स्वागत

थोडक्यात पण मार्मिक

अंतर्नादचेएक जुने वाचक व लेखक आणि ‘शून्य कचरा’ संकल्पनेचे प्रवर्तक – ठाणे येथील कौस्तुभ ताम्हनकर – यांचे ‘थोडक्यात पण मार्मिक’ हे दुसरे पुस्तक श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध झाले आहे.  हे पुस्तक त्यांनी आपले आजोबा कैलासवासी ना. धों. ताम्हनकर यांना अर्पण केले आहे. ताम्हनकर यांनी लिहिलेल्या व दर रविवारी समाजमाध्यमातून (WhatsApp ) वर्षभर प्रक्षेपित झालेल्या लेखांचे हे संकलन आहे.  कै. ना. धों.  ताम्हनकर यांना आपण सर्वजण बालसाहित्यकार म्हणून चांगले ओळखतो.  चिंगी,  दाजी आणि गोट्या  ह्या त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय होत्या. मार्मिक आणि खुसखुशीत लिहिण्याची आजोबांची परंपरा कौस्तुभ ताम्हनकर यांनी पुढे चालवली आहे. 

रविवारचे हे लेख लिहिताना त्यांनी नवीन पिढीचाही विचार केला आहे.  अल्पाक्षररमणीयता व  आंग्ल  भाषा   यांची नवीन पिढीला असणारी विशेष आवड लक्षात घेऊन हे लेख ४००  ते ५००  शब्दांत  बसवलेले आहेत; शिवाय शक्य तिथे सौ.सुचेता साने यांनी इंग्रजीत केलेला या लेखांचा अनुवाद  छापला आहे; त्यामुळे एका अर्थाने हे पुस्तक द्वैभाषिक झाले आहे.  पुस्तकाला भानू काळे यांची प्रस्तावना आहे.  मुखपृष्ठ कुमार मोरे आणि विकास फडके यांचे आहे. 

 कौस्तुभ ताम्हनकर यांच्या भावी लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा !  

थोडक्यात पण मार्मिक

लेखक  व प्रकाशक : कौस्तुभ ताम्हनकर

किंमत:  २६०/- रुपये.

पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक : ९८१९७४५३९३ . 

सफर छत्तीसगडची

(दिनांक एक ऑक्टोबर रोजी पुणे येथे ‘सफर छत्तीसगडची’ या आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.आपला शेजारी असलेल्या या राज्याबद्दल मराठीत फारसे लिखाण नाही.  या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा परिचय करून देत आहेत पुस्तकाचे लेखक आशुतोष बापट– संपादक )

 सफर छत्तीसगडची

महाराष्ट्राचा सख्खा शेजारी असलेला छत्तीसगडचा प्रदेश. नक्षलवाद हा शब्द त्याच्याशी जोडला गेल्यामुळे कायमच पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला होता. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. निसर्गाने समृद्ध आणि संपन्न असलेल्या या प्रदेशाकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. अनेक हातांना रोजगार मिळू लागला आहे. आणि त्यामुळे आता विकासाची गंगा थोड्याफार प्रमाणात का होईना इथे आता वाहू लागली आहे. सरकारच्या कठोर धोरणामुळे नक्षलवादसुद्धा संपत चालला आहे. या प्रदेशाची मनसोक्त भटकंती करावी आणि ती लोकांच्यासमोर मांडावी असे मनोमन ठरवले होते. गेल्यावर्षी ऐन एप्रिलमध्ये या प्रदेशाची भटकंती केली. खरंतर जानेवारीत जायचे होते, मात्र त्यावेळी आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तिथे जाणे पुढे ढकलावे लागले. मात्र रायपूरमध्ये वास्तव्याला असलेले तुषार आणि भाग्यश्री भिरूड या मित्रांच्या आग्रहामुळे एप्रिलमध्ये हा दौरा ठरवला. उन्हाळा होता मात्र सुदैवाने त्याचा काही फार त्रास झाला नाही. अन्यथा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा इथे येण्यासाठी सर्वात उत्तम काळ. चित्रकोट या धबधब्याचे रौद्र रूप न्याहाळायचे असेल तर मात्र ऑगस्ट महिन्यात यायला हवे.

