मी आणि माझे वाचन

 गेली ५० वर्षे मी विविध प्रकारची पुस्तके वाचतो आहे. सुदैवाने पुस्तके वाचायला भरपूर वेळ मिळेल अशी शिक्षकाची नोकरी मिळाली. पुस्तकांनी माझे जीवन पूर्ण बदलले. वाचन ही माझ्या आयुष्यातील अनमोल भेट आहे, असं मला वाटतं. माझ्यासाठी वाचन हा स्वान्त सुखाय भाग आहे. मी आणि पुस्तक हे आमच्या दोघांचं खूप सुंदर प्रेमाचं नातं आहे.

   अगदी लहानपणी शाळेत शिकत असताना मला ‘सुविचार’ वाचनमालेतील अनंत काणेकर, वि. स. खांडेकर वामन चोरघडे यांच्या कथा आणि सोपानदेव चौधरी यांची कविता ‘माझी मायबोली आज आली माहेराला’ खूप आवडत असे. ती कविता मी सतत तालासुरात गुणगुणत असे, मराठीचे पाठ्यपुस्तक वाचायला मला खूप आवडत असे. त्याच काळात ‘मराठी’ मला मनापासून आवडतेय याचा साक्षात्कार झाला असावा. आमच्या घरात मीच पहिला पदवीधर असल्याने घरात वाचनाची परंपरा असण्याची किंवा पुस्तके असण्याची शक्यताच नव्हती, पण आमच्या वेळी अकरावीची परीक्षा असे, तिला मॅट्रीक म्हणण्याचा प्रघात होता. त्या परीक्षेनंतरच्या सुट्टीत माझ्या हाती वि. स. खांडेकरांची ‘अमृतवेल’ ही कादंबरी एका शिक्षकांनी दिली आणि मी ती झपाटल्यासारखी वाचून काढली. माझ्या सारख्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला ही पांढर्‍यावर काळ्या रंगात छापलेली अक्षरं गुंतवून ठेवताहेत यात काही तरी छान आहे, एवढंच मला समजत होतं. त्या वेळी गावात वीज नव्हती. रात्री रॉकेलच्या चिमणीवर ही कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि पहाटे कधीतरी संपूर्ण ‘अमृतवेल’ वाचून संपवली. मी एक वहीचा कागद घेतला आणि वि. स. खांडेकर यांना पत्र लिहिले. पत्र पोष्टात टाकले. वि. स. खांडकेर या मराठी साहित्यातील एक नामवंत लेखकाने मला दोन पानांचे मोठे पत्र आणि ‘क्रौचवंध’, ‘हिरवाचाफा’ इत्यादी त्यांच्या कादंबर्‍या भेट म्हणून पाठवल्या. ते पत्र नंतर व्हिनस प्रकाशनतर्फे ‘दीपस्तंभ’ नावाने वि. स. खांडेकरांचा पत्र व्यवहार प्रकाशित झाला, त्यात हे पत्र प्रकाशित झाले.

कोल्हापूर

२७-१०-१९७२

स. न. वि. वि.

दिलीप, तुझे २५-१० चे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. दोन्ही डोळ्यांवरची शस्त्रक्रीया अयशस्वी झाल्यामुळे अंधत्व आले आहे व रक्तक्षयासारख्या विकारांनी पाठ पुरविल्यामुळे मी नेहमी रुग्णशय्येवर पडून असतो. तरीही मी पत्र पाठवीत आहे. या सूचना विचारपूर्वक लक्षात घ्याव्यात.

1. तुझे वय अवघे १७न वर्षांचेे आहे. सध्या विद्यार्थिदशा आहे. तेव्हा लेखन-वाचनाच्या नादाने अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. 

2. चरितार्थाचे काही निश्चित साधन असण्यासाठी कोणतीतरी विद्या अथवा कला अंगी असायला हवी. तसे साधन जवळ नसेल, तर लेखक होऊ इच्छिणार्‍या मनुष्याचे पुढील आयुष्यात खूप हाल होतात. एवढेच नव्हे तर दैनंदिन जीवनात यशस्वी होणेही फार अवघड जाते.

