
शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी मी गोव्यात पाऊल ठेवले ती माझी तेथील अगदी अलीकडची भेट. तिला निमित्त होते जवळचे स्नेही दत्ता दामोदर नाईक यांच्या सत्तराव्या वाढदिवसाचे. त्याच्या जोडीने गोव्यात थोडेफार भटकावे, काय-काय बदलले आहे ते बघावे हा माझा विचार. जिथे मी उतरलो तो मोपा विमानतळ हाच एक मोठा बदल होता. जेमतेम दोन वर्षांपूर्वी तो सुरू झाला होता. मोपा हे गावाचे नाव आणि प्रत्यक्ष विमानतळाला नाव दिले आहे ते राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचे. हा पणजीपासून ३५ किलोमीटरवर आणि मडगावपासून ७० किलोमीटरवर आहे. तेथून मडगावच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.वाटेत दिसणारी गोमंतकभूमीही बरीच बदललेली दिसत होती. “इथे सारखं काही ना काही नवं चालूच असतं. मोठमोठे रस्ते, फ्लायओव्हर, मॉल… एक-दोन वर्षांच्या गॅपने आलात ना, तर ओळखतापण येणार नाही,” वाटेत आमचा चालक अभिमानाने सांगत होता. पण याचाच अर्थ आसपासचा मोकळा निसर्ग थोडाथोडा कमी होत होता; जी माझ्या दृष्टीने तशी काळजी करण्याची बाब होती.
दुसऱ्या दिवशीची वाढदिवसाची पार्टी रात्री होती आणि त्यामुळे सगळा दिवस स्थलदर्शनासाठी मोकळा होता. सुरुवात देवळांपासून करायचे ठरवले. शिरोडा येथील कामाक्षी मंदिर आणि कवळे येथील शांतादुर्गा मंदिर ही दोन मंदिरे निवांतपणे बघितली. दोन्ही ठिकाणचा माझा अनुभव साधारण सारखाच होता. देवळाभोवती जुने वृक्ष आहेत, पाण्याचे तळे आहे. गाभार्यातून कापराचा आणि धुपाचा दरवळ येत होता. घंटांचा नाद कानात गुंजत होता. कुठल्यातरी आरतीचे श्रद्धेने थबथबलेले सूर भारावून टाकत होते. आत जाऊन पंधरा-वीस मिनिटे विसावलो. कामाक्षीच्या देवळात जाण्यासाठी बरेच चालावे लागले, थोडे दमायला झाले. एक आठवण म्हणजे वाटेतल्या पायऱ्यांवर एक मुलगी सुरंगीचे गजरे विकत होती. गोव्याच्या पार्श्वभूमीवरील कथांतून तो परिचित असल्याने त्याचे वर्षाला विशेष आकर्षण! आधी किंमत न विचारता आम्ही एक गजरा हौसेने घेतला; त्याचे तिने चक्क दीडशे रुपये सांगितले! पण एकदा तो हातात घेऊन त्याचा वास वगैरे घेतल्यावर आम्हांला तो परतही करवे ना!

गोव्यातील मंदिरे ही मुख्यतः दक्षिण गोव्यात आहेत. प्रत्येक गोवेकर कुटुंबाचे एक कुलदैवत असते, कुलाचार असतात; त्यांची-त्यांची मंदिरे वंशपरंपरागत ठरलेली असतात. मला स्वतःला खूप आवडलेले मंदिर म्हणजे मागच्या एका भेटीत बघितलेले तांबडी सुर्ला येथील दगडी महादेव मंदिर. बाराव्या शतकात कदंब राजवटीत ते बांधलेले आहे. आम्ही गेलो तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हते आणि त्या निःशब्द शांततेत पंधरा-वीस मिनिटे बसून राहणे हा एक वेगळाच अनुभव होता. प्रत्येक देवळाचे काही ना काही वेगळेपण असतेच. मंगेशीचे देऊळ मंगेशकर कुटुंबामुळे प्रसिद्ध तर शांतादुर्गा म्हणजे गौड सारस्वत ब्राह्मणांचे कुलदैवत.
देवळात जाणार्याला गोव्यात प्रतिगामी समजत नाहीत. मुंबई-पुण्यात दिसतात तसे ‘आम्ही देवबीव मानत नाही’ असे ठामपणे सांगणारे विचारवंत मलातरी गोव्यात भेटलेले नाहीत. मला भेटलेले बहुसंख्य गोवेकर धार्मिक परंपरा पाळणारे वाटले. त्याचे एक संभाव्य कारण म्हणजे प्रदीर्घ काळ पोर्तुगीज सत्तेखाली राहताना स्वतःची अस्मिता जपणे गोवेकरांसाठी आवश्यक होते आणि धर्म हे त्या अस्मितेचे माध्यम होते. पण त्याचबरोबर हेही नमूद करायला हवे, की गोव्यात धार्मिक संघर्षही फारसे कधी झालेले नाहीत.

इन्क्विझिशनच्या काळात गोव्यातल्या बऱ्याच देवळांतील मूर्ती अन्य सुरक्षित जागी हलवल्या गेल्या. पण १८१२ साली इन्क्विझिशन संपल्यानंतर त्या परत मूळ गावी आणल्या गेल्या, मंदिरे पुन्हा अधिक भव्य स्वरूपात उभारली गेली. आपल्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात पोर्तुगीजांनी जबरदस्तीने काही धर्मांतरे केली हे खरे आहे; पण आपली ती चूक लक्षात आल्यावर त्यांनी असे जबरदस्तीने धर्मांतर करणे थांबवले. अन्यथा गोव्यात शंभर टक्के ख्रिश्चन लोक दिसले असते; हिंदू अजिबातच दिसले नसते; जे आज साधारण सत्तर टक्के आहेत. या देवस्थानांसाठी पोर्तुगीजांनी तयार केलेल्या आणि आजही पाळल्या जाणाऱ्या नियमावलीचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर करायचे काम ज्यांनी केले ते प्रा. रवीन्द्र घवी ‘चाळीस वर्षांचा गोमंतकीय’ या लेखात लिहितात, “देवस्थानांच्या व्यवस्थेचे काटेकोरपणे केलेले नियम मी वाचले आणि तिथल्या शिस्तशीर व्यवस्थेचा बोध झाला. ती व्यवस्था पिढ्यान् पिढ्या चालत आली होती आणि तिला धार्मिक विधी-उपचारांचे पावित्र्यही आलं होतं.” (अंतर्नाद, दिवाळी २०१०)
दुपारच्या वेळात मी ‘बॉम जीझस बॅसिलिका’ आणि ‘से कॅथेड्रल’ ही दोन प्रमुख चर्चेसदेखील बघितली. पणजीच्या ‘ओल्ड गोवा’ भागातील ही सुंदर कॅथॉलिक चर्चेस ख्रिश्चन नसलेल्या प्रवाशांनीही आवर्जून बघावीत अशी आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या दोन्हींचाही समावेश आहे. पोर्तुगीज लोक खूप धार्मिक असल्याने त्यांनी चार-पाचशे वर्षांपूर्वी अशी भव्य चर्चेस बांधली. मी युरोपात बघितलेली चर्चेसदेखील इतकी भव्य नाहीत. चर्च हे सर्वसामान्य रूप; ख्रिश्चन लोकांनी प्रार्थना करायची जागा, म्हणजेच ख्रिश्चनांचे देऊळ. चर्चेस दोन प्रकारची असतात : बॅसिलिका आणि कॅथिड्रल. बॅसिलिका म्हणजे जिथे पोपने नेमणूक केलेला बिशप नसतो असे चर्च; तर कॅथिड्रल म्हणजे जिथे पोपने नेमणूक केलेला बिशप असतो असे चर्च. कॅथिड्रल म्हणजे त्या भागातील सर्वांत मुख्य चर्च असेही म्हणता येईल. चर्च अगदी साधे, छोटे असेल तर त्याला चॅपल म्हणतात. तिथे कोणी पाद्री असतोच असे नाही; ती केवळ शांतपणे प्रार्थना करायची जागा.
चर्चमध्ये प्रवेश करायच्या आधीच प्रथम नजरेत भरले ते आजूबाजूचे प्रशस्त आणि कमालीचे स्वच्छ आवार. प्रत्यक्ष चर्चमध्ये भाविकांना बसायला बाके ठेवलेली होती. खाली संगमरवरी फरशी होती. समोरचा क्रॉस आणि येशू ख्रिस्त बहुधा लाकडात घडवलेला होता. जिथून पाद्री आपले प्रवचन (सर्मन) देतो ती जागा (पुल्पिट) नक्षीदार सजावट केलेली होती. मोठ्या घंटा होत्या. मेणबत्त्या तेवत होत्या. भिंतींवर आणि छतावर रंगीत काचांनी बनवलेली देखणी चित्रे होती. भोवतालची नीरव शांतता आणि एकूण वातावरण मनात एक उदात्त भाव निर्माण करणारे होते. चर्चमध्ये जाताना चांगल्यात चांगले कपडे घालून व सहकुटुंब जायची ख्रिश्चन धर्मात पद्धत आहे. तो एक आनंदाने साजरा करायचा विधी मानला जातो. चर्चमध्ये मास असतो तेव्हा जमलेले भक्त एका सुरात, शिस्तीत हिम्स (भक्तिगीते) म्हणत असतात. त्यांचे शब्द, चाल आणि क्रम हेही ठरलेले. साथीला ऑर्गनचे सूर. कुठेही गोंगाट, गडबड नसते. कोणाची आपापसांत कुजबूजही नसते. ख्रिस्ती धर्म हा एक सुनियोजित (ऑर्गनाइज्ड) धर्म आहे हे चर्चमध्ये गेल्यावर कोणी न सांगताही जाणवते. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, चर्चमधील वातावरण तुम्हांला भारावून टाकते हे नक्की.
