झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.११ 

माझा कोकण दौरा छान चालला होता. नवीन रेल्वे मार्ग, नवा निसर्ग. रेल्वेचे तेच  नियम; पण वेगळ्या पद्धतीची ‘अंमलबजावणी’ पाहत होतो. एक-एक स्टेशन कार्यान्वित करत करत मी उडुपीला पोहोचलो. संध्याकाळी काम झाल्यावर तेथील कृष्णमंदिरात जाऊन आलो. खूपच छान आणि प्रसन्न आहे. प्रसाद म्हणून पुजाऱ्याने मला मूर्तीवर लावलेल्या हळद आणि  चंदनाच्या लेपाचा छोटासा गोळा आणि त्याच रंगाचा  पेढा दिला. मी चुकून लेपाचा गोळा प्रसाद समजून तोंडात टाकला. ते पाहून पुजाऱ्याने आणखी एक मोठा पेढा दिला. मी लगेच खाल्ला. माझी गंमत बघून त्याने विचारले, “कहाँ से आये?” मी  ‘सोलापूर’ म्हटल्यावर त्याने लगेच माझ्याशी मराठीत बोलणे चालू केले आणि आपले विजापूर वेशीतील उडुपी हॉटेलचे नाते सांगितले. रेल्वेमुळे आमची चांगली सोय झाली असेही म्हणाला. ‘केल्याने देशाटन….’ याची प्रचिती आली. तिथेच महाप्रसादाचे जेवण केले. 

कोकण किनार पट्टीवर( महाराष्ट्रात ) जसे ‘नमन’, ‘दशावतार’ या लोककला प्रचलित आहेत त्याप्रमाणे कर्नाटकातील समुद्र किनारपट्टीवर  पारंपरिक नृत्य ‘यक्षगान’ हे खूपच प्रसिद्ध आहे. ‘दुसरे टागोर’ म्हणून संबोधले जाणारे श्रीयुत शिवराम कारंथ यांनी ह्या कलेचे पुनरुज्जीवन केले  असे म्हणतात. ‘यक्षगान’ पाहून विश्रांतिकक्षात  परतलो. 

 बरीच रेल्वे स्टेशन्स  मनुष्यवस्तीपासून दूर असतात. शहरातील दंग्याधोप्यांचा  रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून आणि  कदाचित अशा ठिकाणी जमीन संपादन करणे  सोपे जाते  ही त्याची संभाव्य करणे असावीत.  त्यामुळे बऱ्याच स्टेशनांची  नावे xxx रोड  अशी असतात.  उदा. : अक्कलकोट रोड, गाणगापूर रोड, सातारा रोड इ. आता लोकवस्ती वाढली आहे त्यामुळे असे काही आढळणार नाही. 

एक योगायोग,  त्या वेळी मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ म्हणून ओळखला जायचा आणि हाच महामार्ग मुंबई ते गोवा रेल्वेमार्गाला  १७ वेळा छेदून  जातो.  आता हा राष्ट्रीय महामार्ग ६६ म्हणून ओळखला जातो.

देशभक्तीसाठी दरवेळी सीमेवरच लढण्याची आवश्यकता नसते. समाजासाठी आणि देशासाठी केलेले प्रामाणिक काम ही देशभक्तीच असते. हौतात्म्य हे प्रत्येक वेळी सीमेवर लढतानाच प्राप्त होते असे नाही.

पेडणे स्टेशनजवळच्या भुयाराचे काम करत असताना आमचे काही सहकारी/अधिकारी  आणि मजूर दरड कोसळून गाडले गेले. (१४/१०/१९९८ दुपारी १ ते ३ च्या दरम्यान).  निसर्गासमोर मानव हतबलच असतोच. अशा  सर्व हुतात्म्यांची आठवण आम्ही दरवर्षी रत्नागिरी येथे १४ ऑक्टोबरला त्यांचा  स्मृतिदिन म्हणून जागवतो. माझ्या बरोबर IRISET/Secunderabadला एक कोर्स केलेल्या माझ्याच  सहाध्यायाने  हा सर्व दुर्दैवी प्रकार आपल्या वर्णनाने  माझ्यासमोर उभा केला. त्याच्यासमोरच हे सगळे घडले होते. ऐकून मी सुन्न झालो. 

माझे काम जवळ-जवळ संपतच आले होते. SR (दक्षिण रेल्वे) ला आमची म्हणजे कोकण रेल्वेची Cable जोडणी झाली, की माझी सुटका होणार होती. कोकण रेल्वेचा सगळ्यात जास्त फायदा केरळला झाला. केरळने कोकण रेल्वे उभारणीसाठी केंद्र सरकारला दिलेला वाटा  (राज्याच्या सीमेनुसार हा वाटा होता) खूपच कमी होता; मात्र या रेल्वेमुळे  ते राज्य मुंबईला – म्हणजेच  देशाच्या आर्थिक राजधानीला – जोडले गेले.

