
डावीकडून उजवीकडे : विनोद शिरसाठ, सतीश बागल, भानू काळे, नीती बडवे व सानिया कर्णिक.
रविवार, १९ जुलै २०२६. पुण्यातील एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशनचे सभागृह. संध्याकाळी सहाची वेळ. बरीच गर्दी जमली होती. निमित्त होते ‘चीन भेटीतील भाषणे’ या सानिया कर्णिक यांनी अनुवादिद केलेल्या आणि साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन. मराठी वाचकांची संख्या घटत चालली आहे असे अलीकडे नेहमीच म्हटले जाते पण तसे जरी असले तरी मराठीत अनेक पुस्तके आजही प्रकाशित होत असतात आणि त्यांची संख्या सतत वाढते आहे. अर्थात यांतील काही थोडीच पुस्तके महत्त्वाची असतात आणि तसे एखादे पुस्तक हाती आले की साहजिकच वाचनप्रेमींना आनंद होतो. तसा आनंद या पुस्तकामुळे माझ्या वाट्याला आला.
पुस्तकाचा विषय अगदी आगळा आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी १९२४ साली तब्बल पन्नास दिवसांचा चीन दौरा केला होता. चीनमधील राजकीय व सामाजिक नेते लियांग छिछाव (इंग्रजी स्पेलिंग Liang Qichao, चिनी उच्चार आपल्यासाठी खूप विचित्र असतात) यांच्या आमंत्रणावरून टागोर तिथे गेले होते. बीजिंग येथील युनिव्हर्सिटीज लेक्चर असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने छिछाव यांनी हे आमंत्रण दिले होते आणि विश्वभारतीच्या वतीने टागोरांनी ते स्वीकारले होते. यावेळी त्यांचे वय ६३ होते आणि तरीदेखील त्यांनी हा मोठा दौरा पूर्ण केला आणि त्या दरम्यान तीस लहानमोठी व्याख्याने दिली. ते स्वतः इंग्रजीत बोलत आणि त्याचवेळी मंचावरून त्याचे चिनी भाषेत भाषांतर केले जाई. त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्कारामुळे त्यांचे नाव चीनमध्ये सर्वदूर पोचलेले होते. ‘आपल्यातील एकाला हा जागतिक सन्मान मिळाला’ या भावनेने सर्वच आशिया खंडाची मान उंचावली होती. शिवाय दौऱ्यापूर्वी किमान सहा महिने त्याची भरपूर प्रसिद्धी चिनी वृत्तपत्रांतून होत होती. त्यामुळे साहजिकच लोकांमध्ये टागोर काय सांगतात याविषयी खूप कुतूहल होते. प्रत्येक भाषणाला हजारो श्रोते उपस्थित राहात. एकदा तर श्रोत्यांची एवढी गर्दी झाली होती की बंदिस्त सभागृहाऐवजी खुल्या मैदानात भाषण द्यावे लागले होते. या सर्व व्याख्यानांतील सात निवडक व्याख्याने ‘Talks in China’ या शीर्षकाखाली इंग्रजीत १९२५ साली बंगालमध्ये प्रकाशित झाली होती. त्या व्याख्यानांचा मराठी अनुवाद म्हणजे हे पुस्तक.
‘चिनी महासत्तेचा उदय’ या पुस्तकाचे लेखक आणि माजी सनदी अधिकारी सतीश बागल यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. जर्मन भाषेच्या प्राध्यापिका आणि प्रसिद्ध अनुवादिका नीती बडवे या प्रमुख अतिथी होत्या. दोघांनीही पुस्तकाविषयीची आपली मते सोदाहरण व्यक्त केली. हाँगकाँगमधे ब्रिटिश सैन्याने चिनी नागरिकांवर खूप अत्याचार केले होते आणि त्या सैन्यात बरेच शीख सैनिक असल्याने चिनी जनतेचा भारतावर अनेक वर्षे राग होता असे काही वेगळे मुद्दे सतीश बागल यांनी मांडले. हा अनुवाद किती काटेकोरपणे केलेला आहे हे बडवे यांनी स्पष्ट केले. साधना साप्ताहिकाचे संपादक आणि या पुस्तकाचे प्रकाशक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. अनुवादिका सानिया यांनी पुस्तकलेखनामागची आपली भूमिका स्पष्ट केली. शेवटी भानू काळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. पुण्यात पुस्तकप्रकाशनाचे कार्यक्रम तसे जवळ जवळ रोजच होत असतात, पण आजचे वेगळेपण पण सभागृहात तरुण प्रेक्षकांची नजरेत भरणारी उपस्थिती. अनुवादिका स्वतःही एक विद्यार्थिनीच आहे हे त्यामागचे कारण असावे. सुमारे दोन तास चाललेल्या या समारंभाला सर्व श्रोते शेवटपर्यंत थांबले होते.
पण प्रकाशन समारंभाचा वृत्तान्त देण्यासाठी हा लेख नाही. फक्त १४४ पृष्ठांच्या या छोटेखानी अनुवादाचे वेगळेपण आणि आपले शेजारी राष्ट्र असलेल्या चीनबद्दलचे आपले आकलन अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने असलेले त्याचे महत्त्व वाचकांसमोर मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे.
