पुस्तक परिचय : द विझर्ड अँड द प्रॉफेट

द विझर्ड अँड द प्रॉफेट (टू ग्राउंडब्रेकिंग सायंटिस्ट्स  अँड देअर कॉन्फ्लिक्टिंग  व्हिजन्स ऑफ द फ्युचर ऑफ अवर प्लॅनेट) – चार्ल्स सी. मान

प्रकाशक – पिकॅडोर   

६०८ पाने 

किंमत – रु.५१० किंडल – रु.३९८ 

अमेरिकन पत्रकार आणि लेखक ‘चार्ल्स मान’ हे विविध पुरस्कारांचे विजेते आहेत. फॉर्च्यून, द न्यूयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट अशा नियतकालिकांसाठी त्यांनी विपुल लेखन केले आहे. ‘द विझर्ड अँड द प्रॉफेट’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी गेल्या शतकातल्या शेती, लोकसंख्या आणि पर्यावरण यांच्या भवितव्याबद्दलच्या, दोन अगदी विरुद्ध विचारसरणींचा इतिहास सांगितलेला आहे. 

या पुस्तकाच्या शीर्षकातला विझर्ड – ‘जादूगार’ – म्हणजे नोबेल पुरस्कार विजेता आणि हरित क्रांतीचा जनक नॉर्मन बोरलॉग. नवनिर्मिती आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर आपण पर्यावरणाच्या कुठल्याही समस्येला सामोरे जाऊ शकतो अशी त्याची धारणा होती. या शीर्षकातला प्रॉफेट – ‘प्रेषित’- म्हणजे आधुनिक पर्यावरणवादी चळवळीचा जनक विल्यम व्होट. लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर नियंत्रण असले पाहिजे असे त्याचे ठाम मत होते.  

पुढल्या ३०-४० वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या १० अब्ज इतकी होईल असा एक अंदाज आहे. हा आकडा छाती दडपून टाकणारा आहे. १९७०च्या दशकात जगातले २५% लोक कुपोषण आणि उपासमार यांचे बळी होते. आज हा आकडा १०% च्या आसपास आहे; त्यामुळे जागतिक पातळीवर लोकांची परिस्थिती सर्वसाधारणपणे सुधारते आहे हे मान्य केले पाहिजे. बहुतेक अर्थतज्ज्ञांच्या मते कितीही संथ गतीने किंवा विषमतेने झाली; तरी जागतिक अर्थव्यवस्थेत वाढ ही झालीच पाहिजे; पण आपल्या पृथ्वीची कुठेतरी मोडतोड केल्याशिवाय आपण १० अब्ज लोकांना अन्न आणि सर्व सोयी पुरवू शकतो का, या प्रश्नाचे उत्तर साधे किंवा सोपे नाही. २०५० साली जगातल्या दहा अब्ज लोकांना  अन्न पुरवण्यासाठी आणखी एका हरितक्रांतीची गरज पडणार आहे; असाही एक अंदाज आहे.   

बोरलॉगवादी आणि व्होटवादी यांच्यातला वाद तीव्र असतो. हा वाद वास्तविकांबद्दल नसून सामाजिक मूल्यांबद्दल असतो. तो चांगल्या आणि वाइटाचा नसून, चांगले आयुष्य कशाला म्हणावे याबद्दलच्या भिन्न कल्पनांचा असतो. व्होटच्या मते जागतिक सुबत्ता ही चांगली गोष्ट नसून ती आपली सर्वात मोठी समस्या आहे. या सुबत्तेचा परिणाम सर्वनाशात होईल याबाबत त्याची खात्री होती. त्याच्या मते डासांवरच्या नियंत्रणाचे आर्थिक फायदे आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांची तुलना केली; तर डासांवरचे नियंत्रण अयशस्वी ठरले होते;  मात्र व्होट आणि समविचारी लोकांची भयानक भविष्यवाणी अनेक वेळा चुकीची ठरली. इतिहासात डोकावून पाहिले तर भयानक दुष्काळ, हृदयविकार, कर्करोग यांमुळे होणार्‍या बळींची संख्या कमीकमी होत चालली आहे. 

