दिलासा 

उमा बेडेकर, वय वर्षे ८५ यांनी, १४/०८/२००० ते १९/०८ /२००० या कालावधीत केलेल्या एका प्रवासाचे हे वर्णन आहे. पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख आहे. प्रवास साधाच, अक्कलकोट- पंढरपूर-तुळजापूर वगैरे असा आहे; पण लेखामध्ये जे जुन्या मराठी सांस्कृतिक वळणांचे उल्लेख आहेत, ते वाचनीय आहेत. उमाताई अगदी लहानपणी लग्न होऊन गुजरातमध्ये स्थायिक झाल्या. तिथल्या शाळांमध्ये त्यांनी चित्रकला आणि हिंदी शिकवले पण तरीही त्यांची मराठीशी नाळ जोडलेली राहिली. -संपादक

 काही काही वाक्यं, काही काही घटना आपल्या मनात नेहमी घर करून बसलेल्या असतात. नको मी तुझ्या पाठीशी आहे’ हे वचन अक्षरशः खरं आहे. ते सदैव भक्तांच्या पाठी उभेच असतात. भक्तकामकल्पतरूच आहेत ते; म्हणूनच पुन्हा पुन्हा अक्कलकोटला जाऊन त्यांचं दर्शन घेण्याची, त्यांचं वास्तव्य होतं त्या परिसरात राहून पावन होण्याची इच्छा होते. याच इच्छेपायी १५ ऑगस्टला आम्ही आठ जण अक्कलकोटला जाण्यासाठी मुंबईहून सिद्धेश्वरने सोलापूरला जायला निघालो. माझा मुलगा, सूनही बरोबर होते. सुनेचे आई-वडील होते, माझ्या दोन बहिणी आणि धाकटी भावजयही होती. सगळी मंडळी घरचीच होती, त्यामुळे एक छान ग्रुप तयार झाला. १६ तारखेला सकाळी सोलापूरला आम्ही पोहोचलो. तिथे श्री.पागे यांच्याकडे जायचं होतं. ते माझ्या भावजयीचे नातेवाईक. स्टेशनमधून बाहेर येऊन रिक्षा स्टॅंडकडे वळलो तर क्षणभर हतबुद्ध झालो… कारण रिक्षांचा काही कारणाने संप होता. आमच्याजवळ तसं बरंच सामान होतं; शिवाय परका गाव. काय करावं, अशा विचारात होतो, तोच जसाकाही स्वामींनीच पाठवावं असा एक ट्रॅक्सवाला आला आणि ‘येता का ‘म्हणून विचारू लागला. आम्हांला तर काय देवच पावला. लगेच त्या गाडीत बसलो. तेवढ्यात गाडीला बऱ्याच जणांनी घेराव घातला आणि ट्रॅक्स ड्रायव्हरला ते गाडी सुरू करूच देईनात. मनात आलं, ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात’ होतो हा की काय!’ पण माझ्या मुलाने प्रसंगावधान राखून आम्हां सर्वांना सामानासकट खाली उतरायला सांगितलं आणि पुढील चौकात डावीकडे जायला सांगितलं. मग ड्रायव्हरशी काही बोलून ठरवून तो आमच्या मागोमाग आला. डावीकडे वळणावरती गेलो, तर मागून तीच गाडी पुन्हा जवळ येऊन उभी. मग त्यामध्ये बसून आम्ही पाग्यांकडे गेलो. पागे यांची वास्तू फारच सुंदर! जुन्या धाटणीची, लाकडी बांधकामाची बंगली आहे ती. एखाद्या हिल स्टेशनवर असावं, तशी त्याची धाटणी बघून मला माझ्या आईच्या मामांच्या अशाच एका बैठ्या बंगलीची आणि त्यात असलेल्या लाकडी रिवोल्ह्विंग बुकरॅक आणि हॅटस्टँडची आठवण झाली. आम्हांला लहानपणी त्या पुस्तकांच्या रॅकची फार मौज वाटे. चकचकीत, गुळगुळीत ब्राऊनिश ब्लॅक रंगाच्या त्या रिवॉल्विंग रॅकला पुन्हा पुन्हा हात लावून फिरवून पाहायची फार हौस वाटे; पण मामांच्या भीतीने तसं करता येत नसे. आज वयाची साठी आली तरी तो रॅक मनाच्या तळकप्प्यात सुरक्षित बसला आहे. तर… आम्ही आधीच फोन केला होता म्हणून गाडीतून उतरताच स्वतः पागेच सामोरे आले त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने फार जिव्हाळ्याने आमचं स्वागत केलं. तशी प्रत्यक्ष ओळख नसताना किंवा नातंही नसताना ज्या आपुलकीने, अगत्याने चहापाणी नाश्ता वगैरे त्यांनी केलं, त्यामुळे आजही आपली संस्कृती जिवंत आहे, ‘अतिथि देवो भव’ ही परंपरा अतूटपणे चालू आहे हे जाणवलं. मला आठवतं, मागे एकदा एका परदेशी पाहुण्याने प्रश्न केला होता, की तुमचा देश शेकडो वर्षं पारतंत्र्यात राहूनही आपली संस्कृती कशी विसरला नाही? त्याचे उत्तर देताना मी म्हटलं होतं, की आमच्या संस्कृतीची पाळंमुळं इतकी खोलवर रुजलेली आहेत आणि रक्ताच्या कणाकणांत भिनलेली आहेत, की ती सहज उपटण्यासारखी नाहीत; तर उलट अमरवेलीप्रमाणे ती फोफावतात.
