अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण बारावे .
– संपादक
भाग दुसरा : प्रकरण बारावे
अखेरचे युद्ध
अखेरचे युद्ध सुरू होण्यापूर्वी अनेक वर्षं आंतरराष्ट्रीय स्पर्धा इतकी वाढली होती, की स्वतःच्या देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी सगळं काही क्षम्य समजलं जाई. मनुष्याने इतिहासाची नोंद ठेवायला सुरुवात केल्यानंतरच्या विसाव्या आणि तिसाव्या शतकात जगभर एक परस्परसहकार्य व भागीदारीचे वातावरण होते. त्यासाठी व्यापार करार केले गेले. पण चाळीसाव्या शतकापासून राष्ट्रांना असं वाटायला लागलं की पृथ्वीची साधन सामग्री संपुष्टात येत चालली आहे. मग कशाचे परस्परसहकार्य आणि भागीदारी! त्याची जागा स्वार्थाने घेतली. आपण आपल्यापुरतं पहावं असा विचार बळावला . पण पृथ्वीच्या मर्यादित साधनसामग्रीशी मानवी कल्पकता फार काळ मेळ राखू शकली नाही. लवकरच, मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या नाजूक संतुलनात बिघाड होऊ लागला. तोपर्यंत चंद्रावर आणि मंगळाच्या अधिक खडतर जमिनीवर मानवी वसाहती स्थापन झाल्या होत्या. पन्नासाव्या शतकाच्या सुरुवातीस खनिज तेलाचं उत्खनन किफायती होणं बंद झालं होतं. अणुऊर्जा हीच प्रकाश, उष्णता आणि यंत्रं चालवण्यासाठी लागणाऱ्या शक्तीचा स्रोत म्हणून प्रस्थापित झाली होती. यंत्रमानव तयार करण्याच्या अभियांत्रिकी क्षेत्रात प्रचंड प्रगती होऊन कष्टाची आणि धोक्याची कामं करण्यासाठी अनेक प्रकारची मॉडेल्स तयार करण्यात आली होती.
मानवी शरीराच्या मर्यादा जैविक तंत्रज्ञानाच्या मदतीने केव्हाच ओलांडल्या गेल्या होत्या आणि इंद्रियांच्या मार्फत शरीराला होणारा बोध अनेक पटींनी अधिक समर्थ झाला होता. मानवी शरीराचं प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जीवात परिवर्तन प्रायोगिकरित्या यशस्वी झालं होतं; पण आणखी मोठ्या प्रमाणात त्याचा अवलंब केला गेला नव्हता. फक्त मंगळावर कायम राहणाऱ्या आणि युरोपा व टायटनवर नव्याने बांधल्या जाणाऱ्या वसाहतींत राहणाऱ्या लोकांनी ते आत्मसात केलं होतं.
मानवाने केलेल्या भौतिक प्रगतीत हळूहळू मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय असंतुलन निर्माण झालं. चाळिसाव्या शतकापर्यंत ज्ञान जरी सहज उपलब्ध होतं आणि त्याची देवाणघेवाण सहजी शक्य होती, तरी त्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री पृथ्वीच्या सर्व भागांत उपलब्ध नव्हती. हळूहळू वेगवेगळ्या भागांतील मानवाच्या जीवन-स्तरातील फरक वाढू लागला, सुरुवातीला तो फारसा जाणवला नाही पण नंतर त्याची दखल घेण्याइतका तो वाढला. ज्या भागांतील लोकांकडे तंत्रज्ञानाच्या विकासाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आवश्यक ती साधन सामग्री होती त्यांच्या हे लवकरच लक्षात आलं, की इतरांशी सहकार्य करण्यात त्यांच्या स्वतःच्या विकासाची गती मंद होईल. याउलट इतरांना वगळून केवळ स्वतःच्या देशाचा विकास केल्याने पृथ्वीच्या उर्वरित साधनांचा उपयोग करण्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सत्ता निर्माण होईल. मग पद्धतशीरपणे भेदभाव करणं सुरू झालं. हजार वर्षांनी त्याची परिणती अखेरच्या युद्धात झाली.
