पुस्तक परीक्षण : जानेवारी २०२६

 श्रेष्ठ नाटककाराची सार्थ ओळख

शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार             

             ‘शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार’ हे प्रदीप कुलकर्णी लिखित पुस्तक, मुंबईच्या मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची वेधक आणि सविस्तर प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या मते शेक्सपिअरचे महत्त्व जगातील तमाम सुसंस्कृत समाजाने अतिशय प्रगल्भपणे स्वीकारले आहे. शेक्सपिअरची अनेक वचने, सुभाषिते झाली आहेत. जगातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये शेक्सपिअरची नाटके भाषांतरित झाली आहेत. कुमार केतकर यांनी शेक्सपिअरचा जीवनकाळ आणि भारतातील त्या वेळची आणि नंतरची सामाजिक परिस्थिती यांची तुलना केली आहे. त्यांच्या मते, ‘प्रदीपने सर्व महत्त्वाच्या व गाजलेल्या नाटकांचे कथानक, त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यांतील नाट्य अतिशय चित्तवेधक पद्धतीने मांडले आहे. या ग्रंथाने मराठी साहित्यविश्वाला समृद्ध केले आहे.’  ‘मनोगत’मध्ये प्रदीप कुलकर्णी यांनी, अकरावीच्या वर्गात असताना शेक्सपिअरच्या अभ्यासाची जिज्ञासा कशी निर्माण झाली, हे स्पष्ट केले आहे. शेक्सपिअरने एकूण ३७ नाटके लिहिली. मात्र त्याच्या काव्यलेखनाचा  या पुस्तकात विचार केलेला नाही. सुमारे तीन वर्षं शेक्सपिअरचा अभ्यास करून, हे पुस्तक साकारल्याचे लेखकाने स्पष्ट केले आहे. या पुस्तकात एकूण आठ प्रकरणे आहेत. पुस्तकाचे रंगीत, समर्पक मुखपृष्ठ सतीश भावसार यांचे आहे. 

      ‘ज्ञानाचा प्रबोधन काळ (रेनेसान्स)’ या प्रकरणात शेक्सपिअरच्या उदयापूर्वीची युरोपमधील सामाजिक परिस्थिती स्पष्ट केली आहे. या काळात ज्ञानप्रसारामुळे, धर्माचा पगडा कमी होऊन मानवतावादी दृष्टिकोण वृद्धिंगत झाला. इंग्लंडमध्ये सोळाव्या शतकात वाङ्मयाच्या विविध शाखा बहरल्या. नाट्यवाङ्मयाचा नेत्रदीपक विकास झाला. शेक्सपिअरसारखा अलौकिक प्रतिभावंत इंग्लंडमध्ये जन्माला आला. ‘शेक्सपिअरची जीवनयात्रा’ या प्रकरणात  विल्यम शेक्सपिअर याच्या जन्मापूर्वीची आणि नंतरची, त्याच्या कुटुंबाची सविस्तर माहिती दिली आहे.  त्यामुळे विल्यम शेक्सपिअरच्या समग्र कौटुंबिक जीवनाची वाचकाला कल्पना येते. त्याच्या हयातीत त्याला प्रसिद्धीचे मर्यादित वलय प्राप्त झाले होते. मात्र कालांतराने, विविध भाषांमध्ये त्याच्या नाटकांचे अनुवाद झाल्यामुळे, जगभरातील रसिकांना तो परिचित झाला. लंडनने शेक्सपिअरला अजरामर केले; तर शेक्सपिअरने इंग्लंडला जागतिक साहित्यक्षेत्रात उज्ज्वल नाव मिळवून दिले. नंतरच्या प्रकरणात शेक्सपिअर काळातील रंगभूमीचे सविस्तर वर्णन केले आहे. सोळाव्या शतकात वीज नसल्यामुळे लंडनला नाटकांचे प्रयोग दुपारी दोन वाजता सुरू होऊन, संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास संपत. त्या वेळचे लंडन आणि तेथील रंगभूमी हे दोन्ही आजच्या तुलनेत किती प्राथमिक अवस्थेत होते, याची वाचकाला कल्पना येते. नाट्यलेखक होण्यापूर्वी शेक्सपिअरला रंगभूमीवर, लहानमोठी, विविध कामे करावी लागली होती. शोकांतिका आणि सुखांतिका म्हणजे काय, याचेही स्पष्टीकरण प्रदीप यांनी दिले आहे.

