आकाशवाणीचं हे ….
‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।
वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’
(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)
भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या जोरदार आक्रमणामुळे आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते; परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले. स्वतःचे ॲप तयार केले. विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व विश्वासार्हता टिकवून आहे. शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत.
भाग ८
प्रसारणाच्या विविध अर्थपूर्ण परंपरा
आकाशवाणीच्या व्यक्तिमत्त्वाला घाट आणि आकार देणाऱ्या काही प्रसारण परंपरा आहेत, त्या नीट समजून घेण्यासारख्या आहेत. या परंपरांपैकी काही परंपरा देशाच्या
सांस्कृतिक परंपरा आणि वारशाशी संबंधित आहेत. काही, भारतीय घटना आणि सामाजिक परिवर्तनाशी संबंधित आहेत तर काही क्रीडासंस्कृतीशीही श्रोत्यांची नाळ घट्ट करणाऱ्या आहेत. यांतली पहिली आहे महत्त्वपूर्ण उत्सवांचे प्रत्यक्ष वर्णन. पुरीचा जगन्नाथ रथोत्सव (भुवनेश्वर), कृष्ण जन्माष्टमी उत्सव (मथुरा), कुंभमेळा (उज्जैन-प्रयाग-नाशिक), सुवर्ण मंदिरामधल्या नानक जयंती दिवशीचे शब्द-कीर्तन, गुरुबाणीचे (अमृतसर) प्रत्यक्ष प्रसारण, पंढरपूरची आषाढी वारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्मचक्र प्रवर्तन दिन (दीक्षाभूमी नागपूर) यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रसंगी आकाशवाणी प्रत्यक्ष वर्णन किंवा विशेष रूपक – ध्वनिचित्र इ. कार्यक्रमांचे आयोजन करते. त्या-त्या दिवशी तिथली केंद्रे आयोजकांशी समन्वय करून संपूर्ण घटना – प्रसंगाचे अर्थपूर्ण प्रत्यक्ष वर्णन श्रोत्यांसाठी सादर करते. अभ्यासक, विश्लेषक प्रत्यक्ष वर्णनासाठी आमंत्रित केले
जातात. ते तिथली परंपरा, त्यातला अर्थ – आशय श्रोत्यांना सांगतात. हजारोंच्या उपस्थितीतील उत्सवी आयोजनाचे चित्र मांडले जाते. प्रत्यक्षदर्शींचे अनुभव, प्रतिक्रियादेखील यात समाविष्ट केल्या जातात. प्रत्यक्ष घटनास्थळावरूनच हे केले जाते. काही वेळात रथयात्रेसारख्या ठिकाणी प्रसारणाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असलेले मोठे वाहन (ओ. बी. व्हॅन) सरकत्या यात्रेसोबत जात असते. वाहनात बसलेले किंवा उंच मंडपात स्थिर व्यासपीठावर बसलेले तज्ज्ञ प्रसंगाचे विश्लेषण करत असतात. अभ्यासपूर्ण माहिती वर्णनातून, मनोरंजक समतोल मांडणीतून लोकशिक्षण – असे हे प्रसारण घडवीत असतात. आधुनिक दळणवळणाचा फायदा घेत बरेचदा आकाशवाणीचे प्रतिनिधी (किंवा
वार्ताहरही) वारीच्या किंवा यात्रेच्या विविध स्थळांवरून ‘बाईट्स’ पाठवत असतात. प्रत्यक्ष वर्णनात त्यामुळे अधिक स्पष्टता, वास्तविकता आणि रंजकता येते. हे एकूण प्रसारण संघभावनेतून यशस्वी होत असले तरी या प्रक्रियेत इंजिनिअरिंग विभागातील कुशल तंत्रज्ञानाचा, संगणक यंत्रणाविषयक तज्ज्ञांचा मोठा सिंहाचा वाटा असतो.
