काफ्काची कथा ‘द बरो’ एक अन्वयार्थ    

‘द बरो’ ही काफ्काची अधुरी कथा. १९२३/२४ च्या हिवाळ्यात त्याने लिहिली. मराठीत ‘बरो’ चा अर्थ सामान्यपणे भुईखाली केलेले बीळ असा होतो. पण जुन्या इंग्लिशमध्ये ( १३००) ‘burgh’ म्हणजे कडेकोट बंदोबस्त असलेला किल्ला. या शब्दाला  १६०० मध्ये ‘भोक पाडणे’अशीही एक अर्थछटा आली  आणि  जुन्या इंग्रजी संदर्भाने त्याचा दुसरा एक अर्थ Castle असाही होतो. जर्मन भाषेतही  ‘burg’ म्हणजे ‘कॅसल’ या पासून बरो हा शब्द निर्माण झाला आहे.  काफ्काच्या ‘द बरो’ला नुसता जमिनीखालचे बीळ एवढाच अर्थ लागू नसून कडेकोट किल्ला असाही एक संदर्भ  आहे. त्यामुळे कथेचा मथळा ‘बीळ’ असा लिहिला तर तो अर्थवाही  होणार नाही. कारण बरो या शब्दाच्या ज्या सगळ्या छटा या कथेला आहेत त्या ‘बीळ’ या मथळ्यात येत नाहीत. प्रत्येक शब्दाची एका ‘अर्थवत्ता’ असते त्याचा आदर करणे योग्य ठरते.                                           

 तटबंदी                                                                   

 काफ्काची ही कथा जर्मन भाषेत आहे. त्याचा इंग्लिश  अनुवाद मी वाचला. या दोन्ही पाश्चात्त्य भाषा. या गोष्टीभोवती पाश्चात्त्य भाषेची सांस्कृतिक तटबंदी आहे. कोणतीही कथा वा कादंबरी ज्या भाषेत लिहिलेली असते त्या भाषेची सांस्कृतिक तटबंदी त्या ललितकृतीच्या वेढुन असते. मी एक सामान्य वाचक, माझ्या संस्कृतीच्या बंदोबस्तातला . मी या दोन्ही तटबंद्या मोडून या कथेचा अन्वयार्थ लावण्याचा यत्न केला आहे. हा माझा भावार्थ आहे. प्रत्येक  वाचक आपापली भावार्थदीपिका तयार करत असतो.                                              

   पाश्चात्त्य संस्कृतीत ‘व्यक्तित्ववादाची’ सुरुवात १९व्या शतकात झाली आणि विसाव्या शतकात तो चांगला फोफावला. भारतीय संस्कृतीत व्यक्तित्ववादाला उणी छटा आहे. भारतीय संस्कृतीत व्यक्तित्ववादापेक्षा व्यक्तिपूजेला महत्त्वाचे पद आहे; पण आता इथेही हा ‘इंडिव्हिज्युअ‍ॅलीझम’ जोम धरू लागलाय. ‘इंग्लिश माणसाचे घर हा त्याचा किल्ला असतो,’ अशी इंग्लिश म्हण आहे. ती जवळ जवळ सगळ्याच पाश्चात्त्य लोकांना लागू आहे. ‘द बरो’ या कथेत या म्हणीचे झोके दिसतात. या विचारांच्या मखरात ‘द बरो’ या कथेचा भावांश आणि नंतर अन्वयार्थ देतो. कथेत बीळ आणि बरो हे शब्द मी आलटून पालटून वापरणार आहे. या कथेचा निवेदक बरोत राहणारा सस्तन प्राणी आहे. प्रथम पुरुषी एक वाचनात ही कथा सांगितलेली आहे.                                               

