रसग्रहण :

‘अंतर्नाद एका मासिकाचा उदयास्त’ लेखक : भानू काळे
भानू काळेंचं आत्मचरित्र आणि अंतर्नाद मासिकाचं आत्मवृत्त यांची सुरेख गुंफण मौज प्रकाशनाच्या ‘अंतर्नाद | एका मासिकाचा उदयास्त’ या पुस्तकात साधली गेली आहे. सुजाण, सुबुद्ध दर्जेदार लिखाणाची भूक अंतर्नादने गेली तीस वर्षे भागवली. यापलीकडे मुमुक्षू वाचकाला सुजाण आणि सुबुद्ध करण्याचा मोठा प्रयत्न अंतर्नादने केला. हा सर्व इतिहास, अंतर्नादच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत झालेल्या प्रवासाची ओळख अत्यंत प्रांजळ विवेचनातून पुस्तकात केली आहे.
मुंबईत मध्यमवर्गीय born आणि brought up असूनही भानू काळे यांचा world view आणि त्याला जोडून परिचित व्यक्तिसंचय हे सर्व फारच विशाल आणि व्यापक आहे. असा विशाल आणि व्यापक worldview कसा बनला; किंबहुना तो जाणीवपूर्वक कसा बनवला गेला याची पुस्तकामुळे खूपच चांगली कल्पना आली. मुंबईत मुद्रण व्यवसाय उत्तम चाललेला असताना कित्येक वर्षांपूर्वी तरुण वयात (ज्या काळात पुणं हे पेन्शनरांचं गाव म्हणून ओळखलं जात असे! ) स्थलांतर करून, अभिरुचीच्या अत्यंत कठोर कसोट्या लावून मराठी मासिक चालवणे ही पराकोटीची धाडसी कल्पना होती. दोन कसोट्यांवर पुणे मुंबईपेक्षा बरेच मागास आहे असेच म्हणावे लागेल. भानू काळे यांच्याप्रमाणे या दोन्ही कसोट्यांचा मलाही व्यक्तिगत अनुभव आहे. परस्परसंबंधांत जातपात, पंथ हे मुंबईत transactional level वर व्यक्तींच्या मनात चुकूनही येत नाहीत. (जे पुण्यात दुर्दैवाने आहेत! ) पुष्कळशा लोकांना ‘जातीपातींविना बोलणे म्हणजे काय बोलणे!’ असे होते; शिवाय ज्या प्रकारची व्यावसायिकता मुंबईत आहे आणि तिची जपणूकही केली जाते तिचा पुण्यात अभाव आहे. या संदर्भात कलकत्त्याहून मुंबईत प्रथम आल्यावर सत्यजित रे यांना मुंबईच्या घडीबद्ध आयुष्याचं केवढं आश्चर्य वाटलं होतं याची आठवण होते.
प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि कलर टीव्ही यांचा सुळसुळाट नव्वदच्या दशकापासून झाला होता. प्रस्तावनेतून : “त्या झंझावातापुढे अनेक नियतकालिकांनी मान टाकली. अंतर्नादची वाटचाल सुरू झाली ती अशा प्रतिकूल पर्यावरणात. त्यामुळेच आधीची नियतकालिके मानदंड ठरू शकणार नव्हती. सुरुवातीची तेवीस वर्षे अंतर्नाद मासिक स्वरूपात आणि शेवटची तीन वर्षे ‘दिवाळी अंक’ म्हणून प्रसिद्ध झाले. मासिकाच्या पूर्वतयारीची दोन-अडीच वर्षे आणि अस्तानंतरच्या आवराआवरीतले एक-दीड वर्ष विचारात घेतले तर साधारण तीस वर्षे अंतर्नादने माझे भावविश्व व्यापले होते. अंतर्नादचं मूल्यमापन करणे हा या पुस्तकाचा हेतू नाही. ते काम मराठीचे अभ्यासकच करू शकतील. या वाटचालीतील संघर्षाचे तसेच सार्थकतेचे क्षण आणि अंतर्नादच्या खिडकीतून दिसलेले साहित्यविश्व वाचकांपुढे मांडणे हा या पुस्तकाचा हेतू आहे.
