पुनर्भेट नॅशनल पार्कची.. 

 ‘मी नॅशनल पार्कला पुन्हा आले त्याची गोष्ट’    

   १४.६.२०२३                                                 

 कालपर्यंत सगळीकडे उष्मा वाढला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या; पण आज सकाळपासून थंड वारे वाहू लागले. पांढऱ्याशुभ्र आकाशात कुठून कुठून काळे ढग जमा होऊ लागले . सकाळी नऊ वाजता रिमझिम पाउस पडू लागला. या पहिल्या पावसाच्या सोबतीने मी  संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बरोबर दहा वर्षांनी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून पुन्हा  प्रवेश केला. गेटवरच्या गार्डने माझी बाईक थांबवली . मी म्हटलं, “मी पशुवैद्य  म्हणून इथे आज नव्याने रुजू होत आहे.” तसं तो एकदम ओळखीचं हसला. “अरे ! मॅडम तुम्ही!”   मनातल्या मनात बरं वाटलं. म्हटलं, ‘चला आपल्याला लोक ओळखतात इथे अजून!’ 

काळ्याभोर डांबरी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी छत्रीसारख्या पसरलेल्या झाडांच्या सावलीतून बाईक चालवत मी माझ्या ऑफीसकडे निघाले. दहिसर नदी उन्हाळ्यात पूर्ण सुकली होती. सुकलेल्या नदीपात्रात रिमझिम पावसाचे थेंब पडत होते. मी माझ्या जुन्या ऑफीसकडे निघाले. समोर पाहिलं तर ऑफीसचं जुनं रूप पूर्णपणे पालटलं होतं. पूर्वीच्या आमराईत लपलेल्या छोट्याशा बंगलीच्या  जागी आता सुसज्ज असे वन्यप्राणी इस्पितळ उभे राहिलं होतं.  पांढऱ्याशुभ्र पाटीवर ठळक लाल  अक्षरांनी लिहिलेल्या,  ‘वन्य प्राणी इस्पितळ,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली,’ या पाटीकडे बघत मी माझ्या कार्यालयात प्रवेश केला. इस्पितळात प्राण्यांसाठी अत्याधुनिक व्यवस्था आणि उपकरणं आली होती; पण मला खरी उत्सुकता होती ती पिंजऱ्यावरचे प्राणी बघण्याची; पण त्यासाठी मला दुसऱ्या दिवसापर्यंत थांबावे लागणार होते. त्या दिवशी मी माझे बदलीचे कार्यालयीन पेपर वर्क पूर्ण केले.

१५.६.२०२३  

   आज मी सकाळीच निघाले. मला माझ्या जुन्या दोस्तांना  भेटायचं होतं.पहिल्यांदा डिअर पार्कमध्ये प्रवेश केला. डिअर पार्क  पूर्वी सारखाच होता; पण त्याच्या अलीकडच्या भागात दहा वर्षांपूर्वी बांबूची वीस पंचवीस रोपं ठरावीक अंतरावर लावली होती . आता त्या भागात मोठमोठी बांबूची बेटं तयार झाली होती. त्याच्या सावलीत सांबरं ,नीलगाई ,चौशिंगा निवांत बसले होते. पलीकडच्या भागात पंचवीस-तीस चितळांचा कळप कान टवकारून माझ्याकडे बघत होता. मी त्यात कोणी ओळखीचं चितळ दिसतं का बघायचा प्रयत्न केला;  परंतु ही बहुतेक  त्या जुन्या चितळांची दुसरी किंवा तिसरी पिढी होती . तेवढ्यात माझं लक्ष एका सांबर नराकडे  गेलं . त्याच्या मानेवर एक जखम होती . शिंगांच्यामध्ये आणखी एक जखम होती. मी बेटाडीनचा स्प्रे प्राणिरक्षकांना आणायला सांगितला. पण स्प्रे मारण्यासाठी जवळ गेलं की तो दूर पळून जायचा. मग त्याला  उपचारासाठी एखाद्या बंदिस्त खोलीत घेण्याबाबतच्या सूचना देऊन मी तिथून बाहेर पडले . तिथून वाघांच्या पिंजऱ्यावर निघाले. 

