
माणसं आपल्याला कधी ना कधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भेटत असतात ;मग ती कुठल्याही क्षेत्रातली असोत. त्यांचा थोडा सहवासही आपल्याला खूप काही देऊन जातो, शिकवून जातो.काही वर्षांपूर्वी असंच एक असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व मला भेटलं, ज्यांचं नाव आहे आहिताग्नि राजवाडे. खरंतर त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं नाही, ऐकलंही नाही; तरीही ते मला भेटले असं मी म्हणतेय. त्यांच्या व्यासंगाची, अफाट कष्टांची, ज्ञानोपासनेची ‘धग’ मला लागली. त्यांचं निर्भीड, परखड व्यक्तिमत्त्व माझ्यापर्यंत पोहोचलं ते त्यांच्या ग्रंथांमधून, आत्मवृत्तातून, व्याघ्रासनावर करारी मुद्रेनं बसलेल्या त्यांच्या तसबिरीतून आणि घरातील वडीलधाऱ्यांच्या आठवणींमधून.
ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रा. कै. श्री. के. क्षीरसागर यांनी लिहिल्याप्रमाणे, ‘आहिताग्निंच्या लेखनाचे विषय कलास्वरूपापासून (aesthetics) निर्द्वंद्वाच्या तत्त्वज्ञानापर्यंत विविध विषय असलेले दिसून येईल. परंतु ‘अद्वैत’ सिद्धांताऐवजी ‘निर्द्वंद्व’ सिद्धांत प्रस्थापित करणे हे त्यांच्या प्रचंड लेखनाचे पालुपद होते. आहिताग्नि महाविद्वान होते, स्पष्टवक्ते होते आणि वक्तृत्व त्यांच्या रोमारोमांत भिनलेले होते.’
आहिताग्निंनी हिंदुस्थानभर हिंडून व्याख्यानं दिली. एका वर्षी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रण दिलं होतं. राजवाड्यांनी राजांना निरोप पाठवला, ‘माझं व्याख्यान फक्त दरबारी मंडळींसाठी असणार नाही. जिथं तुमची प्रजा येऊ शकेल अशा ठिकाणी माझं व्याख्यान ठेवा. त्यांच्यापर्यंत माझे विचार पोहोचायला हवेत.’ त्याप्रमाणे राजांनी मोठ्या पटांगणात व्याख्यान आयोजित केलं होतं. राजवाड्यांची दुसरी सूचना होती, ‘राजे, तुमच्या आगमनाबरोबर तुमची प्रजा उठून उभी राहते. मी तुमची प्रजा नाही. मी उठून उभा राहणार नाही.’ त्यावर राजे म्हणाले, “मी व्याख्यानाच्या ठिकाणी आधी पोहोचेन. आपण माझ्यानंतर या.” राजांसमोरही आहिताग्निंनी आपला बाणेदारपणा सोडला नाही, आपली निःस्पृहता सोडली नाही आणि परिणामाची क्षिती बाळगली नाही; हे जेवढं खरं आहे तेवढंच विद्वानांचा सन्मान करण्याची बौद्धिक उदारता राजांमध्ये होती हेही महत्त्वाचं!
१९७९ साली आहिताग्निंच्या आत्मवृत्त प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. रा. शं. वाळिंबे यांनी आपल्या भाषणात राजवाड्यांच्या अमोघ वक्तृत्वाची आठवण सांगितली होती- ‘राजवाड्यांच्या व्याख्यानासाठी तेव्हाचे विद्यार्थी टिपणं काढण्यासाठी बरोबर वही पेन्सील घेऊन जात असत. या विद्यार्थ्यांमध्ये वाळिंबेही होते; परंतु राजवाड्यांच्या व्याख्यानाचा वेग एवढा प्रचंड असे की टिपणं काय काढणार! केवळ अशक्य! त्यांचा आवाज बुलंद, धगधगते तेज- जणू साक्षात अग्नीच! सायंकाळी साडेसहाचा गजर झाला की आपल्या खोलीच्या माडीवरून ते उतरायचे. गजर झाला की पहिलं पाऊल पडलंच पाहिजे अशी त्यांची शिस्त असे. जिना लाकडाचा होता आणि आहिताग्निंचं ते पाऊल! त्याचा आवाज व्हायचाच. गजर संपेतो जिना संपे. त्यानंतर अर्ध्या सेकंदात आसनावर बसायचे. पुढे दीड तास माणसं आपल्या विश्वात नसायची. दीड तासानंतर दुसरा गजर व्हायचा. गजर संपेतो व्याख्यानाचीही सांगता होत असे.’ वेळेच्या या अचूक नियोजनाला काय म्हणावं!
आत्मवृत्तात स्वतः राजवाड्यांनी लिहिलं आहे, ‘मी एकदा व्याख्यान सुरू केले म्हणजे मध्यंतरी तास – दोन तास खळ नाही, विचार करण्याला फुरसत नाही की शब्द योजण्याला अवकाश नाही. व्याख्यान सुरू झाल्यापासून पहिली पाच-दहा मिनिटे फार तर मला त्याचे भान असते; पण पुढे तंद्री लागून तीत ते नाहीसे होते. अशा तंद्रीत मग वाक्यामागून वाक्य उच्चारण्यात शब्द अडत नाही, व्याकरणाची चूक होत नाही की विषयाची संगती सुटत नाही. कित्येकांना माझ्या व्याख्यानातील वक्तृत्व पाहून आश्चर्य वाटते.’
