बेल वाजली आणि मी दार उघडले. या घटनेत काहीच विचित्र नाही. मग मला का सारखे असे वाटत आहे, की मी काहीतरी खूपच विचित्र केले आहे! तशी वेळ सकाळचीच होती, पण… अरे वेळ तर सकाळचीच आहे, मग पणचा प्रश्नच नाही ना. मग असे का होतेय?
काय होते माहिती आहे का? आमच्याकडे मला रोज सकाळी चार चहा करता येतात. हे सगळ्यांना माहिती आहे. तरी सगळे मला मुद्दाम तुच्छ लेखायला वेगळे वेगळे काहीतरी करायला सांगतात. ही तर न चुकता माझे गणित बिघडवते. “अरे आज मी चहा घेणार नाही आहे. माझा करू नकोस.” मग मी खरेतर तिचा चहा नाही करत. तरी ही चिडते. किटलीत एक चहा शिल्लक असतो. तो तिचा नसतो. पण ते तिला कळतच नाही. ती चिडतेच. आता मला सकाळी चार चहा करता येतात हा काय माझा दोष आहे का? मी तिचा चहा नसतोच न केलेला. पण मला चार चहा…
जाऊ दे! ही वेगळी गोष्ट आहे. आता चार चहांची रेसिपी एकदम सोपी आहे. चहाच्या भांड्यात – मागे हिच्या हातून ते पडले होते सुऱ्या ठेवायच्या ठोकळ्यावर, तेव्हा आत एक बरोबर चरा गेला आहे – त्या चऱ्याच्या जरा खाली लागेल या बेताने पाणी घ्यायचे. मग बरोबर चार चहा होतात. त्यात चितळ्यांच्या पाव किलोच्या आम्रखंडाच्या प्लास्टिकच्या डब्याच्या झाकणात मावेल इतकी साखर घालायची, खोकल्याच्या औषधाबरोबर एक मापाचा छोटा पेला येतो, त्यात मावेल इतके आले आणि शकुताईंच्या दिराने दोन पेढे घालून एक डबा दिला होता, आमच्या सहा जणांच्या घरात, त्यामुळे हिने तो त्याला परत दिलाच नाही… हरवला म्हणून सांगितले – त्याचे झाकणभर चहा, हा चहाच्या डब्याच्या झाकणात ठेवायचा. मग पाणी गरम झाले, की तो…
अर्थात इथे सगळ्या सुगरणी आहेत, त्यांना काय हे सांगतोय मी. मुद्दा हा, की मला ही चार चहांची रेसिपी येते. पण आमच्याकडच्या कुणाला ते बघवत नाही. मला मध्येच छोटा सांगतो, की ‘बाबा, मी आजपासून साखर कमी घेणार आहे. मला थोडा कमी गोड चहा कर.’ मग मी मनापासून प्रयत्न करतो चहा कमी गोड करायचा. पण काय होतं – अदपाव श्रीखंडाचं झाकण फारच छोटे होते आणि अर्धा किलाचे खूपच मोठे. मग मी परत आपले पाव किलोचेच घेतो आणि मग मला जे काही आईच्या वरताण कटाक्ष मिळतात, की ज्याचे नाव ते. तर हे सगळे मी का सांगतो आहे, की तसा मी सकाळी चहा केल्यावर खूप स्ट्रेस्ड असतो – तो संपेपर्यंत. त्यात हे दार वगैरे वाजते. सकाळी सकाळी लोकांना काही दुसरा उद्योग नाही आमच्या बेला वाजवण्याच्यापलीकडे. त्यामुळे कधी कधी…
पण आज का असं विचित्र वाटतंय? मी परत तपास करायला म्हटलं, की आपण गुन्हा रिक्रिएट करू या, म्हणून मी परत दाराजवळ जाऊन दार उघडायला लागलो… तर आमच्या आशाबाई मला म्हणाल्या, “बेल नाय वाजली आत्ता!”
“हो पण मगाशी तर वाजली ना!”
“तवा म्यां वाजवली व्हती. आत्ता नाय वाजली”
आता हीला मी काय सांगू, की मी गुन्हा रिक्रिएट करतोय म्हणून! म्हणून मी त्राग्याने तिच्याकडे बघितले तर मला परत तीच विचित्रपणाची जाणीव झाली. हे सगळे विचित्र होत होते. हे असे का होते आहे म्हणून मी जरा आशाबाईंकडे बघतोय, तर ती लाजून आत निघून गेली… अहो हे काय आहे!