पृथ्वी ग्रहाला ग्रासणारं पहिलं संकट पाण्याचं होतं. एकविसाव्या शतकात सुरू झालेला पर्यावरणाचा ऱ्हास तिसाव्या आणि चाळिसाव्या शतकातील सगळ्यांनी मिळून केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे थांबवण्यात यश आलं होतं. पण इतरांना वगळून केवळ स्वतःच्या देशाचा विकास साधण्याचं तत्त्वज्ञान उदयास आल्यापासून, सहकार्याची ढाल फुटली आणि निसर्गाने आपला मार्ग निवडला. वातावरण झपाट्याने उष्ण झालं आणि अवघ्या पाचशे वर्षांत त्याआधीच्या चार हजार वर्षांतील हवामानाचे ठरावीक साचे बदलून गेले. पाऊस आणि हिमवृष्टी कमी झाली. दोन्ही ध्रुवांवरचं बर्फ झपाट्याने वितळलं. त्यामुळे समुद्रांची पातळी वाढली आणि समुद्रसपाटीपासून कमी उंची असणारे देश बुडून गेले. त्या ठिकाणांहून भूमध्याकडे स्थलांतरित झालेले लोक शोषणाचे पहिले शिकार बनले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मानवाच्या शारीरिक कष्टांचा फारसा उपयोग उरला नव्हता. त्यामुळे बुद्धीपेक्षा जी एकच गोष्ट त्या काळात अधिक मौल्यवान समजली जात होती – ते म्हणजे मानवी शरीर – त्यासाठी आश्रितांचा उपयोग करून घेण्यात आला. बहुतेकांना लैंगिक गुलाम करण्यात आलं किंवा त्यांच्या शरीरांचा शास्त्रीय प्रयोग करण्यासाठी उपयोग केला गेला. त्या हजार वर्षांत जैविक तंत्रज्ञानात जी प्रचंड प्रगती झाली ती या लोकांवर निर्विकार मनाने केलेल्या अनैतिक प्रयोगांच्या आधारावरच झाली होती.
पन्नासाव्या शतकाचा पूर्वार्ध हा अतिसूक्ष्म जीवविज्ञानाचा (nano biotechnology) सुवर्णकाळ म्हणून ओळखला गेला. अतिसूक्ष्म बूस्टर डोसेसने मानवी शरीराची प्रतिकार शक्ती अनेक पटींनी वाढवल्यामुळे संसर्गजन्य रोग जवळजवळ नष्ट झाले होते. हे अतिसूक्ष्म बूस्टर शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करत आणि जंतूंमुळे आजार झाल्यास त्यांचा प्रतिकार करण्यास मदत करत. जीवाणू आणि विषाणू यांचा प्रतिकार करण्याची शरीराची नैसर्गिक प्रक्रिया जेव्हा माणसाला नीट समजली तेव्हा त्याला आपलं चातुर्य वापरून त्यांच्या विरुद्धची लढाई जिंकताआली. त्यामुळे लोकसंख्या वाढली आणि लोकांना दीर्घायुष्य लाभलं. आयुष्यातील अनिश्चितता जवळ जवळ संपुष्टात आल्यामुळे श्रीमंत लोकांना मन गुंतवून ठेवण्यासाठी नवीन नवीन साधनांची आवश्यकता भासू लागली. ते विशीत आणि तिशीत असताना त्यांच्या व्यावसायिक कार्यशीलतेचा उच्चांक गाठत आणि पन्नाशी गाठेपर्यंत त्यांचा उत्साह संपून जाई. मग रिकामा वेळ आणि पोकळ झालेली मनं भरून काढण्याचा प्रयत्न सुरू होई. कौटुंबिक जीवन आधीच चाळीस वर्षांपुरतंच मर्यादित झालं होतं – आई वडिलांबरोबर वीस वर्षं आणि पती किंवा पत्नी आणि मुलं यांच्याबरोबर वीस वर्षं. चाळीसचं दशक संपता संपता पती-पत्नी विभक्त होत आणि मुलं निघून जात आणि मग इंद्रियांच्या सुखाचा शोध सुरू होई. भोग अतिरेकाची सीमा पार करत आणि सत्तरच्या दशकात बहुतेक लोक वाईट सवयींमुळे होणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक विकृतींनी पछाडले जात. आयुष्याचे शेवटचे दशक बहुधा वृद्धाश्रमात किंवा मनोरुग्णांच्या आरोग्य केंद्रात घालवत.
