‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’      

प्रत्येक कलेला इतिहास असतो. युरोपीय ललितकलेला – म्हणजे लघुकथा, नाटक, कादंबरी वगैरे कलाकृतींनासुद्धा इतिहास आहे. हा नुसता साहित्याचा इतिहास नसून सांस्कृतिक, सामाजिक  -राजकीय, असे अनेक पदर त्याला असतात.‘हंगर आर्टिस्ट’ ही काफ्काची महत्त्वाची कथा; कारण ‘माझे सगळे साहित्य जाळून टाक पण काही कथा जाळू नको’ असे काफ्काने त्याचा मित्र मॅक्स ब्रॉडला सांगितले होते. ललितकृतीतील ‘हंगर आर्टिस्ट’ ही एक  ही मोठी विदारक कथा आहे; पण ‘ती जाळू नको’ असे काफ्काने का सांगितले? या बाबत धांडोळा घेतला. फारसे काही हाताला लागले नाही. तेव्हा स्वत:च विचार करून उत्तर शोधावे – याचे उत्तर युरोपियन इतिहासाच्या ‘इन बिट्वीन लाईन्स’मध्ये दडलेले असावे, अशी मला दाट शंका आली.                                                                                                                                     

युरोपियन इतिहासाचा गर्भितार्थ शोधायचा असेल तर J H Huizinga (१८७२—१९४५) या डच  इतिहासकाराकडे गेले पाहिजे;  म्हणून त्यांचे The Waning of the Middle Ages हे पुस्तक काढले.  मी बऱ्याच रेघा मारल्या होत्या, काही समास नोंदी केल्या होत्या.. मला ‘हंगर आर्टिस्ट’ या कथेचा छडा लागत होता.                               

मध्ययुगीन मानसिकता                                                                                                                         

काफ्का – १८८३ – १९२४,  हा त्याचा कालखंड. फ्रांझ काफ्काच्या  जन्माआधी चारशे-साडेचारशे वर्षे युरोपातील मध्ययुग सरण्याचा काल. हा काळ या विवेचानासाठी महत्त्वाचा.  हळूहळू युरोपीय प्रबोधन युगाची सुरुवात मध्ययुग सरण्यापासून होते.  या कालखंडात युरोपची काय स्थिती होती हे वाचल्यावर ट्यूब पेटू लागली; कारण आपल्याला फक्त आजचा कंडक्टेड टूरमधील नीटनेटका युरोप माहीत असतो. १४३० च्या सुमारास युरोपात साक्षरतेचा दर फक्त दहा टक्के होता; म्हणजे नव्वद टक्के लोकांना लिहिता वाचता येत नव्हते. फक्त ऐकणे, बघणे आणि बोलणे  एवढेच सामान्य युरोपियन करू शकत असे. सामान्य युरोपियन निरक्षर होता. दहा टक्के साक्षर लोक म्हणजे – धर्मगुरू आणि राजघराण्यातील तसेच दरबारी लोक. काही कवी वगैरेपण होते. अशा काळात ‘सांगितलेल्या’ शब्दाचा आवाज मोठा असतो. ख्रिश्चन धर्माच्या निरनिराळ्या पंथांतील धर्मगुरू प्रवचने करत. सार्वजनिक  प्रवचनाला राजाची परवानगी लागे. बुद्धीला खाद्य न मिळालेल्या, भावनेवर चढलेल्या भाविकांच्या झुंडी तासन्‌तास ‘बोललेला’ शब्द कानावर झेलत. बाया,बापडे,लहानथोर, ओक्साबोक्शी रडत. धर्मगुरूचा स्पर्श व्हावा म्हणून लोक धडपडत. धार्मिक उन्मादी मिरवणुका चालू असत. गावात कोणाला शिक्षा होणार असेल तर झुंडी उत्साहाने हजर असत. ‘सेंट जॉन्स डे’ वेळी पिंजऱ्यात काळ्या मांजरांना ठेवून बाजूने शेकोटी पेटवून देत  असत. मांजरे  पिंजऱ्यातून सुटण्याची धडपड करत आणि होरपळून मरत. 

