ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ६

 अमृता प्रीतम : भारतीय साहित्यातील एक लखलखते आणि बंडखोर नाव 

मल्याळम, तेलगू , कन्नड आणि मराठी या चार भाषांमधील साहित्यिकांचा परिचय करून घेतल्यानंतर आपण आज पाचव्या भाषेतील लेखकाला भेटणार आहोत आणि ‘पाच नद्यांचा प्रदेश’ – पंजाबमधील ते सर्वपरिचित नाव आहे अमृता प्रीतम यांचे. त्यांना १९८१ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.

आजच्या भारतातील पंजाबी भाषकांची संख्या ३.५ कोटींच्या आसपास असली, तरी पाकिस्तानातील जवळपास १० कोटी आणि सौदी अरेबिया, कॅनडा, इंग्लंड आदी देशांतील मिळून १४ कोटींच्या वर पंजाबी भाषक जगभरात आहेत. ही संख्या हिंदी आणि बंगाली भाषकांच्या खालोखाल आहे. दुर्दैवाने या भाषेमध्येदेखील धर्माने विभाजन केले आहे. भारतात ‘गुरुमुखी’ तर पाकिस्तानात ‘शाह्मुखी’ (उर्दू) लिपीचा वापर होतो. मूळ संस्कृतोद्भव असली, तरी वारंवार झालेल्या मुस्लीम आक्रमणांमुळे तिच्यात अरेबिक, पर्शिअन, तुर्की त्याचप्रमाणे लगतच्या प्रदेशांतील सिंधी, हरयाणवी, पश्तो, हिंदुस्तानी  आणि ब्रिटिशकालीन प्रभावाने इंग्रजी शब्द सामावले आहेत. 

 पंजाबी भाषेचा ‘जन्म’ सातव्या शतकातील समजला जातो. ९ व्या ते १४ व्या शतकातील ‘नाथ योगी’ कालखंडात अगदी सुरुवातीचे लिखाण आहे. १५ व्या शतकापर्यंतच्या पंजाबीला प्राचीन, तर १९ व्या शतकापर्यंतच्या पंजाबीला ‘मध्ययुगीन’ संबोधले जाते. फरिदुद्दिन गंजशकर(१३ वे शतक) हा पहिला महत्त्वाचा कवी समजला जातो. बुल्ले शाह, वारिस शाह, मिया मुहम्मद बक्ष अशा अनेक महान सूफी संत आणि कवींनी १२ व्या ते १९ व्या शतकांदरम्यान पंजाबीत रचना केल्या. विशेष गोष्ट म्हणजे आपले संत नामदेव यांचे पंजाबमधील घुमान येथे १४ व्या शतकात अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यांनी पंजाबी भाषेत रचलेले ६१ अभंग ‘गुरुग्रंथ साहिब’मध्ये समाविष्ट आहेत.

शीख धर्माची स्थापना १५ व्या शतकात झाली. ‘गुरुग्रंथ साहिब’ हा धर्मग्रंथ गुरुमुखी लिपीत आहे. गुरु नानक यांचे चरित्र ‘जनमसखीस’ हे आद्य पंजाबी गद्य साहित्य. पंजाबीमध्ये ‘किस्से’ हा महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे. ते प्रामुख्याने प्रेम, विश्वासघात, त्याग, सामाजिक मूल्ये आणि सामान्य माणसाचा व्यवस्थेविरुद्धचा लढा यांवर असतात. ‘हीर रांझा’(वारिस शाह), ‘सोहनी महिवाल’(फझल शाह) हे काही लोकप्रिय किस्से. शूर वीरांचे गुणगान करणारे पोवाडे ‘वार’ ही पंजाबीतली समृद्ध मौखिक परंपरा आहे. ‘चांदी दी वार,’ ‘जंगनामा’ ही त्यांची काही उदाहरणे.

