गुरु गोविंदसिंग

जफरनामा : विजयघोष 

१ 

नुकतेच भारतीय शासनाने गुरु गोविंदसिंगांच्या अल्पवयीन पण तेजस्वी मुलांच्या बलिदानाची स्मृती गौरवान्वित करण्याच्या हेतूने २६ डिसेंबर हा दिवस वीर बालदिन म्हणून घोषित केला आहे. या बातमीविषयी मी इथे सिडनीत पूर्ण अनभिज्ञ होते. परंतु योगायोग असा की डिसेंबर २०२२ अखेरीस सिडनीमध्ये आल्यावर माझ्या मुलाने, मला `जफरनामा’चे गायन यूट्यूबवर ऐकवले, ते ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहत होता.गुरु गोविंदसिंग यांच्या या काव्यात या अल्पवयीन मुलांच्या हत्येचा उल्लेख आहे. पण या उल्लेखापलिकडे जाऊन अत्यंत संयतपणे त्यांनी जे विचार इथे मांडले आहेत,त्या विचारांनी अशी काही जबरदस्त पकड घेतली डोक्याची, की सकाळी उठून मी झपाटल्यासारखी त्याचा अनुवाद करायला सरसावले. सुदैवाने यूट्यूबवर दोन ठिकाणी त्याची संहिता, फारसीत आणि इंग्रजी अनुवादासहित मिळाली .त्यापैकी एक शीख अभ्यासकांनी केलेले काम आहे, तर दुसरी संहिता इराणच्या एम्बसीच्या मदतीने केलेल्या इंग्रजी अनुवादासहित आहे.  या लेखाअखेरीस ते दुवे दिलेले आहेत.अभ्यासूंनी अवश्य वाचावे.  गुरु गोविंदसिंगांच्या कारकीर्दीचा मागोवा घेताना हे लक्षात आले की जफरनामाच्या आधी १७०२ अखेरी गुरु गोविंदसिंगांनी औरंगजेबाला लिहिलेले पहिले पत्र `फतेहनामा’   या नावाने प्रसिद्ध आहे, दोन्ही पत्रे मिळून फक्त २४+१११ दोहे वा छंद म्हणा, आहेत.पण फार प्रभावी आहेत. या लेखामध्ये फारसीत लिहिलेल्या या आगळ्यावेगळ्या  ऐतिहासिक  दीर्घ काव्याचा  परिचय  करून देते. वर उल्लेखलेली दोन्ही पत्रे आता `जफरनामा’ चेच दोन भाग गणली जातात. कदाचित अलीकडच्या काळात इतिहासाचे जे पुनरावलोकन होत आहे, त्या संदर्भात आपल्याला या काव्याची काही माहिती असेलही. मीही उडता संदर्भ ऐकला होता.परंतु प्रत्यक्ष वाचल्यावर त्याने मनाची विलक्षण पकड घेतली. 

   अवघे एक्केचाळीस वर्षांचे आयुष्य (२२ डिसेंबर १६६६-  ७ऑक्टोबर  १७०८) लाभलेल्या या शीख गुरूंना `सच्चे पातशाह’ म्हणून का गौरविले जाते, हे आपल्याला या काव्यातून समजून येते.  गुरु तेगबहादुरांच्या वधानंतर केवळ ९ वर्षांच्या गोविंदसिंगांना शिखांचे दहावे गुरु म्हणून पंथाच्या कारभाराची धुरा हाती घ्यावी लागली. १६९९ मध्ये त्यांनी खालसा पंथ स्थापला, असे आपण इतिहासात वाचतो.गुरुगोविंदसिंगांच्या आधीच्या शीख धर्मगुरूंनीही धर्मरक्षणासाठी शस्त्राचा वापर उचित असल्याचे असे खणखणून बजावले.त्यांच्यापैकी कुणीही काही मोठे सत्ताधीश नव्हते. औरंगजेबाने गोविंदसिंगांचे पिता गुरु तेगबहादूर यांचीही हत्या त्यांनी काही काश्मिरी हिंदूना आश्रय दिला म्हणून केली.

`जफरनामा’ म्हणजे गुरु गोविंद सिंग यांचा `विजयघोष’. जफर म्हणजे विजय आणि नामा म्हणजे पत्र. शीर्षक वाचताच इतिहास आठवतो. इतिहासात आपण वाचलेले असते की औरंगजेबाच्या विराट सैन्यबळापुढे गुरुगोविंदसिंग यांचा पाडाव झाला, एवढेच नव्हे तर औरंगजेबाने त्यांच्या चार मुलांना यमसदनी पाठवले. असे असता या `विजयघोष’ पत्राद्वारे ते कुठल्या विजयाची घोषणा करीत आहेत?

या करुण उदात्त काव्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे: औरंगजेबाने गुरु तेगबहादूर सिंगची हत्या केल्यानंतर त्यांचे पुत्र गुरु गोविंदसिंग शीख पंथाच्या गादीवर आले. त्यांनी कधीही स्वतः:ला अवतार म्हणवून घेतले नाही. त्यांनी शिवालिकमधील एका राजा भीमचंद यांच्याकडून कलहुर नावाचा प्रांत विकत घेतला.आणि त्यातील मखवाल या गावाचे आनंदपूर असे नामकरण केले.कुणाशीही वैरभाव नसला तरी कलहूरच्या जवळच्या हिंदूरच्या राजाला त्यांच्या लोकप्रियतेची भीती वाटू लागली. १७०२ मध्ये ते आणि त्यांचे अनुयायी चमकोरच्या आसपास रात्री निवा-याला थांबले असताना त्यांच्यावर औरंगजेबाच्या सय्यद बेग नावाच्या मनसबदाराने शिवालिकमधील एका हिंदू राजाच्या मदतीने अचानक हल्ला केला. शीख फक्त चारशेच्या आसपास होते, तरी त्यांनी फार पराक्रम गाजवून गोविंदसिंगांना सुरक्षितपणे तेथून बाहेर काढले.परंतु या लढाईमध्ये गोविंदसिंगांचे दोन्ही मोठे मुलगे मारले गेले.या लढाईनंतर उपरती होऊन सय्यद बेग गोविंदसिंगांना जाऊन मिळाला.    

