पुनरपि जननं : भाग ११

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. 

ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :

हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली.  तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल. 

एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल. 

जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’  या नावाने केले आहे. हे भाषांतर   क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण अकरावे.  

 – संपादक

भाग दुसरा : प्रकरण अकरावे

प्रवास

अवकाशाच्या शून्यात… निर्गुण, निराकार पोकळीत! ते अवकाशयान, आकाशगंगेच्या ताऱ्यांमधील अंतरांच्या प्रचंड रिकाम्या जागेत एक इवलासा कण आणि अशा अब्जावधी आकाशगंगा. अंतराळ… ते कुणाचेच नाही आणि कशालाच स्पर्शत नाही… थंड… अंधारे… निराकार…निर्गुण…

परंतु स्पंदन करणारी सोळा हृदयं आणि जाणीव असणारी सोळा मनं, बुद्धिमान जीवनाचे पोषण करणाऱ्या एकमेव ज्ञात ग्रहाकडून जीवन निर्माण करणाऱ्या एकमेव ज्ञात ग्रहाकडे निघाली होती. तो प्रवास सुरू झाला होता. आता माघार शक्य नव्हती.

पृथ्वी सगन्धा सरसास्तथापः 

स्पर्शी च वायुर्ज्वलितं च तेजः।

नभः सशब्दं महता सहैव, 

कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्।।(गंध हा पृथ्वीचा गुण आहे, वाहणे हा पाण्याचा गुणधर्म आहे, स्पर्श हा वायूचा, जळणे हा अग्नीचा आणि ध्वनि हा आकाशाचा गुण आहे. हे सगळे भव तापाचे हरण करतात. त्यांना सकाळी माझा नमस्कार असो.)

मी माझं मन शांत करण्याचा प्रयत्न करते. अवकाशयानाच्या प्रचंड गतीमुळे मी माझ्या खुर्चीला चिकटून बसले आहे आणि मला हलता येत नसल्यामुळे मला डोळे पुसता येत नाहीत. माझ्या निर्णयाची आणि आमच्या प्रवासाची व्यापकता आता जाणवते आहे. आम्ही केवळ अगदी तरुण मुलामुलींचा एक गट आहोत आणि यापूर्वी कोणीही कधीही न केलेल्या प्रवासाला आम्हांला पाठवले आहे. पपाने जेव्हा या मोहिमेवर टीका केली होती तेव्हा बरोबरच होतं त्याचं म्हणणं. कुठून मी या मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला आणि अकादमीत घालवलेल्या वर्षांत कोणत्याही सामान्य मुलीपेक्षा अधिक शिकण्यासाठी दमछाक करून घेतली! पपा नेहमीच म्हणतो, की आनंदी आयुष्यासाठी माणसाने सामान्य महत्त्वाकांक्षाच बाळगाव्यात; पण माझ्यात माझ्या आईच्या जीन्स आहेत. उत्तुंग महत्त्वाकांक्षा हाच तिचा स्वभावधर्म आहे. ही धाडसाची बेपर्वा हौस तिच्या गर्भातूनच माझ्यात आली आहे. माझा जन्म नैसर्गिकरित्या झाला आहे. आईच्या पोलादी नसा माझ्यात उतरल्या आहेत आणि त्या मला बळ देतील.

—————————————————————————————————————-


अर्धा तास उलटून गेला आहे आणि आम्ही स्वर्गाच्या आकर्षण शक्तीतून बाहेर पडलो आहोत. आम्ही आता अंतराळात आहोत आणि इथे गुरुत्वाकर्षण शून्य आहे. आम्ही कपडे बदलून साधा पोषाख करतो आणि हातपाय मोकळे करतो. मी माझ्या छोट्याशा कप्प्यातून बाहेर पडणार इतक्यात माझी दृष्टी आईने दिलेल्या लाकडी फोटो फ्रेमवर पडते. मला तिचा हसरा चेहरा दिसतो. तीन वर्षांच्या मला तिने त्या फोटोत कडेवर घेतलं आहे. मी तिच्या चेहऱ्याकडे बघत राहते आणि मला आश्वस्त वाटतं. मला माहीत आहे, की ती आत्ता माझाच विचार करत आहे, कदाचित तिच्या भिंतीवरच्या पडद्यावर ती हाच फोटो पाहते आहे.
अवकाशयानातील माझ्या सहकाऱ्यांची वास्तपुस्त करायला मी बाहेर येते. आम्ही सगळे यानाच्या मध्यवर्ती कप्प्यात येऊन काहीबाही बोलत राहतो. वास्तवाच्या जाणिवेने आम्ही सगळेच थोडे हादरलो आहोत आणि परिस्थितीचं ओझं हलकं करायचा प्रयत्न करतो आहोत. पुढचे दोन महिने आमचा दिनक्रम जवळजवळ सामान्यच असेल. आम्ही नेहमीप्रमाणेच व्यायाम आणि प्राशन करत राहू. त्यानंतर आमच्या शरीरांतील चय अपचय क्रिया संथ केल्या जातील आणि आम्ही गाढ झोपेत शिरू. पुढचे नऊ महिने आम्ही त्या सुप्त स्थितीत राहू आणि पृथ्वीकडे जाण्याच्या शेवटच्या महिन्यात आम्ही पुन्हा जागृतावस्थेत येऊ. मला मनातून धाकधूक वाटते आहे आणि तरीदेखील मी उत्साही आहे.
आमचं अवकाशयान स्वर्गाभोवती प्रदक्षिणा घालतं आहे. दर नव्वद मिनिटांनी ते स्वर्गाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतं आहे. पुढचे आठ दिवस आम्ही या कक्षेत राहू. त्या अवधीत आमच्या शरीरांना गुरुत्वाकर्षणाच्या अभावाचा सराव होईल. त्यानंतर स्वर्गाच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने यान पृथ्वीच्या दिशेने करण्याच्या दीर्घ प्रवासाच्या दिशेने झेप घेईल. एका खिडकीजवळ जाऊन मी बाहेर डोकावते. अवकाशात अंधार आहे. खाली मला स्वर्गाची जमीन पसरलेली दिसते आणि वस्ती असलेला भाग दिव्यांनी आकारलेला दिसतो. ग्रहाचे विस्तीर्ण भाग अंधारातच आहेत. तिथे समुद्र आहेत. त्यात पोहणारे मासेदेखील पृथ्वीवरूनच आले, आम्हां मानवांसारखे; पण त्यांना ते माहीत नाही. पृथ्वीवर परत जाण्यातदेखील त्यांना रस नाही. स्वर्गाचं चुंबकीय तेज पलीकडच्या अवकाशापासून त्याचा गोलाकार ठळकपणे आखलेला दाखवतं आहे. स्वर्गाच्या परिघापलीकडे मला तारे दिसत आहेत, तेजस्वी आणि स्थिर. लहानपणी आईच्या मांडीवर बसून रोज रात्री मी पाहिले ते हे तारे आहेत का?

