
सुरत ते वडोदरा अंतर साधारण दीडशे किलोमीटर आहे पण रस्ता खूप चांगला असल्याने आम्हाला ते अडीच-तीन तासांत कापता आले. पूर्वी या शहराला आपण मराठीत बडोदे म्हणायचो किंवा इंग्रजीत बरोडा म्हणायचे पण त्यालाच १९७४ साली वडोदरा हे शहराचे मूळ नाव परत एकदा दिले गेले. या शहरात पूर्वी बरेच वटवृक्ष होते आणि त्यावरून वडोदरा हे नाव पडले होते असे म्हणतात. पण अजूनही बऱ्याच लोकांच्या तोंडी बडोदे किंवा बरोडा हे जुनेच नाव असते. विश्वामित्री नदीच्या काठावर वसलेल्या या शहराला साधारण पाचशे वर्षांचा सलग असा इतिहास आहे.
वडोदऱ्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच होणारी पहिली जाणीव म्हणजे सुरतच्या तुलनेने येथील दुकाने, इमारती, रस्त्यावरच्या मोटारी, लोकांचे एकूण राहणीमान हे खूपच साधे आहे. पूर्वीच आरक्षण केलेल्या हॉटेलमध्ये थोडे ताजेतवाने होऊन एका नातेवाइकाकडे जायला म्हणून आम्ही लगेचच बाहेर पडलो. पुढचे दोन दिवस आम्ही मुख्यतः नातेवाइकांना भेटण्यात घालवले. हल्ली अशा गाठीभेटी कमीकमी होत गेल्या आहेत. ज्यांना मी भेटलो त्यांच्या निदान तीन पिढ्या इथेच स्थायिक झालेल्या आहेत. त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पांतून वडोदऱ्यातील मराठी माणसांच्या जगण्याची थोडीफार झलक बघता आली.
बऱ्याच मराठी माणसांना वडोदऱ्याविषयी विशेष ममत्व असते. ‘गुजरातेतील पुणे म्हणजे बडोदे’ असेही पूर्वी म्हटले जायचे. आजही तिथे मराठी लोकवस्ती बरीच आहे. ज्यांच्या विनोदाने आजही मराठी माणसाला खळखळून हसू येते ते चिमणराव-गुंड्याभाऊचे निर्माते चिं. वि. जोशी इथलेच. ‘अभिरुची’सारखे दर्जेदार मासिक चालवणारे पुरुषोत्तम चित्रे आणि त्यांचे कवी असलेले चिरंजीव दिलीप हेही बडोद्याचे. वास्तुविशारद माधव आचवल, क्रिकेटपटू विजय हजारे, संगीतकार श्रीनिवास खळे, चित्रकार एन. एस. बेंद्रे, ग्रंथपाल श्री. बा. जोशी, अलीकडेच दिवंगत झालेले लेखक वि. वा. नेने ऊर्फ दादुमिया हे आणखी काही नामांकित बडोदेकर. पेशवाईत अनेक कर्तृत्ववान मराठे सरदार महाराष्ट्रातून लांबवर गेले आणि तिथे त्यांनी आपापली गादी स्थापन केली. महाराष्ट्रात राहिलेल्या संस्थानिकांपेक्षा ते खूपच अधिक संपन्न बनले. वडोदऱ्याचे गायकवाड हे त्यांच्यातील सर्वांत मोठे नाव. इतिहासात आणखी दोनशे वर्षे मागे गेले तर तंजावर येथील व्यंकोजी भोसले घराण्याचाही यात समावेश करावे लागेल. सयाजीराव गायकवाड महाराष्ट्रातून दत्तक गेलेले. त्यांची राजवट १८७५ ते १९३९ अशी प्रदीर्घ ६४ वर्षांची होती. त्यांच्या राज्याचा विस्तारही खूप होता आणि सुपीक जमिनीमुळे महसूलही खूप होता. अर्थात म्हैसूर संस्थान बडोदा संस्थानाच्या दुप्पट मोठे होते तर हैद्राबादचे संस्थान नऊ पट. पण तरीही देशातील श्रीमंत संस्थानांत बडोद्याची गणना होत असे.
