पुनर्भेट नॅशनल पार्कची २ : नॅशनल पार्कमधील श्रावण 

संततधार धरलेला आषाढ संपून  उद्यानात ऊन-पावसाचा श्रावण सुरू होतो.  जमिनीलगत उगवणाऱ्या गुलाबी रंगाच्या  रानहळदीला बहर येतो . आषाढात समूहाने उगवणारी अळंबी दिसते; तर श्रावणात  ही रानहळदीची फुलं काही काही ठिकाणी समूहाने उगवलेली दिसतात  . जमिनीलगत गुलाबी रंगाच्या पाकळ्या आणि त्यावर काही ठिकाणी हळदीच्या पिवळ्या रंगांचा फटकारा असलेली रानहळदीची फुलं शोधायला मी पूर्वी रानवाटा धुंडाळल्या आहेत .  वाघांच्या पिंजऱ्याकडून चालत येत असताना या जमिनीलगत उगवलेल्या रानहळदीच्या गुलाबी रंगात मी हरवून गेले होते  . अचानक मान वर केली तर एक सहा- सात फुटांचं छोटंसं झाड आणि त्यावर  लाल  कपबशीच्या आकाराची फळं दिसली .

 काही झाडांची फुलं तर काहींची फळं मन आकर्षून घेतात . या  डाळफोडीला बहुतेक आषाढात फुलं येऊन जातात  . परंतु झाडाच्या हिरव्या रंगात मिसळून गेलेली फुलं  तेव्हा दिसत  नाहीत आणि  झाडाने लालचुटुक फळांचे दागिने अंगभर घातल्यावर झाड श्रावणात उठून दिसायला लागतं . अगदी तीन चार सेंटीमीटर  आकाराची चिमुकली बशी आणि त्यावर एखादं बोरं  ठेवावं असा या फळाचा आकार . डाळफोडीच्या फळाच्या लाल  रंगात रंगलेला श्रावण अनुभवत असताना  भेरली माडाच्या फुलांचा सडा लक्ष वेधून घेतो. नारळाच्या झाडासारखाच हा उंचच उंच भेरली माड जणू आकाशाला स्पर्श करायला निघालेला असतो .  या  भेरली माडाची फुलं लांबसडक केसांच्या झुपक्याप्रमाणे झाडावर लटकत असतात . श्रावणाच्या सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत ही फुलं टपटपत असतात . गुलाबी रंगाचं तीन पाकळ्यांचं तीन  ते चार सेंटीमीटर व्यासाचं फूल . मध्यभागातून आलेले असंख्य पुंकेसर असलेलं देखणं फूल . भेरली माडाला इंग्रजीत फिशटेल पाम म्हणतात.  याच्या पानांची टोकं माशाच्या शेपटीप्रमाणे दोन भागांत विभागलेली असतात . सध्या हा भेरली माड खूप दुर्मीळ  झाला आहे; परंतु  नॅशनल पार्कमध्ये जाणीवपूर्वक ठिकठिकाणी भेरली माडाची लागवड केलेली आहे . 

        एक दिवस भेरली माडाच्या फुलांच्या सड्यात हरवून गेले होते . माडाच्या बाजूलाच उभी होते . एका वनरक्षकांचा कॉल   आला . एक लंगूर माकडांची पिल्लू  ते आमच्याकडे घेऊन येत होते  . काळ्या रंगाचे  तोंड व  चंदेरी रंगाचे केस असलेलं साधारण पाच सहा किलो वजनाचं ते पिल्लू खूपच  गोजिरवाणं वाटत होतं. कपाळावर डाव्या बाजूला कसल्यातरी जखमेची काळी खूण होती . आम्ही त्याला केळं पुढे केलं तर त्याने पटकन ते हातातून घेतलं . ते वनरक्षक म्हणाले  ,”हे पिल्लू एका माणसाने घरी पाळलेलं  होतं.” त्याच्याकडून ते वनखात्याने जप्त केले होते . आमच्याकडून त्यांना त्या पिल्लाचा  आरोग्यदाखला हवा होता. मी त्या पिल्लाची पाहणी केली . ते खूप चपळ होतं. त्याला कोणताही आजार झालेला वाटत नव्हता. मी त्या पिल्लाचा आरोग्यदाखला तयार करून दिला. वनरक्षक तो दाखला घेऊन त्याला जंगलात सोडायला घेऊन गेले . त्यानंतर दोनच दिवसांनी जवळच्या एका सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकाचा फोन आला. त्यांनी एका लंगूरच्या पिल्लाला  हॉटेलमधून पकडलं होतं. ते हॉटेलमधील गिऱ्हाइकांच्या  डिशमधील खाणं ओढून खातं  असं त्याचं म्हणणं  होतं . त्यांनी आणलेल्या पिल्लाचं मी निरीक्षण केलं तर पटकन कपाळावरची काळी खूण नजरेस भरली. ‘अरे हे तर दोन दिवसांपूर्वीच वनरक्षकानी जंगलात सोडलेलं   पिल्लू!’ माझ्या लक्षात आलं ,याला त्याचा  कळप जंगलात मिळाला  नसल्याने ते जंगलात राहू शकलं  नाही . माणसाच्याच आसऱ्याला गेलं . मी त्यांना सांगितलं, “याला जंगलात सोडण्यासाठी तुम्हांला थोडा वेळ द्यावा लागेल . एखादा कळप बघून त्याला थोडा वेळ त्यात सोडून पिल्लाचा  आणि कळपाचाही प्रतिसाद पाहावा लागेल. बराच वेळ तिथे घालवावा लागेल . दोन-तीन दिवस रोज पिल्लू सोबत राहिलं की मग तो कळप ते पिल्लू स्वीकारू शकेल” . त्यांनाही ती गोष्ट पटली . त्यांनी तो पिंजरा उचलला आणि ते  निघाले . ते लंगूरच पिल्लू पिंजऱ्याच्या गजाला पकडून माझ्याकडे टकमक बघत होतं. प्राणी पाळीव झाला की मग जंगलात सोडणं थोडं कठीण होतं; पण संयम आणि वेळ दिला की हळूहळू ते शक्य होतं .   

