ढंग विडंबनाचा 

अनुकरण वा नक्कल करणे ही तशी माणसाची जन्मजात प्रवृत्ती असते.  विडंबनाचं मूळ या जन्मजात मानवी वृत्तीतच शोधता येते.  अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून लहान मुलं पक्ष्यांचा आवाज, हम्माचं हंबरणं,  आजी आजोबांचं चालणं – बोलणं,  बाबांचं रागे भरणं, आईचं डोळे वटारणं, अशा गोष्टी अगदी हुबेहूब करून दाखवितात.  शालेय जीवनातील प्रत्येक पिढीमध्ये कोणती ना कोणती विडंबनगीते प्रसिद्ध असतात.  संस्कृत शब्दकोशात ‘विडंबन’  शब्दाचा  अर्थ अनुकरण,  नक्कल असा दिलेला आहे.  विडंबन याचा आणखी एक अर्थ डौल, थाट, तऱ्हा हा ही आहे.  विडंबन शब्दाचे आणखी काही अर्थ फजिती, सोंग, नक्कल व दुसऱ्याचे रूप धारण करणे असेही आहेत  .   सुसंगतीची जाण असणाऱ्या कवीच्या नजरेलाच  विसंगती दिसते. गांभीर्य  आणि विनोद हे मानवी स्वभावाचेच दोन पैलू आहेत. ते परस्परपूरकच असतात. मूलतः जीवनाची सुसंगती लावण्यासाठी जशी कला आवश्यक आहे, तशीच आपल्या आयुष्यातली विसंगती शोधण्यासाठीही कलाच आवश्यक असते. विसंगती हा विनोदाचा आत्मा आहे. शाब्दिक विसंगती, अर्थाची विसंगती, प्रसंगाची विसंगती, अतिशयोक्तिजन्य विसंगती अशा अनेकविध विसंगती जीवनात चमत्कृती निर्माण करतात  आणि अगदी हसतखेळत जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंच आहे,  ‘का लाघवियाचे विचित्र l विनोद ते ll’ 

वैचित्र्याच्या अंगाने जीवनाचं वास्तव चित्र रेखाटणं हेच खरं विनोदाचं प्रयोजन ठरतं. 

       जत्रेमध्ये बहिर्गोल किंवा अंतर्गोल आरशापुढे उभे राहिल्यावर आपली त्या आरशातील प्रतिमा चित्रविचित्र दिसते,  तसंच काहीसं विडंबनाचंआहे.  इंग्रजीतल्या Parody या शब्दावरून मराठीत त्याला विडंबन असा समानार्थी शब्द निर्माण करण्यात आला. Parody या शब्दाचा अर्थ     ‘ caricature of a poem made by applying its words with burlesque effect ‘  असा आहे.  जे. पी. शिपले संपादित ‘A Dictionary of World Literature’ या संदर्भ ग्रंथात parody ची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. ‘A composition in which characteristics of manner and spirit of an author or class of authors are imitated so as to make them appear ridiculous.’ कमी अधिक प्रमाणात मूळ   कृतीबरहुकूम जी गद्य व पद्य रचना केली जाते व तिच्या गंभीर अभिप्रेत अर्थाचा मात्र नवीन रचना पद्धतीने उपहासात्मक विपर्यास केला जातो अशा रचनेला विडंबन म्हणावं.  विडंबनाला विकृतानुकरण असं म्हटलं जातं. स्थूल मानाने विकृतानुकरणाला burlesque, caricature, parody  असे संबोधले जाते. Burlesque म्हणजे कृतिविडंबन होय. नाटककार याचा बव्हंशी वापर करतात. Caricature म्हणजे रूपविडंबन. व्यंगचित्रकार याचा विपुल वापर करतात. Parody म्हणजे शैलीविडंबन. या प्रकाराचा उपयोग विडंबनकार करीत असतात. या शैलीविडंबनाचे १) शब्दनिष्ठ २) बाह्यनिष्ठ वा रीतिनिष्ठ आणि ३) उभयांगनिष्ठ किंवा सर्वांगीण विडंबन असे तीन प्रकार आहेत. विनोद, उपहास, उनोक्ती आणि अतिशयोक्ती यांना विडंबनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विडंबनाचे शब्द कानी पडताच मूळ कृतींची स्मृती मनात जागृत होणे ही विडंबनाच्या यशस्वीतेची प्राथमिक कसोटी आहे. आचार्य अत्रे ऊर्फ केशवकुमारांची ‘परिटा येशील कधी परतून? ‘ ही ओळ ऐकताक्षणी रे. टिळकांची’ पाखरा येशील कधी परतून?’ ही ओळ तत्काळ स्मरते. यशवंत देवांच्या ‘पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा, मरण धाड देवा, आता मरण धाड देवा’ या विडंबन गीताच्या ओळी ऐकल्याबरोबर आपल्याला जगदीश खेबूडकरांचे ‘देहाची तिजोरी’ हे गीत आठवतं. उत्तम विडंबन काव्याने मनोरंजन होऊन एक प्रकारचा दर्जेदार आनंद मिळतोच; पण त्याच बरोबर हसत खेळत दोषदिग्दर्शनही होते. रंजन करीत करीत डोळ्यांत अंजन घालण्याचे काम विडंबन करीत असते. या बाबतीत आचार्य अत्रे यांच्या विद्यार्थिदशेत त्यांच्या वर्गात झोपणाऱ्या एका मित्राची ‘महाबळी झोप घेता सकळा भिववी बळे’ ही विडंबनाची ओळ सतत म्हणून त्याची घोरण्याची वाईट सवय काढून टाकल्याचे मोठे रंजक उदाहरण आहे. आचार्य अत्र्यांच्या मते विडंबन हा विरोधी भक्तीचा प्रकार आहे. एखाद्या कवीचे विडंबन करणे म्हणजे त्याच्याबद्दल अप्रत्यक्षपणे आदर व्यक्त करण्यासारखे आहे. कलमी झाडाप्रमाणे विडंबनाचा जन्म परावलंबी असतो. 

