मराठी समानार्थ लघु शब्दकोश : खंड एक – प्राणिजगत
संपादक : सुहास अनंत रानडे
…..
मराठी भाषेला ‘अभिजात’ असा दर्जा मिळून एक वर्ष उलटून गेले; मात्र, यातून काय काय करायचे, याचा काहीही आराखडा अद्याप अमलात आलेला नाही. मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक, भाषा, कोश किंवा इतरही आनुषंगिक कामे करणारी मंडळे, विभाग महाराष्ट्रात आहेत. राज्यात साहित्य संस्था आहेत. दरवर्षी राज्यात होणाऱ्या शंभरांहून अधिक साहित्य संमेलनांचा एकूण खर्च कित्येक कोटींच्या घरात जात असेल. या साऱ्यांतून काय होत असेल ते होत असेल पण एक अभियंता उठतो आणि मराठीतल्या एका अजस्र कोशाची संकल्पना मनाशी रेखतो. ती अनेक वर्षे चौफेर व्यासंग करून एकट्याच्या बळावर यशस्वी करतो आणि जवळपास हजार पानांचा पहिला खंड वाचकांना सादर करतो, ही घटना अद्वितीय आहे. त्याच्या स्वप्नातले सगळे खंड असेच प्रकाशित झाले तर त्यांची एकूण संख्या चाळीसच्या घरात जाऊ शकते. छाती दडपून टाकणारे हे भव्य स्वप्न आहे.
मराठीला कोशांची अतिशय संपन्न परंपरा आहे. आजच्या मराठी समाजाच्या सरासरी स्थितीवरून तिची कल्पना येत नाही; मात्र, भारतीय भाषांमध्ये इतके कोश दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाहीत. ऋषितुल्य श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या ज्ञानकोशापासून विश्वकोशापर्यंत, पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृती कोशापासून कृ. पां. कुलकर्णी यांच्या व्युत्पत्तिकोशापर्यंत, विठ्ठल वाघांच्या वऱ्हाडी बोलीच्या चौखंडी कोशापासून सुरेश वाघे यांच्या संकल्पना कोशापर्यंत आणि श्री. शा. हणमंते यांच्या संख्यासंकेत कोशापासून य. रा. दाते यांच्या ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशा’पर्यंत ही परंपरा चहूदिशांनी विकसित होत गेली आहे – आजही होत आहे. रानडे यांच्या या कोशसंकल्पाने महाराष्ट्राची आणि मराठीची ही परंपरा कितीतरी पुढे गेली आहे. खरेतर, महाराष्ट्र सरकारने रानडे यांना हवी ती सामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, जागा आणि हवा तेवढा निधी देऊन हे काम पुढे न्यायला हवे. उठवळ नाचगाणी आणि फुटकळ कार्यक्रमांवर बेफाम दौलतजादा करण्यापेक्षा हे काम अधिक मोलाचे आणि मूलभूत स्वरूपाचे आहे.
हे काम नेमके आहे तरी काय? आणि त्याचे वेगळेपण काय आहे?
मराठीच्या सर्व बोलीभाषा, संस्कृत, प्राकृत यांमध्ये येणाऱ्या सर्व विषयांतील, चराचर सृष्टीतील प्रत्येक वस्तू आणि जिवांबद्दलचे समानार्थी शब्द एकत्रित करावेत अशी ही मूळ कल्पना; मात्र, या प्रत्येक वस्तूला लगडून येणारी सगळी लोकसंस्कृती या कोशाच्या परिघात येते. उदाहरण पाहिल्यावर हे अधिक स्पष्ट होईल. म्हणजे, समजा ‘गाढव’ हा अत्यंत कष्टाळू आणि सांस्कृतिक संकेतांनी अन्याय केलेला प्राणी घेतला, तर कोशकार त्याला ४० पाने देतात. इतके काय आहे त्यात? तर नरासाठी असणारे ८९ समानार्थी शब्द आहेत. गाढविणीसाठी असणारे स्वतंत्र १७ शब्द आहेत. पिलाचे सहा शब्द. गाढवांच्या टोळीसाठी ‘गेडळी’ हा कोरकू बोलीतला शब्दही आहे. मग इतर १५ भाषांमधले शब्द. त्यांतला तमीळमधला ‘काळूतई’ आणि बॅबिलोयिनमधला ‘कुर्र’ हे शब्द लक्षवेधक. मग कोशाच्या नावातलं ‘बरंच काही…’ त्यात गाढवांची शास्त्रीय माहिती, गाढवाचा बुद्ध्यंक घोड्यापेक्षा जास्त असतो, ही महत्त्वाची नोंद, गाढवांच्या आवाजाचे प्रकार, गाढवाशी संलग्न असे वाक्प्रचार किंवा शब्द.
