आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे

(१३-१०-१८७९ ते २७-११-१९५२)

आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे. अनेकांसाठी तसं हे अनोळखी नाव. महाराष्ट्रातील काही अभ्यासक आणि विचारवंत वगळता या ज्ञानोपासकाची फारशी ओळख महाराष्ट्राला नाही. एकेकाळी ‘अग्निहोत्र मंदिर’, २८६ सदाशिव पेठ, पुणे (महाराष्ट्र) इथं या प्रकांड पंडिताचं वास्तव्य होतं. त्यांनी आयुष्यभर फक्त ज्ञानसंग्रह आणि ग्रंथलेखन केलं. हिंदुस्थानभर दौरे करून धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांवर व्याख्यानं दिली. ‘ज्ञानोपासक’ या बिरुदाला त्यांच्यामुळे श्रेष्ठत्व प्राप्त व्हावं असं हे आगळंवेगळं पण वादग्रस्त व्यक्तिमत्त्व!

मी आहिताग्निंना पाहिलं नाही, ऐकलं नाही. माझ्या सासूबाई कै. शकुंतला आठवले यांचे ते वडील. त्यामुळे आहिताग्निंविषयी मी बरंच काही ऐकून होते. त्यांची विद्वत्ता, त्यांचा अनेक विषयांचा व्यासंग, अमोघ वक्तृत्व, आपल्या वाड्यात ते चालवत असलेलं शारदीय ज्ञानसत्र… मी वाडा प्रथम पाहिला तेव्हा गतकालीन वैभवाच्या खुणा जपत तो उभा आहे असं वाटलं. भला मोठा लाकडी दिंडी दरवाजा, त्यावरची गणेशमूर्ती, दरवाजातून आत शिरल्यावर पाच – सहा फुटांचा अंधारा बोळ, डावीकडे जिना, उजवीकडे प्रशस्त ओटा, दहा-बारा खोल्या, ओट्यासमोर मोठं पटांगण आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला ‘अग्निहोत्र मंदिर.’ मंदिराच्या दरवाजासमोर बसून आहिताग्नि व्याख्यान देत असत. मी वाडा पाहिला तेव्हा त्याचं रूपांतर मंगल कार्यालयात झालं होतं. त्यामुळे माझं मन थोडं खट्टू झालं होतं. आजही अनेकांना ‘राजवाडे वाड्याची’ ओळख मंगल कार्यालय म्हणूनच आहे. असो! काळाबरोबर असे बदल होतच राहणार.

आहिताग्निंची अभ्यासिका मात्र त्यांच्या ज्ञानवैभवासह जपून ठेवलेली होती. शेजारच्या ग्रंथालयाच्या माडीत भिंतीलगत उंच लाकडी कपाटांमधून त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा, प्रकाशनाची वाट पाहणारे त्यांचे शेकडो छापील कागद आणि जगभरातले अनेक ग्रंथ दाटीवाटीनं तरीही एका शिस्तीत उभे असत. कुणाही अभ्यासकाला, वाचकाला तिथे मुक्त प्रवेश होता. त्याचा फायदा घेऊन काही लोकांनी वाचनासाठी, अभ्यासासाठी नेलेले ग्रंथ पुन्हा आणून दिले नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे आहिताग्निंची संपूर्ण ग्रंथसंपदा आज त्यांच्या परिवाराकडेही नाही.

येत्या २७ नोव्हेंबर रोजी त्यांचा ७१ वा स्मृतिदिन आहे. अग्निहोत्र घेतलं असल्यामुळे आहिताग्नि हे विशेषनाम त्यांच्या नावामागे लागलं ते कायमचंच. ज्ञानार्जन आणि ग्रंथलेखन हे जीवनाचं ध्येय निश्चित झाल्यावर त्यांनी कधीही कुणाची चाकरी केली नाही. त्यामुळे आपले विचार परखडपणे, निर्भीडपणे मांडणं त्यांना शक्य झालं असावं. त्यांच्या अति परखड, स्पष्टवक्तेपणामुळे अनेकजण दुखावले गेले, त्यांच्यापासून दूर गेले. त्यांचे अनेक विचार आजच्या काळात पटणारे नाहीत. काही विचारांचा तर निषेधच होईल. डॉ. सदानंद मोरे लिहितात, ‘राजवाडे यांचे विचार पटले नाहीत तर काही बिघडणार नाही. मात्र त्यांची जिज्ञासा व चौकस वृत्ती, त्यांची ज्ञानपिपासू, स्वतंत्र आणि निर्भीड विचारपद्धती, निःस्पृहता कोणत्याही विचारसरणीच्या सुज्ञ माणसाला भुरळ पाडील अशीच आहे.’ (दै. सकाळ, सप्तरंग, ‘अज्ञात पैलू थोरांचे’ – ४ डिसेंबर २०१६)

