श्रीरामकथा वाचकांच्या मनी बिंबावी यासाठी मोरोपंत वेगवेगळे प्रयोग करतात हे आपण पाहिलंच आहे. या प्रयोगांचा कधीकधी अतिरेक होतो आणि कथेतील रामाऐवजी शब्दांनाच महत्त्व दिले जाते.
‘श्रीरामचंद्रांची प्रार्थना’ या शीर्षकाखाली येणाऱ्या काव्यात प्रार्थनेच्या भावाऐवजी असा शब्दखेळ अधिक आहे.
त्वदश्रयें खोटी परमाया सदा विती
जीव भ्रमविती रामा! पर माया सदा विती (३०३/३)
कां सुदासी नको? वळें
कां उदासीन कोवळें? (४)
दीनां गांजी मोहपाश; हा पाउल गडी लया
नेवू; रामा! अन्य कोण बापा! उलगडील या
या भाजिती- सभाजिती,
पातकाकुळ ती सती
हात काकुळतीस ती (३०४/१०)
अशा शब्दखेळांमुळे अलंकारांचं अजीर्ण होतं.
या प्रसादें काय झाली शबरी न बरी यशें
यात प्रसादाच्या पावित्र्याऐवजी ‘शबरी न बरी’ या अनुप्रासात मोरोपंत रंगून गेले आहेत असे वाटते.
शब्दचि अमुच्या जीवीचें जीवन
शब्दें वाटू धन जनलोका ॥
ही तुकारामांची घडण मोरोपंतांच्या – खरंतर पंतकवींच्या काव्यापेक्षा वेगळी होती. मोरोपंतांच्या काव्यात भाषेचे, अर्थाचे प्रचंड मोहळ उठलेले दिसते. त्यांचे कथन अक्षरसौंदर्यात चिंब होऊन आलेले असते. ही त्यांची मूलभूत घडण होती; शिवाय या एकच कथा किती प्रकारे रंगवून सांगता येईल ही स्वतःच स्वतःची घेतलेली परीक्षा असावी.
पान ३०६, परंतु रामायण गीतिवृत्त
या परीक्षेत मोरोपंतांनी विलक्षण कल्पना लढवून, कुठेही एकसुरीपणा येऊ न देता रामायणातल्या त्याच गोष्टी विविध कोनांतून, विविध पात्रांच्या मनोगतांतून रेखल्या. यांतील एक प्रयोग म्हणजे
‘परंतु रामायण.’ रामकथेतील विविध प्रसंग ‘परंतु’ या अव्ययाने जोडत विरोधाभासातून प्रसंग उभा केला आहे.
पहिल्या वाक्यातील कमीपणा, उणीव किंवा विरोध दर्शवणारी दोन वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. ‘मी असे केले असते; परंतु…’ अशा तऱ्हेची वाक्ययोजना करत घटनेमागचा कार्यकारणभाव उलगडला आहे.
या परंतु रामायणाच्या पंक्तींत ‘परंतु’ हा शब्द येतो. तो कसा, कोणत्या आशयासाठी योजला जातो ते वाचणं उत्सुकता वाढवणारं आहे.
त्याची सुरुवातच विलक्षण आहे.
श्रीरामचरित करितें मुक्त,
सकृत् किमपि सेवितां भावें
पार न लागे दशशतवदना
हि परंतु वाटतें गावें
दशशतवदन म्हणजे शेष. शेषालाही इतकी तोंडं असून रामायणाचं वर्णन करता येत नाही, तर मी काय वर्णन करणार? अशी नम्र भूमिका घेऊन मोरोपंत परंतु रामायणाची सुरुवात करतात.
परंतुमधून वेगवेगळे आशय स्पष्ट होत जातात आणि त्यातूनच रामाचे सघन व्यक्तिमत्त्व अधोरेखित केलं जातं.