पाग्यांच्या परसदारी दत्ताच्या पादुका आहेत – दत्तमंदिरच आहे. त्यांच्या पूर्वजांना स्वप्नदृष्टांत मिळाला, की परसदारी औदुंबर आहे त्याखाली दत्ताच्या पादुका स्थापन कराव्या. त्यांनी परसदारी शोध घेतला, तर खरंच औदुंबराचं झाड दिसलं. मग त्याखाली देऊळ बांधलं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या त्याची ते उपासना करीत आहेत; शिवाय महायज्ञ, होमहवन वगैरेही यथासांग, यथाविधी आजच्या काळातही त्यांच्याकडे होतात. त्यासाठी मोठी होमकुंडे, नैवेद्यासाठी सोवळ्यातले स्वयंपाकघर, उत्सवात येणाऱ्यांसाठी व्यवस्था, राहण्याच्या सोयीसाठी खोल्या वगैरे गोष्टी बंगल्याच्या आवारात त्यांनी उभ्या केल्या होत्या. आजच्या काळातही हे सर्व यथासांग चालत आहे हे पाहून आश्चर्य वाटले, आनंद झाला. स्वतः पागे कॉंट्रॅक्टरआहेत. उच्च विद्याविभूषित आहेत, तरीही आपल्या परंपरा सांभाळून आहेत, हे खरंच विशेष. मग पाग्यांना विचारून त्याच ट्रॅक्सीवाल्याला पुढील प्रवासासाठी नक्की केले आणि त्यांचा निरोप घेऊन अक्कलकोटला रवाना झालो.

सुमारे दोन तासांचा रस्ता होता. पोट शांत होतं आणि रिकामा वेळ होता. मग काय भेंड्यांना सुरुवात. गाडीच्या वेगासोबत भेंड्यांचा वेगही वाढत होता. दोन्ही गट तुल्यबळ होते. जुन्या जुन्या – अगदी बालपणातल्या कविता, गाण्यांचीसुद्धा उजळणी होत होती आणि मन मागे मागे भूतकाळामध्ये जात होतं.
‘ये गं तू गं गाई वासराच्या आई’ ही ओवी कोणीतरी म्हटली आणि मन वरसईच्या खेड्यातल्या आजोबांच्या घरी पोहोचलं. अंगणालगतचा गाई-गुरांचा गोठा, अंगणातही गौरी, तांबू वगैरे गाई बांधलेल्या… त्यांच्या वासरांसहित… आणि त्या सर्वांवर पोटच्या मुलांपेक्षाही अधिक प्रेम करणाऱ्या आजोबांची मूर्ती डोळ्यांपुढे साकार झाली. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही नातवंडं टोपलीभर आंबे मध्ये ठेवून दुपारी आंब्यांवर ताव मारत असू आणि आमचे आजोबा आमचे आंबे खाऊन झाले, की सगळ्या साली-बाठी आपल्या हाताने मोठ्या प्रेमाने, ममतेने गाईगुरांना आंजारून गोंजारून खाऊ घालत असत. ‘आत्मा सो परमात्मा’ हे मोठे तत्त्व सहज अंगी बाणवलेल्या आजोबांची ती वत्सल मूर्ती आजही मनाला स्पर्श करून गेली… तर तेवढ्यात ‘कसा गं बाई झाला कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा…’ हे गाणं कोणीतरी म्हटलं तेव्हा १९५५ ते ५८ सालच्या गणेशोत्सवांची आठवण मनामध्ये दाटी करू लागली. त्या काळी नव्हता टीव्ही किंवा नव्हते घराघरांत रेडिओ. सिनेमाचं साम्राज्य अजून येत होतं. अशा वेळी गणेशोत्सवातल्या गाण्यांचे प्रोग्रॅम म्हणजे लहान-थोर सर्वांना पर्वणीच वाटे. वाटव्यांची भावगीतं भा.रा. तांब्याच्या कविता वगैरे ऐकताना भान हरपून जायचे. मग कितीतरी दिवस त्याच धुंदीमध्ये जात असत. गणपतीतले कार्यक्रम, बेबंदपणे म्हटल्या जाणाऱ्या आरत्या आणि बुलंद आवाजातले मंत्रजागर या सगळ्यांची मोहिनी काही अजबच होती.. संध्याकाळी घरोघरी बाळगोपाळांची सेना जाऊन आरत्यांचा जल्लोष करायचो आणि प्रसाद फस्त करायचो. नव्हता कुठे दिखाऊपणा, संकोच की काही! बस, गणपती उत्सव संपेपर्यंत हीच धुंदी असे.
