
खरे सांगायचे झाले तर मला मुंबईला जाणं अजिबातच आवडत नाही. तिथली ती चिकट, दमट हवा, गर्दी, आवाज, ट्रॅफिक यांची एक भीती मनात बसली आहे. त्यामुळे मुंबईत काही काम निघाले, की ते टाळायचे किंवा इतरांच्याकडून करून घ्यायचं अशी रणनीती मी करतो. परंतु या वेळी त्यातलं काहीच करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे हा प्रवास जास्तीत जास्त नियोजनबद्धरित्या करणे हा एकच पर्याय उरला होता. वंदे भारत रेल्वेने दादर गाठायचे. शक्यतोवर टॅक्सी वापरत काम करायचे आणि वंदे भारतनेच परतायचे असा मनोमन बेत केला. रेल वन नावाचे ॲप डाऊनलोड केले. त्यावरून घरबसल्या जायच्या-यायच्या तिकिटाचे आरक्षण केले. हे सर्व अगदी सुलभपणे झाले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याने सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात क्रांती होईल असे नेहमी सांगितले जाते त्याचा एक अनुभव स्वतः घेतला. अर्थात यासाठी आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असायला पाहिजे ही पूर्व अट आहे याचीही जाणीव झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्या संदर्भातली सर्व तांत्रिक प्रगती यामुळे जगात आता या तंत्रज्ञानापर्यंत पोचू शकणारे आणि पोचू न शकणारे असे दोन वर्ग तयार होतील असे म्हटले जाते आणि बहुधा हे भाकीत खरे ठरणार असे दिसते.
‘वंदे भारत’ ही गाडी भारतीय रेल्वे ‘आपली एक चांगली गाडी’ म्हणून मिरवते. या गाडीने पूर्वीही प्रवास केला होता आणि तो अनुभव सुखद होता. या वेळीही प्लॅटफॉर्मवर गेलो त्या वेळी प्लॅटफॉर्मवरचे सर्व डिस्प्ले अगदी सहज दिसतील व समजतील असे होते. आमची बोगी कोठे येणार ते त्यामुळे सहजपणाने कळले व त्यामुळे कसलीही धावपळ झाली नाही. विशेष म्हणजे ॲपवर आधीच प्लॅटफॉर्म क्रमांक व आमच्या बोगीचा इंजिनपासूनचा क्रमांक पाहण्याची व्यवस्था होती व प्रत्यक्षात तसेच झाले. डब्यांची रचना ऐसपैस म्हणावी अशी होती. दारे स्वयंचलित होती. स्वच्छतागृहे मोठी प्रशस्त व बऱ्यापैकी स्वच्छ होती. बैठकीची रचना वेगळी होती. सर्वजण सरसकट प्रवासाच्या दिशेने तोंड करून बसतील अशी ती रचना नव्हती. काही रांगांमध्ये सहा जण, काही रांगांमध्ये फक्त दोन, काहीच फक्त एक अशी आसनांची वेगवेगळी व्यवस्था होती. काही आसने प्रवासाच्या दिशेने तोंड करून तर काही विरुद्ध दिशेला तोंड करून होती. त्यामुळे डब्यात एक प्रकारचे अनौपचारिक घरगुती वातावरण निर्माण झाले असे निदान मला तरी वाटले. नाश्ता व जेवण रेल्वेच्या प्राधिकृत कंपनीद्वारा दिले गेले. अन्न गरम होते. प्रत्येकाला एक लिटर पाण्याची बाटली मिळाली. वृत्तपत्रे, मराठी वा इंग्रजी दोन्ही आवडीप्रमाणे मिळाली. सेवा देणारे लोक विनम्र होते. बऱ्याच लोकांना सात तासांच्या प्रवासात एक लिटर पाणी लागत नाही त्यामुळे या बाटल्या अर्धवट शिल्लक राहत होत्या आणि त्या तशाच मागे टाकून प्रवासी उतरत होते. एक लिटर पाण्याची गरज आहे, का ती गरज थोडीफार कमी करता येते याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आय आर सी टी सी ने केला पाहिजे. या सेवकांच्या अंगावरचे गणवेश मात्र थोडेसे कळकट होते;गाडीच्या इतमामाला साजेसे नव्हते.