 द बरोचा भावांश                                                        

 बऱ्याच अयशस्वी प्रयत्नांनंतर हा बरो मी तयार केला आहे. मी बऱ्याच युक्त्या-क्लृप्त्या वापरल्या आहेत, शक्कल लढवली आहे. कोणाला वाटेल हा काय डरपोक आहे, घाबरट आहे म्हणून त्याने असे बीळ बनवले. पण तसे नाही. म्हणजे असेलही तसं; पण कोण घाबरट नसतो! हा बरो तयार करण्यात मी सगळे कसब वापरले आहे. एंट्रंस बघा, फक्त शेवाळ दिसेल. ते उचलले म्हणजे आत हळूच शिरण्याचा मार्ग आहे. मी तसा तरुण आहे – म्हणजे जवानीचा बहर ओसरलेला आहे. माझ्या जीवनातील एकही क्षण पूर्ण शांततेत जात नाही. आज ही चिंता तर उद्या दुसरी. मी काही अमरत्व घेऊन आलेलो नाही याची मला जाण आहे आणि जसजसा ज्वानीचा ज्वर ओसरू लागतो तशी ती जाण घट्ट होत जाते. या काळोख्या बरोत जरा निवांत झोपलो तरी कोणतरी चोंबडा वास काढत जिभल्या चाटत सरपटत येत आहे असे स्वप्न पडते. दचकून जाग येते. माझा दरवाजा तसा सुरक्षित आहे. मी तिथे बरीच माती घालून ठेवली आहे. बाहेर जाताना मी माती उकरून शेवाळ्याखालून हळूच बाहेर पडतो.                               

   बिळाच्या आत बरेच भुयारी रस्ते मी तयार केले आहेत; म्हणजे जरी कोणी आत आला तरी मी लपून बसू शकतो. फक्त बिळाच्यावरच नव्हे तर जमिनीखालीसुद्धा शत्रू आहेत अशा आख्यायिका मी ऐकल्या आहेत. माझे सगळेच शत्रू आहेत असे मला नेहमीच वाटत आले आहे. कोणी म्हणतात मित्ररूपी शत्रू असतात. माझीपण अशी श्रद्धा आहे; तरी, असे कोणी येणार नाही या आशेवर मी जगत असतो.                                                                 

 माझ्या गरजा काही मोठ्या नाहीत. किडेमकोडे खाऊन मी जगतो; पण माझ्या बरोची महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील शांतता. मला माहीत आहे  ही शांतता कधी फसवी असू शकते. पण वय व्हायला लागले, म्हणजे असा शांत बरो असणे सुखावह वाटते. आता जीवनाची पानगळ सुरू झाली आहे. कोठूनतरी रानवारा आत येतो – कधी थंड, कधी उबदार, सुखावणारा. काळोखे मुकेपण बरे वाटते.                                                                             

   आत दर शंभर मीटरवर आडवी- तिडवी पन्नास भुयारे मी तयार केली आहेत. प्रत्येक भुयाराशेवटी मी एक छान मोकळी जागा करून ठेवली आहे. तेथे मला शांततेची गाढ झोप लागते. इच्छा पूर्ण झाल्याची समाधानी झोप – उद्देश सफल झाल्याची, स्वतःचे घर असण्याची, मालकीची झोप.                                            या माझ्या शांत बरोत बारीक शीळ घातल्यासारखा आवाज येतो, बराच काळ टिकतो. एखादा छोटा किडा कुठेतरी जवळपास त्याचे भुयार खोदत असावा. मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो; पण थांग लागत नाही. हा आवाज मला अस्वस्थ करतो… माझा थरकाप उडवतो.                                                    मी बरोत एक जरा मोठीशी मोकळी जागा तयार केली आहे. तेथे तयार केलेली तटबंदी मी शारीरिक श्रमापेक्षा बुद्धिचातुर्याने केली आहे; म्हणजे जरी शत्रूचा वेढा पडला तरी मी आत सुखाने राहू शकतो. आत वाणसामान, मांसाचे तुकडे, रुचकर किडूकमिडूक भरपूर भरून ठेवले आहे; पण याच्या भिंती भक्कम करताना मला खूप त्रास झाला. त्याचे काय आहे, माझे पंजे माती उकरायला चांगले आहेत, माती लिंपायला नाहीत. अहो, म्हणजे, प्रत्येकाच्या शरीरातच  काहीबाही कमीजास्त असतेच. पण मी डोके वापरले – अक्षरशः वापरले. डोक्याने माती  ठोकून ठोकून भिंती भक्कम केल्या – इतके, की माझ्या माथ्यातून रक्त यायला लागले तेव्हा थांबलो. कधी कधी अगदी वैताग यायचा, नुसता लोळायचो, बाहेर फेरफटका मारून यायचो,  माझा बरो बघून खूश व्हायचो आणि टकुरं  हापटायला लागायचो – रक्त येईपर्यंत. मी माझा बरो असा कमावला आहे. कमावलेल्या बरोत जमवलेल्या वस्तूंकडे बघणे, त्याचा वास घेणे, हा माझा छंद आहे, आनंद आहे. कधी कधी मी झोपेतून दचकून जागा होतो. मग निरनिराळ्या भुयारांत जाऊन बघतो सर्व ठीकठाक आहे की नाही… सगळ्या वस्तूंची पुनर्मांडणी करतो – हो कुठे काही चुकायला नको! हा प्रकार माझ्या जीवनात बऱ्याच वेळेला घडतो. बरोचा एंट्रंससुद्धा मी बरेच वेळा जाऊन तपासतो. हे दिवसातले हॅपी पण धोकादायक क्षण असतात! मी इतक्या वस्तू जमवल्या आहेत, की मी हावरट, लोभी, वगैरे आहे असे मला वाटते, पण त्याकडे काणाडोळा करतो. मी बाहेर जाऊन फेरफटका करून येतो. पण या बरोपासून दूर जायचे म्हणजे माझ्यासाठी ती कडी शिक्षा असते. मी थोड्याच वेळात परत येतो. तो काळोख, ती शांतता, त्या वस्तू या गोष्टी माझ्या देहाचाच भाग झालेल्या आहेत. आतले  वातावरण हा माझा ‘बहिर्प्राण’ आहे. या वातावरणात मी झोपलो म्हणजे मला कधीमधी स्वप्न पडते. मी माझा बरो नव्याने बांधला आहे, तो जास्त सुरक्षित आहे. जेव्हा मी जागा होतो, तेव्हा कळते ही माझी सगळ्यात गोड झोप होती. मी बाहेर जंगलात भटकायला जातो तेव्हा मला खूप उत्साही वाटते.  मी शिकार करण्यासाठी एखाद्या लहानग्या प्राण्यामागे धावतो, शिकार गवसते असे नाही; पण त्याच्यामागे धावण्यात, तो घाबरलेला बघण्यात मजा येते.        

