‘बलात्कार’ हा शब्दच इतका भयावह आहे की उच्चारतानासुद्धा माणसाला त्रास होतो आणि असा प्रसंग जिच्या वाट्याला येतो तिचे तर आयुष्य उद्ध्वस्त होतेच; त्याचबरोबर ते कुटुंबही उद्ध्वस्त होते; पण अशाही काही वीरांगना असतात,ज्या अशा प्रसंगाचा अत्यंत झुंजारपणे सामना करतात, त्याला सामोऱ्या जाऊन आपल्या समाजासाठी काही काम करण्यासाठी उभ्या राहतात. अशांतीलच एक वीरांगना ‘मुख्तार माई,’ जी अत्यंत गरिबी,सामूहिक बलात्कार आणि न्यायव्यवस्थेकडून मिळालेली अमानुष वागणूक, अशा भयंकर अनुभवांना झुंजारपणे सामोरी गेली आणि स्फूर्तिस्थान ठरली.
‘मुख्तार’ मिरवाला गावातील(पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या दक्षिण बाजूला मुजफ्फरगड जिल्ह्यात सिंधू नदीच्या विस्तीर्ण पठारावर लपलेले चिमुकले गाव) शेतकरी गुजर समाजातील एक गरीब बाई, जिरगाच्या (जात पंचायत) निवाड्याची शिकार होते. गावात गुजर आणि मस्तोई अशा दोन जमाती/समाज. त्यात मस्तोई अत्यंत प्रबळ, आक्रमक,क्रूर वृत्ती असलेली जमात. त्यांचा शब्द म्हणजे दगडावरची रेघ! त्यांनी आरोप केला म्हणजे तो खराच असणार आणि तो गुजरांनी मान्य केलाच पाहिजे असा नियम. हिंसक आणि क्रूर वृत्तीचे मस्तोई गुजर समाजातील कोणाच्याही घरात जबरदस्तीने शिरायचे, लुटालूट करायचे, अत्याचार करायचे.
मस्तोईंचा आरोप काय तर, मुख्तारचा धाकटा भाऊ शकुर हा मस्तोई जमातीच्या सलमा नावाच्या तरुणीशी ‘बोलला.’ शकुर असे काही करणार नाही याची खातरी; परंतु मस्तोईंचा आरोप हा कायम खरा मानला जायचा. मस्तोईंनी शकुरला पळवून नेले, त्याला बेदम मारहाण केली, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि मग त्याला पोलीस चौकीत डांबून ठेवले. यासाठी पंचायत बसली. मस्तोईंचे ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व होते. गुजर समाजातील मुल्लानी तसेच दोन्ही जमातींमधील मध्यस्थांनी हरप्रकारे मस्तोईंना शांत करायचा प्रयत्न केला; पण सगळे व्यर्थ ठरले. मुख्तारचे वडील शेवटी मदतीसाठी पोलिसांकडे गेले. चौकशीसाठी पोलिसांना मस्तोईंकडे जावेच लागले. एका सामान्य गुजर शेतकऱ्यामुळे पोलीस दाराशी आले; त्यामुळे मस्तोईंचा अपमान झाला आणि त्यांनी शकुरवर सलमावर बलात्कार केल्याचा आरोप केला. ‘झिना – बिल – जबर’ म्हणजे बलात्काराचा गुन्हा, व्यभिचार व विवाहबाह्य संबंध.
शेवटी एक प्रयत्न म्हणून गुजर समाजातील एका स्त्रीने त्यांची समजूत काढायची असे ठरले आणि मुख्तारची निवड केली. एकतर शकुर मुख्तारचा भाऊ, तिला नवऱ्याने तलाक दिलेला आणि मूलबाळ नसलेली, वयाने मोठी आणि ती कुराण शिकवत होती म्हणून सज्जन. मुख्तारला खरेतर लिहिता वाचता येत नव्हते; पण ऐकून ऐकून तिचे कुराण पाठ झाले होते. ‘जिरगा’ (जात पंचायत)मध्ये मुख्तारला बोलवण्यात आले आणि सांगण्यात आले की ‘शकुरच्या सुटकेसाठी तिने मस्तोईंची समजूत काढावी.’