बॉम जीझस बॅसिलिकामध्ये सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर या जेसुईट धर्मगुरूचे थडगे आहे. धर्मप्रसार करताना केल्या गेलेल्या जबरदस्तीमुळे त्याच्यावर बरीच टीकाही झालेली आहे; त्याचबरोबर त्याला श्रेष्ठ मानणारेही बरेच आहेत. देशभरात त्याच्या नावाने अनेक चर्चेस आणि शाळा-कॉलेजेस आहेत. यालाच ‘गोयंचो सायबा’ म्हटले जाते. येथील चर्चमध्ये त्याच्या शरीराचे अवशेष (relics) जपून ठेवण्यात आले आहेत. तीन डिसेंबर या त्याच्या स्मृतिदिनी गोव्यात मोठी यात्रा भरते, राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. त्याशिवाय दहा वर्षांतून एकदा त्याचे अवशेष बॅसिलिकातून रस्त्यापलीकडच्या सफेद रंगातल्या भव्य से कॅथेड्रलमध्ये हलवले जातात आणि जगभरातील भाविकांसाठी या अवशेषांचे सरकारतर्फे प्रदर्शन आयोजित केले जाते. त्या वेळी प्रचंड गर्दी उसळते.
सन १५१० ते १९६१ अशी साडेचारशे वर्षे गोव्यावर पोर्तुगीजांनी राज्य केले. (इथे एक नमूद केले पाहिजे, पोर्तुगीजांची साडेचारशे वर्षे थेट अशी सत्ता गोव्याच्या फक्त एक पंचमांश भागावर होती; उर्वरित भागावरील त्यांची थेट अशी सत्ता सुमारे दोनशे वर्षे होती. पण त्या उर्वरित भागावरही त्यापूर्वीची अडीचशे वर्षे त्यांचेच प्रभुत्व होते. त्यामुळे पोर्तुगीज कालखंड हा साडेचारशे वर्षांचा गणला जातो.) एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांचा येथील जीवनावर एक खोल असा ठसा स्वाभाविकच उमटला. गोव्याबद्दल लिहिताना या मोठ्या कालखंडाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल.
केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिले कॉलेज गोव्यातच १५४२ साली सुरू झाले – सेंट पॉल कॉलेज. सुरुवातीला ते जेझुइट पंथाचे प्रशिक्षण देणारे कॉलेज होते पण मग नंतर ते सर्वसाधारण कॉलेज बनले. त्या काळी तिथे तीन हजार विद्यार्थी होते. संपूर्ण आशिया खंडातील पहिला छापखानाही इथेच १५५६ साली सुरू झाला आणि पहिली पुस्तकेदेखील इथेच छापली गेली. लॉर्ड बेंटिकने भारतात सतीबंदीचा कायदा आणायच्या साडेतीनशे वर्षे आधी, म्हणजे सन १५११ मध्येच अल्बुकर्कने गोव्यात सतीबंदी केली होती. त्या काळातच इथे समान नागरी कायदा केला गेला व स्त्रीपुरुषांना समान अधिकार मिळाले. पोर्तुगीज काळात गोव्यातील अनेक जातींचे एकत्रीकरण झाले आणि मला मिळालेल्या माहितीनुसार आज तिथे फक्त दोन टक्के समाज हा दलित म्हटला जाईल असा आहे. एकूणच जातिभेदाची तीव्रता गोव्यात खूप कमी आहे. कोकणी भाषेला आणि साहित्यालाही पोर्तुगीजांनी उत्तेजन दिले. कोकणीतील व्याकरण त्यांनीच प्रकाशित केले, कोकणीतील पाठ्यपुस्तकेही त्यांनीच छापून प्रचलित केली.
लॅटिन अमेरिकेचा भारतावर पडलेला प्रभाव हा पोर्तुगीजांमुळेच शक्य झाला. तेथूनच पोर्तुगीजांनी हापूस, पायरी, मानकुराद यांसारखे कलमी आंबे इथल्या मातीत रुजवले. चिकू, काजू, अननस, पपई, कॉफी, कोको, बटाटा, टोमॅटो, कोबी, मिरची वगैरे अनेक पिके पोर्तुगीजांनी तेथूनच आपल्याकडे आणली. आज संपूर्ण देशभर खाल्ला जाणारा ‘पाव’ त्यांनीच गोव्यात आणला. तो बनवताना घातल्या जाणाऱ्या यीस्टमुळे पावात फर्मेन्टेशन (fermentation) होऊन पाव फुलतो, सच्छिद्र बनतो, पचायलाही सोपा बनतो. पावाच्या वरच्या भागावर साखरयुक्त पाण्याचा ब्रश थोडा अधिक फिरवल्याने तो भाग तांबूस आणि जाड होतो. उंडो म्हणजे लंबवर्तुळाकृती कडक पाव. पाव विकणारा तो पोदेर. हे पोदेर पूर्वी मुख्यतः कॅथलिक असत, आता इतरही असतात. माझ्या लहानपणी मुंबईत ख्रिश्चन लोकांना आम्ही सररास ‘पाववाले’ म्हणत असू. वसई, बांद्रा आणि धोबीतलाव इथे त्यांची मुख्य वस्ती असायची. बेकरीमध्ये तयार होणारे केक किंवा बेबिन्का वगैरे पदार्थ पोर्तुगीजांनीच आणले. तोफा आणि दारूगोळाही पोर्तुगीजांनीच सर्वप्रथम भारतात आणून विकायला सुरुवात केली. ही शस्त्रात्रे त्या वेळी भारतात बनत नव्हती. साहजिकच जुनाट पारंपरिक शस्त्रांनी लढाया करणार्या स्थानिक राजांना एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी ती हवी असत आणि त्यासाठी भरपूर किंमत मोजायची त्यांची तयारी असे.
गोव्यातील प्रत्येक जुन्या घराला छानसा हवेशीर बाल्काव असतो. बाल्काव म्हणजे घरापुढचा मोठा ओटा ज्याच्यावर बसून संध्याकाळी लोक शेजार्यापाजार्यांशी गप्पा मारत. ही उबदार हवामानातल्या पोर्तुगालमधील पद्धत होती; थंड हवेतल्या ब्रिटनमध्ये ती नव्हती. घरांना चांगले, तजेलदार रंग देणे ही परंपरादेखील पोर्तुगीजांची. पणजीतील हेरिटेज वॉकमध्ये पोर्तुगीज शैलीत बांधलेली अशी अनेक पारंपरिक घरे आजही बघायला मिळतात.
गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या एका अधिवेशनात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी उपस्थितांना आवाहन करताना म्हटले होते, “इतिहासाच्या ओघात आपल्या घराच्या पश्चिम दिशेला उघडलेल्या या खिडक्या बंद करू नका.” गोव्यातील पोर्तुगीज प्रभाव हे गोव्याचे एक ठळक वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे तो प्रभाव जपला जावा ही पंडित नेहरू यांचीही इच्छा होती. जगभरच्या प्रभावांचा स्वीकार केल्याने आपल्या संस्कृतीला उणेपणा येत नाही, उलट ती अधिकाधिक बहुढंगी व समृद्ध होत जाते, तिच्यात साचलेपण येत नाही असे अनेकांचे मत आहे.
पोर्तुगालमध्ये १९१० साली राज्यक्रांती झाली, आठशे वर्षे जुनी राजेशाही उलथून पडली आणि देशात ‘प्रजासत्ताक’ (रिपब्लिक) स्थापन झाले. त्याचा मोठा परिणाम सर्वच पोर्तुगीज वसाहतींवर झाला; त्यांना अधिक स्वायत्तता मिळाली. त्याचा फायदा गोव्यातील जनतेलाही झाला. त्याचा एक परिणाम म्हणून गोव्यातील जनतेतही मोठी जागृती झाली. कोकणी साहित्यनिर्मितीलाही बहर आला. वि.स.सुखटणकरांच्या कथा किंवा अ. का. प्रियोळकर यांचे संशोधनपर लेखन त्यातूनच निर्माण झाले. प्रा. रवीन्द्र घवी यांच्यासारख्या काही उपरोक्त साहित्यिकांच्या मते तेवढ्या उंचीचे साहित्य आजच्या गोव्यात निर्माण होत नाही.
