अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(६) 

आकाशवाणीचं हे ….

                                             ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।

                                              वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’

(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)

भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या  जोरदार आक्रमणामुळे  आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते;  परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले.  स्वतःचे ॲप तयार केले.  विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली.  त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व  विश्वासार्हता टिकवून आहे.  शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत. 

भाग ६

मी कात टाकली!

आकाशवाणीमध्ये कार्यक्रमांच्या ध्वनिमुद्रणाबाबत ‘डिजिटल-हार्ड डिस्क बेस्ड’ रेकॉर्डिंग तंत्रज्ञानाने क्रांती घडवली. प्रसारणाबाबत ज्या फ्रिक्वेंसी मॉड्युलेशन (एफएम टेक्नॉलॉजी) रेडिओ लहरींनी आसमंत व्यापून टाकायला सुरुवात केली असे मी म्हणालो त्यापूर्वीचे चित्र जरा समजून घेऊ या, म्हणजे आकाशवाणीच्या कात टाकण्याला तंत्रज्ञानाने कशी मदत केली हेही लक्षात येईल.

अगदी अलीकडे २००२ पर्यंत जवळपास सगळं ध्वनिमुद्रण मॅग्नेटिक टेप्सवर व्हायचं.१५ मिनिटे आणि अर्धा तास पुरतील असे छोटे आणि मोठे टेप्सचे ‘स्पूल’ असायचे.ग्रंथालयातल्या सरासरी अडीच ते तीन हजार टेप्सपैकी काही टेप्सचा कोटा विविध कार्यक्रम विभागांना वाटून दिलेला असायचा. या मॅग्नेटिक टेप्सवर ध्वनिमुद्रण व्हायचं. ध्वनिमुद्रण कच्चे किंवा त्यात अनावश्यक भाग असेल तर डबिंग-एडिटिंग करून फायनल टेप तयार करायला आणखीन काही टेप्सची गरज पडायची. कार्यक्रमाच्या जास्त प्रती करून इतर केंद्रांना त्या पाठवायच्या असतील तर आणखीन टेप्स लागायच्या.या टेप्सची स्टुडिओतून ने-आण, प्रसारण कक्षातून ने-आण, पोस्टातून ने-आण हे सगळं जिकिरीचं असायचं. हे सगळं ठेवायला आणि हाताळायला जागादेखील खूप लागायची. न वापरलेल्या किंवा बराच काळ प्रसारित न झालेल्या मॅग्नेटिक टेप्स काही वेळा वेटोळ्यांमध्ये चिकटून जायच्या. याला ‘स्टिकी होणे’ असं म्हटलं जायचं. ध्वनिमुद्रण किंवा प्रसारण दोन्ही प्रक्रियांत अशा चिकटलेल्या टेप्स अडकण्याचा मोठा अडसर असायचा. अशा टेप्स वापरण्यापूर्वी फास्ट फॉरवर्ड, फास्ट रिवाइंड करून त्यांना ‘स्टिकी’ होण्यापासून वाचवण्याची काळजी घेतली जायची. टेप्सचे साम्राज्य सुमारे ६० वर्षांहून अधिक काळ होते.‘टेप्स’ची सद्दी, इंटरनेट आणि हार्ड डिस्क, सी.डी.वरील रेकॉर्डिंगमुळे संपत आली. ‘जागा’ हा प्रश्न मिटला. भरपूर रेकॉर्डिंग करायला वाव मिळू लागला. संगणक आणि सीडीजमुळे ध्वनिमुद्रणाची, संपादनाची (डबिंग, एडिटिंग), ते सांभाळून ठेवण्याची (प्रिझर्वेशन), त्याच्या प्रती तयार करण्याची (कॉपींग) इत्यादी सर्व प्रक्रिया गतिमान झाल्या.

आकाशवाणीतल्या जुन्या-नव्या पिढीने हे बदल आत्मसात केले. कार्यक्रमकर्मींनी संगणक कुशलता अंगी बाणवली. एक मोठा बदल पचवत असतानाच सीडीही वेगाने मागू पडू लागल्या. त्यांना लागणारी जागा ही आता अडसर वाटू लागली. पेन ड्राईव्ह नावाचा चमत्कार कामी आला. ‘लॅन’मुळे आकाशवाणी केंद्रातल्या कुठल्याही स्टुडिओतून इतरत्र कुठेही ‘कार्यात्मक स्थलांतर’ फार सहज आणि सोपं झालं. सगळे संगणक एकमेकांना जोडले गेलेहोते. अधिक सफाईने मंडळी संपादन करू लागली. गती वाढल्याने कामाचा मोठा व्याप (क्वांटम) सांभाळणे, स्वीकारणे, हाताळणे शक्य झाले. बाहेरच्या ठिकाणी लॅपटॉपवर ध्वनिमुद्रण, संपादन करून ते स्टुडिओत पाठवणंही शक्य झालं. 