मुख्तारचे वडील, चाचा हाजी अल्ताफ आणि स्नेही गुलामनबी तिला घेऊन मस्तोईंच्या महालाकडे निघाले. मुख्तार हातात कुराण घेऊन अत्यंत विश्वासाने याच विचारात निघाली की माफी मागितली की शकुरची सुटका होईल; पण तिथे गेल्यावर जी घटना घडली त्याने मुख्तारच्या आयुष्याची उलथापालथ झाली.
मुख्तारने आपली शाल अब्दुल खलिक, गुलाम फरीद, आल्ला दिना,महम्मद फैज या मस्तोईंसमोर पसरली; पण त्यांना त्याचे काहीच नव्हते. त्यांच्या तुच्छ नजरा मुख्तारला भेडसावत होत्या. हे चारही जण शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी आसुसले होते. काही समजायच्या आत अब्दुल खलिकने मुख्तारचा हात पकडला आणि उरलेल्या तिघांनी तिला फरपटत एका खोलीत नेले. आतमध्ये आता ते चौघे आणि मुख्तार… आता इथून सुटणे अशक्य होते. जीवाच्या आकांताने ती ओरडत होती; पण त्यांच्यावर परिणाम शून्य! नंतर कधी तरी तिला दाराबाहेर फेकून दिले. अर्धवस्त्रावस्था,बाहेर कुचेष्टा करणारा गाव जमला होता आणि मुख्तार शरमेने विदीर्ण झाली होती. वडिलांनी उरली सुरली अब्रू झाकण्यासाठी शाल तिच्या अंगावर घातली.
अशा अवस्थेत मुख्तार घरी आली आणि निर्जीवपणे पडून राहिली. इतकं घृणास्पद,भयंकर काही घडू शकतं हे शरीर आणि मन मानायला तयार नव्हतं. या प्रसंगानंतर मुख्तारने आत्महत्या करणे अपेक्षित होते आणि ती तसे करणारही होती. परंपरागत कायद्यानुसार पाकिस्तानमध्ये पीडित स्त्रीला गुन्हा सिद्ध करण्यासाठी चार पुरुषच साक्षीदार कोर्टामध्ये हजर करावे लागतात. चार पुरुष साक्षीदार मिळविणे सोपे नसल्यामुळे पीडित स्त्रीला न्याय मिळणे कठीण आणि यासाठी तिने आत्महत्या न करता अन्यायाविरुद्ध लढायचे ठरविले.
शुक्रवारच्या नमाजच्या वेळी मुल्लांनी झाल्या प्रकाराचा तीव्र निषेध केला. जमलेल्या लोकांमध्ये एक स्थानिक पत्रकार होता. त्याने ही बातमी वर्तमानपत्रात छापली आणि सगळ्यांचे लक्ष या घटनेकडे गेले. त्यामुळे जतोई पोलीस चौकीवर मुख्तारला नेण्यात आले. तिथे पत्रकार आधीच हजर होते. त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर तिने आपली कैफीयत सर्वांसमोर मांडली; पण तिथेही पोलिसांनी दबाव टाकला आणि तिचा कोऱ्या कागदावर अंगठा उठविण्यात आला आणि सांगण्यात आले की कोर्टात न्यायाधीशांसमोर जास्त बोलायचे नाही. सर्व प्रकारे मस्तोईंना वाचविण्याचा प्रयत्न चालू होते; परंतु मुख्तार घाबरली नाही. जे काही तिच्या बाबतीत घडले ते तिने आरोपींच्या नावासकट सांगितले.