गोव्याचे आणि महाराष्ट्राचे नाते पोर्तुगीज काळापासूनच घनिष्ट आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हाच तेथील प्रमुख राजकीय पक्ष होता. अनेकांची इच्छा गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा अशी होती; पण या प्रश्नावर १९६७ साली गोव्यात सार्वमत (रेफरेंडम) घेतले गेले तेव्हा निकाल विलिनीकरणाच्या विरोधात लागला. देशाच्या इतिहासातील हे पहिलेच (आणि कदाचित एकमेव) सार्वमत. त्यामुळे गोवा स्वतंत्र राज्य राहिले. मराठी बांधवांना हा मोठाच धक्का होता; कारण सार्वमत आपल्याच बाजूने असेल आणि गोवा महाराष्ट्रातच विलीन होईल हे त्यांनी गृहीतच धरले होते; परंतु पक्षाचे मुख्य नेते दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांनी लोकमताचा कौल मानला. स्वतंत्र गोव्यातील पहिल्या निवडणुकीपासून, म्हणजे १९६३पासून १९७३ साली निधन होईस्तोवर ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. सुरुवातीची स्थित्यंतराची ती दहा वर्षे मोलाची होती. त्या काळात या लोकहितदक्ष नेत्याने नव्या राजवटीचा उत्तम पाया रचला. स्वतः एक मोठे खाणमालक असूनही सामान्य जनतेविषयी त्यांना कळवळा होता. गोमंतक मराठा समाजातील कलावंत मुलींना त्यांच्या रूपाने देवदूतच भेटला. देवदासी मानल्या गेलेल्या अनेक मुलींची त्यांनी लग्ने लावून दिली; त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. भेटायला येणारे लहानमोठे सारे लोक त्यांना ‘भाऊ’ म्हणत यातच सर्व काही आले. गोवा म्हणजे अगदी आपले सख्खे शेजारी म्हणता येईल असे राज्य. जिथे आपली मराठी भाषा तुम्ही कुठेही बोलू शकता. जिथे फिरताना आपण आपल्याच माणसांमध्ये आहोत असे आजही वाटत राहते. पण स्वतंत्र राज्य म्हणून राहण्याचा १९६७ सालचा सार्वमताचा निर्णय चुकीचा होता असे म्हणणारे, किंवा अजूनही आम्हांला महाराष्ट्रात सामील व्हायचे आहे असे म्हणणारे कोणी गोवेकर मला तरी भेटलेले नाहीत!

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा ध्वज
पोर्तुगीजांची सत्ता गोव्याप्रमाणे मुंबई-वसई-दीव-दमण-सिल्व्हासा या भागावरही अनेक वर्षे होती. कोकण गोव्याला लागूनच होते आणि मुंबईदेखील गोवेकरांना समुद्रमार्गे कायमच सोयीची होती. साहजिकच त्यांचे भाषिक संस्कारही मराठीवर होणे स्वाभाविक होते. ‘बॉंबे’ किंवा ‘बंबई’ शब्दाची व्युत्पत्तीच ‘बॉं बइआ’ (Buon Bahia) म्हणजे ‘उत्तम बंदर’ या पोर्तुगीज शब्दावरून झालेली आहे.
पोर्तुगीज भाषेतून आलेले अनेक शब्द मराठीत पूर्णतः मिसळून गेले आहेत. उदाहरणार्थ : ‘पाव.’ ‘ब्रेड’सारखा इंग्लिश शब्द टाळून त्याला ‘पाव’ म्हणण्यात आपले मराठीप्रेम सिद्ध होत नाही; कारण ‘पाव’ शब्दही मूळ पोर्तुगीज आहे! अनेक नवीन वस्तू पोर्तुगीजांनी आणल्या आणि त्यांच्याबरोबरच आलेले वस्तुदर्शक पोर्तुगीज शब्दही मराठीने स्वीकारले. साबण, बशी, घमेले, व्हरांडा, अलमारी, चावी, बादली, पिंप, बिजागरी, इस्त्री, परात हे शब्द मूळचे पोर्तुगीज आहेत. पाद्री, लिलाव, नाताळ हेही त्यांचेच शब्द. ‘पगार’ हा सर्वांचा आवडीचा शब्द! तोही ‘पागा’ म्हणजे वेतन या पोर्तुगीज शब्दातून आला आहे. ‘केलेल्या कामाचा नियमित तारखेला मोबदला देणे’ ही संकल्पना ‘पगार’ या शब्दातून व्यक्त होते आणि ‘किंमत’, ‘बक्षीस’ किंवा ‘इनाम’ या रूढ शब्दांपेक्षा ती अगदी वेगळी आहे. जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांना आपली जागा सोडताना मूळ मालकाकडून बरीच मोठी रक्कम ‘पागडी’ म्हणून मिळते. या पागडी शब्दाची व्युत्पत्तीदेखील ‘पागा’ शब्दाच्या ‘मोबदला’ याच अर्थच्छटेतून झाली असावी.
अनेक गोवेकर लेखकांनी कोकणीप्रमाणेच मराठी साहित्यही समृद्ध केले आहे. दहा खंडांतील ‘भारतीय संस्कृतिकोश’ संपादित करणारे महादेवशास्त्री जोशी किंवा ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती,’ अशासारख्या अजरामर ओळी लिहिणारे बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर सर्वच मराठी वाचकांना चांगले परिचित असतात. पण त्यांच्याप्रमाणेच चंद्रकांत काकोडकर या लोकप्रिय पण समीक्षकांनी दुर्लक्ष केलेल्या गोमंतक लेखकाची इथे आठवण होते. त्यांच्या अनेक कादंबर्या गोव्याच्या पार्श्वभूमीवरच्या आहेत. त्यांची ‘श्यामा’ ही कादंबरी एका दिवाळी अंकात १९६२ साली प्रकाशित झाली. ती अश्लील आहे असा आरोप पुण्यातील एका गृहस्थांनी केला. साहित्यक्षेत्रातील अनेक नामवंतांनी ‘माफी मागून मोकळे व्हा’ असा सल्ला काकोडकर यांना दिला; पण काकोडकरांनी माफी मागायला ठाम नकार दिला. त्या गृहस्थांनी कोर्टात खटला भरला. शेवटी न्यायमूर्तींनी ‘ही कादंबरी अश्लील नाही,’ असा निवाडा दिला; पण फिर्यादी पक्षाने हायकोर्टात अपील केले व तेथील न्यायाधीशांनी लेखकाला दोषी ठरवून २५ रुपये दंड केला. तसे पाहिले तर हा किरकोळ दंड भरून काकोडकर मोकळे होऊ शकले असते. तसा सल्ला त्यांना अनेकांनी दिलादेखील. पण अशी कच खाणाऱ्यांपैकी काकोडकर नव्हते. त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला. ह्या ठिकाणी अॅडव्होकेट सुशील कवळेकर काकोडकरांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, आपल्या इतर अनेक महत्त्वाच्या केसेस सहकारी वकिलांवर सोपवून ते दिल्लीला सुप्रीम कोर्टात जात. शेवटी सुप्रीम कोर्टाने काकोडकर ह्यांची निर्दोष सुटका केली. ह्या सगळ्या प्रकरणात सात वर्षे गेली, पण त्यातून भावी मराठी साहित्यावरचे एक संभाव्य भावी गंडांतर टळले. अन्यथा संपूर्ण पुस्तकात एखादे वाक्य जरी एखाद्याला अश्लील वाटले, तरी सगळ्या पुस्तकावर बंदी यायचा धोका होता. अगदी कालिदासाच्या शाकुंतलवरदेखील त्यात विवाहबाह्य संबंधाचे चित्रण आहे असे म्हणत खटला भरणे शक्य झाले असते! दुर्दैवाने काकोडकरांच्या ह्या अभूतपूर्व लढ्याची साहित्यविश्वाने नंतरही फारशी कुठे दखल घेतली नाही. तीनशे कादंबऱ्या लिहिणारे काकोडकर १९८८ साली वारले, पण अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या झुंजीची ही कहाणी आजही प्रेरणादायी आहे.
शनिवारी रात्री दत्ता नाईक यांच्या वाढदिवसाची ताज एक्झोटिका रिसॉर्टमधील पार्टी आनंदात आणि उत्साहात पार पडली. समुद्र आणि प्रत्यक्ष हॉटेल यांच्यामधील प्रशस्त, सुरेख सजवलेल्या लॉनवर चार-पाचशे माणसे जमली होती. एका कोपऱ्यात बॅंडवादन चालू होते. उत्सवमूर्ती दत्ता नाईक डोक्यावर हॅट घालून सर्वत्र फिरत होते. त्यांची कॉमनवेल्थ डेव्हेलपर्स ही बांधकाम कंपनी आहे, न्यू मिलेनियम बेकर्स ही फर्म आहे, ‘मॉंजिनी’ ब्रँडखाली त्यांची उत्पादने गोव्यात सगळीकडे जातात; पण तो सर्व व्याप सांभाळूनही ते रोज वाचनासाठी वेळ काढतात, लेखनही करतात. त्यांची मराठी, कोकणी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांत बरीच पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांना कोंकणी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांची शब्दकळा कुठल्याही लेखकाला हेवा वाटावा अशी आहे. धर्मानंद कोसंबींपासून थॉमस फ्रिडमनपर्यंत अनेकांचे संदर्भही त्यांच्या लेखनात तसेच बोलण्यात येत असतात. साहित्यिक उपक्रमांना मदत करण्यासाठी त्यांनी नुकताच स्वतःचे पाच कोटी रुपये घालून एक ट्रस्ट स्थापन केला आहे.