बालपणीच्या आठवणी जागवताना ते म्हणतात
३०७/४
ते राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न कुमार सारसाक्ष जना
दिसती बाळ, परंतु स्वगुणांहीं हरिती गुरुमुनींद्रमना
स्त्रीचा वध करू नये, पण ताटकेला मारली…
स्त्रीवध निंद्य, परंतु ब्रह्मोक्तें तूर्ण ताटका मारी
(३०७/९)
स्वयंवराच्या वेळी पराक्रमाचे वर्णन करताना ते लिहितात : (३०८/१४)
अतिकठिन भर्गधनु, अतिसुकुमार प्रभु, परंतु गुण जोडी
ओढी सलील लीलानरतनु तें इक्षु जेंवि गज मोडी
(सुकुमार असूनही धनुष्याची दोरी ओढली.)
परंतुरामायणात शूर्पणखेचा प्रसंगही उत्सुकतावर्धक रंगवला आहे.३११/१४
रामाज्ञेनें लक्ष्मण तत्कर न परंतु कर्ण नासा हे
तदवयव घे, तयाच्या ती शूर्पणखा न वर्णना साहे
३१३/५ अशोकवनात सीतेला गळ घालणारा रावण आणि त्याला धिक्कारणारी सीता हा प्रसंग रंगवताना मोरोपंत लिहितात,
दशमुख विनवि परंतु श्री धिक्कारी तयासि तो पाहे;
वाहे रोमांच म्हणे, ‘श्रीरामा योग्य हे सती आहे.‘
३१४/१२)
मोरोपंतांच्या आवडत्या ‘आ’ चे उपयोजन करत, मारुतीला रावणसभेत कसा आणला त्याचे वर्णन करताना म्हणतात,
बांधुनि सभेंत नेला वोढूनि परंतु करुनि ‘आ’ सोसी,
दशकंठमुखें ‘हा! हें वदावयाची च धरुनि ‘आसोसी’ (आसोसी – इच्छा)
रावणवधानंतर (३२३/४३) आनंदाने सर्वांचे सत्कार झाले. या प्रसंगी येणारा ‘परंतु’ वेदनादायी ठरतो.
प्रिय सर्व परंतु अधिक मारुती सत्कारिला दयाधामें
… पण दुसरीकडे सीतेचा मात्र त्याग केला
३२३/४४
निंदेस्तव गर्भवती दयिता शुद्धा परंतु मोह दया
त्यजुनि त्याजिली, त्यागा कारण केला तदीय दोहद हा
डोहाळेजेवणाचे निमित्त करून तिचा त्याग केला.
३२४/५५/
निंदिति लोक परंतु स्वच्छा जरि मीं असेन घे पोटीं
असं म्हणताच
उलली भू, भूदेवी आली तत्काळ भूसुता हर्षे
जाय जसी माहेरा, प्रभु धीर परंतु अश्रुनें वर्षे
या पंक्तींतील परंतु दुःखद आहे.
‘रामायण अभंग’ हे साधेसुधे, कोणत्याही शाब्दिक कसरती नसलेले काव्य. (३२८/)
याला सीतागीत असेही म्हणतात. सीता रामकथा कशी सांगेल? असा विचार करून लिहिलेले हे गोड अभंग.
या अभंगाचे वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या पंक्तीचा शेवट आणि तिसऱ्या पंक्तीतील दुसरा शब्द असे यमक असते.
यज्ञासाठी भूमी नांगरीतां धन्या
सांपडली कन्या सीताबाई
सीता म्हणे : ऐका वनवासकथा
परि मनीं व्यथा न धरावी (१)
स्त्रीमुखातील अभंग रचताना मोरोपंतांच्या एरवीच्या भारदस्त शैलीत पालट झाला आहे. स्त्रीच्या भावना, शब्दलालित्य, हळवेपणा यांचं सुमधुर वर्णन गुणगुणल्याशिवाय राहवत नाही.
वनवासाचं सुखवर्णन करताना
ती म्हणते, (११)
लक्ष्मण भावोजी /मागें पुढे स्वामी
मज आहें धामीं / ऐसें वाटे
अत्रीच्या आश्रमीं /नेलें मज वाटे (रस्त्याने)
माहेर चि वाटे /खरेखुरें
शूर्पणखेचा भाऊ रागाने आला या ओळीत ‘आला बाई’ या ओळीने ती एखाद्या पुरुषाने लिहिलेली पंक्ती आहे असं मुळीच वाटत नाही.
