ज्ञानपीठ पुरस्कार : लेख १

भारतीय साहित्य क्षेत्रात  सर्वोच्च शिखर मानल्या जाणाऱ्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित शब्दप्रभूंच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या अजरामर साहित्याचा वेध घेणारी नवी लेखमाला ‘अंतर्नाद’मध्ये सुरू होत आहे. या प्रतिभावंतांच्या लेखणीची महती आणि त्यांच्या साहित्यातील मर्म उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे. ज्येष्ठ लेखक प्रमोद केशव बापट ही लेखमाला शब्दांकित करत आहेत. संपादक 

साहित्यिक पुरस्कारांसंबंधात चार शब्द….

कोणत्याही क्षेत्रातील उत्तम कामगिरी पुरस्काराने गौरविली जाते; मग ते विज्ञान असो, सामाजिक क्षेत्र असो वा एखादी कला. हे पुरस्कार मर्यादित क्षेत्रासाठी – राज्य, देश, खंड- वा जागतिक स्तरावरील असू शकतात. साहित्यक्षेत्र याला अपवाद कसे असेल?

साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘नोबेल प्राइझ.’  गेल्या तब्बल सव्वाशे वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहे. रवींद्रनाथ टागोर हे या पुरस्काराचे एकमेव भारतीय मानकरी. राष्ट्रकुल देशांसाठी ‘बुकर’,  अमेरिकेतील ‘पुलित्झर’ ,  ‘युरोपियन बुक प्राइझ’ अशी अनेक क्षेत्रीय पुरस्कारांची नावे.

अमेरिका हा देश केवळ आर्थिक, वैज्ञानिक, सामरिक क्षेत्रातच नाही, तर कला आणि साहित्य प्रांतातही ‘दादा’ आहे. नवीन पुस्तकांचे प्रकाशन, ग्रंथालयांची संख्या यात तो अग्रणी आहे. साहजिकच तेथील साहित्यिक पुरस्कारांची संख्या शंभराहून अधिक आहे. सख्खा शेजारी कॅनडादेखील या बाबतीत फारसा मागे नाही.

भारताच्या बाबतीत बोलायचे, तर जसजशी साक्षरता वाढत आहे, साहित्य निर्मितीदेखील वर जात आहे. अर्थात प्रगत देशांचा पल्ला गाठायला अजून बराच अवधी लागेल. मोबाईल, सोशल मीडिया हे यासाठी अडथळे ठरू शकतात.

‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान. याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी काही सर्वसाधारण तपशील आणि भारतातील काही इतर महत्त्वाचे साहित्यिक पुरस्कार यांच्याबद्दल जाणून घेऊ या.

साहित्यिक पुरस्कार अनेक प्रकारचे असतात. काही विशिष्ट भाषेसाठी, काही केवळ ललित वा ललितेतर लेखनासाठी, काही युवावर्गासाठी, अनुवादित पुस्तकांसाठी वगैरे वगैरे. याखेरीज असे पुरस्कार दोन वेगळ्या निकषांवर आधारित असू शकतात – त्यांतले काही लेखकाच्या विशिष्ट पुस्तकासाठी असतात, तर काही त्याची समग्र कामगिरी विचारात घेऊन.

‘ज्ञानपीठ’च्या खालोखाल महत्त्वाचे समजले जाणारे ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ होत. साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. सर्व भारतीय भाषांमध्ये उत्तम साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ती प्रयत्न करते. दरवर्षी एकूण २४ भाषांमधील आदल्या वर्षी प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांना अकादमी पुरस्कार देण्यात येतात. १९५५ पासून आजपावेतो ६९ मराठी (त्याच प्रमाणे इतर भाषांतील) लेखकांना हे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या नावांवर नजर टाकली, तर ललितेतर – समीक्षात्मक साहित्यालादेखील न्याय दिल्याचे दिसते; मात्र तेंडुलकर, कानेटकर, दळवी, कुरुंदकर, शांताबाई, मतकरी, विंदा, बापट ह्यांची अनुपस्थिती खटकते. अकादमी अनुवाद, युवा लेखक आणि बाल साहित्यासाठीदेखील पुरस्कार देते. याशिवाय दोन द्वैभाषिक साहित्यिक नियतकालिके प्रकाशित करते – इंग्रजीत ‘इंडियन लिटरेचर’ आणि हिंदीमध्ये ‘समकालीन भारतीय साहित्य.’