   मला वाटते मी अगदी स्वतंत्र, मुक्त आहे. मी मुक्त असणे, ही माझी नियती नाही, हे माझ्या नंतर लक्षात येते. मला माहीत आहे माझा काळाचा तुकडा मला  मोजून दिलेला आहे. तेव्हा मिळालेल्या काळाचा बिनधास्त उपभोग घेणे हे योग्य. हे कळते पण वळत नाही. मग मी काय करतो, घराच्या दरवाजाबाहेर,  थोडा दूर लपून बसतो. दिवस-रात्र कोणी येत नाही ना यावर पाळत ठेवतो. अजूनतरी तो आला नाही. कोणी म्हणेल काय हा वेडेपणा आहे; पण अशी पाळत ठेवण्यात मला एक निराळीच खुशी मिळते. इथे आजूबाजूला बरेच आहेत ज्यांना आयते बीळ हवे असते. हा विचार मात्र मला अजिबात सहन होत नाही. असा जर कोणी शिरताना दिसलाच तर मी त्याला ठार करीन, पण असे काही घडले नाही. मी आत जाऊन माझ्या मोकळ्या जागेत मुरकुंडी करून पडून राहतो लोकरीच्या गुंड्यासारखा. कधीकधी बाजूला कोणीतरी भुयार खोदत आहेत असे मला आवाज ऐकू येतात, का ते भास असतात…? अशा कल्पना-विकल्पना करत माझे दिवस जात असतात.  जो कोणी येणार आहे तो मला ओळखतो —                                  

अन्वयार्थ                                                          

   या गोष्टीला सुरुवात आहे, शेवट नाही. काफ्काने ही कथा अपूर्ण सोडली का? मला तसे वाटत नाही. सजीवाच्या जीवनगाथेचा शेवट एकदाच होतो. मरेपर्यंत जगण्याची शिक्षा मिळालेलीच असते. ‘द ट्रायल’ या त्याच्या कादंबरीत त्याने हे निराळ्या प्रकारे दाखवले आहे. त्याच्या ‘द कॅसल’ आणि ‘द ट्रायल’ या दोन्ही कादंबऱ्यांचे पडसाद मला ‘द बरो’ या त्याने शेवटच्या दिवसांत लिहिलेल्या कथेत ऐकू आले.                                                                  

   हा अन्वयार्थ लिहिताना माझ्या विचारांना वाट फुटत होती. काही विचारवंत, मनोवैज्ञानिक, मेंदूसंशोधक यांना वाट पुसत कथार्थ रेखाटला आहे. ही कथा एक रूपक आहे. रूपक ही एक कल्पनाच असते. बहुतेक वेळेला कल्पनेचा उगम वास्तवातून होत असतो. म्हणजे रूपक एक तीर आणि वास्तव दुसरा यामधून ही कथा वाहत असते.                                                      

   ही कथा वाचत असताना मला एक म्हण आठवली  –  दात आहेत पण चणे नाहीत आणि चणे आहेत पण दात नाहीत, अशी काहीशी. 