पुस्तक मनस्वी आणि अतिशय निर्भीड आणि प्रांजळ आहे! पहिल्या दोन प्रकरणांत भानू काळे स्वतःचे बालपण आणि पार्श्वभूमी यांची कल्पना देतात. त्यांचे वडील गोदी कामगार चळवळीशी निगडित होते आणि आई शालेय शिक्षिका. वडिलांना कॉम्रेड म्हणवणाऱ्या काळेंच्या घरी कोणत्याच प्रकारच्या देवांच्या मूर्ती नव्हत्या. असे असलेतरी कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावण्याची काळजी घेतली जाई. काहीशा मोठ्या परिवारात आई ही एकटीच मिळवती असणे हा प्रकार मुंबईत थोडाफार असेल; पण मध्यमवर्गीय मराठी परिवारात मुंबईबाहेर अन्यत्र कोठेही (त्या काळात) असणे माझ्या समजुतीप्रमाणे विरळा.
लेखकाच्या शब्दांत, “आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही जाणीव अगदी लहानपणापासून माझ्या मनात कुठेतरी रुजली होती.”
याचा एक परिणाम म्हणजे सर्वप्रकारची पुस्तकं अगदी झपाटल्यासारखी वाचण्याची सवय लेखकाला लागली होती. (चांगला) लेखक हा नव्वद टक्के वाचक असतो आणि दहा टक्के लेखक. भानू काळेंच्याबद्दल हे निश्चितच खरं असावं. सोविएत लँडची पुस्तके त्या काळात घरी येत असत याचा खास उल्लेख काळे करतात. ही गोष्ट इतर ज्ञानशाखांबद्दलही खरी असावी. गणिताची (सोविएट ब्लॉककडून येणारी) MIR Publication ची पुस्तके गणिती आशय (पाश्चात्त्य पुस्तकांपेक्षा) अधिक असूनही किमतीने कमी आणि समजायला सोपी होती!
१९७०चे दशक हे प्रामुख्याने गाजले ते जून १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीमुळे. या दशकात लेखक ‘हिंमत’ या इंग्रजी साप्ताहिकाशी संबंधित होते. ज्या वेगाने१९७७ साली जनतेने इंदिराजींचा पराभव केला तितक्याच वेगाने ‘there is no alternative (TINA)’ पद्धतीने इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्या. या सर्वांचा लेखकाच्या मनावर खोल परिणाम झाला. “सामान्य जनता आम्ही म्हणत होतो तशी ‘सुज्ञ आणि प्रगल्भ’ असते का?” हा प्रश्न लेखकाच्या (अनेक रॅशनल विचारी व्यक्तींप्रमाणे) सदसद्विवेकबुद्धीला भेडसावूलागला. हा एक भ्रमनिरासाचा काळ होता. भारतात English Speaking Elite वर्गआणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी आहे याची जाणीव लेखकाला हिंमत साप्ताहिकातील त्याच्या जीवनाच्या या अध्यायामध्ये झाली.
अंतर्नादची भूमिका लेखकाच्या मनात ८० च्या दशकात मूर्तरूप घेऊ लागली. प्रस्तावित (१९९५ साली सुरू झालेल्या) मासिकाच्या ध्येयधोरणासंबंधी काळे लिहितात (पान ४१) : “कुठल्याही प्रकारची सामाजिक, वैचारिक वा साहित्यिक अस्पृश्यता अंतर्नाद पाळत नाही. अंतर्नादचा रंग लाल, भगवा, निळा असा कुठलाही एकच नाही. अपेक्षित त्या सांस्कृतिक समृद्धीसाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रयत्न होत राहणे गरजेचे आहे आणि अशा प्रयत्नांचा अंतर्नाद हा एक छोटा भाग आहे. ज्याला कसदार वाचनाची आवड आहे त्याच्यासाठी अंतर्नाद हा एक चांगला पर्याय असेल.”