    तथापि विडंबनाला स्वयंपूर्ण असं हास्यमूल्य लाभलेलं असतं. विडंबन ही विकृती नसून स्वतंत्र अशी कृती आहे. विश्वामित्राने ज्याप्रमाणे सृष्टीला प्रतिसृष्टी निर्माण केली तद्वतच विडंबनसुद्धा साहित्याची प्रतिसृष्टीच असते. विडंबन हे सामान्यत: सामाजिक, राजकीय वा धार्मिक अशा वाङ्मयीन  विश्वात जे अनिष्ट संकेत निर्माण होतात, त्याचं केलेलं असतं. 

विडंबनकार अशा संकेतांना व त्यांचे पालन करणाऱ्यांना हास्यास्पद ठरवून लोक व्यवहारामध्ये इष्ट सुधारणा घडवून आणण्याची एक प्रकारे सूचनाच देतो. 

  ‘बांडगुळे’ या आपल्या विडंबन काव्याच्या प्रस्तावनेत विश्वास वसेकर म्हणतात, ‘जेव्हा काव्यात अधर्म माजून वाङ्मयाला ग्लानी येते तेव्हा विडंबनकार अवतरतो.’ विद्याधर पुंडलिकांच्या मते विडंबनकार हा मूळ कलाकृतीला एक सर्जनशील पर्याय देण्यासाठी विडंबन लिहितो. मराठीतील ख्यातकीर्त गीतकार, संगीतकार आणि विडंबनकार यशवंत देव यांच्या मताप्रमाणे गंभीर लेखन, ललित लेखन म्हणजेच कसदार लेखन असं म्हणणं योग्य नाही. हसण्यास उद्युक्त ठरेल असं लिखाण करायलाही हुशारी लागते.  हे सगळ्यांना जमेलच असं नाही.  विडंबनसुद्धा हसण्याची संधी घेऊन येत असतं.  हे हसण्याचं साधन आपण हरवू नये. कारण हसण्यासाठी जन्म आपुला ! 

     ‘संसारापासून समाजापर्यंत अनेक सोंगं  अव्याहत संचार करीत असतात.  सोंग म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाला फसवणारी  बाह्य भूमिका असते. अशी सामाजिक राजकीय सोंगे हे तर विडंबनकाराचं हमखास लक्ष्य असतं. उपहास,  अतिशयोक्ती, उनोक्ती अशा विविध अंगांनी तो अशा सोंगांचा समाचार घेत असतो. अर्थात यामुळेच विपरीत पैलू अधिक उलगडत जातात आणि आतली वीण मोकळी होते.’ ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकामध्ये प्रस्थापित उच्चभ्रू ग्रीक संस्कृतीला धक्के देणारे विडंबनात्मक लेखन मेनीपस ( Menippus of Gadara) या ग्रीक तत्त्वज्ञाने केले. सोळाव्या शतकामध्ये राबले 

