
फ्रान्झ काफ्काने (१८८३-१९२४) १९२३-२४ च्या हिवाळ्यात दोन कथा लिहिल्या. ते त्याच्या जीवनातले अखेरचे दिवस होते. एकमेकांना बिजागराने जोडलेल्या दोन चौकटींत दोन चित्रं असतात तशा या द्विपुटचित्री कथा. काफ्काचा देहांत झाल्यानंतर मॅक्स ब्रॉड या त्याच्या मित्राने प्रकाशित केल्या. कोणत्या या कथा? कशाविषयी आहेत या कथा? ‘Josephine (the singer) or the Mouse Folk’ ही त्याची देहांतापूर्वीची शेवटची कथा.‘The Burrow’ ही जोसेफिनच्या आधीची कथा.
खिडकीवर घुबड
विएनाच्या जवळ असलेल्या Kierling सॅनॅटोरियम येथे फ्रान्झ काफ्का त्याची प्रेयसी Dora Dymant (१८९८-१९५२) हिच्याबरोबर राहत होता. १९२४ चा जून महिना होता, ३ जूनला त्याचा देहांत झाला. त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी एक घुबड त्याच्या खोलीच्या खिडकीवर येऊन बसलेले डोराने पाहिले. पाश्चात्त्य साहित्याच्या प्रतिमासृष्टीत घुबड हे अंधाराचे तसेच प्रकाशाचे असे दुहेरी प्रतीक आहे. घुबड हे रात्रीचे पाखरू. ज्यूंचे प्रतीक – कारण त्यांनी ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे पाठ फिरवली अशी एक दंतकथा. घुबड हे ‘विज्डम’चे प्रतीक. घुबड हे संदिग्धतेचे पाखरू. काफ्का हा स्वतःबद्दल नेहमीच संदिग्ध होता. तो जन्माने ज्यू; पण तो स्वतःला धर्माने ज्यूही मानत नसे आणि खिश्चनही! आपण खरोखर मानव प्रजातीचे आहोत का याबद्दलही तो साशंक असावा. ही साशंकता मानवातील पशुतेची जाण आल्यामुळे असावी. तो एक किडा वा कीटक आहे किंवा भुईखाली राहणारा आणि रात्री बिळाबाहेर येणारा उंदीर वगैरे आहे, असे त्याच्या मेटॅमॉर्फोसिस आणि the burrow या ललितकृतींवरून वाटू शकते. मग या अशा धूसर लेखकाच्या प्रयाणाला साक्षीदार राहण्याकरता हे संदिग्धतेचे पाखरू हजर राहिले असावे. Alan Bennett (१९३४-) या सुप्रसिद्ध ब्रिटिश नाटककार आणि लेखक यांनी काफ्काच्या देहांतशताब्दीच्या निमित्ताने आठवण काढताना हे काफ्काच्या गूढगंभीर साहित्याला साजेसे आशयचित्र रंगवले आहे. या ललित सजावटीवर मी काफ्काच्या वर सांगितलेल्या दोन गोष्टींचा शोध घेणार आहे.
शेवटचे दिवस
‘घटिका पाणी पिते आणि घड्याळ टोले खाते’ दोन्ही काळच दाखवतात. प्रत्येक कथेला एक घडी असते, मला ती शोधायला आवडते. त्यामुळे कथेवर प्रकाश पडतो असे माझ्यातला सामान्य वाचक मला सांगतो; पण काही साहित्यवंत म्हणतात, ‘जे काही त्या चार पानांत लेखकाने लिहिले असेल ते वाचून वाचकाने कथेचा अन्वयार्थ लावावा.’ हो, तेही खरे असेल. मी या दोन्ही पद्धतींचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
जोसेफिन या लघुकथेच्या कालाचा शोध घेतला. लघुकथा लवचीक, कल्पक, टोकदार असते. काफ्का अल्पायुषी ठरला. दिवस शेवटचे होते. वेळ फार उरला नव्हता म्हणून त्याने कथनाचा हा घाट निवडला असावा.