कळत्या वयापासून शंकर राजवाडे आपल्या विचारांवर ठाम असत. त्यांचा बाणेदार स्वभाव लहानसहान गोष्टींमधून दिसून येत असे. १९०८ साली पुण्यात शिवराज्यारोहणाचा उत्सव होता. विद्यार्थ्यांनी राजकीय सभांमध्ये भाग घेऊ नये असा फर्ग्युसन कॉलेजचा नियम होता. तरीही त्यांनी त्या उत्सवात निबंध वाचन केलं. त्याचा परिणाम म्हणून त्यांना कॉलेज सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राजवाड्यांच्या आयुष्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण ठरलं. इथं त्यांना आयरिश वंशाचे गुरू प्राचार्य डब्ल्यू. एफ. बेन भेटले. त्यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आहिताग्निंवर पडला. बेन यांना भारतीय ज्ञानपरंपरा आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी विशेष आत्मीयता होती. प्रो. बेन यांच्या व्याख्यानांनी प्रभावित होऊन मार्क्सचा ‘दास कॅपिताल’ ह्या ग्रंथाचा अनुवाद राजवाड्यांनी वाचला तो याच काळात. डेक्कन कॉलेजमधून तत्त्वज्ञान आणि इतिहास हे विषय घेऊन ते बी. ए. झाले; पण त्यापूर्वी कॉलेजच्या ग्रंथालयातील सर्व विषयांचे सर्व ग्रंथ वाचून झाल्यावर त्यांनी पदवी परीक्षा दिली होती, अशी आठवण ज्येष्ठ मूर्तिकार, शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. देगलूरकरांनी एका व्याख्यानात सांगितली होती. त्या व्यासंगाचा उपयोग त्यांना ग्रंथलेखनाकरता झाला हे ओघानं आलंच. एक विषय मांडताना इतर अनेक विषयांचे संदर्भ लेखनात येत गेले, त्याचं मूळ या व्यासंगी चौकस वृत्तीत आहे.

१९१५ साली लो. टिळकांचा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ प्रकाशित झाला, त्यानंतर ‘गीताभाष्य’ हा आहिताग्निंचा पहिला ग्रंथ १९१६ साली प्रकाशित झाला. ग्रंथनिवेदनात राजवाडे लिहितात, ‘हे ‘गीताभाष्य’ सर्वतोपरी नवीन धर्तीचे व नवीन विचारांचे आहे. हे कोणत्याही पूर्वीच्या भाष्याचे भाषांतर नाही, रूपांतर नाही किंवा अनुरूप कृती नाही. यात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे विवरण केवळ नीतीच्या व समाजाच्या दृष्टीने अगदी स्वतंत्रपणे पृथक्करणपूर्वक केले आहे व त्यात आरंभापासून अखेरपर्यंत गीतेची संगती गीतेच्याच शब्दांनी लावून दाखविली आहे. यातील गीतार्थ विवरण पूर्णपणे ऐतिहासिक, औत्क्रांतिक व तौलनिक आहे. याची रचना नवीन पद्धतीची- जागोजागी रेखाकृती, वंशक्रम, तुलनादर्शक कोष्टके वगैरे देऊन विषय अगदी सोपा करून दाखविणारी आहे. हे गीताभाष्य आधुनिक इंग्रजी पद्धतीच्या सुशिक्षितांनाही सहज परिचयाचे वाटेल.’ हेच आहिताग्निंचं वेगळेपण आहे. पूर्वसुरींचा, परंपरांचा अभ्यास ही त्यांच्या एकूणच ग्रंथलेखनाची मूळ ‘वीट’ आहे. त्या विटेवरच त्यांच्या नव्या अन्वयार्थांचा डोलारा ठामपणे उभा राहिलेला दिसतो. दुर्दैवानं ‘गीताभाष्य’ हा ग्रंथ अपूर्ण आहे.

नं. तरच्या काळात ‘सनातन वैदिक धर्म’, ‘नासदीयसूक्तभाष्य’, ‘ईशावास्योपनिषद्-भाष्य’, ‘षड्-दर्शनसमन्वय आणि पुरुषार्थमीमांसा’, ‘निट्-शेचा ख्रिस्तांतक आणि ख्रिस्तांतक निट्-शे’ आणि राजवाड्यांच्या पश्चात प्रकाशित झालेलं त्यांचं आत्मवृत्त (खरंतर आपल्या या ग्रंथाला त्यांनी ‘मी व माझे कार्य,’ हे शीर्षक दिलं होतं) अशी त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा आहे. याखेरीज शेकडो छापील कागद ग्रंथरूपात येऊ शकले नाहीत व त्यांच्या व्याख्यानांच्या पुस्तिकाही उपलब्ध नाहीत.

