झुकझुक आगीनगाडी  : १७

रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय असावा आणि रेल्वेतील आंतरविभागीय कारभार  सुरळीत चालावा  याकरता प्रत्येक  विभागाची  एक संहिता असते आणि वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा होत असतात. ह्या लहान मोठ्या  सुधारणांची अंमलबजावणी योग्य वेळी आणि योग्य कालमर्यादेत  होते की नाही याकरता अतिउच्चस्तरीय बैठका होतात  आणि त्या सुधारणांची अंमलबजावणी झाली की नाही  याची त्या  ठिकाणी तपासणी केली जाते. अशा अतिउच्चस्तरीय  तपासण्यांमध्ये त्या रेल्वे प्रभागातील त्या-त्या विभागाचे, महाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आणि एक मुख्य महाव्यवस्थापक असा जथा वार्षिक निरीक्षणास आपापल्या विभागाचा फौजफाटा घेऊन जात असतात. अशा तपासण्यांना  GM Inspection (महाप्रबंधक यांची  तपासणी ) असे म्हटले  जाते. तो एक मोठा दिमाखदार राजेशाही  सोहळाच असतो. तपासणीची तारीख आली, की  रेल्वेच्या सगळ्या विभागांत वारे संचारते. काही कर्मचारी/अधिकारी पु.लंच्या ‘नारायण’ या व्यक्तिरेखेत शिरतात. नारायण जर रेल्वेत असता तर कसा वागला असता  हे डोळ्यांसमोर येते. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्याला जरी काही काम सांगितले किंवा  काही विचारले, की त्यांचे उत्तर “GM  Inspection” असेच देतात आणि अहोरात्र सगळे कामाला लागतात. वर्षभर रखडणारी कामे आठवड्यात पूर्ण होतात आणि… मग तो दिवस उजाडतो. 

अशा तपासण्यांदरम्यान त्या अधिकाऱ्याचा  कुटुंबकबिलाही कधीकधी सोबत  असतो.  त्यांची सरबराई ती वेगळीच! “गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज राहिले,” याची प्रचिती अशा वेळी हमखास येतेच. ‘शिष्टाचार’  अशा गोंडस नावाखाली असे बरेच काही खपवले जाते. असो! चालायचंच !   

या तपासणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रेल्वे स्थानके, (स्थानकाच्या उत्पन्नानुसार  स्थानकांचे प्रकार असतात आणि त्यानुसार सोईसुविधा पुरविल्या जातात.) वेगवेगळ्या प्रकारचे लहान, मोठे  रेल्वेपूल, रेल्वे मार्गावरील चढ आणि  उतार, वळणे, बोगदे, नवीन रेल्वे मार्ग, त्यांची सिग्नल आणि दूरसंचार व्यवस्था, गाडीचा वेग आणि इतर बऱ्याच – प्रवास  आणि सर्व बाबींतील  सुरक्षितता यांच्याशी  निगडित असण्याऱ्या गोष्टी – यांचा  काटेकोरपणे लेखाजोखा   घेतला जातो. याशिवाय  नवीन  रेल मार्गाचे राष्ट्रार्पण, सिमेंट आणि ऑइल कंपनी, खाणी यांना लागणारे वेगळे रेल मार्ग(Siding Track ) अशा  अनेक गोष्टी यांचे निरीक्षण  आणि परीक्षण केले जाते.  याशिवाय स्थानिक जनतेची रेल्वे संदर्भातील  गाऱ्हाणी ऐकून ती शक्य असल्यास जागेवरच दूर केली जातात. अशा तपासण्यांदरम्यान काही  कर्मचारी, अधिकारी यांचे भरीव कार्याबद्दल  कौतुक करून जागेवरच प्रशंसापत्र/रोख स्वरूपातील बक्षीस  दिले जाते आणि चुकांबद्दल गंभीर शिक्षासुद्धा केली जाते. निरीक्षण पूर्ण झाल्यावर रेल्वे सांस्कृतिक अकादमीतर्फे मनोरंजन आणि श्रमपरिहार केला जातो. निरीक्षणादरम्यान काही गंभीर/विनोदी किस्सेसुद्धा घडतात.

