पुस्तक परीक्षण – डिसेंबर  २०२५

  दूरदृष्टीचा, समाजहितैषी

    – :  र.धों.कर्वे  : –

‘ समाजस्वास्थ्य’कार, संततिनियमनाचे आद्य पुरस्कर्ते, र. धों.कर्वे, हे डॉ.अनंत देशमुख यांचे पुस्तक संधिकाल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये अनंत देशमुख यांनी र.धों.कर्वे यांच्या, त्यांनी लिहिलेल्या तीन चरित्रांचे, अन्य उपलब्ध तीन चरित्रांशी तुलना करून, सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. या पुस्तकात एकूण अठरा प्रकरणे आहेत. शेवटी रघुनाथ कर्वे यांचा जीवनपट सविस्तरपणे  उलगडला आहे.  सूची आणि संदर्भग्रंथ यांची उपयुक्त माहिती दिली आहे. अनंत देशमुख यांच्या, रंगीत छायाचित्रासह, त्यांच्या लेखनाविषयीची माहिती, पुस्तकात शेवटी दिली आहे. पुस्तकाचे रंगीत आणि सुयोग्य मुखपृष्ठ सतीश खानविलकर यांचे आहे.

          पहिल्या प्रकरणात, इंग्रजी राजवटीखालील एकोणिसाव्या  शतकातील महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला आहे. ‘प्रारंभीचे दिवस’मध्ये धोंडो केशव कर्वे यांचे लग्न राधाबाई यांच्याशी झालेले होते. राधाबाईंच्या पोटी १८८२ सालच्या १४ जानेवारीला रघुनाथ यांचा जन्म झाला. त्या काळात कोकणातील बहुसंख्य व्यक्ती शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी मुंबईकडे समुद्रमार्गाने जात होत्या.  १८९७ मध्ये रघुनाथ मॅट्रिक झाला तेव्हा महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी महाविद्यालये होती. उच्च शिक्षण घेणारांची संख्या हळूहळू वाढत होती. त्या काळी श्रीमंत कुटुंबांतील, कॉलेजमध्ये शिकणारी,  हॉस्टेलवर राहणारी मुले लग्न झालेली असत.  लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे काही विवाहित विद्यार्थी घरापासून दूर शहरात असल्याने, गुप्तरोगांना बळी पडत असत. त्याच काळात वाढत्या लोकसंख्येची समस्या रघुनाथ यांना जाणवू लागली. १९०५ मध्ये  पुण्यात बी.ए. झाल्यावर  शिक्षण शास्त्रातील पदविका घेण्यासाठी त्यांनी मुंबईतील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रघुनाथ यांनी फ्रेंच भाषेचे शिक्षण, प्रा. पेल्तिए यांच्याकडून घेतले. लवकरच ते त्यांचे लाडके विद्यार्थी झाले. १९०८ साली रघुनाथ यांची एल्फिन्स्टन कॉलेजात गणिताच्या प्राध्यापकांचे साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. त्याच वर्षी ते गणित विषय घेऊन एम.ए. झाले; परंतु त्यांना क्लास मिळाला नाही. १९१० साली रघुनाथ यांचा मालतीबाई यांच्याशी प्रेमविवाह झाला. १९१४ पासून रघुनाथ यांनी आपल्या स्वतंत्र लेखनाला सुरुवात केली.