के.के.बिर्ला फाउंडेशन १९९१ पासून ‘सरस्वती सम्मान’ नावाने साहित्याचा पुरस्कार देत आहे. आधीच्या १० वर्षांतील साहित्यकृतींचा यात विचार केला जातो. १५ लाख इतकी घसघशीत रक्कम असणारा हा पुरस्कार आतापर्यंत ३४ साहित्यिकांना मिळाला आहे. त्यात विजय तेंडुलकर(कन्यादान), महेश एलकुंचवार(युगान्त) आणि शरणकुमार लिंबाळे(सनातन) या मराठी लेखकांचा समावेश आहे. हे फाउंडेशन अशाच निकषांवर हिंदी साहित्यासाठी ‘व्यास सम्मान’ पुरस्कारही देते.

याखेरीज इतर काही अखिल भारतीय स्तरावरील साहित्यिक पुरस्कारांचा केवळ उल्लेख करतो; गूगलवरून त्यांची अधिक माहिती करून घेता येईल – ‘क्रॉसवर्ड बुक ॲवार्ड्स,’ ‘सुब्रमण्यम भारती ॲवार्ड्स,’ ‘ऑथर ॲवार्ड्स,’ ‘ द हिंदू लिटररी प्राइझ,’ ‘प्रियदर्शिनी ॲकॅडमी ॲवार्ड्स.’

मराठी साहित्यासाठीदेखील अनेक संस्था नियमितपणे पुरस्कार देत असतात,  त्यांपैकी दोन संस्थांबद्दल थोडी माहिती घेऊ या. १९९४ सालापासून ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ ही अमेरिकास्थित संस्था दरवर्षी साहित्यिक पुरस्कार देत आली आहे. पुरस्कारांची संख्या साधारणपणे ३ ते ५ इतकी असते व पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी रु.५०,०००/- ही संस्था महाराष्ट्रातील इतर काही सामाजिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांसाठीदेखील मदतीचा हात पुढे करत असते.

माझ्या दृष्टीने कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १९९१पासून एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ अतिशय निष्पक्षपणे मराठीतील उत्कृष्ट साहित्यिकांचा सन्मान करतो. रु.एक लाख आणि सूर्याचे चिन्ह असणारी मूर्ती अशा स्वरूपात हा पुरस्कार असतो. आतापर्यंत १८ साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

साहित्याच्या क्षेत्रात असे पुरस्कार महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. यांमध्ये काही त्रुटी असू शकतात, कधीकधी विवाद उद्भवतात. ‘असहिष्णुते’च्या मुद्द्यावरून ‘ॲवार्ड वापसी’सारखे प्रकारही घडतात. तरीही एकूण जमाखर्च मांडला, तर असे पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी सकारात्मकच आहेत असे म्हणता येईल.

ज्ञानपीठ पुरस्कारांसंबंधी थोडेसे…

आधी सांगितल्याप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रासाठी सर्वोच्च सन्मान आहे.

भारतीय ज्ञानपीठ न्यासाची स्थापना उद्योगपती साहू शांती प्रसाद जैन यांनी १९४४ मध्ये केली. १९६१ मध्ये या संस्थेने भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव करण्याचे ठरविले. काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखालील मान्यवर साहित्यिकांच्या एका समितीने तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना या संबंधात प्राथमिक प्रस्ताव सादर केला. धर्मवीर भारती यांनी ३०० साहित्यिकांबरोबर चर्चा करून एप्रिल ६२ मध्ये अंतिम प्रस्ताव मांडला. हा पुरस्कार भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट २२ भाषांमधील साहित्यकृतीसाठी असणार होता.(२०१३ मध्ये यात इंग्रजी भाषेची भर पडली.) जीवित भारतीय नागरिक यासाठी पात्र होते. प्रशस्तिपत्र, वाग्देवीची कांस्य प्रतिमा आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुरुवातीला १ लाख रुपये असलेली रक्कम आता रु.११ लाख इतकी झाली आहे.

