आमची शेती… आमचं प्रेम.. 

  सुनिल खरे ( माझा नवरा ) एम्.एस्सी. (अॕग्रि) झालेला. सगळ्या प्रकारची पिकं, भाजीपाला, बटण-मश्रूम, आंबा, अननस… त्यांचं कॅनिंग, डेअरी, पिगरी… असा बराच अनुभव एव्हाना गाठीशी आला होता. जागा मिळेपर्यंत सात वर्षं गेली. तोवर बरोबरची मित्रमंडळी पांगली; मग आपल्याला परवडेल असं वाटणारी चार एकर जमीन आमच्या ताब्यात आली.

   मुख्य गेटच्या आत आल्यावर उजवीकडे अगदी जवळच बोअरचा पंप होता; पण वापर नसल्याने बोअरचं पाणी आटलं. जागा घेतली की तिथेच राहायचं हे सुनिलनी आधीच ठरवलेलं. जंगलच होतं ते, प्रस्तावित अभयारण्य; पण चौकशी करूनही त्याबद्दल माहिती मिळाली नाही.

   आमची ‘आर्किटेक्ट नसलेली’ जागा बांधायला सुरुवात झाली. पहिली स्लॅब पडताच आमची कुत्री आणि पिल्लांना घेऊन सुनिल तिकडे राहायला गेला. दोन महिन्यांनी घर झालं. नाहीतर दोन-चार वर्षं पैसे पाठवणं आणि घर बांधणं चालूच राहिलं असतं. आणखी चारच महिन्यांत नोकरी सोडून मीही दाखल झाले; पण तोंड पुण्याकडेच वळलेलं असे.

मुळशी – ताम्हिणीमध्ये पाऊस जास्त असतो असं ऐकून होतो; पण चेरापुंजीनंतर आमच्याच जागेचा नंबर असेल एवढी कल्पना नव्हती ! दुसऱ्या वर्षीच्या दुष्काळानंतर तिसऱ्या वर्षी चेरापुंजीपेक्षाही जास्तच पाऊस पडला. सतत वादळी वारे! पहिल्या वर्षीच्या रात्री आडवं झालो की आवाजांनी सतत वाटायचं की हे घर आपल्याला घेऊन केव्हाच उडून जाईल; पण कालांतराने पाऊस कमी झाला… वाट बघायची वेळ येऊ लागली.

   पहिलं वर्ष गेलं. शेतातून काहीतरी हाती लागेल अशी आशा निर्माण झाली! विकण्यासाठी काही करायचंच नव्हतं; त्यामुळे तो ताण नव्हता. दुसऱ्या वर्षी भात आलाही कमी; झोडपणीपूर्वी उंदरांनीही बराच खाल्ला. गहू नव्हताच. इथे भाताबाजूने किंवा बांधावर पावटा लावण्याची पद्धत आहे. दुसऱ्या – तिसऱ्या वर्षी तो लावला. आलाही चांगला; पण वेळच्यावेळी काढणंच होईना! मग तो जून होतो.  कीड लवकर लागते. तीच कथा तुरीची. उपम्यात ओली तूर फार आवडते; पण तो वापर किती… आणि लावलेल्यातलं उत्पन्न किती… तूर सोलून त्याची डाळ करून घेणं हे काही सोपं काम नाही हे लवकरच लक्षात आलं; मात्र तूर ही खत म्हणून फार चांगली , त्यामुळे ती लावायचीच , असं ठरलं.

   तिसऱ्या वर्षी भात मिळाला म्हणजे जेमतेम बियाणं परत मिळालं; पण या वेळपर्यंत एक लक्षात आलं, इथल्या शेतांमधून जे लोक कामं करतात ते स्वतःच्या शेतांमधून. सगळे आवश्यक तेवढे दिवस सगळ्यांकडे भाताची कामं करून कोंबडीचं जेवण करतात. पैशाचे हिशोब नसतात म्हणून परवडतं; पण त्यांची कामं संपल्याखेरीज तुमच्या कामांकडे कोणी फिरकत नाही. कधीकधी काढून ठेवलेला भात लगेच पावसात भिजतो. एकूणच हे परवडणारं काम नाही असं लक्षात आलं.