गरीब लोकांचं आयुष्य आणखी खडतर होतं. पृथ्वीच्या ज्या भागातील लोक अजूनही इतरांपेक्षा अधिक शिक्षित होते ते जवळपासच्या धूमकेतूंवर आणि उल्कांवर त्यांच्या जमिनीत नसलेल्या साधन सामग्रीचा शोध घेण्याचा आटापिटा करत होते – विशेषतः पाणी आणि खनिजं यांचा. आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी सौर, पवन, लाटांपासून तयार होणाऱ्या आणि भूगर्भातील ऊर्जेचा उपयोग करून घेण्याचं तंत्रज्ञान अधिक विकसित केलं. या छोट्या आणि स्वायत्त प्रदेशांतील लोकांनीच अंतराळात वापरण्याच्या आणि मानवी प्रकाश संश्लेषणाच्या क्षेत्रात अपरिहार्यपणे महत्त्वाचे शोध लावले. हे देश, प्रदेश आणि समूह दीर्घ काळ तग धरून राहिले आणि त्यांच्या भिन्न तत्त्वज्ञानातूनच पुढे अनेक शतकांनी मंगळावरच्या वसाहतीत मानवाचे उन्नयन झाले.
पण ज्या देशांची लोकसंख्या अधिक होती आणि ज्यांची साधन सामग्री झपाट्याने नष्ट होत होती त्यांची पूर्णपणे वाताहत झाली. त्यांनी मिळेल तो मार्ग अवलंबून बचावाचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे संशोधन करण्याची क्षमताही नव्हती आणि संवर्धनात्मक धोरण आखण्यासाठी आवश्यक ते स्थैर्यही नव्हतं. या जनसमूहांनी असुरक्षिततेचा आणि भ्रष्टतेचा नीचांक गाठला. या भागांतील लोक लहान वयातच संधीसाधू बनले. ते श्रीमंत देशांतील लोकांना जे हवं होतं आणि त्यांच्याकडे जे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतं – प्रयोगांसाठी आणि इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी लागणारी मानवी शरीरं – ती पुरवू लागले. पन्नासाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये नीतिमत्ता पार ढासळून गेली. स्त्री, पुरुष आणि मुलांना पकडून लैंगिक गुलाम किंवा अत्याचाराचे बळी म्हणून विकलं जाऊ लागलं. श्रीमंतांच्या रिकाम्या मनांचा तो नवीन प्रकाराचा विरंगुळा होता. करमणुकीच्या प्रमुख साधनांमध्ये आभासी क्रौर्याच्या प्रदर्शनाला केव्हाच संमती मिळाली होती. पण हाडामांसाच्या शरीरात बंदिस्त असणाऱ्या मनांना त्यात समाधान मिळेनासं झालं. त्यांची अमर्याद वासना तृप्त करण्यासाठी त्यांना इतर हाडामांसाच्या शरीरांची गरज भासू लागली आणि जे लोक स्वतःचे रक्षण करू शकत नव्हते किंवा आपल्या पोटाची खळगी भरण्यास असमर्थ होते ते या वासनेची शिकार बनले. त्यांच्या यातनांमुळे कोणाच्याही सदसद्विवेक बुद्धीला पीडा झाली नाही.
पृथ्वीवर जेव्हा पाण्याचा तुटवडा जाणवू लागला तेव्हा एका सर्वंकष युद्धाची परिस्थिती आधीच निर्माण झालेली होती. सुरुवातीला प्रत्येक प्रदेशात लढाया सुरू झाल्या. नळातून येणाऱ्या पाण्यावरून लोक एकमेकांशी भांडू लागले. ज्या भागात पाण्याची टंचाई होती तिथे लोक एकत्र राहू लागले होते. वर्षानुवर्षांची प्रत्येक कुटुंबाने वेगळं घर करण्याची प्रथा सोडून देण्यात आली होती. प्रत्येक घराला पाणीपुरवठा करणारे नळ जेव्हा कोरडे पडले तेव्हा लोक एकत्रपणे समूहात राहू लागले आणि टँकरने त्यांना पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला. प्रत्येकाच्या वाट्याला ठरावीक प्रमाणात पाणी देण्यात येऊ लागलं आणि लोक पाण्याची काटकसर करून जगायला शिकले. हे विषवृत्तावरील उष्ण हवामानाचे प्रदेश होते आणि हजारो वर्षांपासून इथे गरिबी नांदत होती. लवकरच इथल्या वस्त्या बकाल झाल्या आणि पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे तिथे दंगे सुरू झाले. सांडपाण्याची नीट व्यवस्था नसल्याने आणि वैद्यकीय सेवांच्या अभावामुळे तिथे साथीचे रोग पसरले. शेकडो लोक आजारी पडून किंवा दंगलीत सापडून मेले.