त्या नंतर गोविंदसिंगांनी औरंगजेबाला `फतेहनामा’ म्हणून एक पत्र लिहिले, या पत्राच्या २४ छंदांत ते स्पष्ट करतात की केवळ प्रजासंरक्षणासाठीच शस्त्र वापरणे विहित आहे, औरंगजेबाने मात्र सत्तामदामुळे हकनाक लढाया केल्या. याचा ते निषेध करतात.  देवाने त्यांना इजा होऊ दिली नाही, कारण ते कर्तव्यबुद्धीने लढत होते. हा   प्रजाहितकारी संदेश पार दुर्लक्षून औरंगजेबाच्या हुकुमानुसार सिरहिंदच्या फौजदाराने गोविंदसिंग जिथे वस्तीला होते त्या कची ग्रही सराई हवेलीला वेढा दिला. गोविंदसिंगांसोबत तेव्हा फक्त चाळीस सैनिक होते, तरीही त्यांनी इतकी चांगली लढत दिली की, औरंगजेबाने कुराणाच्या शपथेवर असे कबूल केले की, गुरूंनी आनंदपुर सोडले किंवा हजार घोड्यांच्या तुलनेचा एक घोडा औरंगजेबाला नजर केला ( या कलमाविषयी बरेच दुमत आहे.) तर  त्यांना  निर्धोकपणे  सिरसा नदीपार जाता येईल. प्रत्यक्षात मात्र आपल्या चाळीस निवडक सैनिकांबरोबर १७०५ मध्ये गोविंदसिंगांनी सराई सोडल्याबरोबर वजीरखानाने त्यांना चमकोर येथे परत गाठले.चमकोरच्या या दुस-या लढाईत गोविंदसिंगांचे बळ केवळ चाळीस, तेही वेढा लांबल्यामुळे अर्धपोटी सैनिकांचे होते तर वजीरखानाला शिवालिक पर्वतीय क्षेत्रातील हिंदू राजे सामील होते, आणि अफगाणांचीही त्याला मोठी कुमक होती. तरीही अतिशय वीरश्रीने गोविंदसिंग स्वतः आणि त्यांचे सैन्य वजीरखानाला भिडले, आणि त्यांनी ख्वाजासारख्या जुन्या दुष्मनाला अचूक टिपले, अनेक वीरांना पाणी पाजले. बरीच हानी होऊनही ते वजीरखानाच्या हाती लागले नाहीत-कारण त्यांच्या सत्याच्या पक्षाची पाठराखण ईश्वर करीत होता. 

परंतु रात्रीच्या अंधारात आणि पावसात चुकामूक होऊन त्यांचे दोन धाकटे मुलगे, जोरावर (वय ९) आणि फतेहसिंग (वय ७) आजीबरोबर सिरसा नदी ओलांडता असताना औरंगजेबाच्या फौजदार वजीरखानाच्या ताब्यात आले, त्यांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला, परंतु त्यांनी निर्भयपणे धर्म बदलण्यास नकार दिला, म्हणून औरंगजेबाच्या हुकुमानुसार त्या कोवळ्या मुलांना निर्घृणपणे भिंतीत चिणून ठार केले गेले. गोविंदसिंगांच्या आईचाही वध केला गेला. तरीही गोविंदसिंग शरण आले नाहीत, औरंगजेब कुरापती करीतच राहिला. या सर्व घडामोडींचा धिक्कार  नोंदवणारे  हे दुसरे , `जफरनामा’  म्हणून प्रसिद्ध  पत्र  गोविंदसिंहांनी  औरंगजेबाला पाठविले.ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण जेव्हा हे काव्य वाचतो ऐकतो, तेव्हा अतिशय विस्मय होतो की इतक्या आततायी, यातनामय घटना आपल्या कुटुंबीयांच्या वाट्याला आलेले पाहण्याचे दुर्दैव ज्या व्यक्तीच्याबाबतीत घडले  ती व्यक्ती इतकी समतोल, निष्ठावान , आणि आत्मविश्वासी  कशी काय असू  शकते? 

२. 

मी या दोन्ही पत्रांचे अनुवाद करावे असे ठरवले.   माझ्या मुलाला इतिहासाची बारकाईची जाण आहे, कारण त्याने काही वर्षांपूर्वी इतिहासात एम ए करण्यासाठी तयारीही केली होती.त्यामुळे शिखांच्या इतिहासातील बारकावे त्याने समजावून दिले. शिवाय या अनुवादाच्या कामी मला विशेष साहाय्य असे की, माझ्या धाकट्या सुनेची मातृभाषा फारसी आहे, त्यामुळे अनुवाद यथातथ्य व्हावा, यासाठी तिची मोलाची मदत झाली.मराठीतील प्रत्येक छंद तिच्या फारसी आकलनाबरोबर ताडून घेता आला.औरंगजेबाच्या काळात फारसी सरकारी कामकाजाची भाषा होती. त्यामुळे जरी गोविंदसिंगांना पंजाबी, संस्कृत, अवधी याही भाषा अवगत असल्या तरी त्यांनी ही पत्रे फारसीत लिहिली.त्यामुळे मूळ फारसी कवितांच्या शैलीपेक्षा गोविंदसिंगांच्या रचनेत वेगळेपणा जाणवतो, असे माझ्या सुनेचे निरीक्षण आहे.  फारसीतील गायन ऐकताना मला हे छंद भुजंगप्रयात वृत्तात असावेत असे लक्षात आले.आपल्याकडे उर्दू शायरीमध्येही भुजंगप्रयात वापरले जाते. असा हा अनोखा संस्कृतिसंगम या काव्यात दिसतो.   कवितेत संक्षेपाने बरेच सुचविले जाते, ते अनुवादकांनी कसे वाचले, यामुळे पुष्कळदा अर्थविपर्यय होऊ शकतो.लेखाअखेरी अशा एका दोन विवादित जागांचा उल्लेख केलेला आहे. 