सयाजीराव विचारांनी पुरोगामी होते. शिक्षणाचे महत्त्व ओळखून होते. त्यांनी शिक्षणाची उत्तम सोय केली होती, सुसज्ज ग्रंथालये काढली होती. गुजराती भाषादेखील मराठी व हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहायला महाराजांनी उत्तेजन दिले होते. बडोद्यात राहिलेल्या विनोबाजी भावे यांचेही मत तसेच होते. पण प्रत्यक्षात ते अंमलात येऊ शकले नाही. महाराजा सयाजीराव (एम.एस.) विद्यापीठ देशभरात प्रसिद्ध होते. विद्यापीठाची इमारतदेखील अतिशय देखणी आहे. तेथील सोशल वर्कचा, टेक्स्टाइल डिझायनिंगचा आणि आर्किटेक्चरचा कोर्स खूप विख्यात होता. शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येत. डॉ. आंबेडकरांना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. सयाजीरावांच्या काळात म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वीच बडोदा हे ‘स्मार्ट सिटी’ होते. रस्ते सरळ, प्रशस्त आणि स्वच्छ होते. दुतर्फा झाडे होती. सयाजी सरोवर बांधल्यानंतर राज्यातील प्रत्येक घरात नळाचे पाणी आले. संपूर्ण शहराचे ड्रेनेज बांधले गेले; जे त्या काळाचा विचार करता खूपच कौतुकास्पद होते. संस्थानातर्फे शाळा, रुग्णालये, उद्याने बांधली गेली. इंग्लंडमधील उत्तमातील उत्तम आर्किटेक्ट त्यासाठी महाराज नियुक्त करत असत. जगभरातील अनेक दुर्मिळ झाडे असलेली प्रशस्त सयाजी बाग ही कुठल्याही शहराला भूषण वाटेल अशीच होती. नागरी सेवांच्या बाबतीत अहमदाबादपेक्षा त्या काळात बडोदा अधिक प्रगत होते. राज्यातील उद्योगांनादेखील त्यांनी उत्तेजन दिले. बँक ऑफ बरोडा त्यांच्याच पुढाकारातून १९०८ साली स्थापन झाली. दुर्दैवाने सयाजीराव गुजरातेत असल्याने महाराष्ट्रात त्यांचे कार्य पुरेसे परिचित झाले नाही. खरे तर महाराष्ट्रातल्या संस्थांनिकांच्या तुलनेत त्यांचे कार्य खूपच अधिक आहे. औरंगाबादच्या बाबा भांड यांनी सयाजीरावांच्या कार्याची नोंद करणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध करून मोठे काम केले आहे.
संस्थानाच्या विलिनीकरणानंतर मात्र अन्य गुजरातच्या मानाने बडोदे काहीसे मागे पडत गेले. खुद्द बडोद्यात राहणाऱ्या मराठी लोकांच्या मानसिकतेत खूपच फरक पडत गेला. सयाजीराव मराठी-गुजराती असा भेदभाव करत नसत, पण तरीही पूर्वी त्यांना संस्थानात मराठी म्हणून थोडेसे प्राधान्य होते. हळूहळू हे बदलत गेले. मराठी संस्था डबघाईला आल्या; काहीतर बंदच पडल्या. अनेक जण बडोदे सोडून अन्यत्र वास्तव्य करू लागले. बडोद्याला येणे केवळ सणासुदीपुरते उरले. बडोदे शहराला पाचशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निघालेला “ईप्सित वडोदरा विशेषांक’ एकाने मला भेट दिला आहे. मोठ्या A-3 आकारातील या जाडजूड आणि देखण्या अंकातील अनेक लेख वाचताना त्यात ‘गेले, ते दिन गेले’ ही भावना ठळकपणे दिसून येते. त्या विशेषांकाच्या मार्मिक संपादकीयातील काही ओळी इथे उद्धृत करतो :
“असुरक्षिततेच्या भावनेतून बडोद्यातील मराठी समाज कधी आत्मकेंद्रित, कधी कचखाऊ, तर कधी अकारण आक्रमक बनलेला आढळतो… गायकवाडांच्या शासनामुळे मराठी समाजाकडे नेतृत्वाची धुरा आपसूकच आली होती आणि आर्थिक व्यवहार सोडल्यास इतर क्षेत्रांत गुजराती समाजाने ते नेतृत्व स्वीकारलेही होते. दुर्दैवाने मराठी समाजातील बुद्धिजीवी वर्गाला ती जबाबदारी पेलता आलेली दिसत नाही… समग्र बडोदे शहराचा साकल्याने विचार करण्याऐवजी मराठी नेतृत्वाने आपला आवाका मराठी जगतापुरताच सीमित ठेवला… आश्चर्याची बाब अशी की आपले वेगळेपण इतक्या कसोशीने जपूनही एक एकसंध समाज म्हणून आपण आपल्या अस्मितेसाठी, आयडेंटिटीसाठी एकत्रितपणे उभे राहू शकलो नाही. मराठी माध्यमाच्या शाळा एकापाठोपाठ एक बंद पडत असताना, मराठी साहित्यसंमेलन हातातून निसटून गेल्याची नामुष्की उभी असताना, मराठी संस्थांना मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायची निकड भासली नाही. वयं पंचाधिकं शतम् हा केवळ आदर्शवाद नसून व्यवहारीपणासुद्धा असतो हे आपण कधी ओळखलेच नाही.”
