ज्ञानपीठ पुरस्कार लेख ७

महादेवी वर्मा : विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रभावशाली हिंदी लेखिका

१९८१ मध्ये अमृता प्रीतम यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारानंतर पुढल्याच वर्षी तो सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिका महादेवी वर्मा यांना मिळावा ही गोष्ट दोन कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते : एक म्हणजे स्त्रीलेखिकांना हा पुरस्कार लागोपाठ दोन वर्षी मिळणे आणि दुसरे म्हणजे  अमृता प्रीतम यांनीदेखील हिंदीमध्ये विपुल प्रमाणात लिहिले आहे. 

हिंदी भाषा : इतिहास, वर्तमान, साहित्य आणि साहित्यिक 

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून शाळांमध्ये हिंदीचे शिक्षण अनिवार्य असावे की नाही हा विवादाचा मुद्दा बनलेली हिंदी भाषा जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील जवळपास ६०% लोकांना हिंदी समजते. १० राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांची अधिकृत भाषा असलेली हिंदी वा तिची बोली भारताबाहेर फिजी, मॉरिशस, गयाना, सुरीनाम, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये मोठ्या संख्येने बोलली जाते. हिंदीच्या अनेक बोलीभाषा आहेत – अवधी, ब्रजभाषा, भोजपुरी, राजस्थानी, बुंदेली वगैरे.

वैदिक -> संस्कृत -> प्राकृत -> अपभ्रंश ते हिंदी अशी शृंखला असलेली ती एक प्राचीन भाषा आहे. सातव्या शतकात ‘अपभ्रंश’ अवस्थेपासून ‘दोहे’ स्वरूपात पद्यरचनेला आरंभ झाला. आठव्या शतकापासून हिंदी साहित्याचा आरंभ मानला जातो. त्यामध्ये बौद्ध, जैनधर्मी, रामायण, अब्दुर्रहमानचे ‘संदेशरासक’ अशा रचना झाल्या. अकराव्या शतकापर्यंत जुन्या हिंदीचा विकास होत राहिला. 

‘आदिकाल’(११ वे ते १४ वे शतक) यांमध्ये राजपूत राजांच्या भाटांनी रचलेल्या वीरगाथा ‘रासो’ म्हणून ओळखल्या जातात. ‘मैथिलकोकिळ’ विद्यापती आणि अमीर खुस्रो याच काळातले. 

‘भक्तिकाल’(१४ वे ते १६ वे शतक) : निर्गुण आणि सगुण अशा दोन शाखांमध्ये भक्तिकाव्ये रचली गेली. रामानंद, वल्लभाचार्य, कबीर, तुलसीदास आणि जायसी हे या काळातले प्रमुख कवी. 

१८ व्या आणि १९ व्या शतकाला ‘रीतिकाल’ असे संबोधले जाते. यामध्ये संस्कृत साहित्यापासून प्रेरणा घेऊन रस, अलंकारयुक्त रीतिकाव्यांची निर्मिती झाली. यांचा आरंभ करणारे कवी ‘केशवदास.’ स्त्री-पुरुष प्रेम आणि सौंदर्याची अभिव्यक्ती करणारे बरेचसे मुक्तच्छंदातले; मात्र काही वृत्तबद्धदेखील – असे हे काव्य उत्तरोत्तर अधिक यांत्रिक होत त्यातील भाव कमी झाला.

विसाव्या शतकाच्या आरंभापासून ‘आधुनिक काला’ला सुरुवात झाली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांच्या जुलमी सत्तेला विरोध, नवीन शिक्षणपद्धती, सामाजिक सुधारणांचे प्रयत्न, वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अंगीकार  हे साहित्यातून उमटू लागले. विसाव्या शतकातील दोन प्रमुख घटना म्हणजे सामान्य काव्यभाषेसाठी ‘खडी बोली’चा स्वीकार आणि हिंदी गद्याचे प्रमाणीकरण. ’सरस्वती’ मासिकाचे संपादक, अनुवादक आणि समीक्षक महावीरप्रसाद द्विवेदी यांचे यात मोठे योगदान राहिले. खडीबोलीमध्ये काव्य करणारे मैथिलीशरण गुप्त, श्रीधर पाठक आणि ब्रज भाषेत लिहिणारे रत्नाकर आणि सत्यनारायण कविरत्न याच काळातले.