तीचा भावू खर/ होवूनीयां क्रुद्ध
करावया युद्ध / आला बाई
लक्ष्मणाला वाईट शब्द बोलल्याचा, अविश्वास दाखवल्याचा तिला होणारा पश्चात्ताप ओवीबद्ध केला आहे. (३३०/३७)
न वदावें तें/ चि बोलिल्यें मीं कोपें
चित्त शब्दरोपें/ विदारिलें
लक्ष्मणावर संतापून ती म्हणते, (३३०/४०)
माज्या दृष्टीपुढें नको राहो जा च
नरकींचा जाच मूर्त तूंचि
हे बोलल्याचा परिणाम म्हणून… डोळां आले पाणी भावोजींच्या!
हे अभंग मुळातून वाचावेत असे आहेत.
स्त्रीच उपयोजील अशा उपमा मोरोपंत सहज लिहून जातात…
३३३/११५
देवानीं वदनीं घातली आंगोळी
लंकेची रांगोळी पाहोनीयां
याच अभंगांमधून वीररसाचे वर्णन करणे, तेही एका पुरुषाने बाईच्या भूमिकेत शिरून करणे हा मानसिक वृत्तीपालट थक्क करतो. (३३४/१३७)
ते राक्षस लक्ष कोटी बळपूर्ण
वानरांनी चूर्ण नखीं केलें
रक्तनद्या तेथें शतशा वाहिल्या
देवानीं पाहिल्या डोळांभर
यात स्त्रीच्या भाषेशी, दृष्टीशी एकरूप होऊन मोरोपंत या ओव्या रचतात…
‘मारले प्रधान, रावणाचे पोर
त्यात बळी थोर इंद्रजित (१३९)
‘रावणाचे पोर’ हे बोलीभाषेतील संबोधन तत्कालीन स्त्रीच्या घरगुती भाषेची चुणूक दाखवते.
पुढचे वर्णन खऱ्या अर्थाने रसाचे आहे… रसासाठी बरक्या फणसाच्या रसाची उपमा दिली आहे; पण कशाला?
३३४/१४२
जसे बरे गरे बहु कपिभट
तेणें गटगट गिळियेले
बरक्या फणसाचे गरे तोंडात घोळवून गटागटा गिळतात तसे कपिभट म्हणजे मर्कट योद्धे राक्षसांनी गिळले. ते राक्षसांच्या नाकांतोंडांतून बाहेर सटकू लागले.
इंद्रासी असह्य इंद्रजित परी
मारला तो अरी भावोजीनीं
(३३४/१४६)
लक्ष्मणाचा उल्लेख यात भावोजी म्हणून केला आहे त्यामुळे हे निवेदन अगदी घरगुती गप्पा रंगाव्यात, ‘अगं तुला आणखी सांगू का?’ या चालीवर रंगत जाते.
आर्यागीतिमुक्तामालेत मोरोपंतांनी यमकांचा पाऊस पाडला आहे. ट ला ट री ला री असा नव्हे; तर मोठमोठ्या संधींतून त्यांनी मराठी भाषेची समृद्धी रेखली आहे.
३३६/१२
राज्य समान सजाय
प्रभु विपिना गणुनि तुष्ट मानसजाय
३३७/१७
पादभजनलाभरतें
ऐसा रघुनाथ तो विनवि ला भरतें
३३७/१९
करुनि बहु कृपा दर जें
तें धरिलें भुवनवंद्यतम पादरजें
काही ठिकाणी मात्र या सोसाचा अतिरेक होतो; कधी हा सोस अश्लीलतेकडेही झुकतो.
रामाच्या गळ्यात पडायला आलेल्या शूर्पणखेला तो लक्ष्मणाकडे पाठवतो. याचं वर्णन करताना मोरोपंत लिहितात, (३३७/२२)
कंठीं पडतां रंडा | हांसे प्रभु धर्मनीतिरत्नकरंडा
रंडा आणि धर्मनीतिरत्नकरंडा हे काहीसं
प्राचीला गच्चीचं यमक जुळवल्यासारखं वाटतं.
शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाते तेव्हा तिचं वर्तन आत्ताच्या काळातही अश्लील वाटेल असे आहे. तिच्याविषयीचा तिरस्कार अधिक ठसावा या दृष्टिकोणातून या प्रसंगाला असा वळसा दिला असावा. (३३७/२३)
दावी स्तन वदन, कटी;
तेव्हां करी तीस तो प्रियंवद नकटी
पुढे मारुतीच्या शेपटीला आग लावण्याच्या प्रसंगाचं वर्णन रंगवताना ते गुळाला लागलेल्या मुंग्यांची उपमा देतात. (३४२/८१)
मारुतिलांगूळाला लावुनियां अग्नि वेष्टिती गूळाला
जेंवि पिपीलिक, सारे
पलाश (राक्षस) म्हणती,
‘पुढें उपाय कसा रे? |
या भागात ही अशीच शाब्दिक कसरत चालू राहतो. पुढे वर्णन करताना ते लिहितात, (३४३/८५)
भेटे सीताकमना, ज्याच्या कीर्ती पुढे सुधा ताक मना
सीताकमना म्हणजे सीतापती. त्याच्या कीर्तीपुढे अमृतही ताकासारखं वाटेल! या उपमा मनाचा ठाव घेत नाहीत. या रामायणात शब्दखेळच रंगतो. त्या खेळाच्या कलाकुसरीची आणि शब्दयोजनांची मौज वाटते पण ती मनात फारशी ठसत नाही.
हृदयाकाशीं राघवकरुणमेघाशि पाहतां स्वसुखानें,
आर्यागीत्यष्टोत्तरशतकेका प्रकटल्या मयूरमुखानें
असा समारोप करत मोरोपंत ‘मत्तमयूर’ वृत्ताकडे वळतात.
मत्तमयूर रामायण (३४५)
श्रीचा भर्ता दिग्रथभूपात्मज झाला,
कौसल्येच्या तो उदराला प्रभु आला
त्याला ज्ञात तात जगत्तारक नाम
स्थापली प्रेमें राम असे सत्सुखधाम
मतयसग हे गण असलेल्या मत्तमयुरी वृत्तातून
हनुमंताच्या शेपटीला आग लावल्याची कथा या रामायणात नाट्यदर्शन घडवते. ३४७/१९
कोपें बोले रावण तो या अतितुच्छा
दंडा, याच्या दीप्त करा सत्वर पुच्छा
शेपूट पेटवल्यावर…
लांगुळातें पेटवितां क्षिप्र उडाला
भंगी रक्षोवीरबळा जेंवि कुडाला
कांबट्यांचं कूड जसं भुरभुर जळून जाईल तसं राक्षसांचा सैन्य त्या आगीच्या तावडीत सापडलं. ही चित्रदर्शी उपमा कथानकात चैतन्य आणते. वृत्ताची लयही वाचनात जोश आणते.
लंकेची तो कीश मुहूर्तें करि होळी
हा! हा! बोलें रावण, कोपें कर चोळी
रेफाचे(रफार असलेले) शब्द उपयोजल्याने वृत्तातील मौज आणखी वाढली आहे. (३४८/२९)
सीताभर्ता स्वाश्रितसर्वा सुखहर्ता
न्यायें वर्ता जो म्हणता पद्मजकर्ता||
३४८/३३
युद्ध कृद्ध स्वांत करी आपण ज्याला
नाही काही भी न वळे हा पणज्याला
ब्रह्मदेवाला पणजा संबोधत, त्यालाही भीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रसंगांचं चित्रण झटपट डोळ्यांसमोर उभं करत मोरोपंत शेवटात म्हणतात :
श्रीरामाच्या पादसरोजांवरि भावें केलें दासें अर्पित रामायणनावें
हे सच्चित मयूर द्रुत यावें, वाटावें कां न प्रभुतें लक्षुनि गावें
पंचचामर रामायण हे गेयता, ओज आणि रसनिर्मितीसाठी सुयोग्य वृत्त. ( चाल: रावणरचित शिवतांडव स्तोत्र)(जरजरजग)
याची सुरुवातच थोडी अवघड आहे.