पेपरला बातमी आल्यामुळे आणि कोर्टात जबानी दिल्यामुळे इस्लामाबादमध्ये सरकारला या घटनेची दखल घ्यावी लागली. परवेझ मुशर्रफ राष्ट्राध्यक्ष होते. सरकारने नुकसान भरपाई म्हणून पाच लाखांचा चेक दिला. मुख्तारने या पैशांमधून गावातच शाळा सुरू केली; कारण ती आणि तिच्यासारख्या अनेक निरक्षर स्त्रियांना साक्षर होणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना स्वतःचे हक्क,अधिकार यांची माहिती होऊन परंपरागत जुलमी सरंजामशाहीविरुद्ध लढण्यासाठी याचा उपयोग होईल असा तिचा विश्वास होता.
Amnesty international, BBC, आणि इतर अनेक मानवी हक्क संघटनांनी मुख्तारच्या लढ्याला साथ दिली; त्यामुळे पाकिस्तान सरकारने हा खटला आपल्या अखत्यारीत घेतला आणि अनेक आरोपींना पकडण्यात आले. पाकिस्तानमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात न्याय मिळविण्याचे मुख्तार प्रतिनिधित्व करत होती; त्यामुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. Amnesty international तर्फे तिला कॅनडा,अमेरिकेच्या भेटीसाठी आमंत्रण होते. तसेच तिचे युनोमध्येही भाषण होणार होते. त्या संदर्भात कागदपत्रांची तयारी करण्यासाठी इस्लामाबादला गेली असताना तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. ‘एक्झीट कंट्रोल लिस्ट’मध्ये तिचे नाव घालण्यात आले आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास नाकारला. तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला,वकिलांना भेटायला बंदी करण्यात आली. तिला इस्लामाबादमध्ये अज्ञात स्थळी बंदिवासात ठेवण्यात आले. पाकिस्तान सरकारने मुख्तारवर सतत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला : तिचा पत्रव्यवहार जप्त करायचा, फोन टॅप करायचे, तिच्याविषयी सरकारी वर्तमानपत्रातून वाईट उद्गार काढायचे,
‘स्त्रियांनी बलात्कार करून घ्यायचा म्हणजे परदेश दौरा आणि पैसा मिळतो!’
… पण तिच्यावर या कोणत्याच दडपणाचा परिणाम झाला नाही; कारण देशात,परदेशात जो पाठिंबा मिळत होता त्यामुळे सरकारचे काही चालले नाही. अखेर सरकारला तिच्या परदेश प्रवासावरील बंदी उठवावी लागली.
संपूर्ण परदेश दौऱ्यामध्ये आमना बत्तार तिची दुभाषी म्हणून काम करते.आमना पाकिस्तानी अमेरिकन डॉक्टर असून एक मानवी हक्क संघटना चालविते. ‘ग्लॅमर’सारख्या अमेरिकन मासिकात मुख्तारवर लेख लिहिला आणि तिचा फोटो छापला गेला.(ग्लॅमरसारख्या फॅशनला वाहिलेल्या मासिकात तिचे संपूर्ण अंग झाकणाऱ्या कपड्यातील फोटो हा विरोधाभास.) अनेक ठिकाणांहून शाळेसाठी देणग्या आल्या; त्यांचा मुख्तारने अत्यंत उत्तम विनियोग केला. एका शिक्षिकेपासून सुरू झालेल्या शाळेत आता पाच शिक्षक आहेत. लायब्ररीची सोय असून शाळेची पक्की इमारत बांधली गेली आहे. नसीम अख्तर, जी मुख्तारच्या सुखदुःखाचा आधार आहे, पेशाने वकील आहे, ती शाळेची मुख्याध्यापिका आहे. नसीम स्वतः मुख्तारला शिकविते. ज्या मुलींसाठी शाळा काढली त्यात मुख्तार स्वतः विद्यार्थिनी आहे. आज तिच्या शाळेत एकशे साठ मुले आणि दोनशेच्या वर मुली आहेत; फक्त मुलींना शाळेत पाठविण्यासाठी पालकांशी संपर्क साधावा लागतो.