हे बघण्यास झुंडीने आलेले लोक गाणे बजावणे, नाचणे आणि दारू पिऊन  उत्सव साजरा करत. तर्कबुद्धीला फाटा देऊन, भावना, उल्हास, ‘स्पिरिच्युअल’ चढउतार यांनी भारलेला, तो हिंसक कार्यकाळ होता.Eustache Deschamps (१३४६-१४०६) या फ्रेंच कवीने या युगाचे ‘निराशा आणि खिन्नतेचे युग’ असे वर्णन त्याच्या कवितांमधून केले आहे.                                                                   

    निरक्षर युरोपियन समाजात चित्रबोलीला खूप महत्त्व होते. मध्ययुगीन ख्रिश्चनचित्रकला हे आदिम आणि विकसित होऊ पाहत असलेल्या चित्रकलेचे  चमत्कारिक मिश्रण होते. धर्मसत्तेच्या फतव्यानुसार चर्चच्या भिंती बायबल-कथा आणि येशूख्रिस्ताच्या जीवन-प्रसंगांनी भरून गेल्या होत्या. निरक्षर भाविकांना बायबल कळावे म्हणून हा उपक्रम होता. भाविक झुंडी प्रतिमांमध्ये विचार करतात. त्यामुळे ही चित्रे प्रभावी ठरत होती.                                                                                                                   Francois Villon (१४३१-१४६३ नंतर) या फ्रेंच कवीने त्याच्या आईवर केलेली  कविता बोलकी आहे :

‘गरीब, म्हातारी माझी आई|

 अज्ञानी ती, वाचता न येई| 

गावातल्या चर्चमध्ये चित्र बघायला जाई| 

स्वर्गाच्या रंगीत चित्राने आनंदी होई|

नरकातले उकळते आत्मे मात्र भीतिदायी||                                                                                                                     

पुढे युरोपियन प्रबोधन युग येऊ घातले होते. समाज-सांस्कृतिक उत्क्रांतीचा आरंभ झाला होता.                                                                                                                                              

सांस्कृतिक आणि जैविक उत्क्रांती   –                                                                                                            

मानवाच्या सांस्कृतिक तसेच जैविक अशा दोन उत्क्रांती होत असतात. या दोन उत्क्रांतींत काही साम्ये आहेत :                                                                                  जैविक उत्क्रांतीतील सोपे उदाहरण घेऊ : अमिबा  हा एकपेशीय प्राणी. अमिबा हालचाल करण्यासाठी, अन्न पकडण्यासाठी सुडोपोडीयाचा वापर करतो. याला मराठीत ‘खोटे पाय’ म्हणतात. हे ‘हात पाय’ हलवण्याकरता जे प्रथिन लागतं त्याला ‘अ‍ॅक्टीन – मायोसीन’ म्हणतात. गंमत म्हणजे मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि पुढे नर-वानरापर्यंत हातापायांचे स्नायू याच ‘अ‍ॅक्टीन – मायोसीनचे बनलेले असतात. प्रत्येक प्राण्याच्या जरुरीप्रमाणे या प्रथिनांचा आकार आणि  स्नायूंमधील प्रथिनांची मांडणी निराळ्या प्रकारे केलेली असते. एवढेच काय, रक्तातील जीवाणू पकडणाऱ्या सफेद पेशी जीवाणू पकडण्यासाठी अ‍ॅक्टीन मायोसीन प्रथिने वापरून सुडोपोडिया तयार करतात आणि आपले कार्य साधतात. सजीवांत अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्या एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राण्यात विकसित होत आल्या आहेत. उत्क्रांतीत निसर्ग दरवेळेला नवीन काही तयार करत नाही. जुन्यात थोडे फार बदल करत नवीन अवयव तयार करतो  म्हणजे – त्यात जुन्याचा अंश असतो – म्हणजे माणूस या उत्क्रांत प्राण्यात बऱ्याच आदिम गोष्टीचा अंश आहे.                                                   

    आता मानवी संस्कृतीच्या विकासाकडे मी बघत होतो. प्रत्येक देश-काला प्रमाणे संस्कृती उत्क्रांत होत असते. प्रत्येक वेळेला नवीन काही घडतेच असे नाही; पण जुन्यातून नवे निर्माण होत असताना जुन्याचा काहीतरी अंश पाझरत असतो. माझी नजर हळूच भारतीय समाजसंस्कृतीकडे गेली. हल्ली ज्या छोट्या-मोठ्या मिरवणुका निघतात त्यांत ढोल ताशे, मोठ्ठाले स्पीकर्स, उच्च डेसिबल्सचा आवाज काढणारे तंत्रज्ञान सहज उपलब्ध असल्यामुळे कानठळ्या बसवणारी गाणी, अशा वाजत वराती निघत असतात. हे ‘ध्वनिप्रदूषण’ मानवी कानाच्या आरोग्यासाठी चांगले नाही असे तज्ज्ञ मंडळी कंठशोष करून सांगत असली, तरी या मिरवणुकांमध्ये काही फरक पडलेला नाही, असे का? हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. याचा अचानक उलगडा झाला द. ग. गोडसे (१९१४-१९९२)    यांचे ‘पोत’ (पॉप्युलर प्रकाशन मुंबई पहिली आवृत्ती सप्टेंबर १९६३) वाचताना झाला.  भारतीयांची आवाजाची आवड महाभारत काळापासून आहे. पोतमधील काही वाक्ये येथे देत आहे. 