त्यातून वाचून पाळलेले लाखो लोक भौगोलिक, राजकीय व ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आधारावर निर्माण झालेल्या कृत्रिम सीमा ओलांडून स्थलांतर करून गेले आणि त्यांच्याबरोबरच युद्धाने श्रीमंत देशांत प्रवेश केला. गेली दोनशे वर्षं या अत्यंत प्रगत राष्ट्रांनी त्यांचे दरवाजे ठोठावणाऱ्या लक्षावधी तहानलेल्या आणि मरणोन्मुख जनतेला क्रूर शक्ती वापरून थोपवून ठेवले होते; पण मग त्यांनाही पाण्याची टंचाई भासू लागली. पृथ्वीच्या ध्रुवांवरील बर्फाचे आवरण केव्हाच वितळून गेले होते आणि उत्तरेकडचे विशाल तलाव सुकून त्यांच्या जागी छोटे पाण्याचे साठे उरले होते. मोठमोठ्या नद्यांचे समुदाय सुकून गेले आणि जमिनीचे विस्तृत प्रदेश कोरडे पडून शेती करण्यास निरुपयोगी झाले.
मानव जातीवर पुढचे संकट अन्नाच्या दुर्भिक्षाच्या रूपात आले. जगातील अन्नाचा समतोल कोलमडून गेला. व्यापाराच्या पारंपरिक पद्धती बदलल्या. अन्नाचे साठे कधी नव्हे त्या वेगाने संपू लागले. राष्ट्रे, सरकार, समूह, ज्या कोणाला कोणत्याही रितीने अधिकार गाजवता आला ते संपत चाललेल्या पाण्याच्या आणि अन्नाच्या स्रोतांची राखण करू लागले. पाच हजार वर्षांत पहिल्यांदाच सरकार ही संस्था निरर्थक ठरू लागली. राष्ट्रे कोलमडून गेली आणि लोक कोणतीही सत्ता मानेनासे झाले. अन्न आणि पाणी देऊ शकेल अशा कोणालाही ते वश होऊ लागले.
पृथ्वीवर अनेक ठिकाणी लढाया सुरू झाल्याने ऊर्जा अधिक जलद रितीने वापरली जाऊ लागली. खनिज संपत्ती वाढत्या वेगाने संपू लागली आणि अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे अणुऊर्जेसाठी लागणारे इंधन खाणीतून काढणे कठीण होऊ लागले. त्यातून उत्पन्न झालेल्या ऊर्जेच्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे पाचशे वर्षं चाललेल्या अखेरच्या युद्धाला सुरुवात झाली. मानवी संस्कृतीचे सर्व पैलू नष्ट झाले. प्रत्येक मनुष्याला इतर सर्व मानवजातीविरुद्ध उभं करणारं सर्वंकष युद्ध होतं ते. दुर्बळ लोकांना त्याच्या सर्वाधिक यातना भोगाव्या लागल्या आणि ते युद्धाचे पहिले बळी ठरले. शक्तिशाली लोकांना अभूतपूर्व अंदाधुंदी, भीषण जीवितहानी आणि मानवतेची विटंबना पाहावी लागली. स्त्रिया आणि मुलांना लोक ओलीस ठेवू लागले आणि त्यांचा व्यापार सुरू झाला. युद्धपरिस्थितीत केलेल्या गुन्ह्यांना कोणताच ताळ उरला नाही कारण आता सामूहिक संयम ही उरला नव्हता आणि वैयक्तिक सदसद्विवेक बुद्धी ही नष्ट झाली होती.

मानवतेची अशी होळी पेटलेली असतानादेखील काही दूरदृष्टी असणारे विचारी स्त्री-पुरुष होते आणि त्यांना येऊ घातलेला संपूर्ण विनाश स्पष्ट दिसत होता. युद्धाने ग्रासलेली पृथ्वी सोडून जाण्याचे त्यांनी प्रयत्न केले आणि हळूहळू ते चंद्रावर, मंगळावर, युरोपावर आणि टायटनवर वस्ती करून स्थायिक झाले.
