श्री. बा. रानडे

अंतर्नाद आंतरजाल माध्यमातून पुन्हा सुरू झाले आहे ही माझ्यासाठी आणि खरेतर सर्वच वाचनप्रेमींसाठी मोठीच आनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. छापील अंतर्नादमधील माझे लेखन मुख्यतः गद्य लेखांच्या स्वरूपात होते; किंबहुना मला गद्य लेखनाची वाट सापडली ती अंतर्नादमुळेच! त्याची सुरुवात झाली २००४ या वर्षी. ‘मनकविता’ सदरासाठी भानू काळे यांनी माझ्याकडे लेख मागितला आणि मी तो दिला. तो लिहिल्यानंतर कवितेविषयी सांगण्यासारखे आपल्याकडे बरेच काही आहे असे मला वाटले आणि मग मी कविताविषयक लेखांच्या दोन मालिका ‘अगा-कवितांनो’ आणि ‘पुन्हा कविता’ या अनुक्रमे २००५ आणि २०१३-१४ या वर्षांत लिहिल्या .
समकालीन कवींविषयीचे लेख २०११-१२ या वर्षांत लिहिले. त्यानंतरही अंतर्नादच्या दिवाळी अंकांतून मी लेख लिहीत राहिलो . त्यातला शेवटचा होता ‘पु.ल. आणि मी.’ तोच धागा पुढे पकडून अंतर्नादच्या या ई-अंकातून, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रांतल्या मला भेटलेल्या मोठ्या माणसांविषयी दरमहा लेख लिहावेत असे योजले आहे. मला आलेल्या त्या मोठ्या माणसांच्या अनुभवांविषयी, त्यांच्या लाभलेल्या प्रेमाविषयी हे लेख असल्यामुळे ते म्हणजे
‘अम्हांस आम्ही पुन्हा पहावे
काढुन चष्मा डोळ्यांवरचा’
असे आहे. यानिमित्ताने कदाचित गेल्या ५० वर्षांचा बदलत गेलेला मराठीचा सांस्कृतिक पट आपल्या डोळ्यांसमोर उलगडेल. दुसरे काही झाले न झाले तरी, मला त्या मोठ्या व्यक्तींचे कृतज्ञतेने पुन:स्मरण करता येईल.
पहिलाच लेख एका सर्वार्थाने – कर्तृत्वाने आणि वयानेही – मोठ्या असलेल्या व्यक्तीविषयी आहे. वयाचे म्हणाल तर त्यांचा जन्म झाल्याला आता १३१ वर्षे उलटली आहेत. मला भेटले तेव्हाच ते नव्वद वर्षांचे होते. विसाव्या शतकातील जवळजवळ सात दशके ते विविध क्षेत्रांत कार्यरत राहिले.
ते होते श्रीधर बाळकृष्ण म्हणजे श्री. बा. रानडे.
त्यांनी पदार्थविज्ञानशास्त्रातले पदव्युत्तर शिक्षण घेतले होते; तेही मुंबई विद्यापीठाचे मूस सुवर्णपदक मिळवून! ते रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य. ते केवळ सदस्यच नव्हते; तर ते आणि त्यांच्या पत्नी कवयित्री मनोरमा रानडे यांनी आपल्या घरी मंडळाचे संगोपन, संवर्धन केले असे म्हणता येईल. श्री. बा रानडे यांच्या मार्मिक टिपण्या अनेकदा इतरांना नवी दिशा दाखवीत असत. त्यामागे त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनही असे .