तिथे, रस्त्यांच्या प्रकाशित ओळींच्या मध्ये कुठेतरी, शांत एडन गाव आहे आणि तिथे एका पलंगावर आई झोपलेली असेल. अस्वस्थ होऊन ती विचार करत असेल, की तिची एकुलती एक लेक, तिच्या पोटातून जन्मलेली, दूर कुठेतरी ताऱ्यांच्या मध्ये गेली आहे. फारच उदास वाटायला लागण्यापूर्वी मला कुणाशी तरी बोलायला हवं.

कुठल्याशा चवदार पेयाची बाटली हातात घेऊन एड्डी उभा आहे.

“तुला हवं का थोडं?” तो मला विचारतो.

आम्हांला चोच असलेल्या सिप्परमधून किंवा नळी घातलेल्या बंद बाटलीतून पेय प्यावं लागतं कारण यानात गुरुत्वाकर्षण शून्य असल्यामुळे ग्लासात पेय ओतता येत नाही. अवकाशासारख्या परिस्थितीत पेय पिण्याचा आम्ही अनेक महिने सराव केला आहे; पण आता ताज्या फळांचा रस काढताना येणार सुवास आणि ग्लासात पेय ओतताना येणारा सुगंध आठवून मी बेचैन होते. एड्डीबरोबर मी थोडा वेळ गप्पा मारते.
तो आकानिष्ठा खोऱ्यातून आला आहे आणि पृथ्वी मोहिमेसाठी निवड होण्यापूर्वीच त्याने जीवशास्त्र तज्ज्ञ होण्याचं ठरवलं होतं. तो आणि युइआ या मोहिमेत आमच्या आरोग्याची काळजी घेतील… आमच्या शरीरांना तशी आवश्यकता वाटलीच तर. जुन्या काळातील डॉक्टरांसारखंच काम आहे त्याचं.
माणसं जेव्हा पृथ्वीवर राहत होती तेव्हा सारखी आजारी पडायची. आयुष्यात कधीच आजारी न पडलेली कोणी व्यक्ती तेव्हा नव्हतीच. आजारी पडल्यावर लोक डॉक्टरकडे जात आणि त्यांचे आजार बरे करण्यासाठी डॉक्टर त्यांना औषधं देत. माणसाच्या शरीरात जो काही बिघाड झाला असेल तो औषधांनी बरा करण्याचा प्रयत्न करत. तेव्हा सगळेच नैसर्गिकरित्या जन्मलेले असल्याने आणि तेव्हा त्यांच्याकडे आईच्या गर्भात असतानाच बाळाची तब्येत तपासण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान नसल्याने कधीकधी कमकुवत शरीरं असलेली बाळं जन्माला येत. प्राचीन मनुष्यांना त्यांच्या आयुष्यात प्रतिकारशक्ती वाढवणारे बुस्टर डोस मिळत नसत आणि त्यामुळे आजारांपासून त्यांना संरक्षण नसे. जीवशास्त्राच्या त्या प्राथमिक अवस्थेत लोक अकालीदेखील मरण पावत. मला नेहमीच प्रश्न पडतो, की आपण कधी आणि कसं मरणार हे माहीत नसताना त्या काळात लोक आपल्या आयुष्याची आखणी कशी करत असतील?
अर्थात त्या काळी लोकांचं जीवन खूप वेगळं होतं. त्यांची बहुतेक शक्ती अन्न आणि निवारा यांची तरतूद करण्यातच जात असे. फार कमी लोक काही कलात्मक निर्मिती करत.

रात्री मला नीट झोप लागत नाही. कुणालाच लागत नाही. आमचे बिछाने आरामशीर नाहीत असं नाही; पण जागा अडचणीची आहे. हळूहळू आम्हांला त्याची सवय होईल. दुसरा दिवस पहिल्या दिवसापेक्षा लवकर जातो. अवकाशयानात करायची आमची नेमून दिलेली कामं आहेत. दर तीस मिनिटांनी प्रकाशित होणाऱ्या काचेच्या कप्प्यात आम्ही आळीपाळीने उन्ह खातो; शिवाय आम्हांला यानात करण्याचे प्रयोग आहेत आणि यान सगळ्या आज्ञा व्यवस्थित पाळतं आहे की नाही हे तपासण्यासाठी करावयाच्या चाचण्या आहेत. आमचे दळणवळण तज्ज्ञ ज्युलिएटा आणि एन कियांबी आकाशगंगा प्रवासकेंद्रातील मुख्यालयाच्या कायम संपर्कात आहेत. सध्यातरी आमच्या मोहिमेत सर्व काही सुरळीत चालू आहे.

आधीपासूनच ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आम्ही झोपतो आणि उठतो. शरीराचं झोप आणि जागृती यांचं चक्र नियमित करायला आवश्यक असणारी काळाची सामान्य गती आम्हांला इथे जाणवत नाही. एडनमध्ये आता किती वाजले असतील याचं गणित सारखं सारखं करून माझं मन कंटाळलं आहे. कोणत्याही वेळी आता आई, पपा आणि माझे मित्रमैत्रिणी काय करत असतील याचाच मी विचार करत असते.