व्होटने १९४४ साली मेक्सिकन सरकारसाठी एक गोपनीय अहवाल लिहिला. त्यात त्याने म्हटले होते की मेक्सिको हा एक आजारी देश आहे. ज्या मातीवर त्याचे भवितव्य अवलंबून आहे, त्या मातीची झपाट्याने धूप होत आहे आणि त्या मातीचा कस कमी होत आहे. नवीन झाडे लावण्याच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जंगलतोड होत आहे. 

त्याचे दोन मुख्य आक्षेप असे होते : 

(१) मेक्सिकोमधल्या जोडप्यांना सहापेक्षा जास्त मुले असतात आणि ही संख्या वाढत असल्यामुळे लोकसंख्येत वाढ होत आहे. (२) जास्तीत जास्त आर्थिक विकास करण्याच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. 

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन यांनी सरकार आणि खाजगी व्यवसाय यांनी एकत्र येऊन अधिकाधिक उत्पादन आणि अधिकाधिक रोजगारनिर्मिती करण्यासाठी काम करावे असा संदेश दिला होता. व्होटच्या मते ही विचारसरणी नैसर्गिक संतुलन बिघडवणारी होती. याउलट इंग्लिश पर्यावरणतज्ज्ञ चार्ल्स एल्टन याच्या मते नैसर्गिक संतुलन असे काही नसते आणि भूतकाळातही ते कधीच नव्हते. सुरुवातीला लोकांनी व्होटला माल्थसवादी ठरवून टाकले होते. प्रचंड वाढत्या लोकसंख्येमुळे मानवाला मोठ्या उपासमारीला तोंड द्यावे लागेल असा इशारा अठराव्या शतकात देणाऱ्या माल्थस या इंग्लिश विद्वानाचे नाव विसाव्या शतकात अनेकजण कुत्सितपणे घेत असत. 

१९४५ साली जपानवर टाकलेल्या अणूबॉंबमुळे व्होटच्या बोलण्याकडे लोकांचे लक्ष पुन्हा एकदा वेधले गेले. संपूर्ण शहर उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेमुळे, ‘मानव आपल्याच जमातीचा नायनाट करू शकेल,’ हा व्होटचा इशारा लोकांना भयकारकरीत्या शक्य कोटीतला वाटायला लागला. ‘रोड टू सर्व्हाइवल’ हे व्होटचे महत्त्वाचे पुस्तक. सुरुवातीला टाइमसारख्या जगप्रसिद्ध मासिकाने त्यावर सडकून टीका केली. व्होटने सांगितलेल्या सर्व गोष्टी खोट्या, मोडतोड करून सांगितलेल्या किंवा सिद्ध न करता येण्याजोग्या आहेत, असा त्या टीकेचा रोख होता. संततिनियमनाचा पुरस्कार केल्यामुळे चर्चने त्या पुस्तकाला विरोध केला. सरकारी नियंत्रणाचा पुरस्कार केल्यामुळे ते सनातनी लोकांना आवडले नाही आणि भांडवलशाहीवर हल्ला चढवल्यामुळे ते व्यावसायिक आणि कारखानदारांना आवडले नाही. 

व्होटच्या अगदी उलट मते बोरलॉगची होती. यंत्रे वजा केली तर माणूस फक्त एक गुलाम बनून राहतो; तर मानव आणि यंत्र मिळून एक स्वतंत्र मानव तयार होतो, असे हेन्री फोर्डचे मत होते. बोरलॉगचे मत तसेच होते. भुकेमुळे लोक दंगेधोपे करतील आणि त्यांना कोणी दोष देऊ शकणार नाही, अशी त्याची धारणा होती.  

शेतीमुळे मानवाचे निसर्गाबरोबरचे नातेच बदलून गेले. शेतीचा शोध लागला त्यावेळी बहुतेक जागी कचराखत आणि शेणखत यांचा पुरवठा मर्यादित असायचा. ते एका जागेहून दुसऱ्या जागी वाहून नेणे अतिशय खर्चाचे काम असायचे. आज जगातली अर्धी पिके रासायनिक खतांनी पुरवलेल्या नत्रवायूवर अवलंबून असतात. त्यांना विरोध करणाऱ्या व्होटचे विचार अमलात आणण्यात सगळ्यात मोठा अडथळा असतो तो पुरेशा संख्येने मजूर उपलब्ध नसल्याचा.  