रवींद्रनाथांनी दिलेल्या सात व्याख्यानांच्या व्यतिरिक्त लियांग छिछाव यांनी लिहिलेला ‘भारताने चीनला काय दिले?’ हा लेखही पुस्तकात आहे. त्याचा अनुवाद सानिया कर्णिक यांनी मूळ चिनी भाषेवरून केलेला आहे. लियांग छिछाव हे भारताला चीनचा मोठा भाऊ मानत. ते स्वतः बौद्ध धर्माचे निष्ठावान अनुयायी होते आणि भारताने चीनला दिलेली ती सर्वांत मोठी देणगी आहे असे त्यांनी म्हटले आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला केलेल्या आपल्या पहिल्या स्वागतपर भाषणात ते म्हणतात, “बौद्ध धर्माच्या कितीतरी तात्त्विक विचारधारांमध्ये चीनने मोलाची भर घातली आहे. बौद्ध धर्म जितका भारताचा, तितकाच तो चीनचाही आहे.” टागोरांच्या त्या भेटीला चीनमध्ये तीव्र विरोधही झाला होता, ‘टागोर, गो बॅक’ अशा विद्रोही घोषणाही दिल्या गेल्या होत्या. टागोरांच्या बाजूने आणि विरोधातही बरीच मते मांडली गेली होती. त्यांचा परामर्श घेणारा एक लेखही अनुवादिकेने या पुस्तकात लिहिला आहे. प्रकाशकाचे व अनुवादिकेचे विस्तृत मनोगतही पुस्तकात आहे. चीनचा असा प्रदीर्घ व्याख्यानदौरा करणारे टागोर हे पहिले भारतीय नेते. टागोरांची ही अतिशय महत्त्वाची भेट या पुस्तकाच्या निमित्ताने मराठीत प्रथमच आली आहे.
सुरुवातीला रवींद्रनाथांविषयी थोडेसे. तसे पाहिले तर त्यांचे मोठेपण आपण सगळेच जाणतो. नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते; एवढेच नव्हे, तर हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई होते; किंबहुना पहिले गौरेतर होते. भारताचे ‘जन गण मन’ आणि बांगलादेशचे ‘आमार शोनार बांगला, आमि तोमाओ भालोबाशि’ ही दोन्ही राष्ट्रगीते त्यांचीच देणगी. फारशी परिचित नसलेली आणखी एक बाब म्हणजे ‘नमो नमो माता, आपा श्रीलंका’ हे श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्याच एका गीतावर आधारित आहे. त्यांची चालही त्यांनीच लावली होती आणि त्यांचे संगीतही त्यांनीच दिली होते. एक कवी, गीतकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, समाजसुधारक अशा विविध नात्यांनी असलेला रवींद्रनाथांचा प्रभाव आजही बंगाली समाजावर कायम आहे. रवींद्रनाथ एका श्रीमंत जमीनदाराच्या कुटुंबातील होते आणि त्यांच्या विचारसरणीत वर्गविग्रह आणि वर्गसंघर्ष या मूलभूत मार्क्सवादी संकल्पना अजिबात बसत नव्हत्या. त्यामुळे एकेकाळी रवीन्द्रनाथांना त्यावेळच्या सत्ताधारी मार्क्सवाद्यांनी बराच विरोध केला. पण तरीही रवींद्रनाथांचे बंगाली मानसातील स्थान कायमच राहिले. शेवटी मार्क्सवाद्यांना आपला विरोध बाजूला ठेवावा लागला. मदर टेरेसांचा स्वीकार केला तसाच रवींद्रनाथांचाही स्वीकार त्यांना करावा लागला.
आज भारताच्या कुठल्याही मोठया शहरात रवींद्रनाथांचा पुतळा किंवा कुठले तरी मोठे स्मारक हमखास दिसते, त्यांच्या नावाने एखादे कलादालन किंवा सभागृह असते; पण त्यांच्यानंतर मात्र एकाही अन्य भारतीय साहित्यिकाला अशी देशव्यापी मान्यता लाभलेली नाही हे वास्तव काहीसे चक्रावून टाकणारे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांसारख्या परक्या शत्रूचे अस्तित्व आपल्यात एकजूट निर्माण करायला पूरक ठरले होते आणि त्यांच्या पश्चात एकजूट निर्माण करायची निकड नाहीशी झाली असे तर नसेल ना? किंवा कदाचित स्वातंत्र्योत्तर काळातील भाषावार प्रांतरचनेचा आणि त्यातून बळकट झालेल्या वेगवेगळ्या भाषिक अस्मितांचा हा एक विपरीत परिणाम तर नसेल ना? असो.
जोरासांको या गावातील ठाकूरबाडी हे रवींद्रनाथांचे घर. जोरा म्हणजे बांबू आणि सांको म्हणजे पूल; इथे जाण्यासाठी पूर्वी एका छोट्या नदीवर बांधलेला बांबूचा पूल ओलांडून जावे लागत असे, म्हणून हे नाव. जोरासांको हा आता कोलकाता शहराचाच एक भाग आहे. इथेच रवींद्रनाथांचा १८६१ साली जन्म झाला, इथेच त्यांचे बालपण गेले, इथेच त्यांचे लग्न झाले, इथेच त्यांनी आयुष्याची अखेरची वर्षे काढली आणि इथेच १९४१ साली त्यांचे निधन झाले. दहा हजार चौरस फूट विस्तार असलेले ते सुंदर, प्रशस्त दुमजली घर आज त्यांचे संग्रहालय म्हणून जतन केले गेले आहे. अलीकडेच प्रस्तुत लेखक तिथे गेला असताना बघितलेली आणि या पुस्तकाच्या संदर्भात नमूद करावीशी वाटणारी एक बाब म्हणजे तिथे असलेले जपान गॅलरी, हंगेरी गॅलरी, चीन गॅलरी आणि युनायटेड स्टेट्स गॅलरी असे चार कक्ष. त्या काळाच्या मानाने रवींद्रनाथांनी किती प्रचंड प्रवास केला होता याची कल्पना तेथील छायाचित्रे आणि इतर वस्तू बघताना येते. विलायतेला तेव्हाही अनेक भारतीय जात पण रवींद्रनाथ चीन आणि जपान या आशियाई देशातही केले होते याचे कौतुक वाटते. याच इमारतीत गुरुदेवांनी स्थापन केलेल्या विश्वभारतीचे मुख्य केंद्र आहे आणि याच विश्वभारतीत गुरुदेवांनी स्थापन केलेले भारतातील पहिले चिनी अभ्यास केंद्र आहे. आज जगातील सर्वांत मोठे देश म्हणून भारत आणि चीनचे महत्त्व सगळेच मान्य करतात पण गुरुदेवांचा द्रष्टेपणा म्हणजे त्या काळातही त्यांनी चीनचे महत्त्व जाणले होते.