अशाच एका स्टेशनवर  GM Inspection होते. निरीक्षणादरम्यान  एक महाव्यवस्थापक  दर्जाचे अधिकारी वार्षिक निरीक्षणास  आले असता झालेली  घटना : हे अधिकारी वैद्यकीय शाखेचे  होते. स्वच्छतेच्या बाबतीत खूपच जागरूक होते.(अशा वेळी जेथे निरीक्षण होणार असते त्या ठिकाणी त्या  अधिकाऱ्याची  कीर्ती   आधीच पोहचत असते.)   

 त्या स्टेशनवर कार्यरत असलेला स्टेशन मास्टर दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणार होता. त्याच्या सेवाकाळातील हे शेवटचे GM Inspection होते.ते अधिकारी कोणकोणत्या  तपासण्या करतात हे त्याला कुणीतरी अतिरंजित करून सांगितले. त्यामुळे तो खूपच घाबरला होता. सावधगिरीचा  उपाय म्हणून त्याने स्वखर्चाने सार्वजनिक   स्वच्छतेसाठी लागणारे दोन कामगार आणले होते. त्यांचे एकच काम : शौचगृहाचा  वापर झाला,  की एक बादली पाणी  टाकणे आणि खराटा  फिरवणे. यथावकाश GM Inspectionची  सजवलेली   गाडी त्या स्टेशनमध्ये दाखल झाली. स्थानिक रेल्वे डॉक्टरने  त्या वैद्यकीय महाप्रबंधक अधिकाऱ्याचे स्वागत केले. गप्पाटप्पा झाल्यावर  ते अधिकारी म्हणाले, “चलो अब शौचगृह कितना साफ है दिखाना,” ही सगळी फौज तिकडे निघाली. तेवढ्यात  एक कामगार येऊन स्टेशन मास्टरच्या कानाशी काहीतरी पुटपुटला. स्टेशन-मास्टरनेसुद्धा त्याला लगेच काहीतरी सांगितले. तो कामगार लगेच पळाला. तोपर्यंत ही सर्व फौज त्या स्टेशनवरील शौचगृहापाशी पोहोचली. एक शौचगृह बंद होते आणि दुसरे उघडे होते आणि स्वच्छ होते. ते पाहून झाल्यावर त्या वैद्यकीय महाप्रबंधक अधिकाऱ्याने फलाटावरील इतर  स्वच्छता, त्या स्थानकावरील प्रथमोपचार साहित्य पेटी, स्टेशनच्या  आसपास असलेले दवाखाने यांची  यादी आणि त्या दवाखान्याचे  रेल्वे स्थानकापासूनचे अंतर, जवळपास असलेल्या डॉक्टरांची नावे  आणि त्यांचे फोन क्रमांक हे सर्व  पाहून झाल्यावर  समाधान व्यक्त केले आणि निरीक्षण  पुस्तिकेत ‘उत्तम, साफसुथरा स्थानक’ असा शेरा मारला  आणि  तो अधिकारी निरीक्षण गाडीत जाऊन बसला. कार्यावर असलेला स्टेशनमास्टर शेरा वाचून कृतकृत्य झाला. आता तो समाधानाने सेवानिवृत्त होणार होता. त्याच्यावर आलेले संकट टळले होते. सर्व महाव्यवस्थापक  अधिकारी आल्यावर  GM Inspection ची सजवलेली  गाडी पुढील तपासणीस  निघाली आणि त्या स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी हुश्श  केले.  गाडी निघाली हे पाहून त्या स्टेशन मास्टरने जाऊन ते तपासणीदरम्यान  बंद असलेले  शौचगृह ठोठावले आणि  म्हणाला, “XXX  भाहिर   ये GM  गेला.” XXX   बाहेर आला आणि त्याने भडाभडा उलटी केली. कारण ते शौचगृह  त्या ‘तपासणी-गोंधळादरम्यान’ येऊन कोणीतरी खूपच घाण केले होते. एका  बादलीने काम होणार नव्हते  म्हणून तो  कामगार येऊन स्टेशनमास्टरच्या  कानाशी ते  पुटपुटला होता. प्रसंग बाका  होता. त्याला आपली सेवानिवृत्ती आठवली. त्याने लगेच त्याला सांगितले, “आत  जाऊन कडी लावून बस.”… आणि त्या  स्टेशनमास्टरवरील दुर्धर प्रसंग टळला. त्या स्टेशन मास्टरला प्रशंसापत्र/रोख स्वरूपातील बक्षीस  जरी काही नाही मिळाले; तरी  त्या स्टेशनमास्टरने XXXला  त्या वेळी  ५०  रुपये रोख बक्षीस   दिले आणि म्हणाला,  “जा !! फूल  क्वार्टर मार.” 