यानात माझं मुख्य काम म्हणजे यानाच्या गतीचा जो कॉंप्युटेशनल डाटा असतो त्याचा अर्थ लावणे; शिवाय इतर लोक यानात जे प्रयोग करत आहेत त्यांचं वर्गीकरण करणे आणि त्यांची नोंद ठेवण्याचंदेखील काम आहे. हे सगळं काम नेहमीचं, अंगवळणी पडलेलं काम आहे. त्यात आव्हानात्मक असं काही नाही. यानातली सगळी यंत्रणा नवीन आहे आणि उत्तम स्थितीत आहे. त्या यंत्रणेचा डाटा कॉंप्यूट करण्यासाठी मला डोक्याला ताण द्यावा लागत नाही.
माझा बहुतेक रिकामा वेळ मी खिडकीतून बाहेर बघण्यात आणि खाली दिसणाऱ्या स्वर्गाच्या प्रचंड गोलाकाराचं निरीक्षण करण्यात घालवते. दर नव्वद मिनिटांनी दिसणाऱ्या रवी उदयाने मी मंत्रमुग्ध झाले आहे. लहान असताना एकदा मी कसा रडून आकांत केला होता ते मला आठवतं. रवी अस्त बघायला मला एकदा एडनमधल्या आमच्या घराजवळच्या टेकडीवर जायचं होतं. माझे आई पपा कामात होते आणि आम्ही टेकडीवर जाईपर्यंत रवीचा अस्त होऊन गेला होता. काय मी पाय आपटून रडले होते तेव्हा! रविअस्त परत व्हायला पाहिजे, रवीला परत वर आणून मी बघत असताना त्याने अस्त व्हायला पाहिजे म्हणून मी हट्ट केला होता. माझ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या कार्टून फिल्मसारखं. आज मला हवे तितके रविअस्त पाहायला मिळताहेत.

किती पटकन आम्ही आमच्या ग्रहाभोवती फेरी मारतो आहोत! जेव्हा आम्ही त्याच्या पृष्ठभागावर असतो तेव्हा थोडं अंतर जायलासुद्धा झिप्पर किंवा विमान लागतं. आणि आमचं उडणं तर फक्त गावापुरतं मर्यादित असतं आणि तरीही आम्हांला वाटतं, की किती प्रवास केला आपण! आपल्या ग्रहाविषयी योग्य परिप्रेक्ष्य बाळगण्यास अवकाश यात्रेची आवश्यकता असते.

यानाच्या गोलाकार खिडकीशेजारी मी बसलेली असताना अग्नॉन येऊन माझ्या समोर बसतो.

“इतकं लक्षपूर्वक काय पाहतेस तू आरुषी?” तो हसून विचारतो. त्याचं हसणं फार प्रसन्न आहे आणि तो हसतो तेव्हा त्याचे डोळेदेखील चमकतात.

“काही नाही, आपला जुनाच ग्रह,” मी फार विचार न करता उत्तर देते.

“आपण जिकडे जातो आहोत तो ग्रह जास्त जुना आहे,” तो मजेत म्हणतो.

“हो, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, जाऊ दे!”

“आपल्याला तिथे काय दिसेल याबद्दल तुझं काय मत आहे? तू त्याबद्दल विचार केलाच असशील,” तो मला बोलतं करायला म्हणतो.

त्याबद्दल मी रोज विचार करते, रात्री झोपायचा प्रयत्न करताना, म्हणजे दर सोळा तासांनी जेव्हा आम्ही रात्र झाली आहे असं मानतो तेव्हा.

“वैराण जमीन, बहुतेक भागांत. कुठे कुठे झाडांचे पुंजके, कदाचित. काही सूक्ष्म जीवाणू किंवा कीटक,” मी उत्तर देते.

“हं. पण प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचं काय? तू तेच शोधणार आहेस ना?”

“हो. पण ते कितपत शाबूत राहिले असतील शंकाच आहे. लक्षात आहे ना, एक हजार वर्षं होऊन गेली आहेत.”

“कोण जाणे? काहीतरी विशेष सापडावं आपल्याला.”

आमच्या पथकातील दोन मेकॅनिकल इंजिनियर्सपैकी अग्नॉन एक आहे. आम्ही पृथ्वीवर जी काही सामग्री वापरू ती सगळी तयार करणं आणि तिची देखभाल करणं हे त्याचं काम आहे. अकादमीत असताना अग्नॉनने आण्विक शास्त्राचा (molecular science) पण अभ्यास केला आहे.

“या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय तू का घेतलास, आरुषी?”

“अवकाशाबद्दल मला कायमच आकर्षण वाटत आलं आहे आणि उन्नयनपूर्व इतिहासात मला विशेष रस आहे. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होणं हाच योग्य निर्णय वाटला मला.”

“आणि तरीपण तुझी निवड सर्वात शेवटी झाली. मला खूप छान वाटलं तू आमच्या बरोबर आहेस म्हणून, ” तो हसत म्हणतो.

“तू कोणत्या कारणासाठी सहभागी झालास?” मी त्याला विचारते.

“साल्चर म्हणतो त्याप्रमाणे मला त्या मूलभूत प्रश्नात रस आहे; शिवाय त्या प्राचीन ग्रहाचं मला आकर्षण आहे. का ते सांगता येत नाही.”

आमच्यापैकी प्रत्येकाचं या मोहिमेत सहभागी होण्याचं वेगळं कारण आहे आणि तरीदेखील ही कारणं मोघमपणे एकमेकांशी जोडलेली आहेत. जणूकाही आमच्या हृदयांत मायेचा स्फुल्लिंग रुजवून पृथ्वीने आम्हां सर्वांना पाचारण केलं आहे.

ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मी व्यायाम करते आणि ऊन्ह खाते. यानातील उपकरणं आणि जमिनीवरील जीवशास्त्रज्ञ आमच्या शरीरांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. नऊ महिन्यांच्या सुप्तावस्थेसाठी ते आमची तयारी करून देत आहेत. यानाच्या वजनरहित अवस्थेत माझे लांब केस विंचरणं कठीण जातं. माझ्या चेहऱ्याभोवती एक सोनेरी आभा असल्यासारखे ते तरंगतात. त्या तरंगणाऱ्या केसांचं वलय असलेल्या माझ्या चेहऱ्याची मी एक सेल्फी घेतली आहे आणि ती आईला पाठवून दिली आहे. तिने निरोप पाठवला आहे, की इथे येऊन माझे केस विंचरून छानसं पोनिटेल घालून द्यावं असं तिला वाटतं आहे. पथकातील बहुतेक इतर मुलींचे केस आखूड आहेत. मोहिमेत निवड झाल्यावर निर्देशकांनी सुचवल्याप्रमाणे केस कापायला मी नकार दिला होता. पथकातील शेवटची सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल त्यांचा सूड घेण्याचा तो माझा प्रयत्न होता. एक लहानशी निरुपद्रवी अवज्ञा जिचा त्यांच्यापेक्षा मलाच जास्त त्रास होणार होता.
अकादमीतल्या वर्गासारखी हळूहळू आमच्यात मैत्रीची नाती निर्माण होताहेत. आम्ही एकमेकांची चेष्टा करतो, खेळ खेळतो आणि झोपण्यापूर्वी एकत्र बसून गाणी म्हणतो. संघशक्ती निर्माण करण्याच्या या खातरीच्या पद्धती आहेत. आम्हांला एकमेकांविषयी आपुलकी वाटावी यासाठी प्रकल्पाच्या केंद्रीय मंडळाने आणि आकाशगंगा प्रवास केंद्रातील त्यांच्या सल्लागारांनी मिळून अनेक क्लृप्त्या योजल्या आहेत. आम्ही जेव्हा पृथ्वीवर उतरू तेव्हा ही मैत्री आम्हांला उपयोगी पडेल. अडचणीची जागा आणि एकांत मिळणे कठीण असूनदेखील आमच्यापैकी काही जणांनी एकत्र झोपायचा प्रयत्न केला आहे. मला त्यात रस नाही. इतक्यात ते शक्य नाही. अजून कुणा मुलाशी माझी तितकी जवळीक झालेली नाही; शिवाय जयंतने केलेला माझा अव्हेर मी अजून विसरलेली नाही. जयंतची आठवण येते मला कधीकधी.

—————————————————————————————————————

स्वर्गाचे गुरुत्वाकर्षण आम्हांला बृहत अंतराळात फेकेल त्या प्रक्रियेला आता केवळ पंचवीस तास उरले आहेत. मुख्यालयाशी होणारे आमचे दळणवळण मग अधिकाधिक संथ होत जाईल. त्यानंतर आमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी यांच्याशी आम्हांला वैयक्तिक निरोपांची देवाणघेवाण करता येणार नाही. गेल्या आठवड्यात उड्डाण केल्यापासून मी आई आणि पपाला रोज संदेश पाठवते आहे आणि त्यांची उत्तरंही नियमित माझ्यापर्यंत पोचत आहेत. आई नेहमीप्रमाणेच काळजी करते आहे आणि सूचना देते आहे. अंतराळ प्रवासाचा तिला अनुभव नाही आणि तरीही माझ्यापेक्षा तिला त्यातील जास्त कळतं असं तिला वाटतं. मी माझ्या अंतराळातील प्रवासाचा मजेत आनंद घेते आहे असं सांगून मी तिची काळजी कमी करण्याचा प्रयत्न करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पपादेखील उत्साहात आहे. खूप उत्सुकतेने तो मला माझ्या अनुभवांबद्दल विचारत असतो. पृथ्वीच्या दिशेने आमचा वक्राकार प्रवास सुरू झाला, की हे सगळं थांबेल. मग ताऱ्यांचा प्रकाश ग्रहण करणारे अंतराळयानाचे प्रचंड अँटीना उघडतील आणि ताऱ्यांच्या ऊर्जेचा उपयोग करू लागतील. आम्ही गाढ झोपेत शिरू आणि पुढचे नऊ महिने आम्हांला ऊन्ह खाण्याची किंवा प्राशन करण्याची गरज पडणार नाही. प्रवासाच्या त्या टप्प्यात, साधारण दोन महिन्यांनंतर, आम्ही रवीचे तारामंडळ ओलांडून ताऱ्यांच्या मधील अवकाशातून प्रवास सुरू करू.

आज मी सारखी खिडकीपाशी बसून आहे. ज्युलिएटा म्हणाली, की मी शक्य तितका आपल्या ग्रहाचा चेहरा माझ्या डोळ्यांनी पिऊन घेते आहे. पुढची तीन वर्षं आपला ग्रह दिसणार नाही याचं ज्युलिएटाला फारसं काही वाटत नाही. ती शीघ्रगामी आहे. अकादमीत असताना तिने एकापाठोपाठ एक असं दोन मुलांशी नातं जोडलं होतं. तिने अकादमीत ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी तिचे आईवडील विभक्त झाले आणि ती म्हणते, की ते दोघे त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. ज्युलिएटाला आईवडिलांचा फारसा लळा नाही. तिच्या पूर्वीच्या मित्रांचाही नाही. ती खेळात पटाईत आहे आणि तिचं शरीर खूप लवचीक  आहे. तिने मार्शल आर्ट्सचे एकदोन हात मलाही शिकवले आहेत.

एखाद्या विस्तीर्ण निळ्या समुद्रासारखा स्वर्ग खाली पसरला आहे. इतक्या अंतरावरून मला जमीन आणि पाणी यांतला फरक दिसत नाही आणि भूखंडांचे आकारही दिसत नाहीत. पण मला ते मॉनिटरवर पाहता येतात. आमचं यान ग्रहाच्या ज्या भागावरून चाललं असेल त्याचा तपशील मॉनिटरवर दिसतो.
एडन आणि पपा राहतो त्या स्टारव्हिलेवर पहाट होते आहे. पपा आणि आई उठले असतील. अकादमीतले माझे मित्र आणि मैत्रिणी उत्तर भूखंडात अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. ते काळाच्या वेगवेगळ्या पट्ट्यांत असतील. काहींच्यासाठी आता रात्र आहे आणि इतर काहींच्यासाठी दिवस. मी काळाच्या वर आहे. मला पहाट आणि रविअस्त काही मिनिटांच्या अंतराने दिसतात. लवकरच माझ्यासाठी काळाचं अस्तित्वच उरणार नाही. माझं मन झोपून जाईल आणि माझ्या दृष्टीने काळाची गती संथ होईल. मी त्या झोपेतून उठेपर्यंत आईसाठी पाच वर्षं उलटून जातील; पण त्या अवधीत माझं शरीर फक्त एका वर्षाने मोठं होईल. कधीकधी, हे सगळं समजून घ्यायला डोक्याला फार ताण द्यावा लागतो. एकमेकींच्या इतक्या जवळ असणाऱ्या दोन व्यक्तींसाठी काळाची गती वेगवेगळी कशी असू शकते? आम्ही दोघी जेव्हा एकाच घरात राहत होतो, तेव्हा कोणती वेळ आहे हे आईच ठरवत असे. उठायची वेळ झाली असं ती म्हणाली, की मी उठत असे. झोपायची वेळ झाली म्हणाली, की मी झोपायला जात असे. संध्याप्राशनाची वेळ झाली असं ती म्हणाली, की आम्ही प्राशन करत असू.

