
माझ्या कामाची व्याप्ती वाढतच होती. अधूनमधून मला कोकण रेल्वेलासुद्धा जावे लागायचे. त्या ठिकाणी आधीच OFC Cable घातली होती. नवीन उपकरणे बसवण्यासाठी मला कोकण रेल्वेला जाण्याचा आदेश नवी दिल्लीहून निघाला. आता मी थेट रेल्वे मंत्रालयाच्या अधीन होतो; कारण सोलापूर परिक्षेत्रात पुणे ते वाडी ह्या भागात फक्त केबल घालण्याचेच काम होते. बाकीचे सोपस्कार म्हणजे – केबल तपासणे, जोडणे, उपकरणे लावणे आणि ती कार्यान्वित करणे इ. कामे नंतर होणार होती.
महाराष्ट्रातील रोहा (प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचे जन्म गाव – ज्यांनी आपल्या इंग्लंडमधील घराचे नाव ‘रोहे’असे ठेवले आहे.) ह्या स्टेशनापासून ते केरळमधील मंगलोर स्टेशनापर्यंत साधरणतः ७६० कि.मीचा रेल्वे मार्ग कोकण रेल्वे म्हणून ओळखला जातो. OFC Cable आधीच घातल्यामुळे मला स्टेशनवरच नवीन उपकरणे जोडणे आणि ती कार्यान्वित करणे आणि महालक्ष्मी, मुंबई येथील (पश्चिम रेल्वे) NMS (Network Management’s) Systemला ही सर्व उपकरणे जोडणे असे किचकट आणि अवाढव्य काम होते. सातशेसाठ कि. मी. म्हणजे काही ‘आलोच रे’ इतक्या हाकेच्या अंतरावरचे काम नव्हते. ही जोखीम मोठी आणि थोडीशी तणाव देणारी होती आणि त्यात ते कोकण – म्हणजे संध्याकाळी सातलाच सामसूम होऊन जायचे. पण रेल्वेच्या नियमाप्रमाणे Block हा रात्रीच म्हणजे रात्री 00:00 ते सकाळी 0५:00च्या दरम्यान असायचा. ह्या Blockच्या दरम्यान एकही रेल्वे त्या स्टेशनावरून तिच्या नेहमीच्या वेगाने धावणार नाही ही खातरी घेतली जायची. जी कामे रात्री ००:०० ते सकाळी ०५:०० वाजेपर्यंतच करावी लागतात अशा कामांना रेल्वेच्या भाषेत Block घेणे म्हणतात.
कारवार हे कोकण रेल्वेमधील एक मध्यवर्ती स्टेशन आहे. ह्या स्टेशनाला नवीन उपकरणे OFC Cable द्वारे जोडली आणि कार्यान्वित केली; पण त्याचा NMSशी संपर्कच होई ना. OFC Cableमध्ये काहीतरी गडबड आहे असे दिसले. OFC मापन यंत्राद्वारे कळले, की कारवारपासून ३.० किमी अंतरावर काणकोण स्टेशनाच्या दिशेला Cable मध्ये काहीतरी त्रुटी आहेत, म्हणून आम्ही सर्वजण रुळाच्या कडेने आमची उपकरणे, टॉर्च, Emergency Lamps घेऊन काणकोण स्टेशनाच्या दिशेने जाऊ लागलो. रात्रीचे १.३० वाजले होते. आम्ही सात-आठ जण होतो. साधारणतः २ कि. मी. अंतर चालल्यावर काही माणसे मोठे टोर्च घेऊन रेल्वेट्रॅककडे म्हणजे आमच्याकडेच येताना दिसली. त्यांना आमची चाहूल लागली असल्यामुळे ती तावातावात कोकणीमिश्रित मराठीत बोलत होती. त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ असा होता, की ‘आज एकाला तरी उडवायला, कापायलाच पाहिजे.’ त्यांचा हा संवाद ऐकून सगळ्यांच्याच पोटात गोळा आला. मी थोडासा अंदाज बांधायचा प्रयत्न केला आणि माझ्या लक्षात आले, की ही गावातीलच काही माणसे आहेत आणि आम्हांला चोर वगैरे समजत आहेत आणि आता काहीतरी गोंधळ होणार आहे हे नक्की! म्हणून मी लगेच जोरात ओरडलो आणि उगाच उसने अवसान अंगात आणून ओळख दाखवत त्या माणसांना ओरडत म्हणालो, “काका,काका मी आहे…हेमंत. ” परत तिकडून आवाज आला, “कोण रे तू हेमंत?” तोपर्यंत आम्ही तेथेच थांबलो होतो. ते लोक आमच्यापाशी आले आणि त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात आम्हांला न्याहाळले. आमचे त्यांच्याशी बोलणे झाल्यावर त्यांना कळले, की आम्ही रेल्वेची माणसे आहोत, त्यांच्या वाडीवर/वस्तीवर चोऱ्या करणारे चोर किंवा दरोडेखोर नव्हे. नंतर त्यांच्याशी बोलताना कळले, की दर दोन-तीन दिवसांनी त्या भागात चोऱ्या होत होत्या. त्यामुळे ते रात्री गस्त घालत होते आणि चोरांच्या टोळीमुळे वैतागलेले होते. आम्हां सर्वांना हायसे वाटले. एक मोठा अनर्थ टळला गेला. परत मला दुधनीची आठवण आली. कारवार हे कर्नाटकात आहे आणि काणकोण गोवा राज्यात आहे. चोऱ्या सीमावर्ती प्रांतातच का होतात? याचा अभ्यास करून पोलिसांनी गुन्हेगाराच्या एक पाऊल पुढेच राहायला हवे असे वाटून गेले.