बोरलॉगने हरित क्रांतीचा पुरस्कार केला. १९६८ साली त्याच्या विरोधकांनी हरित क्रांती ही पर्यावरण, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने विध्वंसक असल्याचे ठरवले. १९७० साली मिळालेल्या नोबेल पुरस्कारानंतरही बोरलॉग हा काहीसा दुर्लक्षितच राहिला; पण त्याच्या हरित क्रांतीचा आदर्श मात्र भारतासह अनेक देशांनी आणि लोकांनी मानला. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित अशी आपली पहिलीच संस्कृती आहे, असे त्याचे प्रतिपादन होते. 

रासायनिक खतांचे टीकाकार असे म्हणतात की शेतात वापरलेल्या खतापैकी ६०% खत झाडांकडून शोषून घेतले जात नाही. ते तसेच वाहून जाऊन नाईट्रस ऑक्साइडच्या स्वरूपात नदीला जाऊन मिळते. हे नुकसान वर्षाला अब्जावधी डॉलर्स इतके मोठे असते; शिवाय तापमानातल्या बदलाच्या खालोखाल याचे दुष्परिणाम सर्वात जास्त आहेत; मात्र केवळ सेंद्रिय खते वापरून सर्वांना पुरेल एवढे पीक घ्यायचे असेल तर मजुरी, वाहतूक आणि आयोजन यांसाठी लागणारा पैसा आणि श्रम प्रचंड असतील याचा विचार सेंद्रिय खतांचे समर्थक करताना दिसत नाहीत. रासायनिक खते वापरून काढलेले पीक कदाचित कृत्रिम असेल; पण त्यामुळे गोरगरिबांचे जीवन बरेच सुसह्य झाले, याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. 

धान्याच्या आणि फळांच्या नव्या जाती बनवताना लोकमताचा विचार महत्त्वाचा ठरतो. १९९९ साली एका पाहणीत अमेरिकेतल्या २५% हून अधिक लोकांच्या मते जेनेटिकली मॉडिफाइड सूक्ष्म जंतूपासून (जी.एम.ओ.) बनवलेले अन्न असुरक्षित होते. प्रयोगशाळेत वैज्ञानिक विचारतात, ‘असे अन्न बनवणे शक्य आहे का?’ आणि बाहेरचे लोक विचारतात, ‘असे अन्न बनवणे योग्य आहे का?’ मात्र हेच लोक जी.एम.ओ.चा औषध म्हणून खुशीने स्वीकार करतात, असे लेखकाने नमूद केले आहे.   

कुठल्या तरी दूर देशांतल्या गरीब, अनामिक लोकांना फायदा होऊ शकेल म्हणून आपल्या घराजवळ शेतीविषयक अपरिचित प्रयोगांचा धोका पत्कारायला अनेक लोक तयार नसतात. जगातल्या गोरगरिबांना वरदान ठरेल असे स्वस्त धान्य बनवण्यात श्रीमंत देशांतल्या शेतकऱ्यांना स्वारस्य नसते. जे धान्य श्रीमंत देशांत खाल्ले जात नाही ते खायला गरीब देशही नकार देतात; त्यामुळे नैतिकता हा विषय विज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर असतो, हेच यातून दिसून येते. 