अनुवादिका सानिया कर्णिक यांच्याविषयीदेखील इथे थोडे अधिक लिहावेसे वाटते. पुण्यातील अक्षरनंदन या प्रयोगशील शाळेच्या आणि नंतर अकरावी-बारावीत असताना फर्ग्युसन कॉलेजच्या त्या विद्यार्थिनी. लहानपणापासून भाषाविषयांची विशेष आवड. त्यामुळे मुंबई विद्यापीठातून बीए करत असताना चिनी भाषा हा विषय त्यांनी घेतला. २०२३ साली चायनीज ब्रिज कॉम्पिटिशनमध्ये भारतात पहिला क्रमांक मिळाल्यामुळे आठ दिवसांचा चीन दौरा करायची त्यांना संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्या अनुभवावर त्यांनी साधना साप्ताहिकात काही लेख लिहिले. ते संपादकांना व वाचकांना आवडल्यामुळे ग प्र प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राची अभ्यासवृत्ती त्यांना मिळाली व तिचाच एक भाग म्हणून प्रकाशकांनी हे अनुवादाचे काम त्यांच्यावर सोपवले. या केंद्राच्या अभ्यासवृत्तीतून आलेले हे पहिलेच पुस्तक आहे. सध्या त्या चीनमध्ये बीजिंग लँग्वेज अँड कल्चर युनिव्हर्सिटीत मास्टर्स इन ट्रान्सलेशन स्टडीज (इंग्रजी आणि चिनी भाषांतर) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यासाठी त्यांना चीन सरकारकडून पूर्ण अनुदानित शिष्यवृत्ती मिळाली आहे.
आता या पुस्तकाविषयी. रवींद्रनाथांच्या या पुस्तकातील पहिल्या भाषणाचे शीर्षक आहे ‘आत्मचरित्रात्मक’. खुद्द बंगालमध्ये स्वतःला झालेल्या विरोधाविषयी त्या भाषणात प्रांजळपणे रवींद्रनाथ म्हणतात, “माझे भाग्य असे की, तथाकथित प्रतिष्ठित कुटुंबांतील मुलांसाठी योग्य मानले जाणारे शाळा आणि कॉलेजचे औपचारिक शिक्षण मी कधीच घेतले नाही. औपचारिक शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे अनुकरणाच्या चौकटीत मी अडकून पडलो नाही. काव्यनिर्मितीमध्ये मी वेगळी शब्दसंपदा आणि कल्पनाशक्ती यांचा वापर केल्यामुळे विद्वान समीक्षकांनी मला अनेकदा धारेवर धरले. बुद्धिमान लोकांनी माझी खिल्ली उडवली. साहित्याच्या विश्वात मी बहिष्कृत ठरलो….. काही काळानंतर माझ्या देशात माझे थोडे नाव झाले. पण अजूनही एका मोठ्या वर्गात विरोधाची लाट तीव्र आहे. काही जण म्हणतात की, माझ्या कविता परंपरांना धरून नाहीत. काहींना त्या दुर्बोध वाटतात, तर काहींना त्या अनुचित भासतात. मला माझ्या स्वतःच्या लोकांकडून कधीच संपूर्ण स्वीकृती मिळाली नाही. पण ते माझ्यासाठी वरदानच ठरले; कारण निर्विवाद यशाइतके मनुष्याला भ्रष्ट करणारे दुसरे काहीही नाही.” बंगाली पाठ्यपुस्तकांत रवींद्रनाथांच्या काही कविता समाविष्ट करायचा प्रस्ताव जेव्हा प्रथम पुढे आला त्यावेळी बंगालच्या शैक्षणिक वर्तुळामधील बऱ्याच धुरीणांनी त्याला आक्षेप घेतला होता याची हे वाचताना मला आठवण होत होती.
रवींद्रनाथांच्या दुसऱ्या व्याख्यानाचे शीर्षक आहे ‘प्रिय आयोजकांना’. त्यातील काही भाग इथे उद्धृत करावासा वाटतो, कारण आजच्या काळालाही तो खूप लागू पडणारा आहे. ते म्हणतात, “आज माणसे सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करू शकत असली, तरी माणसांना खऱ्या अर्थाने परस्परांच्या जवळ येणे अधिकच कठीण झाले आहे. आजकाल आपल्यापैकी बहुतेक जण फक्त वरवरचे जग पाहणारे पर्यटक झाले आहेत. संस्कृतींनी आपल्याभोवती निर्माण केलेल्या कोषांना सोबत घेऊनच आपण फिरत असतो. दूर देशातही आपल्याला घरच्या चवीचे जेवण मिळते, राहायला आरामदायी खोल्या मिळतात. मात्र या सुखसोयी आपल्याला त्या देशातील लोकांपासून दूर ठेवतात. मोठमोठ्या हॉटेलांत शिरलो की फिरायला आलेल्या नवीन जागेचा आपल्याला विसरच पडतो. आपण कुठल्यातरी उद्देशाने एखाद्या ठिकाणी जातो आणि केवळ त्याच ठरावीक नजरेने सारे पाहून येतो.” शंभर वर्षांपूर्वी व्यक्त केलेले हे विचार आहेत पण असे वाटते की, आजच्या पर्यटकांना समोर ठेवूनच ते व्यक्त केले आहेत!