आम्ही Cable दुरुस्त केली. त्या शेतकऱ्याने आम्हांला प्रेमाखातर रात्री ०२:३० वाजता आले घातलेला फक्कड चहा दिला. आम्ही त्याला मनापासून धन्यवाद दिले आणि आम्ही परत कारवारकडे पायी निघालो. महालक्ष्मी येथील NMSला उपकरण जोडले गेले आणि उपकरण कार्यान्वित करून मी कारवारच्या रिटायरिंगरूममध्ये उद्याचा विचार करत झोपलो.
एकूण मला बारा स्थानके कार्यान्वित करावयाची होती. कोकण रेल्वेच्या आणि भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनात मला खूप फरक आढळला. सद्यःस्थितीत कोकण रेल्वे भारतीय रेल्वेचाच भाग झाला आहे. मी जेव्हा कोकण रेल्वेत गेलो होतो तेव्हा ते महामंडळ (Corporation) होते. तेथील सुरक्षिततेचे नियम बरेच शिथिल होते.
रेल्वेसाठी ज्यांची जागा /शेतजमीन दिली गेली त्या कुटुंबातील एका व्यक्तीला नियमानुसार नोकरी दिली गेली होती. अशा नियमांतर्गत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना, शैक्षणिक पात्रतेनुसार भरती झालेले कर्मचारी विनोदाने कोकण रेल्वेत ‘LLB (Land Looser Batch)’ असे म्हणायचे. आता सर्वकाही नियमानुसार होते. मडगाव ते मंगलुरु अशी बारा स्थानके मला पूर्णपणे कार्यन्वित करून निघायचे होते. त्यात काही गडबड झाली की मुक्काम वाढणार होता. वाढीव मुक्काम नको म्हणून झोपेची तडजोड माझ्याकडून स्वाभाविकपणे केली गेली. याचा बाकीच्यांना त्रास झाला. असो, चालायचंच!
माझ्याबरोबर Alcatel Co. फ्रांसचा अभियंता होता. कारण नवीन उपकरणे त्या फ्रांसमधील कंपनीची होती. तो अभियंता नागपूरचा होता. साधारण २५ वर्षांचा असेल. एक सुयोग्य वर म्हणून पात्र होता. आमच्या तशा गप्पाही चालायच्या. एक दिवस NMS चा मला call आला. काणकोणच्या उपकरणाशी त्यांचा पुन्हा संपर्क होत नव्हता. आम्ही दोघे काणकोणला पोहोचलो आणि लक्षात आले, की उपकरणातील एक Unit खराब झाले आहे; ते बदलावे लागेल म्हणून तो मला तेथेच थांबवून उडुपीला तेथे असलेले जास्तीचे उपकरण आणायला गेला. वेळेचा आणि त्या मार्गावरील रेलवाहतुकीचा विचार केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत उपकरण ठीक होईल असे वाटत होते. मी काणकोणच्या निरीक्षकाची गाडी घेतली आणि जवळपास भटकंती केली. दुसऱ्या दिवशी मी परत काणकोण स्टेशनवर गेलो. सकाळची DEMU (Diesel Electric Multiple Unit ) आपल्या भाषेत ‘प्यासिंजर गाडी’ उडुपीहून निघून ती सकाळी दहाच्या सुमारास काणकोणला पोहोचते. गाडी आली आणि गेली पण तो अभियंता काही दिसला नाही. त्याचा मोबाइलसुद्धा लागे ना! नक्की काय झाले हे मला मुंबईला सांगता येई ना. तो दुपारी चारच्या सुमारास काणकोण स्टेशनमध्ये आला. आम्ही घाईघाईने ते युनिट लावले आणि उपकरण पूर्ववत केले आणि NMSला संपर्क होऊ लागला.
त्याने उशीर होण्याचे सांगितलेले कारण मजेशीरच होते. काणकोणला उत्तम समुद्रकिनारा असल्यामुळे तेथे बरेच परकीय प्रवासी येत असत. उडुपीला जेव्हा आमचा इंजिनियर ते युनिट घेऊन गाडीत चढला तेव्हा त्याच्याबरोबर (आपल्या दृष्टीने) कमी कपड्यांतील बरेच परकीय स्त्री/पुरुष गाडीत चढले. त्याला वाटले हेसुद्धा आता काणकोण स्टेशन येथेच उतरणार. अधूनमधून डुलकी घेत तो त्यांना निरखत होता. त्या अभियंत्याच्या दुर्दैवाने ती सर्व परकीय मंडळी नेमकी मडगावला (एक स्टेशन पुढे) उतरली. ह्याला वाटले काणकोण स्टेशन आले. स्टेशनचे नाव बघितल्यावर ह्याचे धाबे दणाणले. काहीतरी शक्कल लावून हा काणकोण स्टेशनला पोहोचला. झालेला प्रसंग मला सांगताना त्याचा चेहऱ्यावर शंभर सशांची व्याकुळता दिसत होती आणि मला सारखे हसू फुटत होते.
OFC cable म्हणजे काय? हे खालील लिंक वरून कळेल.