खुद्द वडोदरा शहरात आवर्जून उल्लेख करावा अशा दोन वास्तू आहेत. एक म्हणजे लक्ष्मी विलास पॅलेस आणि दुसरी म्हणजे त्याच्या जवळच असलेले फत्तेसिंग म्युझियम. या दोन्ही ठिकाणी आम्ही गेलो. लक्ष्मी विलास पॅलेस अतिशय भव्य आहे. भारतातील हे सर्वांत मोठे खासगी निवासस्थान आहे; अंबानी यांच्या अॅंटीलियापेक्षाही मोठे. १८९० साली हा एका विख्यात इंग्रज आर्किटेक्टने बांधला तेव्हा त्याला त्यावेळीचे साठ लाख रुपये खर्च आला होता. अवतीभवतीचे आवारही प्रचंड म्हणजे पाचशे एकरांचे आहे. (दिल्लीचे राष्ट्रपती भवन तीनशे एकरांचे आहे.) त्यात बाग तर आहेच पण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फकोर्सदेखील आहे. अर्थात गोल्फ क्लबच्या सदस्यांनाच तिथे प्रवेश आहे. असे म्हणतात की हा राजवाडा लंडनमधील बकिंगहम पॅलेस या शाही राजवाड्याच्या चौपट मोठा आहे. त्या वेळी आपण पराजित होतो, परतंत्र होतो आणि ब्रिटनचे आपल्यावर राज्य होते हे विचारात घेतल्यावर लक्ष्मी विलासची भव्यता निदान मलातरी काहीशी खटकली. राजवाड्यात शिरताना तुम्हाला ऑडिओ गाईड टेप दिली जाते व ती कानाला लावून तुम्ही त्या-त्या ठिकाणची सर्व माहिती ऐकू शकता. ती बरोबर एक तासाची आहे. आत अनेक झुंबरे, गालिचे, शोभेच्या वस्तू, शाही पोशाख, गालिचे, जुनी नाणी, फोटो वगैरे ठेवले आहे. विशेष म्हणजे आत अनेक आधुनिक बनावटीची हत्यारेदेखील आहेत. इंग्रज राजवटीत या हत्यारांचा उपयोग काय आणि कधी केला जात होता हा एक प्रश्नच आहे. राजवाड्यात आजही गायकवाड कुटुंबियांचे वास्तव्य असते व त्यामुळे बराचसा भाग त्यासाठी आरक्षित आहे; पण जो भाग जनतेसाठी मोकळा आहे तोही बघून बघून पाय दुखतील इतका मोठा आहे. संपूर्ण गुजरातमधील हा सर्वांत सुंदर राजवाडा आहे. इतर बहुतेक सर्व राजवाड्यांची आता हॉटेल्स केली गेली आहेत आणि इथेही तसेच एक भव्य हॉटेल सुरू होणार आहे असे कानावर आले.

फत्तेसिंग म्युझियम हे त्या एकूण आवाराचाच एक भाग आहे, पण चालत जायचे म्हटले तर अंतर साधारण दोन किलोमीटर आहे. ऐन उन्हाळ्यातील त्या तळपत्या दुपारी ते फारच त्रासदायक ठरले असते. सुदैवाने तिथे जायला सहा आसने असलेली बॅटरीवर चालणारी पाचसहा वाहने (गोल्फ कार्ट) उपलब्ध आहेत. त्यामुळे निदान प्रवासाचा त्रास टळला. पण कुठल्याही म्युझियममध्ये शिरले की आत भरपूर चालावे लागतेच. इतर कुठल्याही म्युझियमप्रमाणे इथे बघण्यासारख्या अनेक वस्तू आहेत.

