मन वढाय वढाय : विस्मरण ( Dementia )

मन वढाय वढाय या ‘मानसिक आरोग्य’ या विषयावरील लेखमालिकेतील पुढील लेख हा जरा वेगळ्या, काहीशा अपरिचित परंतु सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वाच्या विषयावर आहे. Dementia म्हणजेच विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारा आजार!

काही दिवसांपूर्वी जवळच्या एका खेडेगावातील सरपंचबाई मला भेटायला आल्या होत्या. त्या स्वतः पन्नाशीच्या आसपास होत्या आणि त्यांच्या सासूबाई ऐंशीच्या घरात. तर सासूबाईंना बरं  वाटत नव्हतं. त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला होता. चिडचिड वाढली होती, नेहमीच्या मदतीला असणाऱ्या मावशीला त्या खोलीत येऊन देत नव्हत्या; थोड्या वेळापूर्वी केलेल्या गोष्टी विसरत होत्या, कधीकधी त्यांना जुन्या सध्या हयात नसणाऱ्या नातेवाइकांचे भास होत होते. हा त्रास त्यांना कधीपासून होतोय असं विचारल्यावर आजींच्या सूनबाई जरा अडखळल्या. त्या म्हणाल्या हा त्रास गेला एक महिना होत आहे. 

मी विचारलं, ‘एक महिन्यापूर्वी हा त्रास सुरू झाला, की त्रासाची तीव्रता वाढली?’ 

सरपंचबाई जरा विचार करून म्हणाल्या डॉक्टर विस्मरणाचा त्रास तसा तीनचार महिन्यांपासून आहे पण वयोमानानुसार होत असावा म्हणून आम्ही फार गांभीर्याने  घेतलं नाही. पण आता त्रास वाढला आणि त्यामुळे घरातील वातावरण सगळं बिघडायला लागलं त्यामुळे आम्ही ठरवलं, की आता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. म्हणून आज तुम्हांला भेटायला आले. त्यांना सांगितलं, की आजींना दवाखान्यात तपासणीसाठी  घेऊन यावं लागेल आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या tests कराव्या लागतील. त्याप्रमाणे काही दिवसांनी आजी आल्या. त्यांची प्राथमिक मानसिक तपासणी केल्यानंतर त्यांना Dementia म्हणजेच स्मृतिभ्रंश हा मेंदूचा विशिष्ट प्रकारचा मानसिक आजार झाला असावा असं निदान केलं. त्यानंतर MMSE, MRI Brain आणि इतर महत्त्वाच्या रक्ताच्या तपासण्या करूनही निदान पक्क केलं आणि पुढील उपचारांना सुरुवात केली. 

स्मृतिभ्रंश हा बघायला गेलं तर आजार नसून मेंदूमध्ये होणाऱ्या विशिष्ट लक्षणांचा एक समूह आहे; ज्यामध्ये स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि दैनंदिन कामे करण्याच्या क्षमतेमध्ये घट होत जाते. 

स्मृतिभ्रंशाची लक्षणे खालीलप्रमाणे दिसून येतात :

१ स्मरणशक्ती कमी होणे : अलीकडच्या काळातील घटना, आठवणी विसरणे परंतु खूप वर्षांपूर्वीच्या जुन्या काळातील घटना आठवणे. 

२ समस्या सोडवण्यात अडचण येणे : दैनंदिन कामे करणे कठीण होणे. 

३ नवीन गोष्टी लक्षात न राहणे, नवीन गोष्टी शिकून समजून घेण्यात अडचण येणे. 

४ एकाग्रता कमी होणे . 

५ मूळ स्वभाव किंवा व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होणे. 

ही लक्षणे जेव्हा नातेवाइकांना जाणवू लागतात त्या वेळी ते आपल्या रुग्णाला दवाखान्यात घेऊन जातात. पण स्मृतिभ्रंश हा आजार झालेला रुग्ण मनोविकार तज्ज्ञ किंवा मेंदूरोग तज्ज्ञाकडे यायला नेहमीप्रमाणेच बऱ्याच उशीर करतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर मेंदूच्या पेशींची झीज झाल्यामुळे स्मृतिभ्रंश हा आजार होतो असे म्हणायला काही हरकत नाही. मेंदूच्या पेशींची झीज ही साधारणपणे वयाच्या पन्नाशीच्या पुढे सुरू होते. परंतु झीज होण्याचा वेग, मेंदूच्या कोणत्या भागामध्ये झीज होत आहे, तसेच त्या व्यक्तीला इतर काही गंभीर आजार आहेत की नाही अशा काही महत्त्वाच्या घटकांवर स्मृतिभ्रंश या आजाराचे स्वरूप अवलंबून असते. 