मुख्तारच्या लढ्यामुळे स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रतिष्ठेखातर होणाऱ्या गुन्ह्यासाठीच्या कायद्यामध्ये सुधारणा व्हाव्यात या मागणीसाठी आंदोलन झाले आणि २००६ मध्ये पाकिस्तान लोकसभेमध्ये बलात्कारविषयक कायद्यात बदल होऊन हे बलात्काराचे खटले धार्मिक कायद्यांतर्गत नव्हे; तर पीनल कोड अंतर्गत चालविले जाण्याचा निर्णय झाला. २२ जून २००२ पासून मुख्तारचा लढा सुरू झाला आणि तो अजून चालूच आहे; कारण परिवर्तनाची गती खूप कमी आहे; पण मुख्तार आशावादी आहे. या लढ्यामुळे मुख्तारला २००५ मध्ये पाकिस्तान सरकारकडून ‘फातिमा जिना’ पुरस्कार मिळाला; तसेच २००५ मध्ये अमेरिकन ग्लॅमरतर्फे ‘वूमन ऑफ द इयर’ आणि २००७ मध्ये मानवी हक्कांसाठी योगदान दिल्याबद्दल ‘नॉर्थ साऊथ प्राईझ ऑफ द कौन्सिल ऑफ युरोप,’ हे पुरस्कार मिळाले.
मुख्तारचे आत्मकथन मूळ फ्रेंच भाषेत लिहिले गेले. ‘मारी तेरेसक्युनी’ या लेखिकेने तिची कहाणी लिहून घेतली. मुख्तारला लिहिता वाचता येत नाही आणि ‘सराईकी’ ही एकच भाषा ती बोलू शकते; त्यामुळे दुभाषा म्हणून मुस्तफा बलोच आणि सैफ खान यांनी काम केले. ‘लिंडा कव्हरडेल’ने मूळ फ्रेंच आवृत्तीमधील मुख्तारच्या आत्मकथनाचा अनुवाद केला. २००६ मध्ये ‘इन द नेम ऑफ ऑनर,’ हे मुख्तारचे आत्मचरित्र अमेरिकेत प्रसिद्ध झाले आणि त्याचा मराठी अनुवाद ‘उल्का राऊत’ यांनी केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार ‘निकोलस डी क्रिस्टीव्ह’ यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
पुस्तक वाचताना आपण कुठल्या शतकात राहतो याचा विचार करावा लागतो.पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून पीडित दुःखी स्त्रिया भेटायला येतात. प्रत्येकीची वेगळी कर्मकहाणी. नाक कापून बाईला जन्माची अद्दल घडवायची शिक्षाही पाकिस्तानमध्ये दिली जाते. बलुचीस्तानमधील डॉक्टर शाजिया खालिदची कहाणी भीषण आहे; तरीसुद्धा या बाई स्त्रियांच्या अत्याचार विरोधाचे नेतृत्व करतात.
हा विषय फक्त पाकिस्तान पुरेसा मर्यादित नाही. जगभरात स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. अनेक संस्था या संदर्भात काम करत आहेत. स्त्रियांना संरक्षण मिळावे,पीडित स्त्रियांना लवकर न्याय मिळावा यासाठी कायद्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा थोडाफार परिणाम दिसतो; नाही असे नाही; पण एकंदरीत बलात्कार, डोमेस्टिक व्हॉयलन्सच्या घटना घडतात त्यावेळी पीडित स्त्री आणि तिचे कुटुंबीय अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पुढे येतातच असे नाही. कदाचित जी न्यायप्रक्रिया बघितली जाते त्याची सामान्य माणसाला भीती वाटते किंवा त्यांची तितकी सहनशक्ती नसते; तसेच आर्थिक क्षमता हा भागसुद्धा महत्त्वाचा असतो. आजही, ‘लोक काय म्हणतील,’ ‘समाजात काय स्थान मिळेल,’ याचा विचार जास्त होतो; पण एखादी स्त्री अन्यायाविरुद्ध न घाबरता दाद मागते तेव्हा चळवळींना, संघटनांना संघर्ष करण्याचे बळ येते.