याच भाषणात पुढे ते म्हणतात, “तुम्ही मला आमंत्रित केलेत तसेच मीही तुम्हाला भारतात येण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही कदाचित मी माझ्या मातृभूमीत स्थापन केलेल्या विश्वभारती ह्या संस्थेविषयी ऐकले असेल. भारताने अवघ्या जगाचे मोकळ्या मनाने स्वागत करावे ह्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली गेली. आपल्याला अलग करणाऱ्या कुंपणांतून वाट तयार करू या आणि फरकांसह एकत्र येऊ या. फरकांशिवाय हे जग किती एकसुरी वाटेल! विविध वंशांच्या लोकांनी आपापली वैशिष्ट्ये जपत एकत्र आले पाहिजे. नीरस एकसारखेपणापेक्षा विविधतेतील रसरशीत एकता कधीही चांगली.”
रवींद्रनाथांच्या भाषणांतून अनेकदा विचारांना चालना देणारी विधाने ओघानेच बाहेर पडतात. त्यांची प्रतिभा आणि आयुष्यभराचे चिंतन यांतून ती सहजत: उमलतात. उदाहरणार्थ, दुसऱ्या व्याख्यानात ते म्हणतात, “आजकाल अनेकांचा कशावरही विश्वास नसतो. मनात अविश्वास घेऊन चालणारी माणसे केवळ मतभेद निर्माण करू शकतात. इतिहासातील महान संस्कृतींची उभारणी अतिशय साध्या विचारांच्या, स्वतःमधील मूल कायम जपणाऱ्या, स्वप्नाळू माणसांकडून केली गेली. साशंक वृत्तीने सतत टीका करणारे टीकाकार काहीही निर्माण करू शकत नाहीत.” किती मोलाचे निरीक्षण आहे हे!
पुस्तकातील तिसरे व्याख्यान विद्यार्थ्यांना उद्देशून तर चौथे भाषण शिक्षकांना उद्देशून केलेले आहे. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या भाषणांची शीर्षके आहेत — ‘संस्कृती आणि प्रगती’, ‘सत्य’ आणि ‘निरोप घेताना’. ‘टागोरांच्या चीन भेटीवरील मत-मतांतरे’ हे शेवटचे प्रकरण सानिया कर्णिक यांनी स्वतः लिहिलेले आहे. त्यासाठी त्यांनी त्या काळातील खूप खटपट करून मिळवलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या चिनी वृत्तपत्रांचा आधार घेतलेला आहे. त्यातील बहुतेक भाग इंग्रजीतून नव्हे तर थेट चिनी भाषेतून अनुवादित केलेला असून तोही आवर्जून वाचावा असा आहे. या चीनभेटीत टागोरांवर बरीच टीकाही झाली आणि तिचे स्वरूप काय होते हेही या शेवटच्या प्रकरणात वाचायला मिळते.
या विरोधामागची कारणे स्पष्ट करताना प्रसिद्ध चिनी साहित्यिक माओ तुन ‘टागोरांकडून आमची अपेक्षा’ या शीर्षकाखालील १२ एप्रिल १९२४ रोजी लिहिलेल्या एका लेखात सांगतात, “दुर्बलांसाठी आणि शोषितांसाठी आवाज उठवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ देणाऱ्या, आणि भारतीय तरुणांना साम्राज्यवादी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी बळ देणाऱ्या देशप्रेमी टागोरांविषयी आम्हाला अतिशय आदर वाटतो. म्हणूनच आम्ही टागोरांचे स्वागत करतो. मात्र केवळ पौर्वात्य संस्कृतीची भलामण करणाऱ्या आणि कवितांच्या कल्पनारम्य जगात आमच्या तरुणांना गुंगवणाऱ्या टागोरांचे चीनमध्ये मुळीच स्वागत नाही. बाहेरील देशांकडून थोपवला गेलेला साम्राज्यवाद आणि देशांतर्गत लष्करशहांची युद्धखोरी व दडपशाही यांच्या कचाट्यात आजचा चीन सापडला आहे. यातून बाहेर पाडण्यासाठी सशस्त्र क्रांतीवाचून दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच तुम्ही आमच्या तरुणांना पौर्वात्य संस्कृतीच्या पोकळ बाता सांगून, त्यांना कवितांच्या कल्पनारम्य जगात रममाण राहायला शिकवू नका. टागोरांकडून आमच्या दोन अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा ही की, तुम्ही आमच्या तरुणांना कल्पनाविश्वातून बाहेर काढून सद्य:स्थितीचे भान द्या, ‘एकला चलो रे’चा नारा देऊन लढण्याचे बळ द्या. दुसरे म्हणजे, पश्चिमेच्या साम्राज्यवादाचा पाडाव करण्यासाठी त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे बळ फुंका.”
दुर्दैवाने माओ तुन यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत; टागोरांनी पौर्वात्य संस्कृतीचे गोडवे गाणे कमी केले नाही; किंबहुना त्यांच्या प्रत्येक भाषणाचा आशय तोच आहे. माओ तून लिहितात, “पौर्वात्य संस्कृती म्हणजे नेमके काय हे माझ्यासारख्याला अजूनही अजिबात कळलेले नाही. सुंदर शेते आणि कुरणे म्हणजे पौर्वात्य संस्कृती का? पौर्वात्य संस्कृतीची नेमकी व्याख्या मला चीनमधील कोणत्याही पुस्तकात सापडलेली नाही. टागोर किमान आपल्या भाषणांमध्ये त्याबद्दल स्पष्टपणे सांगतील अशी अपेक्षा होती, पण हाती केवळ निराशाच आली आहे. टागोरांची भाषणे म्हणजे अतिशय तर्कहीन अशा पोकळ बाता आहेत.” हे सारे वाचताना त्याचा संबंध आजच्या भारताशी आपण अपरिहार्यपणे जोडत राहतो आणि तसे करताना आपण सतत जिचे गुणगान गातो ती ‘भारतीय संस्कृती’ म्हणजे तरी नेमके काय आणि जगातील अन्य संस्कृतींपेक्षा ती कुठल्या प्रकारे वेगळी आहे असे प्रश्न आपली मनात येत राहतात; निदान माझ्या मानत तरी सतत येत होते.