पुस्तकांत रमणारा माणूस सहसा रस्त्यावर उतरणारा नसतो. दत्ता नायक हे अपवाद म्हणायचे. मागे एकदा गोवा पोलिसांनी वास्को बंदरातील वेश्यांवर ‘कठोर कारवाई’ करून त्यांना हुसकावून लावले असताना पोलिसांच्या ‘क्रूर’ वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी दत्ता नायक रस्त्यावर उतरले होते व त्याबद्दल त्यांनी पोलीस कोठडीची हवाही खाल्ली होती. वाचिवीर बरेच असतात, पण ही कृतिप्रवण सामाजिक संवेदनशीलता एकूण दुर्मीळच. सामान्यतः उद्योगपती सत्ताधारी पक्षाशी पंगा घेत नाहीत; पण दत्ता नायक अनेकदा सत्ताधारी पक्षावर जाहीर टीका करत असतात. त्यांच्या मित्रवर्तुळात समाजाच्या सर्व स्तरांतील लोक आहेत. पार्टीत वर्षा आणि मी यांच्याप्रमाणेच पंढरपूरहून आलेले अनिल आणि शुभांगी जोशी तसेच साधनाचे संपादक विनोद शिरसाठ आणि त्यांचे तीन सहकारी हजर होते. अशा प्रसंगी गंभीर विषयावर काही चर्चा व्हायची शक्यता अर्थातच नसते; पण त्या निमित्ताने एरव्ही सहसा न भेटणारे अनेक जण एकत्र भेटतात हे खरे. अधूनमधून हातातली प्लेट रिकामी करता करता मी शांतपणे आसपासच्या गप्पा ऐकत होतो. इथल्या लोकांच्या बोलण्यात ‘अहो-जाहो’ नाहीच; ‘अरे-तुरे’ असाच एकेरी उल्लेख. बोलणे अनुनासिक आणि अनौपचारिक. त्यात एक वेगळाच गोडवा आणि जिव्हाळा होता. छान वाटत होते. रात्री उशिरापर्यंत आम्ही तिथे रमलो होतो.
संस्थात्मक सामाजिक कामातही दत्ता नायकांचा मोठा सहभाग असतो. तसा तो त्यांचा कौटुंबिक वारसाच आहे. गोमंत विद्या निकेतन हा त्याच सेवाकार्याचा एक भाग. गोव्यातील ही एक प्रमुख सामाजिक-सांस्कृतिक संस्था. १९१२ साली स्थापन झालेली. काही प्रमुख स्थानिक मंडळींच्या त्यागातून आणि धडपडीतून वाढलेली. पूर्वी संस्थेत सारस्वत ब्राह्मण समाजाचे वर्चस्व होते; पण तिचे आजचे स्वरूप जातिविशिष्ट नाही. मडगावच्या अगदी मध्यवर्ती भागात संस्थेची स्वतःची नवीन दुमजली वास्तू असून तिचे उद्घाटन १९६७ साली माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते.
या संस्थेच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तिथे चार-पाच वेळा तरी गेलो असेन. प्रत्येक कार्यक्रम सणासुदीच्या उत्साही वातावरणात पार पडला होता. महिलाही बर्याच उपस्थित असत. वागण्याबोलण्यात गोडवा आणि जिव्हाळा जाणवत असे; जो मुंबई-पुण्यात दुर्मीळ आहे. हेही गोव्याचे मला जाणवलेले एक वैशिष्ट्य. संस्थेतील नूतनीकरण केलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले तो कार्यक्रम मला खूपच आवडला होता. लुइझीन फालेरो आणि दिगंबर कामत हे गोव्याचे दोन कॅबिनेट मंत्री कार्यक्रमाला हजर होते, प्रत्येक गोष्टीत अनौपचारिकपणे भाग घेत होते, गप्पा-विनोद करत होते. प्रथमपासून शेवटपर्यंत थांबले होते. केवळ हजेरी लावून लगेच दुसरीकडे गेले असे नव्हते. मंत्र्यांभोवती बहुतेकदा असणारे अधिकारी-पोलीस आणि त्यामुळे उगाचच निर्माण होणारा एक प्रकारचा दबदबा व नेत्यांचे लोकांपासूनचे अंतर यांचा इथे मागमूसही नव्हता. गोवा हे खूप छोटे राज्य आहे याचा हा परिणाम असावा. मुख्यमंत्री असतानाही साध्या स्कूटरवरून भाजी आणायला जाणारे मनोहर पर्रीकर गोवेकरांनी पाहिले आहेत. या बाबतीत गोव्याचे केरळशी बरेच साम्य आहे. दोन्ही राज्यांत मंत्री आणि सामान्य जनता यांच्यातील संबंध बऱ्यापैकी अनौपचारिक आहेत.
संस्थेची संबंधित बहुतेक मंडळी मराठीवादी दिसली; पण दत्ता नायकांसारखी काही मंडळी कोकणीची कैवारीही आहेत. तसे पाहिले तर कोकणी-मराठी वाद हा खूप जुनाच आहे. ‘मी रायटर नाही तर फायटर आहे’ असे ठासून सांगणारे गोव्यातील एकमेव ज्ञानपीठविजेते रवींद्र केळेकार यांनाही त्यांच्या ग्रंथभरल्या घरी भेटायचा, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारायचा एकदा योग आला होता. कोकणीचे ते कट्टर पुरस्कर्ते. कोकणी ही मराठीची बोली नसून ती एक स्वतंत्र भाषा आहे हे केंद्र सरकारला पटवण्यात आणि त्यानुसार कोकणीला स्वतंत्र भाषेचा अधिकृत दर्जा मिळवून देण्यात सुखटणकर व बोरकर यांच्याप्रमाणेच त्यांचाही वाटा मोठा होता.
काही वर्षांपूर्वी बोरकर जन्मशताब्दीच्या निमित्ताने गोवा सरकारतर्फे भरलेल्या एका साहित्य संमेलनात माझा सहभाग होता. ‘कोकम संमेलन’ असे ह्या संमेलनाला म्हटले होते. कोकम हे गोव्यात सर्वत्र उपलब्ध असलेले रोजच्या वापरातले एक फळ, पण त्याचबरोबर कोकणी, कन्नड आणि मराठी ह्या गोव्यात बोलल्या जाणाऱ्या तीन भाषांची ही आद्याक्षरे. मुळात असे संमेलन ही बोरकरांची एक संकल्पना. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या संमेलनाचे सर्व सूत्रसंचालन या तिन्ही भाषा वगळून इंग्रजीसारख्या परकीय भाषेत करावे लागले, कारण सर्व उपस्थितांना समजेल अशी ह्या तिनांपैकी एकही भाषा नव्हती! एकमेकांशी संवाद साधतानाही सर्वांना पुन्हा इंग्रजीचाच आधार घ्यावा लागत होता. तथाकथित कोकणी-मराठी वाद अशा प्रसंगी हास्यास्पद ठरत होता, कारण दोघांनीही आपापल्या मातृभाषा बाजूला सारून इंग्रजीचा सुखेनैव आसरा घेतला होता! वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या भारतीयांना जोडणारी एक जोडभाषा नसणे ही आपल्या समाजात एकमयता निर्माण होण्यातली एक मोठीच अडचण आहे हे तेव्हा पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले होते.
गोवा सरकार साहित्याला बऱ्यापैकी उत्तेजन देते असे माझे निरीक्षण आहे. शासनातर्फे बरीच पुस्तक-खरेदी होत असते. वाचनाचे प्रमाण तुलनेने तसे चांगले आहे. या भेटीत मी पणजी येथील संस्कृती भवन या संकुलातील सहा मजली गोवा स्टेट सेंट्रल लायब्ररी बघायला आवर्जून गेलो होतो. गोव्यातील आद्य साहित्यिक कृष्णदास शामा यांचे नाव या ग्रंथालयाला दिले आहे. त्यांनी १५२६ साली लिहिलेले ‘कृष्ण चरित्रकथा’ हे कोकणीतील पहिले पुस्तक. पोर्तुगीज काळात १८३२ साली स्थापन झालेले हे ग्रंथालय देशातील सर्वांत जुने ग्रंथालय आहे. म्हणजे इथेही गोवा अन्य राज्यांपेक्षा पुढे होते. पोर्तुगीज, इंग्लिश, कोकणी, मराठी, कन्नड या भाषांतील साधारण दोन लाख पुस्तके इथे उपलब्ध आहेत. पुस्तकविक्री दालनही आहे. निव्वळ वाचनाच्या पलीकडे जाऊन एक सांस्कृतिक केंद्र म्हणूनदेखील येथील काम होते. आत्ताची नवी इमारत जेरार्ड द कुन्हा या जगविख्यात आर्किटेक्टने २०११ साली बांधली. गोव्यात प्रकाशित झालेल्या कुठल्याही पुस्तकाच्या तीन प्रती इथे द्याव्या लागतात. साधारण तासभर मी तिथे काढला असेल. इतके सुसज्ज ग्रंथालय देशात इतर कुठे क्वचितच बघायला मिळेल.