समोरच्या मॉनिटरवर गाडीचा वेग, येऊ घातलेले स्टेशन, स्टेशन आल्यावर दार कोणत्या बाजूला उघडणार यासारखी सर्व आवश्यक माहिती दिसतही होती व त्याबाबतची उद्घोषणाही होत होती. विशेष म्हणजे या सर्व उद्घोषणा स्पष्ट ऐकायला येत होत्या. अन्नसेवा झाल्यानंतर वापरलेल्या प्लेट्स अर्ध्या तासाच्या आत साफ केल्या गेल्या. गाडीच्या आसनांचा तळ वापरामुळे झिजला होता आणि त्यामुळे त्यावर बसणे फारसे सुखकारक नव्हते. अर्थात अशी आसने योग्य वेळी बदलली जातील अशी आशा आहे. सुमारे तीन ते चार लोक गाडीत बसून आपापले काम करत होते – म्हणजे तार स्वरात आपापल्या टीमला किंवा आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आंग्ल भाषेत किंवा मराठीत सूचना देत होते. आपल्यामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांना काही व्यत्यय येतो आहे याची त्यांना फिकीर नव्हती. जणूकाही तो त्यांचा हक्कच आहे अशा पद्धतीने आसपासच्या जगाचा सोयीस्कर विसर पाडत त्यांचे काम चालू होते. आयटी क्षेत्रात बऱ्याच वेळा “मी कॉलवर आहे,” असे सांगितले जाते. असे काही कॉल आम्हांला इच्छा नसतानाही ऐकायला लागले. नागपूरमधल्या एका कामाबद्दल चर्चा चालू होती. त्या कामासाठी नागपूरला कोणी जायचे, किती दिवस व कोठे राहायचे व मुळात नागपूरला जायलाच हवे, की आपापल्या ठिकाणी बसून संबंधितांशी व्यापक चर्चा करून ती माहिती मिळवता येईल का? असा काहीसा त्या चर्चेचा गोशवारा होता. त्या निमित्ताने या टीममधील प्रतवारी, वर्गवारी व वर्गसंघर्ष कसा असू शकतो त्याची झलक मिळाली.
चढताना व उतरताना बहुसंख्य लोकांनी आपल्याला नागरिकशास्त्र समजते याचे प्रात्यक्षिक दाखवले व त्यामुळे गाडीतून चढणे व उतरणे सोपे झाले. आधी सर्व उतरणारे लोक सुखरूप उतरल्यावर मगच बाहेरचे लोक आत आले. अर्थात गाडीला गर्दी नसल्याचाही तो एक परिणाम असावा; पण आपण संशयाचा फायदा नागरिकशास्त्राला दिला तर काय बिघडले!
मुंबई मुक्कामात एकंदरीत चार वेळा टॅक्सी करायला लागली. चारही वेळेचे टॅक्सी ड्रायव्हर वेगवेगळे होते. एक बिहारी होता, एक उत्तर प्रदेश मधला होता, एक मुस्लीम होता तर चौथा बदलापूर या मुंबईच्याजवळील गावात राहणारा मराठी माणूस होता. या सर्व लोकांशी मी हिंदी व मराठी अशा संमिश्र भाषेत गप्पा मारल्या. ते हिंदी बोलत होते म्हणून माझे काही अडले नाही आणि मी मराठी बोलत होतो म्हणून त्यांचे! सर्व टॅक्सी ड्रायव्हर विनम्र होते. सामान उतरवायला त्यांनी आपणहून मदत केली. त्यामुळे टॅक्सी ड्रायव्हर या बिरादरीबद्दलचे माझे मत काहीसे बदलले. एक संध्याकाळ मरीन ड्राईव्हवर घालवली. सर्व सामाजिक स्तरांतील लोक तेथे गुण्यागोविंदाने नांदत होते व निसर्ग व समुद्र यांचा आनंद घेत होते. राजकारणविरहित समाज असू शकतो आणि तो बऱ्यापैकी सहिष्णू असतो याचा हा प्रत्यय अत्यंत सुखकारक होता.

सुखद अनुभव…रेल्वेच्या कार्यशैलीचा, तेथील भोजनाचा, जनतेच्या माफक शिस्तीचा अन् सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईतील बिहारी, उत्तर प्रदेशिय, मुस्लिम अन् मराठी टॅक्सी ड्रायव्हरांचा. सामाजिक स्नेहाचे खरे दर्शन या मध्यमवर्गीय व निम्नस्तरीय वर्गातच पहावयास मिळते. जाती तथा धर्मावरून समाजात फूट पाडण्याच्या सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हा वर्ग अद्यापही सामाजिक सहिष्णुता टिकवून आहे हे निरीक्षण आनंद देणारे !❤