झोपायला जाण्यापूर्वी आम्ही सगळे एकत्र जमतो. आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याबद्दल आम्ही तो दिवस साजरा करतो. आम्ही सगळे एक मिनिट शांतता पाळतो आणि आमची बुद्धी, आमची उत्क्रांती आणि आमच्या मनाला चालना देणाऱ्या शक्तींवर मन एकाग्र करतो. उद्या उठल्यावर आम्ही आमच्या ठरावीक वेळी ऊन्ह खाण्याच्या, व्यायाम करण्याच्या आणि प्राशन करण्याच्या दिनचर्येचं शेवटचं आचरण करू. मग सुप्तावस्थेत जाण्यासाठी घेण्याच्या औषधांचे डोस सुरू होतील. एकेका तासाच्या अंतराने, एकामागून एक, आम्ही सगळे सुप्तावस्थेत जाऊ. अवकाशयान आता स्वयंचलित अवस्थेत गेलं आहे. यानात करायचे आमचे सगळे शास्त्रीय प्रयोग पूर्ण झाले आहेत, त्यांची नोंद करून ठेवलेली आहे आणि ती माहिती मुख्यालयाला पाठवून दिलेली आहे. साहसापूर्वीच्या विश्रांतीसाठी आम्ही तयार आहोत.

त्या रात्री आई माझ्या स्वप्नात येते. तिला तिचं ते भीतिदायक स्वप्न पडलेलं असतं. माझ्या स्वप्नाच्या आत स्वप्न असतं. स्वप्नात मी पृथ्वीवर उतरते आणि आई आधीच तिथे असते. अकादमीतले माझे मित्र इव्हान आणि काईटो पण तिथे असतात. एका क्षणी आम्ही स्वर्गासारख्या वातावरणात असतो. दुसऱ्याच क्षणी आम्ही कुठल्यातरी विनाशकारी संकटापासून जीव वाचवून पळत असतो. रात्रभर मला स्वप्नं पडत राहतात आणि सगळ्या स्वप्नात माझी भावनिक गुंतवणूक असते. मी जागी होते तेव्हा मला थकून गेल्यासारखं वाटतं. आम्ही आमच्या नावांच्या आद्याक्षराप्रमाणे सुप्तावस्थेत जाणार आहोत. त्यामुळे औषध घेण्याचा माझा दुसरा नंबर आहे. मी ऊन्ह खाण्याच्या दालनात जाते आणि आमच्या ताऱ्याचा प्रकाश एकदा शेवटचा अनुभवते. आम्ही स्वर्गाची कक्षा आधीच सोडली आहे आणि इथून आता आमचा ग्रह दिसत नाही. मी यानाच्या मुख्य दालनात परत येते, औषध घेते, त्वचेवर लावण्याचा पॅच लावते आणि शुभरात्री म्हणत सगळ्या सहप्रवाशांचा निरोप घेते. मग मी एक प्रकारचे द्रव भरलेल्या झोपण्याच्या पिशवीत शिरते आणि डोळे बंद करते. हळूहळू माझ्या शरीराला पेंग येत असल्याचं आणि माझं मन मिटत चालल्याचं मला जाणवतं.

————————————————————————————————————–

आरुषीची आई जागी झाली तरी तिला अस्वस्थ वाटत होतं. नुकतीच ती कशीबशी घरात धडकली होती आणि लहानगी आरुषी भिऊन एका कोपऱ्यात थरथरत असलेली तिला सापडली होती. अंधाराला भ्यालेली, एकाकी आणि तहानलेली. ती गडबडीने पुढे झाली होती आणि आपल्या बाळाला तिने उचलून घेतलं होतं… आणि तिला जाग आली होती. तिला परत स्वप्नात जायचं होतं, तिच्या छोट्या लेकीला आश्वस्त करायचं होतं, तिला काहीतरी पेय पाजायचं होतं, दिवे लावून तिला घाबरवणारा अंधार नाहीसा करायचा होता. पण आता तर ती जागी झाली होती. तिच्या जागृत मनाला माहीत होतं, की वास्तव खूप वेगळं आहे. आरुषी आता मोठी झाली होती आणि अकादमीतलं शिक्षण तिने पूर्ण केलं होतं. खरंतर तिला आरुषीला कधीच भ्यालेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत अंधाऱ्या घरात एकटं सोडून जावं लागलं नव्हतं. ते केवळ एक स्वप्न होतं. स्वप्नातली परिस्थिती कधीच अस्तित्वात नव्हती आणि तरीही, तिच्या मनाच्या एका भागात तिला परत स्वप्नात जाऊन तिथली परिस्थिती नीट करायची होती.

आरुषीची आई अंथरुणातून उठली आणि न्हाणीघरात गेली. परत आल्यावर तिने वेळ पाहिली. पहाटेचे तीन वाजले होते. काही निरोप तर आलेला नाही हे पाहण्यासाठी प्रतिक्षिप्त क्रियेने तिने आपला कॉम तपासला. कोणताच संदेश आलेला नव्हता, त्या अर्थी यानात सगळं ठीक चाललेलं होतं. आतापर्यंत आरुषी सुप्तावस्थेत गेली असेल. नऊ महिन्यांची झोप, गर्भावस्थेत तिच्या पोटात घालवलेल्या नऊ महिन्यांसारखी. आईने आपल्या पोटावर हात ठेवला. छे! तिच्या पोटात असताना तिचं बाळ काही नुसतं झोपून नव्हतं. ती वाढत होती, शक्ती मिळवत होती आणि आपल्या आईच्या भावना जगत होती. तिला आपलं गरोदरपण चांगलं आठवत होतं. शारीरिक अवघडलेपण आणि थोडीशी लाज या विचित्र गोष्टी सोडल्या तर आपल्या शरीरात एका दुसऱ्या जीवाचं असणं तिला आवडलं होतं. 

ती आपल्या झोपायच्या खोलीतून बाहेर आली आणि हळूहळू पायऱ्या चढून छतावरच्या गच्चीत आली. अजूनही डोळ्यांवर झापड असल्याने तिला उडणं शक्य नव्हतं. गच्चीच्या मधोमध असलेल्या हिरवळीच्या बेटाजवळ येऊन ती एका खुर्चीवर बसली. 