      १९१७ नंतर दीड वर्षे रजा घेऊन रघुनाथ गणित विषयात पीएच.डी. करण्यासाठी आणि संतती नियमन, गुप्तरोग, स्त्रीपुरुषसंबंध या विषयांचा अभ्यास करण्यासाठी पॅरिसला गेले. तेथे त्यांनी तेथील वातावरणाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न केला;  मात्र मार्गदर्शक प्राध्यापकाशी मतभेद झाल्याने त्यांचे डॉक्टरेटचे काम पूर्ण झाले नाही. सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर रघुनाथरावांनी परळ भागात संततिनियमनाचे केंद्र सुरू केले. कोणाही  पुरुषाने येऊन या विषयासंबंधात आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात अशी त्यांची अपेक्षा होती. हळूहळू लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. रघुनाथरावांनी आपल्या 

पत्नीला पद्धतशीर शिक्षण देऊन, त्यांच्याद्वारे स्त्रियांसाठी हेच कार्य सुरू केले. पुण्यात शकुंतलाबाईंनी हे कार्य सुरू ठेवले, तसेच त्या खेड्यापाड्यांत जाऊन यासंबंधीची माहिती देत असत. संततिनियमनाची साधने  उपलब्ध व्हावीत  म्हणून रघुनाथ यांनी ‘राईट एजन्सी’ निर्माण केली होती. १९२६ मध्ये रघुनाथराव त्यांचे बंधू डॉ. शंकरराव  यांच्याकडे नैरोबीला नोकरीसाठी गेले होते; परंतु तेथेही त्यांना अपेक्षित नोकरी न मिळाल्याने रघुनाथ साडेपाच महिन्यांनी मुंबईला परतले. संततिनियमनाच्या कार्यात रघुनाथ यांना डॉ. रॉबिन्सन, डॉ.नॉर्मन हेअर, हॅवलॉक एलिस,सिग्मंड फ्रॉइड यांच्याकडून प्रेरणा प्राप्त झाली. 

मार्गारेट सॅंगर, हाऊ मार्टिन या विदेशातील संततिनियमनाचे कार्य करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या हितचिंतक होत्या. १९२१ साली रघुनाथ यांनी ‘संततिनियमन’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. १९२३ साली त्यांनी परळ भागात आपले क्लिनिक सुरू केले. १५ जुलै १९२७ पासून  ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक रघुनाथ यांनी सुरू केले. समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने, ज्या विषयांची चर्चा व्हावी असे त्यांना वाटे, त्या सर्व विषयांचा अंतर्भाव त्यांनी आपल्या  नियतकालिकात केला होता. त्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी विचारांना प्राधान्य दिले. समाजातील अंधश्रद्धा, जुन्या रूढी आणि परंपरा यांच्यावर हल्ला करण्यावर त्यांचा भर राहिला. साहित्य समीक्षा, पुस्तक परीक्षणे, आरोग्य, व्यायाम, गृहकर्मे अशी विविध सदरे होती. वाचकांच्या पत्रव्यवहारालाही स्थान दिले गेले. विरोधी छापून येणाऱ्या विचारांचा समाचार घेण्यासाठी, त्यांनी ‘शारदेची पत्रे’ हे स्वतंत्र सदर सुरू केले. सत्य नेहमीच कटू असते, हे स्पष्ट करण्यासाठी मासिकाच्या मुखपृष्ठावर नग्न, अर्धनग्न स्त्रियांची चित्रे देण्यावर त्यांचा कटाक्ष राहिला. रघुनाथरावांची समाजस्वास्थ्य विषयक भूमिका अतिशय स्पष्ट आणि रोखठोक होती. पहिल्या अंकाच्या आरंभी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. समाजस्वास्थ्यचा अंक २४ पानांचा असायचा. बहुतेक सर्व मजकूर रघुनाथ यांचाच असायचा. कारण त्यांना लेखकांना मानधन देणे परवडणारे नव्हते. फ्रांसमध्ये मुक्त स्त्रीसंबंधाला आणि तशा विचारांना स्वातंत्र्य होते. पॅरिसच्या फूटपाथवर त्या विषयाला वाहिलेली पुस्तके, नियतकालिके, चित्रसंग्रह  सहजपणे उपलब्ध होत असत. त्यांतील मजकुराचा आणि चित्रांचा रघुनाथ आपल्या प्रकाशित होणाऱ्या अंकांमध्ये उपयोग करून घेत असत. विविध प्रकारचे अंक रघुनाथ यांनी काढले होते. त्यांची माहिती सविस्तरपणे  डॉ. देशमुख यांनी दिली आहे. त्यामधून रघुनाथ यांचे बुद्धिप्रामाण्यवादी विचार दिसून येतात. रघुनाथ यांना कला, साहित्य, संगीत या विविध विषयांमध्ये रस होता; त्यामध्ये ते वेळोवेळी सहभागी होत असत. 