१९२३चा जुलै महिना होता. उन्हाळ्याचा आल्हादक आरंभ होता. काफ्का Muritz या जर्मनीतील सागरासारख्या मोठ्या तळ्याकाठी राहायला आला होता. बहीण एली आणि मुले बरोबर होती. तीराकाठी त्याला खूपच बरे वाटले. काफ्का चाळिशीचा! तेथेच त्याला वीस वर्षांची डोरा भेटली. ती त्याच्याकडे ओढली गेली, तोही तिच्या प्रेमात पडला. डोरा त्याची शेवटची प्रेयसी ठरली. १९२३चा सप्टेंबर उजाडला. हळूच पानगळीला सुरुवात झाली. काफ्का आणि डोरा बर्लिन येथील एका फ्लॅटमध्ये राहू लागले. काळाने पान उलटले. १९२४ आले. काफ्काची तब्येत झपाट्याने खालावू लागली. मॅक्स ब्रॉड – त्याचा खास मित्र – मार्च महिन्यात काफ्काला प्रागला घेऊन गेला. प्रागमध्ये असताना त्याच्या स्वरयंत्रावर क्षयाने आघात केला. बोलणे अशक्य झाले. वेदना प्रचंड होत्या. त्याच्याबरोबर त्याचा डॉक्टर होऊ घातलेला मित्र Robert Klopstock (१८९९-१९७२) होता. १९२० ते १९२४ या काळात काफ्का आणि रॉबर्ट एकाच सॅनेटोरियममध्ये त्याच रोगाचे पेशंट होते. आपला आवाज जाणार याची काफ्काला भयपूर्ण जाणीव होती. ‘जोसेफिन द सिंगर ऑर द माउस फोक’ ही कथा त्याने याच काळात लिहिली. कथेचे शेवटचे पान लिहून झाले. काफ्का रॉबर्टला क्षीण आवाजात म्हणाला, “मी अगदी योग्य वेळी उंदीर ‘ची ची’ असा आवाज केव्हा काढू लागले याचा शोध घेतला. त्या बाबतची कथा मी आताच पूर्ण केली.”त्याच्याकडे कथा वाचायला मागण्याचे धाडस रॉबर्टला झाले नाही. काफ्का म्हणाला, “मला चिंता वाटते, माझ्या स्वरयंत्रावर परिणाम झाला असावा!” काफ्का, रॉबर्ट, डोरा परत सॅनेटोरियमला आले. त्याचे खाणे पिणे जवळ जवळ बंद झाले. गिळताना, तसेच बोलताना खूप वेदना होत. डॉक्टरांनी त्याला ‘बोलू नका’ असा सल्ला दिला. त्याचे बोलणे थांबले. तो कागदाच्या चिटोऱ्यावर वाक्ये लिहीत असे. काफ्काच्या ‘कॉनव्हरसेशन स्लिप्स’ डॉ. रॉबर्टने जपून ठेवल्या होत्या. त्यांतील काही काफ्काच्या पत्रखंडात प्रकाशित झाल्या आहेत.
गाणारी जोसेफिन – कथावस्तू
उंदीरलोकात गाणारे जवळ जवळ कोणी नसतेच. जोसेफिनजवळ हे कौशल्य होते म्हणून उंदीरलोक तिला प्रेमादराने वागवीत. गावात काही असतातच, ज्यांना तिचे काही महत्त्व नव्हते. पण ती गाऊ लागली म्हणजे गाव लोटत असे. रोजचे धकाधकीचे, पळापळीचे जीवन सह्य करायला तिच्या प्रोग्रॅमची मदत होत असे. जोसेफिनला सुदैवाने त्याचकरता आमच्याकडे पाठवले असावे; तेव्हा आम्ही तिला सांभाळले पाहिजे. आमच्यासारखे ती ‘ची ची’च करते, पण ती गायला उभी राहिली म्हणजे ती दृश्यकलेने आम्हांला मोहून टाकते. तिच्या गाण्यापेक्षा, एकत्र येण्याची, भेटण्या-बोलण्याची ती आम्हांला मिळालेली एक संधी असते म्हणून आम्हांला ते गाणे-बिणे आवडते, असे काहीजण म्हणतात. ठीकाय! त्या आवाजामुळे कधी पंचाईत होते – म्हणजे आमचे शत्रू आकर्षित होतात. मग आम्हांला घाईघाईने तिला सुरक्षित ठिकाणी न्यावे लागते. जोसेफिनला वाटे लोकांनी तिची रोजच्या ढोरमेहनतीतून सुटका करावी. म्हणजे तिला गाण्यावर, रियाजावर लक्ष केंद्रित करता येईल. तिच्या अपेक्षा वाढतच होत्या. आमचा समाज याला राजी नव्हता. तिला मनातून वाटत असावे, समाजाने तिच्या कलेचे मोल जोखावे, कदर करावी. असा आम्हां लोकांचा समज! आम्ही तिच्या विनवण्यांकडे काणाडोळाच केला. हळूहळू ती तिचे कार्यक्रम थोडक्यात आटपू लागली. एक दिवस ती दिसेनाशी झाली. मग ती कधी दिसलीच नाही. काही दिवस तिच्या गाण्याच्या आठवणी वगैरे काढल्या लोकांनी. मग लोक तिच्या गाण्याला आणि जोसेफिनला विसरूनच गेले. आम्ही इतिहासाला वगैरे काही महत्त्व देत नाही. वेळ कोणाला आहे! अहो, म्हणजे असे बघा, ती नव्हती तेव्हाही आम्ही जगत होतो आता ती गेल्यानंतरही जगतोच आहोत की!