छत्तीसगड म्हणजे वारसास्थळांची भरभराट आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेला सगळा प्रदेश. तांदुळाचे कोठार म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश विपुल खनिज संपत्तीनेसुद्धा समृद्ध आहे. अख्ख्या देशाची दगडी कोळशाची गरज हा एकटा पूर्ण करतो. आणि नुसती आपल्या देशाचीच नव्हे तर इथल्या दगडी कोळशाची जपानला निर्यातसुद्धा होते. दगडी कोळशाबरोबर बॉक्साईट आणि मँगेनीज यांचीसुद्धा विपुलता इये देशी आहे. 

इ.स. २००० साली मध्यप्रदेशापासून वेगळे झालेले हे राज्य. १,३६,००० वर्ग किलोमीटर एवढे क्षेत्रफळ असलेले. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश अशा राज्यांनी सर्वबाजूंनी याला वेढलेले आहे. छत्तीसगडचे आज ३३ जिल्हे असले तरी पूर्वीच्या काळी ३६ गड किंवा परगणे असलेला प्रदेश म्हणून छत्तीसगड असे याचे नाव पडल्याचे सांगतात. प्राचीन काळी या प्रदेशावर चेदी साम्राज्याचे राज्य होते त्यामुळे ‘चेदीशगड’ याचा अपभ्रंश होऊन ‘छत्तीसगड’ झाले अशीही एक उत्पत्ति सांगितली जाते. चेदी हे कलचुरींचे दुसरे नाव. इ.स. ९८० ते १७४१ एवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत यांची राजवट अधूनमधून या प्रदेशावर होती. इतिहासात डोकावले तर हा प्रदेश म्हणजे अगदी इ.स.पूर्व ६०० मध्ये असलेल्या कोसल गणराज्याचा हा भाग. सरगुजा जिल्ह्यात इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातले मौर्य साम्राज्याचे काही पुरावे आढळले आहेत. पुढे इ.स.च्या ५ व्या शतकात इथे शरभपुरीय राजवट होती. अंतर इथे पांडुवंशीय राजांची राजवट दिसते. याशिवाय नळ, नाग, फणीनाग अशा विविध वंशाच्या राजांचे शिलालेख इथे सापडले आहेत. रामायण काळात हा सगळाच प्रदेश ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखला जायचा. आजही रामायणातील विविध उल्लेखांच्या खुणा जपून त्यांचे संवर्धन केलेले आढळते. ‘राम वन गमन मार्ग’ प्रकल्प हे त्याचेच एक रूप. प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ज्या मार्गावरून त्यांनी मार्गक्रमणा केली तो मार्ग आणि त्यावर असलेली ऐतिहासिक स्थळे आता पर्यटन स्थळे म्हणून जतन केली जात आहेत. कौसल्येचे माहेर चंदखुरी, शबरीनारायण, रामगढ ही त्यातली काही ठिकाणे. 

छत्तीसगडचा प्रदेश निसर्गसंपन्न आहे. मुख्यत्वे करून खनिज संपत्तीने हा प्रदेश बहरला आहे. दगडी कोळसा, बॉक्साईट, मँगेनीज यांच्या प्रचंड खाणी इथे आहेत. इथला बस्तर हा प्रदेश यासाठी प्रसिद्ध आहे. जगदलपूर, दंतेवाडा आणि इतर भागात असलेल्या दगडी कोळशाच्या खाणीतून रोज हजारो टन दगडी कोळसा बाहेर काढला जातो. अख्ख्या देशाची दगडी कोळशाची गरज एकटा छत्तीसगड भागवतो. ज्यावेळी देशात औष्णिक विद्युत प्रकल्पांना दगडी कोळसा कमी पडतो तेव्हा छत्तीसगडवरून मालगाड्या भरभरून दगडी कोळशाची वाहतूक केली जाते. अशा वेळी इतर सर्व प्रवासी गाड्या बाजूला करून फक्त मालगाड्यांना मार्ग करून दिला जातो. खनिज संपत्तीसोबतच तांदूळ हे इथले मोठे पीक. छत्तीसगडला भारताचे तांदळाचे कोठार असे म्हणतात. प्रचंड प्रमाणात इथे तांदूळ पिकतो. प्रवास करताना कधी वाटेत थांबून मुद्दाम बघावे. नजर जाईल तिथपर्यंत अगदी क्षितिजापर्यंत भातशेती पसरलेली दिसून येते. 