मंगळावर जमिनीखालच्या एका प्रचंड वसाहतीत शास्त्रज्ञांचा आणि संशोधकांचा एक समूह प्रस्थापित झाला होता. गेल्या दोन शतकांत ती वसाहत हळूहळू स्वावलंबी झाली होती. आता त्यांना पृथ्वीवरून साधन सामग्री मागवण्याची आवश्यकता भासत नव्हती. चंद्रावरच्या आणि टायटनवरच्या वसाहतीदेखील स्थिरस्थावर झाल्या होत्या. पण त्या स्वावलंबी नव्हत्या आणि साधनसामग्री आणण्यासाठी त्यांची अवकाशयानं नियमितपणे पृथ्वीवर येत असत. अखेरच्या युद्धाच्या शेवटच्या काळात चतुर लोकांनी या नियमित अवकाश यात्रांचा पृथ्वीवरील प्रलयंकर परिस्थितीतून जीव वाचवण्यासाठी उपयोग करून घेतला. पृथ्वीवरील विध्वंसातून जरी ते वाचले तरी पृथ्वीवरून येणाऱ्या सामग्रीचा पुरवठा नष्ट झाल्यावर या वसाहती कालांतराने नष्ट झाल्या.
पृथ्वीवर सत्ताधारी संस्था कोलमडून गेल्यानंतर अणुयुद्ध अटळ होते. शांतताप्रिय कार्यकर्त्यांनी अनेक शतकं प्रयत्न करूनदेखील मुख्य प्रगत देशांनी आपले अण्वस्त्रांचे साठे जपून ठेवले होते. जेव्हा या राष्ट्रांचे आपसांत लढाया करणाऱ्या छोट्या पक्षांत विघटन झाले तेव्हा ही अण्वस्त्रे सैनिकांच्या हातात आली. या विनाशकारी अस्त्रांचा पहिला वापर करणाऱ्या समूहाला वाटले, की काही बॉंब टाकून मोठ्या संख्येने लोकांना मारून टाकले तर ही सडत चाललेली युद्धं एकदाची थांबतील. त्यांना वाटले, की उरलेली जनता घाबरून त्यांना शरण येईल आणि त्यांची सत्ता मान्य करेल. मग उरलेल्या नैसर्गिक संपत्तीचे कडक नियमन करून आपण मानव जातीला विनाशापासून वाचवू शकू.
अण्वस्त्रांचा पहिला मारा करताच त्यांची ही स्वप्नं धुळीला मिळाली. त्या अस्त्रांनी अभूतपूर्व विनाश तर केलाच पण त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी साठवून ठेवलेल्या अण्वस्त्रांवर कब्जा करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. एका माऱ्यानंतर दुसरा असं होत सर्व मानव जात नष्ट झाली, पृथ्वीवरील निसर्गाचा भयानक विध्वंस झाला आणि जीवनाचे पोषण करण्याची तिची क्षमता संपुष्टात आली.
अनेक विचारवंतांना हा विनाश अटळ आहे हे जाणवलं होतं. इतर प्राण्यांहून मनुष्यप्राण्याचे वेगळेपण प्रस्थापित करणारी वैशिष्ट्ये जपण्यासाठी अशा विचारवंतांनी जवळ जवळ दोनशे वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. जेव्हा त्यांना ही वैशिष्ट्ये ढासळत आहेत असे दिसले तेव्हा त्यांनी बळावत चाललेल्या क्रूरतेपासून शक्य तितक्या मुलांना वाचवून माणसाची निरागसता, दयाळूपणा आणि सामाजिकता टिकवण्याचा प्रयत्न केला. माणसांची तस्करी करणाऱ्यांपासून हजारो मुलांना वाचवण्यात आलं, ज्यांची घरं नष्ट झाली होती किंवा ज्यांच्या आया मरून गेल्या होत्या अशा रस्त्यात भटकणाऱ्या मुलांना उचलून सुरक्षित स्थानी नेण्यात आलं आणि अनेकांना त्यांचा छळ करणाऱ्यांकडून विकत घेण्यात आलं. या मुलांना शिक्षण देऊन शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि इंजिनीयर करण्यात आलं. पुढे याच मुलांनी मोठं झाल्यावर इतर मुलांना गुप्तपणे वाचवण्यात पुढाकार घेतला.
