पाय फुटलेला व्यासंग

  

फोडणीतली राई तडतडताना पाहून मीनाला फुटणाऱ्या लाह्यांची आठवण येते. लाह्यांवरून पॉपकॉर्न, तिथून  मॉलमधली पॉपकॉर्न  खाणारी, केस निळे रंगवलेली बाई असा राई ते बाई मनप्रवास घडतो. हे मानसशास्त्रीय विचार-साखळीचं एक उदाहरण आहे. ‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे,’ म्हणून सुरू केलेली विचारसाखळी संत ज्ञानेश्वर प्रारब्ध, संचित आणि क्रियमाणाच्या बुक्क्यांपर्यंत नेऊन सद्गुरूच्या पायीं पोचवतात. प्रत्येकाच्या मनातल्या  विचारांची भ्रमण-साखळी वेगवेगळी असते. 

डॉ.आनंद जोशींनी लिहिलेलं, ‘ऑर्वेलच्या अवतीभोवती’ हे पद्मगंधा प्रकाशनाचं पुस्तक हा तशाच विचारवाटांवरच्या सफरीचा, मन गुंग करणारा वृत्तांत आहे. डॉ.जोशींच्या व्यासंगी मनात ऑर्वेलकडून सुरू होणाऱ्या आणि पुन्हा ऑर्वेलपाशीच येऊन पोचणाऱ्या विचारांचं, फार मोठ्या कक्षेतलं ते आवर्तन आहे.

आपल्याला ऑर्वेल माहिती आहे तो त्याच्या 1984 आणि Animal Farm या दोन पुस्तकांमुळे. पण त्याने त्याखेरीजही खूप खूप काही लिहिलं आहे. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर त्याचे विचार डॉ.जोशींच्या ‘बौद्धिक स्तराशी फिट बसले’ आणि ऑर्वेल खास त्यांचा लेखक झाला. त्यांनी ऑर्वेलच्या लेखनाच्या व्यापक पसाऱ्याशी दोस्ती केली. त्यातली प्रत्येक साहित्यकृती, अगदी परीक्षणं, पत्रं, टीकासुद्धा कशातून जन्मली असावी ते शोधलं. त्यासाठी त्यांनी समकालीन साहित्याचा अभ्यास तर केलाच पण ऑर्वेलच्या कादंबऱ्यांतल्या इतिहासाचं मुळातून वाचन केलं; त्याच्या Wigan Pier कादंबरीत उल्लेखलेल्या गावाला, खाणींना प्रत्यक्ष भेट दिली! थोड्या वेळेपुरता का होई ना, ते ऑर्वेल जगले. त्याच्या जीवनाचा पाठपुरावाच केला. ऑर्वेलच्या लेखनातला आणि वैयक्तिक जीवनातला विरोधभासही परखडपणे जाणून घेतला.    

ते सगळं या पुस्तकातून आपल्याला अनुभवायला मिळतं. ऑर्वेलचं जीवन, त्याच्या दोन प्रमुख कादंबऱ्या, त्याव्यतिरिक्तचं इतर लेखन नव्याने भेटतात. त्याने इंग्रजी भाषेला बहाल केलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार लक्षात येतात. ऑर्वेल का लिहितो ते समजून घेताघेता एकूणच ललित लेखनामागचं कारण, त्या अनुषंगाने कुठल्याही लेखकाच्या प्रतिभेने सुस्पष्ट होणारं वास्तव, त्यातून सुरू होणारं वाचकाचं विचारचक्र यांचं महत्त्व समजतं. 

पण हे पुस्तक ऑर्वेलच्या साहित्यकृतींच्या पल्याडही पोचतं. ऑर्वेल हिटलरपासून डार्विनपर्यंत सगळ्यांच्या लेखनाची दखल घेतो. आम जनतेला हिटलरसारख्या नेत्यांपासून सावध करण्यासाठी तो ‘माईन काम्फ’चं परीक्षण लिहितो. तो डिकन्सचा चाहता होता. ‘गरिबांकडे बघायचा डिकन्सचा दृष्टिकोण मध्यमवर्गीय होता,’ ही नवी नजर या पुस्तकातून वाचकाला मिळते. 

जिथे ऑर्वेल स्वतः जाऊन भिडत नाही तिथे इतरेजन त्याला आपल्यात खेचतात. Anna Burns ना राजकारणासंबंधीच्या ललितलेखनासाठी पारितोषिक मिळालं ते ऑर्वेलच्या नावाचं. अभिजित बॅनर्जींच्या Poor Economics या नोबेल पारितोषिक विजेत्या निबंधात त्याचा आवर्जून, आदराने उल्लेख झाला म्हणून बर्न्स, बॅनर्जी आणि त्यांचे विचार या पुस्तकात हक्काने दाखल होतात. 