उदाहरणार्थ : ‘हत्त्याण’ म्हणजे गाढवी माजावर येणे. मग गाढव शब्दाच्या व्युत्पत्ती. इथे कोशकार थेट ऋग्वेदापर्यंत जातात. मग गाढवाविषयीच्या धार्मिक समजुती, गद्धेगळ म्हणजे शिक्षा, शिव्या आणि शाप देणारे मध्ययुगीन शिलालेख किंवा ताम्रपट, पुराणे, रामायण, महाभारत इतिहास, वेद, जातक… यांतील गाढवांचे संदर्भ, नंतर गाढवांच्या जत्रा, बाजार, त्यांचे रोग, त्यांच्याबद्दलच्या अंधश्रद्धा, गाढवपोळा सणाची माहिती, गाढवांवरील म्हणी तसेच वाक्प्रचार. उदाहरणार्थ : ‘बायको लवते पिरमानं, गधी लवते भारानं…’ किंवा ‘गध्याले सांगते ग्यान, गधं हालोते दोनी कान…’ मग त्यानंतर, वास्तुशास्त्र, शकुन, स्वप्न, वनस्पती, सुभाषिते, ज्योतिष, गावाची नावे, लोककथा, संतसाहित्य यांच्यातील गाढवांचे संदर्भ, मग जगातील एकूण गाढवे, मृगपक्षिशास्त्रातील गाढवाचे संदर्भ हे सगळे येते. जगातील पुरुषांचे सहा प्रकार कल्पिले आहेत. त्यांतील एक ‘गर्दभ’ ही मौलिक माहितीही मिळते. पाळीव गाढवांप्रमाणेच जंगली गाढवांचीही माहिती कोशकार देतात. अशी ही गाढवाची ४० पाने.
अशा प्रकारे या पहिल्या भागात गेंडा, घोडा, अस्वल, बैल, उंट… असे १४ चतुष्पाद भूचर प्राणी आले आहेत. म्हणजे या १४ प्राण्यांमध्येच पहिल्या खंडाच्या पहिल्या प्रकरणातील ‘अ’ विभागाची ९७० पाने संपली आहेत. आता पहिल्या खंडाच्या पहिल्या प्रकरणातील ‘ब’ विभाग येणार आहे. त्यात चिचुंद्रीपासून हत्तीपर्यंत २१ प्राणी असतील; मग दुसरे प्रकरण पक्षिगणांचे, तिसरे सरपटणारे, जलचर, उभयचरांचे आणि चौथे कीटकांचे झाले, की पहिला खंड पुरा होईल.
दुसऱ्या खंडात कुटुंबसंस्था असेल. या खंडाचीही दोन प्रकरणे होतील. तिसरा खंड असेल वनस्पतींचा. चौथा सूपशास्त्राचा. पाचवा घर-दार आणि परिसराचा. सहाव्या खंडात कोशकारांना अलुतेदार, बलुतेदार आणि इतर व्यवसाय आणि व्यावसायिक घ्यायचे आहेत. सातवा खंड पंचमहाभूतांसाठी राखीव आहे. यात प्रत्येक महाभूतासाठी एक प्रकरण म्हणजे निदान नऊशे-हजार पाने तरी खर्ची पडतील. आठव्या खंडात अस्त्र, शस्त्र, व्यूह, किल्ले इत्यादी असेल. नवव्या खंडात सर्व कला येतील. या खंडाची दोन प्रकरणे म्हणजे दोन ग्रंथ झाले तर त्यात संगीत, नृत्य, वाद्ये, ध्वनी, गंध, रंग, वस्त्र असे सारेच येईल.