कथेचा आशय
कथेचा सारांश दिला आहे. मूळ कथा वाचली तर कथेतील निरनिराळ्या जागा, वळणे, बहुविध वाचकांना वेगवेगळी भावतील. विषय तोच असला तरी प्रत्येकाचा आशय निराळा असेल. काफ्काला हेच अपेक्षित असावे.
माझा या आशयाचा प्रवास नमुनेदार आहे. मानवता आणि पशुता यांतील सीमारेषा ही धूसर असते. त्याचा उपयोग काफ्काने त्याच्या अशा कथांमध्ये अनेकदा करून घेतला आहे. काफ्काच्या साहित्यात आणि विशेषतः पत्रव्यवहारात मला अनेक काफ्का भेटले आहेत. यांतील दोन जरा ठळक – ‘काफ्का विचारवंत,’ ‘काफ्का शब्दकलावंत.’ त्याच्या ललितकृतीत या दोन्हींची मिसळ असते.
चार्ल्स डार्विनचे (१८०९-१८८२) ओरिजिन ऑफ स्पिशीज १८५९ मध्ये प्रकाशित झाले. यात त्याने उत्क्रांतीची थिअरी मांडली. पुढल्याच वर्षी त्याचे जर्मन भाषेत भाषांतर झाले. युरोपातील जर्मन भाषक देशांत ‘उत्क्रांती’ सहज स्वीकारली गेली. तुलनेने इतर युरोपीय देशांत या थिअरीला बराच विरोध झाला होता. सजीवांचा विकास निसर्गात क्रमाक्रमाने आणि हेतुपुरस्सर उद्दिष्ट ठेवून होतो असा विचार जर्मनीतील विज्ञानाच्या तत्त्वज्ञानात अगोदरपासून होता हे उत्क्रांती स्वीकारण्यामागचे कारण आहे. डार्विनच्या उत्क्रांती थिअरीचे स्वागत करताना Friedrich Nietzsche (१८४४-१९००) या तत्त्वज्ञाने त्याच्या झोंबऱ्याशैलीत नमूद केले, ‘बरे झाले मानवाला त्याच्या विशेष स्थानापासून, सिंहासनावरून खाली खेचून तो पशू आहे म्हणजे ‘सिक अॅनिमल’ ‘विकृत अॅनिमल’ आहे हे सांगितले’ येथे ‘अॅनिमल’ हा शब्द मी तसाच ठेवला आहे. लॅटिन रूट ‘निमस’ म्हणजे ‘हृदय आणि मन’ या कोंभातून ‘अॅनिमल’ हा शब्द उगवतो. म्हणजे नुसता सजीव नाही; तर ज्याला हृदय आणि भावभावना आहेत असा!