तिसऱ्या प्रकरणात संपादकाच्या खुर्चीतून आलेले अनुभव विशद केले आहेत. “साहित्याच्या मूल्यमापनात कोणत्याही प्रकारचा कृत्रिम भेदभाव नाही,” हे पुढील निवेदनात काळे स्पष्ट करतात (पान ४५) : ललित व वैचारिक किंवा कल्पनाप्रधान (फिक्शन) व वास्तवप्रधान (नॉनफिक्शन) अशा दोन्ही प्रकारचे साहित्य अंतर्नादला हवे आहे; त्यात आम्ही श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करत नाही. वैचारिक साहित्यात लालित्य असते आणि ललित साहित्यातही विचार असतोच. कुठल्याही अंगाने घेतला – ललित वा वैचारिक – तरी तो एका प्रकारे सत्याचाच शोध असतो आणि दोन्हींच्या अभिव्यक्तीत शब्दलाघव, वाचनीयता, कल्पकता आणि रचनासौंदर्य सारखेच असू शकते.” संपादक म्हणून भानू काळेंचा लेखकसंग्रह (आणि त्या अनुषंगाने लोकसंग्रहसुद्धा) किती विशाल आहे याची कल्पना या प्रकरणात उल्लेख केलेल्या अनेक वैचारिक विषयांवरील लेखांवरून येते. यात विशेष उल्लेखनीय लेख ‘ज्ञानप्रबोधिनी’ या अतिशय controversial विषयावरील आहेत. ते मुळातूनच वाचायला पाहिजेत.
नुकत्याच दिवंगत झालेल्या यास्मिन शेख यांच्यासारख्या अभ्यासू आणि व्यासंगी व्याकरण सल्लागार अंतर्नादला लाभल्या. त्यामुळे सर्व मजकूर प्रमाणभाषा मराठीत उत्तम प्रकाशित झाला. मासिकाचे मुखपृष्ठ साधे; पण भावपूर्ण आणि आकर्षक असावे याकडे संपादकांचे खास लक्ष असे. या कामात त्यांना अनेकांनी मदत केली. यात विशेष उल्लेखनीय व्यक्ती लेखिका नीलिमा गुंडी आणि चित्रकार रवी परांजपे. कोणत्या प्रकारच्या पुस्तकांची आवड लोकांमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी वाचनालय हा सर्वात उपयुक्त मार्गआहे. अंतर्नाद सुरू करण्यापूर्वीच संपादकांनी राहत्या जागेच्याजवळ औंधमध्ये ‘ऊर्मी वाचनालय’ सुरू केले. भानू काळेंच्या पुस्तकात वाचन आणि वाचनालयाचेउल्लेख वारंवार येतात. एकूणच लेखकाला वाचनालय-वाचक-वाचन चळवळींबद्दल किती आत्मीयता आहे हे पदोपदी – या सर्वच पुस्तकांत जाणवते.
मराठी/इंग्रजी भाषांचे शालेय शिक्षणात माध्यम आणि काही वेळा इंग्रजी सफाईने बोलण्यामुळे मिळणारा काहीसा (गैर)फायदा याची चर्चा पुस्तकात बऱ्याच ठिकाणी आली आहे. सध्या मराठीला वाचकवर्ग न मिळण्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, की आत्ता सत्तर वर्षांच्या पुढेमागे असणाऱ्या बहुतांश व्यक्तींची पुढची पिढी इंग्रजी माध्यमातून शिक्षण
घेतलेली आहे. या पिढीमध्ये शाळेत मराठी भाषा असली तरी ती एका प्रकारे दुय्यम असते. (याचा अर्थ त्यांना इंग्रजी फार चांगले येते असा मुळीच नाही). या पिढीतल्या अनेकांना मराठी वाचता येते. परंतु टीव्ही (आणि मोबाईल फोन)सारख्या माध्यमांबरोबरच एकूण आयुष्याचे पराकोटीचे शहरीकरण झाल्याने या पिढीला मराठीतले बारकावे आणि खाचाखोचा अजिबात समजत नाहीत. मला स्वतःला अकरावीपर्यंत मराठी उत्तम शिकवली गेली असल्याने दुसऱ्या भाषा येण्यासाठी या गोष्टीचा फार उपयोग झाला. भाषांबद्दल अभिनिवेशाच्या पलीकडेएक प्रकारचा लवचीकपणा अवलंबणं आवश्यक आहे.