शिवाय ऑर्वेलमुळे डॉ.जोशींना इतरही अनेक समांतर संदर्भ आठवतात. मग त्यांनाही वाव मिळतो. Wigan Pierच्या खाणकामगारांवरून Pitmen Painters हे नाटक आठवतं आणि त्यावरून नाटकातून होणारी अभिव्यक्ती आणि नाटकाचा समाजाच्या विचारांवर, संस्कृतीवर होणारा परिणाम यांचाही ऊहापोह होतो. 

एकूण काय, ऑर्वेलच्या निमित्ताने डॉ.जोशी वाचकाला पाश्चात्त्य आणि भारतीय साहित्याच्या अफाट पसाऱ्यातून फिरवतात. खुद्द ऑर्वेलच्या लेखनाखेरीज जॅक लंडन, लॉरेन्स, डिकन्स यांच्या कथा-कादंबऱ्यांची ओळख करून देतात. वाटेत हेमिंग्वे, टॉल्स्टॉय, कामू, कोस्लर यांना भेटवतात. सीमसच्या Old Smoothing Iron या कवितेचं  केशवसुतांच्या ‘रांगोळी घालताना पाहून’ या कवितेशी नातं जोडतात. हताशा, कणव आणि सोबत यांची ओळख सांगत विनोदकुमार शुक्लांच्या साथीने प्रफुल्ल शिलेदारांना आणतात. जयंत पवारांच्या  ‘वरणभातलोंचा’ची चव देतात. लोमटे, अतुल पेठे, अशोक केळकर, सुरेश भट अशा अनेकांना आपुलकीने, ‘कसं काय?’ म्हणतात. पंचतंत्र, नलदमयंती आख्यान यांचीही झलक दाखवतात. मध्येच रॉबर्ट फ्रॉस्टचा चिमुकला बेडूकदेखील टुणकन उडी मारतो.  

डॉ.जोशींचा ऑर्वेल ललितवाङ्मयाच्या बाहेरही भटकतो. राजकारण, समाजकारण हे तर त्याचे जिव्हाळ्याचे विषय. तिथला त्याचा आणि त्याच्या साहित्यिक भाऊबंदांचा अनुभव, त्यांची मतं लख्ख विशद करतो. पण त्यापलीकडे जाऊन तो इतिहासात, अर्थशास्त्रात, विज्ञानातसुद्धा घुसतो. वैज्ञानिक वृत्ती म्हणजे तर्कसंगत संशयवादी वृत्ती आणि विज्ञान म्हणजे सुविकसित विचारपद्धती. तशी विचारपद्धती विकसित व्हायला समाजात काही गोष्टी घडाव्या लागतात. त्या पाश्चात्त्य  जगात पाचशे वर्षांपूर्वी घडल्या. म्हणून तिथे पाचशेच वर्षांपूर्वी विज्ञानाची विचारवहिवाट तयार झाली. बी कवींच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, आत्ताच वैज्ञानिक विचारवहिवाट लाभलेली ‘मनुजता अजून बाल्यदशेतच आहे,’ असा निष्कर्ष काढतानाही ऑर्वेल आजूबाजूला असतोच! 

ऑर्वेलच्या या सहवासात  माणसाच्या भाषेचाही अधिक परिचय होतो. सिक्वेल, ऱ्हेटॉरिक, मेटॅफिजिक्स या शब्दांची मुळं, भाषेचे परिणाम, राजकारण आणि भाषा, मेंदूला गुंगी आणणारी शाब्दिक लबाडी असं शब्दमाहात्म्य कळत जातं. ‘दोन भाषा जाणणाऱ्या विनम्र लोकांना अल्झायमर्स – बुद्धिमांद्याचा त्रास लवकर होत नाही,’  असा वैद्यकीय सल्लाही जाताजाता मिळतो.

ऑर्वेलसोबतच्या त्या मनमुराद भटकंतीत वाचक अगदी रमतगमत सामील होतो. 

डॉ.जोशी त्याला खेचून नेत नाहीत. एखादा सुंदर विचारपक्षी दाखवत त्याच्या मागोमाग सहजपणे जायला लावतात. तसे ते स्वतः त्या सगळ्या प्रदेशांत आधीच फिरून आले आहेत. रम्य उद्यानांतल्या झाडांवर रसिक आपली नावं कोरतात. तशीच डॉ.जोशींनी वाचनात आलेल्या सगळ्या रम्य जागांवर आपली मतं नोंदली आहेत, पण आपल्या वह्यांत! त्या सगळ्या नोंदींचा बनलेला  वाचन-नकाशा वाचकाला ऑर्वेलसोबतच्या भटकंतीत वाट दाखवतो.   