ब्रिटिश राजवटीतील शिक्षण पद्धतीतून कादंबरी, नाटक, मुक्तच्छंदातील काव्य अशा आधुनिक साहित्याची सुरुवात झाली. नानक सिंग, वीर सिंग, धनी राम चात्रिक ही आधीच्या काळातली, तर जसवंत सिंह कंवल, शिवकुमार ‘बटालवी,’ सुरजित पातर, गुरदियाल सिंग ही नंतरच्या काळातील महत्त्वाची नावे. या दोन्ही कालखंडांत अमृता प्रीतम याच आघाडीच्या लेखिका होत्या. 

३० एप्रिल १९६२ रोजी पतियाळा येथे ‘पंजाबी युनिवर्सिटी’ची स्थापना झाली. जेरुसलेमच्या हिब्रू युनिवर्सिटी नंतरचे हे भाषेसाठी निर्माण झालेले जगातील दुसरेच विद्यापीठ. त्यातील संशोधन केंद्र अनेक आघाड्यांवर काम करत आहे. २०१४ मध्ये ‘पंजाबीपीडिया’ सुरू झाला आहे. (२०२४ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ रिद्धपूर येथे सुरू केले आहे.)

भारतातील साहित्य अकादमी पुरस्कारांव्यतिरिक्त कॅनडातील बर्ज आणि रिटा धाहान यांनी गेल्या काही वर्षांपासून जगभरातील सर्वोत्कृष्ट पंजाबी साहित्यासाठी पुरस्कार सुरू केले आहेत. २५००० कॅ.डॉलरचा पहिला, प्रत्येकी १०,००० डॉ.चे दोन द्वितीय आणि लिप्यंतरासाठी ६००० डॉ. चा एक असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. १९५४ मध्ये स्थापन झालेली ‘पंजाबी साहित अकादमी’ आणि दिल्लीतील ‘पंजाबी अकॅडेमी’ या पंजाबी भाषेसाठी कार्य करणाऱ्या अन्य काही संस्था.

गुरदियाल सिंग हे पंजाबी भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार (१९९९) मिळवणारे दुसरे साहित्यिक. अत्यंत गरिबीतून त्यांनी शर्थीने एम.ए. पर्यंतचे शिक्षण केले. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या, आत्मचरित्र व बालसाहित्य आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, सोविएत लॅंड नेहरू पुरस्कार, भाई वीर सिंग फिक्शन अवॉर्ड आणि शिरोमणी साहित्यकार अवॉर्ड असे विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले. ‘अधचनानी रात,’ ‘मढी दा दिवा’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. 

शिवकुमार ‘बटालवी’ हे काळाने अकाली हिरावून नेलेले पंजाबी साहित्यिक. ‘लूना’ महाकाव्यासाठी अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 

सुरजित पातर हे पंजाबी साहित्यातील आणखी एक लक्षणीय नाव. स्वतःच्या कवितांखेरीज त्यांनी अन्य भारतीय आणि विदेशी भाषांमधील उत्तम साहित्याचे पंजाबीत अनुवाद केले. साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सम्मान, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार यांसह अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले.

पंजाबी भाषा, तिचे साहित्य आणि काही महत्त्वाचे साहित्यिक यांच्या धावत्या आढाव्यानंतर आता मुख्य विषयाकडे वळू या.

अमृता प्रीतम : निरंतर साहित्य सेवेचा कित्ता 

अखिल भारतीय स्तरावर ज्या मोजक्या साहित्यिकांची नावे बहुसंख्य लोकांना माहीत असतात त्यांमध्ये अमृता प्रीतम या अग्रणी असाव्यात.