इतक्यात हिनी भुवया उंचावल्या.
याचा अर्थ ‘काय झाले? ’ असा होतो. मग मी तिला सांगितले, की “मला सकाळी दार उघडल्यापासून काहीतरी विचित्र झाल्यासारखे वाटत आहे. ही… ही आशा आल्यापासून. नक्की कळत नाही काय ते पण…”
“अरे तिने आज गजरा घातलाय म्हणून असेल!”
“फक्त गजरा घातला म्हणून मला इतके विचित्र वाटेल?”
“जरा मेकपपण केलाय थोडा,” हे असू शकते.
“वाढदिवस आहे का तिचा?”
“तिचा जानेवारीत असतो. ” हे सगळे हिला कसे माहीत हे मला विचारू नका. फक्त आशाबाई आत आली, या एका घटनेत हिला इतक्या सगळ्या गोष्टी कशा दिसतात? मला फक्त काहीतरी विचित्र झाले आहे, इतकेच जाणवले. पण याचा छडा लावायचा मी ठरवलाच. मग मी आशाबाईंना बोलावले, “मला सांग आज तुझा वाढदिवस असतो का?”
“या बया, आत्ता कुठला”
“मग हे…” (असं डायरेक्ट कसं विचारायचे ना! मग काय विचारावे याचा विचार करतोय तोवर आशा पळून गेली आत.)
“आशा, यांना विचारायचे आहे, की आज सजून धजून कशी आल्येस?” मी विचारले असते तर ही तीन दिवस बोलली नसती. पण हिने विचारल्यावर मी एक मिनीटसुद्धा बोलणार नाही असे करू शकत नाही. मला या स्त्रीधार्जिण्या समाजपद्धतीचा मनापासून राग आहे. पण काय करणार! संस्कृती आहे ना ती आपली. पण आशा हिच्या प्रश्नावर एकदम सुखावून बाहेर आली. “अवो आज ऊमन्डे हाये ना, म्हून”
हे माझ्या साधारण तीन मजले वरून गेले. मग हिने परत भुवया उंचावल्या. याचा अर्थ, ‘कळले का? ’ असा होतो. मला असे भुवया वगैरे उंचावायला लागतच नाहीत. हिला साधारण अर्ध्या सेकंदात काय झाले ते कळते.
“वूमन्स डे म्हणत्ये ती!”
आयला! ते ऊमन्डे म्हणजे हे होतं तर!
“पण त्याचं काय एवढं? ”
“आज आमच्या वस्तीत तळागाळातल्या इस्त्रींचे उनीन आलेवते. तेंनी ऊमन्डे म्हून पोग्राम केला. समद्यांचे नौरे बोलले. मांजाबी बोल्ला. तेनीच मला हा गजरा दिलावता.” आता याच्यावर परत भुवया वर गेल्याच. मी नाइलाजाने नकारार्थी मान हलवली. “तळागाळातल्या स्त्रियांचे युनियन” इतकेच बोलून ही माझी स्त्री समोरच्या सासूसुनांच्या कल्पित मायाजालात गुरफटली.
जागतिक वूमन्स डे ला, आमची आशाबाई सजूनधजून ‘नौर्यानी’ दिलेला गजरा माळून आली आणि ही दूरदर्शनवर नसलेल्या सासूसुनांच्या काल्पनिक हेव्यादाव्यांमधे गुंतली हे अगदी योग्यच नाही का!
पण तरी मला जरा कळवळा आला. तसे सगळे दिवस यांचेच असतात म्हणा, पण हा अगदी जागतिक वूमन्स डे म्हणून आपणही काहीतरी करायला हवे असे मला वाटले. आता मी काही गजरा देऊ शकत नव्हतो; पण मी आपल्या काही कॅडबऱ्या मागवल्याा आणि हिच्यासाठी केक. मला वूमन्स डे ला काय करतात ते नाहीच ना माहीत… म्हणून केक. तशी मला याच्यावर, “इश्श आज काय माझा वाढदिवस….” थांबा.. नाही आज नक्की नाही. “…आहे का, केक कापायला” अशी एक भलावण होईल असे वाटत होतेच. पण त्याची माझी तयारी होती.