सरोजजार्थित प्रभु क्षपाचरेंद्रमारणा
असंख्य भक्तदृष्टिची घडावयास पारणा
अजात्मजात्मज द्रवोनि होय विश्वतारणा
अशेषजाड्यजन्यपापशापतापवारणा
सरोज म्हणजे कमळ, सरोजजा म्हणजे कमळातून जन्मलेली म्हणजे लक्ष्मी, तिने प्रार्थना केलेला प्रभू,
क्षपा म्हणजे रात्र, क्षपाचर म्हणजे रात्री फिरणारे निशाचर म्हणजे राक्षस! त्यांना मारायची प्रार्थना.
ही प्रार्थना ऐकून, त्यांचे निर्दालन करण्यासाठी
अजात्माचा आत्मज अवतरला.
अज म्हणजे दशरथाचे पिता. अजाचा आत्मज दशरथ, त्यांचा आत्मज म्हणजे राम जन्माला आला.
मोरोपंत लिहितात
भरादि तान्त नाम साधु केकयात्मजाजनि
याचा उलगडा पट्कन झाला नाही…
‘भर’ अशी सुरुवात होणारा आणि त ने शेवट होणारा… म्हणजे भरत
भरताचे नाव पंचचामर वृत्तात बसवण्यासाठी किती हा अट्टाहास!पान ३५०,२
कथा तीच पण वृत्त वेगळं आणि वृत्ताला अनुसरून येणारं शब्दवैभवही (पान ३५२/१६)
खलाची म्हणजे खलपुरुषाची बहीण म्हणजे स्वसा म्हणजेच शूर्पणखा खळस्वसा हा यथोचित शब्द पंचचामराच्या लयीत मस्त गुंफला आहे.
शूर्पणखा आणि रामाचा संवाद यातील आणि त्यातील ‘असीस’ शब्दाचा वापर :
खळस्वसा म्हणे असीस लुब्ध कां? मला भजें;
कळत्र तें चि सेव्य दे यथेष्टकामलाभ जें
या अशा स्त्रीवर लुब्ध का होतोस, माझ्याशी लग्न कर…
पुढे लक्ष्मण तिचे नाक कान छाटतो तेव्हा वर उपयोजिलेल्या असी शब्दाचा दुसरा (तलवार) अर्थ चपखलपणे गुंफतात…
समर्पि लक्ष्मणाचिया असीस नाक, कान ती
न त्या करील, दंडितां असीस नाक कान ती
पंचचामर रामायणात पंपाचा उल्लेख करताना ते म्हणतात, (३५३/२३)
यदीयनाम युग्मवर्ण पं अणीक पा असे
तिच्या तटी स्मरें प्रियेसि वर्णवेल तें कसें
याचं हसू येतं.
अशांत ये दशास्य ज्या न लाज मत्त पाप हा
वदे, सुभोग भोग चाल आज मत्तपा पहा
मत्त म्हणजे माजलेला, मत्तपा म्हणजे माझे तप.
(३५४/२७)
अशा शब्दांंची या काव्यात मांदियाळी आहे.
३५८/५१
नटे नभांत जो रमेशपादपद्मबंभर
व्यसुत्व घे न खंडिलीं शिरें जरी हि शंभर
रमेश म्हणजे रमापती म्हणजे विष्णू. त्याऐवजी उमेशपद्मबंभर हे अधिक योग्य ठरल असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे ते एकदम पटते.
शंभर डोकी उडवली तरी रावणाचा प्राण जात नाही… पण रिपूच्या उरात बाण मारला आणि
आनंदरस पसरला.
जयें महेंद्र दुंदुभिप्रचंड नाद वाजला
जयाचिया महाध्वनीस मेघसंघ लाजला
असं हर्षोत्फुल्ल वातावरण निर्माण झाले.
या रामायणाचा शेवट करताना मोरोपंत म्हणतात,
ज्या प्रभूत्तमें यशें अशेष विश्व तर्पिले
त्यासि पंचचामराख्य तच्चरित्र अर्पिले
रामचिंतनार्थ वर्णिले मयूरसेवकें
मुक्ति सुंदरी वधू वरलि याचि देवकें
एकेक रामायण वाचताना मोरोपंतांनी
शब्दांतून साकारलेले विश्व आपल्याला तत्कालीन प्रसंगांत घेऊन जाते हेच त्यांच्या प्रतिभेचं सामर्थ्य आहे.