काफ्का शिकू लागला तोपर्यंत उत्क्रांती समाजात रुजली होती. त्याने डार्विन वाचला होता. त्याचा प्रभाव त्याच्यावर होता. वयाच्या सतराव्या म्हणजे कुमारवयात काफ्का सेल्मा या मैत्रिणीला उन्हाळ्याच्या सुटीत नित्शेचे निबंध मोठ्याने वाचून दाखवत असे. अठरा वर्षे वयाच्या मॅक्स ब्रॉडने शोपनहाउवर आणि नित्शे यांच्या तत्त्वज्ञानावर व्याख्यान दिले होते. ते ऐकायला सतरा वर्षांचा काफ्का गेला होता. तेथे दोघांची ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. काफ्का आणि त्याचे मित्र ज्ञानाच्या भुईत वाढले होते.
द बरो, द रिपोर्टर, इन्वेस्टीगेशन्स ऑफ ए डॉग, जोसेफिन द सिंगर, ऑर द माउस फोक या त्याच्या माणूस आणि अॅनिमल यांच्या रूपक कथा आहेत. मानुषततेतील पशुता आणि पशुतेतील मानुषता शोधण्याचा प्रयत्न काफ्काने केला आहे.
उंदीरलोक
उंदीर हा सतत धोका-धमकीच्या गडद सावलीतच वावरत असतो. आता समोरून दबा धरून बसलेली मनी झडप घालेल, वरून कोणी पाखरू पटकन उचलेल, नाहीतर कोणी सरपटत येईल, काय नि काय! उंदराची सतत धावपळ,पळापळ चालू असते जीव वाचवण्यासाठी, जगण्याकरता! त्या काळात ज्यू-द्वेष युरोपमध्ये सर्वदूर विषासारखा पसरला होता, काफ्काने अनुभवला होता. शाळेपासून कॉलेजपर्यंत आणि निवाऱ्यापासून नोकरीपर्यंत सगळीकडे नियंत्रणे, निर्बंध. ज्यूंचे जीवन खडतर होते. ते सतत धमकावणीखाली जगत. ‘गाणारी जोसेफिन किंवा उंदीरलोक’ यांतील उंदीरलोक हे ज्यूंचे रूपक. हा या कथेतील एक स्तर.
थडग्यावरील लेख
मृत्यू जवळ दिसताना काफ्काने ही कथा लिहिली होती. त्याचे त्याच्या समाजाशी नाते खडबडीत आहे असा त्याचा समज होता. मृत्यूनंतर आपली ‘जोसेफिन’ होईल, लोक आपल्यालाही असेच विसरून जातील, असे वाटून त्याने ही कथा म्हणजे त्याच्या थडग्यावरील लेख त्यानेच लिहून ठेवला. ‘माझ्या लेखनातून ‘इव्हील स्पिरिट’ बोलत असावे’ अशी गंभीर भीती त्याला वाटत असावी म्हणून त्याने त्याचा मित्र मॅक्स ब्रॉडला सांगितले होते, की ‘मॅक्सने काफ्काचे सगळे साहित्य जाळून टाकावे’ मॅक्सने त्याच्या विनंतीला मान दिला नाही. त्याचे सगळे साहित्य जपून ठेवून, प्रकाशित केले. म्हणून तर त्याची देहांतशताब्दी नुकतीच ‘साजरी’ झाली. असे जरी असले तरी कितीतरी कलाकार, लेखक, वैज्ञानिक वगैरे वगैरे अडगळीत गेलेले जगभरच्या प्रत्येक समाजाने अनुभवलेले असते.