     शेक्सपिअरने लंडनमधील  वीस वर्षांच्या कालावधीत एकूण सदतीस नाटके लिहिली. त्यांपैकी बावीस नाटकांचा परिचय प्रदीप कुलकर्णी यांनी अत्यंत मेहनत घेऊन, सविस्तरपणे करून दिला आहे. प्रत्येक नाटकातील मध्यवर्ती कल्पना, विविध पात्रे आणि नाटकाचे कथानक देऊन शेवटी त्या नाटकाचे महत्त्व विशद केले आहे. शेक्सपिअरचं माहात्म्य, या प्रकरणात, चारशे वर्षे उलटूनही शेक्सपिअरच्या आयुष्याविषयी आणि त्याच्या साहित्याविषयी संशोधकांचा अभ्यास अजूनही चालूच असल्याचे वाचकाला समजते आणि यामुळेच शेक्सपिअरला जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार असा सन्मान मिळाला आहे.  ग्रीक नाट्यकला आणि शेक्सपिअरची नाट्यकला यांमधील फरक प्रदीप यांनी स्पष्ट केला आहे. ग्रीक नाट्यकलेत, ‘नियती माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवते,’ हा विचार आढळतो; तर शेक्सपिअरच्या नाट्यकलेत, माणसाचे व्यक्तिमत्त्व,  त्याच्या स्वभावातील गुणदोष, त्याचे भविष्य घडवते, हा सारासार विवेकाला पटणारा विचार दिसून येतो. शेक्सपिअरने आपल्या नाटकांमधून निर्माण केलेली, नानाविध पात्रे मानवातील विविध स्वभाववैशिष्ट्ये दर्शवितात. शेक्सपिअरने परंपरागत धार्मिक संकल्पनांना आपल्या नाटकांतून स्थान दिले नाही. मानवी स्वभावदोष आणि त्यामधून निर्माण झालेली सदोष विचारपद्धती, हीच माणसाच्या अधःपतनाला आणि विनाशाला कारणीभूत ठरते, हे शेक्सपिअरला आपल्या विविध नाटकांतून दर्शवायचे आहे. लॉर्ड माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या (१७७९- १८५९) भारतातील कार्यकाळात, भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. नंतरच्या काळात इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे, शेक्सपिअरचा प्रभाव भारतीय साहित्यावर पडला. शेक्सपिअरच्या नाटकांचे विविध अनुवाद मराठीत केले गेले. त्याची माहिती शेवटच्या प्रकरणात प्रदीप यांनी दिली आहे.  शेवटी शेक्सपिअर-अभ्यासकांसाठी उपयुक्त माहिती, चार परिशिष्टांतून दिली आहे. प्रदीप कुलकर्णी यांनी पुस्तक लेखनासाठी अभ्यासलेल्या विविध संदर्भ ग्रंथांचा उल्लेख शेवटी करण्यात आला आहे. लेखकाचा सविस्तर परिचय शेवटी  दिला आहे. या पुस्तकात निवडक कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रांचाही सुयोग्य समावेश करण्यात आला आहे. ज्ञानाचा प्रबोधनकाळ, हे या पुस्तकातील पहिले प्रकरण सर्वांनाच अंतर्मुख करते आणि चिंतनप्रवृत्तही!

विल्यम शेक्सपिअर, (२३.४.१५६४-२३.४.१६१६) यांच्या ५२ वर्षांच्या आयुष्याची आणि त्यांनी लिहिलेल्या महान नाट्यकृतींची उत्तम ओळख या पुस्तकाद्वारे प्रदीप कुलकर्णी यांनी सुजाण मराठी वाचकांना करून दिली आहे.          _______________________

पुस्तकाचे नाव : शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार 

लेखक : प्रदीप कुलकर्णी 

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस गिरगाव, मुंबई – ४

(०२२) २०८३०२०७, २३८७३५०२

पहिली आवृत्ती : २३ एप्रिल २०२५

 पृष्ठे : ३९३   मूल्य : रु.७५०/- 

  ________________________

Author

Leave a Reply