पुढचा दहावा खंड पुन्हा दोन प्रकरणांचा. यात रसायन, धातुशास्त्र, स्थापत्य, मूर्ती, लेणी, शिल्प, गुहाचित्रे हे विषय असतील. अकराव्या खंडात रत्ने, दागिने, नाणी, वजने, मापे, अंतरे, संख्या, चलन, खेळ असे विषय येणार आहेत. याही खंडाचे दोन ग्रंथ होतील.
बारावा खंड सणवार, यात्रा, धर्मशास्त्र, वेद, पुराणे, व्रतवैकल्ये यांच्यासाठी आहे. त्याचेही दोन ग्रंथ होतील; म्हणजे कोशकारांच्या परिभाषेत दोन प्रकरणे होतील. तेराव्या खंडात देवदेवता, संतमहंत, संप्रदाय यांचा परामर्श. हा व्यापक विषय असल्याने या खंडाचेही तीन ग्रंथ होणार, असे दिसते. चौदावा खंड केवळ विशेषणे, क्रियाविशेषणे, क्रियापदे यांचा असेल; तरीही त्याला दोन ग्रंथ लागतील. पंधराव्या खंडात भावभावनांचा समावेश असेल. सोळावा खंड लिपी, भाषा, कुळनाम, विशेष नामे यांचा परामर्श घेणारा असेल.
इतके सगळे विषय घेतल्यावरही सगळ्या ज्ञानशाखांचा समावेश या कोशात होणार नाही, याची जाणीव कोशकाराला आहे; पण यात अडचण अशी आहे, की अनेक आधुनिक विषयांमधील ‘मराठी’ शब्दाचे समानार्थी
मराठी शब्द देण्याइतका मराठी भाषेचा विस्तार झालेला नाही. म्हणजे, समजा संगणकशास्त्र असेल तर त्यातल्या किती शब्दांचा समावेश करून त्यांना असणाऱ्या ‘समानार्थी मराठी शब्दांची’ नोंद कोशात करता येईल? गेल्या पन्नास वर्षांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यावर आधारित अशा ज्ञानशाखा विकसित झाल्या, त्यांचा समावेश या बृहद्कोशात होण्याचे प्रमाण कमीच असणार आहे. बऱ्याच वस्तू आणि संकल्पनांना आपण अद्याप एकेकच शब्द तयार करून तो वापरण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यामुळे, स्वाभाविकच हे १६ खंड आणि त्यांचे अंदाजे ४० ग्रंथ हे आजवरच्या शब्दकोशांमधल्या सर्व शब्दांचा माग घेण्यातच खर्च होतील असे दिसते.
इंग्रजी भाषेची एके काळी ‘सागरी चाच्यांची भाषा’ अशी हेटाळणी होत होती. त्या काळात फ्रेंच ही भाषांची महाराणी होती. आज इंग्रजीत दोन लाखांपेक्षा अधिक शब्द आहेत. या भाषेचे जगभरात हजारो शब्दकोश आहेत, थिसॉरस आहेत, अनेक ज्ञानकोशही आहेत. या लिखित भाषेचे आयुष्य जास्तीत जास्त पाचशे वर्षे. याउलट, मराठी भाषेने अभिजात भाषेचा दर्जा मिळवताना तीत सलग दीड हजार वर्षे साहित्य निर्मिती होत असल्याचा पुरावा सादर केला आहे. असे असताना, मराठीच्या सगळ्या बोली, उपभाषा धरूनही शब्दसंख्या ७० हजारांच्या आसपास आहे; शिवाय, या शब्दांमधील वापर होणाऱ्या शब्दांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्राशी जोडल्या गेलेल्या छोट्या प्रादेशिक, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या भाषांची संख्या निदान २१६ असावी; शिवाय, अरबी, फार्सी, तुर्की, इंग्रजी… अशा किमान ३५ भाषांमधले शब्द आपण घेतले आहेत. हे सारे शब्द त्यांच्या अर्थांसकट तसेच समानार्थी शब्दांसकट या कोशात यावेत आणि त्यांच्या संकल्पनाही स्पष्ट व्हाव्यात अशी या कोशकारांची कल्पना आहे. एका अर्थाने मराठी भाषेच्या संस्कृतिकारणाला भक्कम भरीवपणा देणारे फार महत्त्वाचे कार्य सुहास रानडे हे करीत आहेत.