3. लेखन हा फुरसतीचा छंद या नात्याने कुणीही जोपासावा. साहित्यासारखा आयुष्यात दुसरा चांगला सोबती मिळणे कठीण, पण साहित्य माणसाचे पोट भरू शकत नाही. शेकडो साहित्यिकांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके साहित्यिकच आपल्या देशात साहित्यावर आपला चरितार्थ चालवू शकतात.

4. साहित्य ही एक अत्यंत अवघड कला आहे. दिलीप, मी गेली पन्नास वर्षे लिहीत, वाचीत आलो आहे; पण अजूनही मी श्रेष्ठ साहित्याच्या किनार्‍या किनार्‍यानेच पोहत आहे, असे मला वारंवार वाटते. अस्सल साहित्य निर्माण करायला लागणारे प्रतिभा गुण जगात फार दुर्मीळ असतात. इथे पहिल्या वर्गात येणारे फार थोडे. तिसर्‍या वर्गात भरपूर भर्ताड येते. तिसर्‍या दर्जात येणार्‍या लेखकाला यश, पैसा किंबहुना निर्मितीचा आनंददेखील हाती लागत नाही. 

5. मी हे अभिजात साहित्याविषयी लिहीत आहे. सर्वसाधारण वाचनीय किंवा ज्याला तात्पुरता बाजारभाव असतो अशा वाङ्मयाची गोष्ट, निराळी कविता ही वीजेसारखी असते, ती धरू पाहणार्‍या शंभरापैकी एखाद्याच्या हाती ती लागते. बाकीचे नव्याण्णव जळून जातात. केशवसुतांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. तू पुढे मोठा लेखक होशील, पण विद्यार्थिदशेत साहित्यिक होण्याची स्वप्ने पाहणार्‍या तुझ्यासारख्या अनेक जणांनी हे लक्षात ठेवायला हवे.

6. तू मला गुरू मानतोस. हे लक्षात ठेव की, साहित्यात कुणीही कुणाला गुरू मानावे, पण शिकायची जबाबदारी असते शंभर टक्के शिष्यावर. शाळा कॉलेजातील पोपटपंची गुरूपासून हस्तगत करता येते. तसे येथे घडत नाही. शिष्याच्या अंगी प्रतिभेचे अस्तित्व नसेल, तर माळरानावर पडलेल्या पावसासारखी गुरूच्या साहित्याची स्थिती होते. शिष्याची प्रगती व्हायची असेल, तर गुरूचे गुणावगुण जाणण्याची शक्ती हवी.

7. दत्ताने चोवीस गुरू केले. साहित्यिकाला सहस्रावधी गुरू मिळू शकतील. जागतिक वाङ्गमयात होऊन गेलेले सर्व प्रतिभावंत समाज जीवनातले नाना प्रकारचे सौंदर्य, संघर्ष, निसर्ग नियमानुसार चालणारे अद्भुत सृष्टिचक्र, एक ना दोन, सार्‍या चराचर सृष्टीतल्या लक्षावधी गोष्टी लेखकाच्या साहित्य निर्मितीला खतपाणी घालू शकतात, पण केवळ खतपाण्यावर पिके येऊ शकत नाहीत. त्याला तशी सामर्थ्यवान बिजेही असावी लागतात. 

8. साहित्य हा धंदा नाही. तो प्रतिभेचा स्पर्श झालेला स्वधर्म आहे.