   ‘प्रचंड मोठ्या आवाजात आरोळी ठोकता  येण्याची शक्ती व आवाज जवळ असणे हा भारतीय योद्ध्याचा गुणविशेष समजण्यात येई. अफाट अंतराळ निनादून सोडणारा सिंहनाद अथवा शंखनाद म्हणजे आक्रमक विजीगिषु ईर्षा असे वाटे. प्रतापी शंख आवेशाने फुंकणे, निरनिराळी रणवाद्ये वाजवून सर्व वातावरण नादनिनादांनी दणाणून सोडणे इत्यादी गोष्टींची भारतात प्रत्यही येणारी वर्णने आहेत.’ 

   अशी ध्वनिवर्णने वाचल्यावर मी काय समजायचे ते समजलो. हा संस्कृतीचा पीळ खूप जुना आहे. आता तंत्रज्ञान बदलले पण आवाजाची आवड तशीच आहे. संस्कृती अशी पाझरत असते.युरोपीय संस्कृतीत असे काहीसे घडले असावे. क्रौर्यातून करमणूक ही युरोपीय संस्कृतीची एक धारा अशीच पुढे पाझरत आली असावी. प्रत्यक्ष जे जीवनात घडते ते कलेच्या रूपात सजवून येते असे दिसते.                                                              

कथेचा ऐतिहासिक संदर्भ                                                                                                                             

१८८० ते १९२२ या कालावधीत ‘उपास करणे आणि त्याचे प्रदर्शन करणे’ हा पाश्चात्त्य देशात एक व्यवसाय होता. याला ‘प्रोफेशनल फास्टिंग’ म्हणत.काफ्का (१८८३ – १९२४) याच कालखंडातला.पहिला उल्लेखनीय व्यावसायिक उपास अमेरिकी Dr. Henry Tanner यांनी वैद्यकीय देखरेखीखाली ४० दिवस केला. प्रसिद्ध व्यावसायिक युरोपियन ‘उपासकार’ Giovanni Succi  (१८५३-१९१८) याने तीस दिवसांचे तीस उपास युरोपातील निरनिराळ्या शहरांत केले. यानंतर कितीतरी उपासकारांनी असे उपास युरोपभर केले. ‘व्यावसायिक उपास’ हा सार्वजनिक करमणुकीचा प्रकार होता. या सादरीकरणाकरता पैसे मिळत असत. उपासाच्या विविध अवस्थांमधील उपासकाराचे फोटो काढून ते विकले जात असत. त्यातूनही उपासकाराची कमाई होत असे. यात अनेक  महिला उपासकार ‘आर्टिस्ट’सुद्धा होत्या.                                                                                     

 १८८८ मध्ये बार्सेलोना येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरले होते. तेथे सायन्स पॅव्हेलीयन येथे जोवानी सूची या ‘हंगर आर्टीस्टने’ काही न खाता;  पण पाणी पिऊन तीस दिवसांचा उपास केला होता. त्याच्यावर काही वैज्ञानिक प्रयोगही झाले होते.Claude Ambroise Seurat (१७९७-१८३३) या फ्रेंच माणसाला ‘जिवंत सांगाडा’ म्हणत असत. कोणत्यातरी विकारामुळे त्याच्या अंगावरचे मांस पूर्ण झडले होते, उरली होती चामडी आणि हाडे. तो उपास-कलाकार नव्हता. तो त्याच्या विचित्र देहाचे प्रदर्शन – ‘फ्रिक शो’ – युरोपातील शहरात पैसे लावून करत असे. अनेक गंडगोपाळ हे शो बघण्यास गर्दी करत असत.                                                                                                                         ‘The Land of the Hunger Artists’ हे इतिहास सांगणारे पुस्तक  केंब्रिज युनिवर्सिटीने प्रकाशित केले आहे. लेखक आहेत Austi Nieto-Galan (१९६०-) प्रोफेसर हिस्टरी ऑफ सायन्स ऑटॉनॉमस युनिवर्सिटी ऑफ बार्सिलोना. (काफ्काने ही कथा लिहिली तेव्हा विसाव्या शतकातील सिनेमा, सर्कससारख्या जनमनोरंजनाच्या प्रकारांचा उदय झाला होता; त्यामुळे असेल, पण ‘हंगर आर्टिस्ट’ या करमणुकीच्या प्रकाराला उतरती कळा लागली होती.)                                                                

