भारतीय संस्कृतीत चौसष्ट कलांचा समावेश आहे. त्यांतील एक महत्त्वाची कला म्हणजे शिल्पकला होय. सध्याच्या काळात शिल्पकला काहीशी दुर्लक्षित वाटते.
आपल्या सर्वांना सिंधू संस्कृतीची ओळख आहे. या संस्कृतीतील मोहेंजोदारो, हरप्पा ही नगरे व त्यांची आदर्श रचना आपणां सर्वांनाच माहीत असते. या नगरांच्या उत्खननात मिळालेली नर्तिका, दाढीवाला पुरुष यांसारख्या मूर्ती व या शहराची एकंदरीतच रचना व त्यातील वैशिष्ट्यपूर्ण स्नानगृहे शालेय जीवनात आपण अभ्यासलेले असते.
सिंधू संस्कृतीच्या नगरांच्या उत्खननात मातीची मातृकाशिल्पे, शिवलिंग, टेराकोटा सील, खेळणी मिळाली आहेत. मातीच्या शिल्पांना पुरातत्त्वीय भाषेत टेराकोटा शिल्पे म्हणून संबोधले जाते. या मातीच्या शिल्पांबरोबर ब्रॉंझ धातूची शिल्पेही या संबंधित उत्खननात आढळून येतात. या प्रकारच्या शिल्पांमध्ये नर्तिका शिल्प आणि दायमाबाद उत्खननात मिळालेला घोडयांचा रथ ही प्रसिद्ध शिल्पे होत.


टेराकोटा शिव प्रतिमा
टेराकोटा डांसिंग गर्ल, बिहार संग्रहालय

वैशाली स्तूप, बिहार

दिदारगंज यक्षिणी, बिहार संग्रहालय
टेराकोटा शिल्पांचा क्रमशः विकास होत मौर्य कालखंडात ही कला चांगलीच बहरली होती. मौर्यकालीन असंख्य टेराकोटा शिल्पे आपणांस बिहार संग्रहालयात पाहण्यास मिळतात. मातीच्या भाजलेल्या विटा या कालखंडात वापरल्या गेल्या. या विटांवर कोरीव काम केले गेले. नालंदा विद्यापीठ, वैशाली, केसरिया स्तूप येथे अलंकरणासाठी अशा प्रकारे विटांचा वापर केलेला दिसतो. मात्र यात पुढे फारसे काम झालेले दिसत नाही.

विटांवरील अलंकरण
मौर्यकाळात पुढच्या टप्प्यात दगडात शिल्पे घडवण्यास सुरुवात झाली. मौर्यकालीन दगडी शिल्पांना दिली गेलेली झिलई वैशिष्ट्यपूर्ण आहे. बिहारमध्ये बाराबर डोंगरात सम्राट अशोकाने आजीवकांसाठी गुहा कोरल्या. या गुहांच्या भिंतीवर आरशासारखी प्रतिबिंब दिसणारी झिलई निर्माण केली आहे. ग्रीकांकडून भारतीय कलाकारांनी हे झिलई करण्याचे शास्त्र शिकून घेतले असा समज आहे. दिदारगंजची यक्षिणी हे या कलाप्रकारातील एक महत्त्वाचे शिल्प आहे. यानंतर या झिलईचा वापर ठिकठिकाणीच्या मंदिरांच्या स्तंभांवर – विशेषतः कर्नाटकमधील मंदिरांमध्ये केलेला दिसतो. कालांतराने हे तंत्र काहीसे मागे पडले. त्याला लागणारा वेळ आणि कष्ट हे त्यामागचे कारण असावे.

मौर्यकालीन झिलई, बाराबर लेणी – बिहार
पुढचा टप्पा म्हणून सह्याद्रीच्या डोंगरात बौद्धधर्मीय लेणी कोरली जाऊ लागली. महायान काळात बुद्धाच्या लेण्यांमधून बौद्ध धर्माचा प्रसार सुरू झाला. आपल्याला बोधिसत्त्व बुद्धाच्या जीवनातील शिल्पांकत केलेले अनेक प्रसंग कान्हेरी, पितळखोरा, भाजे, कार्ले इ. ठिकाणी पाहण्यास मिळतात. याच सुमारास शिल्पकलेतील गांधार व मथुरा शैली निर्माण झाली. गांधार शिल्पशैलीवर रोमन व ग्रीक कलांचा प्रभाव दिसतो; तर मथुरा शैली भारतीय असली तरी तीवर ग्रीक, इराणी कलेचा प्रभाव दिसतो. या दोन्हीही शिल्पशैलींनी हाताळलेले विषय मात्र भारतीयच असत. या निमित्ताने शिल्पनिर्मिती प्रक्रियेविषयी थोडा अधिक तपशील पाहू या.
शिल्पे माती, दगड, चुना, प्लास्टर ऑफ पॅरीस, लोखंड, कागद, पुठ्ठा इत्यादी विविध माध्यमांत केली जातात . ती दोन प्रकारची असतात : द्विमिती व त्रिमिती. द्विमिती शिल्पे सपाट पृष्ठभागावर घडवली जातात. त्यात खोली निर्माण करून दुसऱ्या मितीचा भास निर्माण केला जातो. त्रिमिती शिल्प आपण कोणत्याही बाजूने पाहू शकतो.
भारतीय शिल्पकलेत सौंदर्यशास्त्राप्रमाणे रूप, भेद, प्रमाण, भाव, लावण्य, योजना यांचा समावेश असतो. शिल्पकाराला कोणत्या माध्यमात कला घडवायची आहे त्या माध्यमाची जाण असणे आवश्यक असते. शिल्पकलेत — विशेषतः दगडात घडणार्या मूर्तीमध्ये — फेरफार, दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे कलाकार जेव्हा ते शिल्प करतो त्या वेळी पूर्ण तन, मन, धन ओतल्याशिवाय ते घडत नाही.
आपण कितीतरी प्राचीन मूर्ती या भग्न पावलेल्या पाहतो परंतु तरीही त्यांतील सौंदर्य नष्ट झालेले नसते! हे त्या भारतीय कलाकारांचे कसब आहे. याचे उदाहरण म्हणून पुण्याजवळील भुलेश्वर मंदिर आठवावे.
अशी ही वैशिष्ट्यपूर्ण भारतीय शिल्पकला मूर्ती, लेणी, मंदिरे यांतून सर्वत्र प्रसारित झाली. सातवाहन, वाकाटक, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार आणि यादव यांच्या राजवटीत बहरली. त्यानंतरच्या इस्लामीक काळात मात्र ती नामशेष झाली. तिच्या पुनरुज्जीवनाचे मर्यादित प्रयत्न पुन्हा मराठा काळात सुरू झालेले दिसतात. आजही याची साक्ष देत लेणी, मंदिरे उभी आहेत.
शिल्पकला जाणीवपूर्वक जोपासावी लागते. त्यातून कलेची जाण निर्माण होते, सौंदर्यदृष्टी तयार होते.
(लेखातील सर्व छायाचित्रे अनिता आगाशे. त्या पुरातत्त्व अभ्यासक असून डेक्कन कॉलेज, पुणे मधून पीएच. डी. करत आहेत . )