गोव्याबद्दल लिहिताना रामकृष्ण नायक यांच्याविषयीही लिहायला हवे. दत्ता नायक यांच्याप्रमाणेच तेही अंतर्नाद मासिकाचे प्रथमपासून हितचिंतक होते. नात्याने ते दत्ता नायक यांचे काका. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत; पण जेव्हा जेव्हा मी गोव्याला गेलो आहे तेव्हा तेव्हा त्यांची प्रकर्षाने आठवण झाली आहे; किंबहुना मी बघितलेला बराचसा गोवा हा त्यांच्याच साक्षीने बघितलेला आहे. तो सगळा परिसर ते जिवंत करायचे. तसे पाहिले तर रामकृष्णकाका (असेच मी त्यांना संबोधत असे) शिक्षणाने चार्टर्ड अकाउंटंट; पण नाटकांचे जबरदस्त वेड असलेले. मराठी रंगभूमीला नवसंजीवनी देणार्या गोवा हिंदू असोसिएशन या मुंबईतील संस्थेसाठी स्वतःला वाहून घेतलेले. बरोबर दुपारी दोन वाजता मुंबईतल्या माहीम येथील आपले ऑफिस ते बंद करीत. त्यानंतर काम करावे लागेल इतकी कधी प्रॅक्टिस वाढवायचीच नाही हा स्वतःच घालून घेतलेला दंडक त्यांनी शेवटपर्यंत पाळला. दोन वाजले, की सरळ लॅमिंग्टन रोडची बस पकडायची, तिथल्या गोमंतधाम इमारतीतील संस्थेच्या कार्यालयात जायचे. मग जिथे नाटकाची तालीम वा प्रयोग असेल तिथे. तिथून रात्री केव्हातरी घरी परत. हे सगळे करता यावे म्हणून त्यांनी विवाहदेखील केला नाही. संस्थेच्या कलाविभागातर्फे एकापेक्षा एक उत्तम अशी नाटके रंगभूमीवर सादर केली गेली. सुरुवात झाली ती वसंत कानेटकर यांच्या १९६२ सालच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ह्या नाटकाने. त्याने अक्षरशः इतिहास घडवला. त्याचे ६६६ प्रयोग झाले. त्यानंतर मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाली, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, मंतरलेली चैत्रवेल अशा उत्तमोत्तम नाटकांची एक शृंखलाच आली. त्यांनी १९७० साली सादर केलेले वि. वा. शिरवाडकरांचे नटसम्राट हे तर मराठी रंगभूमीवरचे सर्वांत गाजलेले नाटक म्हणता येईल. इंग्रजी रंगभूमीवर ज्याप्रमाणे शेक्सपीयरचा हॅम्लेट सादर करणे हे प्रत्येक नटाचे स्वप्न असते, त्याचप्रमाणे ‘नटसम्राट’मधील बेलवलकर सादर करणे हे प्रत्येक मराठी नटाला आव्हान वाटत आले आहे. सर्व कलावंतांशी रामकृष्णकाकांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. कुसुमाग्रजांचे तर ते जणू मानसपुत्र होते. संस्थेच्या नाट्यप्रयोगांना नेहमीचा ‘चौथा अंक’ नसायचा; आणि रामकृष्णकाकांच्या प्रेमाचा वचक इतका, की सगळे बडे नट ती परंपरा कुरकुरत का होईना पण पाळायचे! पडद्यावरच्या जगाइतकेच पडद्यामागच्या जगाशीही ते परिचित होते; पण तरीही त्यांच्या बोलण्यात ‘सिनीसिझम’ जराही नसायचा.
नाटकांचे पर्व संपल्यावर त्यांच्या आयुष्यातील वृद्धसेवेची दुसरी इनिंग्ज सुरू झाली. कदाचित पहिल्या इनिंग्जपेक्षाही ती त्यांना अधिक समाधान देणारी होती. फोंडा येथे सहा-सात एकरांच्या डोंगरउतारावर त्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेले ‘स्नेहमंदिर’ म्हणजे वृद्धाश्रम कसा असावा याचा एक आदर्श आहे. त्याची पायाभरणी १९८९ साली कुसुमाग्रजांच्या हस्ते आणि पु. ल. देशपांडे यांच्या उपस्थितीत झाली. प्रत्यक्ष उद्घाटन १९९३ साली नानी पालखीवाला यांच्या हस्ते झाले. तेथील डायनिंग हॉलच्या भिंतींवरील मनोहर ओके (ओकऐवजी त्यांनी ओके हेच नाव वापरले आहे) यांनी काढलेली कलावंतांची अप्रतिम रेखाटने कोणाचेही लक्ष वेधून घेतात; ती बघताबघता जेवण खूपदा उशीराच होते! रामकृष्णकाकांचे वडील केशव अनंत नायक हेही गोव्यातील मोठे सामाजिक कार्यकर्ते होते. गोमंत विद्या निकेतनचे ते एक संस्थापक आणि सत्तावीस वर्षे चिटणीस होते. स्वतः नामानिराळे राहून हाती घेतलेल्या कामात सर्वस्व झोकून द्यायचा वडलांचा गुण रामकृष्णकाकांनीही आयुष्यभर जपला. असे कार्यकर्ते आजच्या इमेज-बिल्डिंगच्या जमान्यात दुर्मीळच. चांगले सामाजिक काम पैशावाचून थांबत नाही हे कदाचित खरे असेल; पण निरलस कार्यकर्त्यांवाचून ते कधी उभेच राहू शकत नाही हे नक्कीच खरे आहे. आमची शेवटची भेट याच स्नेहमंदिरमधील त्यांच्या खोलीत झाली. तब्येत बरी नसतानाही ते आमच्याशी तासभर बोलले. अनिल जोशी आणि दत्तप्रसाद दाभोळकर हेही त्या वेळी आमच्याबरोबर होते. त्यांच्या मडगावमधील जुन्या गोव्याची परंपरा मिरवणाऱ्या ऐसपैस वडिलोपार्जित घरात राहणे, त्यांच्याबरोबर उसळ-पावाचा नाश्ता करणे आणि रमतगमत गोव्यात भटकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. तो माझ्या वाट्याला तीन-चार वेळा तरी आला हे भाग्यच म्हणायचे.
उद्योगक्षेत्राच्या दृष्टीने गोवा म्हणजे लोखंड व मॅंगनीजच्या खाणी; पण सांस्कृतिकदृष्ट्या गोमंतभूमी म्हणजे कलावंतांची खाण. मीनाक्षी शिरोडकरपासून वर्षा उसगावकर आणि उर्मिला मातोंडकरपर्यंत इथल्या अनेक रूपगर्वितांनी लाखो प्रेक्षकांची हृदये जिंकली आहेत. लता मंगेशकरपासून किशोरी आमोणकरपर्यंत इथल्या अनेक गानसम्राज्ञींनी लाखो कानसेनांना तृप्त केले आहे. मोगूबाई कुर्डीकर, आशालता वाबगावकर, केसरबाई केरकर, श्रीपाद नेवरेकर, मास्टर दत्ताराम, प्रसाद सावकार, सुरेश हळदणकर, रामदास कामत, जितेंद्र अभिषेकी, भास्कर चंदावरकर… नावांची मालिका लांबलचक आहे. दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर यांच्यासारखे चित्रकार इथलेच. अर्थात ही गोमंतभूषणे फक्त कलेच्या क्षेत्रापुरतीच आहेत असे नव्हे. टीव्ही पत्रकार राजदीप सरदेसाई इथलेच. प्रेमानंद रामाणी, अरविंद बावडेकर यांच्यासारख्या सर्जन्सपासून अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांपर्यंत अनेक गोवेकरांनी देशाची मान उंचावली आहे.
आज जो गोवा आपल्याला दिसतो तो घडवण्यात तेथील ख्रिश्चन समाजाचेदेखील मोठे योगदान आहे. फारच थोड्या वाचकांना ठाऊक असेल की टी. बी. कुन्हा हे ख्रिश्चन गृहस्थ गोव्यातील आद्य स्वातंत्र्यसेनानी मानले जातात. ‘फादर ऑफ द गोवन नेशनहूड’ असा पंडित नेहरू यांनी त्यांचा गौरव केला होता. भारत सरकारने त्यांच्यावर एक टपाल तिकीट जारी केले होते आणि भारताच्या लोकसभेत त्यांचे तैलचित्र लावलेले आहे. एक विशेष म्हणजे त्यांचे मुंबईतल्या शिवडी येथील स्मशानभूमीत असलेले आणि नंतर विस्मृतीत गेलेले थडगे फिल्म्स डिव्हिजनचे एक निर्माते प्रेम वैद्य यांनी शोधून काढले होते. पुढे ते थडगे शिवडीहून गोव्याला नेले गेले आणि सरकारी इतमामात पणजीच्या आझाद मैदानावर त्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना केली गेली. त्या अनुभवावर आधारित ‘विस्मृतीतला स्वातंत्र्ययोद्धा’ या शीर्षकाचा एक लेखही प्रेम वैद्य यांनी अंतर्नाद मासिकाच्या एप्रिल २००१ अंकात लिहिला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवलेलेही काही ख्रिस्ती गोवेकर आहेत त्यांचाही उल्लेख करायला हवा. एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे चार्ल्स कुरैया हे वास्तुतज्ज्ञ. साबरमती येथील गांधी स्मारक संग्रहालय, नवी दिल्ली येथील ब्रिटिश कौन्सिल, भोपाळ येथील भारतभवन आणि विधानसभा किंवा पुणे विद्यापीठातील आयुका या त्यांच्या इमारती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि त्यांना भेटी देणे हा आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा एक भाग असतो. नवी मुंबई शहराचे अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे १९७० ते १९७५ या काळात कुरैया प्रमुख आर्किटेक्ट होते. दुर्दैवाने पुढे नव्या मुंबईची वाढ अगदी चुकीच्या पद्धतीने होत गेली. पोर्तुगाल, कॅनडा वगैरे देशांमध्येही त्यांनी काही महत्त्वाच्या इमारतींची वास्तुरचना केली आहे. ब्रिटनच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (RIBA) या महत्त्वाच्या संस्थेने १९८४ साली ‘India’s greatest architect’ अशा शब्दांत कुरैया यांचा गौरव केला होता. भारत सरकारनेही त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. असेच दुसरे एक नाव म्हणजे मारिओ मिरांडा हे व्यंगचित्रकार व रेखाटनकार. टाइम्स ऑफ इंडिया व इकॉनॉमिक टाइम्स या दैनिकांमधली आणि इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया या आता बंद झालेल्या नामांकित साप्ताहिकामधील त्यांची रेखाटने बरीच लोकप्रिय होती. गोव्यात विमानतळापासून रेल्वे स्टेशनपर्यंत आणि कला अकादमीपासून मंत्रालयापर्यंत त्यांनी केलेली मोठी-मोठी म्युरल्स आपल्याला दिसतात. त्यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. जगात हिप्नॉटिझमची सुरुवात करणारे आबा फारिये हे गोव्याचेच. त्यांचे पुतळे युरोपातही उभारले गेले आहेत. मिस वर्ल्ड हा किताब मिळवणारी पहिली भारतीय आणि पहिली एशियन सुंदरी रिटा फरिया हीदेखील मूळची गोव्याचीच. जाहिरातगुरू कर्सन द कुन्हा किंवा नर्तक रेमो फर्नांडिझ ही अलीकडची काही नावे.
