दोहा रामायण ही मोरोपंतांची आणखी एक कलाकृती.
दोह्यासंबंधी थोडी माहिती देते.
दोहा हा अर्धसम मात्रिक छंद आहे. यात दोन ओळींत चार चरण असतात. पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १३ मात्रा आणि दुसऱ्या आणि चौथ्या चरणात ११ मात्रा असतात.
विषम चरणाच्या सुरुवातीला ‘ज’गण (लघू-गुरू-लघू) नसावा असा संकेत आहे.( मात्र याला काही अपवाद आहेत.)
शेवटची अक्षरे :
समचरणातील शेवटचे अक्षर गुरू आणि त्याआधीचे अक्षर लघू असणे आवश्यक आहे. हे स्पष्टीकरण देण्याचं कारण काव्यात एकसुरीपणा येऊ नये, तीच कथा सांगताना रटाळ होऊ नये म्हणून योजलेल्या वृत्तं, छंदांचा सांगोपांग अभ्यास वाचकांच्या लक्षात यावा. श्रीरामाचे गुणगान करणाऱ्या या काव्यातही अलंकारांची उधळण आहे.
निववीतें जें पावतें बहु मानस खेदास,
पावति या प्रभुचे जसे बहु मान सखे दास||३||
अशा षडक्षरी यमकातून दोह्याचे लालित्यही अनुभवता येते.
दोहा रामायणाचा विशेष म्हणजे कथा रंगवून न सांगता थोडक्यात सांगितली आहे.
गाधितनुज मख रक्षिला, उद्धरिले मुनिदार
ईश्वरधनु भंगुनि दिलें सुख सीतेला फार.||५||
इतक्या चटपटीतपणे कथा वेग घेते. सातव्या पंक्तीत राम वनवासाला जातोही!
गुरुसत्यव्रतरक्षणाकरितां तत्क्षण राम
प्राप्त हि राज्यपद त्यजी, गतसार जसें दाम (२२५/६)
दाम म्हणजे पुष्पहार… शिळा झालेला हार कःपदार्थ म्हणून टाकून द्यावा तसा श्रीराम राज्यपद सोडून गेला.
विविध उपमांमधूनही रामाचे व्यक्तिमत्त्व, देवत्व मोरोपंत अधोरेखित करत राहतात.
नासाकर्ण छेदवी शूर्पणखेचे राम ||१३||
हा पराक्रम सांगून अतिशयोक्ती अलंकाराने रामाचे शौर्य खुलवत नेतात…
त्रिशिरा खरदूषण असे आले राक्षस शूर,
ते केले रघुनंदनें चवदा हजार चूर ||१४||
सीतेला अशोकवनात पाहून मारुतीला प्रश्न पडतो…(४७)
मनीं म्हणे कपि देखतां सती अशोकवनांत
ग्रथिलि उपनिषत्प्राकृता कसी पशो कवनांत||४६||
ही पंक्ती विचार करायला लावते. मारुतीला आश्चर्य वाटतंय, सीता अशोकवनात कशी आली? हे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी मोरोपंत लिहितात,
संस्कृत उपनिषदे प्राकृतात कशी रचली गेली! संस्कृतातून मराठीत अनुवाद या आश्चर्यासारखंच सीतेचं अशोकवनात असणं आश्चर्यकारक आहे. पशो हा शब्दही थोडा बुचकळ्यात टाकतो.
पशो म्हणजे बघा…
चौऱ्याऐंशी ओळीतच ही रामायण कथा संपते. शेवटात मोरोपंत मोर या अक्षरांचा काव्य गुच्छ गुंफत लिहितात, श्रीराम हा जलद – पाण्याने भरलेला – मुदिर म्हणजे ढग आहे. तो पाहून आनंदलेले भक्त म्हणजे मोर आहेत. रामाला साकेताचे म्हणजे अयोध्येचे इतके प्रेम आहे तितके रमेच्या हृदयाशीही दाटून आलेलं नाही.