१९२० ते ४० च्या दरम्यान आधुनिक साहित्यांतर्गत विचार आणि कलात्मकतेला चालना मिळाली. गरीब आणि मध्यमवर्गाचे वास्तव चित्रण करणाऱ्या कथा आणि कादंबऱ्या लिहिणाऱ्यांत आघाडीवर होते मुन्शी प्रेमचंद. हिंदी साहित्यात त्यांचे स्थान असाधारण आहे. त्यांनी हिंदी आणि उर्दू अशा दोन्ही भाषांमध्ये लिखाण केले. (वास्तविक पाहता हिंदी आणि उर्दू ही दोन्ही हिंदुस्तानीचीच दोन रूपे आहेत. त्यांचे व्याकरण एकच आहे. हिंदीत संस्कृतोद्भव शब्द अधिक प्रमाणात, तर उर्दूमध्ये अरबी- फारसी शब्दांचा वापर अधिक.) याच काळात वृंदावनलाल वर्मा हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून, जयशंकर प्रसाद नाटककार म्हणून; तर रामचंद्र शुक्ल, हजारीप्रसाद द्विवेदी हे समीक्षक म्हणून आघाडीवर होते.

काव्याच्या क्षेत्रात या काळात ‘छायावाद’ पुढे आला. या आधीचे काव्य वास्तवाधारित होते, तर ‘छायावादी’ काव्य भावनिष्ठ. व्यक्तिगत भावनांचा कलात्मक आविष्कार त्यात आहे. निसर्गसौंदर्य, काव्यमाधुर्य हे त्याचे विशेष. जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला,’ सुमित्रानंदन पंत – (हिंदी साहित्यासाठीचे प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते) आणि महादेवी वर्मा हे छायावादाचे चार ‘स्तंभ’ मानले जातात.

१९४० नंतर छायावादाच्या विरोधात ‘प्रगतिवादा’ने डोके वर काढले. यात साहित्याचा वापर सामाजिक क्रांतीचे अस्त्र म्हणून करण्यात आला. यामध्ये साहित्याच्या सामाजिक बांधिलकीवर भर; तर कलात्मकता काहीशा कमी प्रमाणात होती. यशपाल, उपेंद्रनाथ अश्क, अमृतलाल नागर हे महत्त्वाचे कथाकार; तर केदारनाथ अग्रवाल, रांगेय राघव हे कवी. मात्र थोड्याच काळात ‘प्रयोगवादी’ साहित्यातून मनोविश्लेषणात्मक, व्यक्तिवादी साहित्याचा उदय झाला. यातूनच नवकाव्य आणि नवकथा पुढे आली. 

गेल्या शंभर वर्षांत हिंदी साहित्यात अनेक लेखकांनी आपला ठसा उमटवला. सामाजिक वास्तव, मानवी मनाचा शोध, भाषेचे नवे प्रवाह, नाट्य-कादंबरी-कथा-कवितेतले प्रयोग यांतून आधुनिक हिंदी साहित्य आकाराला आले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांमधील रामधारी सिंह ‘दिनकर’ यांनी राष्ट्रभावना, इतिहासदृष्टी आणि ओजस्वी शैलीचा संगम घडवला. ‘अज्ञेय’ यांनी प्रयोगवाद, नवी काव्यभाषा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांची चौकट उभी केली. नरेश मेहता यांनी कथा, कादंबरी, काव्य, नाटक, समीक्षा, अनुवाद असे विविधांगी लेखन केले. एक क्रियाशील कार्यकर्ता असणारे निर्मल वर्मा यांनी कथा, कादंबरी, अनुवाद, प्रवास वर्णन, निबंध असे लेखन केले. ‘नई कहानी’च्या प्रवर्तकांपैकी ते एक होते. नवकवितेचे प्रणेते कंवर नारायण यांनी कवितेसोबतच महाकाव्ये, लघुकथा, समीक्षात्मक लेखन आणि अनुवाद केले. अमरकांत हे प्रेमचंद परंपरेतील कथा-कादंबरीकार आणि पत्रकार होते. प्रतिष्ठेचा ‘व्यास सम्मान’देखील त्यांना प्राप्त झाला. त्यांच्या प्रमाणेच ‘व्यास सम्मान’ प्राप्त करणारे केदारनाथ सिंग हे कवी, समीक्षक, निबंधकार होते. ‘बाघ’ हे त्यांचे दीर्घ काव्य प्रसिद्ध आहे. २०२४ साठीचे विजेते विनोद कुमार शुक्ल हे कथा, कादंबरी, बालसाहित्य आणि काव्यलेखक. ते ‘Magical realism’ साठी ओळखले जातात. प्रसिद्ध हिंदी लेखक गजानन मुक्तिबोध यांचा त्यांच्या साहित्यावर प्रभाव आहे. २०२३ मध्ये त्यांना अत्यंत महत्त्वाचे “PEN/Nabokov Award’  मिळाले.