मला माणसाच्या मनाची मोठी गंमत वाटते. समजा एरवी कोणी म्हटलं, की जरा पाच -पंचवीस गाणी म्हणून दाखव, तर आपल्याला काही एवढी आठवणार नाहीत, पण भेंड्या खेळताना एखाद्याने एक गाणं म्हटलं तर लगेच आपल्याला तत्सम दुसरं आठवतं. एकातून दुसरं, तिसरं…मग साखळीच निर्माण होते आणि त्या साखळीमध्ये आपण गुरफटून जातो. अगदी वय वर्ष पाचपासून आजकालच्या सगळ्या नव्या जुन्या गाण्यांचा पिंगा भोवती फेर धरतो आणि झिंग येते. मन मोकळं होतं. किती विलक्षण शक्ती असते ना सुरांना – संगीताला! माझी एक बहीण कवयित्री आणि गझल गायिका आहे. तिच्या गजला ऐकता ऐकता, कविता ऐकता ऐकता मन आणि डोळे भरून येत होते. खरोखर उगीच नाही म्हटलेलं काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम्! तर अशा या भेंड्यांच्या खेळामध्ये बालगीतं कविता, भक्तिगीतं,भावगीतं, प्रणयगीतं सर्वांनी आपले नंबर लावले. सगळ्या नव्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि बघता बघता आम्ही अक्कलकोटच्या वेशीत कधी शिरलो ते कळलंसुद्धा नाही. मग मात्र ‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ’ मंत्राची धून लावली आणि नामस्मरण करत करतच अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ मठामध्ये जाऊन पोहोचलो. आमच्या सुदैवाने अक्कलकोटच्या मठामध्ये फार गर्दी नव्हती. योगायोग म्हणजे गुरुवारच होता. आम्ही सर्वांनी श्रीस्वामींचे दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. सर्वांनी मठातील स्वामींच्या वस्तूंचे दर्शन घेतले. वडाखालील पादुकांवर मस्तक ठेवून ‘योगक्षेम’ त्यांच्या हवाली केला आणि थोडा वेळ मधल्या चौकातील दुसऱ्या मंदिरामध्ये बसून धावा म्हटला. ध्यानही धरलं. त्याच वेळी आरती झाली. अगदी उत्तम शकुन झाला. मग तिथून निघून सरळ गाणगापूरची वाट धरली. संपूर्ण रस्ता ओसाड होता. नव्हत्या नद्या-डोंगर की झाडी! नुसता सगळीकडे रखरखाट होता. त्या भागात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष असतं, असं ऐकलं होतं, त्याची सत्यता जाणवत होती. समृद्धीचं कुठलंही चिन्ह असं दिसत नव्हतं. त्यामुळे हा प्रवास जरा कंटाळवाणाच झाला. गाणगापूरला नृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे मंदिर आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे दत्त संप्रदायातल्या श्रीदत्तांनंतरचा पहिला अवतार. त्यानंतर दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वतींच्या काळामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती नावापुरती राहिली होती. मुसलमानांच्या अत्याचारांनी मंदिरे नष्ट होत होती. मूर्ती तोडल्या जात होत्या, लोकांना जबरदस्तीने मुसलमान केले जात होते. अशा काळात दत्त संप्रदायाची महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमध्ये सामंजस्यासाठी प्रयत्न केला आणि विशेषतः ब्राह्मणेतर समाजालाही एक प्रकारची सांत्वना दिली. त्या काळात याची फार आवश्यकता होती. ती त्या काळाची गरज होती. गाणगापूरला तीन नद्यांचा संगम आहे : कृष्णा,भीमा, अमरजा. जवळच भस्माचा डोंगर आहे आणि तटावर औदुंबर वृक्ष असून त्या वृक्षाला शेकडो भाविक आणि रोगी रोग नष्ट करण्यासाठी, भूत पिशाच्च वगैरे व्याधी दूर होण्यासाठी प्रदक्षिणा घालतात. अशा प्रदक्षिणा ठरावीक मुदतीपर्यंत नेमाने घालणं हीच तिथे दत्तसेवा समजली जाते. तसेच दीनदुःखी पीडित लोक तिथे येऊन केवळ पाच घरी भिक्षा मागून जे मिळेल ते खातात तीसुद्धा सेवा मानली जाते. आजही दत्त संप्रदायातील लोक यात्रेसाठी या तीर्थक्षेत्री आले असता निदान एक दिवस का होई ना, भिक्षान्न सेवन करून प्रतीक