   आता घरात किंवा शेतातही कामाला , मदतीला नेहमीचं असं कुणीच नव्हतं. नाही म्हणायला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आम्ही स्वीटकॉर्न मात्र बऱ्या प्रमाणात खाल्ले, आपल्या लोकांनाही दिले. चांगल्या भाज्या-पिकांच्या बिया आम्ही पुढच्या वर्षीसाठी जपून ठेवू लागलो.

   बियाणं टाकूनही उगवायचं नाही याची दोन कारणं होती; विशेषतः अनेक प्रकारची कडधान्यं , मका , भुईमूग शेतात टाकलं की खायला पक्षिगण टपलेलेच असायचे. पहिल्या दुसऱ्या वर्षी भात पाखडत असताना चार दोन चिमण्या दिसल्या होत्या त्या पुन्हा फिरकल्या नाहीत; पण वेडे राघू , बुलबुल , भारद्वाज, साळुंक्या, सातभाई , खंड्या , बगळे , पाणकोंबड्या, काळेभोर पांढऱ्या पट्ट्यांची पंखासारखी शेपूट मिरवणारे आणि दुसरे भिंतीवर मातीचं घरटं करणारे अगदी छोटे काळसर पक्षी सतत भिरभिरताना दिसायचे. क्वचित वटवटे , डोमकावळे;  पण या सगळ्यांपेक्षाही दाणे टिपण्यात पटाईत असायचे ते मोर! टाकलेलं बियाणं दुसऱ्याच दिवशी दिसेनासं व्हायचं. रोज संध्याकाळी घरापासून दूर असलेल्या फाटकाजवळून इकडून तिकडे जाणारी मोराची तीन पिल्लं आम्हांला दिसायची. पिसाराधारित मोठ्या मोरानंही दोन-तीनदा दर्शन दिलं. पुढच्या दोन वर्षांतही ते कधीतरी आढळायचे. कलिंगडं, चिबुडं, मका घराजवळच्याच छोट्याशा जागेत छान वाढलं म्हणून पलीकडे आणखी लावलं. पीक अमाप आलं; पण येणारे जाणारे, विशेषतः कातकरी चोऱ्यामाऱ्या करू लागले. भोपळे, कलिंगडं रात्रीच्या वेळी जात राहिली.

दोन वर्षे थोडी थोडी मोहरी, त्यानंतर धणे आणि मेथीही थोडी थोडी मिळाली; पण म्हणण्यासारखी कोथिंबीर आणि मेथीची भाजी मिळायला मात्र आणखी दोन वर्षे लागली.

आगंतुक पाहुणे… 

सुरुवातीच्या काळात चरायला जाणारी गुरं अवचित शेतात घुसायची. पूर्वी त्यांचा वहिवाटीचा रस्ता होताच इथून. अचानक कुंपण पडल्याने त्यांनाही गोंधळायला होत असावं; मग आमची दाणादाण… पिंजऱ्यात आणि पार्किंगमध्ये असलेल्या आमच्या श्वानसेनेला बाहेर काढून काठ्या घेऊन आम्ही त्यांच्या मागे पळायचो.

आपल्या पूर्वजांनी हजेरी लावायला एव्हाना सुरुवात केली होती. दरवर्षी पावट्यावर धाडी सुरू झाल्या. दोघे-तिघे तरी असायचे. तीन तीन डॉबरमन पुरे पडायचे नाहीत. आजही कधी दगड, कधी फटाके, शिवाय काठ्या घेऊन मागे धावणं चालतंच मधूनमधून! दोन वर्षांपूर्वी लावलेल्या केळीची छोटी बाग तर आता आमंत्रणच देते माकडांना ! तिथे तर डुकरंही येतात. अंग घासून केळी पाडतात. घडाची वाट लावतातच, पण कंदही उकरून खातात! 