याशिवाय अनेक उत्कृष्ट साहित्यिक हिंदीमध्ये होऊन गेले आहेत. ‘मधुशाला’चे कवी हरिवंशराय बच्चन, कथा, कादंबरीकार फणीश्वरनाथ रेणू (त्यांच्या ‘मारे गये गुलफाम’ कथेवर ‘तीसरी कसम’ चित्रपट बनला होता), ‘गुनाहों का देवता’ ही कादंबरी आणि ‘अंधा युग’ या नाटकासाठी प्रसिद्ध धर्मवीर भारती, व्यंगात्मक लिखाणातून राजकारण, भ्रष्टाचार, ढोंगी नैतिकता यांवर प्रहार करणारे श्रीलाल शुक्ल (‘राग दरबारी’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक), ‘नयी कहानी’तील प्रमुख कमलेश्वर, मोहन राकेश, राजेंद्र यादव आणि भीष्म साहनी, अगदी अलीकडच्या काळात ‘International Booker Award’ ने सन्मानित गीतांजली श्री अशी अनेक नावे सांगता येतील.

अभिजाततेचे सर्व गुण असणाऱ्या या हिंदी भाषेने तो ‘शिक्का’ मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे मात्र ऐकिवात नाही!

महादेवी वर्मा : स्त्रीवादी कृतिशील लेखिका 

हिंदी भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या महादेवी वर्मा या पहिल्याच स्त्री लेखिका. (त्यांच्यानंतर कृष्णा सोबती या कथा, कादंबरी, व्यक्तिचित्र असे विविध प्रकारचे लेखन करणाऱ्या लेखिकेला या पुरस्कारासाठी ३५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली.)

महादेवी वर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे२६  मार्च १९०७ ला झाला. त्यांचे वडील प्राध्यापक होते. इंदूरला प्राथमिक शिक्षण झाल्यावर अलाहाबाद येथील क्रॉस्थवेट गर्ल्स कॉलेजमध्ये त्या माध्यमिक शिक्षण घेऊ लागल्या. कवितेची आवड पहिल्यापासून होती, पण कोणाला कळणार नाही अशा प्रकारे गुपचूप लिहीत. नंतरच्या काळात ख्याती पावलेल्या सुभद्रा कुमारी चौहान त्यांच्या सिनिअर आणि रूम पार्टनर होत्या. त्यांच्या नजरेस महादेवींच्या कवितांचे बाड आल्यावर त्या दोघी एकत्र बसून नियमितपणे कविता लिहू लागल्या. सुभद्राकुमारीच्या प्रभावाखाली  त्या ‘खडी बोली’मध्ये लिहू लागल्या. मात्र त्यांच्या मूळ ‘ब्रजभाषा’ प्रवृत्तीला अनुसरून त्यांनी आपल्या काव्यात कोमल शब्दांचा अधिक वापर केला. त्या दोघींच्या कविता मासिकांमध्ये छापून येऊ लागल्या.