वर आकाश ताऱ्यांनी खच्चून भरलं होतं. त्या विस्तीर्ण दिव्यमंडलात कुठेतरी एक इवलसं अवकाशयान पृथ्वीच्या दिशेने चाललं होतं आणि तिचं बाळ त्यात निश्चिंतपणे झोपलेलं होतं. आरुषीची आई त्या गडद आकाशाकडे पाहत राहिली.

_______________________________________________________________________________________________

काईजाचा कॉम वाजला तेव्हा तो सामानाची बांधाबांध करत होता. त्याच्या स्क्रीनच्या भिंतीने उघडझाप केली आणि अमरचा चेहरा तिच्यावर झळकला. 

“काईजा मित्रा, अभिनंदन! आज प्रक्षेपण आहे हे तू मला सांगितलंच नाहीस. मी आलो असतो ना बघायला.”

“हॅलो अमर. थॅंक्स, पण मला वाटलं तू कामात असशील. तू काय बाबा, तुझ्या प्रकल्पाचा मोठा शास्त्रज्ञ आहेस.”

“काय रे काईजा! तुझ्या मोहिमेत मला रस आहे हे तुला माहिती आहे; शिवाय आता आम्ही मोडीत निघालेली टीम आहोत. पृथ्वीवर जाणारं पथक यानात बसून निघून गेलं आहे. आम्ही आता आवराआवर करतो आहोत. आता लवकरच नवीन टीम प्रकल्पावर रुजू होईल. ते लोक यानाच्या प्रवासावर लक्ष ठेवतील आणि परतीच्या प्रवासात पथकाशी संपर्क साधतील. पण आपण माझ्याविषयी कशाला बोलतोय? मला तुझ्या प्रकल्पाविषयी सांग. त्यावर नीट चर्चा करायला आपल्याला वेळच मिळाला नाही.”

“अमर, तू उद्या गुरुत्वकण प्रयोगशाळेत का येत नाहीस? मी आज इथून निघतो आहे आणि मध्यरात्रीपर्यंत प्रयोगशाळेत पोचेन. मग आपण निवांतपणे चर्चा करू. अर्थात तुला वेळ असेल तर.”

“मी नेहमीच वेळ काढू शकतो आणि कृष्णविवर मोहिमेचा तपशील समजून घ्यायला मी खरंच उत्सुक आहे. भेटू या उद्या संध्याकाळी.”

दुसऱ्या दिवशी जेव्हा अमर गुरुत्वकण प्रयोगशाळेत पोचला तेव्हा तिन्हीसांजा झाल्या होत्या. उडणारं कुणीच आकाशात नव्हतं आणि डझनावारी तरंगणारे दिवे बाहेर आले होते. काईजाने त्याच्या घराच्या गच्चीवर प्राशनासाठी टेबल आणि खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. 

“व्वा काईजा! तू काही आता विसरभोळा शास्त्रज्ञ उरला नाहीस. मला येऊन तुला तुझ्या एकलकोंडया गुहेतून बाहेर काढावं लागायचं, आठवतं? तू आता आतिथ्य करण्यात पटाईत व्हायला लागला आहेस.”

काईजा गंभीरपणे हसला. 

“तू स्वतःकडे पण बघ. तू ही बदलला आहेस. आता काही तू उच्च पदावरची नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी तोलणारा व्यग्र शास्त्रज्ञ राहिला नाहीस.”

“हो, आयुष्यातलं ते पर्व संपलं आता. मी त्यात गुंतलो होतो तेव्हा आवडलं ते मला पण ते पर्व संपलं हे आता बरं वाटतं.”

“तुझ्या मुलाशी तुझा काही संपर्क आहे का नाही?”

“हो, आम्ही बोलतो कधीकधी. पृथ्वीवर जाणाऱ्या पथकात त्याची निवड नाही झाली हे तुला माहीत आहे. त्याने प्रकल्पाचं प्रशिक्षण घेतलं होतं तरी. त्याबद्दल तो मला दोष देतो. पक्षपातीपणाचा आरोप येऊ नये म्हणून निवड समितीने त्याची निवड केली नाही, असं त्याला वाटतं. पथकाची निवड होण्यापूर्वी मी जर प्रकल्पाच्या केंद्रीय मंडळातून राजीनामा दिला असता तर त्याची निवड होण्याची शक्यता वाढली असती असं त्याला वाटतं.”

“त्यात काही तथ्य आहे?”

“नाही. निवड करण्याची प्रक्रिया एका स्वतंत्र समितीने केली होती. ती प्रक्रिया पूर्णपणे न्याय्य होती यावर माझा विश्वास आहे. जयंतची निवड झाली नाही याचं मला वाईट वाटतं पण त्याहूनही अधिक दुःख मला त्याची प्रतिक्रिया पाहून झालं.”

“पण तो काही अजूनही तुझ्यावर रागावलेला नसेल.”

“नाही, ते कसं शक्य आहे? आपण आता सगळे उन्नत मानव आहोत, नाही का? प्राचीन मानवांसारख्या आपल्या भावना आता अतिरेकी नसतात. त्याने त्याची नियती आता स्वीकारली आहे आणि माझ्याशीही समेट केला आहे; पण एक अंतराळवीर म्हणून तो आपलं करिअर करणार नाही. औद्योगिक मशिनरी तयार करणाऱ्या एका कंपनीत तो इंटर्नशिप करतो आहे. उत्पादन केंद्राच्या एखाद्या उपग्रहावर त्याची थोड्या काळासाठी नेमणूक झाली तरच त्याला अंतराळयात्रेच्या जवळपास जाणारा अनुभव घेता येईल. अँड्रॉइडना साध्य न होणारे प्रश्न सोडवायला मानवांना कधी कधी अशा उपग्रहांवर जावं लागतं ना!”

“हं! आणि नताशा कशी आहे? तिच्याशी बोलतोस तू कधी?”

“हो. जयंतला जसं वाटतं तसंच सुरुवातीला तिलाही वाटत होतं. कदाचित अजूनही वाटत असेल; पण आता आम्ही परत मित्रत्वाने वागतो. ती आता डाय हेमेलमध्ये राहते त्यामुळे आमच्या वरचेवर भेटी होत नाहीत. कधीकधी वाढदिवसाला आमच्या आभासी भेटी होतात.”