रूपाने दत्त सेवा करतात. नदीच्या किनारी त्या दत्तमंदिराचा मोठा महिमा आहे. लोक तिथे उत्सव साजरा करतात. दत्तजयंतीच्या वेळी गुरुचरित्राचं पारायण होतं. औदुंबराच्या भोवती सततच अनेक लोक निरनिराळ्या उपासनांसाठी बसलेले असतात. त्या दत्त मंदिरामध्ये दर्शन करून मग वाडीला नृसिंह सरस्वतींच्या मंदिरात गेलो. तिथे त्यांची तेजस्वी आणि शांत अशी तापस मूर्ती पाहून मनाला शांती वाटली. तिथे अवघड असाध्य रोग झालेली माणसं मानवी उपाय हरल्यावर प्रभुकृपेच्या आशेने येतात आणि आश्चर्य म्हणजे त्यांतील कितीतरी लोकांना गुण येतो. हा श्रद्धेचा परिणाम म्हणावा की कशाचा याला उत्तर नाही; पण तिथल्या पुजाऱ्यांनी घडलेल्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या. आज त्या देवळामध्ये जे पुजारी आहेत ते पिढ्यानुपिढ्या तेथे काम करत आहेत. तिथे आम्ही नृसिंह सरस्वतींची पाद्यपूजा केली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि दीपदान केले. दुपारी आरतीच्या वेळी तिथे ज्यांना भूत झोंबलं असेल अशा लोकांना त्यांचे नातेवाईक घेऊन जातात. त्यांना दत्त मंदिरातील आरती ऐकणे सोसत नाही. ते त्या वेळी तिथल्या खांबांवरती चढतात, निरनिराळे चाळे करतात, नदीप्रवाहात उड्या टाकतात… वगैरे गोष्टी ऐकल्या होत्या; पण आम्ही आरतीची वेळ निघून गेल्यानंतर तिथे पोहोचलो होतो म्हणून यातल्या कुठल्याच गोष्टी आम्हांला बघायला मिळाल्या नाहीत. मात्र तिथे भाविक लोक ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ अशी अखंड धून करतात. अशा प्रकारे दत्त मंदिर, श्री श्रीपाद वल्लभांचं पादुका मंदिर आणि वाडीचं नृसिंह सरस्वतींचं मंदिर वगैरे बघून थोडा वेळ आम्ही तिथे नामस्मरण केले आणि मग तिथून निघालो. तिथल्याच एका घरगुती खानावळीमध्ये जेवायला गेलो. जेवण अगदी साधं होतं. शहरातील लोकांच्या पसंतीला न उतरेल असं; पण भुकेच्या वेळी तेही गोड वाटलं. भोजनोत्तर लगेच पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आणि संध्याकाळी आठ वाजता सोलापूरला परत आलो. तिथल्या प्रसिद्ध ऐश्वर्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि पूनम गेस्ट हाऊसमध्ये रात्रीसाठी परतलो.

१६ तारखेला सकाळी आठ वाजता सोलापूरचा स्पेशल डोसा खाण्यासाठी ‘कामत’मध्ये आम्ही गेलो, पण अजून हॉटेल उघडलं नव्हतं; म्हणून सरळ सुप्रसिद्ध सिद्धेश्वरचे देऊळ बघायला गेलो. सोलापूरचे हे शिवालय फारच देखणे आणि रमणीय आहे. एका मोठ्या तळ्यामध्ये देऊळ आहे देवळापर्यंत पाण्यातून जाणारा खास सुंदर प्रशस्त रस्ता आहे. दुतर्फा उंच उंच झाडं आहेत. दोन्ही अंगांना अथांग निळाईने नटलेलं तळं आहे. पाणी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक आहे त्यामुळे हा जाण्याचा मार्गही मन आकर्षित करून घेतो. मधोमध देवळाचा परिसर भव्य आहे. चिरेबंदी दगडी भव्य वास्तू आहे. आम्ही गेलो तेव्हा सकाळचे आठ – सव्वा आठ झाले होते तरी पहाटे लावलेले दिवे अजून तेवत होते. त्या दिवशी श्रावणाचा शेवटचा दिवस होता. श्रावणी अमावास्या. देवळात विशिष्ट पूजा होती, वातावरण मोठं प्रसन्न होतं. श्रद्धा आणि भक्तीचा संगम दिसत होता. देवळाच्या परिसरात अनेक फुलझाडं होती. मोठे वृक्ष होते, वेली होत्या. जे जे होतं ते सगळं निरामय आनंदाने भरलेलं होतं. विशेष म्हणजे सिद्धेश्वर ट्रस्टने निरनिराळ्या १५ संस्थांचा कारभार सांभाळलेला दिसला. समाजाची अशी सर्वांग सेवा एकाच संस्थेतर्फे होत असलेली बघून विशेष आश्चर्य वाटलं. नंतर समजलं, की जवळजवळ अर्धे सोलापूर सिद्धेश्वर संस्थानाच्या मालकीचेच आहे. या ट्रस्टच्यातर्फे दवाखाने, शाळा कॉलेज वगैरे सगळ्याच