गवत काढणे – एक कार्यक्रम…

पावसाळ्यानंतर गवत काढणं हे एक इथलं मोठं काम ! ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत पाऊस चालूच असतो ! गवताला भरमसाठ वाढ! नवरात्रात म्हणे अनेक पटींनी वाढतं! पाऊस थांबला, म्हणेतो, ते माणसाचीच उंची गाठतं! काढायला माणसं मिळायची तर किमान नोव्हेंबर उजाडतोच. माणूस मिळत नाही म्हणून पहिल्या वर्षी इथे राहणाऱ्या मारुतीनेच ते काढायचं ठरवलं आणि चेंगटपणे, आरामात , आवश्यक तेवढ्या ठिकाणचं जेमतेम काढलं. त्याचं निम्मं लक्ष त्या काळात त्याच्या घराकडेच होतं. मग सुट्टी घेऊन तो निघूनच गेला तो कायमचाच! गुरांसाठी गवत न्यायला तयार असणारे काही भेटतात; पण पंधरा हजाराच्या कामाला चाळीस हजार रुपये मागतात; मग गवत शेतातच जिरवायचं ठरवलं. गवत काढण्याची सायकलही घेतली, आजुबाजूला वणवे लागतात, लावतात म्हणून शक्यतो ते काढण्याचाच विचार असे. प्रत्यक्षात जानेवारीपर्यंत कसंबसं उरकतं ते काम. मग लावलेल्या झाडांतील नेमकं काय शिल्लक राहिलं आहे ते समजतं !

आमची फळबाग..

पहिल्या वर्षातच शंभरपैकी सुमारे चाळीस आंबे, चाळीस नारळ धारातीर्थी पडल्याचं आढळलं. असं का व्हावं? त्याचाही शोध हळूहळू लागला. इथल्या पावसात विंडचिल फॅक्टर झाडांना त्रास देतो असं लक्षात आलं. आडोसा असेल तर छोटी झाडं टिकली आहेत असं दिसतं. काही झाडं वादळी  वाऱ्याने पडतात. पाच वर्षांचा सुंदर बांबू दोन हजार वीसमध्ये निसर्ग वादळात जमीनदोस्त झाला. आता जी जगतील तीच झाडं लावायची असं ठरवलं; मग मदतीला दीड-दोन वर्षे कुणीच नव्हतं. पलीकडच्या शेतात काम करणारं जोडपं कधीमधी अडीअडचणीला यायचं; पण आपल्या मर्जीने! त्यांच्याच ओळखीने एक मुलगा आला – त्यांच्याच गावचा – म्हणजे पाच कि. मी. वरचा. बस एकच – तिनं सकाळी यायचा, संध्याकाळी पाचला निघायचा. उन्हाळ्यात झाडांना पाणी घालायचं काम काही व्हायचं नाही; तरी शेतात बऱ्याच ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय करून घेतली होती; त्याचं अनुदानही खूप खटपटी करून मिळवलं होतं. फुलझाडांना तरी नळीने घालावं लागतंच. दोन वर्षे थोडी थोडी मोहरी, त्यानंतर धणे आणि मेथीही थोडी थोडी मिळाली; पण म्हणण्यासारखी कोथिंबीर आणि मेथीची भाजी मिळायला मात्र आणखी दोन वर्षे लागली.

पुन्हा एकदा थोडा काळ मदतनीसाशिवाय गेला; मग एक जोडपं आलं. संध्याकाळी झाडांना पाणी घालायच्या वेळेला तो माणूस त्याच्या झोपडीबाहेर दाढी करत बसला. घरात कपाट आवरत असलेल्या त्याच्या बायकोला लगेच नवऱ्याबरोबर फिरायला जायचं होतं. तेवढा कप्पा तरी पूर्ण कर म्हटलं  तर खुशाल ‘नाही ‘ म्हणाली; मग दोघांनाही लगेच ‘निघूनच जा!’ म्हटलं.