श्रीराम सरस मुदिर
जे भक्त सकळ नरमोर
साकेत जसें प्रिय तसें प्रभुदृष्टिस न रमोर|
निउनि सुर सुखें नाचती प्रभुच्या दृष्टिसमोर|
प्रभुमूर्तिस कवि सेविती, जैसे वृष्टिस मोर||
घनाक्षर रामायण या छंदोबद्ध रचनेत जोरकसपणा अनुस्यूत आहे. याचे वेगवेगळे प्रकार असले तरी या काव्यात मोरोपंतांनी योजलेले घनाक्षर वृत्तच आपण विचारात घेऊ या.
तीन ओळींत ८ – ८ अक्षरे आणि अंत्यानुप्रास असतो. शेवटच्या ओळीत ७ अक्षरे असतात. शेवटच्या ओळीशी पुढच्या कडव्यातील शेवटची ओळ अंत्यानुप्रास साधते. ही धावती रचना आहे.
या रामायणाची लय द्रुत आहे. रामजन्मानंतर राक्षस कुळात काही अपशकुन झाले असं चित्र मोरोपंत रंगवताना म्हणतात : २३३/५
लंकेत उत्पात शत
राक्षस वदले बत
रावणचि चित्तगत
जाड्यविष न वमी
बत म्हणजे अरेरे सारखा उद्गार
ही काव्यरचना समजून घेण्यासाठी तीन कडवी उदाहरणादाखल घेत आहे. रामजन्माची कथा
२३३/५
कौसल्येसि झाला बाळ
विष्णु त्रिभुवनपाळ
तैं शुभ मध्याह्नका ळ
पुनर्वसू नवमी||
प्रत्येक तीन ओळींत अंत्यानुप्रास असतो आणि कडव्याच्या शेवटीही अनुप्रास असतो.
वानगीदाखल काही प्रसंग बघू या. विश्वामित्रासह राक्षस निवारणासाठी राम लक्ष्मण गेले आहेत.
‘मुनि गुरु म्हणे ‘हाण’
तोंचि सोडूनि सुबाण
ताटकेचे हरी प्राण
राम लावी न क्षण||२३३/९
पुढे कैकेयीचा रुसवा, हट्ट याचे नाट्य न रेखता एका ओळीत रामाचं वनवासाला जाणं ते दाखवतात.
कैकेयीचें व्हाया इष्ट
ताताचेही सत्यदिष्ट
सफळ कराया शिष्ट
मुनिव्रत वरिलें||२३४||१२|
क्वचित अशिष्ट शब्द वापरून मोरोपंत दुष्टांवरचा संताप व्यक्त करतात.
२३५/१५
तेथे शूर्पणखा रांड
म्हणे, ‘रामा! सीता सांड
मजसीं विलास मांड
बळें गळां पडली||
बोले,‘लक्ष्मणा जा वर’|
ऐसे योगिज्ञानिवर;|
तो ही न बधे त्यावर|
सीताघाता अडली||
रांड सांड मांड असा अंत्यानुप्रास एका कडव्यात आणि कडव्याच्या शेवटचा शब्द पुढच्या कडव्याशी जुळणारा आहे. : पडली, अडली!
घनाक्षरीची ही द्रुतलय कथानकात चैतन्य निर्माण करते.
सीता आणि लक्ष्मणाच्या संवादात मोरोपंत दृष्टान्त अलंकार, अंत्यानुप्रास आणि रस यांची त्रिवेणी वळतात.
२३५/१८
जानकी वदे ‘हा तात’!
झाला सर्वस्वाचा घात|
धाव जोडूं काय हात
जा लक्ष्मणा नीघ रे!
तेव्हा तीस तीचा दीर|
सांगे तत्त्व द्याया धीर
माते ढेंकुळसा हीर|
जळीं काय वीघरे||
यातली भाषाही धावत्या लयीला साजेशी आहे.