रेल्वे स्टेशनजवळच्या लक्ष्मी विलास पॅलेसपासून तीन किलोमीटरवर असलेल्या सयाजी बागेचाही इथे उल्लेख करायला हवा. तिलाच कामटी बाग असेही म्हणतात. तिचा विस्तार ११३ एकर असून पश्चिम भारतातील ही सर्वांत मोठी बाग मानली जाते. इथे एक प्राणी संग्रहालयदेखील आहे. वडोदरा महानगर पालिका येथील व्यवस्थापन सांभाळते. येथील अजस्र मगरी विशेष प्रसिद्ध आहेत. मगरींवरून एक आठवले. यंदाच्या पावसाळ्यात विश्वामित्री नदीला मोठा पूर आला होता आणि त्या पुराच्या पाण्यातून बऱ्याच मगरी वडोदऱ्याच्या रस्त्यारस्त्यावर आल्या होत्या. आपल्या नेहमीच्या रस्त्यावर आठ-दहा मोठ्या मगरी पहुडल्या आहेत ही कल्पनाच आपण करू शकत नाही. खूप भीतीदायक असे दृश्य होते ते. पाणी ओसरल्यावर कसेबसे त्यांना पुन्हा नदीत सरकवले गेले. महाराजांनी १८७९ साली वीस लाख रुपये खर्चून बांधलेले बरोडा म्युझियम पर्यटकप्रिय आहे. तिथे इजिप्तमधील ममी, हस्तिदंताच्या कोरीव काम केलेल्या चिनी आणि जपानी वस्तू, कलापूर्ण पुतळे आणि विशेष म्हणजे येथील आर्ट गॅलरीत कॉन्स्टेबलसारख्या नामांकित युरोपियन चित्रकारांची मूळ (ओरिजिनल) चित्रे आहेत. इथला आरसे महालदेखील बघण्यासारखा आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आरशांत आपली प्रतिबिंबे किती चित्रविचित्र दिसतात ते मोठे गमतीदार आहे. ही जागा लहान मुलांच्या विशेष आवडीची आहे. यांतील बऱ्याचशा वस्तू महाराजांनी आपल्या राजवटीत जमवलेल्या आहेत. शिकारीत मारली गेलेली अनेक मोठी मोठी जनावरे तिथे भुसा भरून ठेवलेली आहेत. एक संपूर्ण मजला त्यासाठी दिलेला आहे.
सयाजी बाग
वडोदराबद्दल लिहिल्यानंतर महाराष्ट्रातील गुजरातबद्दलही इथे लिहावेसे वाटते. त्याबद्दल मागच्या लेखात उल्लेख केलेल्या दिनकरभाई जोषी यांनी अंतर्नाद मासिकात लिहिलेही आहे. त्यांचे कुटुंब गेल्या तीन पिढ्या म्हणजे १९१४ पासून मुंबईत आहे. ते स्वतः गेली पन्नासएक वर्षे मुंबईत कांदिवली (पश्चिम) येथे राहत आहेत. साहजिकच ‘महाराष्ट्रातील गुजरात’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. देना बँकेच्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजचे ते प्राचार्य होते. मुंबईतील गुजराती हे उपरे नाहीत, मुंबईत इतर बहुसंख्य मराठीभाषक जेव्हा आले त्याच्या खूप आधीपासून मुंबईत गुजराती लोक राहत आले आहेत असे मत व्यक्त करताना जोषी लिहितात,
“दहा पौंड इतक्या कमी किंमतीत पोर्तुगीजांनी विकत घेतलेल्या मुंबई टापूवर जेव्हा अगदी थोडे कोळी-मच्छिमारच राहत होते, तेव्हापासूनच गुजराती लोकांनी येथे वस्ती केली आहे. सुरतपासून मुंबई किंवा अलिबागपर्यंत दक्षिण बाजूचा प्रदेश त्यावेळी ‘लाट’ या नावाने ओळखला जायचा. त्यानंतर गुजरातमधील अणहिलपूर–पाटण येथील राजा भीमदेवाचा जेव्हा महमद गझनीच्या आक्रमणात पराभव झाला, तेव्हा त्याने लाट प्रदेशातील महिकावती नगरीत स्वतःची राजधानी वसवली होती, अशीही नोंद सापडते. असं म्हटलं जातं, की ही महिकावती म्हणजे आजचं माहीम आणि राजा भीमदेवाची गजशाळा, म्हणजे हत्तीखाना किंवा मातंगशाळाचं, इंग्रजी अंमलाच्या वर्षांमध्ये माटुंगा झालं.” (अंतर्नाद, दिवाळी अंक २०१०, पृष्ठ ३४)

दिनकर जोषी
१९६० सालापर्यंत मुंबई राज्य हे द्वैभाषिक होते; म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्हीचा त्यात समावेश होता. त्यावेळी मुंबई हेच गुजराती साहित्याचे मुख्य केंद्र होते. बहुतेक प्रकाशकांची कार्यालये इथेच होती. १९६० नंतर ती गुजरातमध्ये हलवली गेली. मुंबईतील व्यापाराची भाषा उघडउघड गुजरातीच होती. बहुतेक बडे उद्योगपती गुजरातीच होते, पण सामाजिक कार्यासाठी देणग्या देताना ते कधीच भेदभाव करत नसत. दैनंदिन व्यवहारातही गुजरातीचा वापर भरपूर होता. रस्त्यावरील, रेल्वे स्टेशन्सवरील आणि दुकानांवरील पाट्या मराठीप्रमाणेच गुजरातीदेखील असत. पण त्यावरून कधीच वाद निर्माण झाले नाहीत. दोन्ही समाजांमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते. उंधियू, ढोकळा, खमण, थेपला, कढी यांच्यासारख्या खाद्यपदार्थांप्रमाणेच खेडूत, चोपडी, लोचा, तेजी, मंदी, वांधा, दामदुप्पट, जेमतेम, अफरातफर, चरखा, पथारी असे अनेक गुजराती शब्द मराठीने स्वीकारले. मराठी माणसासाठी गुजराती भाषा तशीही समजायला फारशी कठीण नाही; संदर्भाने साधारण अर्थ लागतो. त्यांची लिपी मात्र मराठी, हिंदी किंवा देवनागरीप्रमाणे नाही; लिहिताना शब्दावर रेघ द्यायची पद्धत त्यांच्यात नाही.