अखेरच्या युद्धाच्या शेवटच्या काळात मंगळावरील वसाहतीने या गुप्त संस्थांना सहकार्य करून हजारो मुलांना मंगळावर आणलं आणि तिथल्या जमिनीखालच्या वसाहतीत वाढवलं. ही पिढी अत्यंत खडतर परिस्थितीत लहानाची मोठी झाली पण मानवी संस्कृतीचे जे काही चांगले अवशेष उरले होते त्यावर पोसली गेली. या वाचवलेल्या पिढीच्या मुलांनी मानवाचं उन्नयन घडवून आणलं.
उन्नत अवस्था ही एक समान विचार असणाऱ्या लोकांची चळवळ म्हणून सुरू झाली. मानवी मनाची असीमित क्षमता त्यांच्या लक्षात आली होती. ही क्षमता त्यांनी इतकी वाढवली, की इतर मनुष्यांविषयीच्या सर्व वाईट भावना त्यांच्या मनातून नष्ट झाल्या. मग त्यांच्या मनात केवळ सर्वांसाठी प्रेम आणि ज्ञानाची पिपासा उरली. या पिढीत निर्माण झालेल्या शास्त्रज्ञांनी विश्वातील नवे सिद्धांत शोधले, आधीच्या पिढीपेक्षा ऊर्जा आणि वस्तुजात (energy and matter) या संकल्पना अधिक चांगल्या समजून घेतल्या आणि मानवाची जगण्याची पद्धत बदलून टाकली.
जीवशास्त्रात त्यांनी विलक्षण प्रगती केली. माहीत असलेल्या सर्व आजारांवर त्यांनी औषधं शोधून काढली आणि सगळ्या माणसांचं आयुष्य किमान शंभर वर्षांचं होईल अशा जीवनपद्धतीचा पुरस्कार केला. निकामी झालेल्या पेशी आणि अवयव पुन्हा नव्याने वाढतील असं तंत्र त्यांनी विकसित केलं आणि अपंगत्वाचा काळ संपवून टाकला. आता आयुष्यभर माणसाचं शरीर सुदृढ राहू लागलं आणि बरा करता येणार नाही असा एकही आजार किंवा जे पूर्ववत करता येणार नाही असं कोणतंच अपंगत्व उरलं नाही.
पण एवढी प्रगती झाली असली तरी, मंगळ म्हणजे काही पृथ्वी नव्हती. मंगळावरचं जीवन कठीण आणि उदासवाणं होतं. घातक किरणोत्सर्गाने भरलेल्या वातावरणात राहायची सक्ती झाल्याने नाजूक मानवी शरीर किरणोत्सर्गापासून वाचवण्यासाठी अनेक नवे शोध लागले. आधुनिक प्रकारचे अवकाशात वापरायचे कपडे आणि फुगे तयार करण्यात आले आणि त्यामुळे माणसांना मंगळाच्या पृष्ठभागावर काही काळ राहता येऊ लागलं; शिवाय ग्रहाच्या पातळीवर अभियांत्रिकीचे (planetary engineering) तंत्र विकसित झालं आणि त्यामुळे ग्रहाचं वातावरण बदलण्याची आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची कला माणसाने आत्मसात केली; पण कालांतराने जेव्हा मंगळावरील लोकसंख्या वाढू लागली तेव्हा असं लक्षात आलं, की त्या ग्रहावरील पाण्याचा अभाव आणि इतर खडतर परिस्थिती यांमुळे हे सर्व शोधदेखील त्या ग्रहावर दीर्घ काळ वास्तव्य करण्यास पुरेसे पडणार नाहीत. मग मानवजातीसाठी एक नवीन घर शोधण्यासाठी शोधमोहिमांची सुरुवात झाली.