“आणि तुला पुन्हा कुणाबरोबर पालक करार करायचा नाही?” काईजा विनोदाने म्हणाला. 

“काय चेष्टा करतोस माझी? एकाच कराराने माझी दमछाक झाली. नाही, प्रकल्पातील एका शास्त्रज्ञ स्त्रीबरोबर आता माझं नातं जुळलं आहे. ती आण्विक शास्त्रज्ञ आहे आणि अनेकदा आम्ही एकत्र राहतो; पण आता मला एकांतवासही आवडायला लागला आहे. त्यामुळे माझे जे प्रकल्प पृथ्वी प्रकल्पामुळे लांबणीवर पडले होते त्या प्रकल्पांवर मला लक्ष केंद्रित करता येतं.”

“हो, समजतंय मला, तुला काय म्हणायचं आहे ते. मला कायमच एकांतवास आवडला आहे. फ्लोशी झालेलं वादळी प्रेमप्रकरण आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात आलेल्या दोन मुली सोडल्या तर मी कायम एकटाच राहिलो आहे आणि मला तेच जास्त आवडतं.”

“पण मला तुझ्या मोहिमेविषयी सांग. यान कोणत्या प्रकारचं आहे? कृष्णविवरापर्यंत पोचायला त्याला किती काळ लागेल? ई-६३४ च्या जवळ जाणार आहे ते, हो ना?”

“हो, बरोबर. स्वर्गावरची सहा वर्षं लागतील त्याला तिथे पोचायला. तुझ्या पृथ्वी मोहिमेच्या यानासारखं त्यात मुलांचं ओझं नाहीये. त्यामुळे ते जास्त वेगाने प्रवास करेल. म्हणजे सहा वर्षांत ते काही प्रकारचं निरीक्षण करता येईल इतकं घटना क्षितिजाच्या जवळ पोचेल. अर्थातच ते माहितीकणांचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करेल आणि बहुतेक लोकांना त्यातच रस आहे. तो सिद्धांत लोकांना फारच आवडला आहे आणि काही प्रतिभाशाली लोक तर काय काय भन्नाट कल्पना करताहेत. प्रत्यक्षात ते यान इतरही मूलभूत सिद्धांत तपासेल. उदाहरणार्थ : गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आणि उष्णतेचा किरणोत्सर्ग आणि घटना क्षितिजावर जर त्याचा नाश झाला नाही तर ते गुरुत्वाकर्षण क्षेत्रातील बदल, अवकाश आणि काळाच्या पडद्यातील बदल असे आणखी वरच्या स्तरावरचे निरीक्षण करू शकेल अशी आशा आहे. बघू. त्याला बहुधा शक्य होईल त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने निरीक्षण करता येण्याजोगी सगळी सामग्री त्याच्यावर लादलेली आहे आणि आता दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.”

“मग तोपर्यंत तू काय करणार आहेस?”

“मला इथं आयुष्यभर पुरेल इतकं काम आहे.”

“पण कंटाळा येत नाही तुला, एकटंच राहून काम करायला?”

“माझे विद्यार्थी असतात आणि खूप हुशार विद्यार्थी आहेत माझ्याकडे; शिवाय सहकारी आहेत. मी अंतर ठेवून राहत असलो तरी आजूबाजूला त्यांची वर्दळ असतेच आणि मला तुझ्यासारखा मित्र आहे, ज्याला कधीकधी माझी आठवण येते.”

अमर हसला. आपला मित्र किती मवाळ झाला आहे हे त्याला जाणवलं. तो आता त्याच्या संशोधन क्षेत्रात रस नसलेल्या लोकांमध्ये स्वारस्य नसणारा रागीट तरुण शास्त्रज्ञ उरला नव्हता. अमरने त्याची ती अवस्था ही पाहिली होती आणि त्याला प्रसिद्धी आणि चक्रावून टाकणारी प्रशंसा मिळाली ती अवस्थाही पाहिली होती. यशाचा मोठा टप्पा ओलांडून गेल्यावर आता तो समाधानी होता आणि प्रयोगांच्या परिणामांची दीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर येणारी परिपक्वता त्याच्यात अवतरली होती. शास्त्रीय संशोधनाविषयी असणारी त्याची तीव्र जिज्ञासा आणि आयुष्याचं साधं सरळ तत्त्वज्ञान अमरला आवडायचं. 

______________________________________________________________________________________________

आरुषीची आई झिप्पर मधून उतरली आणि रॉल्फ गानिबी तिच्या पाठोपाठ उतरला. तिचे हात हातात घेऊन त्याने तिच्या डोळ्यांत  बघितलं. आरुषीच्या आईने घाईघाईने त्याच्या गालाचा पापा घेतला आणि वळून ती तिच्या घराच्या दारापर्यंत जाणाऱ्या हिरवळीच्या रस्त्यावरून चालू लागली. सेन्सरने तिला ओळखलं आणि दार आपोआप उघडलं. ती उंबऱ्यावर थबकली आणि वळून तिने आपल्या प्रियकराला टाटा केला. तो झिप्परमध्ये बसून झिप्पर निघून जाईपर्यंत ती बघत उभी राहिली नाही. ते आवाज मात्र तिने ऐकले. अजून बाहेर लखलखीत प्रकाश होता तरीही तिने घराच्या भिंती अपारदर्शकच राहू दिल्या आणि ती दिवाणखान्यात जाऊन बसली. 

आपल्या घराच्या शांततेत तिला बरंच आश्वस्त वाटलं. रॉल्फची सोबत तिला आवडायची पण आजकाल तिच्या असं लक्षात येऊ लागलं होतं की काही काळानंतर त्याच्या जवळिकीचा तिला कंटाळा यायचा. नेहमी तटस्थ वृत्तीने जगणाऱ्या माणसाबरोबर पंधरा वर्षं राहिल्यानंतर, ही सततची जवळीक तिला दमवून टाकायची. तिला एकटंच राहून आपल्या बेताने आयुष्य जगावंसं वाटायचं. 