पुणे केंद्रात काम करताना २०१७ पासून सलग काही वर्षे आषाढी वारीचं प्रत्यक्ष वर्णन आयोजित करण्याची संधी मला मिळाली. यासाठीची व्यवस्था सिमला ऑफिस (वेधशाळा)शिवाजीनगरच्या चौकात महाराष्ट्र बँकेच्या प्रांगणात (लोकमंगल) केले जाते. आकाशवाणी पुणेतर्फे साधारण दहा ते पंधरा फूट उंचीवर एक प्रत्यक्ष प्रसारण कक्ष उभारायचा. वर साधारण ५ ते ७ लोक बसतील अशी व्यवस्था. टेबल, खुर्च्या, माईक, हेडफोन, मोठे घड्याळ इत्यादी व्यवस्था असायची. आकाशवाणी केंद्रातील नियंत्रण कक्षाशी या मंचावरील प्रसारण यंत्रणा, संगणक, टेलिफोन लाइन्सने जोडलेले असायचे. देहू-आळंदीहून ज्ञानेश्वर माऊली – तुकाराम माऊलींच्या पालख्या येथे एकत्र येऊन पुढे मार्गस्थ व्हायच्या. संपूर्ण वारी जल्लोशात – गजरात पुढे सरकायची. हजारो भाविक दुतर्फा उभे राहून पालखी यात्रेचे, वारकऱ्यांचे स्वागत करायचे. ज्यांना इथे प्रत्यक्ष यायची संधी मिळत नाही असे शेकडो श्रोते प्रत्यक्ष वर्णनाचा योग्य फायदा घेत. डॉ. रामचंद्र देखणे यांसारख्यांची प्रत्यक्ष वर्णनाची शैली श्रोत्यांना फार आवडायची. (या अनुभवातूनच डॉ. देखणे यांना पुढे मी उद्घोषक स्वर चाचणीसाठी परीक्षक म्हणून येण्याचा आग्रह केला आणि त्यांनीही ती जबाबदारी सानंदे
स्वीकारली. त्यांचा सहवास बौद्धिक आनंदाचा ठेवा होता.) शेवटच्या दिवशी म्हणजे आषाढीला पंढरपूर येथील पहाटेच्या विठ्ठल पूजेवेळीसुद्धा आकाशवाणीची टीम उपस्थित असते. तेथून प्रत्यक्ष वर्णन, मुख्यमंत्र्यांचे बाईट्स, वारीतल्या भाविकांचे मनोगत, पौरोहित्य करणाऱ्या पुजाऱ्यांच्या प्रतिक्रिया इत्यादी सर्व प्रसारित होते. आकाशवाणीवरून जवळपास दहा-बारा दिवस चाललेल्या ‘पायी वारी पंढरीची’ या प्रसारण सोहळ्याची ही अशी समाप्ती होते.



प्रसारण परंपरेतील आणखी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे. आकाशवाणी दिल्लीच्या राजेंद्र प्रसाद व्याख्यानमाला आणि सरदार पटेल व्याख्यानमालेच्या धर्तीवर महाराष्ट्रात आकाशवाणीतर्फे चालणारी ‘पुरुषोत्तम मंगेश लाड व्याख्यानमाला.’ विशेष म्हणजे दिल्लीबाहेर चालणारी ही एकमेव व्याख्यानमाला आहे. महाराष्ट्रात या प्रसारणाला आता
जवळपास ७० वर्षांची परंपरा आहे. १९५८ मध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. तेव्हा ती दोन दिवस चालायची. प्रमुख वक्ते, अध्यक्ष असे स्वरूप असायचे आणि अधिकाधिक संतसाहित्यावरच या व्याख्यानमालेचे विषय असत. पुढे पुढे विषयांचा परीघ विस्तारला. अगदी पहिले पुष्प मुंबईला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाहिले. यशवंतराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. पुढेही उत्तम विषय, फर्डे वक्ते, अभ्यासू – विद्वान अध्यक्ष अशी परंपरा लाभली. शेकडो श्रोत्यांनी सभागृह खचाखच भरायचे. शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे, राम शेवाळकर गंगाधर गाडगीळ, नरहर कुरुंदकर, न्यायमूर्ती चपळगावकर, डॉक्टर गणेश देवी, माधव गडकरी, तारा भवाळकर, वि. रा. करंदीकर अशा कितीतरी मान्यवरांनी या व्याख्यानमालेत हजेरी लावून श्रोत्यांचे कान तृप्त केले. या व्याख्यानमालेने काही चांगली पुस्तके मराठी सारस्वताला दिली. श्रोत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानांचे ध्वनिमुद्रण महाराष्ट्राच्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होते. पु. मं. लाड हे स्वतंत्र भारतातल्या नभोवाणी खात्याचे पहिले सचिव होते. ते अर्थशास्त्र, संतसाहित्य, पाली भाषा इत्यादींचे तज्ज्ञ होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही बौद्धिक विचार सत्रे दरवर्षी होतात. या व्याख्यानमालेची परंपरा कायम राहील अशी श्रोत्यांची अपेक्षा आहे.