ॲगाथा ख्रिस्तीच्या बिलंदर मार्पल आजीचा मनुष्यस्वभावाचा व्यासंग मोठा. तिच्या मनाच्या पोतडीत जुने मनुष्यस्वभाव, लकबी, वागण्याचे कल वगैरेंचे नमुने साठवलेले असतात. नव्याने भेटणाऱ्या माणसांशी ती ते जुने नमुने ताडून बघते. 

डॉ.जोशींनी अनेक साहित्यिकांचे, त्यांच्या विचारांचे, शैलीचे नमुने हौसेने जमा करून आपल्या मेंदूत निगुतीने जपले आहेत; शिवाय त्यांना सापडलेल्या ‘वाचनसमाधानगृहां’तून त्यांनी अनेक शास्त्रांवरची, तऱ्हेतऱ्हेची पुस्तकं मिळवून वाचली आहेत. त्यात पुस्तकवाचेपणा नव्हता. एकाच विषयासंबंधीही त्यांनी वेगवेगळ्या लेखकांकडून वेगवेगळे दृष्टिकोण मिळवले आहेत. त्या वाचनसोनचुऱ्यातून त्यांनी स्वतःचा वाचनमयकोश तयार केला आहे. नवं वाचताना, ऑर्वेलबद्दल बोलताना त्या कोशातले जुने धागे आपणहोऊन पुढे सरसावतात. तुलना होते, साधर्म्य सापडतं, जुळणी होते आणि एका वाचनमय कोशातून फार विस्तृत आणि तरीही बेमालूम विणलेला वाचनपट उलगडतो. मग त्यातून लाभणारा आनंद ते निःस्वार्थीपणे वाचकांना वाटून देतात. 

त्यात ‘मी वाचतो’ याचा बडेजाव नाही. जे सापडलं ते सांगायचा उत्साह आहे. वाचनाने विचारांना पैलू पडतात; संवेदनशीलता, शहाणीव येते, ही जाणीव  पोचवायची कळकळ आहे. 

आम्ही वाचतो हे; तुम्हीही वाचा ना! 

असं अलिखित आर्जव आहे. म्हणून तर पुस्तकात ज्यांची तोंडओळख होते त्या सगळ्या मराठी पुस्तकांचे प्रकाशक, प्रसिद्धीची तारीख हा सारा ठावठिकाणा ते सांगतात. वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश, इंग्रजी शब्दकोश, Historical Thesaurus यांना शरण गेल्याने भलं होतं, हा कानमंत्र देतात. मराठी बृहद्कोषाचा तर टिचकी-पत्ताही देतात. 

वाचनाच्या बगीच्यात मनमुराद हिंडायची इच्छा असली आणि सोबत जाणकार वाटाड्या हवा असला तर डॉ.आनंद जोशींचा ऑर्वेल नक्की सोबत घ्यावा. डॉ.जोशींच्याच शब्दांत सांगायचं तर ते पुस्तक दुसारावं(दुसऱ्यांदा वाचावं), तिसारावं. त्याच्यातल्या कुत्रेकुई, अर्थरंगांचे पतंग उडवणारे शब्द, लेखनाची गुणिता यासारख्या छान जागा किंवा कुरळ्या सोनेरी बटांसाठी वापरलेला सोनेरी ‘कुरळं’ हा शब्द यांची मजा पुन्हा पुन्हा अनुभवावी. पुस्तकात उल्लेखलेल्या कवितांचा, कथांचा, पुस्तकांचा शोध घ्यावा. काही कवितांची, कथांची स्वैर भाषांतरं दिलेली आहेतच. पण त्याही जमल्यास मुळातून वाचाव्या. पुस्तकात ज्यांचं थोडक्यात दर्शन घडतं त्या थोर लेखकांना आपल्या आपण, स्वतंत्रपणे भेटावं. डॉ.जोशी म्हणतात तसा, ‘त्या थोरांशी एकांतात संवाद साधावा.’ 

इये पुस्तकाचिये स्थळीं 

विचारनिष्ठांची मांदियाळी 

अनवरत वाङ्मयमंडळीं 

भेटे वाचता वाचता, 

हा लाभ पदरात पाडून घ्यावा. पुढच्या किमान महिन्याभरासाठी तरी  मराठी, इंग्रजी वाङ्मय, इतिहास, उत्क्रांतिवाद अशा अनेक क्षेत्रांतल्या फेरफटक्याची निश्चिंती होईल. ‘ऑर्वेलच्या अवतीभोवती’ तशी भ्रमंती केली तर आपल्यातली ‘मनुजता’ अधिक सुंदर होईल.

Author

One thought on “पाय फुटलेला व्यासंग

  1. पुस्तक तर सुंदर असेलच पण परिक्षण वाचून लगेच वाचायची इच्छा होते.

Leave a Reply