सगळ्या गोवा राज्याची लोकवस्ती जेमतेम चौदा-पंधरा लाख असेल, म्हणजेच मुंबईच्या एक दशांश आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा कमी, हे लक्षात घेतले तर गोवेकरांचे हे योगदान अधिकच थक्क करते. एक पारशांचा अपवाद सोडला तर संख्येने इतका अल्प पण गुणवत्तेने इतका समृद्ध समाज सापडणे कठीणच.
रविवार, ९ मार्चच्या संध्याकाळी साधनाच्या गोवा विशेषांकाची पूर्वतयारी करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. काहीही कारण नसताना अस्मादिकांना त्यांनी अध्यक्षस्थानी बसवले होते! त्या वेळच्या चर्चेतून मला थोडी वेगळी माहितीही मिळाली. उदाहरणार्थ : गोव्यातील तियात्र या नाट्यप्रकाराविषयी प्रथमच काही कळले. पाश्चात्त्य ऑपेरापासून प्रेरणा घेतलेला हा प्रकार होता. चर्चमध्ये प्रचलित असलेल्या संगीतामुळे ऑर्गन, अॅरेंजर, नोटेशन्स हे प्रकार गोव्यात कसे रूढ झाले, ऑर्केस्ट्रा हा प्रकार कसा आला हेही एकाने सांगितले. माझ्या लहानपणी रेडिओवर अधूनमधून लागणारी कोकणी गाणी आम्हांला कशी खूप वेगळी वाटायची आणि आम्ही ती किती आनंदाने ऐकत असू याची त्या वेळी मला आठवण झाली.
या बैठकीला साधनाचे वीस-पंचवीस वाचक हजर होते; पण ती उपस्थिती बरीच कमी होती असे मला वाटले. कारण गोव्यात साधनाचे हितचिंतक बरेच आहेत असे मी ऐकले होते. इथे नक्की भेटतील असे वाटलेले माझ्या ओळखीचे एक जण आले नव्हते. नंतर मी त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले, “मला जायला-यायला ट्रान्सपोर्टची काही सोय नव्हती. आता मी गाडीही चालवत नाही. मुंबई-पुण्यासारखा गोव्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही ना! त्यामुळे इच्छा असूनही बैठकीला येता आलं नाही.” चांगल्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा अभाव ही अनेकांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची किती मोठी अडचण असते हे इथे जाणवले. शैला राव नावाच्या एक ज्येष्ठ लेखिका खास टॅक्सी करून फोंड्याहून बैठकीला आल्या होत्या; पण सगळ्यांनाच ते शक्य होईल असे नसते.
मडगावात कधीही येणे झाले तरी माझा एक जुना कॅथॉलिक मित्र लुईस गोम्स याला भेटण्यासाठी मी वेळ काढतो. या वेळीही त्याच्या घरी जाणे झाले. तो सांगत होता, “हल्ली रस्त्यात दिसणारी बहुतेक माणसं कर्नाटक किंवा महाराष्ट्रातून आलेली वाटतात, लोकल नाही वाटत. दिल्लीवालेदेखील गोव्यात बिग स्केलवर प्रॉपर्टी खरेदी करत आहेत, पण त्यांना आम्ही थांबवू शकत नाही.”
स्थानिक माणसे काम करत नाहीत ही तक्रार इतरत्र असते तशी इथेही आहेच! येथील आंबे-नारळ-सुपारीच्या बागांमधील सगळे मजूर परराज्यातले. ‘भायले’ असाच त्यांचा उल्लेख होतो; पण त्यांच्याशिवाय गोव्यातील लोकांचे चालत नाही हेही तितकेच खरे! ‘सुशेगात’ स्थानिक माणसे आणि ‘कष्टाळू’ बाहेरचे हा देशातील बहुतेक प्रांतांत आढळणारा तिढा इथेही जाणवतो. “मडगावात मासळी विकणाऱ्या पाचशे बायकांपैकी एकसुद्धा गोव्याची नाही; सगळ्या बेळगावच्या,” असे एकदा रामकृष्णकाका म्हणाल्याचे आठवते.
लुईस स्वतः पक्का मडगाववासी. गोव्याच्या बदलत्या लोकवस्तीबद्दल तो म्हणत होता, “पूर्वी गोव्यात जवळजवळ वन थर्ड लोक ख्रिश्चन होते, मोस्टली कॅथलिक; पण आता आमचं इथलं प्रमाण खूपच कमी झालं आहे. माझ्या बहुतेक सगळ्या नातेवाइकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतला आहे. तो आम्हांला सहज मिळतो. आधी पोर्तुगाल आणि मग पोर्तुगाल युरोपिअन युनियनचा एक भाग असल्याने तिथून इतर युरोपात. ते कधीच इथे कायमचे परत येणार नाहीत. यंग ख्रिश्चन क्राऊड आता गोव्यात फारसा दिसत नाही. एकूणच इथले ख्रिश्चन कल्चर खूप कमी झाले आहे.”
एके काळी गोव्याचा अविभाज्य भाग असलेली ख्रिश्चन संस्कृती हळूहळू कमी होत आहे याची खंत लुईसच्या बोलण्यात नेहमीच जाणवते. त्याची खंत तशी समजण्यासारखी आहे आणि तो गेल्या काही वर्षांत गोव्यात होत गेलेला एक मोठा सामाजिक बदल आहे.
गोव्यातील जुनी पारंपरिक संस्कृती कशी होती ते कळावे म्हणून मागे एकदा लुईसने मला ‘बिग फूट’ अॅन्सेस्ट्रल गोवा नावाचे एक सुंदर थीम पार्क आणि म्युझियम दाखवले होते. मएन्द्र जोसेलिनो अल्वारीस (Maendra Jocelino Alvares) नावाच्या एका गोवेकर कलावंत तरुणाच्या स्वप्नाला लाभलेले हे मूर्त रूप. मडगावपासून नऊ किलोमीटरवर लोटोलिम गावात हे आहे. गोव्यातील एखाद्या खेड्यात पूर्वी असायचे तसे लोकजीवन अल्वारीस यांनी हुबेबूब उभे केले आहे. उदाहरणार्थ : एखादा ताडी गाळणारा ताडी किंवा काजूची फेणी कशी तयार करतो किंवा एखादा चर्मकार चामडे सरळ करण्यापासून व चपलांचे माप घेण्यापासून प्रत्यक्ष चपला तयार करण्यापर्यंत आपले काम कसे करतो हे तिथे दिसते. जयपूरजवळ जसे ‘चोखी दाणी’ आहे किंवा अमृतसरमध्ये ‘सड्डा पिंड’ आहे तसाच हा प्रकार. विशेषतः परदेशी गेलेल्या लोकांना आपली मूळ संस्कृती कशी होती हे बघायला व मुला-नातवंडांना दाखवायला खूप आवडते. इथेही तसे परदेशी गोवेकर मोठ्या संख्येने येत असतात. अर्थात इतर सर्व प्रकारचे पर्यटकही असतातच.
आपल्या हातातल्या एकतारीच्या साथीने तल्लीन होऊन भजन गाणार्या संत मीराबाईचे एक प्रचंड मोठे दगडशिल्प इथल्या जमिनीवर अल्वारीस यांनी तयार केले आहे. एकाच मोठ्या लॅटेराइट (लोहयुक्त) दगडातून बनवलेले हे शिल्प चौदा मीटर लांब आणि पाच मीटर रुंद आहे. लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याची देशातील सर्वांत विशाल दगडशिल्प म्हणून नोंद झाली आहे. हे शिल्प अल्वारीस यांनी फक्त तीस दिवसांत घडवले.