तत्कालीन प्रथेप्रमाणे महादेवींचा विवाह वयाच्या नवव्या वर्षीच लावला गेला. मात्र नंतरच्या काळात डॉक्टर झालेल्या आपल्या पतीसोबत  त्या कधीच राहिल्या नाहीत. त्या आयुष्यभर एकट्याच राहिल्या. बौद्ध जोगीण बनण्याचा विचार काही काळ त्यांच्या मनात होता. त्यांनी पाली आणि प्राकृत भाषांचा अभ्यास करून बौद्धसाहित्य वाचले. त्या मीराबाईच्या भक्त होत्या. ‘आधुनिक मीरा’ असे त्यांना संबोधले जाई.

संस्कृत मध्ये एम.ए. झाल्यावर त्यांनी शिक्षिका म्हणून प्रारंभ केला. नंतर त्या प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्य आणि कुलगुरू झाल्या. ‘नीहार’ हा त्यांचा काव्यसंग्रह १९३० मध्ये प्रसिद्ध झाला. ‘रश्मि,’ ‘नीरजा,’ ‘सांध्यगीत’ हे पुढील काही वर्षांत आल्यानंतर १९३९ मध्ये एकत्रित स्वरूपात ‘यामा’ या नावाने आले. मध्यांतरीच्या काळात १९३७ मध्ये महादेवींनी उत्तराखंडामधील उमागढ या गावात आपले घर बांधले. काही काळ तेथे स्त्रीशिक्षण आणि स्वयंपूर्णता यांसाठी कामही केले. त्यांच्या निधनानंतर त्या घराचे रूपांतर ‘महादेवी साहित्य संग्रहालय’ असे करण्यात आले.

लेखनासोबत संपादन क्षेत्रातही त्यांना रस होता. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ‘चांद’ या स्त्रियांसाठीच्या लोकप्रिय मासिकाचे संपादन केले होते. १९५५ मध्ये त्यांनी ‘साहित्य संसद’ स्थापन केली. तिच्या मुखपत्राचे संपादन त्याच करत. यातूनच स्त्रियांच्या कविसंमेलनांना प्रारंभ झाला.

आठ कवितासंग्रहांखेरीज महादेवी वर्मा यांनी व्यक्तिचित्रण, आत्मकथनपर, निबंध आणि कथालेखन केले. ‘मेरा परिवार,’ ‘स्मृति की रेखाएं’ ही त्यांतली काही पुस्तके. ‘शृंखला की कडियां’ पुस्तकात त्यांनी महिलांचे हक्क आणि स्त्रीशिक्षण या विषयांवर आपले परखड विचार मांडले आहेत.

‘अतीत के चलचित्र’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकांतील ११ लेख वयाच्या २३ ते ३२ व्या वर्षी लिहिलेले आहेत. पुढील ५० वर्षांत त्याच्या १८ आवृत्ती निघाल्या होत्या. त्यातील पहिल्या प्रकरणातली आठवण घरी आईच्या मदतीसाठी असलेल्या ‘रामा’ची आहे. लेखिकेच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून पुढली कित्येक वर्षे तो त्यांच्या घरी होता. त्या सहवासाच्या आठवणी नर्म विनोदाच्या शिडकाव्यात, पण हृद्यपणे सादर केल्या आहेत. आणखी एक कहाणी एका बालविधवेची आहे. कुणा पुरुषाच्या वासनेला बळी पडून ती एका मुलाला जन्म देते. तिचे सर्व नातेवाईक त्या मुलाला मारून टाकायचे ठरवतात. निर्वाणीचा उपाय म्हणून ती मुलगी आपल्या आजोबांकरवी लेखिकेला बोलावून घेते व स्वतःला तिची मुलगी म्हणून स्वीकारण्याची गळ घालते. अशा परिस्थितीत जेमतेम २७ वर्षांच्या लेखिकेला तिची विनंती मान्य करण्यावाचून दुसरा कोठला पर्याय शिल्लकच राहिला नाही. लेखिकेने व्यक्तिचित्रे इतकी तपशीलवार रंगवली आहेत, की ती पात्रे आपल्या डोळ्यांसमोर सजीव होऊन उभी राहतात. कॉलेजच्या प्राचार्या आणि मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षक असतानाच्या ६-७ वर्षांतील यातील काही अनुभव आहेत.

महादेवी वर्मा यांना छायावादी कवितांच्या चार स्तंभांपैकी सर्वात महत्त्वाचा स्तंभ मानले जाते. त्यांच्या काव्यात आत्मा – परमात्मा यांचे मिलन – विरह, गूढवाद आणि निसर्गप्रेम यांवर भर आहे. त्यांना ‘वेदना आणि करुणा’ यांची कवयित्री म्हटले जाई. त्यांच्या लिखाणातून व्यक्तिगत वेदनेऐवजी दृढनिश्चय आणि समाजपरिवर्तन यांवर भर दिसतो. ‘स्त्री का पत्नीत्व’ या लेखातून त्यांनी पारंपरिक विवाह संस्थेची तुलना सामाजिक पराधीनतेशी केली. राजकीय वा आर्थिक पाठबळाअभावी विवाहित स्त्रियांची भूमिका केवळ ‘चूल आणि मूल’ एवढीच उरते  असे त्यांनी म्हटले आहे. 

आपली स्त्रीवादी दृष्टी विकसित करण्यासाठी त्यांनी एकीकडे भारतातील समाजसुधारक पुरुष आणि स्त्रिया, पाश्चात्त्य महिला मताधिकारवादी आणि महात्मा गांधी यांचे लिखाण, तर त्याचसोबत प्राचीन हिंदू आणि बौद्ध धार्मिक साहित्याचा आधार घेतला.

महादेवी वर्मांचे मुलांसाठीच्या कवितांचे दोन संग्रह आहेत : ‘ठाकुरजी भोले हैं’ आणि ‘आज खरीदेंगे हम ज्वाला.’ 

१९४३ च्या बंगालमधील दुष्काळानंतर त्यांनी ‘बंगभू शांत वंदना’ ही कविता लिहिली होती. चिनी आक्रमणाच्या वेळेस राष्ट्रभक्तीपर ‘हिमालय’ या काव्यसंग्रहातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

त्यांच्या काव्यप्रतिभेचा एक नमुना  :

 मैं नीर भरी दु:ख की बदली!

स्पंदन में चिर निस्पंद बसा;

क्रंदन में आहत विश्व हँसा,

नयनों में दीपक-से जलते

पलकों में निर्झरिणी मचली!

मेरा पग-पग संगीत-भरा,

श्वासों से स्वप्न-पराग झरा,

नभ के नव रँग बुनते दुकूल,

छाया में मलय-बयार पली!

मैं क्षितिज-भृकुटि पर घिर धूमिल,

चिंता का भार, बनी अविरल,

रज-कण पर जल-कण हो बरसी

नवजीवन-अंकुर बन निकली!

१९८२ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या हस्ते स्वीकारण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्याआधी १९७९ मध्ये त्या साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित झाल्या होत्या. साहित्यक्षेत्रातील अनेक पुरस्कार आणि सन्मान त्यांच्या वाट्याला आले. प्रसिद्ध दिग्दर्शक मृणाल सेन यांनी त्यांच्या आत्मकथनावर आधारित ‘नील आकाशेर नीचे’ हा बंगाली चित्रपट १९७९ मध्ये बनवला. 

ज्या शहरात त्यांचे बरेचसे आयुष्य व्यतीत झाले, त्या अलाहाबाद मध्येच ११ सप्टेंबर १९८७ रोजी महादेवी वर्मांचे निधन झाले… मृत्युपश्चात पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. १९९१मध्ये भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक विशेष तिकीट जारी केले.

केवळ पुस्तकी विचारातून नव्हे, तर व्यक्तिगत अनुभवातून उलगडणाऱ्या स्त्रीवादासाठी महादेवी वर्मा चिरकाल स्मरणात राहतील.  

Author

One thought on “ज्ञानपीठ पुरस्कार लेख ७

  1. महादेवी वर्माची खूप सुंदर ओळख करून दिली आहे.

Leave a Reply