टागोरांच्या ‘गीतांजली’मधील काही कवितांचे चिनी अनुवाद करून चिनी वाचकांना टागोरांच्या साहित्याची सर्वप्रथम ओळख करून देणारे प्रसिद्ध चिनी साहित्यिक आणि तेथील कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक छन तुशिऊ यांनीदेखील टागोरांच्या भाषणांवर अशीच जहाल टीका केली आहे. “वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीचा पश्चिमेच्या काही राष्ट्रांनी केलेला गैरवापर विज्ञान आणि भौतिकवादाला वाईट ठरवू शकत नाही. ज्यांच्याकडे अन्न, वस्त्र या किमान गरजांची ददात आहे त्यांना तुम्ही आध्यात्मिक शक्तीचे कसले डोस पाजता आहात?”
टागोर देत असलेल्या प्रेमाच्या संदेशावरही छन तुशिऊ यांनी कडक टीका केली आहे. ते लिहितात, “कन्फ्युशियस हजारो वर्षांपासून प्रेमाचा संदेश देतो आहे, येशू हजारो वर्षांपासून प्रेमाचा संदेश देतो आहे, मग तरीही आज जगात माणसे का मारली जात आहेत? व्यावहारिक दृष्टिकोनाचा अभाव असलेला हा संदेश अतिशय पोकळ आणि टाकाऊ आहे.”
छन तुशिऊ यांच्या मते टागोर करत असलेला जागतिक शांतीचा प्रचार म्हणजे चिनी तरुणांना साम्राज्यवादाविरोधात शरणागती पत्करायला सांगण्यासारखे होते. टागोरांच्या दोन महिन्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान त्यांनी टागोरांवर टीका करणारे तब्बल अकरा लेख लिहिले. ‘टागोरांचे मागास आणि रूढीवादी विचार आपल्याला शंभर वर्षे मागे घेऊन जाण्याचे काम करत आहेत’ असा आरोपही त्यांनी केला. टागोरांच्या भाषणासाठी जमलेल्या सात हजार विद्यार्थ्यांच्या जमावामध्ये ‘या म्हाताऱ्याला घरी परत पाठवा’ असे लिहिलेली पत्रके वाटण्यामध्येही त्यांचाच हात होता.
टागोरांना झालेल्या या प्रखर विरोधाचे एक कारण म्हणजे त्या काळात चीनमध्ये साम्राज्यवादाविरोधात प्रचंड आंदोलन सुरू होते. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर जो व्हर्सायचा करार झाला त्या करारान्वये जर्मनीच्या ताब्यात असलेला चीनचा शानतांग नावाचा एक संपूर्ण प्रांत चीनला परत न करता पाश्चात्त्य राष्ट्रांनी तो परस्पर जपानला देऊन टाकला! हपापाचा माल गपापा! त्यामुळे चीनमधील तरुणाई अगदी पेटून उठली होती. ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी ४ मे १९१९ रोजी बीजिंगमध्ये जोरदार निदर्शने झाली होती. या चळवळीला ‘मे फोर्थ मुव्हमेन्ट’ असे म्हणतात. आपण शक्य तितक्या लौकर समृद्ध आणि समर्थ बनले पाहिजे, पाश्चात्यांची दादागिरी सहन करता कामा नये, आणि त्यांना सडेतोड जबाब दिला पाहिजे हीच सर्वसामान्य चिनी माणसाची त्यावेळी मानसिकता होती.
टागोरांवर टीका करणारे एक पत्रक त्यावेळी चीनमध्ये वितरित झाले होते; त्या पत्रकात लिहिले होते,
“आम्ही जेव्हा आधुनिक संस्कृतीने केलेल्या प्रगतीकडे बघतो, तेव्हा आम्हाला अतिशय शरम वाटते. पूर्णपणे मानवी श्रमांवर आधारलेली शेती, यंत्रांच्या साहाय्याशिवाय हाताने केलेले उत्पादन, निकृष्ट दर्जाची वाहने, मागास मुद्रण व्यवस्था, खराब रस्ते आणि स्वच्छतेचा अभाव हे सारे आम्हाला बदलायचे आहे. आम्हाला आमच्या संस्कृतीचे आधुनिकीकरण करून प्रगती करायची आहे. म्हणून आम्ही टागोरांना विरोध करतो.”
तत्कालीन चिनी मानसिकता या पत्रकात चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित झालेली आहे. टागोरांचे पौर्वात्य संस्कृतीचा पुरस्कार करणारे तत्त्वज्ञान अशा वातावरणात लोकांना पटणे अशक्यच होते. यामुळेच बहुधा डॉ. अमर्त्य सेन यांनी ‘टागोर आणि चीन’ या आपल्या लेखात “टागोरांचा चीन दौरा ही एक शोकांतिका होती” असा निष्कर्ष काढला आहे.