मी आशाबाईंना जाताना कॅडबरी दिली. आता भुवया दोघींच्या वर झाल्या. मग मी, “आज वूमन्स डे आहे ना म्हणून तुम्हांला.” असे म्हटल्यावर आशाबाईंची कळी खुलली आणि ती कॅडबरी ओच्यात खोचून ती तरातरा निघाली. “आशा थांब, ” ही म्हणाली. आता भुवई… मला नाहीच जमत ते. बायोलॉजिकल डिफेक्ट आहे. एक भुवई उंचावताच येत नाही. तर हिने फ्रिजमधून आणखी एक कॅडबरीचा तुकडा काढून तिला दिला आणि म्हणाली, “हा इथे माझ्यासमोर खा, मग जा. ” माझ्या कॅडबरीला काय वाटले असेल त्याच्या दसपट आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि माझ्या सगळ्या भुवया एकदम उंचवायची वेळ आली होती. मी हिच्याकडे आश्चर्याने बघत होतो. तर आशा नक्की गेली आहे याची खातरी करून ती म्हणाली, “ती कॅटबरी तिने मुलांसाठी ठेवली होती. तिने नसती खाल्ली. म्हणून मी तिला दिली, इथे खा म्हणून.”
मी या चमत्कारिक आशाचा विचार करायला लागलो. हिचा नवरा दारू पिउन येतो. तिला फार मारत नाही, पण थपडावतो. हिच्याकडे पैसे मागतो. तसा तो कामही करतो. मेहनती आहे म्हणे! पण काम रोज नाही मिळत. मग हे चाळे सुचतात. तरी आशा त्याला पिरेम म्हणते. काय करायचं अशा बायकांचं!
“उगाच मोठे प्रॉब्लेम्स बघू नकोस. छोटे छोटेही खूप असतात प्रॉब्लेम्स!”
तुम्हांला सांगतो, ही असे काही सयुक्तिक वगैरे बोलायला लागली ना, की मला आतल्या खोलीत निघून जावेसे वाटते. त्यापेक्षा भांडण परवडले.
“म्हणजे काय आता? ”
“एक दिवस घरातली बाई आहेस असे समजून काम करून बघ, म्हणजे कळेल!”
“त्यात काय! सोप्पं आहे.” असं म्हणून मी तिच्या शेजारी मालिका बघत बसलो, नाहीतरी इतकंच तर करायचं असतं. पण त्यातल्या त्या सासू-सुना बघून मला काही फार आनंद होत नव्हता हे नक्की. इतक्यात काहीतरी विचित्र आवाज यायला लागला.
“हा कसला आवाज गं?”
“वॉशिंग मशीनची सायकल झाली.”
“हो का! असं कळते का ते” मला हे स्वतःहून सांगणारे मशीन आवडले. तसे मागल्या वर्षी हिचा त्रास कमी व्हावा म्हणून मीच आणले होते.
“आता कपडे वाळत घालून पुढचा लॉट लावायला लागेल,”… ही.
मी तिच्याकडे बघत बसलो. मग एकदम मला दृष्टांत झाला.
‘एक दिवस घरातली बायको होऊन बघ,’ याची ही परिणती होती. “त्यात काय करतो की!” मी उठलो. वॉशिंग मशीनचे दार उघडत नव्हते. मला वाटले सायकल अजून चालू असेल, पण ती बंद पडली होती. मी एक दोन तीन बटणे दाबून बघितली. पण ते दार उघडेना. मग मला एकदम एक दारावरचाच एक भाग पुढे आढायचा, मग तसे केले, की ते दार उघडते हे कळले. आतले सगळे कपडे एकामेकांभोवती घट्ट मिठी मारून बसले होते. एक कपडा काढला, की दुसरा बाहेर सांडत होता. आता माझा एक हात हा कपड्यांचा पिळा बाहेर काढत काढत जवळपास छपराला पोचला, तोच आतून मोठी शिट्टी वाजली.
“पाच झाल्या की कुकर बंद कर! ”… ही.
मी दुसऱ्या हाताने त्या पिळ्यातले खालचे कपडे उलटे पिळून वेगळे करायचा प्रयत्न करत होतो, तोवरच कुकरने उरलेल्या शिट्ट्या उरकून घेतल्या. मग ते पिळे तसेच नीट मशीनमधे आत ठेवून कुकर बंद केला. परत पिळे… तोवर तिने तो अख्खा पिळा बाहेर काढून ट्रॉलीवर ठेवला आणि माझ्याकडे आशयपूर्ण नजरेने बघत आत गेली. मग मी ते पिळे अनपिळे करून वाळत घातले आणि पुढचे कपडे मशीनमध्ये घातले.
“मग आता पुढे काय?”