मीसुद्धा त्याच  गाडीत होतो. मलासुद्धा ताण  आला होता;  कारण पुढील स्टेशनापासून माझे कार्यक्षेत्र सुरू होणार होते. मी माझ्याकडील सर्व सेक्शन डिटेल्स, मुंबई/दिल्लीची सर्व टेक्निकल आणि सुरक्षाविषयक  परिपत्रके   बघितली; कारण  पुढील १५० किमी पर्यन्त  मलाच उत्तर द्यावे लागणार होते. त्या वेळेस OFC तंत्रज्ञान नुकतेच सोलापूर मंडळामध्ये सुरू झाले होते. OFC तंत्रज्ञानाबद्दल मला खूपच आत्मविश्वास होता. पुढील स्टेशन आले.  उपकरणे, मदतनीस, त्या सेक्शनचे  कनिष्ठ अभियंता आणि त्या स्टेशनावरील तंत्रज्ञ यांच्यासमवेत मी खाली उतरलो. माझ्या सोलापुरातील  वरिष्ठांसोबत  आणि महाव्यवस्थापक यांच्याबरोबर आमच्या स्टेशनवरील  उपकरण कक्षात पोहोचलो. महाव्यवस्थापक  यांनी तेथील  अत्याधुनिक अशा OFC Equipment बद्दल माहिती विचारली. त्या वेळी एक  कनिष्ठ  अधिकारी – पण तो  माझ्यापेक्षा वरिष्ठ झाला होता –  माहिती सांगू लागला.  तो  महाव्यवस्थापकांवर छाप   मारायच्या हेतूने अति  पुढे-पुढे करून बढाया मारत होता.  मला कळत होते, की तो चुकीचे सांगत आहे. मी शांत उभा होतो. त्यादरम्यान महाव्यवस्थापक यांनी एक तांत्रिक प्रश्न विचारल्यावर तो  गडबडला. ते  पाहून माझे सोलापुरातील वरिष्ठ लगेच म्हणाले, “हेमंतजी आप OFC SDH Equipment और Nokia  एक्सप्लेन करो!” मी महाव्यवस्थापक यांना अथपासून इतिपर्यंत सर्व सांगितले.  त्यांनी माझे नाव विचारून घेतले आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाले, “वेल डन! ये नया टेक्नॉलॉजी है.  आप दुसरे  को भी आप जैसा तय्यार करो. सोलापूर तक  आप मेरेही  साथ रहो.” मला उगीचच  भारी वाटले; पण त्यांच्यासोबत पूर्णवेळ थांबणे माझ्या गळ्यात पडले! थोडक्यात काय तर  मला माझी अतिहुशारी नडली. बाकीच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा स्मित करून आपला ‘In charge’  खरंच ‘शाणा’ आहे याची प्रचिती करून दिली. मला जबलपूरचे दिवस आणि ते GM  Inspection  आठवले. सोलापूरपर्यंत मला कोणत्याही GM  Inspection चा  त्रास झाला  नाही.  तपासणी पूर्ण झाल्यावर सोलापुरात आल्यावर  रेल्वे सांस्कृतिक अकादमीतर्फे आयोजित मनोरंजन आणि श्रमपरिहार कार्यक्रमात मी सामील झालो. 

तपासणीदरम्यान ज्या ठिकाणी आम्हांला रेल्वे मार्गावरच अध्येमध्ये   थांबायचे असते त्या ठिकाणी आम्ही अशी चित्रात दाखवलेली  मोटर किंवा ढकलणाऱ्यां  गाडीचा वापर करत असतो.

Author

Leave a Reply