समाजोपयोगी संस्था जनसेवेसाठी उभारलेल्या आहेत. त्या सर्वांची माहिती तिथल्या एका बोर्डावर व्यवस्थित लिहिलेली होती. सोलापूरमध्ये मराठी लोकांच्या बरोबरीने कानडी लोक दिसले. त्यांची भाषा मात्र पटकन कळत नव्हती. अर्थात कानडी लोकांना मराठी चांगले येते, त्यामुळे फारशी अडचण भासली नाही. देवळाचा परिसर आणि प्रसन्न वातावरण पाहून तास-दोन तास तरी तिथे निवांत बसावं, असं वाटत होतं, पण पुन्हा पंढरपूरला जायचं होतं म्हणून तिथे थांबण्याचा मोह आवरून परत ‘कामत’ मध्ये गेलो, डोसे खाल्ले, कॉफी घेतली आणि पंढरपूरला जायला निघालो. गाडीत बसताच विठ्ठलाचा गजर सुरू केला. आज भेंड्या न खेळता सगळी भजनं, आरत्या आणि भक्तिगीतं म्हणू , असं ठरवलं आणि अगदी पंढरपूर येईपर्यंत भजनं म्हटली. पंढरपूर जवळ आलं तसं शृंगारलेले बैल रस्त्यावरून जाताना दिसले आणि आठवलं, की आज बैलपोळा आहे. श्रावणातल्या अमावास्येला मराठवाड्यामध्ये पोळ्याचा सण शेतकरी लोक मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. ज्यांच्या जिवावर वर्षानुवर्षं जगायचं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. पोळ्याच्या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना न्हाऊ घालतात, जेवू घालतात, गुळवणी पाजतात आणि रात्री त्यांच्या कानामध्ये ‘उद्या जेवायला या’ म्हणून निमंत्रणही देतात. पोळ्याच्या दिवशी त्यांना न्हाऊ घालून सजवतात. त्यांच्यावर रंगीत झूल पांघरतात, गळ्यात, पायात घुंगूर बांधतात. शिंगे रंगवून बेगड लावतात. त्या दिवशी त्यांना कामाला जुंपत नाहीत, स्वतः चरायला घेऊन जातात आणि त्यांच्यासाठी पुरणपोळी करतात. शेतीची इतर हत्यारे आणि साधनांचीही त्या दिवशी पूजा करतात. मडक्यात दिवा आणि विशिष्ट गवत ठेवून ते बैलांना हुंगायला देतात. बैलांनी नैवेद्य खाल्ला नाही, तर बैल रुसला असं समजून शेतकरी नाकदुऱ्या काढून त्याची माफी मागतो. बैलाला जेवू घालीपर्यंत स्वतः उपास करतो. अशा प्रकारे आपली कृतज्ञता तो व्यक्त करतो. खरोखर आपल्या संस्कृतीमध्ये सणांच्या रूपाने फार मोठ्या गोष्टी सांभाळल्या आहेत. आपल्या जीवनात पशुपक्षी, वृक्षवेली, नद्या, पर्वत यांचं महत्त्वाचं स्थान आहे, त्यांच्याशिवाय मानवसृष्टीची कल्पनाही करवत नाही. तर या आपल्या साथीदारांविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असावी, सर्वांभूती समभाव ठेवून वागावं, जगावं आणि जगू द्यावं, त्यांच्यातसुद्धा परमेश्वराचा वास आहे याची जाणीव ठेवून वागावं, एकूणच सृष्टीशी समरस व्हावं यासाठी निरनिराळ्या सणांना निरनिराळ्या प्रकारांनी साजरा करायची पद्धत घालून दिली गेली आहे. वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात, तर दिवाळीला नदीत दिवे सोडून दीपदान होतं. आजही कमी-अधिक प्रमाणामध्ये सगळ्याच हिंदुस्थानामध्ये हे आणि असे सण लोक उत्साहाने साजरे करतात. मनाने टवटवीत होऊन जगण्यासाठी एक शक्ती अनायास मिळवतात. सजवलेल्या बैलांना पाहून हे सगळं क्षणार्धात मनात आलं आणि लहानपणी आजोळच्या खेड्यात साजरा केलेला पोळ्याचा सण आठवला. त्या वेळचा शेतकऱ्यांचा जो उत्साह होता, त्यांच्या डोळ्यांतला तो जो आनंद होता, आपापल्या जनावरांसाठी जी माया होती ती काही निराळीच होती. आजच्या शहरी जीवनात राहणाऱ्यांना त्याची कल्पनाही येऊ शकणार नाही… या आणि अशा विचारातच पंढरपूरच्या देवळापाशी पोहोचलो. विठोबाच्या पूजेसाठी पूजासाहित्य, प्रसाद वगैरे घेतला आणि देवळामध्ये गेलो. जुन्या देवळाचे रूपरंग पालटलेले दिसले. आता इथेसुद्धा विठोबाच्या जवळून दर्शनासाठी पैसे मोजावे लागतात, हे पाहून मात्र मन खट्टू झालं. पंढरीचा विठोबा