आशयानुसार विचारकांनी आता या काव्याचे चार भाग केले आहेत. `फतहनामा’ (१७०२मधील रचना) हा याचा पहिला भाग मानला जातो. यातील २४ छंदांमध्ये गोविंदसिंगांची ईश्वर संकल्पना आणि औरंगजेबाच्या दुराचाराचा निषेध येतो, त्याचबरोबर धर्मयुद्ध कसे असावे, हेही ते स्पष्ट करतात.

 इतर तीन भाग हे नंतरचे दुसरे पत्र `जफरनामा’ या अंतर्गत येतात.

जफरनामाच्या प्रारंभिक १२छंदांतून (भाग दोन) )पुन्हा: एकदा गोविंदसिंग आपली पूर्ण ईश्वरनिष्ठा प्रकट करतात. त्यानंतरच्या सहा छंदांमध्ये ते औरंगजेबाच्या कुराण बाटविणा -या दुर्वर्तनाचा उल्लेख करून त्यांना आता त्याच्या कोणत्याही वचनावर  विश्वास ठेवणे  का शक्य नाही हे स्पष्ट करतात. याचे कारण म्हणजे चमकोरच्या त्या  दोन लढायांनंतरही औरंगजेबाने त्यांच्याकडे पुन्हा तहाचे प्रस्ताव पाठवून त्यांनी भेटीस यावे असे सुचवले होते.यावर ते परखडपणे  आता विश्वास ठेवणे का अशक्य आहे , हे प्रभावीपणे मांडतात. १९व्या छंदापासून४१ व्या छंदापर्यंत  चमकोरच्या विषम, अन्याय्य लढाईचे करूण-रुद्र वर्णन आपल्याला त्यांच्या निर्भयतेची आणि करुणेची साक्ष पटविते.  तशातही त्यांच्या सैन्याने कसा निर्भय प्रतिकार केला ते सांगून औरंगजेबाला जाणीव करून देतात की  सत्ताबळापेक्षा मनोबळ  का आणि कसे श्रेष्ठ  आहे.(हा भाग ३ गणला जातो.) त्यानंतर ४२व्या(भाग ४) छंदापासून ते  या  युद्धाची अनैतिक पार्श्वभूमी आणि औरंगजेबाच्या चुकीच्या धर्मधारणेविषयी सडेतोड विचार मांडतात,त्याची कानउघाडणी करतात  आणि फतहनामाप्रमाणेच  ईश्वर  म्हणजे काय, हे स्पष्ट करतात.

पहिल्या पत्राद्वारे गोविंदसिंगांनी मोठा मुत्सदीपणाचा आणि सावधगिरीचा इशारा औरंगजेबाला दिला. तो असा की त्यांनी आपल्या अनुयायांना पाण्यात तलवारीचे पाते फिरवून ते पाजले आहे.(फ.९) आता त्यांना मरणभय उरलेले नाही. ते पूर्ण समर्पित सैन्य आहे. अफगाणांसारखी किंवा लालचीने अथवा भयाने सामील झालेल्या हिंदू राजांसारखी ही उसनी कुमक नसून ही जीवावर उदार होऊन स्वधर्माचे पालन करणारी निष्ठावंत सेना आहे.हा संदर्भ आपल्याला त्यांच्या धोरणी नेतृत्वगुणाची जाणीव करून देतो.त्यांनी आपल्या पाच अनुयायांना अशाप्रकारे एका अर्थाने वचनबद्ध, कर्तव्यसिद्ध (याच संदर्भात आता शीख समुदाय पंच ककारांचे पालन करून स्वतः:ला खालसा म्हणजे शुद्ध म्हणवून घेतात.)केले, आणि त्यांना सैन्याची जवाबदारी सोपवली.हे पाचही अनुयायी विविध जातींचे आणि तत्कालीन भारताच्या पंजाब, हरयाणा, ओरिसा-जगन्नाथपुरी, द्वारका-गुजरात आणि बिदर- कर्नाटक अशा विविध प्रांतांतून आलेले होते. त्यांना त्यांनी पंज प्यारे `खालसा’, म्हणजे शुद्ध ही उपाधी देऊन गौरविले, एवढेच नव्हे, तर तशीच दीक्षा त्यांच्याकरवी स्वतः घेऊन आपणही त्यांच्यातीलच एक आहोत, कुणी लहानमोठा नाही, ही भावना त्यांच्याठायी निर्माण केली. अशा मुत्सदीपणे गोविंदसिंगजींनी एक राष्ट्रीय कर्तव्याचा भाव लोकांमध्ये जागा केला. तलवारीच्या पात्याने पाण्याचे अमृत करणे, हे प्रतीकात्म रीतीने सर्व अनुयायांना देवाची आज्ञा पालन करण्यासाठी निर्भय करणे होय. फतेहनामामध्ये याचा संदर्भ देऊन ते म्हणतात,

 “मी तर ईश्वरकृपया केले अमृत पाण्याचे,

 तुझ्या शिरावर झेल आता आघात प्रपातांचे “(फ. छंद ९)