आहिताग्नि आपल्या वाड्याच्या चौकात ज्ञानसत्र भरवीत असत. अनेक विद्वान व्याख्यात्यांच्या भाषणांनी चौक गाजता राहिला. इथं अनेक विषयांवर चर्चा झडल्या, टोकाचे वादविवाद त्या विषयाच्या मर्यादेत रंगले. वैयक्तिक टीकेला तिथं जागा नव्हती आणि विरोधी मतांचा, विचारांचा आदर करण्याची सहिष्णुता तेव्हाच्या समाजात होती. हे तेव्हाच्या विचारवंतांचं भाग्यच!
अशा ह्या वाड्यात लोकमान्या टिळक येऊन गेले, आचार्य अत्र्यांनी इथं व्याख्यान दिलं होतं, इतिहासाचार्य राजवाडे कामानिमित्त मुक्कामाला असत, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार व्याख्यानाच्या वेळी श्रोत्यांमध्ये बसल्याची आठवण काही जण सांगत असत. खरोखरच ‘वाडा’ सर्वार्थानं ‘जागता’ होता. ते एक ज्ञानमंदिरच होतं. या ज्ञानमंदिराचं पुजारीपण आहिताग्निंनी निष्ठेनं सांभाळलं. इथल्या तीर्थप्रसादाचं भाग्य अनेक श्रोत्यांना लाभलं.
आहिताग्निंच्या व्याख्यानाची तर पुणेकर वाट बघत असायचे. १९३२-३३ च्या सुमारास त्यांनी याच चौकात ‘फ्रेंच राज्यक्रांती’ या विषयावर शारदीय उत्सवाचं औचित्य साधून महिनाभर व्याख्यानं दिली होती. त्यापूर्वी त्यांनी फ्रेंच भाषेचा अभ्यास केला आणि राज्यक्रांतीचा इतिहास फ्रेंच भाषेतून वाचला. जर्मन, लॅटिन, ग्रीक, झेंद (Zend) ह्या भाषा त्यांना अवगत होत्या. इंग्रजी आणि संस्कृत भाषांवर तर त्यांचं प्रभुत्व होतं. शिवाजी महाराज आणि नेपोलियन बोनापार्ट त्यांचे ‘हिरो’ होते. त्या काळात फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास, त्यातले योद्धे, विचारवंत, कलावंत… हे सारं सामान्य लोकांसाठी अपरिचित होतं. त्यांनी कुणाचे फोटो पाहिले असण्याची फारशी शक्यता नव्हती. आहिताग्नि नेहमी म्हणत असत, ‘माझे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवेत.’ या भूमिकेतून त्यांनी आपली मुलगी शकुंतला हिच्याकडून क्रांतीतील एकशे एक महत्त्वाच्या व्यक्तींची चित्रं काढून घेतली होती. ही सर्व चित्रं व्याख्यानाच्या वेळी चौकात टांगलेली असत. रोज त्यांपैकी ज्या व्यक्तीविषयी व्याख्यान असे, त्या व्यक्तीचं चित्र मंचावर ठेवलं जायचं; हेतू हा की आपण कुठल्या व्यक्तीविषयी बोलणार आहोत ते लोकांना समजावं. फार दूरदृष्टीनं राजवाड्यांनी ‘visual’ माध्यमाचा उपयोग केला होता, हे आता लक्षात येतं.
कर्मठ सनातनी म्हणून आहिताग्नि ओळखले जात आणि ते खरंही आहे; परंतु आहिताग्नि रसिक होते. जाणकार रसिक! काव्य, साहित्य, संगीत, नाटक, क्रिकेट… अशा अनेक विषयांत त्यांना रस होता. वाड्याच्या चौकात त्यांनी ज्ञानसत्र चालवलं आणि गायन-वादनाच्या मैफिलीही घडवून आणल्या. ‘नाटक’ या विषयावर चौदा दिवस व्याख्यानं दिली. राजवाडे एवढ्यावरच थांबले नाहीत- त्यांनी आपल्या मुलींना, सुनांना कलाशिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. आपल्या प्रत्येक मुलीला महाविद्यालयीन शिक्षण दिलं; ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी तेवढीच ठळक बाजू!
‘ज्ञानोपासना’ हे आहिताग्निंचं जीवितकार्य होतं. विधात्यानं दिलेला तो ‘कौल’ होता. तरीही स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक, राजकीय प्रश्नांपासून ते कधी दूर गेले नाहीत- कायमच संवेदनशील राहिले. ते म्हणायचे, ‘इतिहास आणि तत्त्वज्ञान हे माझे विषय आहेत. राजकारण हा माझा विषय नाही.’ स्वतःची अशी प्रतिमा तयार करून छुपेपणानं इंग्रजांविरूद्ध क्रांतिकारकांना मदत करत राहिले.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की आहिताग्निंनी काही प्रचलित विचारांना, ‘अद्वैत’ सिद्धांताला आव्हान देत ‘निर्द्वंद्व’ सिद्धांत मांडला. भविष्यात याही सिद्धांताला आव्हान देणारे व्यासंगी विद्वान जन्माला येतील, नवा सिद्धांत मांडतील. बौद्धिक-वैचारिक वाद-चर्चांचं हे चक्र असंच चालू राहणं हे सुदृढ समाजमनाचं लक्षण आहे.
समाप्त
या लेख मालिकेचा पहिला भाग वाचण्यासाठी खालील दुवा पहा :