पर्यटकांची गजबज असलेल्या भागातून शांत जंगलात मी प्रवेश केला. हिरव्या झाडांच्या महिरपीतून गेलेला काळभोर डांबरी रस्ता. मध्येच  ऐकायला येणारी पानांची  सळसळ सोडली तर तीच झाडी तीच शांतता अनुभवायला येत होती. व्याघ्रविहारात पाच सहा वाघ होते; पण त्यांत  दहा वर्षांपूर्वीचे वाघ नव्हते . बहुतेक सगळे वाघ नवीन दिसत होते . एकच ‘लक्ष्मी’ नावाची वाघीण तेवढी माझ्या ओळखीची होती . पलाश आणि बसंती या जोडीचे बारा वर्षांपूर्वी ब्रीडींग केले होते . त्यावेळी बसंतीला यश आणि लक्ष्मी ही दोन पिल्लं झाली होती. त्यातीलच ही लक्ष्मी . 

एखाद्या छोट्याशा मुलीला खूप वर्षांनी प्रौढ झालेले पाहिल्यावर, “ अरे ! किती मोठी  झाली ही !”  असं वाटतं आणि सरलेल्या वर्षांची जाणीव टोचून जाते; तसंच काहीसं मला लक्ष्मीला पाहिल्यावर वाटलं .  आता मला बिबट्यांच्या निवारा पिंजऱ्याकडे जायचे होते . बिबट्यांचा निवारा पिंजरा हा उद्यानातील नवापाडा भागाच्या जवळ आहे . जंगलात बरंच आतपर्यंत चालत गेल्यावर सुमारे २ एकर भूभागावर केलेले आयताकृती आकाराचे कुंपण लागले . आत इंग्रजी सी  आकाराचे बांधकाम  केले होते. त्यात बिबट्यांचे जवळजवळ तीस  पिंजरे होते .प्रत्येक पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला बिबट्यांना खेळण्यासाठी, व्यायामासाठी मोकळी जागा ठेवली होती. त्या जागेला कुंपण  केले होते .

 प्राणिरक्षक मोरे मला एकेका बिबट्याची ओळख करून देत होते. तेवढ्यात ते म्हणाले, “मॅडम, हा आपण मोठा केलेला अर्जुन.” मी आश्चर्याने बघत राहिले. बारा तेरा  वर्षांपूर्वी  डोळेही न उघडलेली बिबट्यांची पिल्लं इस्पितळात आली होती . त्यांची नावं आम्ही भीम आणि अर्जुन ठेवली होती. दुरून माझ्या गाडीचा हॉर्न जरी ऐकायला आला तरी दोघंजण खिडकीच्या गजांना पुढचे दोन पाय पकडून कुई कुई- आवाज काढत उभे राहायचे . मोरे म्हणाले, “भीम काही वर्षांपूर्वी मृत्यू पावला.” आता माझ्यासमोर वृद्धत्वाकडे झुकलेला अर्जुन उभा होता. मोरेंनी  त्याला हाक मारल्यावर जाळीजवळ धावत आला . मोरेंशी खेळू लागला. आम्ही पिंजऱ्याजवळून पुढे जाऊ लागलो . तर अर्जुन कडेला येऊन माझ्याकडे बघत घशातून वेगळीच घुरघुर काढू लागला. मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. माझ्या लक्षात आलं , ‘हा तर जणू मला हाक मारत होता! काय ओळखलंस ना?  विचारत होता. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी त्याच्या पिंजऱ्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी काही काही बोलत थोडावेळ उभी राहिले.  दहा वर्षांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटवरच्या पहारेकऱ्याने मला ओळखले त्याहीपेक्षा मी वाढवलेला एक वन्य प्राणी एवढ्या वर्षांनंतरही माझी ओळख विसरला नव्हता, हा आनंद अवर्णनीय होता. 