ही दीक्षा त्यांनी १६९९मधेच आपल्या अनुयायांना दिली होती.अर्जुनालाही कर्तव्यपूर्ती करताना मरण आले, तरी ते उत्तम वीरगतीचे असेल, हेच श्रीकृष्णांनीही सांगितलेआणि त्याला मरणभयातून मुक्त केले. लढण्याच्या मागे स्वधर्मसंरक्षण आणि प्रजाहित हेच हेतू असतील   तरच युद्ध धर्मयुद्ध ठरते.मात्र सत्तामदातून, आणि राक्षसी महत्वाकांक्षेतून युद्धाला प्रवृत्त होणे हे औरंगजेबाआधी रावणाने आणि दुर्योधनानेही केले. अशा अपप्रवृतीचे निर्दालन करण्यासाठी शस्त्रसिद्धता असावी, जीवाची तमा बाळगू नये, अशी गोविंदसिंगांची शिकवण होती.गोविंदसिंगांचे वाढते बळ काही राजपूत राजांना आणि औरंगजेबाला चिंतेचा विषय वाटत होते.तत्कालीन भारतामध्ये शासकीय दृष्टीने एकसंधपणा नव्हता, परंतु वैचारिक, सांस्कृतिक एकात्मता नक्की होती. आणि तीच औरंगजेबासारख्या सत्ताधीशांना डाचत होती.   

३.   

या काव्यातील सखोल, सर्वस्पर्शी,प्रगल्भ, उदार धर्मसंकल्पना आपल्याला आपल्या संस्कृतीच्या खोल रुजलेल्या पाळा- मुळांची  जाणीव  करून देते.या १११ द्विपद्यांत त्यांनी देवाला अल्ला वा ईश्वर  संबोधलेले  नाही, परंतु इस्लामचा वा ईश्वराचा कुठे अनादर वा अपमानही नाही. अकाल(कालातीत), निराकार, सर्वज्ञ, सत्तारूप  अशी ही  ईश्वर संकल्पना आहे.त्याच्या कृपेच्या छत्राखाली आपण जगतो, तो दयामयच सर्व सुख-कल्याणकारी, आणि सदभक्तांचा  रक्षणकर्ता  आहे, ही त्यांची आस्था  या छंदांतून ठायी ठायी प्रकट होते ते स्वत: केवळ ईश्वर इच्छेनेच पालन करतात.हे ते निक्षून सांगतात. निर्गुण, अतुल, अमूर्त, सर्वज्ञ,कृपावंत, दयामय, दातार, स्नेहशील, दीनानाथ, पथदर्शक, त्राता,स्वामी, कृपादयाळ  इत्यादी  विशेषणे  गोविंदसिंग ईश्वरी सत्तेचे वर्णन विवरण करताना योजतात.त्यांची  अभंग  ईश्वर निष्ठा  या काव्याचा कणाच आहे.औरंगजेबाला त्या सर्व सत्ताधीश ईश्वराची खरी जाणच  नाही, त्याने इतर धर्मांची  तर अवहेलना केलीच, पण त्याला इस्लाम आणि महंमदाचे  रूपही स्मजलेले नाही. असे ते लिहितात.एका प्रकारे या विजयपत्राद्वारे ते त्याला जाणवून देत आहेत की ईश्वर ज्याच्या बाजूने असेल तोच खरा विजय मिळवू शकतो.औरंगजेबाने केलेला कुराणाचा अपमानही गोविंदसिंगजी अत्यंत त्याज समजतात. जितका एखाद्या हिंदू धर्मग्रंथाचा निरादर त्यांना झोंबला असता, तितकाच खेद, दु: ख औरंगजेबाने चुकीच्या धर्मधारणेमुळे आपल्याच कुराणग्रंथाची विटंबना केली, या विचाराने त्यांना झालेला दिसतो.ते म्हणतात,

`ईश्वरास स्मरुनी शपथ घेत मी ‘म्हटले होतेस 

आठवून ते आता दिल्या वचनाला जागावेस (ज. ५१)

 ….. 

दिला शब्द पाळावा खचितच नेक माणसाने

 `ओठीं एका अन पोटी भलते’ असे नसावे जिणे (ज. ५५)

खरे धर्मपालन नि:स्वार्थ असते. आपल्या क्षुद्र मतलबांना पाठबळ म्हणून धर्माचा आधार घेणे ते अत्यंत निंद्य, त्याज्य समजतात. हा सार्वकालिकपणे लक्षणीय असा दृष्टिकोन आहे. अगदी अद्यापही जगामध्ये अनेक वाद विवाद आणि युद्धे धर्माच्या खोट्या बडेजावापायीं होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर गुरु गोविंदसिंगांचे विचार मननीय, चिंतनीय, आचरणीय आहेत.केवळ औरंगजेबाचाच नव्हे, तर त्याच्या दडपणांना आणि प्रलोभनांना बळी पडून स्वत्व सोडणा-या राजपूत आणि शिवालिक मधील इतर हिंदू राजांच्याही ते विरोधात यासाठीच जातात की मूर्तिपूजा कर करूनही त्यांना धर्म म्हणजे काय याची पुरेशी जाण नव्हती. क्षुद्र स्वार्थासाठी वा भीतीपोटी त्यांनी आपल्या राजधर्माची हेळसांड केली.फतेहनामामध्ये ते म्हणतात,

 त्या ईश्वरेच सोपविले मज काम धर्म रक्षणाचे, 

ज्याने दिधले असे तुला, ते तख्तही सत्तेचे (फ़३.)