सांडपाणी आणि कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी नदीत किंवा समुद्रात सोडण्यापूर्वी क्लोरीन आणि अतिनील किरणांसारख्या जंतुनाशकांनी शुद्ध केले पाहिजे. असे करणे खर्चीक असते; म्हणून अनेक वेळा सरकारांकडून याबाबत टाळाटाळ केली जाते. इस्राएलमधे प्रक्रिया करून शुद्ध केलेल्या पाण्यापैकी ८५% पाणी शेतीसाठी वापरले जाते. अशा प्रकारे केलेला पाण्याचा पुनर्वापर हा ‘प्रेषितांच्या’ आवडीचा मार्ग आहे. याउलट ‘जादूगारांच्या’ आवडीचा मार्ग म्हणजे मोठ्या धरणांचा आणि मध्यवर्ती पाणीसाठ्याचा. यात एक व्यावहारिक बाब अशी की पाणी वाचवणे हा मार्ग पत्करला; तर अधिक पाणी पुरवायला काही समर्थन रहात नाही आणि अधिक पाणीपुरवठा केला; तर पाणी वाचवायचे कारण काय, असा प्रश्न पडतो. आदर्श ठिबक सिंचनामुळे झाडांच्या मुळांकडून ज्या वेगाने पाणी शोषले जाते, त्याच वेगाने पाणीपुरवठा होतो. काहींच्या मते असले काही प्रकार म्हणजे, ‘पाण्याचे दुर्भिक्ष,’ या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून केलेले तात्पुरत्या मलमपट्टीसारखे उपचार. शहरी नियोजन हे लोकशाहीपेक्षा हुकूमशाहीमध्ये सोपे जाते. सरकारी भ्रष्टाचार, ढिसाळपणा, कार्यक्षमतेचा तसेच इच्छाशक्तीचा अभाव हे अशा कामात मोठेच अडथळे असतात. 

चीनमध्ये कोळशाचा इंधन म्हणून वापर ५००० वर्षांपूर्वीपासून चालत आलेला आहे. कोळशामुळे कितीही प्रदूषण झाले तरी युरोपीय राष्ट्रांना दुसरा पर्याय नसल्यामुळे ते कोळशाचा उपयोग अनेक शतके करत राहिले. कोळसा आणि तेल यांच्या वापराला सरसकट विरोध करताना आपण काही गोष्टी विसरू शकत नाही. माणसांचे राहणीमान सुधारले आहे हे दर्शवणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यांपैकी काही म्हणजे  आयुर्मर्यादा, पोषण, उत्पन्न, मृत्युदर वगैरे. यांपैकी कशाचाही आलेख बघितला, तर तो अनेक शतके खालच्या पातळीवर रेंगाळताना दिसतो; पण कोळसा, तेल आणि वायू या इंधनांचा वापर सुरू झाल्यावर मात्र तो एकदम उसळी घेताना दिसतो.   

१९७०च्या तेलाच्या तुटवड्यामुळे तेलाचा वापर कमी करण्याऐवाजी अधिक तेलसाठ्यांचा शोध सुरू झाला – ही विकृती होती. अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांनी तेलाच्या तुटवड्यावर इलाज म्हणून कोळशाचा वापर वाढवायचे ठरवले. कोळसा हा फारच जास्त प्रदूषणकारी आहे; त्यामुळे त्यांचा हा उपाय रोगापेक्षा भयंकर होता.  

कोळसा आणि तेल यांना सौर ऊर्जा हा एक चांगला पर्याय आहे असे अनेक लोक मानतात. सौर ऊर्जेचा फायदा असा असतो की आज कितीही ऊर्जा शोषून घेतली तरी उद्या सूर्याकडून आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जेत काही फरक पडत नाही. सौर ऊर्जा विकली किंवा खरीदली जाऊ शकत नाही. तिच्यावर कोणाची मालकी असू शकत नाही. आता सौर ऊर्जेतून वीज बनवण्याच्या कारखान्याची किंमत, कोळशातून वीज बनवायच्या कारखान्याएवढीच झालेली आहे. ही किंमत यापुढे आणखी कमी होणार आहे. 

मात्र अक्षय ऊर्जेचा पाठपुरावा करणाऱ्या ‘प्रेषितांना’ सौर किंवा वात ऊर्जेसाठी उभारलेले महाकाय प्रकल्प, कोळसा किंवा तेलावर वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांइतकेच अप्रिय वाटतात. त्यांची पसंती विकेंद्रीकरण आणि आकाराने लहान प्रकल्प यांना असते. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांच्यात सातत्य नसल्यामुळे अजूनतरी त्यांची कोळसा आणि तेल यांच्याशी बरोबरी होऊ शकत नाही. 