सुरुवातीच्या मानवरहित मोहिमांनंतर यंत्रमानवांना या शोध मोहिमांवर पाठवण्यात आलं. वारंवार कराव्या लागणारा अंतराळातील प्रवास आणि मंगळावरच्या वसाहतीतील वाढती गर्दी यांमुळे प्रकाश संश्लेषण हेच मानवी शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणून वापरण्यात येऊ लागलं. अधिकाधिक लोक प्रकाश संश्लेषणाचे सामर्थ्य असलेली मुलंच जन्माला घालणं पसंत करू लागले. प्रजननाची क्रिया मागेच कृत्रिम सहाय्याने होणारी प्रक्रिया झाली होती. तिसाव्या शतकात कृत्रिम गर्भाशयांचा वापर सररास होऊ लागला होता आणि चाळिसाव्या शतकापासून तोच पर्याय सर्वसंमत झाला होता. माणूस जेव्हा मंगळावर राहत होता तेव्हा स्त्रियांचे मासिक प्रजनन चक्र बंद करणंच जास्त सोयीचं होतं. बीजांड आणि शुक्राणू मानवांच्या शरीरातून काढणं आणि त्यांचं संवर्धन करून ठेवणं अधिक सोपं आणि कार्यक्षम झालं होतं. अखेरच्या युद्धानंतर त्यातून वाचलेल्या पिढीला स्वतःची जनुकं असलेलीच संतती जन्माला घालण्याची हौस उरली नाही. मंगळावरच्या खडतर परिस्थितीत जगण्यासाठी उपयोगी पडतील असे गुण त्यांनी आपल्या मुलांसाठी निवडले. मुलांवर योग्य ते संस्कार करणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय झालं. ज्या पिढीने पृथ्वीवरचा विध्वंस स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता त्यांनी पुढच्या पिढीचा निरागसपणा टिकवण्यासाठी आणि त्यांच्यात एकमेकांना मदत करण्याचे आणि सर्वांविषयी मनात स्नेह बाळगण्याचे संस्कार रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्या विध्वंसातून वाचण्यात याच मूल्यांची त्यांना मदत झाली होती.
सोयीस्कर घर शोधत शोधत हे उन्नत मानव सूर्यमालेच्या बाहेर पडले. त्यांनी अनेक ग्रहांवर आणि उपग्रहांवर वसाहती केल्या आणि शेवटी त्यांना मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असा स्वर्ग ग्रह सापडला. मृतावस्थेतील पृथ्वीपासून ते स्वर्गापर्यंतच्या प्रवासासाठी पाचशे वर्षांच्या शोधयात्रा आणि नऊ पिढ्या जाव्या लागल्या. हा प्रवास सोपाही नव्हता आणि सरळही नव्हता. त्या प्रवासात अनेकदा त्यांना खोटी आशा दिसली आणि त्यांच्याकडून अनेक चुकाही झाल्या. अनेकांनी बलिदान दिलं आणि अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. स्वर्गाचा जेव्हा शोध लागला तेव्हा मानवजात आठ वेगवेगळ्या ग्रहांवर वस्ती करून राहिली होती. पण अंतराळातील शोधयात्रांमुळे त्यांची संख्या बरीच कमी झाली होती. खडतर परिस्थितीत तग धरून राहणाऱ्या या समाजाला प्रजनन करणं सोपं नव्हतं. शोधयात्रांच्या या काळातील साधारण निम्म्या टप्प्यावर माणसाचं वजन पेलू शकतील आणि त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाची क्रियाही करू शकतील असे पंख उगवण्याची प्रक्रिया आत्मसात करण्यात मानव यशस्वी झाला.

पृथ्वी सोडल्यानंतर मानवाला कमी ऊर्जा वापरून सोप्या रितीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एखादा उपाय शोधण्याची गरज भासू लागली. मंगळावरील जमिनीखालच्या वसाहतीत मानवी शरीराची हालचाल सोपी होण्यासाठी कृत्रिम गुरुत्वाकर्षण वापरण्यात आलं होतं. पण मंगळाच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या तुलनेत गुरुत्वाकर्षण खूप कमी होतं. त्यामुळे मंगळाच्या पृष्ठभागावर लांब अंतर काटून जाणं सोपं होतं. जेव्हा शोधमोहिमांच्या पर्वाची सुरुवात झाली तेव्हा मानवाला वेगवेगळ्या प्रमाणात गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव येऊ लागला आणि एका ग्रहासाठी विकसित केलेलं तंत्रज्ञान दुसऱ्या ग्रहासाठी निरुपयोगी ठरू लागलं. पण तोपर्यंत जीव-अभियांत्रिकीच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली होती. मानवाने प्राण्यांकडून अधिक प्रभावी घ्राणेंद्रियांची शक्ती उचलली, पक्ष्यांकडून अधिक व्यापक दृष्टीची क्षमता उचलली आणि ध्रुव प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांकडून थंडी सहन करण्याची शक्ती आत्मसात केली. प्राण्यांच्या या शक्ती मानवाने त्याच्या जीव अभियांत्रिकीच्या कौशल्याने त्याच्या जनुकांत मिसळल्या. आता त्याला प्राप्त झालेल्या अतिमानवी शरीरयष्टीत उडण्याची क्षमता समाविष्ट करणं हे साहजिकच होतं; तरीदेखील उडण्याची क्रिया केवळ सोयीस्करच नव्हे तर आनंददायी होईल यासाठी आवश्यक अशा पंखांची रचना आणि आकार निश्चित करण्यासाठी अनेक पिढ्या जाव्या लागल्या.