कथेचा गोशवारा                                                                                                                                              

तो काळ बरा होता हंगर आर्टिस्टसाठी. आयोजक सार्वजनिक शो आयोजित करायचा, पद्धतशीर व्यवस्था लावायचा. बऱ्यापैकी पैसे मिळायचे दोघांनाही. कलाकार किती ‘खंगला’ आहे, ते बघायला लोक गर्दी करायचे. तीस, चाळीस दिवसांचे उपास असायचे. जसजसे दिवस जायचे तशी गर्दी वाढायची. ज्या पिंजऱ्यात त्याला ठेवलेला असे त्याच्या आजूबजूला सुरक्षारक्षक फिरत असत;  हा काही लपवून खात नाही ना हे बघायला! रात्रीच्या तिकिटाचा दर जास्ती होता. लोक आळीपाळीने येत त्याच्यावर नजर ठेवायला. जागरण करणारे चहा कॉफी नाश्ता घेऊन येत, म्हणजे बघ्यांचा वेळ बरा जाण्याकरता आणि डोळ्यावरची पेंगही उडायला मदत होई. खंगलेल्या कलाकाराला झोप येतच नसे. त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता आलेले बघे खिशातल्या बॅटरीचा झोत मारून तो काय करतो आहे हे बघत असत. बॅटरीच्या झोतात लोक आपल्याकडे पाहत आहेत हे कलाकाराला सुखावह होते, त्याच्या कलेचे चीज झाले असे त्याला वाटत असे. शनिवार- रविवार सुटीचा दिवस. पालक आपल्या मुलांना जिवंत सांगाड्याचा शो दाखवायला घेऊन येत असत. तो त्याचा हात बाहेर काढून मुलांना दाखवत असे. मुले भीतभीत हात लावत असत. एखादी माउली मुलाला म्हणायची ‘बघ किती सुकला आहे ना त्याचा हात,’ हे ऐकून कलाकाराला धन्य वाटत असे.उपासाच्या शेवटच्या दिवशी बरीच गर्दी जमायची. आयोजक दोन तरुणींना त्या कलाकाराला उभा करण्याकरता आणायचा. त्या सांगाड्याला इतक्या जवळून बघून त्या युवती पांढऱ्या फटक पडत. उभा करताना त्या मुलींच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत. बघ्यांच्या लोंढ्यात हास्यकल्लोळ उडत असे. आयोजक त्या सांगाड्या कलावंताला पहिला घास भरवत असे. पण तो घास गिळण्याची ताकद आणि इच्छा नसे. त्याची अन्नावरची वासनाच उडाली असायची इकडे हातातला ग्लास उंचावत झुंडी जल्लोश करत. शो संपला असे आयोजक जाहीर करी.  मग काही दिवस विश्रांती. आयोजक त्याला दुसऱ्या शहरात घेऊन जाई. पण अचानक काय झाले कोणास ठाऊक! मौजमजा लुटायला निघालेले लोंढे या ‘शो’ ला येईनासे झाले. त्यांनी त्यांचा मोर्चा दुसरीकडे वळवला असावा. हे असे काय झाले! हंगर आर्टिस्टला ही उपेक्षा सहन होई ना! 

तो म्हणत असे, ‘मी कलाकार आहे, मी दुसरे काय करणार?’

 आयोजक म्हणाला ‘अरे लोकांचे असेच असते बाबा.’  आयोजकाने कलाकाराचे उपासमारीचे प्रयोग बंद केले. तो पैसे मिळवण्याच्या इतर वाटा धुंडाळण्यासाठी निघून गेला.                                                                                                                     

“प्रेक्षक द्या, प्रेक्षक द्या प्रेक्षक मी कलाकार आहे,” असे सांगत हा जिवंत सांगाडा गावोगावी हिंडू लागला. एका शहरात एक सर्कस आली होती. त्याने सर्कसवाल्याला विचारले. तो म्हणाला, “मी तुला सर्कसच्या प्रवेशद्वाराशी एक पिंजरा देतो. तेथे तुझा ‘शो’ तू कर.” कलाकाराने उपासमारीचा प्रयोग सुरू केला. सर्कसला येणारे काही लोक बघून जात. पण पूर्वीचा बहर, जल्लोश आता राहिला नव्हता. कलाकाराला हवी तशी दाद मिळत नव्हती. शेवटच्या दिवशी तो वॉचमनच्या कानात सांगतो, 

“मला जर माझ्या जीवनात माझ्या आवडीचे अन्न मिळाले असते, तर मीसुद्धा तुमच्यासारखा भरपेट जेवलो असतो.” 