‘बिग फूट’ या नावामागे एक स्थानिक लोककथा आहे. महादर नावाच्या एका श्रद्धाळू आणि उदार जमीनदाराने दयेपोटी गरिबांना बराच दानधर्म केला. पण काही लोभी गावकर्यांना अधिकाधिक पैशाचा मोह सुटत गेला आणि शेवटी त्याच्याजवळ होते नव्हते तेवढे सगळे गावकर्यांनी लुबाडून घेतले. महादर बिचारा कंगाल बनला. तरीही तो उरलेसुरले दान करतच राहिला. शेवटी त्याच्यावर खूश होऊन देवाने, ‘काय हवे ते माग’ असा त्याला वर दिला. त्याने फक्त ‘मला एक पाय ठेवता येईल एवढी जमीन दे’ असे मागणे मागितले. देवाने त्याला तशी जमीन दिली आणि त्याच्यावर एक पाय ठेवून महादर तपश्चर्या करत राहिला अशी ही लोककथा आहे. इथे तुम्ही हात जोडून श्रद्धापूर्वक काहीही मागितले तरी देव तुमची इच्छा पूर्ण करतो असे लोक मानतात. इथे भेट देताना हात जोडून काही ना काही मागणारे प्रवासी नेहमीच दिसतात. ही म्हटले तर अंधश्रद्धा असेल, पण इटलीतल्या रोममधील ट्रेव्ही फौंटनमधेही नाणे टाकून देवापाशी श्रद्धेने काही ना काही मागणारे लोक दिसतातच! काहीतरी श्रद्धापूर्वक मागणे आणि ते मिळेल असा विश्वास बाळगणे हा मनुष्यस्वभाव असावा.
स्थानिक कलावस्तू मांडलेले एक म्युझियम इथे आहे. तशा काही वस्तू विकणारी दुकानेही आहेत. शंभरएक जण नोकरीला आहेत. त्यांतील काही अपंग किंवा आता सुधारलेले पण एके काळी व्यसनी असलेले असेही आहेत. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अल्वारीस अशा स्थानिक लोकांना इथे नोकरी देतात आणि चांगला पगारही देतात. अल्वारीस यांचे अडीचशे वर्षे जुने आणि जिथे आजही लोक राहतात असे वडिलोपार्जित घर म्हणजेदेखील एक ऐतिहासिक ठेवा आहे. ते घर बघायलाही अनेक पर्यटक जात असतात. गोव्यातील एके काळची ग्रामीण संस्कृती तुमच्यापुढे अतिशय आकर्षक स्वरूपात जिवंत करणारे हे स्थळ एकवार अवश्य बघण्याजोगे आहे.
पोर्तुगीज काळापासूनच खाणींपासूनचे उत्पन्न गोव्यासाठी महत्त्वाचे आहे; पण खाणी आणि पर्यावरण यांच्यात खूपदा संघर्ष जाणवतो. तांबडासुर्ला येथे दत्ता नायक यांच्या फार्म हाऊसवर असताना बघितलेले चित्र आजही डोळ्यांपुढे आहे; घरासमोरच्या रस्त्यावरून तांबड्या मातीचा धुरळा उडवत जाणारी ट्रक्सची रांग सलग चालू होती. क्लॉड आणि नॉर्मा अल्वारिस नावाच्या एका जोडप्याला मी पूर्वी दोन वेळा भेटलो होतो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी अथक कायदेशीर झुंज दिली. हे जोडपे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेच पण त्यांना साहित्याचीदेखील खूप आवड आहे. ‘दि अदर इंडिया’ हे म्हापसामधील त्यांचे पुस्तकाचे दुकान म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांचा अड्डाच आहे. इतर कुठे सहसा मिळणार नाहीत अशी सामाजिक प्रश्नांवरची पुस्तके इथे आवर्जून ठेवलेली असतात. ‘गोव्याचे राखणें’ या शीर्षकाचा त्यांच्यावरील एक दीर्घ लेख विश्राम गुप्ते यांनी अंतर्नादसाठी लिहिला होता.
खाणी आणि पर्यावरण यांची सांगड कशी घालायची हा खरोखरच एक अवघड प्रश्न आहे. कारण पर्यावरण महत्त्वाचे आहेच पण त्याचबरोबर खाणींपासून मिळणारे उत्पन्न आणि रोजगारनिर्मिती याचीदेखील आपल्याला गरज आहेच. इथे एक नमूद करायला हवे; दरडोई आर्थिक उत्पन्नात गोव्याचा देशात पहिला क्रमांक आहे.
पोर्तुगीज आणि इंग्रज दोघेही युरोपियन, पण त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक होता. भारतात राहणाऱ्या ब्रिटिशांनी स्वतःला नेहमीच अलिप्त ठेवले; नोकरी संपली की आपल्याला परत आपल्या मायदेशात जायचे आहे, ही भावना यांच्या मनात कायम होती. याउलट पोर्तुगीजांनी मात्र आपल्या जगभरातील वसाहती कायम आपल्याच मानल्या. भावनिकदृष्ट्या ते त्या वसाहतींशी समरस झाले. आपल्या कुटुंबियांसह त्यांनी इथे वास्तव्य केले. पोर्तुगालच्या संसदेत गोव्याला प्रतिनिधित्व होते. शिवाय ज्यांचा जन्म गोव्यात १९६१ पूर्वी झाला आहे त्यांना किंवा त्यांच्या मुलांना व नातवंडांनादेखील पोर्तुगालचे नागरिकत्व आजही सहज मिळते.
हे थोडेसे पुदूचेरीप्रमाणे आहे; फ्रेंच राजवटीत तिथे जन्मलेल्या सर्वांना फ्रान्सचे नागरिकत्व मिळू शकते. पण पुदूचेरीच्या तुलनेत गोवा खूपच मोठे आहे. पुदुचेरीचा विस्तार फक्त २० चौरस किलोमीटर असून लोकवस्ती अडीच लाख आहे; याउलट गोव्याचा विस्तार कित्येक पट अधिक म्हणजे ३७०० चौरस किलोमीटर असून लोकवस्ती पंधरा लाख आहे हेही विचारात घेतले पाहिजे.
पोर्तुगालचे माजी पंतप्रधान;जे सध्या युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आहेत, अन्तोनिओ कॉश्ता हे मूळचे गोवेकरच. त्यांचे वडील गोवामुक्तीनंतर १९६१ मध्ये पोर्तुगालला स्थलांतरित झाले. गोव्यात मडगावला त्यांच्या वडलांचे घर आहे आणि तिथे त्यांचे काही नातेवाईक आजही राहतात. मागे जेव्हा यांनी गोव्याला अधिकृत भेट दिली होती त्यावेळी ते आपल्या वडिलोपार्जित घरीही गेलो होते आणि त्यांनी तिथे नेहमीचे घरगुती गोमंतकीय जेवण केले होते. सहा वर्षे ते पोर्तुगालचे पंतप्रधान होते. ‘मी अनिवासी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे’ असे उद्गार त्यांनी एका समारंभात काढले होते व त्यावरून त्यांना अजूनही गोव्याविषयी किती जिव्हाळा वाटतो ते दिसते. युरोपियन वंशाचे गौरवर्णीय नसूनही त्यांना पोर्तुगालमध्ये हे सर्वोच्च स्थान मिळाले हे लक्षणीय आहे.
पोर्तुगीजांच्या ताब्यातला टीचभर गोवा अगदी सहज शक्य असूनही बलाढ्य ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात कधीच घेतला नाही याचे महत्त्वाचे कारण अनेकांना ठाऊक नसते. युरोपात १३७३ साली झालेल्या ‘अँग्लो-पोर्तुगीज ट्रिटी’नुसार आपण एकमेकांविरुद्ध जगातल्या कुठल्याही भागात युद्ध करायचे नाही असे ठरले होते आणि तो करार त्यांनी कटाक्षाने पाळला. दोन स्वतंत्र देशांमध्ये झालेला आणि आजही लागू असलेला हा जगातील सर्वांत जुना करार मानला जातो. या करारामुळेच ब्रिटिशांनी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातच राहू दिला. पुदूचेरीच्या संदर्भात जे घडले तसाच हा प्रकार होता. फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यात युरोपमध्ये झालेल्या अशाच एका करारान्वये भारतात पूर्वीपासून असलेल्या वसाहती कायम ठेवायला फ्रेंचांना परवानगी दिली गेली होती आणि त्याचवेळी अन्य भारतात मात्र फ्रेंचांनी ढवळाढवळ करायची नाही असेही ठरले होते. युरोपमध्ये होणाऱ्या घडामोडींचा भारतावर होणारा परिणाम हा एक महत्त्वाचा पण कायम दुर्लक्षित राहिलेला विषय आहे.
मडगावमधली एक महत्त्वाची जागा म्हणजे लोहिया मैदान. पूर्वी इथे फक्त थोडी मोकळी जागा होती. गोवा मुक्ती लढ्याचे रणशिंग इथेच भरलेल्या एका जाहीर सभेत समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी १८ जून १९४६ रोजी फुंकले होते. मुख्यतः तो लढा पोर्तुगालचे अध्यक्ष सालाझार यांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात होता. तेव्हापासूनच गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात झाली असे मानले जाते. तो दिवस गोवा मुक्ती दिन मानला जातो; प्रत्यक्षात गोवा स्वतंत्र झाला १९ डिसेंबर १९६१ रोजी. त्या मोकळ्या जागेलाच आता लोहिया मैदान म्हणतात. लोहिया यांचा एक पूर्णाकृती पुतळाही इथे उभारलेला आहे. लोहियांचा पुतळा महाराष्ट्रात कुठे पाहिल्याचे आठवत नाही. शहरातील हा सर्वांत महत्त्वाचा चौक. बहुतेक मोठ्या जाहीर सभा इथेच भरतात; मोर्च्यांची सुरुवात इथूनच होते. सहा महिन्यांपूर्वीच या परिसराचे गोवा सरकारतर्फे नूतनीकरण करण्यात आले होते; म्हणूनच इथे यायला मी उत्सुक होतो. पूर्वी बघितला होता त्यापेक्षा आता तो खूपच जास्त प्रशस्त व देखणा वाटतो. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे उत्तम स्मारक आहे.