   त्यानंतर मात्र एक जोडपं आलं आणि ते अनेक त्रासांना तोंड देऊन अजूनही टिकलं. ते आल्यानंतरच आमची दोन कुत्री मेली – एक साप चावून आणि एक आजारपणाने; त्यामुळे सगळंच त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आम्हांला डॉबरमनच हवी होती; पण मिळेना म्हणून एकाच्या जोडीला दुसरी कारावान हौड मादी  ‘सखी’ आणली. मग एक डॉबरमन मादी मिळाली, ती ‘बिजली.’ दोन म्हशी घेतल्या त्याला आता तीन वर्षं झाली; पण अजूनही त्या फळेनात; मग दोन महिन्यांपूर्वी दुभती गाय घेतली – ती नंदिनी- आजही गोड दूध देते. रोज दोन लिटर दूध घेणारं एक गिऱ्हाईकही लगेच पक्कं झालं हे विशेष.

दरम्यान कारावान हौंड ‘सखी’ बाहेर जाऊन शेण खाऊन आली. त्यात माझं आजारपण, आम्ही दोघे बाहेर; पण आमच्या बाईंनी तिची नऊ पिल्लं झाल्याचं बाळंतपण कुठल्याही अनुभवाशिवाय उत्तम केलं. त्या अशक्त जीवाला मदतही केली. पिल्ले जातील तशी देऊन टाकली. आपण छान वाढवली असली; तरी पैसे देऊन कुणी घ्यायला पुढे येत नाही. व्यावसायिक ब्रीडर्सकडून मात्र वारेमाप पैसे खर्च करून सगळेच अशक्त, पिसवा झालेली पिल्ले विकत घेतात हा आणखी एक अनुभव गाठीला आला. दोन म्हशी मात्र अजूनही फळत नाहीत. व्हेटर्नरी डॉक्टर त्यांचं काम असूनही वेळच्यावेळी येत नाहीत. त्यांच्या हाताखाली बरंच क्षेत्र असतं शिवाय इतर कुठल्याही सरकारी नोकरांप्रमाणे इतर गोष्टी चालतात. मग वाट बघत बसण्यापलीकडे काही हातात राहत नाही. आताची माणसं मात्र स्वतः अंड्याला हात लावत नसूनही आमच्या बाळांना अंडी खायला घालतात, विचित्र वासाचं डॉगफूड घालतात, त्यांच्यासाठी भाकरी करतात,मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करतात,आमच्यासाठी तर करतातच! त्यातूनच धावपळ करून कित्येक मैलांवराच्या आपल्या गावात सण, उत्सव, पूजाही करून येतात. तारखा जमवताना आमची आणि  त्यांची – दोघांचीही – दमछाक होते; पण चार चांगल्या माणसांवरच जग चालतं यावरचा विश्वास दृढ होतो.

तीन वर्षांपूर्वी स्ट्रॉबेरी लावायला सुरुवात केली. बरीच तयारी असते. आता चौथं  वर्ष; पण स्ट्रॉबेरी छान आली. पांढरे जांब भरपूर येतात. थोडे गुलाबजाम (सुंदर वासाचे ) आणि थोडे लालही येतात. गरजेनुसार दारात विकायलाही बसता येतं. नात्यात, ओळखीत भरपूर दिली, जॅम केले, वाईन बनवली. सगळ्यांनी आस्वाद घेतला. गंमत! 

हे सगळं करताना होता होईतो आम्ही धरसोड केली नाही, प्रत्येक गोष्टीला पुरेसा वेळ दिला, त्यातून समाधान मिळालं.

Author

Leave a Reply