आणखी एक सर्व परिचित आणि आबालवृद्धांमध्ये प्रिय प्रसारण परंपरा म्हणजे क्रिकेट कॉमेंट्री, “पॅव्हेलियन छोर की ओर से चंद्रशेखर की अगली गेंद… काफी लेग स्पिन होकर गेंद अंदर की ओर मुडी. क्लाइव्ह लॉईड ने पीछे जाकर खेलने की कोशिश में गेंद को स्लीप कीतरफ घुमाया है… काफी तणाव का क्षण… और ये कॅच. एकनाथ सोलकर ने बडी सहजता से बॉल को झेल लिया है. लॉइड की विकेट गिर चुकी है… दर्शक झूम उठे हैं, भारतीय स्पिन गेंदबाजों के सामने वेस्ट इंडिज का टिक पाना मुश्किल लग रहा है. केवल २२ रनों पर लॉइड आउट. भारी झटका.” असे जलद शैलीतले आवाज, सजीव चित्र उभे करणारे शब्द,प्रेक्षकांचा जल्लोश हे रेडिओ कॉमेंट्रीचं अद्भुत वैशिष्ट्यच राहिले आहे. यावर लोकांनी प्रेम केलं आहे; अजूनही करतात. हे प्रकरण तसे फारच रोचक आणि जुने आहे. यावर कदाचित विश्वास बसणार नाही.
१९३२ मध्ये पहिले प्रत्यक्ष वर्णन (धावते समालोचन) आकाशवाणीने प्रसारित केले. मुंबई येथे मुस्लीम आणि पारशी संघांत जो क्रिकेट सामना झाला, त्या वेळी हा यशस्वी प्रयोग झाला. बॉबी तल्यारखान समालोचक होते. १९३६ नंतर तर प्रत्यक्ष वर्णन रेडिओ प्रसारणाचा अविभाज्य भाग होत गेले. बॉबी तल्यारखान (मूळ नाव अर्देशीर फुरदोरजी शोराबजी), सुरेश सरैया, जयदेव सिंग, नरोत्तम पुरी, रिची बेनाड, राजू भारतन, डॉ.सुरेश नाडकर्णी, हर्ष भोगले, सुशील दोशी, डॉ.मिलिंद टिपणीस अशा कितीतरी समालोचकांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. अनेक नामवंत क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर समालोचकाचे काम केले. ही यादी शंभराहून अधिक आहे म्हणून सगळी नावं घेत नाही. मराठीमध्येसुद्धा बाळ ज. पंडित, वि. वि. करमरकर, चंद्रशेखर संत, डॉ. सुरेश नाडकर्णी या सर्वांनी केवळ खूप नाव कमावलं नाही; तर मराठी समालोचनाला प्रतिष्ठा मिळवून दिली. गोलंदाज, फलंदाज,धावचीत,पायचीत, फिरकी, शतक, यष्टिरक्षक, त्रिफळाचीत, क्षेत्ररक्षक, खेळी, झेल, चौकार, षट्कार, गडी राखून, धाव, बारी, सीमापार, राखीव गडी असे कितीतरी सुंदर मराठी शब्द वापरात रूढ झाले – ते आकाशवाणीवरील धावत्या वर्णनामुळेच माहिती झाले, रूढ झाले
रणजी ट्रॉफीसारख्या सामन्यांचेदेखील प्रत्यक्ष वर्णन पूर्वी प्रसारित व्हायचे. पुढे ‘वेळ’ खाऊपणामुळे ते थांबले. क्रीडांगणावर आकाशवाणीचा समालोचन कक्ष (कॉमेंट्री बूथ) म्हणजे एक आकर्षण स्थळ असायचे. जळगाव, रत्नागिरी आणि पुणे येथे समालोचनाचे व्यवस्थापन हाताळण्याची संधी मिळाली. त्या आठवणी फार आनंददायक आहेत. समालोचन कक्षामध्ये सर्व व्यवस्था आम्ही आयोजकांच्या समन्वयाने करायचो. समालोचकांच्या मदतीला स्टॅटिस्टिशियन असायचे. ते उत्तमोत्तम संदर्भ चिठ्ठीवर लिहून समालोचकांना द्यायचे. ‘कॉमेंट्री’ त्यामुळे फार रंजक व्हायची. नवे रेकॉर्ड स्थापन होताच पूर्वीची रंजक माहिती, सामन्यांचा, संघाचा, त्यांच्या देशांचा