गोव्याला आलो आणि बीचवरच्या वाळूत एकदाही चाललो नाही असे कसे होईल! सुदैवाने मडगावचा कोळवा बीच जवळच आहे. तिथे बरीच साफसफाई चालली होती. बरेच पोलीसदेखील हजर होते. “कोणीतरी व्हीआयपी दिल्लीहून येणार असणार,” मडगावमध्ये फिरण्यासाठी आमच्या बरोबर आलेल्या सुशांताताई नायक म्हणाल्या. “तसेही इथे खूप टुरिस्ट येतात, म्हणून सिक्युरिटी लागतेच. आपली पार्टी झाली तो बेनोलीम बीचदेखील खूप फेमस आहे. पण तेव्हा आपण हॉटेलात होतो, त्यामुळे तुम्हांला प्रत्यक्ष बीचवर जाता आलं नव्हतं. बागा आणि कलंगुट बीचदेखील मस्त आहेत. गोव्यात सगळीकडेच असे बीच आहेत. जास्त करून टुरिस्ट लोकांना बीचचंच अॅट्रॅक्शन असतं. अंजुना बीचवर सर्वांत जास्त फॉरेनर्स असतात आणि त्यातले बरेच टुरिस्ट कायमच तिथे राहतात. रशियन टुरिस्ट चिक्कार असतात. रस्त्यावरचे बोर्ड आणि हॉटेलचे मेन्यूपण त्यांच्या भाषेत असतात. पूर्वी हिप्पी खूप असायचे. आता कमी झालेत. पण आजही काही बीचवर आपण फॉरेनला आहोत असंच वाटतं. पण टुरिझममुळे लोकांना इन्कमपण बरंच मिळतं.” सुशांताताई सांगत होत्या.
निसर्गाने गोव्याच्या भूमीवर सौंदर्याची अगदी बरसात केली आहे. दूधसागर धबधबा, फोर्ट अग्वाद, डोना पावला, मॉलेम अभयारण्य वगैरे अनेक स्थळे डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत. झुआरी आणि मांडवी या गोव्यातील दोन्ही मुख्य नद्या प्रवासात आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत राहतात. भरपूर पाऊस पडत असल्याने भूमी कायम हिरवागार दिसते. गोव्यात कुठेही फिरा, भातशेतीचा हिरवा गालिचा आणि उंच माडांच्या लांबचलांब रांगा दिसतात. दोन्ही हात पसरून निसर्ग तुमचे स्वागत करत असतो. अधूनमधून काजूची आणि आंब्याची झाडे असतातच. येथील मानकुराद आंबा, गोवेकरांच्या मते, आपल्या रत्नागिरीच्या हापूस किंवा पायरीपेक्षा अधिक गोड! अर्थात आंब्याच्या त्या जातीही पोर्तुगीजांनीच आणलेल्या!
स्वच्छता अभियानाची आज आपण चर्चा करतो; पण गोव्यात काही शतकांपूर्वीच स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटले होते. तेव्हापासून अंगवळणी पडलेली सार्वजनिक स्वच्छता आजही गोव्यात दिसते. रस्त्यावर घाणीचे ढीग साठले आहेत असे सहसा कधी दिसत नाही. दंगेधोपेही गोव्यात क्वचितच कुठे होतात. स्वच्छतेइतकीच इथली सामाजिक शांतता महत्त्वाची आहे. इथली छोटी छोटी पण टुमदार गावे आणि मोकळे रस्ते बघताना आजही पर्यटकांना आपण एका वेगळ्याच परिसरात आलो आहोत याची जाणीव होते. देशातील कुठल्याही शहरात प्रवास करताना आज वाढती लोकवस्ती अगदी अंगावर येते. तसे गोव्यात कधीच वाटत नाही. मुंबईत चाळीतल्या एखाद्या खोलीत राहणार्याला पुण्यात दोन-तीन बेडरूम्सच्या घरात वावरताना वाटावा तसा ऐसपैसपणा अन्य प्रांतांतून गोव्यात आलेल्या प्रवाशांना जाणवतो.
म्हणूनच पर्यटकांसाठी खूपदा गोवा ही पहिली पसंती असते. उत्तम हॉटेल्स व रस्ते यांसारख्या प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सुखसोयी इथे आहेत. अनेक पर्यटक चार्टर फ्लाइट घेऊन युरोप-अमेरिकेतून थेट गोव्यात उतरतात. नाताळचा सण हा मुख्य टुरिस्ट सीझन. तसेच तीन दिवसांचा कार्निवल हा महोत्सव. त्या काळात गोव्यातील हॉटेलांचे दर किमान दुप्पट असतात!
बीचेस हे आजही गोव्याचे प्रमुख आकर्षण आहे. कोकण, कारवार, केरळ इथले समुद्रकिनारेदेखील चांगलेच आहेत; तुलना करण्यात अर्थ नाही; पण गोव्यातील स्वच्छ, पांढरट वाळूच्या बीचेसची मजा काही औरच आहे; शिवाय गोव्यात रस्ते, हॉटेल्स, शॅक्स, बार यांचे एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले आहे; जे इतर ठिकाणी पुरेसे नाही. खरेतर बीच हॉलिडे हा जगभर खूप लोकप्रिय असलेला प्रकार भारतात प्रथम गोव्यातच सुरू झाला. बीचवरच्या मऊ वाळूत सूर्यस्नान घेत निवांत पडून राहणे ही अनेक गौरवर्णीयांची सुट्टीची आणि मजेची कल्पना. तसे न करणाऱ्या भारतीयांनादेखील बीचचे आकर्षण असतेच. विशेषतः जिथे समुद्रकिनारा नाही अशा उत्तर भारतातील पर्यटकांना. दत्ता नायकांच्या पार्टीला आलेल्यांपैकीदेखील काही जण पंजाबवरून आले होते आणि बीचवर जायला खूप उत्सुक होते.
गोव्याची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात माध्यमांचा वाटा मोठा आहे. बॉम्बे टू गोवापासून शौकीनपर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांतून गोवा आपल्याला भेटतो. होय गोयचा सायबा… हे मजबूर चित्रपटातले गाणे किंवा घे घे घे घेरे, घेरे सायबा, प्यार मे सौदा नही! हे बॉबी चित्रपटातले गाणे आणि सोबतचा नाच आठवा. गोव्याची लोकांच्या मनातली प्रतिमा ही साधारण तशीच मौजमजेची आहे. ती बरीचशी तेथील पोर्तुगीज ख्रिश्चन प्रभावाशी निगडित आहे. ख्रिश्चनांमधील स्त्री-पुरुष संबंधात पूर्वीपासूनच एक मोकळेपणा होता. ड्रिंक आणि नाच यांना मान्यता होती. पूर्वी हिंदी चित्रपटात कधी नाचाचा सीन असला, की बहुतेकदा फॅशनेबल फ्रॉक घातलेल्या ख्रिश्चन मुलीच दाखवत. गोव्यात दारूबंदी पूर्वीही कधी नव्हती आणि आजही नाही. इथली फेणी प्रसिद्धच आहे. अर्थात ड्रिंक घेऊन रस्त्यात पडलेला माणूस माझ्यातरी बघण्यात तिथे कधी आलेला नाही. बीच हॉलिडे हा प्रकार भारतात प्रथम गोव्यातच सुरू झाला. पर्यटनाचे फायदे अनेक आहेत पण विमानप्रवास, हॉटेल्स, टॅक्सी, रेस्टॉरंट्स यांचे दर आता अवाच्यासवा वाढलेले आहेत आणि मध्यमवर्गीय पर्यटकाच्या खिशाला ते परवडणारे नाहीत. त्यात आता कॅसिनो, अतिरिक्त मद्यपान, ड्रग्स व वेश्याव्यवसाय यांचीही भर पडली आहे. उपरोक्त बैठकीत भेटलेले एक प्राध्यापक गोव्यातील पर्यटनामुळे निर्माण झालेल्या समस्यांबद्दल बोलताना ‘गोव्याचा मकाव बनवू नका’ असेही म्हणाले होते. या साऱ्यातून हरवत चाललेले गोव्याचे गोयेपण हा अनेकांच्या स्वाभाविक काळजीचा विषय आहे.
पर्यटकांच्या मनातली गोव्याची प्रतिमा ही बरीचशी ड्रिंक, कॅसिनो, कार्निव्हल आणि बीचभोवतीच रेंगळणारी आहे. ती बदलायला हवी. गोव्यात इतरही खूप काही आहे. बोरकर म्हणतात, “माझ्या गोव्याच्या भूमीत, गड्या नारळ मधाचे; कड्याकपार्यांमधुन, घट फुटती दुधाचे; माझ्या गोव्याच्या भूमीत, सागरात खेळे चांदी; आतिथ्याची अगत्याची, सार्या षडरसांची नांदी!” बोरकरांचा तो गोवा आर्ट पेपरवरच्या गुळगुळीत टुरिस्ट ब्रोशर्समध्ये कसा आणायचा हा अवघड प्रश्न आहे.