त्या रात्री उपासमारीचा कलाकार मरतो. त्याच्या डोळ्यांत कलाकाराचा अभिमान नसतो. सर्कसवाला त्याला रात्रीच पुरतो. पिंजऱ्याची साफसफाई करून तेथे एक जवान चित्ता आणून ठेवतो. सर्कशीला येणारे तो येरझारा घालणारा बंदिस्त पिंजऱ्यातला रानटी प्राणी बघायला गर्दी करतात.                                                

  वाचक विचार                                                                                                                                             

‘काफ्काने हंगर आर्टिस्ट ही कथा जाळू नकोस,’  असे त्याच्या मित्राला सांगितले होते हे मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. युरोपीय संस्कृतीतील निर्दयतेचा धागा त्याला या कथेत दाखवायचा असावा. प्रागमधील ज्यू द्वेषाच्या वातावरणात तो वाढला होता. ज्यू द्वेषाचा तो बळी होता. त्यानंतर झालेले दुसरे महायुद्ध बघायला तो नव्हता. त्याच्या बहिणी ज्यूसंहारात छळछावण्यांत मेल्या.                                                                

माझ्याकडे एक पुस्तक आहे  : ‘Wit as a Weapon’ The Political Joke in History. Frederick Muller Limited London. १९८० सालचे हे प्रकाशन. या पुस्तकाचे लेखक आहेत Egon Larsen (१९०४-१९९०). हे जर्मन सायंस पत्रकार आणि लेखक होते. त्यात जगभराचे राजकीय टीकाटिपणी कारणारे जोक्स आहेत. नाझी कालखंडातील हा ब्लॅक ह्यूमर माझ्या स्मृतीत टिपला गेला आहे. तो असा : 

एक गेस्टापो एका ज्यूला छळछावणीत नेण्यासाठी येतो. गेस्टापो त्याला म्हणतो मला दोन डोळे आहेत, त्यांतील एक कृत्रिम आहे, कोणता – हे जर तू ओळखलेस तर मी तुला सोडून देईन. ज्यू त्याच्या डोळ्यांकडे बघतो आणि म्हणतो तुझा उजवा डोळा कृत्रिम आहे. गेस्टापो त्याला म्हणतो, “अगदी बरोबर, कसे ओळखलेस ते सांग.” ज्यू म्हणतो, “त्या एकाच डोळ्यात मानवतेची झाक आहे.”                                                                                                        

काफ्काची ही ट्रॅजीकॉमिक कथा युरोपीय संस्कृतीच्या एका धारेवर प्रकाश टाकते. बोधकथा, रूपककथा, निरर्थकतावाद अशा अनेक साहित्यिक अंगांनी या कथेचे विवेचन झालेले आहे.  पण    मी पडलो एक सामान्य वाचक! माझ्या मनात कोणते विचार आले ते वाचक मित्रांशी शेअर केले.                                                                                        बालकवींच्या काही पंक्ती आठवल्या, 

“परी त्याच दीर्घ किंकाळ्या | ठरतात जगाची गाणी.||”  

या ओळींचे शेलेच्या ‘स्कायलार्क’ मधील our sweetest songs are those that tell of saddest thought’ या ओळीशी विचारसाम्य आहे. (समग्र बालकवी संपादिका श्रीमती पार्वतीबाई ठोमरे. व्हीनस प्रकाशन पुणे आवृत्ती पहिली सप्टेंबर १९६६)                                                              

 `निसर्गात जीवनात दु:खाबरोबर सुंदरतासुद्धा आहे, मग असे का?                                      

‘बालकवींनी गुजराती कवितेचा थोडाफार अभ्यास केला होता आणि ‘कलापी’ हा त्यांचा आवडता कवी होता,’ असे म्हणतात. ‘कई लाखो निराशामां अमर आशा छुपाई छे’ असे युयुत्सु वृत्तीचे व आशावादाचे उत्कट उद्गार काढणाऱ्या कलापीचा पुसटदेखील ठसा बालकवींच्या कोणत्याही कवितेवर दिसत नाही, याचे आश्चर्य वाटते. असे या पुस्तकाच्या समालोचनात म्हटले आहे.”                                                              

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             

Author

3 thoughts on “‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’      ”

  1. ‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’ ….एक अप्रतिम लेख वाचण्याचे समाधान काही औरच असते. ते समाधान अन् त्याबरोबरच एक खिन्नता अनुभवली !!😞

  2. परवा लोकसत्तेत काफ्काच्या जीवन अन् साहित्यावर गिरिश कुबेर यांनी लिहिलेला लेख वाचला. तोही छान होता.

Leave a Reply