दुसरीकडे देशात एक भाषा (एक निशाण, एक गीत, एक, एक….) हा आग्रह फार जोरात धरता येत नाही; कारण या देशाची राज्यघटना हीसुद्धा इंग्रजीतच लिहिली गेली आहे. माझ्या मताने इंग्रजी ही आता एक भारतीय भाषाच होय. तिला चोर-लुटारूंची भाषा, गुलामगिरीची निदर्शक वगैरे संबोधणे चूक आहे. भारतीय इंग्रजी ही आता एक जगन्मान्य भाषा आहे. जगात इंग्रजी येणारा वर्ग (संख्येने) सर्वात जास्त अमेरिकेत आहे आणि त्याखालोखाल दुसरा नंबर भारत. दुरभिमानी अभिनिवेशाचं एक हास्यास्पद उदाहरण नुकतंच पाहण्यात आलं. BRICS राष्ट्रप्रमुखांच्या (गोलमेज) परिषेदेत मेजावर प्रत्येक राष्ट्रप्रमुखाच्या देशाची पाटी इंग्रजी लिपीत लिहिली होती. यात आपल्या पंतप्रधानांच्या पुढील पाटीवर BHARAT असं देशाच्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगसकट लिहिलंहोतं. यात गंमत ही आहे, की ज्याचे संक्षिप्त रूप BRICS आहे त्यातील B हा ब्राझील आहे, भारत नाही! भारत अजूनही BRICS मध्येतरी India च आहे.
(उर्दू सोडून) सर्वच भारतीय भाषांच्या लिपी या ब्राह्मीनामक मूळ लिपीतून तयार झाल्या. देवनागरी अंकसुद्धा असेच तयार झाले. सध्या आपण ज्यांना इंग्रजी आकडे म्हणतो तेही Indo-Arabic संख्यालेखन पद्धतीचेच आहेत. (तत्पूर्वी युरोपात रोमन पद्धती होती.) वास्तविक देवनागरी आणि इंग्रजी अंकांमध्ये फार फरक नाही. एक, दोन, तीन हे अंक जवळजवळ सारखेच आहेत. याच कारणाने शहाणपणाचं धोरण स्वीकारून अंक (सर्व व्यवहारांत – विशेषतः नोटांवर) इंग्रजीमध्ये लिहावेत असा केंद्रशासनाचा निर्णय झाला होता. दुर्दैवानेहा निर्णय धाब्यावर बसवणाऱ्यात महाराष्ट्र अग्रेसर होता! तमीळ भाषेत मराठीसारखेच अंक आहेत. कल्पना करा : चेन्नईमध्ये बसच्या पाट्यांवरील आकडे तमीळमध्ये लिहिले गेले तर इतर भारतीयांची किती पंचाईत होईल!