मुंबईत किंग्ज सर्कल येथे मी बत्तीस वर्षे जिथे राहिलो त्या इमारतीत एकूण २४ बिऱ्हाडे होती आणि त्यांच्यापैकी बहुतेक सर्व गुजराती किंवा दक्षिण भारतीय होती. त्यांतील गुजराती शेजारी सगळे व्यापारी होते. त्यातले बरेच जैन होते. रोज सकाळी त्यांचे खास धोतर पांघरून आणि हातात पूजेचे ताट घेऊन ही मंडळी बाजूच्या देरासरात (देवळात) अनवाणी चालत जात. आम्ही लहान मुले एकत्र खेळायचो. क्रिकेट व डबा आइस पाइस हे आमचे आवडते खेळ. त्यातल्या डबा आइस पाइस या लपंडावासारख्या खेळात लपलेल्या मुलाचे नाव घेताना चूक झाली की सगळी मुले आपापल्या जागांवरून ‘हंडी फोडली, हंडी फोडली’ असे ओरडत बाहेर यायची. आज या शब्दप्रयोगाची गंमत वाटते. कारण तसा तो निरर्थक होता, पण सगळ्या भाषा बोलणारी मुले तोच मराठी शब्दप्रयोग करत! एकूणच सगळ्यांचे एकमेकांशी खिलाडू संबंध होते; वैरभाव तर बिलकूल नव्हता.
भारतीय विद्या भवनचे कन्हैयालाल मुनशी यांच्यासारखे नेते दोन्ही समाजांमध्ये सारखेच आदरणीय होते. जुहू विलेपार्ले येथील गुजराती शिक्षणसंस्था किंवा हरकिसनदाससारखी रुग्णालये सर्वांना सारखीच सेवा देत. मराठी नाटके अनेक गुजराती प्रेक्षक आवडीने पाहत. बहुसंख्य गुजराती वस्ती असलेल्या काळबादेवी येथील भांगवाडीत ‘देशी नाटक समाज’ या नाटक मंडळीच्या मराठी नाटकांचे प्रयोग साधारण ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीच्या काळात होत आणि ते बघायला मराठी प्रेक्षकांबरोबरच गुजराती प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर हजर असत. मराठी बालगंधर्व गुजराती प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होते. आजही अनेक मराठी नाटकांचे गुजराती अनुवाद रंगमंचावर गाजत असतात.
महाराष्ट्रात जसे गुजराती बांधव वास्तव्य करत आले आहेत तेच अनेक मराठी बांधवही गुजरातमध्ये वास्तव्य करत असत. सुप्रसिद्ध गुजराती लेखक व गांधीवादी नेते काका कालेलकर मुळचे मराठी पण गुजराती बांधव त्यांना ‘सवाई गुजराती’ मानत. पहिल्या भारतीय सिनेमाचे निर्माते दादासाहेब फाळके आणि लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर जन्माने मराठी असले तरी त्यांची यांची कर्मभूमी गुजरात हीच होती. असे अनेक मुद्दे जोषींशी बोलताना पुढे येतात. मराठी आणि गुजराती भाषकांतील सौहार्द हा स्थायीभाव आहे, ही प्रकृती आहे आणि त्यांच्यात अधूनमधून निर्माण होणारी तेढ ही विकृती आहे, तात्कालिक आहे याची साक्ष अशा वेळी पटते. भारतातील इतर भाषकांची परिस्थितीदेखील वरवरची कटुता बाजूला सारून आणि खोलात जाऊन पाहिले तर साधारण अशीच आहे.