त्यांचा जन्म १९१९ मध्ये आताच्या पाकिस्तानमधील गुजरानवाला शहरात झाला. त्यांचे वडील कवी आणि ब्रज भाषा पंडित होते. शिक्षिका असलेल्या आईशी अमृतांची विशेष जवळीक होती. लहानपणीच मातृछत्र हरपल्याने त्यांना एकलेपणाने ग्रासले. यातूनच त्या कवितेकडे वळल्या. ‘अमृत लहरां’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प्रसिद्ध झाला. त्याच वर्षी त्या प्रीतम सिंग यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. पुढील काही वर्षांत अमृतांचे आणखी ५-६ काव्यसंग्रह प्रकाशित झाले. सुरुवातीच्या काळात स्त्रियांची दुःखे आणि वेदना आपल्या लेखनातून व्यक्त करणाऱ्या अमृता त्यानंतर प्रागतिक साहित्यिक चळवळीकडे ओढल्या गेल्या. बंगालच्या १९४३ मधील भीषण दुष्काळावरील ‘लोकपीड’(जनतेची वेदना) या रचनेतून त्यांनी तत्कालीन राजवटीवर कडवे भाष्य केले. विवाहानंतर लाहोरला स्थलांतर केल्यावर त्यांनी काही वर्षे तेथील रेडिओ स्टेशनवर काम केले.

फाळणीनंतर त्या लाहोर सोडून दिल्लीत आल्या. फाळणीच्या कालखंडात त्यांनी जे अनुभवले त्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या, कवितांमध्ये हा विषय पुनःपुन्हा येत राहिला. त्या काळातील “अज्ज आखां वारिस शाह नू” (आज मी वारिस शाहला साद घालतेय) या दीर्घ कवितेतून त्यांनी हिंसेचा निषेध करत माणुसकीला आवाहन केले होते. फाळणीवरील साहित्यात या कवितेचा अग्रक्रम आहे.

भारतात आल्यावर अमृता अनेक वर्षे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर उर्दू विभाग सांभाळत होत्या. त्याच काळात त्यांचे कौटुंबिक जीवन ठेचकाळत चालले होते. साहिर लुधियानवींच्या त्या निकट आल्या होत्या. कोणत्याही प्रकारच्या कटुतेशिवाय, कज्जे दलाली न करता त्या १९६० मध्ये विभक्त झाल्या; मात्र साहिर यांची साथदेखील सुटली. आयुष्यातील अखेरची ४० वर्षे इमरोज या त्यांच्यापेक्षा ७ वर्षांनी लहान असलेल्या चित्रकार मित्राने अमृता यांना भावनिक आधार दिला. त्या दोघांनी ‘नागमणी’ या साहित्यविषयक मासिकाचे ३३ वर्षे संपादन केले. या दोन व्यक्तिमत्त्वांच्या संदर्भात अमृता म्हणतात, ‘साहिर हा एक विचार होता… हवेत चमकणारा, बहुधा माझ्या स्वतःच्याच विचारांची जादू होती ती… पण इमरोजबरोबर घालवलेले आयुष्य म्हणजे आरंभीची काही वर्षे सोडली तर एक अखंड धुंदी आहे.’

आयुष्यात अनेक उलथापालथी होत असताना अमृतांचे लेखन मात्र अव्याहतपणे सुरूच होते. त्यांच्या ‘सुनेहडे’(निरोप, संदेश) काव्यसंग्रहाला १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या संग्रहात त्यांच्या प्रेमाच्या आणि विरहाच्या तीव्र भावना व्यक्त झाल्या आहेत.