युद्धही नीतिमानपणे, प्राप्तकर्तव्य म्हणून, सर्व न्याय्य नियमांचे पालन करून केले पाहिजे, हा रामायण महाभारतकालीन धर्मयुद्ध आणि  युद्धधर्म विचारही त्यांच्या या काव्यात दिसून येतो. अशा नीतिमानतेचे पालन औरंगजेबाकडून होत नसल्याबद्दल ते त्याचा अधिक्षेप करतात.फतहनामाच्या अखेर छंद २०, २१, २२ मधून ते न्यायाचे युद्ध कसे आमोरासामोरे, कुठलाही घातपात न कारता, युद्धभूमीवर दोन सैन्यांमध्ये दोन फर्लांगांचे अंतर ठेवून झाले पाहिजे, हे सांगतात.आणि अखेरच्या २४ व २५ व्या छंदांत त्याला आव्हान देतात की अशा प्रकारे युद्ध करायचे, तर सामोरा हो. निष्पाप प्रजेला त्रास देऊ नकोस.

 उगाच परपीडन आणि आपल्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालणे ते निंदनीय ठरवतात.युद्धात होणा-या रक्तपाताविषयी, अनाठायी हिंसेबाबत त्यांना अतीव करुणा होती, हेही या छंदांतून प्रभावीपणे व्यक्त होते.जफरनामामधील चमकोरच्या दुस-या लढाईचे जे त्यांनी वर्णन केले आहे, त्यात हे प्रकर्षाने जाणवते.त्यांची निर्भय अस्मिता  फतहनामाच्या शेवटच्या छंदांतून जेव्हा ते औरंगजेबाला म्हणतात की अद्याप तुझी ख-या वीरांशी गाठ पडलेलीच नाही, आणि  चमकोर युद्धाच्या वर्णनात ते ज्या उपहासाने  तोंड लपवून भिंतीआड दडणा -या – ख्वाजाचा  आणि त्यांच्या अचूक बाणाने टिपलेल्या  नाहर या मातबर दुश्मनांचा उल्लेख  करतात,त्यातून सहजच दिसून येते. 

पण तेच गोविंदसिंग छंद ३७ ते ४१मध्ये ते नमूद करतात की रणभूमी गोळ्या-बाणांचा वर्षावाने रक्तरंजित झाली, सर्वत्र तुटलेले अवयव, मस्तके विखुरली, हलकल्लोळ माजला, दोन्हीकडचे वीर जणू माथेफिरूंसारखे एकमेकांना भिडले.विनाकारण एवढा रक्तपात झाला. असा हिंसाचार टाळावा यासाठी ते इतके व्यक्तिगत आघात होऊनही औरंगजेबाला अभय देऊन त्याच्याशी सामोपचार करण्याची तयारी दर्शवितात.आपल्याला कदाचित हे भारतीयांचे बोटचेपेपणा किंवा भीरूता वाटेल, पण त्यामागे अहिंसेचा पुरस्कार आणि शांतिप्रियताच आहे. कृष्णाने शिशुपालाचे शंभर अपराध पोटात घातले आणि अखेर नाईलाजाने त्याचा वध केला, तद्वत गोविंदसिंगजी औरंगजेबाला सुधारण्याची संधी द्यायला तयार आहेत. हे तत्थ्य भारतीय मानसिकतेचे निदर्शक म्हणावे लागेल.जे जे काही घडते, ते ईश्वरी योजनेनुसार होत असते, आपण आपल्यापरीने योग्य अयोग्य काय याचा विवेक करून सत्याचा मार्ग अनुसरावा हेच ते औरंगजेबाला सांगतात, आणि हेही बजावतात की सदाचार सोडून वागलो तर त्याची फळे कधीनाकधी माणसाला भोगावी लागतातच. ईश्वराचा न्याय सदैव जागा आहे.त्याच्या इच्छेनेच जग चालत असते.  त्यांची क्षमाशीलता हा काही खोटा आव आणण्याचा, अथवा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न नव्हता हेही या छंदांतून सहजच दिसून येते. त्यांचे शौर्य, निर्भयता आणि समतोल विवेक आपल्याला अचंभित करतात.

या वीरश्री युक्त काव्याला असलेला करुण अंत:स्तर वाचकाचे मन उदात्त गंभीरपणे अभिभूत करतो. एको रस: करुण एव. असे काव्यप्रकाशात का म्हटले गेले,याचा आपल्याला बोध होतो. रामायणाची प्रेरणा क्रौंच वधाच्या करुण दृश्यातून स्फुरली, त्यामागचे कवितेच्या उगमस्थलाचे सत्य आपल्याला इथे सहज अनुभवाला येते.गोविंदसिंगांची करुणा निव्वळ आप्तस्वकीयांच्या जीवितहानीतून उपजलेली नव्हती, तर त्यांना आयुष्याची खोल समज असल्याने औरंगजेबाचा अविचारी रक्तरंजित कारभार पाहून त्यांचे अंत: करण द्रवले. 

या दीर्घकाव्यात पोवाड्यांसारखा शाहिरी जोष नाही. शाहिरी परंपरेमधे शिवराय वा संभाजीमहाराजांच्या विजयाचे वा पराक्रमाचे पोवाडे गाऊन वर्णन केले जात असे,ते स्वतः आपली विजयघोषणा करीत नसत. इथे एक लौकिक दृष्टीने पराभूत सेनानी हे विजयपत्र लिहितो आहे. हे इतिहासाने औरंगजेबाच्या कुटिलतेचा बळी ठरवले गेलेल्या गुरु तेगबहादुरांच्या पुत्राच्या आध्यात्मिक वेदनेतून उमटलेले हे बोल आहेत.त्यातले तीव्र कोमल आत्मभान चटका लावते.