काफ्काचा भविष्यकाल
होरहे लुईस बोरहेस – Jorge Luis Borges (१८९९-१९८६) हा अर्जेंटिनियन लेखकवंत बहुभाषिक होता. त्याने संपूर्ण काफ्का मूळ जर्मन भाषेत वाचून अभ्यासला होता. (बोरहेस यांना वयाच्या ५५व्या वर्षी पूर्ण अंधत्व आले होते) १९७७ साली पॅरीसमध्ये काफ्कावर कॉंग्रेस भरली होती. त्यात काफ्कावरील अधिकारवाणीकरिता बोरहेस यांना बोलावेले होते. त्या वेळी बोरहेस काफ्काच्या साहित्याबद्दल जे बोलले होते त्याचा आशयांश – ‘काफ्काचे साहित्य झीनोच्या पॅराडॉक्समधील कासवासारखे; ‘फिनिशिंग लाईन’पर्यंत कधी पोचत नाही. याचा अर्थ काफ्काच्या कथा, कादंबऱ्या, निबंध कधी निष्कर्षाप्रत येत नाहीत. त्या सगळ्या ‘फेबल्स’ असतात. त्याचे साहित्य इतिहास ओलांडून जाते. अरेबियन नाईट्सला कोण्या एका लेखकाने सुरुवात केली, मग त्यात इतर लेखकांनी त्यांच्या कथा घातल्या, आज त्याचे अनेक खंड झाले, अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. काफ्काच्या साहित्याचे असेच होईल. त्याच्या फेबल्स अशाच मानवी स्मृतीच्या भाग बनतील. त्याचे साहित्य जणू ‘अॅनॉनिमस’ होईल,’
बोरहेसने काफ्काच्या साहित्याबाबत वर्तवलेले हे भविष्य खरे ठरले आहे. त्याच्या साहित्याचे जगातील अनेक भाषांत भाषांतर झाले आहे. त्याच्या साहित्यावर हजारो पुस्तके लिहिली गेली, लिहिली जात आहेत. मनोविज्ञान, तत्त्वज्ञान, समाजविज्ञान या विषयांतील तज्ज्ञांनी काफ्कावर साधक बाधक लिहिले आहे आणि त्याच्या साहित्याचा त्यांच्या विषयात उपयोगही केला आहे. काफ्काच्या ‘फेबल्स’ नाटक, सिनेमा, ऑपेरामध्ये रूपांतरित झाल्या आहेत. काफ्का असा मानवी स्मृतीचा भाग झाला आहे
(फेबल्स = नीतिकथा, बोधकथा असे शब्दकोशात दिले आहे; पण मला त्या कूटकथा वाटतात, कोडी वाचकाने आपल्यापरीने सोडवायची असतात.)
चौकटीतून मुक्त
कालैतिहासाच्या चौकटीत बंदिस्त झालेली कथा मुक्त करायची असेल तर काय करावे लागेल या विचारात मी पडलो होतो. एकदम ट्यूब पेटली, “अरे तू काही लेखकबिखक नाहीयेस, तू आहेस एक सामान्य वाचक! तू तुझ्या पद्धतीने त्या कथेचा अर्थ लाव म्हणजे फक्त त्या चार पानांत जे लिहिले आहे त्याचा अन्वयार्थ लावायला सुरुवात कर म्हणजे कथा मुक्त होईल. भाषा आणि देश, काळाच्या सीमा कथा ओलांडेल.
जोसेफिन या कथेत उंदीरलोक म्हणतात, “ती आमच्यासारखे ची ची करते पण…” काफ्काचे हे विधान मोठे धाडसाचे आहे. म्हणजे कलाकार सामन्य माणसासारखेच असतात असा त्याचा अर्थ होतो. कलाकार म्हणजे गायक असो वा लेखक, चित्रकार कोणीही असो – हा सामान्य असतो; पण त्याच्यात काही कौशल्ये अनेक कारणांमुळे विकसित झालेली असतात. ती वापरून तो आपली कलाकृती समाजापुढे सादर करतो. ती अभिव्यक्त करणे ही त्या कलावंताची निकड असते. हे समाजतील काहींचे मत असते पण सर्व समाजाचे तसे मत नसते. पण समाज कलावंताला फारच डोक्यावर घेतो हे धोक्याचे असते. कलावंताच्याही समाजाकडून अपेक्षा वाढतात. काफ्काला हेसुद्धा सांगायचे असेल. कलाकार हा शब्द येथे व्यापक अर्थाने घ्यायचा आहे.