इतिहास, खेळाडूने पूर्वी स्थापन केलेले उच्चांक (रेकॉर्ड्स) यासारखी माहिती धडाधड समालोचकांना मिळायची. श्रोते आश्चर्यचकित व्हायचे. बाद झालेल्या किंवा खेळायला अद्याप वेळ असलेल्या नामांकित खेळाडूंना आम्ही समालोचन कक्षात घेऊन यायचो. श्रोत्यांशी संवाद घडवायचो. के. श्रीकांत, पांडुरंग साळगावकर, एकनाथ सोलकर, सुनील गावस्कर असे कितीतरी खेळाडू मोठ्या उत्साहाने आकाशवाणी बूथमध्ये येऊन कॉमेंट्रीत सहभागी झाले. अशा ‘रनिंग कॉमेंट्री’नेदेखील भारतात क्रीडा प्रसारणास हातभार लावला, अशी या खेळाडूंची भावना असायची. हे उल्लेखनीय आहे, की दरवर्षी समालोचकांची एक स्वीकृत यादी भाषावार तयार केली जायची. नवीन होतकरू समालोचकांचे ‘१५ मिनिटे’ टेस्ट – रेकॉर्डिंग केले जायचे. ती एक प्रकारची ऑडिशन होती. त्यांचे टेस्ट रेकॉर्डिंग दिल्लीला पाठविले जायचे. त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार (स्थानिक – विभागीय – राष्ट्रीय – स्तरानुसार) घसघशीत मानधन देण्याचीही आकाशवाणीने परंपरा सांभाळली.अतिउत्साहात समालोचकांकडून चुका होऊ नयेत म्हणून आकाशवाणीने अतिशय सुंदर सूचना (डूज अँड डोण्ट्स ) / समालोचकांसाठी कष्टपूर्वक तयार केल्या, त्याही वाचनीय आहेत.
एक असेही घडताना मी पाहिले, की लोक टीव्हीचे दृश्य ऑन ठेवून त्याचा आवाज
(व्हॉल्यूम) बंद करायचे आणि टीव्हीच्या वर किंवा बाजूला ट्रांजिस्टरची कॉमेंट्री चालू ठेवायचे. आकाशवाणीची कॉमेंट्री अधिक गतिमान, अधिक निर्दोष असते असे या मागचे कारण सांगितले जायचे. उत्कृष्ट समालोचकांना याचे श्रेय निर्विवादपणे द्यावे लागेल.
आज दुर्दैवाने मराठी समालोचनाला स्थान उरले नाही. सगळीकडे ‘प्रायोजक’ महत्त्वाचे ठरले. हिंदी, इंग्रजीला प्राधान्य मिळत गेले. मैदानावरची जागा, चॅनेलवरची जागा, साऱ्या ठिकाणी स्थानिक भाषा संकोचल्या. राजभाषेच्या जल्लोशापुढचे हे प्रखर वास्तव आहे. मराठी प्रेमी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे असा हा विषय आहे.
हिंदी-इंग्रजीत कॉमेंट्रीने आकाशवाणीला लाखो नव्हे करोडो रुपये मिळवून दिले ही मात्र चमचमणारी वस्तुस्थिती आहे. एअरटेल – व्होडाफोनपासून अनेकांची प्रायोजनाची करार पत्रे मी स्वतः पाहिली आहेत. राष्ट्रीय स्तरावरती हे उत्पन्न कोटींमध्ये जाते. षटक (ओव्हर) चौकार, षट्कार, झेल, बाद इत्यादींचे क्षणदेखील प्रायोजित करण्याचे कसब दाखवून ‘भरपूर कमाई’च्या फुशारक्या आम्ही मारल्या खऱ्या; पण स्थानिक भाषेतले समालोचन फारसे वाचवता आले नाही, याचा सल माझ्यातरी मनात कायम राहिला.
भविष्यकाळ कदाचित ही संधी भाषिक समालोचकांना पुन्हा मिळवून देईल…कोणी सांगावे!

आकाशवाणीच्या स्टुडिओत रामचरित मानसबद्दल लतादीदीं समवेत चर्चा करताना संगीतकार सतीश भाटिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ साठी आकाशवाणी माध्यम वापरून प्रसारण परंपरेत नवी भर टाकली.