 लेडी मॅकबेथची हताश पराभूतता किंवा कलिंग विजयानंतर अशोकाला आलेली विरक्ती आणि औरंगजेबाची उपरती ह्या सा-यांपेक्षा गुरु गोविंदसिंगांची कर्तव्यपूर्ती मन हेलावून सोडते. `पा, पाति ‘इति पति या अर्थाने पातशहा म्हणजे अनाथांचा नाथ, दीनानाथ रक्षणकर्ता पति म्हणजे राजा.प्रजाहितदक्षता त्याचे आद्य कर्तव्य आहे,या विचाराने दुष्प्रवृत्तींशी दिलेली ही धीरगंभीर लढत आहे.या पत्राच्या निमित्ताने त्यांनी राज्यशासकावरच्या जवाबदारीचे जे दिग्दर्शन केले आहे, ते अगदी रामायण महाभारतकाळापासून आपल्या संस्कृतीने दिलेल्या विचारांशी जुळते मिळतेच आहेत. राजपद ही भोगविलासाची अथवा आपली महत्वाकांक्षा पुरी करण्याची एक संधी नसून समस्त राज्याचा प्रतिपाळ करण्याचे ते असिधाराव्रत आहे. `मनस्वी कार्यार्थी गणयति न दु:खं नच सुखम् ‘(भगवद्गीता, 2.88) अशा निर्लेप बुद्धीतून राजाने शासन विषयक निर्णय घेतले पाहिजेत. त्यात अहंकाराला वा स्वार्थाला तिळमात्रही जागा नाही, असे जेव्हा आपले मायबाप आणि चार मुले गमावलेला राजा निश्चयपूर्वक म्हणतो, तेव्हा तो स्वत:  किती सुविचारी, प्रशान्त, नि:स्वार्थ असेल, याची आपण कल्पना करू शकतो. औरंगजेबाच्या दुष्कर्माचा हिशेब त्याला केव्हा ना केव्हा ईश्वरापुढे द्यावाच लागेल, हा त्यांचा विचारही भारतीय विचारपद्धतीशी सुसंगतच आहे.

त्यांची निर्भय अस्मिता फतहनामाच्या शेवटच्या छंदांतून जेव्हा ते औरंगजेबाला म्हणतात की अद्याप तुझी ख-या वीरांशी गाठ पडलेलीच नाही, आणि चमकोर युद्धाच्या वर्णनात ते ज्या उपहासाने तोंड लपवून भिंतीआड दडणा -या – ख्वाजाचा आणि त्यांच्या अचूक बाणाने टिपलेल्या नाहर या मातबर दुश्मनांचा उल्लेख करतात,त्यातून सहजच दिसून येते.  

 जरी हकनाक हत्या वा कुबुद्धीने केलेली दांडगेली निंद्य असली तरी ज्याला शब्दांचा मार समजत नसेल त्याला वठणीवर आणण्यासाठी  हाती शस्त्र घ्यायलाच हवे.अशा भूमिकेतूनच फतहनामाचा पहिला छंद स्पष्टपणे म्हणतो की `कु-हाड, बाण वा भाला आणि ढाल नि तलवार , प्रकट होतसे या रूपांनी तो अमुचा ईश्वर ‘(फ.१ ) कारण गोविंदसिंग  जाणून होते  की निव्वळ शाब्दिक उपदेशाने वळेल , बुद्धी पालटेल असे औरंगजेबाचे व्यक्तिमत्वच  नव्हते.ते जाणून आहेत की त्याची जपमाळ हा निव्वळ देखावा आहे, अन्यथा कोणता धार्मिक माणूस  आपल्या जन्मदात्याची आणि भावांची हत्या करून सत्ता बळकावेल ?(फ.७,८,९)म्हणूनच  त्यांनी स्पष्ट मत नोंदवले आहे की औरंगजेब हे अभिधान औरंगजेबाला तिळमात्रही शोभत नाही. कारण औरंगजेब शब्दाचा अर्थ, तख्ताची शान वा सिंहासनाचा गौरव असा आहे.पुढे जफरनामामध्ये छंद ८९ ते ९४ या ओळींमध्ये ते औरंगजेबाची कीर्ती देखणा, तल्लख बुद्धीचा,शूर, दानी ,धनवान आणि रयतेला खुश ठेवणारा अशी  आहे, हे ते नोंदवितात.परंतु, त्या आधी त्याच्या खोटेपणाचं माप त्याच्या पदरी घालतात.  जफरनामाच्या ५७ व्या छंदात ते लिहितात की कुराणाच्या ज्या प्रतीवर सही करून औरंगजेबाने शपथेवर अभय दिले, ती प्रत त्यांच्यापाशी आहे, हवी तर ते ती प्रत औरंगजेबाला त्याच्या खोटेपणाचा पुरावा म्हणून पाठवून देऊ शकतात. “नंतर ते म्हणतात

  “त्यानेच (ईश्वराने)) दिले ते तख्त तुला, पण झाले विपरीत,

 दुर्गुणीच तू, न्याय ना पाळणे हीच तुझी रीत (ज.६६)

 हे त्यांचे विधान आपल्याला थोडे खटकते कारण आधी ते औरंगजेबावर स्वकुळाची हत्या करून गादी बळ कावल्याबद्दल निषेध करतात. परंतु त्यांच्या या काव्यातून ते ईश्वरी सत्तेचे संपूर्ण सार्वकालिक सत्तारूप वर्णतात. काव्याच्या अखेर शेवटून पाचव्या आणि सहाव्या छंदांमध्ये ते आपल्या संस्कृतीतील एक महत्वाचा तात्त्विक विचार मांडतात.तो असा की या जगाच्या सराईमध्ये किंवा धर्मशाळेमध्ये आपण सारेच वाटसरूसारखे काही काळ येतोआणि आपापली वेळ झाली की पुढच्या वाटचालीला लागतो. इथल्या कशावरही आपली कुणाचीच खरी सत्ता नाही, त्रिकालाबाधित, सार्वकालिक सत्ता एकमेव ईश्वराचीच आहे. ते दोन छंद असे:

