पठण, वाचन आणि कुतूहल : ज्ञानसाधनेचा बदलता प्रवास

नवीन पिढीमध्ये इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल, टॅबलेट, संगणक आणि AI आधारित साधने आज दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. माहिती काही सेकंदांत उपलब्ध झाली आहे. प्रश्न विचारताच उत्तर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची चिंता सतत व्यक्त केली जात आहे; ती म्हणजे नव्या पिढीमध्ये ‘वाचनसंस्कृती’चा होत असलेला ऱ्हास!

अनेकांना असं वाटतं, की वाचन कमी झालं, तर ज्ञानही कमी होईल. पुस्तकं वाचली नाहीत, तर विचारक्षमता कमी होईल. अभ्यासाची सवय नष्ट होईल. नवी पिढी वरवरची माहिती घेईल, पण सखोल ज्ञानापासून दूर जाईल. ही भीती समजण्यासारखी आहे. पण थोडा खोलवर विचार केला, तर या भीतीत तितकेसे सत्य वाटत नाही.आपण आज ज्या वाचन संस्कृतीबद्दल बोलतो, ती फार जुनी नाही. मुद्रणयंत्राचा प्रसार झाल्यानंतर, म्हणजे साधारण गेल्या ३०० ते ४०० वर्षांत, वाचन संस्कृतीचा विस्तार झाला. त्याआधी ज्ञानाचा प्रसार वेगळ्या पद्धतीनं होत होता. भारतात हजारो वर्षे ज्ञान हे प्रामुख्याने तोंडी पद्धतीनं दिलं जात होतं.

ऋषी, मुनी आणि आचार्य शिष्यांना ज्ञान प्रत्यक्ष सांगत असत. गुरू बोलत असत. शिष्य ऐकत असत. त्यामुळे ऐकणं हीच पहिली आणि महत्त्वाची पायरी ठरत असे. ऐकलेलं ज्ञान लक्षात ठेवणं ही पुढची पायरी होती. स्मरणशक्तीला त्या काळात विशेष महत्त्व दिलं जाई. मंत्र, सूत्रं, श्लोक यांची रचना मुद्दामच अशी केली जाई, की ती लक्षात राहावीत. छंद, लय, ताल आणि पुनरुक्ती यांचा उपयोग केला जाई. त्यामुळे पाठांतर सोपं होत असे. वेद, उपनिषदे, स्मृती हे सर्व मुख्यतः पाठांतराच्या माध्यमातून जपले गेले. त्या काळात छापील पुस्तकं नव्हती. लेखनसाहित्य सहज उपलब्ध नव्हतं. तरीही ज्ञान नष्ट झालं नाही. उलट, दीर्घ काळ टिकलं.परंतु या ज्ञानपरंपरेची एक मर्यादा होती. ज्ञान हे प्रामुख्यानं त्या ऋषी-मुनींच्या थेट संपर्कात येणाऱ्या शिष्यांपुरतंच मर्यादित होतं. सर्वसामान्य लोकांपर्यंत ते सहज पोहोचत नसे. गुरुकुलात प्रवेश, शिष्यत्वाची पात्रता, दीर्घ काळ अभ्यास करण्याची संधी – या गोष्टी सर्वांनाच मिळत नसत. त्यामुळे ज्ञानाचा विस्तार खोल होता, पण व्यापक नव्हता.यालाच मी ‘पठण संस्कृती’ म्हणतो. ऐकणं, लक्ष देणं, स्मरणात ठेवणं आणि पुनरुच्चार करणं – या चार टप्प्यांतून ज्ञान पुढे जात होतं.ही पद्धत काही वर्षं नव्हे, तर हजारो वर्षं टिकली. भारतासारख्या विशाल आणि विविधतेनं नटलेल्या देशात एवढा मोठा ज्ञानसाठा टिकून राहिला, हेच या पद्धतीचं सामर्थ्य दाखवतं. लिखित साधनं नसतानाही ज्ञानाची परंपरा अखंड राहिली.

मुद्रणयंत्राचा प्रसार झाला आणि ज्ञानाच्या इतिहासात एक निर्णायक वळण आलं. पुस्तके मोठ्या प्रमाणावर छापली जाऊ लागली. एकाच ग्रंथाच्या अनेक प्रती उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे ज्ञान एका व्यक्तीकडे किंवा एका संस्थेकडे मर्यादित राहिलं नाही. ते भौगोलिक सीमा ओलांडून समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचू लागलं.यामुळे ज्ञान केवळ गुरुकुल, मठ किंवा विशिष्ट विद्वानांच्या संपर्कापुरतंच मर्यादित राहिलं नाही. सामान्य माणसालाही पुस्तक हातात घेऊन शिकण्याची संधी मिळाली. शिक्षणासाठी गुरूच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर पूर्ण अवलंबून राहावं लागेनासं झालं. वाचनाच्या माध्यमातून स्वतःच्या गतीनं, स्वतःच्या वेळेनुसार ज्ञान मिळवणं शक्य झालं.या बदलामुळे ज्ञानप्रसाराची जबाबदारी नव्या घटकांकडे आली. ऋषी-मुनी जे कार्य करत होते, ते अधिक व्यापक स्वरूपात लेखक, शिक्षक आणि संशोधक करू लागले. लेखकांनी विचार लिहून ठेवले. शिक्षकांनी ते समजावून सांगितले. संशोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आणि नवे अर्थ लावले. ज्ञान ही स्थिर गोष्ट राहिली नाही, तर सतत विकसित होणारी प्रक्रिया बनली.