खुद्द रवींद्रनाथांना आपण इथे अयशस्वी ठरलो आहोत याची जाणीव दौऱ्याच्या शेवटी शेवटी झाली होती. ‘निरोप घेताना’ या शेवटच्या, पुस्तकातील सातव्या भाषणाचा शेवट करताना त्यांनी म्हटले होते : “तुमच्यातील काही देशभक्तांना भीती वाटत होती की, तुमच्या संपत्ती आणि भौतिकवादावरील श्रद्धेला माझ्या भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानामुळे काही संसर्गजन्य आजार होईल. अशा सर्व चिंताग्रस्त लोकांना मी खात्री देतो की मी पूर्णपणे निरुपद्रवी आहे. मी एकाही साशंक व्यक्तीचे हृदयपरिवर्तन करू शकलो नाही. भौतिक शक्तीपेक्षा नैतिक सौंदर्याचे मूल्य अधिक आहे हे त्यांना पटवून देऊ शकलो नाही. त्यांच्या हे लक्षात येईल तेव्हा ते मला नक्कीच माफ करतील याची मला खात्री आहे.”
या भाषणांचा समावेश असलेले ‘Talks in China’ हे पुस्तक इंग्रजीत १९२५ साली प्रसिद्ध झाले, पण त्यानंतर आपल्या या चीनभेटीवर रवींद्रनाथांनी कुठेही काही लिहिलेले नाही.
पण मग प्रश्न असा निर्माण होतो की टागोरांची व्याख्याने अशी पौर्वात्य संस्कृतीचा पुरस्कार करणारी आणि त्याचवेळी पाश्चिमात्य संस्कृतीवर मात्र टीका करणारी का होती? याचा जरा खोलात जाऊन विचार केला तर या साऱ्याची एक व्यापक पार्श्वभूमी आपल्या लक्षात येते. टागोरांना १९१३ साली जेव्हा नोबेल पारितोषिक दिले गेले त्यावेळची युरोपातील परिस्थिती काय होती? युरोपातील अनेक राष्ट्रांत आपापसात युद्धे सुरू होती. सगळीकडे हिंसाचार माजला होता. महायुद्ध होणार याची चाहूल अगदी स्पष्ट दिसत होती. आत्यंतिक राष्ट्रवादाने लोक अतिशय संकुचित व आक्रमक वृत्तीचे झाले होते. वैज्ञानिक प्रगती सतत होत राहील आणि त्यातून माणसाचे सगळे प्रश्न मिटतील, माणूस सुखी बनेल हा आशावाद संपुष्टात आला होता. ही सतत चालणारी युद्धे आणि हिंसाचार यांच्यामुळे युरोपातील विचारवंतांना नैराश्येने ग्रासले होते. बुदधिनिष्ठ कारणमीमांसेला उतरती कळा लागली होती. त्या मानसिकतेत असलेल्या युरोपला टागोरांचा आध्यात्मिक संदेश आकर्षक वाटला. किती आकर्षक? याचे एक द्योतक म्हणजे नोबेल पुरस्कार निवड समितीसमोर त्यावेळी २६ जणांची नावे चर्चेत होती आणि त्यात थॉमस हार्डी यांच्यासारखे काही दिग्गज लेखकही होते, पण तरीही निवड समितीच्या पंधरा सदस्यांपैकी तेरा सदस्यांनी आपले मत रवींद्रनाथांना दिले होते. याचाच अर्थ बहुमत अगदी उघडपणे टागोरांच्या बाजूचे होते.
नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर टागोरांनी युरोपात अनेक व्याख्याने दिली. त्यावेळी पहिले महायुद्ध संपले होते. त्या महायुदधाने जगाच्या तोवरच्या इतिहासातील सर्वांत भयानक हिंसाचार पाहिला होता. दीड ते दोन कोटी लोक त्या महायुद्धात मरण पावले. घरटी एक माणूस दगावला होता. याची भयानकता आपण नीट समजून घेतली पाहिजे. आज आपण टीव्हीवर गाझा पट्टीतील किंवा इराणमधील किंवा युक्रेनमधील युद्धाच्या बातम्या जवळजवळ रोजच बघत असतो, बॉम्बस्फोट सतत होत असतात, पण त्या स्फोटांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या दहा-बारा-वीस अशीच असते. आत्ताच्या किंवा तत्कालीन मृतांच्या संख्येची तुलना मी करत नाही आहे, कृपया गैरसमज नसावा, कारण एकाही मृत्यूचे आपण समर्थन करू शकत नाही किंवा तो नगण्य मानू शकत नाही. पहिल्या महायुद्धातील मनुष्यसंहाराची भयानकता आपल्या लक्षात यावी एवढाच माझा इथे उद्देश आहे. या संहाराच्या पार्श्वभूमीवर युरोपियन समाजाला शांतीचे, प्रेमाचे आणि एकूणच भारतीय अध्यात्म व टागोरांच्या कवितेतील गुढवाद यांचे खूप आकर्षण वाटले. या पार्श्वभूमीवर टागोर यांनी आपली मते जेव्हा युरोपातील त्यांच्या भाषणांत मांडली तेव्हा त्यांना साहजिकच उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अमर्त्य सेन म्हणतात त्याप्रमाणे, “टागोरांच्या या भाषणांना या देशांमधून भरभरून दाद मिळाली. त्यामुळे टागोरांची ही मते अधिकच दृढ झाली.” या प्रतिसादाचे कारण टागोरांची ती मांडणी ही त्या वेळच्या पाश्चात्त्य श्रोत्यांची नेमकी भूक होती; त्यांना तेच ऐकायचे होते. चीन दौऱ्याच्या वेळी मात्र चिनी समाजाची मानसिकता याच्या नेमकी उलट होती आणि त्याचे भान कदाचित टागोरांना आले नसावे. भाषणाचा जुनाच सूर त्यांनी कायम ठेवला; जो आता त्यांच्या एकूण भाववृत्तीचा अविभाज्य भाग झाला होता. चिनी समाजाला मात्र त्यावेळी आध्यात्मिक विचारांचा वीट आला होता; त्यातून आपले दारिद्रय आणि दैन्य दूर झालेले नाही याची त्यांना जाणीव झाली होती. त्यांना ऐहिक प्रगतीची अपार आस होती; त्यांना विकसित राष्ट्र बनायचे होते; पाश्चिमात्य लोकांशी बरोबरी करायची होती; त्यासाठी त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान हवे होते. वेगवेगळी काळात वेगवेगळ्या देशांची गरज वेगवेगळी असते; एकच एक विचारसरणी सगळ्यांना सर्वकाळासाठी लागू पडत नाही हे एक तथ्य यातून समोर येते.