रसांचा एक वेगळा लेख होणार असला तरी भयानक रस, वीररस आनंद रस, असे एकापाठोपाठ येतात आणि कथेला एकसुरी होऊ न देता औत्सुक्य वाढवतात ते कसे हे वाचणेही रसदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
२४१/४४
रघूत्तमें मग खळ |
केला व्याकुळ निखळ|
क्षतांतूनि खळखळ
रक्त त्याच्या वाहिलें
वीररस २४१/४६/
होय शब्द कडडड| दिगंतात गडडड| दशकंठ धडडड| पडे उर फोडिता||
डच्या अनुप्रासाचा गडगडाट वातावरण निर्मिती करतो.
पुढे आनंदरस ओघाने येतो : २४२/४८
लाजले विघ्न सकळ
दोष जाहले विकळ
पडे दुःखांसि न कळ
रामोत्कर्षें भाजली
हर्षल्या चुकतां जाच
अप्सरा करीती नाच
चारणानी स्तोत्र साच
रामापुढें मांडिलें
हा आनंद रंगवताना मोरोपंत दुसरी बाजू विसरत नाहीत. रावणाच्या पत्नींची विकल अवस्थाही ते काव्यातून रेखाटतात. त्यामुळे काव्य एकांगी होत नाही. २४२/५०
मंदोदरीसह काय
न गणुनीं मृदु पाय
तरी धांवल्याचि हाय
वदत त्या बायका
कोण तें संकट खोल
स्नेहाचें उडालें ओल
काय अपराध बोल
राक्षसांच्या नायका?
इथे दीर बिभीषण या स्त्रियांचं सांत्वन करतानाही दाखवला आहे.
मारुती आणि सीतेचा संवादही विशेष महत्त्वाचा आहे. मारुती म्हणतो,(२४३/५५)
ज्यांहीं तुज जाचिलें
त्या या राक्षसी मारीन|
दुःख चित्तींचें सारीन|
राहिलें पाप वारीन|
म्यां हे प्रिय याचिलें
यावर सीता म्हणते, त्या दासींना जे काम सांगितले ते त्यांनी केले. यात त्यांचा काय दोष?
सीता म्हणे,
‘राम! राम!’
यांहीं केलें उक्त काम
जैसें अन्न मांस आम
पाचकाने पाचिलें
आलेलं मांस पचवण्याचे काम जस केलं तसं या दासींनी सांगितलेलं काम केलं. यात त्यांचा काय दोष?
अशा ओळी आत्मचिंतन करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.
अयोध्येला गेल्यावर राम आणि भरताच्या भेटीचं हृद्य वर्णन आनंदित करतं.
२४८/७६
युवराज तो भरत
केला जो न लोभरत
ज्याचे हृदय भरत
जाय भक्तिच्या रसें
करूनीं तेजोविस्तार|
हरूनि शोकाधिभार
चित्ते हृष्टें केलीं फार,|
सूर्ये जसीं सारसें||
‘भक्तिच्या रसें’ ला सारसे सारखे यमक जुळवले आहे पण पुढे मात्र याच यमकाच्या अट्टाहासात
‘तत्सुसंनिधानयुक्त लग्न मुंज बारसे’
ही ओळ गुंफली आहे ती यमकाची झटापट हास्यास्पद वाटते.
२६१/१
प्रत्येक रामायणाच्या उपसंहारातही काही नवीन शब्द, अलंकार मोरोपंत गुंफतात त्यामुळे काव्य शेवटापर्यंत उत्सुकतावर्धक होतं.
घनाक्षरीचा उपसंहार करताना ते लिहितात :
श्रीरामासि घनाक्षररामायणपद्म अर्पिला भावें
ज्याच्या चरितांत अमृत, जैसें दुग्धांत सर्पि लाभावें
दुधात सर्प अशी उपमा रामचरित्रात अमृत लाभण्याला दिली आहे असं वाटू शकतं. इथे मोरोपंतांचं यमकांवरचं प्रेम आणि संस्कृतावरचं प्रभुत्व यांची सांगड घातलेली आहे.
सर्पि म्हणजे तूप.
दुधात जसं कणीदार तूप असतं, तसंच या रामायणात अमृतसिंचन केलेलं आहे.
सुषमा जोशी
9769362601