( Rabelaise) या फ्रेंच लेखकाने विडंबनाच्या सादरीकरणनिष्ठ परंपरेचा आपल्या लेखनात पुरेपूर उपयोग केला.  राबलेच्या कथानकामध्ये मध्ययुगीन दैवकेंद्री व एका  आभासी व्यवस्थेचे कार्निवल धर्तीचे विडंबन आढळते.  विशेष म्हणजे पूर्वी रोममध्ये अंत्ययात्रेमध्ये विडंबन म्हणणे अनिवार्य असायचे! 

    मराठी विडंबन काव्याची दीर्घ परंपरा आहे. विडंबन काव्य आणि केशवकुमार यांचं अतूट नातं आहे. अत्र्यांमुळेच विडंबनाला स्वतंत्र साहित्य प्रकाराचा दर्जा प्राप्त झाला. विडंबन काव्य म्हटले की आजही आपल्या डोळ्यासमोर आचार्य अत्रे यांची’ झेंडूची फुले ‘उभी राहतात. अत्र्यांनी या काव्य प्रकाराचा निष्ठेने प्रचार व प्रसार केला आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.  कै. पांगारकरांच्या मते संत एकनाथांच्या भारुडामध्ये विडंबनाची वीस तरी उदाहरणे आढळून येतात. त्यांच्या ‘अर्जदास्त ‘ सारख्या गद्यविडंबनातून प्राथमिक स्वरूपाचे विडंबन पहावयास मिळते. विडंबन काव्य आचार्य अत्र्यांच्या ‘झेंडूची फुले’पासून सर्वपरिचित असले तरीही आद्य विडंबनकाराचा मान मंगेश रामचंद्र तेलंग यांच्याकडे जातो. मराठीतले पहिले विडंबनकाव्य म्हणजे १८८९ साली प्रकाशित झालेले तेलंग यांचे ‘संगीत हजामत’ हे होय. 

     विडंबन काव्यात मौलिक योगदान असणाऱ्या कवींमध्ये प्रामुख्याने ज. के. उपाध्ये, दत्तू बांदेकर, राजा बढे, पु. ल. देशपांडे, बा. सि. मर्ढेकर, सुरेश खेडकर, मंगेश पाडगावकर, डॉ. दिलीप कुलकर्णी, अनिल सोनार, श्रीमती लागू आणि इतर विडंबनकारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 

      अलीकडे विविध प्रकारच्या विडंबनाची रेलचेल आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये विडंबनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. विडंबन म्हणजे मानवी स्वभावातील सर्वांगीण पैलूंचे निरीक्षण करणारे क्ष- किरणच! दांभिकतेचा बुरखा फाडून आतील खराखुरा चेहरा समाजाला दाखविण्याचे कार्य विडंबन करते. ‘ज्याप्रमाणे निष्णात शल्यविशारद आपल्या आयुधांच्या साहाय्याने शरीरातील दूषित भाग काढून प्रवाह पुन्हा मोकळा करतो, तशीच काहीशी भूमिका विडंबनकाराची असते. तो विविध रूपांतील खटकणारी विरूपं हेरतो, विनोद बुद्धीने ‘ट्रीटमेंट’ देतो अन् मग तयार होतं विडंबन!’ अर्थात, मानवी वैगुण्यावर प्रकाश टाकून त्याचं निर्दालन करणं हे विडंबनाचं प्राथमिक ध्येय असतं. थोडक्यात दीनदुबळ्या, पिचलेल्या समाजाचे परिवर्तन  ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ मध्ये करून समाजाला नवसंजीवनी देण्याचं कार्य विडंबन आणि विडंबनकारच करू शकतो. 

Author

  • डी. एस. ( मिलिंद) परिचारक

    निवृत्त प्राचार्य उमा महाविद्यालय, पंढरपूर.लेखकाने 'The Tradition of Parody in English and Marathi Poetry: A Comparative Study' या विषयामध्ये पीएच. डी. प्राप्त केली आहे.

    View all posts

One thought on “ढंग विडंबनाचा 

  1. खुप छान.. विडंबन या साहित्यप्रकाराची उत्तम माहिती मिळाली 🙏🏼

Leave a Reply