या प्रगत मानवाने शेवटी स्वर्ग शोधून काढला. या ग्रहाचं पृथ्वीशी इतकं साम्य होतं, की जणू काही तो मानवाच्या वास्तव्यासाठीच बनला असावा. आठ वेगवेगळ्या ग्रहांवर वस्ती करून राहिलेल्या मानवांची एक महासभा घेण्यात आली आणि असं ठरलं, की सर्वांनी आपापली ठिकाणं सोडून या नवीन सापडलेल्या आणि त्याच्या ताऱ्यापासून योग्य अंतरावर असणाऱ्या ग्रहावर स्थलांतर करायचं. या ग्रहाला मानवाच्या वस्तीसाठी आणखी आनंददायी करण्यासाठी जे प्रचंड काम करायचं होतं ती कामगिरी ज्यांच्यावर सोपवायची होती त्या अभियंत्यांची पण या महासभेत निवड करण्यात आली.
पाण्याच्या प्रवाहांची दिशा वळवून ते एकमेकांना जोडण्यात आले, हवामानाचे नमुने बदलून त्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलं आणि तिथे आरामात राहण्यासाठी ऊर्जेचा सारखा वापर करावा लागणार नाही अशा प्रकारचं हवामान स्थिरस्थावर करण्यात आलं. या आधीपासूनच अभियांत्रिकी बदल केलेल्या, आकारलेल्या आणि आखलेल्या ग्रहावर पन्नास हजार मानव गटागटाने आले आणि स्थायिक झाले. आपलं घर म्हणता येईल असं स्थान त्यांना एकदाचं सापडलं होतं. दीर्घ काळ चाललेला शोध आता संपला होता आणि पाच पिढ्यांच्या संघर्षाचं फळ आता मिळालं होतं. इथे येऊन स्थायिक झालेल्या पहिल्या पिढीला हा ग्रह इतका सुंदर वाटला, की त्यांनी त्याचं नाव स्वर्ग ठेवलं. एका प्राचीन दंतकथेत स्वर्ग हे देवाचं – एका सर्वत्र भरून राहिलेल्या आणि सर्वज्ञ अशा अंतिम सत्य मानल्या जाणाऱ्या अस्तित्वाचं – घर होतं.
आयुष्यातील संघर्ष संपल्यामुळे मानवाला आता त्याची सर्जनात्मक क्षमता विकसित करण्यास सवड मिळाली. सर्व प्रकारच्या कला बहरास आल्या. पूर्वी अस्तित्वात नसलेल्या माध्यमांतून मानवी मनाचा आविष्कार झाला आणि जुन्या कलांचं पुनरुज्जीवन केलं गेलं. मानवी शरीराचं सौंदर्यीकरण हे याच कलाविष्काराचं फलित होतं. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारे त्वचेवरचे रंगाचे डाग काढून टाकून एक सलग रंग पंखांवर घालण्यात आला. ताऱ्याचा प्रकाश शोषून त्याचं ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी जांभळा रंग मानवी शरीरात सर्वात कार्यक्षम आढळून आला आणि नवीन मानवाला जांभळे पंख मिळाले. प्रकाश संश्लेषण करणाऱ्या मानवी शरीरात त्वचेचा रंग अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणार होता. काळ्या रंगाची त्वचा अतिप्रमाणात प्रकाश शोषून घेई आणि गोरी त्वचा उन्ह खाताना भाजली जाई. या समस्येवर तोडगा म्हणून अतिरेकी प्रमाणातील उष्णता परावर्तित करणारी आणि शरीर थंड ठेवणारी सोनेरी त्वचा आत्मसात करण्यात आली. पृथ्वीवर अखेरचे युद्ध लढणाऱ्या पूर्वजांपासून माणसाने आता बराच लांबचा पल्ला गाठला होता.
प्रकरण बारावे समाप्त