स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर इथे पुरातत्त्वीय उत्खनने मोठ्या प्रमाणावर सुरु झाली, आणि त्यात सापडलेल्या निरनिराळ्या वस्तु, शिलालेख, नाणी, मूर्ती यांतून या प्रदेशाचा एक देदिप्यमान इतिहास समोर येऊ लागला. सिरपूर या ठिकाणाची महती मोठ्या प्रमाणावर उजेडात आली. इथे असलेले व्यापारी केंद्र, व्यापाऱ्यांच्या वसाहती, दवाखाने, बौद्ध मठ वगैरे माहितीचा खजिनाच उघडकीस आला. डॉ. अरुणकुमार शर्मा या पुरातत्त्व अधिकाऱ्याचे यासाठी आभार मानले पाहिजेत. बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीत डॉ. शर्मांनी मोठ्या हिमतीने उत्खनाने करून छत्तीसगडचा इतिहास जगापुढे मांडला. त्यांच्या थोर कार्यांची दाखल घेऊन सन २०१७ साली त्यांना ‘पद्मश्री’ ने सन्मानित करण्यात आले आहे. 

प्राचीन मंदिरे, मूर्ती यासोबत अफाट निसर्गसौंदर्य हे छत्तीसगडचे वैभव आहे. आणि या सगळ्याला साथ आहे ती इथे राहणाऱ्या अनेक आदिवासी मंडळींची. इथली आदिवासी संस्कृती बहरलेली आहे. रूढी-परंपरा-सण-समारंभ या सगळ्या गोष्टींनी नटलेली आहे. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र बोलीभाषा, परंपरा, देवदेवता, नृत्यप्रकार, वस्त्रप्रावरणे आणि आभूषणे आहेत. त्या प्रत्येकाचे एकेक वैशिष्ट्य आहे. इथली आदिवासी मंडळी आजही या सगळ्या परंपरांचे कसोशीने पालन करताना दिसतात. छत्तीसगड हा खरोखर रमणीय आहे. इथे हिंडताना निसर्ग आणि आदिवासी संस्कृती यांचा झालेला अपूर्व मिलाफ अनुभवता येतो. यासाठी स्नेहल प्रकाशनाने ‘सफर छत्तीसगडची’ हे माझे पुस्तक वाचकांसाठी प्रकाशित केले आहे. छत्तीसगडमधील विविध ठिकाणे, त्यांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भ आणि देखणी प्रकाशचित्रे यांनी हे पुस्तक सजले आहे. या पुस्तकाद्वारे भटकंतीसाठी एका निराळ्या प्रदेशाची ओळख चोखंदळ वाचकांना करून दिली आहे. देखणे मुखपृष्ठ आणि तेवढाच सुंदर आतील मजकूर यांनी हे पुस्तक नटले आहे.

अगदी आगळावेगळा आणि पूर्णपणे दुर्लक्षित असलेला हा प्रदेश आपण अवश्य बघावा. बस्तर, दंतेवाडा, जगदलपूर ही नावे पूर्वी जरी नक्षलवादाशी जोडलेली असली तरी आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. कुठल्याही भागात अगदी सहजपणे भटकणे सोपे आहे. इथली प्रेमळ आणि मदतीला तत्पर असलेली माणसे, इथला निसर्ग आणि इथली आदिवासी संस्कृती या सगळ्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा. आपली भटकंती समृद्ध व्हावी.

Author

Leave a Reply