एकटी असली, की ती तासन्‌तास  कोचावर नाहीतर हिरवळीवर पडून राहायची. तीच वेळ असायची जेव्हा तिच्या मनात नवनवीन कल्पना उसळून यायच्या. अंतःचक्षूंना समोर स्पष्टपणे दृश्यं दिसू लागायची. तिने प्रत्यक्षात कधीही न पाहिलेल्या जागा, तिला ज्ञात नसलेले प्रसंग, इतके गडद आणि अद्वितीय रंग, की ती कधीही ते तसेच्या तसे आपल्या चित्रांमध्ये उतरवू शकायची नाही. पण तिची रेखाटनं आणि चित्रं नुसती डोळ्यांना सुखावणारी कधीच नसत. त्यांतून नेहमीच काहीतरी अर्थबोध होई. तिच्या चित्रात एखादं झाड नुसतं झाड नसायचं. त्याचं एक जीवन असायचं, त्याला एक भूतकाळ आणि वर्तमानकाळ असायचा. ते अनुभवी असायचं आणि त्याचे अनुभव तिच्या कुंचल्याच्या वळणांमधून व्यक्त व्हायचे. 

आरुषीची आई अनेक वर्षांपासून चित्रं काढत होती, अगदी लहानपणापासून. पण उघडपणे आपली कला जोपासायला तिला संकोच वाटे. तिचे आई वडील तिच्या कलेविषयी उदासीन होते आणि मोठी झाल्यावर आधी अकादमीमध्ये आणि नंतर तिचं काम आणि कुटुंब यात ती व्यग्र होत गेली. अर्थात अधूनमधून ती चित्रं काढत राहिली पण सगळ्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन एकांतवास सुरू होईपर्यंत तिची प्रतिभा बहरली नव्हती. तिच्या चित्रांची सर्वात मोठी प्रशंसक आरुषी होती. 

“तू रोज का नाही चित्र काढत?” एकदा तिने विचारलं होतं.

“वेळ कुठे असतो बिट्टू? आणि मी फक्त माझी कला हरवून जाऊ नये म्हणून चित्रं काढते. मी काही मोठी चित्रकार नाही.”

“मला आवडतात तुझी चित्रं. ती बघितली, की एखाद्या गोष्टीत शिरल्यासारखं वाटतं.”

आपल्या छोट्या लेकीच्या आकलनक्षमतेचं तिला कौतुक वाटलं होतं आणि म्हणून ती कधी कधी चित्रं रंगवायची आणि आरुषीला रंगांशी खेळू द्यायची. ती किशोर वयाची असताना तिने स्वतःच काळजीपूर्वक आपले रंग तयार केले होते. तेव्हा मिळवलेले डिजिटल ब्रश आणि चित्र काढायची डिजिटल फ्रेम अजूनही तिच्यापाशी होती. आरुषी मोठी झाल्यावर तिला संगीतात अधिक रुची निर्माण झाली आणि तिचा बहुतेक कलात्मक वेळ ती आपल्या गुरूंकडून शिकलेल्या संगीताचा सराव करण्यात आणि आपल्या प्रतिभेने नवीन संगीत तयार करण्यात घालवी आणि म्हणून तिच्या आईची चित्रकला मागे पडली. 

पण आता आरुषी दूरच्या प्रवासाला निघून गेली होती. पालक करार संपल्यावर आरुषीचा पपा दुसरीकडे राहायला गेला होता आणि आरुषीच्या आईच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. अर्थात तिची नोकरी, मित्र-मैत्रिणी आणि एक नवीन साथीदार होता. पण कधीकधी अनेक दिवस ती एकटीच असायची. आयुष्यातील मुख्य कामं निर्विघ्नपणे पूर्ण केल्यावर प्रौढ वयात येणारा एक सौम्य आत्मविश्वास तिच्यात आला होता. तिला एक मूल वाढवायचं होतं, त्या मुलाला नैसर्गिकरित्या जन्म द्यायचा होता. ही दोन्ही स्वप्नं तिने यशस्वीपणे पूर्ण केली होती आणि एका अत्यंत लाघवी कन्येचं प्रेम तिला लाभलं होतं. आतापर्यंत दोन पुरुषांशी तिने नातं जोडून निभावलं होतं आणि तिच्या कामामुळे समाजाचा ती एक महत्त्वपूर्ण घटक होती. ती समाधानी होती आणि आपण परिपूर्ण असल्याची तिला जाणीव होती. लहानपणीचा एकाकीपणा आणि तरुण वयातील चिंता आता तिला सतावत नव्हती. आता त्याच्या नैसर्गिक प्रकृतीप्रमाणे तिचं मन गतिशील होऊन अज्ञाताला गवसणी घालू पाहत होतं… जिथून प्रतिभा अवतरते आणि तिच्या मनाला निर्मिती करण्यास प्रेरित करते त्या उदात्त स्तरावर. 

आता तिला भौतिक वस्तू वापरून चित्रं काढायचे प्रयोग करायचे होते. नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेल्या ओल्या रंगांच्या स्पर्शासाठी तिचे हात शिवशिवत होते. चित्रकलेचा प्राचीन इतिहास तिने वाचला होता. प्राचीन चित्रकार प्राण्यांच्या केसांपासून तयार केलेल्या कुंचल्यांनी आणि नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेल्या रंगांनी चित्रं कशी रंगवत असतील याचं तिला फार कुतूहल होतं. त्या माध्यमांवर फारसं नियंत्रण ठेवता येत नाही हे तिला माहिती होतं. घन कुंचल्याने मारलेला रंगाचा प्रत्येक फराटा घन कॅनव्हासवर कायमचा अंकित होणार. डिजिटल माध्यमासारखं तो पुसून दुरुस्त करता येणार नाही. तिलाही ते तंत्र वापरून बघायचं होतं. त्यासाठी तिला मन इतकं एकाग्र करावं लागेल, की त्याचा प्रत्येक आदेश हा निश्चित असेल. काढलेली प्रत्येक रेघ आणि ब्रशचं प्रत्येक वळण हे कायम राहील आणि त्यातून तयार होणारी कलाकृती नष्ट करता येईल पण पुसून टाकता नाही येणार. हो, लवकरच ती आता रंग तयार करायला सुरुवात करेल… झाडांच्या पानांपासून हिरवा, फुलांपासून लाल आणि पिवळा, मातीपासून तपकिरी आणि कदाचित जांभळा देखील, तिच्या स्वतःच्याच पंखांपासून…

________________________________________________________________________________________________

प्रकरण अकरावे समाप्त


Author

Leave a Reply