जग हे केवळ असे सराई आठा दिवसांची

 पथिक एक सोडून जाई, दुसरा जागा घे त्याची (ज.१०७)

बघ चक्रनेमिक्रम जगताचा घातच चाले येथे 

अटकावच ना, बळकावी, कुणीही खुशाल पराद्वाराते (ज.१०८) 

 आणि त्यापुढे ते सुचवितात की हे समजून घेऊन आतातरी औरंगजेबाने आपले वर्तन सुधारावे:

 थांबव शक्तिप्रदर्शन, सतावू नको दीन दुबळ्यांना

 खोट्या शपथा घेऊन तू ठकवू नको बिचा-यांना (ज.१०९)

यानंतर शेवटच्या दोन छंदांतून ते पुन्हा एकदा आपली अढळ, अचल ईश्वरनिष्ठा व्यक्त करतात,की जो कुणी सत्याचा मार्ग धरून चालतो, त्याचा वाली, राखणदार ईश्वर असतो.त्याच्या शत्रूने जरी हजार माणसे  त्याच्या नि:पाताला पाठवली तरी  त्याच्या केसालाही इजा पोचत  नाही.अशा दृढ श्रद्धाभावाने या उदात्तगंभीर काव्याची समाप्ती होते. 

 ४. 

या दीर्घ कवितेचा ओघ, त्यातील ओज आणि सच्चेपणा आपल्याला सरळ भिडतात. गुरु गोविंदसिंगांचे नुसते फारसी भाषेवरचे प्रभुत्वच नव्हे, तर पर्शियन साहित्य आणि विचारांशी असलेला त्यांचा सघन परिचय ही त्यांच्या बहुश्रुततेची साक्ष पटवितात.  `जफरनामा’ मधील चमकोरच्या लढाई च्या संदर्भात २२व्या छंदात गोविंदसिंगजी म्हणतात, 

जेव्हा सोडविण्यास समस्या पर्यायच ना उरत

 अखेर हातीं समशेरीचा घेणे आम्हा क्रमप्राप्त (ज.22)

या छंदात फारसी कवी शेख सादी यांचा प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येतो, असे जफरनामाच्या अभ्यासकांचे स्पष्ट मत आहे.* युद्ध हा इतर सर्व उपाय खुंटले तरच अवलंबिण्याचा नाइलाजाचा पर्याय आहे, हे ते इथे अधोरेखित करतात.  फारसी महाकवी फिरदौसी यांचा चपखल संदर्भही अतिशय मार्मिक आहे. फिरदौसी यांनी अन्य एके ठिकाणी असे म्हटले आहे की, `मी मेलेला नाही. काळ पुढे जात आहे, तसा जावो. मी माझ्या शब्दांचे बियाणे विखुरले आहे, त्यांमध्ये माझे शरीर-मन आणि विचार उजळत आहेत.’हे त्यांचे विधान सुप्रसिद्ध आहे. अशा फिरदौसीचा संदर्भ देऊन गोविन्दसिंगजी स्पष्ट समज  देत आहेत की माणसाची हत्या करता येते, विचारांची नाही.जफरनामाच्या ८०व्या छंदात ते  म्हणतात की फिरदौसी यांनीही म्हटले आहे की अविचाराने  केलेले काम हे अहिरमनाचे, म्हणजे रावणाचे किंवा दुर्बुद्धीचे (सैतानाचे) काम आहे.अशा दोनच ओळींतून ते हे सुचवितात की औरंगजेबाने केलेली अविचार कृत्ये (गोविंदसिंगांच्या  कुटुंबीयांचे वध इत्यादीही ) त्याचा तामसीपणा दाखवितात. अशा कृत्यांनी सत्य झाकता वा विझवता येत नाही.पुढे ते म्हणतातही की तू माझे  चार  मुलगे मारलेस पण माझा प्रत्येक सैनिक माझा पुत्रच आहे, आणि त्यांच्या नागफासातून आता तुझी सुटका होणार नाही.ज.७८हा छंद मला त्याच्या पु-या अल्पाक्षरी  ताकदीने अनुवादित करता आला नाही. फारसीमधे ते म्हणतात, की एखादा साप जसा वेटोळे करून फणा काढून भक्ष्याचा गळा आवळायच्या तयारीत असतो, तसे माझे सैनिक आता तुझ्यासाठी टपून बसले आहेत. त्याच्या पुढच्या छंदांमध्ये ते इशारा देतात की दोन ठिणग्या विझवून ज्वाला भडकायच्या थांबत नाहीत.

ध्यानींमनीं नसताना शपथेवर विश्वासून गोविंदसिंग आणि त्यांच्या   चाळीस अनुयायांनी कच्ची ग्रही सोडली, आणि अकस्मात त्यांच्यावर वजीरखानाने हल्ला केला, त्याचे वर्णन करताना ते म्हणतात,

आले ते तर घोंगावत जणू थवाच माशांचा 

काळेकभिन्न कपडे घालून हल्ला झाला त्यांचा (ज. २६)