‘काळोख दाटून येताना’ या दहाव्या प्रकरणात अंतर्नादने राबवण्याचा प्रयत्न केलेल्या काही उपक्रमांत निराशा पदरी कशी आली याचं वर्णन आहे. आपल्याला एखाद्या उपक्रमाबद्दल जितकी पोटतिडीक वाटते तिचा लवलेशही ज्यांच्यासाठी तो उपक्रम हाती घेतला गेला, त्या व्यक्तींमध्ये असू नये याचं दुःख अपार आहे. प्रसंग अंतःकरणाला भिडणारा आहे. या दुःखदायी प्रसंगात अंतर्नाद आणि दत्तप्रसाद दाभोळकर यांनी मिळून विदर्भ-मराठवाड्यातील काही शैक्षणिक संस्था निवडून त्या संस्थांना अंतर्नादचे अंक भेट म्हणून दिले आणि या वाचनप्रसाराच्या उपक्रमाला ज्यांच्यासाठी ते केले जात होते त्यांनी काहीसे दुर्लक्ष केले. हा सर्व प्रसंग अत्यंत दुःखद आणि touching आहे आणि समाजात अभिरुची निर्माण करणे हे किती कठीण आहे याचं प्रत्यंतर देणारा आहे.
चांगल्या लेखनाची आवड लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी अंतर्नादने अनेक उपक्रम हाती घेतले व ते पारही पाडले. यांतील एक उपक्रम म्हणजे वाचकांनी केलेली श्रेष्ठ पुस्तकांची निवड आणि आवडलेल्या पुस्तकांची पसंतीनुसार क्रमवारी. यासकट एकूणच अभिजात वाचनाच्या प्रसाराची आणि प्रचाराची अंतर्नादची तळमळ लक्षणीय होती. या बाबतीमध्ये दर्जेदार साहित्य प्रकाशित करणाऱ्या सत्यकथासमान प्रकाशनांपेक्षा अंतर्नादचं योगदान खूपच वेगळ्या स्वरूपाचं होतं. अंतर्नादची उत्तम वाङ्मयप्रसाराची तळमळ ही तुपाचं भांडं घेऊन कुत्र्याच्या पाठीमागे धावणाऱ्या नामदेवासारखी होती. मी वाचलेल्या दोन भाषांतरित तमीळ कथा वाचनीय होत्या. त्यांतली एक अगदी लहान होती आणि तिचं शीर्षक होतं, ‘कढीपत्त्याचे झाड!’ कथानक मला अजूनही आठवते! अवधूत परळकरांचा परिचय मला अंतर्नाद मासिकाद्वारेच झाला. अंतर्नाद मासिकाच्या चळवळीमधे मिळालेल्या यशाबद्दल लेखकाला वाटलेले समाधान याबरोबरच (नकळत) झालेल्या चुकांबद्दल पुस्तकात एका प्रकारे कबुलीदेखील आहे. या पार्श्वभूमीवर हे आत्मवृत्त झपाटलेले व पारदर्शी आहे. त्यामुळे या पुस्तकाची तुलना श्रीराम लागूंच्या ‘लमाण’ बरोबर करण्याचा मोह मला होतो. तरीही लमाण आणि या आत्मवृत्तात एक मोठा फरक आहे. लागू (त्यांच्या नैसर्गिक वृत्तीप्रमाणे) सर्व घटनांकडे तटस्थ आणि एक प्रकारच्या त्रयस्थ दृष्टीने पाहतात. भानू काळेंच्या लेखनामधे मध्यमवर्गीय जाणिवांचे भान घट्ट भरून राहिले आहे. त्यांच्या या भूमिकेत ‘सत्यं-शिवं-सुंदरम्’ ची समाजाला सातत्याने जाणीव करून देणे; किंबहुना मंतरलेपणाने अभिरुचिपूर्ण लोकशिक्षणाचा ध्यास घेणे या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. तरुण वयात कथाकादंबरी विश्वात भानू काळेंनी लक्षणीय यश मिळवलं होतं.तितक्याच तरुण वयात उत्तम अभिरुचीचे मासिक काढून ते यशस्वीपणे चालू ठेवण्याची जिद्द त्यांच्या मनात जवळजवळ मूर्त स्वरूपात आली होती, तिला पत्नीचीही तेवढीच साथ होती ही तर गोष्ट त्याहूनही लक्षणीय! लेखकाच्या
अंतर्नाद-प्रवासाचं विहंगमावलोकन सुबक पद्धतीने आणि प्रामाणिकपणे करून देणारं हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.