मराठी भाषेतील शब्दकोशांची परंपरा समृद्ध आहे, असे आपण वारंवार म्हणतो. पण प्रत्यक्षात एखादा नवा कोश हातात घेतल्यावर एक साधा, पण महत्त्वाचा प्रश्न मनात येतो – हा कोश खरंच आवश्यक होता का? कारण शब्दकोश हा केवळ संदर्भग्रंथ नसतो. तो भाषेच्या वापराचा, समाजाच्या अनुभवांचा आणि काळानुसार बदलणाऱ्या अर्थच्छटांचा दस्तऐवज असतो. शब्द कसे जन्माला येतात, कसे बदलतात, कसे लोप पावतात आणि कसे नव्या अर्थांनी भरतात – हे सगळे शब्दकोशाच्या पानांतून उमटत असते. सुहास रानडे यांचा हा कोश केवळ कोणत्याही औपचारिक गरजेतून नव्हे, तर भाषेच्या प्रत्यक्ष वापरातून, अनुभवातून तयार झाला आहे. कोणतीही शब्दसंपदा एका दिवसात तयार होत नाही. माणूस आणि सृष्टी यांचे नाते हजारो वर्षांचे आहे. शेती, पशुपालन, जंगल, उपजीविका, श्रद्धा, भीती, लोककथा, म्हणी…यांच्या सगळ्या अनुबंधांमध्ये सृष्टी हजर होती आणि आहे. या सृष्टीच्या व्यापातूनच शब्दांची सृष्टी निर्माण झाली. हा बृहद्कोश या शब्दसृष्टीचा अनेक अंगांनी वेध घेतो म्हणूनच ते एक महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य ठरते.
असा विशाल परिघाचा समानार्थ शब्दकोश तयार करणे हे मोठे आव्हान होते; कारण समानार्थता ही संकल्पना सोपी नाही. भाषाशास्त्र सांगते, की पूर्णपणे समान अर्थ असलेले शब्द फार क्वचित असतात. बहुतांश शब्द अर्थाने जवळचे असतात; पण वापरात वेगळे असतात. ‘साप,’ ‘नाग,’ ‘भुजंग,’ ‘फणा’ हे शब्द समानार्थी वाटतात; पण संदर्भ बदलला, की त्यांची छटा बदलते. धार्मिक ग्रंथांत ‘नाग’ शोभून दिसतो, काव्यात ‘भुजंग’ सौंदर्य वाढवतो, तर रोजच्या बोलण्यात ‘साप’च वापरला जातो. हा कोश ही जाणीव ठेवून तयार झालेला आहे, हे त्याच्या पानोपानी जाणवते.
मराठीतील कोशपरंपरेचा मागोवा घेतला, तर तिची मुळे संस्कृत कोशपरंपरेत सापडतात. ‘अमरकोशा’सारख्या ग्रंथांनी शब्दसमूह, समानार्थी शब्द आणि वर्गीकरणाची शिस्त भारतीय भाषांना दिली. मराठीत अनेक अभ्यासकांनी कोशांचे काम पुढे नेले; मात्र, या सगळ्या समृद्ध परंपरेत समानार्थ शब्दकोश हा प्रकार तुलनेने दुर्लक्षित राहिला; कारण समानार्थ शब्द देताना अर्थ, भावच्छटा, सामाजिक अनुबंध आणि वापर यांचा तोल सांभाळावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर रानडे यांचा हा कोश विशेष महत्त्वाचा ठरतो.
या कोशाची मोठी ताकद म्हणजे त्याची विषयकेंद्रित मांडणी. या पहिल्याच खंडात प्राणिजगत ही चौकट स्वीकारल्यामुळे शब्दांची निवड सुसंगत आणि नैसर्गिक वाटते. पाळीव प्राणी, वन्य प्राणी, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, जलचर… हे सगळे गट मराठी अनुभवविश्वात आधीपासून आहेत. गाय, बैल, म्हैस यांसारखे शब्द ग्रामीण जीवनाशी घट्ट जोडलेले आहेत, तर वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा यांसारखे शब्द जंगलाशी आणि लोककथा, लोकजीवनाशी जोडलेले आहेत. हा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ शब्दांच्या यादीतूनही नकळत उलगडत जातो. पुढच्या प्रकरणात म्हणजे ग्रंथात बिबट्याचे समानार्थी शब्द येतील तेव्हा बिबट्या आणि माणूस यांच्यातील वर्तमानातील संघर्षाचा वेधही विविध शब्दांच्या वापराच्या माध्यमातून घेतला जाईल.
या कोशाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याची भाषा अतिशय सुलभ आहे. कुठेही विद्वत्तेचा बडेजाव नाही, क्लिष्ट व्याख्यांचा अतिरेक नाही. शब्द दिला आहे आणि त्याचे योग्य समानार्थी शब्द दिले आहेत. पण हा साधेपणा फसवा नाही. मराठी, तिच्या बोली आणि मराठीच्या संबंधात येणाऱ्या इतर भाषा मिळून बैल या मानवी जीवनात मिसळून गेलल्या प्राण्यासाठी तब्बल ५२१ शब्द असतील, असा आपण कधी विचार तरी केला असेल का?
या कोशाचा विचार करताना भाषा आणि स्मृती यांचे नातेही लक्षात घ्यावे लागते. प्राणिजगताशी संबंधित अनेक शब्द आजच्या शहरी मराठीत हळूहळू मागे पडत चालले आहेत. शेती, गुरेढोरे, जंगल, नदीकाठ… या अनुभवांपासून तुटलेल्या जीवनात काही शब्द वापरातून नाहीसे होत आहेत. शब्द वापरातून गेले, की त्यांच्याबरोबर त्या जीवनपद्धतीची स्मृतीही पुसट होते. अशा वेळी शब्दकोश हा केवळ संदर्भग्रंथ न राहता सांस्कृतिक स्मृती जपणारे साधन ठरतो. रानडे यांचा हा कोश ही जबाबदारी शांतपणे पार पाडतो.
बोलीभाषेतील शब्दांचा समावेश ही या कोशाची आणखी एक महत्त्वाची जमेची बाजू. मराठीतील हजारो शब्द लोकभाषांमधून पाझरत आले आहेत. शेतकरी, गुराखी, कोळी, आदिवासी समाज, भटके आणि विमुक्त, गावोगावचे अलुतेदार तसेच बलुतेदार यांनी हे शब्द पिढ्यान्पिढ्या जपले. अनेक वेळा प्रमाणभाषेतील कोशांचे या अफाट शब्दसंपत्तीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. रानडे यांनी सर्व बोली, लोकभाषा यांच्यातील शब्दांचा विचार केला आहे. भाषाशास्त्रीय दृष्टिकोणातून ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. भाषेच्या जिवंतपणाचे खरे लक्षण तिच्या दैनंदिन समाजजीवनातील वापरातच दडलेले आहे.
कोशशास्त्रीय दृष्टीने हा ग्रंथ भाषा कशी वापरली जाते, याची विस्तृत नोंद करतो. पहिल्याच ग्रंथातील प्राण्यांशी निगडित शब्दांची नोंद करत असताना शब्दांचा प्रवास लक्ष वेधून घेतो. काही शब्दांचे अर्थ सौम्य झाले आहेत, काही अधिक तीव्र झाले आहेत, तर काही शब्द उपरोधिक अर्थाने वापरले जाऊ लागले आहेत. या सगळ्या छटा समानार्थी शब्दांच्या यादीतून सूचकपणे समोर येतात.
प्राणिजगताशी संबंधित शब्दांचा अभ्यास करताना लोकपरंपरेतील वर्गीकरण आणि वैज्ञानिक वर्गीकरण यांतील फरकही लक्षात घ्यावा लागतो. जीवशास्त्रात सस्तन, पक्षी, सरपटणारे असे वर्ग असतात; पण लोकभाषेत हा भेद अनेकदा नसतो. ‘साप’ या एका शब्दाखाली अनेक जाती लोकमानसात येतात. भाषा ही शास्त्रीय अचूकतेपेक्षा अनुभवाला प्राधान्य देते. हा अनुभवाधारित दृष्टिकोण या कोशात ठळकपणे दिसतो.