२२.०६.२०२३ 

पावसाने संततधार धरली होती . उद्यानाचं अख्खं जंगल पहिल्या पावसात नाहून निघालं होतं. ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली होती. छोटे मोठे ओहोळ सर्वत्र वाहत होते. भिजलेला  भारद्वाज आपले तपकिरी पंख फैलावून रेन ट्रीच्या विशालकाय हिरव्या फांद्यांवर विसावत होता. निळ्या रंगाचा  खंड्या काळपट ढगांच्या पार्श्वभूमीवर चंदेरी पाण्यातले मासे पकडण्यासाठी झेप घेत होता  . तपकिरी रंगाचे खेकडे काळ्याभोर डांबरी रस्त्यावरून लगबगीने एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे तुरुतुरु जात होते. रस्त्याच्या कडेला पांढरी शुभ्र अळंबी उगवली होती. देठ जेमतेम पाच सेंटीमीटर लांबीचा. देठाच्या टोकाला दहा सेंटीमीटर व्यासाची  पांढरीशुभ्र गोल छत्री . झाडांच्या सावलीत ही अळंबी समूहाने उगवली होती . वनस्पती जीवनात काही वनस्पती एकेकट्या दिसतात तर काही समूहानेच दिसतात . पावसाळ्यात या अळंबीच्या  कितीतरी जाती नॅशनल पार्कमध्ये दिसतात . एके ठिकाणी एका आडव्या पडलेल्या मेलेल्या झाडाच्या  ओंडक्यावर  अगदी एक किंवा दोन सेंटीमीटर  लांबीची ऑरेंज जेली नावाची अळंबी समूहाने उगवलेली दिसत होती . काळ्या निस्तेज रंगाच्या ओंडक्यावर तो केशरी रंग अगदी झळाळून उठला होता . जंगलात काही म्हणता काही फुकट जात नाही . मेलेल्या झाडाचा उपयोग या अशा अळंबी  किंवा कित्येक कीटकांसाठी जंगलात होतो . पाण्याच्या ओहळाच्या कडेने पातीसारखी पोपटी पानं असलेली फूटभर उंचीची लिलीची  जंगली प्रजाती  उगवलेली होती . जमिनीतून उगवलेल्या दहा-पंधरा हिरव्या पाती , त्यांचा कडेला जमिनीतूनच उगवलेला एकच लांबसडक देठ आणि त्या देठाला पांढऱ्याशुभ्र कळ्या एखाद्या नर्तकीच्या फैलावलेल्या बोटांप्रमाणे दिसत होत्या. त्यातील एक झुडूप अगदी ओहळाच्या कडेला होतं .  त्याचं पांढरंशुभ्र  फूल पाण्यावर झुकून जणू  आपलं प्रतिबिंब न्याहाळत होतं . ओहळाच्या कडेला एक गायबगळा निश्चलपणे उभा होता . त्याच्या मानेवर त्याच्या मिलनकाळाची निदर्शक असलेली पिवळ्या रंगाची पिसं उगवलेली होती . मीही त्याच्या बाजूला एका खडकावर निश्चल बसून राहिले . आजूबाजूला नीरव शान्तता होती .   

नॅशनल पार्कमधील निसर्गाची आणि प्राण्यांची विविध रूपं दहा वर्षांनंतर पुन्हा नोंदवताना मला संगीता जोशींची एक गझल आठवली 

  तू भेटशी नव्याने ,

 बाकी जुनेच आहे .

 या मैफिलीत गाणे ,

 तुझियामुळेच आहे.

Author

4 thoughts on “पुनर्भेट नॅशनल पार्कची.. 

  1. आपल्या पुस्तकांचा मी वाचक आहे. आपला हा “पुनर्भेट नॅशनल पार्कची” हा लेखही आवडला.
    माणसाने आपल्याला ओळखण्यापेक्षा प्राण्याने आपल्याला ओळखण्यातील आनंद प्रगाढ असतो. आणि हा आनंद जे प्राण्यांना जीव लावतात त्यांनाच कळतो.

  2. खूपच सुंदर वर्णन. प्रत्येक महिन्यातले असे वर्णन वाचायला खूप आवडेल.

  3. सुंदर लेख लोभस. रानफुलां इतकाच गोड
    डॉक्टर आनंद जोशी.

Leave a Reply