१९६५ पासून हे पुरस्कार देण्याचे ठरले. प्रथम वर्षीच्या पुरस्कारासाठी १९२१ ते १९५१ दरम्यान प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा विचार केला गेला. ९ वेगवेगळ्या भाषा समित्यांनी निवड समितीला नामांकने,  त्या साहित्यकृतींच्या हिंदी किंवा इंग्रजी अनुवादासह सादर केली. अंतिम चार जणांच्या लघू यादीतून मल्याळम कवी जी. शंकर कुरूप यांची ‘ओडाक्कुझल’  या काव्यसंग्रहासाठी निवड झाली. १९ नोव्हेंबर १९६६ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कारांची निवड प्रक्रिया साधारणपणे अशी आहे :

* नामांकने साहित्यिक, शिक्षक, समीक्षक आणि साहित्यसंस्थांकडून येतात.

* प्रत्येक भाषेसाठी एक सल्लागार समिती असते, त्यातील सदस्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो, ज्यास दोन वेळा मुदतवाढ दिली जाऊ शकते.

* सल्लागार समिती आलेल्या नामांकनातून वा आपल्या इच्छेनुसार एका साहित्यिकाची निवड करते.

* प्रस्तावित साहित्यिकांच्या निवडक साहित्यकृतींचे अनुवाद मध्यवर्ती निवड समितीकडे पाठवण्यात येतात.

* मिळालेल्या सर्व प्रस्तावांतून अंतिम निवड केली जाते.

* एखाद्या भाषेतील साहित्यिकाला पुरस्कार मिळाल्यावर पुढील दोन वर्षे त्या भाषेतील साहित्यिकांचा विचार केला जात नाही.

१९८१ पर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार लेखकाच्या एखाद्या विशिष्ट साहित्यकृतीसाठी दिला जाई. वि.स.खांडेकरांना १९७४ साठीचा पुरस्कार त्यांच्या ‘ययाति’ कादंबरीसाठी मिळाला होता. मात्र त्यानंतर यात बदल होऊन लेखकाच्या गेल्या २० वर्षांतील साहित्याचा एकत्रित विचार केला जाऊ लागला.

(मात्र विशिष्ट साहित्यकृतीसाठी पुरस्कार देण्याचा प्रघात बंद झाला नाही. ज्ञानपीठ प्रतिष्ठानतर्फेच ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ त्यानंतर दिले जाऊ लागले. त्यांसाठी लेखकाच्या त्या आधीच्या १० वर्षांतील साहित्याचा विचार केला जातो. आतापर्यंत दिल्या गेलेल्या ३१ पुरस्कारांमध्ये शिवाजी सावंत (मृत्युंजय) हे एकमेव मराठी नाव आहे).

आतापर्यंत ६५ साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. त्यांच्या यादीवर नजर टाकली तर पुढील गोष्टी दिसून येतात.

१  केवळ ८ स्त्री साहित्यिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. १९७६ साली पुरस्कार मिळालेल्या आशापूर्णा देवी(बंगाली) या पहिल्या स्त्री साहित्यिक.

२  सर्वाधिक (१२) पुरस्कार हिंदी साहित्यिकांना मिळाले आहेत. प्रथमदर्शनी हा आकडा जरी मोठा वाटत असला, तरी एकूण लोकसंख्येच्या ४५% हिंदी भाषक आहेत, त्या मानाने पुरस्कारांची संख्या खूपच कमी आहे. तुलनेने केवळ ५% उर्दू भाषकांना मिळालेले ५ पुरस्कार लक्षवेधी ठरतात.