त्याआधी १९५० मध्ये लिहिलेली पिंजर (हाडांचा सांगाडा) ही त्यांची छोटेखानी कादंबरी फाळणीपूर्व आणि फाळणीच्या काळातील – आता पाकिस्तानात गेलेल्या पंजाब प्रांतातील पूरो या हिंदू स्त्रीची करुणरम्य कहाणी आहे. लग्न काही दिवसांवर आलेले असताना तिच्यावर आशिक झालेला रशीद हा मुस्लीम तरुण तिचे अपहरण करतो. आई – बाप आपला स्वीकार करत नाहीत हे कटू वास्तव ध्यानात आल्यावर ती रशीदशी विवाह करते. त्यानंतरचे तिचे आयुष्य, तिच्यासारख्याच किंवा तिच्याहून अधिक दुर्दैवी स्त्रियांसाठी तिने केलेली धडपड, फाळणीदरम्यानचे हिंसाचार यांचे प्रभावी चित्रण कादंबरीत आहे. तीवर आधारित चित्रपटही आला होता. कादंबरीतील काही ओळी : ‘जशा खरबुजाच्या फाका केल्या जातात   शहराशहरांत गावागावांत माणसं कापली जात होती. जशी हवेबरोबर धूळ उडत येते, तशा आसपासहून माणसांच्या कापाकापीच्या बातम्या येत होत्या. लोक मारले जात होते. घर  घर जाळले जात होते. शेजाऱ्यांना शेजारी मारत होते. रस्त्यात चालणारा वाटसरू वाटसरूंना मारत होता. लोकांचे प्राण सुरक्षित नव्हते. मालमत्ता सुरक्षित नव्हती.’

अमृता प्रीतम यांनी आत्मकथनात्मक तीन पुस्तके लिहिली. त्यांतील ‘रसीदी टिकट’ हे विशेष गाजलेले! आपल्या आयुष्यातील प्रेम, संघर्ष आणि साहित्याचा प्रवास अमृताजींनी या पुस्तकात मांडला आहे. त्यातील काही उतारे :

‘याप्रमाणे सोळावे वर्ष आले आणि निघून गेले. या वर्षात सगळं ओळखीचं जग शरीरावरच्या वस्त्राप्रमाणे तंग होत जाते. ओठ आयुष्याच्या ओढीमुळे शुष्क पडतात. ज्यांना कधी सप्तर्षींच्या रूपात बघून दुरूनच प्रणाम केला होता, त्या आकाशातल्या ताऱ्यांना हातात घेण्याचा मोह होतो… वातावरणात इतके अडथळे आणि इतका विरोध असतो, की श्वासामध्ये आगीची धग उभी राहते .’

असफल प्रेमानंतर मनाची अस्वस्थ अवस्था त्यांनी मुक्तच्छंदात वर्णन केली आहे त्यातील एक कडवे :

‘रात्रीचा वाडगा कुणी मधाने भरू शकला नाही व वास्तविकतेचे ओठ कधी तो मध चाखू शकले नाहीत…. हा दुःखान्त नसतो.

दुःखान्त असतो जेव्हा रात्रीच्या वाडग्याला असलेली चंद्रम्याची कल्हई निघून जाते व वाडग्यात असलेली कल्पना नासून जाते.’

अमृता प्रीतम यांची साहित्य संपदा विपुल आहे. पंजाबीतच नव्हे तर हिंदी, उर्दूमध्येदेखील त्यांनी लिहिले. २९ काव्यसंग्रह, २४ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, लोकगीतांचे संग्रह, निबंध, लेख, आत्मचरित्रे अशी जवळपास शंभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते यांच्याशी त्यांची जवळची मैत्री होती. शेवते यांनी अमृतांची प्रदीर्घ मुलाखत रेकॉर्ड केली आहे. त्यांच्या पुस्तकांचे अनेक भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले. डॉ. पद्माकर जोशी यांनी त्यांच्या काही कादंबऱ्या मराठीत आणल्या आहेत. -‘कागज ते कॅनव्हास’  (कागद आणि कॅनव्हास) या १९७० मध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. मानवी जीवनातील रितेपण, तीव्र दुःख आणि वेदनांचा शोध त्यांनी यात घेतला आहे. पारंपरिक काव्यशैलीऐवजी मुक्तच्छंद आणि समकालीन प्रतिमा, रूपकांचा वापर केला आहे. पुस्तकाच्या शीर्षकातून कलाकाराच्या अभिव्यक्तीमधील द्वैत दर्शविले आहे. क्षणभंगुर शब्द (कागद) आणि सर्जक दृष्टान्त (कॅनव्हास) यांचा सखोल भावनिक वास्तव व्यक्त करण्यासाठी वापर केला आहे.