श्री.बां.नी छायानाट्य, बालसाहित्यदेखील लिहिले. ‘लेझिम चाले जोरात ‘ ही सर्वपरिचित कविता त्यांचीच. मनोरमाबाई आणि श्री.बा. यांच्या कवितांचा एकत्रित संग्रह आहे ‘श्री-मनोरमा’, त्याबरोबरच श्री.बां.चे खंडकाव्य ‘काळाच्या दाढेतून’ प्रसिद्ध झाले . नवयुगमाला आणि इतर अनेक मालिकांचे संपादन श्री.बां.नी केले. त्यांनी विज्ञानकथाही लिहिल्या. त्यांना मराठीतले आद्य विज्ञानकथा लेखक मानले जाते. त्यांची १९८० च्या आसपास सत्यकथा (की मौज?) च्या दिवाळी अंकात आलेली कविता संपादक राम पटवर्धन यांनी विज्ञानकविता नाव देऊन छापली तर श्री.बां. नी ‘ती कविता आहे विज्ञानकविता नाही,’ असे म्हटले होते. स्वतः रोमँटिक कवींच्या रविकिरणी संप्रदायाचे कवी असताना श्री.बां.नी नवीन साहित्याची आणि साहित्यिकांची पाठराखण केली. मर्ढेकरांच्या पहिल्या ‘शिशिरागम’ कवितासंग्रहाचे प्रास्ताविक ‘उत्तर वारा म्हणाला’ श्री.बां.नीच लिहिले आहे. इतरांशी फटकून वागणारे मर्ढेकर शेवटपर्यंत श्री.बां.शी संपर्क ठेवून होते. त्यांच्या काव्यविषयक चर्चा झडत असत. त्यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणेही असे. मर्ढेकरांची ‘पोरसवदा होतीस…’ ही प्रसिद्ध कविता श्री.बां.च्या कन्येला उद्देशूनच होती.
माझी आणि श्री.बां.ची पहिल्यांदा भेट झाली ती १९८२ या वर्षी. माझा पहिला कविता संग्रह ‘होड्या’. तो तुमच्या हस्ते प्रकाशित कराल का? असे मी आमच्याच आळीत राहणाऱ्या अनुराधा पोतदारांना विचारले तर त्यांनी तो आग्रहाने तेव्हा पुण्यात असलेल्या ज्येष्ठ कवी बा.भ. बोरकरांच्या हस्ते प्रकाशित करविला. त्यानंतर माझे अनुराधाबाईंच्या घरी येणे जाणे सुरू झाले. तेव्हा एकदा त्या मला म्हणाल्या, “नानांचा म्हणजे श्री. बा. रानडे यांचा ९० वा वाढदिवस आहे. आपण जाऊ.” श्री. बा. म्हणजे अनुराधाबाईंचे वडील – रविकिरण मंडळाचे वि.द. घाटे यांचे स्नेही. त्यामुळे अनुराधाबाईंचे त्यांच्याशी घरगुती संबंध होते . ते जवळच राहत होते. आम्ही श्री.बां.च्या घरी गेलो. श्री.बां.नी आपण कोणतीही भेटवस्तू, फुले, मिठाई स्वीकारणार नसल्याचे आधीच सांगितले होते. नव्वदीचे श्री.बा. एकटेच राहत होते .आपली सर्व कामे स्वतःच करत होते .अनुराधाबाईंनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. माझा वाकून केलेला नमस्कार मात्र त्यांनी स्वीकारला. पुढे मी म्हणालो, “मी अशी एक गोष्ट देतो जी तुम्हाला नाकारता येणार नाही” आणि मी माझा नुकताच प्रकाशित झालेला होड्या संग्रह त्यांना दिला. तो त्यांना घ्यावाच लागला. अनुराधाबाईंनी या संग्रहाचे प्रकाशन बोरकरांच्या हस्ते झाल्याचे सांगितले. श्री.बां.नी संग्रह हातात घेऊन पाहिला. मग मला विचारले, “ बोरकर भाषणात काय म्हणाले?” थोड्याशा संकोचानेच मी त्यांना होड्या संग्रहाविषयी बोरकरांनी काढलेले काही गौरवोद्गार सांगितले. पुढे म्हणालो, “बोरकर असेही म्हणाले की सूर ताल छंद नसलेल्या कवितेबद्दल मला नफरत आहे; पण जोगळेकरांच्या कवितेला स्वतःची लय आहे.” बोरकरांच्या या उद्गाराबद्दल श्री.बा. म्हणाले, “जिला लय नसेल ती कविताच होणार नाही.” श्री.बां.चे हे म्हणणे माझ्यासारख्या मुक्तछंदी कवीला पटण्यासारखेच होते. श्री.बां.नी काही दिवसांनी संग्रह वाचून झाल्यावर आपले मत सांगू असे सांगितले. आणखी एका कारणासाठी मला श्री.बां शी बोलायचे होते. तेव्हा मी पु.आ. चित्रे यांच्या ‘अभिरुचि’ या नियतकालिकात लिहीत असे. त्यामुळे पु.आ. चित्रे माझ्या संपर्कात होते. कुठल्याही गोष्टीवर लिहिताना त्याच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. काही संदर्भात त्यांना मर्ढेकर आणि माधव जूलियन् यांची प्रत्यक्ष भेटीचे तपशील हवे होते. श्री.बां.ना त्याबद्दल काही स्मरत नव्हते; पण ते म्हणाले, “माधव जूलियन् यांच्या कवितेने मर्ढेकर प्रभावित झाले होतेच; पण त्यांना माधवरावांच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही कुतूहल होते आणि त्याबद्दल ते विचारत असत.
