‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग

मानवजातीच्या विकासप्रक्रियेत समाजाचं रूप सतत बदलत गेलं. अविकसित अवस्थेत माणसाचे प्रमुख प्रश्न होते : अन्न, निवारा आणि उपजीविका. जगण्यासाठी लागणाऱ्या या तीन गरजाच त्याच्या आयुष्याचं केंद्रबिंदू होत्या. संघर्ष होता फक्त अस्तित्व टिकवण्याचा. हे आदिमानवाच्या स्थितीचं वर्णन आहे का? नाही! अगदी स्वातंत्र्योत्तर भारतातही अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येत होती. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे फक्त ‘जगणं’ – एवढंच!

हळूहळू भारतीय समाज विकासाच्या टप्प्यात प्रवेश करू लागला. माणूस फक्त जगण्यासाठी नव्हे, तर चांगलं जगण्यासाठी झगडू लागला. यातून शिक्षण, आरोग्य आणि ‘जीवनमान सुधारणा’ या नव्या गरजा पुढे आल्या. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या पलीकडे त्याचा विचार पोहोचू लागला. शिक्षणाद्वारे ज्ञान वाढवणं, वैद्यकीय सेवा सुधारणं आणि जीवनशैलीत सुधारणा करणं हे प्रगतीचं चिन्ह ठरलं. या काळात उद्योगधंदे वाढले, शहरे फुलली आणि संवादसाधनांची क्रांती झाली. लोकांच्या आकांक्षा उंचावल्या आणि ‘उत्तम जीवनशैली’ हेच नवीन स्वप्न बनलं. स्वातंत्र्यानंतरची साठ-सत्तर वर्षं भारताने या प्रवासात घालवली – अविकासातून विकासनशीलतेकडे वाटचाल करत. पण इथे एक प्रश्न उभा राहतो – या सुधारणांच्या शर्यतीत माणसाला खरंच ‘आनंद’ सापडला का? की जीवनाच्या वेगाने धावताना मन मागे राहिलं?

गेल्या दहा- पंधरा वर्षांत एक नवं चित्र समोर येत आहे. सुखसोयी वाढल्या, तंत्रज्ञानाने जग हाताच्या तळव्यावर आलं; पण  मनामध्ये मात्र एक पोकळी निर्माण झाली आहे. आपल्यालाही कधी जाणवतं – ‘सगळं आहे, पण काहीतरी कमी आहे!’ हीच ती आधुनिक पोकळी. भौतिक गरजा पूर्ण झाल्या; पण मानसिक शांती हरवली. एकटेपणा, ताण आणि अस्वस्थता  हेच नवे साथीदार झाले. संपर्क वाढले; पण संवाद कमी झाला. माणूस स्वतःमध्येच बंदिस्त झाला. विकसित देशांमध्ये हीच स्थिती दिसते – समृद्धी आहे, पण समाधान नाही आणि आता भारतीय समाज – विशेषतः शहरी समाज – हळूहळू त्याच दिशेने जात आहे.

शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान सुधारणा या आपल्या विकसनशील समाजाच्या गरजा आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत; पण आता त्यासोबतच ‘मानसिक समाधानाची’ गरज अधिक तीव्र झाली आहे. माणूस गर्दीत असूनही एकटा पडत आहे. कुटुंब, शेजार आणि संस्कृतीशी असलेली नाती सैल झाली आहेत.

ही तूट भरून काढण्यासाठी काय करायला हवं? 

याचं एक उत्तर आहे : सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात पुन्हा सक्रिय सहभाग! संस्कृती, कला, संगीत, नाट्य, लोककला  ही केवळ मनोरंजनाची साधनं नाहीत. ती मनाला जोडतात, विचारांना दिशा देतात आणि समाजाशी एकरूप करतात. हाच अनुभव तर मानसिक समाधानाचा पाया आहे. सांस्कृतिक उपक्रम माणसाला त्याच्या मुळांशी आणि परंपरेशी जोडतात. या माध्यमातून आपुलकीचा भाव निर्माण होतो. हीच भावनिक जोड व्यक्तीला स्थैर्य आणि समाधान देते.

शेवटी प्रश्न एकच – आपल्याला फक्त विकसित व्हायचं आहे का? की सुसंस्कृतही व्हायचं आहे? व्यक्तीने स्वतःला समाजाशी आणि समाजाने स्वतःला संस्कृतीशी जोडलं, तरच निर्माण होईल एक संतुलित, सुसंस्कृत आणि शांत समाज. या सांस्कृतिक मूल्यांचा विकास आणि संवर्धन  हाच मानसिक समाधानाकडे नेणारा खरा मार्ग आहे.

Author

Leave a Reply