मानवी जीवनाचे तीन भाग असावेत, असे मला वाटले : अगदी बालपण जेव्हा तोंडाचे बोळके असते तेव्हा चणे असूनही काही उपयोग नसतो. तरुणपणी दात आणि चणे दोन्ही असतात. म्हातारपणी पुन्हा तोंडाचे बोळके, चणे असून दात नाहीत. काही वेळेला असे घडते, दात आहेत, चणेही आहेत पण चणे खाऊन आनंद लुटण्याची मानसिकता नाही. पॅरॅनॉइड मनःस्थितीत असे घडते. अतिसंशयी, भयंकर भीती, सतत धोका, सगळे आपल्या विरुद्ध कट करत आहेत, म्हणजे पॅरॅनॉइड मनःस्थिती.  पॅरॅनोईया हा स्वयंचलित असतो, त्यामुळे तो सतत वाढत असतो. कधी कधी तो इतका वाढतो, त्याची मनोविकृती होते. त्यामुळे चिंता, काळजी, या व्याधी  मागे लागतात. शारीरिक आणि मानसिक ताणतणाव मेंदूच्या ऱ्हासाला कारण ठरतात.                                                              

    तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांच्या मनात पॅरॅनोईयाचा अंश असतो पण विवेकाने आपण तो बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. धर्मसत्ता, राजसत्ता  या पॅरॅनोईयाचा उपयोग करून घेते. सगळा समाज पॅरॅनॉइड होतो! यामुळे काय घडते याला इतिहास साक्षी आहे. ‘द बरो’ या कथेत एक मार्मिक वाक्य आहे त्याचा आशय ‘तर्कबुद्धीला सिंहासनावर पुनर्स्थापित करायचे असेल तर ते पूर्णपणे केले पाहिजे.’ पण तसे घडत नाही. काफ्का ज्यू होता. त्याने पॅरॅनोईया अनुभवला होता. द बरो ही कथा पॅरॅनोईयाचे रूपक आहे.                          

जागेची रचना                                                                  

   Jacques Lacan (१९०१-१९८१) हा फ्रेंच मनोवैज्ञानिक.  त्याने एक सेमिनार घेतला होता. त्यात ‘द बरो’ या कथेचा महत्त्वाचा उपयोग केला होता. सजीव राहत असलेल्या वास्तूची रचना, त्याचा सजीवावर होणारा परिणाम याचा ऊहापोह केला होता. हा topology = ‘आकारिक संरचना’ संकल्पनेचा मनोवैज्ञानिक शोधाभ्यास होता. डॉ. लकॅन यांनी सांगितले त्याचा आशय : ‘प्राणी बरोत राहतो आणि बरो त्या प्राण्यात निवास करतो. प्राणी राहतो त्या जीवनभराच्या वास्तूशी त्याची  खोलवरची जवळीक निर्माण होते. हा संबंध घट्ट असतो. हे नाते जिव्हाळ्याचे असते म्हणून तर बरोतील प्राणी म्हणतो, “बरोचे काही नुकसान झाले तर मला जखम होते, जणू कोणी माझ्यावर आघात केला आहे.”  डॉ लकॅन यांनी याला ‘टपॉलॉजिकल लिंक बिट्वीन नेचर अँड कल्चर’  ‘घराची रचना ही निसर्ग आणि संस्कृती यांना जोडणारी साखळीची एक कडी असते, ’ असे म्हटले आहे. मला डॉ. लकॅन यांचा अन्वयार्थ आगळावेगळा वाटला.                                            

   माणूस हासुद्धा निसर्गाचा पुत्र. त्याच्या घराच्या चार भिंतींत त्याची संस्कृती असते. आतले वातावरण, वस्तू, सोई-गैरसोई यांत ‘तो-ती’ अनेक वर्षे राहत असतात. ते त्याच्या नुसते अंगवळणी नाही तर मनवळणीही पडलेले असते. ते सोडून जाताना – स्थलांतर करताना त्याच्या लक्षात येते. पन्नास वर्षे राहिलेली इमारत रिडेव्हलपमेंटला जात आहे… ती सोडून दुसऱ्या भाड्याच्या घरात जात असताना कळत न कळत तणाव त्याच्या मेंदूत निर्माण झालेला असतो. त्याची वास्तू त्याच्या ‘मनवळणी’ पडलेली असते. घर, परिसर सोडून वृद्धाश्रमात जाणाऱ्या काही ज्येष्ठांमध्येसुद्धा असा ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असते. स्वतःचे घरटे त्यांचा ‘द बरो’ असतो.                                                           मेंदूची रचना आणि द बरो                                                                 