३  कन्नड(८),  मल्याळम आणि बंगाली (प्रत्येकी ६) या भाषांचा दबदबा राहिला आहे. एकूण भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत मल्याळी भाषकांचे प्रमाण ३ टक्क्यांहूनही कमी, तेव्हा त्याच भाषेच्या जी. शंकर कुरूप यांना प्रथम पुरस्कार मिळणे हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. भाषावार पुरस्कारांची तौलनिक संख्या पाहता ज्या राज्यांमध्ये ग्रंथालय संस्कृती जास्त चांगली आहे, सर्वसाधारणपणे तेथील साहित्यिकांना अधिक यश प्राप्त झाल्याचे दिसते.

३  तामीळ लेखकांना केवळ २ पुरस्कार आतापर्यंत मिळावेत ही काहीशी विस्मयाची गोष्ट आहे. अभिजात भाषेचा दर्जा सर्वप्रथम तामीळ भाषेला मिळाला,  ती सर्वाधिक प्राचीन भाषा असल्याचे म्हटले जाते. तेथील साक्षरतेचे प्रमाण कर्नाटक व बंगाल या दोन्ही प्रांतांच्या तुलनेत अधिक आहे, या पार्श्वभूमीवर ही गोष्ट नक्कीच गोंधळात टाकणारी आहे.

४  मराठी साहित्यिकांच्या गळ्यात पुरस्कारांची माळ केवळ ४ च वेळा पडली आहे( वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे). हा आकडा निश्चितच याहून अधिक असायला हवा होता. या संदर्भात दत्तप्रसाद दाभोलकर यांनी त्यांच्या एका लेखात भाष्य केले होते. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी यासाठी ३ कारणे दिली होती. पहिले म्हणजे मराठी साहित्याचे पुरेशा प्रमाणात हिंदी/इंग्रजीत भाषांतर होत नाही. एकमेकांचे पाय ओढण्याची मराठी प्रवृत्ती आणि मध्यवर्ती निवड समितीत मराठी साहित्याविषयी अनास्था/आकस अशी बहुधा ती कारणे होती. १९९८ मध्ये गिरीश कर्नाड यांना जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती, की त्यांच्या आधी खरेतर विजय तेंडुलकरांना तो मिळायला हवा होता.

५  केवळ २५ लाखांच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या कोकणी भाषेला २ पुरस्कार मिळावेत ही स्पृहणीय गोष्ट आहे. संस्कृत भाषेला २ पुरस्कार मिळाले आहेत हा गुणवत्तेपेक्षा   प्रतीकात्मकतेचा भाग असावा.

६ अनेक भारतीय लेखक पूर्वीपासून इंग्रजी भाषेत लिखाण करत आले आहेत. आर. के. नारायण, अरुंधती रॉय, चेतन भगत अशी अनेक नावे घेता येतील. २०१३ मध्ये इंग्रजीचा समावेश झाल्यानंतर २०१८ साली अमिताव घोष यांना हा पुरस्कार मिळाला.

७  ७० लाख संख्या असणाऱ्या काश्मिरी भाषेला २००४ मध्ये हा सन्मान मिळाला. बोडो, डोगरी, मैथिली, मणिपुरी, नेपाळी, संथाली आणि सिंधी भाषा पहिल्यावहिल्या पुरस्काराच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.

पुरस्कार म्हटले की वादविवाद असणारच. अगदी नोबेल पुरस्कारांच्या संदर्भात तथाकथित विरोधाभास आणि अन्यायाची उदाहरणे  आयर्विंग वाॅलेस यांच्या ‘द प्राइझ’ कादंबरीत दिली आहेत. तरीही नोबेल पुरस्कारांविषयी उत्सुकता आणि त्यांना मिळणारी प्रसिद्धी कायम आहे. ज्ञानपीठ पुरस्कारांबद्दलही असेच म्हणता येईल.

पुरस्कारात मिळणारी वाग्देवीची प्रतिमा

Author

One thought on “ज्ञानपीठ पुरस्कार : लेख १

Leave a Reply