कला हे एक करमणुकीचे साधन आहे. कथा, कादंबरी, सिनेमा, संगीत कोणतीही कला असो, त्यामुळे रोजच्या धकाधकीतून विरंगुळा विसावा मिळाला पाहिजे असे बहुतेकांना वाटत असते आणि ते योग्यच आहे. करमणूक म्हणजे संवेदनसुख देणे हा कलेचा उद्देश असतो. निखळ करमणूक करणाऱ्या कलाकृती या साधारण ‘प्लॉट प्रेरित’ असतात. त्यांना करमणूकप्रधान म्हणतात; तर काही कलाकृती ‘विचार-ज्ञान प्रेरित’ असतात. त्यांना आशयप्रधान असेही म्हणतात. ‘प्लॉट प्रेरित’ आणि ‘थॉट प्रेरित’ यांतील फरक स्पष्ट करण्यासाठी एक अनुभव सांगतो. बऱ्याच वर्षांपूर्वी मी इंग्लंडमधील सुप्रसिद्ध लायब्ररीत गेलो होतो. ‘फिक्शन’च्या शेल्फवर आर्थर हेले, आर्चर, फ्रेड्रिक फोरसाइथ वगैरे ही मंडळी हारीने मांडून ठेवली होती. बाजूच्या ‘लिटरेचर’च्या शेल्फवर वर्जिनिया वूल्फपासून व्ही. एस. नायपॉल अशा लेखकांची पुस्तके होती. दोन्ही शेल्फ तुडुंब होती. दोन्ही शेल्फमध्ये करमणूक हा समान धागा आहे… आणि मला ‘प्लॉट’ आणि ‘थॉट’ प्रेरित यांतील फरक येथे गवसला. ज्ञान ही प्रवाही आणि मूलभूत ऊर्मी आहे. तिचा उगम मानवी मेंदूच्या ‘कुतूहल’ या क्षमतेत आहे. ज्ञान जिथे निर्माण होते तेथे ते साचून राहू शकत नाही. काही निर्मिक असे असतात, ते जेव्हा कलाकृती निर्मितात तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा प्रवाह नकळत-कळत त्यांच्या कलाकृतीत हळूच वाहत असतो. भाव-भावना तर असतातच; त्याशिवाय कलाकृती निर्माण होणार नाही. भावजाणिवांबरोबर ज्ञान- विचार, दर्शक-वाचक यांच्यापर्यंत सहजतेने पोचण्याच्या शक्यता वाढतात असे मेंदूविज्ञानात सिद्ध झाले आहे. ज्ञानप्रवृत्ती ही प्रवाही असते ती कथा, कादंबर्या, तसेच इतर ललितकला, दृश्यकला, यांतून नव्या मळवाटा शोधत समाजापर्यंत पोचते.
असे म्हणतात, ‘तुम्ही एकाच नदीत दोन वेळा पाय ठेवू शकत नाही.’ याचा अर्थ एकदा नदीत उतरून तुम्ही पुन्हा उतरता तेव्हा प्रवाह पुढे गेलेला असतो, नदी बदललेली असते, तुम्हीही बदललेले असता. तेच कथेलाही लागू आहे. तीच कथा वाचक दोनदा वाचू शकत नाही. म्हणजे एकदा कथा वाचली आणि पुन्हा केव्हातरी वाचायला लागल्यानंतर त्याच कथेचा निराळा अर्थ वाचकाला लागू शकतो. कारण वाचकही तोपर्यंत आतून बदललेला असतो. दरवेळेला तीच कथा वाचकाला निराळा अर्थ, वेगळा आनंद देते किंवा कथेबाबतचा भ्रमनिरासही करते. जो लेखक अशी निर्मिती करतो, त्याला अभिजात वगैरे म्हणतात असा माझा समज आहे. अर्थात वाचकही अभिजात असू शकतो. लेखकाला अभिजात करण्यात अभिजात वाचकांचा मोठा सहभाग असतो. वाचक लेखकाला मोठे करतात असे म्हटले तर वावगे होणार नाही.
काफ्कासारखे लेखक धूसर लिहितात, निष्कर्षाप्रत येत नाहीत; पण वाचक मात्र त्यातून त्याला हवा तो निष्कर्ष काढतो. असे का? याचे कारण मेंदूविज्ञानात आहे. मानवी मेंदूला ‘कन्फ्युजन’ – गोंधळ नको असतो. त्यामुळे अशा लेखनातून वाचक वाट काढतो आणि स्वतःपुरता काही निष्कर्ष काढतो, हा निष्कर्ष दरवेळेला निराळा असू शकतो.कागदावरचा वेळ संपला आहे. ‘द बरो’ या कथेबाबत पुन्हा केव्हातरी.
ता. क. झीनोचा पॅराडॉक्स (४९० – ४३० B C) हा मुळातून वाचण्यासारखा आहे. तो खरा का खोटा हा सवाल नाही; पण यामुळे गणित आणि तत्त्वज्ञान यांतील विचारांना चालना मिळाली असे मानले जाते.