कळावे, ही विनंती

आपला

वि. स. खांडेकर

मराठीतील एका सुप्रसिद्ध लेखकाने हे पत्र माझ्यासाठी लिहिले असले तरी तमाम नवोदित लेखकांना दिशा दाखवणारे विचार भाऊंनी लिहिले होते. ‘दीपस्तंभ’ पुस्तकाच्या प्रस्तावनेत याबद्दल सविस्तर लिहिले आहे. हे पत्र भाऊंच्या निधनानंतर एका नामवंत दैनिकाने पहिल्या पानांवर छापले होते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या भाऊंचा त्यानंतर पत्राद्वारे स्नेह मिळत राहिला. दरम्यान महाराष्ट्रात १९७२ साली मोठा दुष्काळ पडला होता. मला उच्च शिक्षण घेण्याची खूप इच्छा असून घरच्या परिस्थितीने ते शक्य नव्हते. मॅट्रिकचा रिझल्ट लागला. भाऊंना कळवले. भाऊंचे ‘तुला चांगला माणूस व्हायचे असेल, तर शिक्षक हो.’ असे एका ओळीचे पोष्टकार्ड आले. मी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील करंदी येथे शिक्षक झालो. त्या गावात वर्तमानपत्र येत नव्हते, पण मी ललितसह अनेक मासिकांचा वर्गणीदार झालो. वाचन हा माझा श्वासाइतका महत्त्वाचा छंद झाला.

गेली ५० वर्षे मी मराठी पुस्तके वाचतो आहे. एका लेखकाने लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकांचा पूर्ण संच विकत घेण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या संग्रही चार हजार तरी पुस्तके असतील. चारही कपाटे पुस्तकांनी भरली आहेत. माझ्या खोलीत पुस्तके राहतात, उरलेल्या जागते मी राहतो. दिवसांतले सहा-सात तास पुस्तके वाचत असतो. वाचनाने माझे अनुभवविश्व, भावविश्व समृद्ध झाले. माझ्या शिक्षकाच्या भूमिकेला वाचन वरदान ठरले आणि मी शिक्षक असल्याचा फायदा माझ्यातल्या लेखकाला झाला. साहित्यिक क्षेत्रातील नियतकालिकांतून आणि रविवारच्या पुरवणीत अनेक चांगल्या पुस्तकांची परीक्षणे वाचून पुस्तक घेण्याची सवय लागली. दिल्लीच्या प्रगती मैदानावरील जागतिक पुस्तक प्रदर्शनापासून ते अनेक साहित्य संमेलनांतून पुस्तके विकत घेतली. दुकानातून विकत घेतली त्यापेक्षा मुंबई, पुणे, दिल्ली येथे रस्त्यावर जुन्या पुस्तक विक्रेत्यांनी माझ्या पुस्तक संग्रहात मोलाची भर घातली. त्यासाठी खूप वणवण केल्यानंतर एखादे दुर्मीळ पुस्तक मिळाल्याचा आनंद हा अवर्णनीय असतो.

पुण्या-मुंबईतील अनेक पुस्तक विक्रेते माझ्यासाठी पुस्तके निवडून आठवणीने बाजूला ठेवतात. मला चरित्र-आत्मचरित्र आणि तत्त्वज्ञान विषयक पुस्तके वाचायला आवडतात. त्यांनी माझ्या मनाची मशागत तर केलीच पण त्यांनी एक समृद्ध करणारा आनंद दिला आहे. माझे आवडते लेखक जयवंत दळवी, रविंद्र पिंगे, अनिल अवचट, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगुळकर, भानू काळे, सारंग दर्शने, अंबरिष मिश्र, अरुण शेवते, विजय पाडळकर, आशा बगे, सानिया, गौरी देशपांडे, पद्मजा फाटक, मेघना पेठे, नीरजा, कमल देसाई, विश्वास वसेकर, भा. रा. तांबे, बहिणाबाई, कुसुमाग्रज यांनी मनाचं आभाळ आनंदाच्या चांदण्यानी भरून टाकलयं. ‘अंतर्नाद’चे संपादक आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक भानू काळे यांचा स्नेह माझ्या जीवनातील सर्वोच्च असा आनंद आहे. अंतर्नादच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभाचा मी साक्षीदार आहे. आदरणीय भानू काळे आणि वर्षाताई काळे यांनी मला भरपूर पुस्तके तर दिलीच, पण निरपेक्षपणे उदंड माया केली. त्यांच्या अंतर्नादने अभिरुची संपन्न, वाङ्मयीन सांस्कृतिक साहित्याने मोठा आनंद दिला आहे. त्यामुळे अनेक नामवंत साहित्यिकांचा सहवास मिळाला. माझ्यासाठी अनमोल भेट आहे. तितकेच प्रेम मला नव्याण्णव वर्षांच्या यास्मिन शेख या व्याकरण तज्ज्ञ विदुषीकडून मिळाले. भानू काळे, सारंग दर्शने, प्र. ना. परांजपे, अंबरिष मिश्र, अरुण शेवते ही माझ्यासाठी वाचनाने मला दिलेली ही माणसे एक उच्च दर्जाची मूल्ये आणि तत्त्वे जपणारी माणसे आहेत. मराठी साहित्य विश्वाचे वैभव आहेत.