                लंगूर माकडांबरोबरच बॉनेट माकडंही  उपचारासाठी आणली  जातात. एकदा  एका बॉनेट माकडाची मृत मादी शवविच्छेदनासाठी  आणली होती.  विजेचा झटका लागून ती मेली होती . तिच्या शरीरात सर्वत्र रक्तस्राव झालेला दिसत होता . मी तिला शवविच्छेदन  विभागात पाठवले; पण त्या पाठोपाठ आणखी एक पिंजरा होता. त्यात त्या मृत माकडिणीची  दोन अगदी छोटी गोजिरवाणी पिल्लं होती – आईच्या अचानक मृत्यूमुळे अनाथ झालेली –  त्यांचं वजन जेमतेम अर्धा किलो .  अगदी माणसाच्या बाळासारखंच गोल  डोकं, पिंगट डोळे , अंगावर तपकिरी केस आणि लांब शेपटी . ती दोन्ही पिल्लं घाबरलेली दिसत होती . दोघंही एकमेकांना अगदी चिकटून बसली होती . त्यांचे डोळे आमच्याकडे रोखून बघत होते. त्यांत भय, हतबलता स्पष्ट दिसत होती.   आई गेल्यावर आता आपल्या दोघांचाच  एकमेकांना आधार आहे हे समजून चुकली होती . एवढ्या छोट्या पिल्लांना जंगलात सोडणं शक्यच नव्हतं; मग त्या दोघांनाही आमच्या रेस्क्यू सेंटरला मी दाखल करून घेतलं . रेस्क्यू सेंटरमधील मोठ्या पिंजऱ्यात त्यांना ठेवलं . पहिल्यांदा ती घाबरून एका कोपऱ्यात जाऊन एकमेकांना बिलगून बसायची . त्याना केळं किंवा काकडी दिली की लगेच येऊन हातातून घ्यायची. पुन्हा त्याच कोपऱ्यात दोघंही जायची .हळूहळू त्यांना कळलं ही माणसं तितकीशी वाईट नसावीत; मग मी आपला हात पुढे केला की हळूहळू घाबरत घाबरत यायची . आपली लांबसडक बोटं पिंजऱ्याच्या गजातून बाहेर काढायची आणि माझ्या हाताला स्पर्श करून पुन्हा घाबरून  मागे जायची . दोनेक दिवसांतच ती पिल्लं निवांत झाली . पिंजऱ्यात न घाबरता राहायला लागली.  टोमॅटो वगैरे काही दिलं की  दूर बसून खाऊ लागली. मी जवळ गेले की धिटाईने माझ्या ड्रेसला पकडून ओढायला बघायची .  त्यातल्या एका पिल्लाच्या पायाला जखम होती. आम्ही त्याला बाहेर काढून अलगद त्या जखमेचं ड्रेसिंग करायचो .  मी सकाळी ऑफीसमध्ये आले की पहिल्यांदा या दोन पिल्लांची खबर घ्यायचे; मग पुढच्या कामाला लागायचे.  

माझ्या रोजच्या  राउंडमध्ये मांजरांच्या पिंजऱ्याकडेही मी  जायचे . मांजरांच्या पिंजऱ्याकडे वाघाटी मांजरांची एक जोडी आहे . वाघाटी मांजरं कधीच माणसाच्या वाऱ्यालाही उभी राहत नाहीत. पिंजऱ्यामध्ये असलेल्या दाट झुडपात लपून बसलेली असतात. चुकून दिसलीच तर चटकन दूर निघून जातात. पलीकडच्या पिंजऱ्यात एक नर रानमांजर एकटाच आहे. तपकिरी रंगाचे शरीर.  साधारण तीन  साडेतीन किलो वजन असलेला हा रानमांजर त्याच्या पिंजऱ्याकडे गेलं की लगेच जवळ येतो. पिंजऱ्यातून आत बोट टाकले की  बोटांना अंग घासायचा प्रयत्न करत राहतो – जणू कोणाच्यातरी स्पर्शासाठी तो जणू आसुसलेला असतो. मी त्याचं नाव किंग ठेवलं आहे . मी थोडा वेळ त्याच्याशी बोलत राहते.  त्याला म्हणते, “किंग  निघते मी आता,”  तसा पिंजऱ्याच्या टोकाला जातो. सरसर वर चढतो . चारी पायांनी जाळी घट्ट पकडतो आणि मी दूर निघत असताना एकटक बघत राहतो,जणू ‘उद्या लवकर ये,’ असं स्तब्धपणे सांगत राहतो . 

       पाउस रिमझिम पडत असतो .  मांजरांच्या पिंजऱ्याच्याजवळ असलेला भेरली माडाच्या फुलांचा सडा दिसतो .त्यातील एक फूल मी उचलून हातात घेते.  पिंजऱ्याच्या जाळीला चारी पायांनी पकडून उभ्या असलेल्या किंगकडे बघत हात हलवत राहते .   नॅशनलपार्क मध्ये  निसर्ग आणि प्राणी असे रिमझिमणाऱ्या पावसासोबत मला जीव लावत असतात .  

Author

2 thoughts on “पुनर्भेट नॅशनल पार्कची २ : नॅशनल पार्कमधील श्रावण 

Leave a Reply