कोळसा आणि तेल जाळल्यामुळे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड ही खरी समस्या असते. हवेतल्या कार्बन डायऑक्साईड मधल्या थोड्याशा फरकानेसुद्धा हिमयुग येऊ शकते. कार्बन डायऑक्साईडमुळे पृथ्वीतून इन्फ्रारेड किरणांच्या स्वरूपात अवकाशात फेकली जाणारी ऊर्जा अडवली जाते; त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत जाते. तापमानातल्या बदलाचा फटका सर्वात आधी समुद्रातली बेटे, समुद्रसपाटीला असणारी किनारपट्टीजवळची गावे, उत्तर ध्रुवावर राहणारे लोक आणि ज्या जंगलात सहजासहजी वणवे लागू शकतात – तिथे राहणारे लोक – यांना बसेल. 

ज्या लोकांनी प्रदूषण केले आहे त्यांनी पर्यावरणाच्या सफाईचा खर्च करावा ही मागणी न्याय्य वाटते; पण पर्यावरणातले बदल टाळण्यासाठी लागणारा खर्च फार मोठा आहे आणि त्याचा फायदा भविष्यात कधीतरी, कोणालातरी होऊ शकेल. हे म्हणजे, ‘एखाद्या कॉलेजकुमाराला दुसऱ्या कोणाच्या तरी नातवंडांसाठी आताच बचत करायला सांगण्यासारखे आहे,’ असे लेखक म्हणतो. आजच्या जगण्यापेक्षा भविष्यातल्या पिढ्या जास्त महत्त्वाच्या आहेत, हे सर्वांना पटवणे अवघडच असेल. या सगळ्या गोंधळात भर म्हणून काही वैज्ञानिक तापमानातल्या वाढीचे भाकीत करतात; तर काही हिमयुगाचे भाकीत करतात; त्यामुळे यासंदर्भात जनमत तयार करणे अधिकच कठीण होते.  

निसर्गात एवढ्या मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ करण्याचा मोह फक्त ‘जादूगारांनाच’ होतो असे नाही. भयानक दुष्काळ, महापूर यांच्या धास्तीमुळे ‘प्रेषितही’ अशा काही मार्गांचा विचार करताना दिसतात. माणसाने तयार केलेल्या कार्बन डायऑक्साईडपैकी ४०% वनस्पतींकडून शोषला जातो; त्यामुळे जर सहारा वाळवंटात जंगल निर्माण करता आले तर कार्बन डायऑक्साईडचा प्रश्न सौम्य होऊ शकतो, असा विचार त्यामागे आहे. ‘जादूगारांच्या’ मते वाळवंटाची एक स्वतःची व्यवस्था असते. जंगलांमुळे तिचा नाश होऊन इतर काही अनपेक्षित समस्या उभ्या राहू शकतील. त्यातून ‘हिरवा विस्तारवाद’ तयार होईल आणि जगभरातल्या धनिकांच्या फायद्यासाठी, वाळवंटातल्या गरीब लोकांना त्याची किंमत चुकवावी लागेल.    

वाढती लोकसंख्या हा व्होटच्या दृष्टीने फार मोठा प्रश्न होता. सर्वसाधारणपणे लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या कार्यक्रमांना नैसर्गिक विज्ञान क्षेत्रातले लोक म्हणजे, जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी पाठिंबा  दिला. मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, अशा लोकांनी मात्र विरोध केला असे लेखकाचे निरीक्षण आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनने लोकांना एकपेक्षा जास्त मूल होऊ देण्यावर बंदी आणली. त्यासाठी जबरदस्तीने कोट्यवधी गर्भपात झाले. त्यात गरीब कुटुंबांचे अतोनात हाल झाले. आता चीनने या धोरणाचा अधिकृतपणे त्याग केला आहे. आज दिल्ली शहराची लोकसंख्या बेसुमार वाढते आहे; मात्र त्याची कारणे आर्थिक आणि सामाजिक आहेत. 

