
पॅरिसच्या चढउतारी
मोहक रस्त्यांवर
वरचेवर वावरणारी विद्वान
चित्रकार, शिल्पकार,
लेखक आणि कवी मंडळी
वाटतात बिचारी
कायम गुरफटलेली
पॅरिसच्या लोभात !
त्यांच्या अस्थिर मेंदूत
सदैव अदला बदल करणाऱ्या
इकडून तिकडे
वक्राकार फिरणाऱ्या
टिंबांच्या त्या विकर्ष रेषा
भासतात पुसट… पण तरीही रेखीव!
असू दे ना पॅरिस फक्त
गोलाकार पृथ्वीचा एक अंश
पण आपल्या कलेला… विद्वत्तेला
मान्यता मिळण्याच्या
आशेवर तरंगत
ही मंडळी
पॅरिसमध्येच मारतात हेलपाटे
बुटांच्या टाचा झिजवत
अमर्याद… निस्सीम !
कलाकारांचे अस्थिर मेंदू …
त्यातील अगणित विकर्ष रेषा
मात्र कलाकार मर्त्य असूनही
फिरतात अमर्त्याच्या शोधात…
भासतात एखाद्या
अवघडलेल्या अर्धवट
विदूषकासारखे…
तरीही असतात
रखडत पॅरिसच्या
नाट्यमय जगात…
पडद्यामागे रडत
पडद्यापुढे हसत…!
सारे पॅरिस होते
एक व्यासपीठ
एक व्यापक चौथरा
त्या चौथऱ्यावर
एखादाच अति प्रतिभाशाली
सॅम्युएल बेकेट
बाकी सगळे
जीवन मरणाच्या सीमेवर
हास्याचे फवारे उडवत
बनू इच्छिणारे
अनेक उरले सुरले बेकेट..!
चौथऱ्यावर ठळक दिसतात
मधून मधून…सार्त्र,कॅमू आणि फुको
त्यांच्या आजूबाजूला आढळतात
भ्रमिष्ट चेहरे करून
कपाळाला आठ्या पाडून
भुवयांची प्रश्नचिन्हे दाखवत
रानपारव्या प्रमाणे घुमत फिरणारे
अनेक विफल विद्वान
नुसतेच दाढी वाढवलेले…!
आर्ट गॅलरीत ध्रुव ताऱ्यासारखा
अढळ चमकत राहणारा
दिसतो एखादाच पाब्लो पिकासो
बाकी सगळे इथे तिथे
नदीकाठावर आपली चित्रे
वर्षनुवर्षे फडफडत बसविणारे
पुराणे चित्रकार ..
व्यावहारिक जगापासून
दूर विसावलेले… असंख्य डोंबारी…!
शेवटी कीर्ती कसली ती तात्पुरती
तरीही कीर्तीमागे धावणारे
बरेच विद्वान, कलाकार सरफिरे
बरेचदा फुसके विचारवंत
ऑपेरा थिएटर बाहेर…
पॅरिसच्या अनेक भागांत
रस्त्यावर उभे राहून
अॅकॉर्डिअन, व्हायोलिन आणि गिटार
ऐकत जगतात रमत
बहुतेक सगळे विद्वान, कलाकार
प्रतिभेच्या विकासाला लागणारा
सुगंध हुंगत… उलटे पालटे होऊन
सैरावैरा धावत
पॅरिसच्या मादकतेवर
फिदा होत काढतात वेळ
सडत… हसत… रडत…जगत
शेवटी त्यांच्या कारकिर्दीची
सुरुवातही इथेच… अंत तर इथेच…….!
राजन हर्षे, २ ऑगस्ट, १९७५ पॅरिस