मराठी समाजातील सर्व स्तरातल्या लोकांचं अगदी लाडकं दैवत. तिथे बालाजी किंवा स्वामीनारायण मंदिरासारखा झगमगाट, ऐश्वर्याच्या खुणा नाहीत. हृदयी हार्द आहे. हा जनाबाईचा पांडुरंग आहे, तिच्यासाठी काम करणारा, भक्ताच्या हट्टासाठी जेवणारा… बहुजन समाजाला भक्तीची गोडी लावणाऱ्या संतमंडळींची आठवण झाली. तुकाराम, नामदेव, गोरा कुंभार आठवले आणि क्षणभर बडवा काय सांगतोय, हे समजेना. पण लगेच वर्तमान काळात आले आणि बडव्यांनी सांगितली ती रक्कम देऊन अगदी जवळून पंढरीनाथाचं दर्शन घेतलं. कर कटीवर ठेवून रखुमाईसोबत उभ्या असलेल्या सावळ्याचं सुदर्शन. थोडा वेळ देवळात थांबून मग पंढरपूरच्या बाजारपेठेमध्ये रेंगाळलो. अशा देवस्थानांच्या शेजारच्या बाजारपेठेमध्ये उभी केलेली दुकानं मोठी आकर्षक वाटतात. घेण्यासारखं असं काही नव्हतं, पण तरी सगळं बघत बघत पुढे निघालो आणि दिंडीच्या वेळी ज्या मैदानामध्ये घोड्याचे रिंगण धरलेलं असतं, तिथे पोचलो. ज्याच्याजवळ पादुका असतील त्याच्याजवळ घोडा अचूक जाऊन उभा राहतो, असं ऐकलं होतं. ते मैदान बघितलं आणि आपसूकच श्रद्धेने हात जोडले गेले. डोळ्यांसमोर शिस्तीत चालणारी हजारो लोकांची दिंडी साकार झाली आणि ‘विठोबा रखुमाई’ ‘विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोवला’ वगैरे अव्यक्त ध्वनी कानांमध्ये रेंगाळू लागले. आज चंद्रभागा नदी ही नदीच्या स्वरूपामध्ये दिसत नाही; तरी तिचं दिव्य दर्शन घेतलं आणि मग परतीच्या वाटेला निघालो. वाटेमध्ये एका छोट्याशा गावरान हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. तिथे मराठवाडा स्पेशल मेनू होता. ज्वारीच्या कडक भाकऱ्या, झुणका, वांग्याचे चमचमीत भरीत, जोडीला प्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी आणि दही. वा! वा! ते सुग्रास आणि गरमागरम पदार्थ खाताना रसना अगदी तृप्त झाली. कितीतरी वर्षांनंतर असं गावरान जेवण झालं; शिवाय तेही मोकळ्या मैदानात – बदामाच्या झाडांच्या घनदाट छत्र्यांखाली,नैसर्गिक पाण्याच्या झुळकींसोबत. पाण्याच्याऐवजी मात्र थम्स अप. जेवता जेवताच तृप्तीची पोचपावती दिली. मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे, शिवाय पाणीसुद्धा शुद्ध चांगलं असेल याचा भरवसा नव्हता म्हणून या संपूर्ण प्रवासामध्ये बिसलेरीचे पाणी पिण्याचाच आम्ही नियम घेतला होता आणि तो पाळला. ते पाणी पिताना मला एक आठवण येत होती. एकदा चार लोक जगप्रवासाला निघाले. ते तरुण पूज्य विनोबांचा आशीर्वाद आणि सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले. तो सद्भावना प्रवास होता. पूज्य विनोबांनी त्यांना तीन गोष्टी सांगितल्या. पहिलं म्हणजे खिशामध्ये एकही पैसा ठेवू नका, दुसरे, मांसाहार कुठेही करू नका आणि तिसरी सूचना उकळलेलेच पाणी प्या! या तीनही सूचनांची त्या तरुणांनी अंमलबजावणी केली आणि त्यांचा जगप्रवास अगदी सुखरूप सफळ झाला. प्रवासात ही छोटी दिसणारी पण मोठी महत्त्वाची पथ्यं पाळावी लागतात. जे अशी खबरदारी घेतात, त्यांना विशेष त्रास सोसावा लागत नाही. जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही गाडीत बसून तुळजापूरला जायला निघालो. तुळजापूर म्हटलं, की शिवरायांची आठवण येते. भवानी तलवार आठवते, अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या हिंदू पदपादशाह राजाधिराज क्षत्रियकुलवंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आठवतो. ते गोब्राह्मणप्रतिपालक. सुग्रास जेवलो होतो त्यामुळे सर्वांच्या डोळ्यांमध्ये पेंग भरली आणि सगळ्यांनी थोडा वेळ डुलक्या काढल्या. मग कोणीतरी टूम काढली, की ताई गोष्ट सांग. वेळ घालवायला गप्पागोष्टी आणि गाण्यांसारखं दुसरं विनामूल्य साधन नाही आणि गोष्टी ऐकायला तर सर्वांनाच फार आवडतात. मला गोष्टी सांगायला आवडतात. म्हणून मग मी नलदमयंती आख्यान सुरू केलं. विदर्भातला नळराजा आणि त्याची सुंदर सुविद्य पतिव्रता सती दमयंतीची कथा. अगदी साद्यंत रसाळपणे सांगितली. ते नलाख्यान संपेपर्यंत तुळजापूरच्या वेशीवर पोहोचलो. तुळजापूरसुद्धा तसं लहानसंच खेडेवजा शहर आहे. देवळाबाहेरच्या बाजारपेठेत गाडी उभी केली आणि पायीपायी आईच्या देवळात जायला निघालो. योगायोगाने आज शुक्रवार होता. देवीचाच वार होता. देवीसाठी खणानारळाची ओटी, हार, तुरे, प्रसाद घेतला आणि देवळात शिरलो. ती शिवकालीन वास्तू अतिशय भव्य आहे. उंच उंच बंदिस्त भिंती चहूबाजूंना असून प्रवेशद्वार खूप उंच आणि वास्तू कलेचा उत्तम नमुना पेश करणारं आहे. आम्ही ज्या वाटेने गेलो तिथून देवळापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या होत्या. बांधकाम पक्कं आणि प्रशस्त होतं. पायऱ्या उतरताच उजवीकडे कुंड होतं. कुंडाला जिवंत झरे होते. तिथे पदप्रक्षालन करून मगच पुढे दर्शनासाठी जातात. तिथे जवळच चौघडा सनई वगैरे वाजवण्यासाठी मोठा फरसबंदी कट्टा होता. चारी बाजूंना भक्कम दगडी चिरेबंदी ओवऱ्या होत्या आणि त्यामध्ये मोठ्या मोठ्या कोनाडेवजा जागा होत्या. त्यामध्ये अनेक देवींची स्थानकं होती. जोगवा देण्याची सोय होती. तिथे देवीचा प्रसाद म्हणून पिवळ्या ठिपक्यांच्या हिरव्या बांगड्या देण्याचा प्रघात आहे. आम्हीसुद्धा त्या बांगड्या विकत घेतल्या. जोगवा दिला आणि मग देवीच्या दर्शनाला गेलो. देवीची ओटी भरली आणि प्रदक्षिणेसाठी बाहेर आलो. प्रदक्षिणा घालताना एका ठिकाणी ‘चिंतामणी’ दगडाभोवती बरीच माणसं गर्दी करून उभी असलेली दिसली. मला एकदम आठवलं, की शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेला जाण्याआधी तुळजाभवानीच्या देवळात येऊन कौल घेत असत. मग आम्ही सुद्धा त्या चिंतामणीपाशी गेलो आणि काय प्रकार आहे ते बघू लागलो. तो कौलाचा दगड होता. एका दगडी कट्ट्यावर फुटबॉलच्या आकाराचा दगड. त्यावर दोन्ही हात ठेवून आपल्या मनातच इच्छा बोलायची, जर इच्छा पूर्ण होणार असेल तर दगडावरती आपले हात असूनही तो उजव्या बाजूला फिरतो आणि जर इच्छा सफल होणार नसेल तर तो डाव्या बाजूस फिरतो जर इच्छेविषयी अनिश्चितता असेल तर मात्र तो दगड स्थिरच राहतो – कुठल्याच बाजूला फिरत नाही. दोन-दोन रुपये देऊन या चिंतामणी दगडावरती हात ठेवून कौल घेता येतो. आजपर्यंत आम्ही कोणीच अशा तऱ्हेचा कौल पाहिला नव्हता, म्हणून सर्वांनीच कुतूहलाने चिंतामणीवर हात ठेवून कौल घेतला. या कौलाच्या दगडाचा म्हणे, वार्षिक लिलाव केला जातो. तिथून परतताना एका ठिकाणी उंच उंच पायऱ्या उतरून खाली जाण्यासाठीचा मार्ग होता आणि पायथ्यापाशी गुप्त वाटा होत्या – अर्थात सध्या त्या बंद होत्या. शिवाजी महाराज कुठेही असले तरी त्या गुप्त वाटेने येऊन देवीचे दर्शन घेत असत, असं म्हणतात. त्या ठिकाणी उभं राहिलं, की सभोवारचा कित्येक मैलांचा परिसर दिसतो. वारासुद्धा एवढा झुळझुळ येतो, की श्रांतक्लांत मनाचंही सांत्वन व्हावं. तिथे थोडावेळ बसून पुन्हा एकदा त्या भव्य वास्तूवर नजर टाकून आम्ही परतलो आणि गाडीतून पुन्हा सोलापूरला आलो. सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये फेरफटका मारायला निघालो. सोलापूरामध्ये हातमागाच्या आणि इतर सुती चादरी खास मिळतात. त्या घ्यायला गेलो. सर्वांनी काहीबाही खरेदी केली. त्यात मुख्य चादरी, टॉवेल, मॅट्स वगैरे वस्तू घेतल्या आणि ‘कामत’ मध्ये जाऊन जेवलो. नंतर पूनमवर रात्री विश्रांती.