वाचन संस्कृतीचा उदय हा केवळ तांत्रिक बदल नव्हता. ते एक सामाजिक परिवर्तन होतं. ही प्रक्रिया ज्ञानाचं लोकशाहीकरण करणारी होती. म्हणजे ज्ञान काही निवडक लोकांचा विशेषाधिकार राहिलं नाही, तर अधिकाधिक लोकांसाठी खुलं झालं. वाचण्याचा आणि विचार करण्याचा अधिकार मिळाला. प्रश्न विचारण्याची मुभा वाढली. मतभिन्नता व्यक्त करण्याची ताकद निर्माण झाली.समाजानं जाणीवपूर्वक वाचनाला प्रोत्साहन दिलं. शाळा, महाविद्यालयं, सार्वजनिक ग्रंथालयं उभी राहिली. वर्तमानपत्रं, मासिकं, नियतकालिकं सुरू झाली. शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीय आणि सामाजिक उद्दिष्ट ठरला. साक्षरता वाढवणं हे विकासाचं मोजमाप बनलं.या काळात वाचन ही ज्ञान मिळवण्याची प्रमुख पद्धत बनली. वाचनातून व्यक्ती एकटी असतानाही अनेक विचारवंतांशी संवाद साधू लागली. काळ आणि अंतराची बंधनं कमी झाली. पूर्वी एखाद्या गुरूपर्यंत पोहोचण्यासाठी जेवढा काळ आणि संधी लागत असत, तेवढंच ज्ञान एका पुस्तकातून सहज मिळू लागलं.

आता आपण पुन्हा एका मोठ्या संक्रमणाच्या टप्प्यावर उभे आहोत. AI च्या नव्या युगात प्रवेश करत आहोत. आज ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक शोधण्याची गरज अनेकदा उरत नाही. माहिती आपल्या हातात आली आहे; किंबहुना, वाचनाची सक्तीच कमी होत चालली आहे. AI आपल्याला ज्ञान थेट ‘प्लॅटर’वर आणून देत आहे. प्रश्न विचारला की सारांश मिळतो. संदर्भ मिळतात. तुलना मिळते. स्पष्टीकरण मिळते. अनेक विषयांचं प्राथमिक ज्ञान काही मिनिटांत मिळू शकतं. ही स्थिती चांगली की वाईट, हा प्रश्न आपण त्याकडे कसं पाहतो यावर अवलंबून आहे.येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. ज्ञान कसं मिळतं, यापेक्षा ज्ञान मिळवण्याची इच्छा असते की नाही, हे अधिक महत्त्वाचं आहे. वाचन असो, पठण असो किंवा AI असो – कुतूहल नसेल, तर ज्ञान मिळणार नाही. पठण, वाचन किंवा AI ही साधनं आहेत. अंतिम साध्य ज्ञान आहे. यासाठी कुतूहल, किंवा ज्ञान मिळवण्याची सुप्त इच्छा, हाच महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

आजच्या काळात खरे आव्हान वाचन टिकवण्याचं नाही. खरे आव्हान कुतूहल जागृत करण्याचं आहे. मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. ‘हे का?’, ‘कसं?’, ‘यामागे काय आहे?’ असे प्रश्न पडले, तर ज्ञान आपोआप शोधलं जाईल.AI च्या जगात माहितीचा आणि ज्ञानाचा पूर आला आहे. पण त्या पुरातून काय घ्यायचं आणि काय टाळायचं, हे ठरवण्याची क्षमता प्रत्येकाला विकसित करावी लागेल. योग्य प्रश्न विचारण्याची कला आत्मसात करावी लागेल. हे कौशल्य वाचनाइतकंच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं आहे.

म्हणूनच मी याला ‘कुतूहल संस्कृती’ म्हणतो. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र इच्छा. माध्यम कोणतंही असो, पण आतून जाणून घेण्याची ओढ असेल, तर व्यक्ती ज्ञानाच्या जवळ राहते.पूर्वी पठण संस्कृती होती. नंतर वाचन संस्कृती आली. दोन्ही काळांत ज्ञान समृद्ध झालं. आज AI च्या युगात माध्यम बदलत आहे. पण उद्देश तोच आहे – ज्ञानप्राप्ती. त्यामुळे ‘वाचन संपत आहे’ यापेक्षा ‘कुतूहल जिवंत आहे का?’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.

या टप्प्यावर आधीच्या पिढीची जबाबदारी वाढते. मुलांना केवळ पुस्तके वाचायला लावणं पुरेसं नाही. त्यांच्यात योग्य प्रश्न निर्माण होतील, अशी वातावरणनिर्मिती करणं आवश्यक आहे. त्यांना विचार करण्याची सवय लावणं आवश्यक आहे. योग्य आणि चुकीच्या माहितीत फरक कसा करायचा, हे शिकवणं आवश्यक आहे.पठण संस्कृती लयाला गेली. वाचन संस्कृतीही हळूहळू बदलत आहे. पण ज्ञान संपत नाही. साधनं बदलत आहेत. आज कुतूहल संस्कृतीचा काळ आला आहे. ही संस्कृती जोपासली, तर AI हे धोका न राहता एक प्रभावी साधन ठरेल.

काळ बदलतो. माध्यमं बदलतात; पण ज्ञानाचं कुतूहल जिवंत राहणं, हेच महत्त्वाचं आहे.

Author

One thought on “पठण, वाचन आणि कुतूहल : ज्ञानसाधनेचा बदलता प्रवास

  1. नेहमीसारखाच संपूर्ण अंक दर्जेदार.
    ‘अवधान’ हा लेख खास आवडला. AI हे धोका न राहता एक प्रभावी साधन ठरेल! हा लेखक गिरीश घाटे यांचा विश्वास सार्थ ठरो.

Leave a Reply