पुस्तक परीक्षण : फेब्रुवारी २०२६ 

नात्यांचा पैस कवेत घेणारे काव्य म्हणजे : ‘एक नातं असंही’ हा कवितासंग्रह

   मानवी जीवन आणि नातं हे अविभाज्य घटक आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा विचारही शक्‍य नाही. ‘नातं हेच जीवन’ असं म्हणूनच म्हटलं जातं. साहित्यसृष्टीत नातं हा शब्द केवळ दोन व्यक्तींमधील रक्तसंबंध किंवा सामाजिक नातेसंबंधांपुरता मर्यादित नाही; तर व्यक्तीचे भावविश्व,आत्मसंवाद, जगण्याची तत्त्वे, वेदना- आनंद यांचा परस्परांतील अदृश्य धागा यांनाही ते व्यापून आहे. ‘एक नातं असंही’ हा डिंपल पब्लिकेशनाने प्रकाशित केलेला, युवा चैतन्य डुम्बरे लिखित ११८ पृष्ठसंख्येचा कवितासंग्रह अशा नातेसंबंधांचा पैस कवेतघेणारा आहे. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व मराठीतील जाणते समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची या काव्यसंग्रहाला प्रस्तावना  आहे. हा संग्रह म्हणजे मानवी नातेसंबंधांच्या बहुपेडी धाग्यांची शोधयात्रा आहे. चैतन्य डुम्बरे यांनी सृष्टीतील चराचरांच्या मनातील नात्यांचे अनेकविध रंग, छटा, ताणतणाव आणि उबदार स्पंदनं अत्यंत सूक्ष्मतेने टिपली आहेत. चैतन्य यांच्या कवितांच्या आशयाला अनुभवांचे, चिंतनशील समाज निरीक्षणाचे उबदार अस्तर आहे. प्रेम, सख्य, मैत्री, अनामिक ओढ, आक्रोश, विरह आणि आत्मसंवाद अशा अनेक मानसिक छटांनी हे अस्तर विणले गेले आहे. नात्यांचे गूढ, कधी न बोलले जाणारे ताण, कधी स्वयंभू प्रेमाचा कोवळा स्पर्श हे सर्व आविष्कार शब्दांच्या अतिशय सूक्ष्म हाताळणीमध्ये दिसतात. व्यक्तिजीवनातील बालपण ते किशोरवयीन अवस्थांतील भावविश्वाच्या संवेदनांचे जग अत्यंत तरलतेने येथे शब्दरूप घेताना दिसते. 

‘एक मुलगी माझ्या आत’ ही त्या दृष्टीने एक प्रत्ययकारी कविता म्हणता येईल. कविमनाचे कुतूहल अनेक कवितांमधून व्यक्त होताना दिसते.  

‘कॅनव्हास’ या कवितेत कवी म्हणतो, 

“रंगा – रंगांमधील बारीक-सारीक छटा 

घ्याव्यात आधी जाणून

 तेव्हा हे विश्व, कुठं येतं उमजून

असणारं असतं… दिसणारं दिसतं. त्याच्या एकाच रूपात मुळीच अडकू नये…” 

कविमनाचं व्यापकपण किती सहजतेनं येथे व्यक्त झाले आहे. ‘शेवट नसणारी गोष्ट’ या कवितेतील   

‘आपल्या अमोल अस्तित्वासाठी एक रूप तर हवेच असते प्रत्येकाला.’  

ही साधीच काव्यपंक्ती जगण्याची शहाणीव जागवते. या कवितांमध्ये अव्यक्त भावनेचे व्यक्त होणे हा प्रवास आहे. हा प्रवास शांत, संयमी आणि आत्मीय आहे. तो गोंगाट करत नाही; उलट वाचकाला स्वतःच्या आयुष्यातील एका शांत कोपऱ्यात नेऊन बसवतो.

 ‘प्रेमाची गोष्ट’ ही तर कवीचीच गोष्ट आहे. स्वतःकडेच तटस्थपणे पाहणं किती सुंदर असतं हे वाचकाच्या येथे लक्षात येईल. लेखक आणि डिक्शनरीचं एक अनोखं नातं एखाद्या घटितचित्रासारखं एकेका कडव्यागणिक पुढे पुढे सरकत जातं आणि वाचक त्यात रमूनही जातो. या संग्रहातील कवितांची भाषा साधी, प्रवाही आणि बोलकी आहे. भाषेत आडाखे नाहीत, कृत्रिम अलंकार नाहीत. रूपकांचा वापर कोमल आणि अर्थवाही आहे – नातेसंबंध कधी आभाळासारखे विशाल, कधी पावसासारखे टिपूर, तर कधी दगडात उमलणाऱ्या फुलासारखे नाजूक म्हणून उलगडतात. महत्त्वाचे म्हणजे कवीने सृष्टीतील निर्जीव घटकांनाही चैतन्य दिले आहे. 

‘मी स्वेट शर्ट बोलतोय…’

या कवितेत चेतनगुणोक्ती अलंकार वापरून वस्तूंना चैतन्यरूपात पाहणं, अनुभवणं आणि त्यांचे भावविश्व चितारणं किती वेगळा अनुभव देणारं आहे हे वाचकांच्या लक्षात येईल. या काव्यसंग्रहात केवळ सव्वीस कविता असून त्या ‘स्त्री तुझा रंग कसा?,’ ‘निसर्गाच्या सान्निध्यात/कलेच्या प्रांगणात,’ ‘तोच मी,’ ‘ पोर्ट्रेट पोएम्स,’  ‘कवीची दुर्बीण’ अशा सहा भागांत त्यांची विभागणी केली आहे. पुस्तकाचे रंगीबेरंगी बोलके मुखपृष्ठच वाचकाला वेधून घेते. संग्रहातील कवितांच्या आशयानुसार रेखलेली सुंदर रेखाचित्रे, अंतर्गत सजावट यांमुळेही पुस्तक देखणे झाले आहे. 

‘एक नातं असंही’ हे शीर्षकच अर्थवाही आहे. येथे कवी नातेसंबंधांचे नवे अर्थ शोधतो. कधी नाते स्वतःशीच असते, कधी प्रकृतीशी, कधी शब्दांशी, कधी अपरिचिताशी. काही कवितांमध्ये स्वतःचा शोध आहे; तर काही कवितांमध्ये नात्यातील मुक्ततेचा आग्रह आहे.

या आशयवैविध्यामुळे साधेच शब्द प्रभावी झाले आहेत आणि त्यांनी संग्रहाला एकसुरी होऊ दिलेले नाही. उलट प्रत्येक कविता भावभावनांचा नवा प्रदेश वाचकाला दाखवते. सर्वांनी जरूर वाचावा व संग्रही ठेवावा असा हा कवितासंग्रह आहे. 

 कविता संग्रह : एक नातं असंही

 कवी : चैतन्य सदाशिव डुम्बरे 

प्रकाशन: डिंपल पब्लिकेशन 

Author

Leave a Reply