स्मृतिभ्रंश या आजाराचे निदान जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्या रुग्णाला साधारणपणे कमीतकमी ६ महिने ते वर्षभरापूर्वीपासून विस्मरण होण्यास सुरुवात झालेली असते. म्हणजेच यांच्याकडे आलेल्या पेशंटच्या आजाराची तीव्रता दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवर पोहोचलेली असते. अशा वेळी उपचार सुरू करताना काही गोष्टी आपल्या सर्वांना माहिती असणे फार गरजेचे असते. एक म्हणजे मेंदूच्या पेशींची झालेली झीज आपल्याला पुन्हा भरून काढत येत नाही. कदाचित भविष्यामध्ये यावर संशोधन होऊन काही उपाय मिळू शकेल; परंतु सध्यातरी काही उपाय नाही. 

झीज होण्याचा वेग आणि प्रमाण कमी करण्यासाठी काही औषधोपचार सध्या उपलब्ध आहेत; त्यामुळे स्मृतिभ्रंश या आजाराचे जितक्या लवकर निदान होईल आणि उपचार सुरू होतील तितका पेशंटला फायदा होतो. 

स्मृतिभ्रंश असणाऱ्या पेशंटचे जे care takers असतात त्यांचीसुद्धा उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका असते. स्मृतिभ्रंश असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांनी घ्यावयाची काळजी खालीलप्रमाणे 

१ विस्मरणाच्या तीव्रतेनुसार रुग्णावर सावध लक्ष ठेवणे. 

२ रुग्णाच्या शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देणे. 

३ रुग्णाचा आहार साधा आणि संतुलित असावा. 

४ रुग्णाची सर्व औषधे वेळच्या वेळी द्यावीत, त्याचप्रमाणे आहारातील पथ्ये काळजीपूर्वक पाळावी. 

५ रुग्ण काही कारणाने घराबाहेर जाणार असेल तर त्यांच्या खिशात किंवा पिशवीमध्ये रुग्णाचे ओळखपत्र – ज्यामध्ये रुग्णाचे पूर्ण नाव, पत्ता त्याचप्रमाणे नातेवाइकाचे नाव, फोन नंबर आणि रुग्णाचे उपचार जिथे सुरू आहेत त्या दवाखान्याचे नाव ही माहिती असावी. त्याचप्रमाणे रुग्णाला स्मृतिभ्रंश हा आजार असल्याचे नमूद केलेले असावे. 

६ रुग्णाची नियमित वैद्यकीय तपासणी करावी आणि डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम आणि इतर activities काळजीपूर्वक करून घ्याव्यात. 

आतापर्यंत आपण स्मृतिभ्रंश या आजाराच्या लक्षणांची माहिती घेतली आणि आजार झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी काय करावे हेही बघितले. 

आता आपण बघू या स्मृतिभ्रंश होऊ नये किंवा मेंदू जास्तीत जास्त वर्षे कार्यक्षम राहावा आणि मेंदूची झीज होत असेल तर त्याचा वेग कमीत कमी असावा यासाठी काय उपाय करावे लागतील 

१ सर्वप्रथम आत्तापासूनच सर्वप्रकरचे विविध रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करावे. 

२ रोज  संतुलित आणि सात्त्विक आहार घ्यावा. 

३ सर्व प्रकारचे मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. 

४ फळे पालेभाज्या नियमित खाव्यात. 

५ रोज वयाला अनुसरून नियमित हलका व्यायाम करावा. 

६ नियमित वाचन करावे. 

७ मेंदूचे व्यायाम ज्याला आम्ही cognitive exercises म्हणतो ते करावेत. 

८ वर्षातून दोन वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व रक्ततपासण्या करून घ्याव्यात. 

९ एखादा छंद जोपासावा. 

१० आपल्या सवयीच्या गोष्टींपेक्षा वेगळे काहीतरी नवीन शिकावे. 