आपल्या पृथ्वीवर अमर्याद साधनसंपती नाही हे उघड आहे; पण आर्थिक प्रगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातले निश्चित नाते स्पष्टपणे सांगता येणार नाही असे लेखकाला वाटते. यासाठी तो डेन्मार्कचे उदाहरण देतो. डेन्मार्कची अर्धी वीज पवनऊर्जेतून निर्माण होते; पण डेन्मार्कचे नागरिक इतके मांस खातात आणि इतके पेट्रोल जाळतात की पर्यावरणावर सर्वात जास्त घातक परिणाम करणाऱ्या देशांमध्ये डेन्मार्कचा चौथा क्रमांक लागतो. लोकसंख्येचा पर्यावरणाच्या ऱ्हासावर होणारा परिणाम हा अप्रत्यक्ष असतो हे आता मान्य झाले आहे; मात्र या वादात दोन दशके वाया गेली याची लेखकाला खंत वाटते.  

या पुस्तकातला एक मोठा भाग भारताविषयी आहे. नेहरूंना गरिबांविषयी कणव होती; मात्र त्यांनी कारखानदारीच्या प्रगतीसाठी राबवलेल्या धोरणांमुळे शेतीचे नुकसान झाले आणि कारखानदारीवर भर देऊन शेतीउत्पादनात तूट येताच कारखानदारीवर अधिकच लक्ष केंद्रित केले; असा लेखकाचा दावा आहे. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या दोन दशकांमधे भारताला दुष्काळ आणि अन्नटंचाईच्या भीषण समस्येचा सामना करावा लागला. या समस्येचे निवारण कसे झाले  याचे उत्तर १९६०च्या दशकातल्या राजकीय घडामोडींच्या उत्कंठावर्धक पद्धतीने मांडलेल्या इतिहासामधून वाचकाला मिळते. त्या काळच्या राजकीय घडामोडींचा ज्या काही लोकांना अप्रत्यक्ष फायदा झाला त्यांतले एक म्हणजे एम.एस. स्वामिनाथन्. ते भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. स्वामिनाथन् आणि बोरलॉग यांची गाठ पडली तेव्हा अर्धशिक्षित आणि काहीशा उर्मट वाटणाऱ्या आणि भारतीयांना उपदेश करू पाहणाऱ्या बोरलॉगसारख्या परदेशी माणसाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले असण्याची शक्यता कमी होती. याउलट बोरलॉगला स्वामिनाथन् हे फक्त स्वतःच्या करिअरची काळजी करणाऱ्या मेक्सिकोमधल्या अधिकाऱ्यासारखे वाटले असतील, असे येथे सुचवले आहे. बोरलॉगच्या नंतर लक्षात आले की स्वामिनाथन् हे केवळ पाट्या टाकणारे नोकरशहा नसून ते त्याला भेटलेल्या अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेच्या शेतकीतज्ज्ञांपैकी एक होते. स्वामिनाथन् यांच्याही लक्षात आले की बोरलॉगचा उर्मटपणा हा प्रत्यक्षात स्पष्टवक्तेपणा आणि एखाद्या लहान मुलासारखा साधेपणा होता. 

१९६०च्या दशकात भारताचे गव्हाचे उत्पादन पुरेसे नव्हते. बोरलॉगने संशोधन करून बनवलेल्या गव्हाचे पीक नेहमीच्या गव्हाच्या चौपट होते. त्या संदर्भात चाचण्या करण्यासाठी चौपट परकीय चलन वापरून गहू आयात करणे आवश्यक होते. पुढचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि कृषिमंत्री सी. सुब्रमण्यम् यांनी आवश्यक परकीय चलन उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. अधिक धान्य पिकवायच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात खतांची आवश्यकता होती. भारतात मोठे कारखाने निघू शकले नाहीत; कारण त्यावेळी भारतात भांडवलाचा तुटवडा होता. दुसरीकडे भारतात अमेरिकन कंपन्यांना खतांचे कारखाने काढायची परवानगी मिळावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी भारतावर दबाव आणला होता. जर शास्त्रींनी हे मान्य केले नाही; तर भारताला मिळणारी अन्नधान्याची मदत थांबवली जाईल; अशी धमकीही त्यांनी दिली. 