होड्या संग्रह दिल्यानंतर काही दिवसांनी मी श्री.बां.कडे गेलो .आता श्री.बा. नवे फारसे वाचत नसत; पण माझा कवितासंग्रह त्यांनी अगत्याने वाचला होता. त्यांना तो आवडला होता . त्यांना विशेष आवडली होती ती त्यातली ‘मोर सज्जच असतात ‘ ही कविता. तिच्याविषयी ते सविस्तर बोलले. त्यांच्या बोलण्यातून त्या वयातलीही त्यांची मर्मस्पर्शी रसिकता जशी जाणवली तशीच त्यांची वैज्ञानिक दृष्टीदेखील. त्यांनी व्यक्त केलेले मत नीट कळण्यासाठी ती कविता आपल्याला आधी वाचावी लागेल. म्हणून ती देतो.
मोर सज्जच असतात
तसे मोर सज्जच असतात
संकेत मिळताच,
फुलवायला आपला पिसारा .
मी उघडते तू दिलेला गोल जपानी पंखा
अन् सहजच टेकवते नाकावर
मग आपलं आपल्यालाच
सुचायला लागतं :
माझे डोळे
केवळ पंख्यामागून डोकावतात म्हणून
सूर्यच डोंगरामागून उगवणारे
अन् मोरपिसाऱ्यावरचे असंख्य निळे ठिपके :
डोळेच .
पंखा मिटवला की कसं सुटल्यासारखं वाटतं .
तसंच वाटतं का मोरांना आपला पिसारा मिटल्यावर ?
प्रियकराने दिलेल्या भेटवस्तूबद्दल प्रेम वाटलेच पाहिजे या अलिखित संकेतांचे दडपण निवेदिकेच्या मनावर असू शकेल म्हणून तिला पंखा मिटल्यावर सुटल्यासारखे वाटत असेल, असे काहीसे कविता लिहिताना माझ्या मनात होते; पण श्री.बा. म्हणाले, “आभाळ भरून आले की मोराच्या शरीरात एक स्राव पाझरू लागतो. त्याला तो अस्वस्थ करतो. पिसारा फुलवून नाचायला भाग पडतो. प्रियकराच्या प्रेमाचे स्मरणही प्रेयसीला अस्वस्थ करते, बेचैन करते. आपल्या या भावना इतरांच्या डोळ्यांपासून लपवून ठेवाव्यात असे वाटते. लाजही वाटते. पराकोटीचे सुख हे असे असह्य होत असते.”
श्री.बां.नी लावलेला हा अर्थ शास्त्राधारित होता. कवितेशी सुसंगत होता आणि कवितेला अधिक भावसुंदर आणि उन्नत करणारा होता. वाचकाच्या मनात कवितेने निर्माण केलेल्या अशा अर्थाला धक्का लावण्याचा अधिकार कवीलाही नसतो.
श्री.बां.चा निरोप घेऊन मी परतलो; पण माझ्या त्यानंतर श्री.बां.शी अधिक भेटी होऊ शकल्या नाहीत; कारण लवकरच त्यांनी इहलोकाचाच निरोप घेतला होता.


‘होड्या ‘ कविता तुमच्याच एका लेखात वाचली होती.आता यातली कविता आणि रानडे यांचे भाष्य वाचून आनंद झाला.तीन दुर्लभ गोष्टीत मोठ्यांचा सहवास लाभणे ही एक तुम्हाला लाभली त्यात माझ्यासारख्या अनेकांना आपण सहभागी करून घेत आहात याबद्दल कौतुकच वाटते
धन्यवाद !
हेमंत गोविंद जोगळेकर