“दोन चमचे साबण घाल त्याच्या कप्प्यात.” आता दोन प्रश्न : साबण कुठे आणि कप्पा कुठे. साबण दिसला मशीनवरच होता. आता कप्पा. दोन तीन दारे ओढल्यावर एक उघडले आणि इथेच बहुतेक साबण जात असेल म्हणून… “तिथे सॉफ्टनर, साबण शेजारी”
मी फार सांगत नाही. आपल्या अपयशाच्या कमानी नसतात बांधायच्या पण पुढच्या काही तासांत मला घरातली बाई ही काय काय करते हे कळून चुकले होते. कुकर थंड व्हायला जेवढा वेळ लागतो, त्या वेळात कापाकापी झाली पाहिजे. मग बटाटे गार व्हायच्या वेळात पोळ्यांची कणीक तिंबून झाली पाहिजे; कारण नंतर तिलापण थोडा वेळ लागतो मुरायला. तोवर वरण सारखे करून घेतले, की बरे असते! वेळ वाचतो. मग बटाट्यांची साले काढून ते कापले, की शेवटी शेगडीवर सगळ्या गोष्टी एकाच वेळी करता येतात. नाहीतर तिथे सगळे वेगळे वेगळे करायला लागते. हे सगळे चालू असताना, बहिणीचा फोन, तिला रेसिपी हवी असते. जोशीकाकूंना आम्लेटचे अंडे बुडलेले चांगले का तरंगलेले हे कळत नसते. रद्दीवाला साडेनऊ किलोचे माप नऊच सांगतो, हे कळायला लागते. इस्त्रीवाल्याला बाकी चालू असलेल्या कुठल्याही गोष्टीचे टायमिंग न चुकवता कपडे द्यायचे असतात. हे सगळे करताना त्या टीव्हीवरच्या सासूसुनांना योग्य न्याय द्यायचा असतो. हे करताना माझे घामटे आणि धिंडवडे असे दोन्ही – सेकंदा सेकंदाला निघत होते.
आश्चर्य म्हणजे मी हे सगळे करत होतो तेव्हा हिचा चेहरा आनंदाने उजळत होता. मला काहीच करता येत नव्हते नीट. मी तर चिडलो असतो अशा वेळी, अशा मूर्ख विद्यार्थ्यावर. पण हिचे उलटे होत होते. ती जास्तीच आनंदी होत होती. मगाचचा आशाबाईंच्या चेहऱ्यावरचा तजेलदारपण आणि हिच्या चेहऱ्यावरचा आनंद हे एकदम एकाच कॅटॅगरीतले! हे कसे? मला काहीच जमत नाही याचा आनंद नव्हता तो. पण मला जमत नाहीये तरी मी करतोय याचा होता.
कुठलाही विचार न करता, मीठ कमी झालंय आज, हे सांगणे आम्हांला पुरुषार्थ वाटतो. भाजी जरा कमीच पडली नाही का? अगं या शर्टावरचा डागच नाही निघाला! या त्रुटी सांगताना आम्हांला होत असतो चूक पकडल्याचा आनंद आणि आज हिला वाटतोय तो फक्त नवरा करतोय, या एकाच गोष्टीचा आनंद. काय करावं यांचं!
असला कसला ‘वूमन्स डे’ साजरा करतो आपण – एका दिवशी त्यांची पूजा करून…?
याला वूमन्सडे म्हणायचे का स्त्रीपोळा? आपण पुरुष इतके स्वार्थी आणि आपमतलबी कसे होतो या बाबतीत? मला वाटले, की आत्ता कुठे मला खरे प्रश्न पडायला लागले आहेत. पण जोपर्यंत आपण असे स्वार्थी आणि आपमतलबी आहोत तोवर तरी या वूमन्स डेची गरज आहे. ही गरज कधी नष्ट होईल का?
माहीत नाही. पण ज्या दिवशी आशाबाई मिळालेल्या कॅडबरीतला एक तुकडा, मुलांना द्यायच्या आधी स्वतः खाईल आणि ज्या दिवशी वॉशिंग मशीन घेताना माझ्या मनात, ते हिचा त्रास कमी करण्यासाठी घेतोय असे येणार नाही किंवा पोहे हिनेच करायचे आहेत, शर्टावरचा डाग हिने काढायचा आहे, हे ज्या दिवशी आम्ही गृहीत धरणार नाही त्या दिवशी कदाचित वुमन्स डे
साजरा करायची गरज संपेल… पण तोवर तरी करावाच लागेल.

Happy Women’s Day !
भ भन्नाट विनोद. आणि शेवटी खरेच अंतर्मुख करायला लावणारे लेखन.
मस्त! खुसखुशीत.