आहिताग्निंचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे, ‘नासदीयसूक्तभाष्य.’ ऋग्वेदातील नासदीय सूक्तावर लिहिलेला हा सव्वादोन हजार पानांचा ग्रंथ चार खंडांमध्ये विभागलेला आहे. या ग्रंथातील दोन खंड हे प्रौढ अभ्यासकांसाठी शरीरशास्त्र आहे. त्यामध्ये विवाहशास्त्र, जननशास्त्र, कुटुंबशास्त्र, समाजशास्त्र अशा मानवी जीवनाशी निगडित असलेल्या अनेक शास्त्रांचा ऊहापोह अनेक चित्रं आणि आकृत्यांसह केला आहे. त्यात मानसशास्त्राचाही त्यांनी विचार केला होता हे विशेष. आज ‘sex education’ ही काळाची गरज मानली जाते. ८० वर्षांपूर्वी या विषयाचं महत्त्व लक्षात घेऊन एखाद्या डॉक्टरनं ग्रंथ लिहावा इतक्या तपशीलात तो त्यांनी लिहिला आहे. त्यांचा प्रत्येक ग्रंथ त्यांनी स्वतःच प्रकाशित केला होता. त्याप्रमाणे हाही ग्रंथ त्यांनी प्रकाशित करून आपल्या निर्भीड स्वभावाचं दर्शन घडवलं असं म्हणता येईल. इथं त्यांनी स्वतःच्या रूढ ‘सनातनी’ प्रतिमेला स्वतः छेद दिला का, असा प्रश्न पडतो.

‘ईशावास्योपनिषद्भाष्य’ या ग्रंथात त्यांनी सुरुवातीलाच लिहिलं आहे; ‘नासदीयसूक्तात जगतपूर्व काय होते याचा विचार आहे. ईशावास्यात जगतात काय आहे ते दर्शविले आहे.’ हा ग्रंथ त्यांनी निर्द्वंद्व तत्त्वाच्या दृष्टीनं अद्वैत मतांचं खंडन करून मराठी भाषेत लिहिला आहे. विशेष म्हणजे त्यात जवळजवळ शंभर पानांचं लेखन हे भौतिकशास्त्रावर आहे (Physics). त्यामध्ये प्रो. सी. एम. ज्योड, प्रो. जोसेफ नीडहॅम, सर आर्थर डिंग्टन,प्रो.रसेल, आईन्स्टाईन अशा अनेक संशोधकांचे, विचारवंत लेखकांचे, तत्त्वज्ञांचे संदर्भ या ग्रंथात दिले आहेत. अर्थात सामान्य वाचकाला निर्द्वंद्व सिद्धांताच्या अर्थापर्यंत पोहोचणं तसं सोपं नाही. परंतु प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत उलगडत जाणारा प्रचंड कालपट राजवाड्यांच्या लेखनाचा आवाका नेमकेपणानं दर्शवितो हेही तेवढंच महत्त्वाचं!

स्वतःच्या ग्रंथलेखनाबरोबर राजवाड्यांनी फ्रीड्रीक निट्-शे या तत्त्वज्ञानं जर्मन भाषेत लिहिलेल्या ‘ख्रिस्तांतक’ या ग्रंथाचं मराठी रूपांतर केलं व याच ग्रंथात निट्-शेच्या ख्रिस्तांतकाचं पर्यालोचन म्हणून ‘ख्रिस्तांतक निट्-शे’ हे तीनशे पानांचं लेखन समाविष्ट केलं आहे. हा ग्रंथ त्यांनी इतिहासाचार्य राजवाडे यांना समर्पित केला आहे. अर्पणपत्रिकेत आहिताग्निंनी लिहिलं आहे, ‘निट्-शेच्या वृत्तीचे महाराष्ट्रातील एकच बाणेदार विवेचक विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरणार्थ’.

या ठिकाणी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. या राजवाडे घराण्यात पाव शतकाच्या कालखंडात तीन व्यासंगी विद्वान जन्माला आले. यास्काचार्यांच्या निरुक्ताचं संशोधन आणि भाषांतर करणारे भाषापंडित प्रा.वैजनाथ काशीनाथ, त्यांचे कनिष्ठ बंधू इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ आणि या दोघांचे चुलतबंधू आहिताग्नि शंकर रामचंद्र. खरोखरच निसर्गानं घडवलेला हा चमत्कारच म्हणावा लागेल.

व्यासंगी लेखक, टीकाकार डॉ. रा. शं. वाळिंबे एका सभेत म्हणाले होते, ‘आहिताग्निंच्या ज्ञानाचा महिमा, कर्तृत्व एवढे मोठे होते की ते गेले आणि सर्व ज्ञानाचे वैभव गेले.’ 

पूर्वार्ध

Author

2 thoughts on “आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे

  1. फारच मोलाची माहिती मिळाली.

Leave a Reply