वर नमूद केलेले मेंदूचे व्यायाम किंवा cognitive exercises म्हणजे काय ते बघू या. स्मृतिभ्रंश हा मेंदूची झीज झाल्यामुळे होणार आजार आहे हे आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलेच आहे. त्यामुळे मेंदूचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे . आहारबद्दल आधी लिहिले आहेच, आता मेंदूचे व्यायाम बघू या. हे व्यायाम शारीरिक व्यायामपेक्षा  वेगळे असतात. घरच्या घरी करता येतील आणि फार काही खर्च होणार नाही असे हे व्यायाम आहेत. मेंदूची मुख्य कार्ये म्हणजे एकाग्रता, विचार करणे, स्मृती, परिस्थितीनुसार निर्णय घेणे आणि निर्णय अमलात आणणे यावर काम करणारे व्यायाम असतात. 

१ वेगवेगळ्या रंगांच्या, प्रकारांच्या डाळी (उदा. तूर डाळ, मसूर डाळ, हिरवे मूग इत्यादी ) थोड्या थोड्या प्रमाणात एकत्र एक ताटात घेणे आणि डाळींच्या प्रकारानुसार किंवा रंगानुसार त्यांची विभागणी करणे. 

२ कपाटातील कपडे रंगानुसार किंवा कापडाच्या प्रकारानुसार लावणे 

३ खेळण्याचे पत्ते :- एका ठरावीक क्रमाने चढत्या किंवा उतरत्या क्रमाने पत्ते लावणे, रंगानुसार लावणे, पत्त्यांमधील sequence किंवा patience हा खेळ खेळणे. 

४ ज्येष्ठ नागरिकांचा सर्वसामान्यपणे एक दिनक्रम ठरलेला असतो. दैनंदिन कामांचा क्रमसुद्धा ठरलेला असतो; पण दर महिन्यात एक आठवडा हा सर्व क्रम बदलायचा. सर्व कामे जितकी शक्य आहेत तितकी उलट्या क्रमाने करायची. 

५ वर्तमानपत्रांमध्ये येणारी शाब्दिक कोडी, गणिताची कोडी सोडवायची. 

६ एखादी नवीन भाषा किंवा नवीन लिपी शिकायची. 

७ मोबाइलचा वापर आवश्यकतेनुसार थोडा वेळच करायचा. 

वरील उपाय वाचून तुमच्या मनात आल असेल, की अरे, ही असले कसले व्यायाम आहेत? तर या सर्वांचा  मूळ हेतू हा  मेंदूची कार्यक्षमता वाढवणे, माहिती ग्रहण करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि त्यानुसार काम करण्याची क्षमता वाढवणे हा आहे. आपण रोज एकाच क्रमाने ठरावीक कामे करत असू; तर ती आपण यंत्रवत करत राहतो; पण त्यामध्ये बदल केल्यानंतर मेंदूला आव्हान मिळते आणि आपल्याला आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेची  कल्पना येते. 

Dementia किंवा स्मृतिभ्रंश यावर जितके जास्त प्रतिबंधात्मक उपाय योजता येतील तितके करणे आपल्यासाठी फायद्याचे असते  कारण स्मृतिभ्रंशाची तीव्रता जसजशी वाढत जाते तसतशी मेंदूची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. स्मृती जाते म्हणजे फक्त आपल्या आयुष्यातील व्यक्ती किंवा घटना यांचे विस्मरण होते इतका हा आजार उथळ किंवा सोपा नाही. मेंदूमधील सर्व माहितीची, ज्ञानाची झीज होत जाते. मेंदू हळूहळू प्रत्येक स्मृती, प्रत्येक कार्य विसरायला लागतो. शारीरिक क्रियासुद्धा मेंदूमधून delete किंवा नष्ट व्हायला लागतात. अगदी शेवटच्या पायरीला अन्नपचन, हृदयक्रिया, श्वसनक्रिया यांचे विस्मरण होऊन व्यक्ती मृत पावते. वाचताना असा शेवट भयावह वाटतो आणि आम्हांला रुग्णांच्या नातेवाइकांना हे सगळं समजावून सांगणे फार कठीण असते. म्हणूनच आपण आपल्याला स्मृतिभ्रंश होऊ नये याची पुरेपूर काळजी घेणे फार आवश्यक आहे आणि दुर्दैवाने ज्यांच्या घरामध्ये या आजाराचे रुग्ण आहेत त्यांनी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या रुग्णाची काळजी घ्यावी. तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा योग्य वेळेत योग्य खबरदारी घ्यावी. 

Author

Leave a Reply