आज मी लौकिक अर्थाने श्रीमंत झालो नसलो, तरी पुस्तके वाचण्यातून समृद्ध आनंदी जीवन माझ्या वाट्याला आले. चार चांगले मित्र मिळाले. मुंबईचे रवीप्रकाश कुलकर्णी दुर्मीळ पुस्तके आणि कात्रणांचे संग्रहचे संग्रह मला मुंबईहून प्रेमाने घेऊन येतात. सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ माझ्या दुचाकीवर मागे बसून बसच्या तिकीटावर कविता लिहित. मी मराठी बालभारतीचा संपादक सदस्य झालो आणि लेखकांचे जग, पुस्तकांचे जग अधिक जवळ आले. शाळेत पाठ्यपुस्तकात ज्यांच्या धडे आणि कविता शिकलो त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. अनेक साहित्य संमेलनाला उपस्थित राहून आनंद घेता आला. 

आज कपाटातील अनंत काणेकर, दि. बा. मोकाशी, विद्याधर पुंडलीक, प्रभाकर पाध्ये, गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, र. वा. दिघे यांची पुस्तके आनंद देतात तशी नव्या पिढीतील लेखक अभिराम भडकमकर, प्रणव सखदेव, असे अनेक नवे लेखक मनाला आनंद देतात. कवी अनिल, बा. भ. बोरकर, पु. शि. रेगे, ना. घ. देशपांडे, कान्त, इंदिरा संत, मंगेश पाडगांवकर यांच्या सोबत अनेक नवीन कवींनी भावविश्व समृद्ध केले आहे. 

आज माझ्याजवळ पु.ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, अनिल अवचट, भारत सासणे, डॉ. अरुणा ढेरे, अनंत काणेकर, दि. बा. मोकाशी, विद्याधर पुंडलिक, प्रभाकर पाध्ये, सरोजिनी वैद्य, मारुती चितमपल्ली, र. वा. दिघे, वामर घोरपडे, अच्युत बर्वे, भाऊ पाध्ये, म. वा. धोंड, सारंग दर्शने, अभिराम भडकमकर यांची पुस्तके आहेत. प्रणव सखदेव यांची पुस्तके आवडतात. कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, वा.रा.कान्त, कवी बी, दत्तात्रय कोंडो घाटे, ग.ह. पाटील, भा.रा. तांबे, कवी यशवंत, आरती प्रभू, महानोर, मंगेश पाडगांवकर, ना. घ. देशपांडे यांच्यासोबत अनेक नवीन कवींनी मनाला आनंद दिला आहे. 

हे खरं आहे वाचनामुळे अनेक चांगले लेखक मित्र मिळाले. व्याख्यानांसाठी जातो तेव्हा भानू काळे, विद्याताई पटवर्धन यांनी दिलेली पुस्तके ग्रामीण भागातील शाळांना देतो, तेव्हा मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद अवर्णनीय असतो. 

पुस्तकांच्या वाचनाशिवाय मी माझ्या जीवनाचा विचारही करू शकत नाही. या सर्व संपन्न वाचनामुळे वर्गातल्या विद्यार्थ्यांकडे संवेदनशीलतेने बघायला शिकवले. प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून मुलांसाठी काही करू शकलो. वाचन हे मला माझ्या श्वासोच्छ्वासाइतके महत्त्वाचे आहे. त्या वाचनानंदाच्या ऑक्सिजनमुळेच आनंदी जीवन जण्याची गुरुकिल्ली सापडली एवढं मात्र खरं.

Author

Leave a Reply