किती कमी शब्दात ती   परिस्थिती इथे चितारली गेली आहे तसेच फारसी साहित्यात `लाली’ म्हणजे एका प्रकारच्या पॉपी वा ट्युलिप जातीच्या फुलांशी असलेला मरणाचा संकेत अतिशय विनासायासपणे या काव्यात दिसून येतो. अनाठायीच्या रक्तपाताने चमकोरची रणभूमी कशी त्या मरणफुलांच्या लालेलाल शेतासारखे दिसत होती, असे गोविंदसिंग म्हणतात. अशा संदर्भांतून त्यांचे फारसीची जाण तर दिसतेच, पण त्याचबरोबर युद्धात होणार-या अनाठायी हिंसेबाबत त्यांना वाटणारी खोल अस्वस्थताही जाणवते.या लाल फुलांच्या शेताच्या पुढच्याच छंदात ते म्हणतात की सारे रणमैदान पोलो खेळाच्या मैदानासारखे भासू लागले. पोलो खेळात चेंडू आणि काठ्या असतात, त्याऐवजी चमकोरच्या मैदानात तुटलेले पाय आणि धडावेगळी मस्तके पसरली होती.अशा हृदय हेलावून सोडणार-या प्रतिमांनी ते युद्धाचे वैय्य्यर्थ अधोरेखित करतात.जेमतेम चाळीशीच्या गोविंदसिंग इतक्या प्रगल्भतेने पंच्याऐंशी वर्षाच्या औरंगजेबाला त्याचे काय चुकते आहे, हे स्पष्टपणे जाणवून देतात.त्यांचा निर्भय आत्मविश्वास त्यांच्या ईश्वरनिष्ठेचे फलित आहे. त्यांना कसलाही व्यक्तिगत स्वार्थ भुरळ घालू शकत नाही, आणि ईश्वराखेरीज इतर कुणाचीही सत्ताही नमवू शकत नाही.त्यामुळे त्यांची वाणी तेजस्वी, तेवढीच हितकर आहे. 

इतिहास असे सांगतो की हे पत्र औरंगजेबाच्या हाती पडले तेव्हा तो औरंगाबाद, महाराष्ट्र येथे वास्तव्याला होता. पत्र वाचून त्याला खूप खोलवर बोच लागली, आणि त्याने मुनीम नावाच्या आपल्या संदेशवाहकाकडे गोविंदसिंगांच्या नावे पुन्हा एकदा भेटीसाठी निमंत्रण पाठवले. परंतु ही भेट होण्याआधीच त्याचे निधन झाले.(वय ८९) निधनापूर्वी त्याने आपल्या मुलांना ,स्वतःच्या मागे त्याच्या राज्याची आणि मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी , यासाठीच्या सूचना देणारे इच्छापत्र लिहिले.त्यात त्याने आपला मुलगा आझम शहा याला आपल्यामागे गादीवर बसवावे अशी सूचना केली.या पत्रातील  बाकी सर्व मजकूर लक्षात घेतला तर औरंगजेबाच्या मनात झालेला पालट  स्वच्छ दिसून येतो.(खाली  या पत्राचा आंतरजालावरील दुवा जोडलेला आहे.तो अवश्य नजरेखालून घालावा.) त्याला आपल्या वर्तनाचा पस्तावा झालेला कळून येतो.असे परिवर्तन घडून येण्यासाठी गोविंदसिंगांचे हे विजयपत्र प्रमुख कारण असेल, असे मानायला हवे.अशा प्रकारे या विजयघोषाचा नैतिक, आध्यात्मिक परिणाम व्हावा हेच गोविंदसिंगांना साधायचे होते.अन्यथा ते इतके निरभिमानी , ईश्वरनिष्ठ संत होते की त्यांना लौकिक  जयापजयाचा हर्ष-खेद नव्हता, हे त्यांच्या या विजयपत्राच्या अखेरच्या पाच छंदांतून  सुस्पष्टपणे जाणवते.

त्यांनी आपल्यामागे कुणी उत्तराधिकारी न नेमता त्यांच्यापर्यंत झालेल्या सर्व गुरूंची वाणी संकलित करून तो ग्रंथच आता शिखांचा गुरू आहे, असे घोषितकेले.औरंगजेबाच्यामागोमाग एका वर्षाने १७०८मध्ये त्यांचीही जीवनयात्रा संपली, परंतु त्यांची `सच्चे पातशहा ’हीउपाधी त्यांची कीर्ती अजरामर करीत आहे.

आजच्या जागतिक परिस्थितीमधे गोविंदसिंगांचे विचार किती मोलाचे आहेत, हे सुजाण वाचकांच्या लक्षात आलेच असेल.असे म्हटले जाते की जो समाज आपल्या इतिहासाला विसरतो, आणि त्याने दिलेल्या शिकवणीकडे काणाडोळा करतो, त्याला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा धोका संभवतो.या दृष्टीने पाहता आपण या पत्रांतील   संदेश पुरतेपणाने समजून घेउन पुढची सश्रद्ध, सुजाण वाटचाल करावी.या हेतूने हा लेख वाचकांसमोर ठेवीत आहे. 

 इत्यलम् 

१.या लिंकवर आपल्याला इराणच्या एम्बसीच्या मदतीने केलेले जफरनामाचे इंग्रजी भाषान्तर मिळेल. 

२. शीख अभ्यासकांनी केलेले जफरनामाचे भाषान्तर या लिंकवर डाउनलोड करून पंजाबी, तसेच मूळ पर्शियन ,व इंग्रजी अनुवाद वाचता येतील. पाहता येईल. 

file:///C:/Users/Aviram%20Vijh/Downloads/Zafarnama-With-Meanings-English-Punjabi-Persian.pdf

३. औरंगजेबाचे मृत्युपत्र::

https://www.kractivist.org/what-last-will-of-emperor-aurangzeb-reveals/

Author

  • सुखमणि रॉय

    एम् ए, एम् फिल्, पंडित
    एक्स रीडर व विभागाध्यक्ष, इंग्रजी विभाग, पी एन् दोशी कॉलेज,घाटकोपर, मुंबई

    संशोधन क्षेत्र: उत्तर-आधुनिकतावादी व स्त्रीवादी साहित्य व विचार

    View all posts

One thought on “गुरु गोविंदसिंग

  1. अगदी प्रेरणादायी इतिहास आहे हा ! शालेय पुस्तकात अगदी ओझरता उल्लेख होता.

Leave a Reply