शास्त्री आणि सुब्रमण्यम् हे दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते. त्या दोघांनाही ब्रिटिशांनी तुरुंगात ठेवले होते. त्या दोघांनीही नेहरूंच्या कारखानदारीला शेतीपेक्षा प्राधान्य देण्याच्या भूमिकेविरुद्ध युक्तिवाद  केला होता. शास्त्रींना भारताच्या चीनविरुद्धच्या १९६२च्या युद्धातल्या पराभवाची चांगली जाणीव होती; पण जॉन्सन यांच्या दंडेलीपुढे माघार न घेण्याबद्दल ते ठाम होते. 

नंतर पुढच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या एक जुगार खेळल्या आणि त्यांनी सरकार किंवा कंपन्यांबरोबर करार करण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांबरोबर करार केले. याबाबतीत बोरलॉगने मेक्सिकन सरकारबरोबर वाटाघाटी करून या करारांना मदत केली. याच सुमाराला बिहारमधे भयानक दुष्काळ पडला होता. इंदिरा गांधींनी अधिकृतपणे ‘दुष्काळ’ हा शब्द वापरायला नकार दिला; कारण या शब्दामुळे लोकांवर होणारा नकारात्मक मानसिक परिणाम त्यांना टाळायचा होता. जॉन्सन यांचा दुष्काळ शब्द वापरण्याबाबत आग्रह होता; कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या काँग्रेसकडून मदत मिळवणे काहीसे सोपे झाले असते. दुष्काळ हा शब्द वापरला नाही; तरी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठे कर्ज घेऊन धान्याची प्रचंड आयात केली. त्यापैकी बरीचशी अमेरिकेकडून आली होती. दोन कोटी टन धान्य आयात केल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात भूकबळी झाले नाहीत; मात्र इंदिरा गांधींच्या एवढ्या प्रयत्नांनंतरसुद्धा मतदारांनी पुढच्या निवडणुकीत बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव केला.   

१९६७च्या निवडणुकीच्या वेळी स्वामिनाथन् आणि बोरलॉग भारतभर फिरत होते. यावेळी मेक्सिकन गव्हाचे चांगले पीक येत होते. ते दोघेही कृषिमंत्री सुब्रमण्यम् यांच्याकडे गेले आणि त्यांनी हरितक्रांतीला सुरुवात झाली आहे; तेव्हा शेतकऱ्यांना खते, पाणीपुरवठा आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी केली. त्यावेळी सुब्रमण्यम् यांची मनःस्थिती चांगली नव्हती. निवडणुकीत काँग्रेसचे अनेक नेते हरले, त्यात सुब्रमण्यम् यांचाही समावेश होता. अन्नधान्य पुरवठ्याच्या कामात त्यांना आपल्या मतदारसंघात जायला वेळच मिळाला नव्हता. स्वतःच्या कामात गर्क असलेल्या स्वामिनाथन् आणि बोरलॉग यांना याची काहीच कल्पना नव्हती.         

सुब्रमण्यम् यांनी त्यांना नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष अशोक मेहता यांच्याकडे जायचा सल्ला दिला. मेहता यांचा नवीन खतांच्या कारखान्यांना असलेला विरोध जगजाहीर होता. मेहता, स्वामिनाथन् आणि बोरलॉग यांची मीटिंग वादळी ठरली. खतांच्या कारखान्यासाठी भारताकडे पुरेसे भांडवल आणि वीज नाही, हे मेहता यांनी पुन्हा सांगितले. बोरलॉगच्या मते लोकांना अन्न पुरवणे ही सरकारची जबाबदारी होती आणि त्यासाठी खते आवश्यक होती. जर भारताकडे भांडवल नसेल तर परदेशी कंपन्यांना हे कारखाने उभारू द्यावेत, असा आग्रह त्याने धरला. मेहता यांनी याबाबतचा धोरणात्मक विरोध स्पष्ट केल्यावर बोरलॉगचा संताप अनावर झाला आणि त्याने बरीच आरडाओरड केली. 