चीनबद्दलची बरीच माहिती हे पुस्तक वाचताना आपल्याला ओघानेच मिळते आणि त्यापासून आपण बरेच काही शिकण्यासारखे आहे हेदेखील लक्षात येते. उदाहरणार्थ, आपली भाषा लोकांना सुलभ वाटावी म्हणून चीन सरकारने राबवलेली काही लक्षणीय धोरणे. विकासाचा विचार करताना भाषा आणि लिपी यांचा विचारही महत्त्वाचा असतो. पूर्वी चिनी भाषेत लेखन करताना वापरली जाणारी अक्षरे खूप किचकट होती. १९४९ साली चीनमध्ये साम्यवादी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढवायचे नक्की केले आणि त्यासाठी उपयुक्त म्हणून पारंपरिक चिनी अक्षरे सोप्या लिपीत लिहिली जावीत असे ठरवले. एवढ्या प्रचंड देशात असा मूलभूत बदल करणे महाकठीण होते; पण चिनी सरकारने जिद्दीने ते करून दाखवले. अशावेळी आपण साधे मराठी व्याकरणाचे नियमही कालसुसंगत करू शकलेलो नाही हे आठवते आणि त्याची खूप खंत वाटते. १९५६ साली ‘सिंप्लिफाईड स्क्रिप्ट’ म्हणून ओळखली जाणारी ही नवी चिनी लिपी वापरायला प्रारंभ झाला. आज संपूर्ण चीन देशात तीच एक लिपी वापरली जाते. हाँगकाँग, मकाउ आणि तैवान या जगातील अन्य तीन चिनीभाषक देशांत मात्र अजून पारंपरिक (traditional) चिनी लिपीच वापरली जाते.
साम्यवादी क्रांतीनंतर चीन सरकारची धोरणे काळानुरूप बदलत गेली आणि त्यासाठी आवश्यक असलेली लवचीकता सरकारने अनेकवेळा दाखवली आहे. एकेकाळी कल्चरल रिव्होल्युशनच्या नावाखाली जुन्या परंपरांची आणि वस्तूंची मोडतोड करणारा चीन देश आज मात्र आपल्या त्याच प्राचीन संस्कृतीचा जगभरातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी सॉफ्ट पॉवर म्हणून उपयोग करत आहे. एकदा एखादे धोरण राबवायचे ठरवल्यानंतर त्याची व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करण्याचे चीनचे सामर्थ्य केवळ अचाट म्हणावे लागेल. उदाहरणार्थ, एकेकाळी जो कन्फ्युशियस सरकारने कालबाह्य आणि जुनाट संस्कृतीचे प्रतीक म्हणून घोषित केला होता तोच पुढे त्यांनी आपल्या देशाचा मानबिंदू बनवला. त्याच कन्फ्युशियसच्या नावाने चिनी भाषेच्या अध्ययनासाठी चीन सरकारने आज १५० देशांमध्ये तब्बल पाचशेहून अधिक कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट्स स्थापन केल्या आहेत! संस्था स्थापन करायचे हे प्रमाण किंवा स्केलदेखील थक्क करणारे आहे.
रवींद्रनाथांनी त्यांच्यासोबत या दौऱ्यात काय तोलामोलाची माणसे घेतली होती तेही नोंद करण्याजोगे आहे कारण त्यातून या दौऱ्याचे त्यांना किती महत्त्व वाटत होते ते स्पष्ट होते. त्यातील एक होते क्षितिमोहन सेन — शांतिनिकेतनमधील इंडोलॉजीचे प्राध्यापक आणि नोबेलविजेते अमर्त्य सेन यांचे आजोबा. बंगाली, हिंदी, इंग्रजी, गुजराती, अरबी, फारसी भाषा त्यांना अवगत होत्या आणि वेदांचे व उपनिषदांचे त्यांनी सखोल अध्ययन केले होते. दुसरे एक होते नंदलाल बोस — विख्यात चित्रकार आणि शांतिनिकेतनमधील कलाभवनचे प्रमुख. मिठावरील कराराच्या विरोधात १९३० साली केलेल्या सत्याग्रहात गांधीजी हातात काठी घेऊन चालले आहेत ही प्रतिमा त्यांच्या एकूणच अहिंसक क्रांतीचे प्रतीक मानली जाते व ते मूळ चित्र बोस यांनीच काढले होते. पुढे त्यांनीच भारतीय संविधानाच्या हस्तलिखितासाठी रेखाचित्रे काढण्याचे काम केले आणि त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितही केले गेले होते. असेच आणखी एक गृहस्थ म्हणजे एल. के. एल्महर्स्ट – विख्यात ब्रिटिश कृषितज्ज्ञ आणि श्रीनिकेतन या ग्रामीण पुनर्रचनेसाठी रवींद्रनाथांनी स्थापन केलेल्या संस्थेचे संचालक. रवींद्रनाथांबरोबरचे इतरही सर्व सहप्रवासी असेच नामांकित होते आणि तरीही त्यांनी या चीन दौऱ्यासाठी आयुष्यातले पन्नास मौल्यवान दिवस दिले. जीवनाच्या एखाद्या क्षेत्रात या तोलामोलाची सहकारी लाभणे आणि त्यांनी एखाद्या उपक्रमासाठी सलग पन्नास दिवस आपला पूर्ण वेळ देणे आज किती दुर्मीळ आहे असा विचार हे वाचताना मनात येतो.