शनिवारी सकाळी चहा नाश्ता करून विजापूरला जायला निघालो. विजापूरचं नाव घेताच मुघल काळातली आदिलशाही कुतुबशाही वगैरे आठवली आणि त्या पार्श्वभूमीवर आधारित लहानपणी पाहिलेली नाटकं आठवली. चार-चार, पाच-पाच अंकी, असंख्य प्रवेश असलेली ती ऐतिहासिक नाटकं पाहताना सगळा इतिहासच जिवंत होत असे. आजही विजापूरला जाताना ती नाटकं मनामध्ये रुंजी घालत होती. विजापूरला पोहोचलो. इतिहासप्रसिद्ध, जगातील आश्चर्य समजलं जाणारा गोल घुमट बघितला. त्याच्या पुढे दुसरी एक मोठी वास्तू आहे. आज तिच्यापुढे एक मोठी तोफ ठेवलेली आहे : मुलुख मैदान तोफ आणि आतल्या दालनामध्ये एक छोटसं वस्तुसंग्रहालय आहे. चांगलं प्रशस्त आहे. मोठ्या मोठ्या झाडांनी आणि बगीचांनी आजही मोठे प्रेक्षणीय दिसते. चारी बाजूंना चिरेबंदी वास्तू आहेत, तिथे म्हणे घोड्यांच्या पागशाळा होत्या.

प्रत्यक्ष गोलघुमट मागच्या बाजूला आहे. तो चौदाव्या शतकामध्ये आदिलशहाने बांधला. कितीतरी वर्षे ते बांधकाम चालले. गोल घुमटाच्या पायाचा दगड एकसंध आहे. वर जाण्यासाठी चक्राकार जिने असून त्यांची प्रत्येक पायरीची उंची अगदी गुडघा गुडघा आहे. वर गेल्यावर डोक्यावर प्रशस्त घुमट आहे आणि त्या घुमटामध्ये एका बाजूला नुसती खुसफूस केली किंवा काडी पेटवली तरी तो आवाज प्रचंड अंतर पार करून दुसऱ्या बाजूला अगदी जसाच्या तसा ऐकू येतो. खरोखर एवढ्या वर्षांपूर्वी – नव्हे शतकांपूर्वी हे शास्त्र, ती वास्तुकला किती चरम सीमेला पोचली होती, याचं आश्चर्य वाटतं. विशेष म्हणजे आजही गोलघुमट अगदी सुस्थितीत आहे. कितीही वेळाही करामत पाहिली तरी मनाचं समाधान होत नव्हतं. पुन्हा पुन्हा तोच चाळा लागला. शेवटी गाईडने खाली उतरायला सुरुवात केली, तेव्हा नाइलाजाने त्याच्या पाठोपाठ उतरलो. मला आमच्या अहमदाबादच्या प्रसिद्ध झुलत्या मिनारांची आठवण झाली. तेसुद्धा आश्चर्यकारक वास्तुशिल्प आहे. समोरासमोर दोन उंच मिनार आहेत – एक हलवला, की दुसरा आपोआप हलतो. आजही त्याचं कोडं इंजिनियर्सना उकललेलं नाही. ती वास्तूसुद्धा मुघलकालीनच आहे. मुघलांनी ताजमहाल, कुतुबमिनार अशी कितीतरी शिल्पं आणि अप्रतिम बागा आपल्याला भेट दिल्या, त्या अजरामर आहेत. गोलघुमट पाहताना त्या सर्वांची मनामध्ये आठवण झाली. जणू शिल्पसाखळीच मनाला वेढा घालून बसली. गोलघुमट हा आमच्या प्रवासातला शेवटचा टप्पा होता. तो पाहून आम्ही पुन्हा सोलापूरला आलो, आणि शनिवारी रात्रीच्या सिद्धेश्वरने मुंबईला परतलो. रविवारी मुंबईहून गुजरात मेलने निघून सोमवारी सकाळी अहमदाबादला सुखरूप घरी परतलो.

उमा बेडेकर

Author

Leave a Reply