मजल दरमजल करीत आम्ही आमचे शेवटचे स्टेशन ‘मंगलोर’ला पोहोचलो. रात्री ०३:३० वाजता मंगलोरमध्ये आम्ही OFC Cableची जोडणी  केली आणि मंगलोर  स्टेशन रेल्वेच्या   NMS (Network Management System)वर दिसले. माझे काम वेळेआधी १० दिवस संपले. आमचे वरिष्ठ  GM i R.K बहुगुणा (ते IIT रुरकीचे Topper होते)  होते.  त्यांना पहाटे  ०४:०० वाजता   फोन करून ही बातमी दिली. त्यांनी तसे मला सांगितलेच होते. आता मंत्रालयात होणाऱ्या  आढावा मीटिंगमध्ये त्यांची कॉलर ताठ होणार होती त्यामुळे ते भलतेच खुशीत होते.

   रात्री आम्ही सगळ्यांनी कॉफी प्यायली. स्टेशनवरीलच एका जास्वंदाच्या झाडाचे फूल मी त्या (FDMS…Fiber Distributions Management System) या उपकरणावर ठेवले आणि नमस्कार केला. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे ,कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे OFC केबलद्वारे जोडली गेली. ह्या सगळया नोंदी  मी दैनंदिनी लिहित असल्यामुळे चट्कन मिळत गेल्या आणि माझे लिखाण सोपे झाले. 

सिनेमा पाहताना प्रत्येकाला त्या हिरोचेच कौतुक वाटते; पण आपल्या अंगावर  पेट्रोल ओतून आणि आग लावून १२ मजल्यावरून पाण्याच्या टाकीत  उडी घेणारा किंवा जळत्या मोटारीखालून  बाहेर येणारा  त्याचा स्टंटमॅन किंवा डमी कुणाला आठवतदेखील नाही.  तसेच काम आम्हां तांत्रिक कर्मचाऱ्यांचे असते. आम्ही सगळे पडद्यामागे. असो. 

 मला, “दो दिन और रुको. पुरा System  Monitor करो और Joint  Report बना के वापीस आओ,” असा  निरोप मिळाला. त्यामुळे दोन दिवसांत रिपोर्ट तयार करून, तसेच तिथल्या स्टाफला टेक्निकल टिप्स देऊन मी कोकण रेल्वेचा निरोप घेतला.

कोकण रेल्वेवर घेतल्याला मेहनतीचे फळ मला मिळाले.  रेलटेलचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मला मिळाले. पहिला क्रमांक प्राप्त करणारे सिकंदराबादचे होते. नंतर बऱ्याच दिवसांनी एका ट्रेनिंगमध्ये सिकंदरबादच्या स्टाफने पहिला क्रमांक मिळवण्यासाठी केलेली  तांत्रिक गडबड माझ्याच एका सहाध्यायाने  उघडकीस आणली आणि मी पहिल्या  क्रमांकाचा  मानकरी झालो;  पण त्याला बराच उशीर झाला होता. 

अशा या OFC  तंत्रामुळे भारतीय रेल्वेला प्रचंड फायदाच झाला. आमची स्वत्रंत्र दळणवळण प्रणाली अद्ययावत झाली. BSNLवरील अवलंबित्व पूर्णपणे संपले. उलट काही ठिकाणी आम्हीच त्यांना दळणवळणसाठी सोयीसुविधा दिल्या.

अभिमानाची गोष्ट म्हणजे,C-DAC (  Centre for Development of Advance Computing, मुंबई ऑफिस आणि बेंगलोरचे ऑफिस यांचे दोन सुपर कॉंप्युटर (Cray XMP 14)   रेल्वेच्या  OFC द्वारे लगेचच जोडली गेले . एवढी मोठी Bandwidth (400Mb) त्या काळी बीएसएनएलसुद्धा  देऊ शकले नाही. या उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीमुळे रेलटेलला  मिनिरत्न  हा पुरस्कार काही दिवसांतच  मिळाला. रेल्वेचे उत्पन्न वाढू लागले. सगळी कामे आटपून मी KRCL कर्मचारीवर्गाला तांत्रिक माहिती देऊन सोलापुरी निघालो.

खालील लिंक वरून आपणांस कोकण रेल्वेबद्दल माहिती मिळेल.

https://konkanrailway.com/sites/default/files/JUNE_2025_COFFEE_TABLE_BOOK/mobile/index.html

Author

Leave a Reply