चीन दौऱ्यात आलेल्या कटू अनुभवानंतरही चीनबद्दलचे प्रेम मात्र टागोरांच्या मनात कायम राहिले. विश्वभारतीत १९३७ साली टागोरांनी ‘चिना भवन’ची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी थान युनशान या चिनी भाषा तज्ञांचा सहभाग मिळवला. चिनी भाषेच्या आणि संस्कृतीच्या अध्ययनाचे ते भारतातील पहिले केंद्र आहे. पुस्तकाचा शेवट करताना लेखिका लिहिते, “भारत आणि चीन या दोन प्राचीन संस्कृतींनी एकत्र येऊन जगाचे नेतृत्व केले पाहिजे, ही संकल्पना मांडणारे टागोर सर्वांत पहिल्या भारतीय विद्वानांपैकी एक होते. काही अर्थाने वादग्रस्त ठरली असली, तरी भारत आणि चीन यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी संवादाचा मार्ग खुला करणारी ही चीनभेट ऐतिहासिकदृष्ट्या नक्कीच महत्त्वाची आहे.”
पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या विस्तृत टीपा आणि संदर्भसूची यांच्यावरून अनुवादिकेने घेतलेल्या परिश्रमांची आपल्याला कल्पना येते. भाषांतर करताना आलेल्या अडचणीही आपल्या मनोगतात लेखिकेने प्रांजळपणे मांडल्या आहेत. त्या म्हणतात, “मराठी माझी मातृभाषा आहे, दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालेले आहे आणि मराठीत लेखन करण्याची मला आवड आहे. असे असूनही अनेकदा मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये काही वाक्ये किंवा शब्द वापरणे किती सोपे आहे असे वाटून गेले. उदाहरणार्थ, इंग्रजी भाषणांत ‘सोल’ आणि ‘स्पिरिट’ हे शब्द तीस ते चाळीस वेळा आले आहेत. इंग्रजीमध्ये ते अतिशय तरल, काव्यात्मक, सकारात्मक वाटत असले तरी मराठीतील त्यांचा प्रतिशब्द ‘आत्मा’ हा काहीसा गंभीर आणि गूढ वाटतो. त्यामुळे मी भाषांतर करताना आत्माच्या जोडीने अनेक ठिकाणी हृदय, मन, अंत:करण, वृत्ती, भावना असे शब्द वापरले. मटेरियल पॉवर आणि मटेरियलिझम हे शब्ददेखील पुस्तकामध्ये पन्नासहून अधिक वेळा आलेले आहेत. शब्दांच्या पुनरुक्तीने लेखाची शोभा जाऊ नये यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.”
हे पुस्तक जेवढे सांगते त्यापेक्षा कितीतरी अधिक कुतूहल ते तुमच्या मनात जागे करते. चांगल्या पुस्तकाचा हा मोठा विशेष मानला जातो. या महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल लेखिकेचे कौतुक करायला हवे यात शंका नाही; पण त्याचवेळी त्यांच्याकडून निदान माझ्यातरी अधिक अपेक्षा आहेत. त्यांना चिनी भाषा अवगत आहे आणि त्यांचे वास्तव्य चीनमध्येच आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी आजच्या चीनबद्दल अधिक लेखन करायला हवे. या पुस्तकाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले त्या सतीश बागल यांनी चीनबद्दल एक महत्त्वाचे पुस्तक लिहिले आहे. अॅप लॅब या इलेक्ट्रॉनिक कंपनीचे संस्थापक प्रभाकर देवधर यांनी भारत व चीन यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून जवळजवळ पन्नास वर्षे अथक परिश्रम घेतले होते. त्यांनी त्यासाठी औद्योगिक सहकार्य वाढवणारी एक संस्थाही काढली होती. त्यांचे ‘सिनास्थान’ हे चीनबद्दलचे पुस्तक मराठी आणि इंग्रजीतही गाजलेले आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनीही त्यांच्या भाषणांत भारतीयांनी चीनचा अधिक सखोल अभ्यास करायची गरज अनेकदा अधोरेखित केली आहे. गेल्या पन्नास वर्षांत चीनने विकासाच्या वाटेवर जी गरुडभरारी घेतली आहे तिची रहस्ये काय आहेत याविषयीचे लेखिकेचे विश्लेषण खूप महत्त्वाचे असेल. त्यातून समकालीन चीनच्या सखोल अभ्यासाला गती मिळावी असेही वाटते. भारत आणि चीन हे दोन्ही खंडप्राय देश जगात सर्वाधिक लोकवस्तीचे आहेत. दोघांनाही पाच हजार वर्षांची संस्कृती लाभलेली आहे. आपापल्या परीने दोन्ही महासत्ता आहेत. आपण शेजारी राष्ट्रेही आहोत. आपल्यात अधिक साहचर्य असणे ही काळाची गरज आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या टागोर यांच्या चीन भेटीत जे घडले त्याचे दस्तावेजीकरण कमी महत्त्वाचे नाही, पण आजचे वास्तव अधिक महत्त्वाचे आहे. भूतकाळात रमणे नको; भविष्य अधिक महत्त्वाचे. रवींद्रनाथांनी शंभर वर्षांपूर्वी सुरू केलेली ही भारत-चीन संवादाची वाट आता अधिकाधिक रूंद व्हायला हवी.