सततच्या भावनिक आंदोलनांमुळे आयुष्याच्या एका टप्प्यावर अमृता जे. कृष्णमूर्ती आणि ओशोंकडे वळल्या. ओशोंच्या अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना त्यांनी लिहिल्या. आध्यात्मिक विषय आणि स्वप्ने यांवर त्यांनी लिहिले – उदा. ‘काल चेतना,’ ‘अग्यात का निमंत्रण.’

पंजाबच्या साहित्यिक वर्तुळात त्या बहुशः एकाकीच राहिल्या. समकालीन साहित्यिकांचे लिखाण आणि विशेषतः त्यांची मनोवृत्ती यांबद्दल त्यांच्या नकारात्मक भावना होत्या. भारतीय लेखकांचे एक डेलिगेशन सोव्हिएत रशियाला जायचे होते. तेव्हा लेखकांच्या निवडीसाठीच्या बैठकीमध्ये केवळ पंजाबी लेखकांनीच त्यांच्या नावाला विरोध करतांना म्हटले, ‘अमृता डेलिगेशनमध्ये असली तर आमच्या बायका आम्हांला जाऊ देणार नाहीत.’ (संदर्भ: रसीदी टिकट) अमृतांची यावर प्रतिक्रिया होती, की त्यांना जेव्हा एकटीला निमंत्रण येईल तेव्हाच त्या जातील आणि खरोखरच १९६१ मध्ये रशिया, कझाकस्तानासह चार देशांना त्या जाऊन आल्या. 

त्या कायम सत्याला जागून राहिल्या. एकदा त्यांना हिशोबाच्या खोट्या कागदावर सही करायला सांगितले गेले तेव्हा नकार देताना त्या म्हणाल्या, ‘ज्या हाताने मी लेखन करते, त्या हाताने मी खोटं काम करणार नाही.’

अमृता प्रीतम यांना असंख्य सन्मान प्राप्त झाले. त्या सहा वर्षे राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्यांना इ.स. २००० मध्ये ‘शताब्दीसम्मान पुरस्कार,’ २००४ मध्ये ‘पद्मविभूषण’ आणि अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी ‘साहित्य अकादमी फेलोशिप’ मिळाली. ‘पंजाब रतन’ पुरस्कार हा पंजाब शासनातर्फे देण्यात येणारा पुरस्कार पंजाबसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्य करणाऱ्यांना दिला जातो. अमृता त्याच्या पहिल्या मानकरी होत्या. अनेक विद्यापीठांकडून त्यांना मानद डी. लिट.ने सन्मानित करण्यात आले. ‘गर्म हवा’ या फाळणीशी संबंधित प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक एम.एस. सथ्यू यांनी ‘एक थी अमृता’ या नाट्यप्रयोगातून त्यांना मानवंदना दिली. या सर्वांवर कडी म्हणजे पाकिस्तानच्या पंजाबी अकॅडमीने ‘शतकातली सर्वोत्तम कवयित्री’ असा किताब त्यांना दिला. भावुक झालेल्या अमृतांची प्रतिक्रिया होती, ‘माझ्या माहेराला माझी आठवण येण्यास खूप उशीर झाला.’

वयाच्या ८४ व्या वर्षी त्या घरीच पडल्या. कंबरेचं हाड मोडलं. नंतर क्षयाची बाधा झाली. पैशांची पुंजीदेखील संपली. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना १ लाख रुपये पाठविले आणि  आकाशवाणीवरून त्यांच्यासाठी रसिकांना आवाहन केले. 

३१ ऑक्टोबर २००५ रोजी एका अस्वस्थ, बंडखोर आणि प्रतिभावान आयुष्याची अखेर झाली. 

Author

Leave a Reply