    हा लेख टंकत असताना ‘नेचर’ या जगन्मान्य विज्ञानपत्रिकेतील ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेला एक शोधनिबंध वाचत होतो. त्याचा मथळा होता, ‘मानवी जीवनकाळातील मेंदूच्या रचनेतील ‘टपॉलॉजिकल’ वळणबिंदू’. मी चरकलोच. शोधनिबंध अभ्यासला. त्याचा सुलभ आशय – मेंदूच्या रचनेतील न्युरॉन्सच्या  जाळ्याचा विस्तार विलक्षण आहे. त्यात अनेक वळणे आहेत, भुयारे आहेत. न्यूरॉन्सची ही कनेक्शन्स – जोडण्या – जन्मापासून अगदी अंतापर्यंत सतत बदलत असतात. या जोडण्यांवर माणसाचे बोधन-आकलन आणि वर्तन अवलंबून असते. माणसाचे वय आणि मेंदूची बदलती रचना यांचे घनिष्ट नाते असते.    ‘द बरो’मध्ये जशी अनेक वळणे, काही मोकळ्या जागा, भुयारे असतात, तशीच काहीशी मेंदूतील न्यूरॉन्सची अनंत कनेक्शन्स असतात – मेंदूत सर्वदूर पसरलेली,   असे मला वाटून गेले. मेंदूतील या मोकळ्या वाटणाऱ्या जागा मोकळ्या नसतात; त्या बहुविध गुंतागुंतीच्या जागा असतात, ‘मोड्यूल्स’ असतात.           

    मानवी जीवनप्रवासात मेंदूच्या रचनेतील विकासाचे मार्गक्रमण होत असताना चार ठळक ‘वळणबिंदू’ – ‘टर्निंग पॉइंट्स’ असतात. या चार वळणबिंदूंवर मेंदूच्या रचनेत झालेल्या बदलामुळे व्यक्तीच्या ‘बोधनात’ ‘कॉग्निशन’ बरेच बदल होतात; ते त्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात. कोणते हे वळणबिंदू?     जीवनातील ९, ३२, ६६, ८३ ही जीवनातील वर्षे म्हणजे मेंदूच्या रचनेतील वळणबिंदू.  हे सरासरी आकडे आहेत. प्रत्येक माणसात थोडाफार फरक असतोच.  जन्म ते वयाचे नववे वर्ष, ९ ते ३२, ३२ ते ६६, ६६ ते ८३ आणि ८३च्या पुढे हा प्रत्येक काळ महत्त्वाचा! यातील वळणबिंदूला संशोधकांनी ‘टपॉलॉजिकल एपॉक’ ‘रचनेचा युगारंभ’ असे सार्थ नाव दिले आहे. या महत्त्वाच्या काळत हे बदल कसे होतात, का होतात, कोणते असतात हे बदल, हा निराळ्या निबंधाचा विषय आहे.                                                                 

   मेंदू हा प्रत्येकाचा ‘द बरो’ आहे. यात माणूस जीवनभर निवास करत असतो. या वास्तूत सतत बदल होत असतात. वाढते विकास-वय म्हणजे त्याने त्याच्या मेंदूच्या बरोत मारलेल्या फेऱ्या, येरझाऱ्या, असतात. या बरोच्या रचनेत बदल झाल्याशिवाय त्याला बाहेरच्या जगाचे आकलन होत नाही. बाह्यजग आणि मेंदूतील विश्व यांचा परस्पर संबंध असतो. माणूस बाह्य जगात फेरफटका मारत असतो. बाह्य जगातील सफर म्हणजे पंचेंद्रियांतून येणाऱ्या संवेदना – त्याचा तो अर्थ लावतो, त्यावर त्याचे वर्तन ठरते. माणसाला त्याच्या बरोची माहिती नसते. विज्ञान या बरोची रचना उलगडू पाहत आहे. त्याची कथा अजूनही अधुरीच आहे ——

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        

Author

Leave a Reply