अशोक मेहता यांच्यावर ओरडणे हा आपल्या कारकिर्दीतला सर्वोच्च क्षण होता असे बोरलॉगने लिहून ठेवले आहे; पण त्याचा परिणाम म्हणून अशोक मेहता यांचे मत बदलले आणि भारताचे धोरण कृषिक्षेत्राच्या बाजूला झुकले; असे मत नंतर इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून आलेल्या सुब्रमण्यम् यांनी व्यक्त केले आहे.  

हरितक्रांतीमुळे कोट्यवधी लोकांच्या अन्नाचा प्रश्न सुसह्य झाला; तरी तिचे काही अनपेक्षित दुष्परिणामही झाले. जमिनीतून जास्त पीक आल्यामुळे जमिनी बळकावण्यासाठी जमीनदारांना आणखी एक कारण मिळाले. ऑक्सफर्डचा अर्थतज्ज्ञ कीथ ग्रिफिन याच्या मते हरित क्रांतीची कहाणी ही एका फसलेल्या क्रांतीची कहाणी आहे. बोरलॉगला नोबेल पुरस्कार मिळाल्यांतर त्याच्यावर मोठी टीका झाली. खते आणि कीटकनाशके यांचा बेसुमार वापर, चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या सिंचन योजना यामुळे जमिनी, हवा आणि पाण्याचे प्रदूषण, पाण्याखाली गेलेल्या किंवा खारवलेल्या जमिनी, खतांच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाचा ऱ्हास याची फार मोठी किंमत द्यावी लागली, असा त्या टीकेचा रोख होता. डाव्या विचारसरणीचा पत्रकार अलेक्झांडर कॉकबर्न याने बोरलॉगची, ‘अनेक लोकांचा मारेकरी’ अशी संभावना केली.  

बोरलॉगच्या मते हरित क्रांतीचे विरोधक, आधीची परिस्थिती किती वाईट होती, याकडे दुर्लक्ष करतात. हरित क्रांतीशिवाय एक अब्ज लोकांना पुरेशा अन्नाचे उत्पादन भारताने कसे केले असते, असा सवाल त्याने केला. हाच प्रश्न जगातल्या सर्वच देशांना लागू पडतो. भविष्यातसुद्धा या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे असणार नाही.  

व्होट आणि बोरलॉग या दोघांनीही आयुष्यभर आपल्या ध्येयाचा पाठपुरावा एका निष्ठेने केला; मात्र या दोघांनीही त्यांच्या धोरणांमुळे जगात कशा प्रकारचे बदल होतील याचा फारसा विचार केला नाही असे लेखकाला वाटते. पृथ्वीवरची मर्यादित साधनसंपत्ती जपून वापरली पाहिजे, त्यासाठी तिचा उपभोग कमी केला पाहिजे आणि लोकसंख्या एका मर्यादेपर्यंत रोखली पाहिजे हे प्रेषितांचे प्रतिपादन तर्काला पटते; पण गेली दोनशे वर्षे त्यांची भयानक भाकिते चुकीची ठरलेली आहेत हा इतिहास आहे. लोकसंख्यावाढीचा दर शून्याखाली गेल्याचे दुष्परिणाम केवळ युरोपीय देशांतच नव्हे तर चीनमधेही दिसून आलेले आहेत. मध्ययुगात फ्लूसारख्या साथीच्या रोगात, युरोपमधले १/३ लोक मृत्युमुखी पडले होते. आज तसे काही होण्याची शक्यता नाही. त्यामुळे २०५० साली जगातल्या १० अब्ज लोकांना अन्न कसे पुरवायचे याकडे दुसऱ्या हरितक्रांतीपेक्षा काही वेगळे उत्तर आजतरी कोणाकडे नाही. ‘जादूगार’ आणि ‘प्रेषित’ यांची विचारांची लढाई इतकी तीव्र आहे की त्यात काही सुवर्णमध्य साधणे आज तरी शक्य वाटत नाही.   

लेखात उल्लेख असलेले आणि भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे एम एस स्वामीनाथन यांचे २८   सप्टेंबर  २०२३  रोजी चेन्नई मुक्कामी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. छायाचित्रात एम एस स्वामीनाथन व नॉर्मन बोरलॉग 

Author

Leave a Reply