या कोशाचा उपयोग केवळ लेखक किंवा अभ्यासकांपुरता मर्यादित नाही. भाषांतराच्या क्षेत्रातही असा बृहद्कोश फार उपयुक्त ठरतो. इंग्रजी किंवा इतर भाषांतून मराठीत भाषांतर करताना एखाद्या प्राणिविषयक शब्दासाठी नेमका, संदर्भानुरूप मराठी शब्द निवडणे ही मोठी कसरत असते. थेट शब्दार्थ दिला, तर अर्थ सपाट होतो. समानार्थ कोशामुळे पर्यायांची जाणीव होते. अनुवाद अधिक रसरशीत होण्याची शक्यता वाढते.
शिक्षणाच्या दृष्टीनेही या कोशाचे महत्त्व मोठे आहे. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर मराठी शिकवताना शब्दसंपदेचा विस्तार ही मोठी अडचण असते. विद्यार्थी अनेकदा एकाच शब्दाभोवती फिरत राहतात. समानार्थी शब्दांची सवय लागली, तर भाषेवरचे प्रभुत्व वाढते.
आजन्म अखंड ज्ञानसाधना करणारे ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे यांनी मोजक्या शब्दांमध्ये कोशकाराचे अभिनंदन केले आहे. ते लिहितात, “तुमचा ग्रंथराज चाळला. तुमच्या भाषाप्रेमाला आणि परिश्रमांना साष्टांग दंडवत. केवळ भाषाप्रेमाने एवढे मोठे धाडस करणे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.” जो कोणी हा कोश हातात घेईल, त्याच्या मनात उचंबळून येणाऱ्या भावनांना घाटे यांनी सुभग शब्दरूप दिले आहे. या ग्रंथाला ख्यातनाम लेखक व संशोधक डॉ. अनंत देशमुख यांनी जी विवेचक पण नेमकी प्रस्तावना लिहिली आहे; तिच्यामुळे या ग्रंथमालेचे महत्त्व अचूक चौकटबद्ध झाले आहे.
ज्ञानकोशकार केतकरांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे खंड ज्या दिवशी पुरे केले असतील, महादेवशास्त्री जोशींनी संस्कृतिकोश संपन्न केला असेल, मारुती चितमपल्ली यांनी पक्षिकोश हातावेगळा केला असेल, ‘आपली सृष्टी, आपले धन…’चे शिवधनुष्य दिवंगत विवेक परांजपे, मिलिंद वाटवे यांनी पेलले असेल, अशोक जोशी यांनी कृषिज्ञानकोश प्रकाशित केला असेल किंवा डॉ. गोवारीकरांनी ‘द फर्टिलायझर एनसायक्लोपेडिया’ पुरा केला असेल. असे सर्व दिवस महाराष्ट्राने सणांसारखे साजरे करायला हवेत. ही ज्ञानसाधकांची यादी आणखी मोठी आहे; मात्र, ज्ञानाच्या रणांगणात अतुलनीय पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्यांचे महाराष्ट्राला कौतुक उरलेले नाही. आज महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासारखा राज्यकर्ता असता तर त्यांनी सुहास अनंत रानडे यांची सुशोभित हत्तीवरून मिरवणूक काढली असती आणि या साऱ्या ज्ञानयज्ञाच्या मागे आपली सर्व प्रकारची शक्ती उभी केली असती. या महाकोशाचे केवळ १/४० काम प्रकाशात आले आहे. ते पुरे होण्यासाठी रानडे यांना उदंड आयुष्य, शक्ती आणि मुख्य म्हणजे समाज, उद्योजक आणि सरकार यांची सार्थ साथ मिळायला हवी!
…………
(मराठी समानार्थ लघु शब्दकोश आणि इतर बरंच काही : खंड १ : प्राणिजगत् : प्रकरण १(अ) – चतुष्पाद (जरायुक्त–सस्तन–भूचर) पशू
संपादक : सुहास अनंत रानडे
परममित्र पब्लिकेशन्स,
पाने : ९७० (पुठ्ठा बांधणी)
किंमत : दोन हजार रुपये
संपर्क : ८३६९३ ५१९५९
…..
(पूर्वप्रसिद्धी : ललित मासिक, अंक मार्च, २०२६ )

