विकास का पर्यावरण ही चर्चा आपण तावातवाने व सतत करतो. पांढरपेशे देश व माणसे प्रायः पर्यावरणाच्या बाजूने बोलतात; तर विकसनशील देश व गरीब माणसे विकासाच्या बाजूने! खरेतर गरिबांना आपली पोटाची आग विझवण्यात असल्या चर्चांमध्ये भाग घेण्याची कुवतच नसते. आदिवासी संस्कृती तशीच राहावी असे बहुतांशी पांढरपेशा विद्वानांनाच वाटत असते. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी सिंचन, वीजनिर्मिती यांसारख्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्यासाठी मग धरणे, विद्युत निर्मिती प्रकल्प यांना खरे तर पर्याय नाही. अशा प्रकारचे प्रकल्प समोर आले की त्यांना जोरदार विरोध होतो. या विरोधाची वेगवेगळी कारणे असतात. संकुचित स्वार्थी राजकारण हे त्यांतले एक महत्त्वाचे कारण आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन. हे विस्थापन अपरिहार्य असते. वर्षानुवर्षे एखाद्या ठिकाणी राहणारे गावच्या गाव जेव्हा उठते त्यावेळेला त्या गावकऱ्यांच्या वेदना आपण समजून घ्यायला पाहिजेत. व्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने झालेले पुनर्वसन हा खरंतर या विस्थापितांच्या वेदना सुसह्य करण्याचा एक राजमार्ग. फक्त पुनर्वसनाचा विचार करायचा झाला तर नर्मदा प्रकल्पाच्या बाबतीत जे पुनर्वसनाचे धोरण अवलंबले गेले ते कागदोपत्री अतिशय चांगले होते.
पुनर्वसन चांगले झाले तर काय होऊ शकते त्याचे एक प्रारूप नुकतेच पाहायला मिळाले. पंढरपूरपासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर ‘पिराची कुरोली’ नावाची एक ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत चिंचणी हे गाव येते. १९७५च्या सुमारास सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील कणेर धरण अस्तित्वात आले. या धरणामुळे प्रभावक्षेत्रातील ३५ ते ४० गावे विस्थापित झाली. ही सर्व छोटी छोटी गावे होती. त्यांचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुनर्वसन झाले. या विस्थापित गावांमध्ये चिंचणी या नावाचे एक गाव होते. त्याचे पुनर्वसन पिराची कुरोली जवळ झाले. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य घनदाट हिरवीगार झाडी असलेल्या भागातून हे गावकरी सोलापूर जिल्ह्यात आले. या जिल्ह्याचे वातावरण काहीसे कोरडे व रुक्ष. हे गावकरी शरीराने नवीन ठिकाणी आले तरी मनाने महाबळेश्वरमध्येच होते. आपल्या नवीन वस्तीच्या ठिकाणीसुद्धा महाबळेश्वरसारखी झाडे लावायची अशी जिद्द या गावकऱ्यांनी मनात बाळगली. आज या गावात महाबळेश्वर इतकी घनदाट झाडी नसली; तरी नेत्रसुखद हिरवाई या गावात नक्कीच आहे. गावात ७० ते ७५ कुटुंबे निवास करून आहेत. आजची लोकवस्ती सुमारे साडेतीनशे आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा म्हणून शासन दरबारी प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांना यश येऊन आमची ग्रामपंचायत लवकर होईल असा आत्मविश्वास या गावातील एक कारभारी मोहनराव अनपट यांनी बोलून दाखवला. सामूहिक नेतृत्व हे आमच्या गावाचे वैशिष्ट्य आहे. सर्व निर्णय हे ग्रामसभा एकत्र येऊन घेते. स्थानिक राजकारणात आम्ही फारसा भाग घेत नाही. आसपासच्या मतदारसंघांतील सर्व लोकप्रतिनिधी आमच्या गावाला वेळोवेळी मदत करतात. गावातील सर्व पथदिवे व पाणीपुरवठा योजना ही सौर ऊर्जेवर चालते. गावात जिल्हा परिषदेची छोटी शाळा आहे. अतिशय देखणी अशी ही शाळा आहे. गावातले सर्व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत व अतिशय स्वच्छ आहेत. प्रत्येक घराला शौचालय आहे व गावात सार्वजनिक स्वच्छतागृह देखील आहे. हे सार्वजनिक स्वच्छतागृहदेखील अतिशय स्वच्छ व चकाचक असते. सर्व विस्थापितांना शासकीय नियमाप्रमाणे शेत जमीन मिळालेली आहे. या जमिनीचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून आहे. धरण भरले असले की पाटाद्वारे शेतीला पाणी मिळते. ऊस व वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. जवळपास बरेच साखर कारखाने आहेत; त्यामुळे या कारखान्यात ऊस पाठवून त्यातून चांगले उत्पन्न मिळते.
गावातील महिलांनी एकत्र येऊन एका सहकारी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारा चिंचणीमध्ये एक कृषी पर्यटन केंद्र चालवले जाते. हुरड्याच्या हंगामामध्ये येथे हुरडा व जेवण दिले जाते. इतर वेळी खास ग्रामीण ढंगाचे ताजे गरम जेवण येथे मिळते. काही शासकीय किंवा अर्ध शासकीय कार्यशाळा या कृषी केंद्रात चालवल्या जातात. केंद्रात काम करणारे सर्व कर्मचारी स्थानिक आहेत. पगार व इतर खर्च वजा जाता जी जास्तीची रक्कम येते ती या पर्यटन केंद्राच्या सुधारणांमध्ये वापरली जाते. यावर्षी श्रावणात खास महिलांसाठी ‘नागपंचमीचे खेळ’ या कृषी केंद्रामार्फत करण्याचे नियोजन होते आहे. गेल्या दिवाळीत गावाने निर्णय घेऊन गावात दिवाळीच्या काळात एकही फटाका वाजवला नाही. गांधीजींच्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेच्या जवळ जाणारी अशी ही संकल्पना आहे. गावातल्या नवीन पिढीला शहराकडे जाण्याची ओढ नाहीच असे नाही. त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी वेळप्रसंगी शहरात गेले पाहिजे परंतु त्यांची गावाला जोडली गेलेली नाळ देखील तशीच राहिली पाहिजे असे प्रयत्न हा गाव करतो आहे. ग्रामपंचायत आल्यानंतर गावात राजकारणाचा प्रवेश होईल का? कदाचित होईल; परंतु तरीही सामूहिक नेतृत्वाचे लक्ष या ग्रामपंचायतीच्या कामावर असेल; त्यामुळे परिस्थिती फारशी बिघडेल असे आत्ता तरी वाटत नाही असे श्री. अनपट यांनी आवर्जून सांगितले.
छायाचित्रात मध्यभागी मोहन अनपट, उजवीकडे अंतर्नाद संपादक भानू काळे , डावीकडे अनिल जोशी.

चिंचणी च्या गावकर्यांना सलाम! इच्छा असेल तर समस्त गावकरी काय करू शकतात त्याचे हे उत्तम उदाहरण!
गावातील सामुहिक नेतृत्वासाठी कारभारी मोहन अनपट यांचे अभिनंदन. अंतर्नाद चे संपादक भानु काळे यांचे ” पर्यावरण कि विकास ?” यावरील विचार अत्यंत मौलिक.
अनिल, तु चिंचणीला पोहोचलास याबद्दल तुझेही अभिनंदन. सर्व फोटो व तु श्री भानु काळे यांची घेतलेली छोटेखानी मुलाखत सुरेख !
एकूणच अनिल जोशी यांचे संपादकिय उत्तम !! आवडले!❤