समाजस्वास्थ्यमधील प्रकाशित मजकुरावर अश्लीलतेच्या मुद्द्यांवर, वेळोवेळी खटले दाखल केले गेले. या खटल्यांचा सविस्तर ऊहापोह देशमुख यांनी केला आहे. अहिताग्नी राजवाडे, मनोरमाबाई थत्ते, मनोरमाबाई खाबडे, कॅप्टन पिल्ले, डॉ.स्टोन हे ‘समाजस्वास्थ्य’चे विरोधक का होते, हे देशमुख यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. रघुनाथ यांच्या ग्रंथलेखनाविषयी आणि रीझन या इंग्रजी नियतकलिकातील कार्याविषयी देशमुख यांनी माहिती दिली आहे. रघुनाथ यांचा स्वभाव कसा होता याचे सुंदर विश्लेषण अनंत देशमुख यांनी केले आहे; त्यामध्ये त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू वाचकांसमोर उलगडत जातात. १९४४ मधील दिवाळीच्या पहिल्या दिवशी, रघुनाथ यांच्या पत्नी – मालतीबाईंचा – दीर्घ आजारानंतर, मृत्यू झाला. १९३७ पासून रघुनाथ  यांना रक्तदाब विकाराचा त्रास सुरू झाला होता. शारीरिक दुखणी असतानाही त्यांची व्याख्याने, लेखन नियमितपणे चालू होते. नोकरीविना त्यांचे सारे आयुष्य प्रचंड हलाखीचे, खडतर होत होत गेले. त्यांच्या जीवनकाळात समाजाने त्यांची आणि त्यांच्या कार्याची यथोचित दखल घेतली नाही. परंतु १९५२ साली त्यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली तेव्हा न्या.एम.सी.छगला यांच्या अध्यक्षतेखाली रघुनाथ यांचा सत्कार केला गेला. या वेळी रघुनाथरावांच्या कार्याविषयी समुचित व्याख्याने झाली. त्यांचा गौरव करणारे लेखही लिहिले गेले. १४ ऑक्टोबर १९५३ रोजी त्यांचे निधन झाले. धोंडो केशव कर्वे आणि रघुनाथ हे पितापुत्र,आपापल्या कार्याशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. परस्परांचे महत्त्व ते जाणून होते; म्हणूनच अण्णांनी रघुनाथ यांना वेळोवेळी आर्थिक मदत केल्याचे  उल्लेख आहेत.

      समाजहिताची जाण असणाऱ्या, दूरदृष्टीच्या, भारतातील एका महान समाजसुधारकाचा डॉ.अनंत देशमुख यांनी उत्तमप्रकारे, समग्र परिचय करून दिला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात, भारत सरकारने, शासकीय पातळीवर जगभरात सर्वप्रथम, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम स्वीकारला. यातूनच रघुनाथ कर्वे यांच्या महान कार्याचे महत्त्व स्पष्ट होते. या पुस्तकात राहून गेलेले, लहान-मोठे मुद्रणदोष खटकतात, ते टाळले असते तर उत्तम झाले असते.

      __________________

पुस्तकाचे नाव : र. धों. कर्वे. 

लेखक : डॉ.अनंत देशमुख 

प्रकाशक : संधिकाल प्रकाशन, नवघर, भाईंदर (पू).  ९८२०५९५२८२

प्रथमावृत्ती : ऑगस्ट, २०२५ 

पृष्ठे :१४३        मूल्य : रु.२५०/- 

 

Author

Leave a Reply