या काळात म्हणजे जवळपास ३०-४०-५० वर्षे जुन्या टेप्सवरील आणि सीडीवरील दुर्मीळ  कार्यक्रमांचा ऐवज पुन्हा वापरणे, पुन्हा प्रसारित करणे हे सोपे झाले. समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) उपस्थिती सोपी होत गेली; वाढत गेली. यूट्युब, फेसबुक,व्हॉट्सॲप, वेबसाईट्स, ट्विटर इत्यादी सर्व ठिकाणी ‘आकाशवाणी’ची ठळक उपस्थिती शक्य झाली. तिचा ‘कनेक्ट’ वाढला. या सगळ्याचा परिणाम श्रोता-संख्या वाढण्यावर झाला. हे सर्व घडताना आकाशवाणीने परंपरेने जी भूमिका पार पाडली त्यात शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार हा एक वादातीत मुद्दा आहे. दुसरे कुठलेही माध्यम शास्त्रीय संगीताला जेवढा वेळ आकाशवाणी देते, त्या तुलनेत १० ते १५ टक्केसुद्धा देऊ शकलेले नाही.शास्त्रीय संगीताचा खरा आणि मोठा आधार केवळ आकाशवाणीच राहिली आहे.

शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि लोकप्रियता याचं आकाशवाणीला असलेल श्रेय पं. भीमसेन जोशी, राम मराठे, प्रभा अत्रे यांसारखे मान्यवर कलावंतही बोलून दाखवितात. अगदी अलीकडे यालाही ग्रहण लागले आहे. शास्त्रीय संगीताचा वेळ प्रायोजित कार्यक्रम खाऊ लागले आहेत. धुरिणांनी धोका ओळखायला हवा. या खंडप्राय देशातील कानाकोपर्‍यांतील लेखक आणि कलावंत, शेकडो बोलीभाषांचे आपापले रंगढंग यांच्याकरता आकाशवाणी सातत्यानं आधार म्हणून राहिली आहे.

तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी असणार्‍या कितीतरी विशिष्ट श्रोत्यांच्या कार्यक्रमांमधून (स्पेशल ऑडियंस प्रोग्रॅम) नवीन प्रतिभांना समाजासमोर येणं रेडिओमुळेच शक्य झालं आहे. त्यांना अभिव्यक्तीचं समाधान दिलं आहे. कार्यक्रमाच्या शैली (फोरमॅट्स) तरी किती विविध आहेत! मुलाखत, चिंतन, कथा-कविता, भाषण, श्रुतिका, संगीत, नाटक, रूपक, चर्चा, परिसंवाद असे कितीतरी! दिवस-रात्र निव्वळ बातम्यांसाठी तर आकाशवाणीला पर्याय नाही, असं अनेकांना ठामपणे वाटतं. आकाशवाणीचा भौगोलिक विस्तार आणि त्यामुळे ९८ टक्के लोकांपर्यंत पोहचता येणे ही केवढी ताकद आहे. प्रचंड प्रमाणातील निरक्षरतेमुळे वर्तमानपत्रांचा स्पर्शही असंख्य लोकांना आजही होत नाही. लक्षावधींची आर्थिक स्थिती ही अशी आहे, की महागडे दूरदर्शन खेड्यापाड्यांतील लोकांना घेणे अशक्य आहे. उलट छोटासा ट्रांझिस्टर मात्र खडी फोडणार्‍या मजुराला उत्तमोत्तम गाणी ऐकवीत बसलेला असतो. होस्टेलवरच्या मुलामुलींना आपल्या खोलीत ट्रांझिस्टर हा मित्र वाटतो. अलीकडे ‘अ‍ॅप’मुळे कोणतेही केंद्र कुठेही ऐकण्याची सोय झाली आहे. या ‘तांत्रिक’ प्रगतीने पुन्हा एकदा नव्याने श्रोता जोडला जातोय.

आपल्यासारख्या सांसदीय लोकशाही असलेल्या देशात सरकारी धोरण आणि योजना यांची पुरेशी माहिती देण्याचं काम आकाशवाणीनं एक आद्यकर्तव्य म्हणून सातत्यानं केलं आहे. हुंडा, धूम्रपान, व्यसनाधीनता, निरक्षरता यांसारखे सामाजिक कलंक धुण्याचे काम करताना आकाशवाणीनं ही समाजसुधारकाची भूमिका पार पाडली आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची छोटी छोटी मनोगतं प्रभावीपणे मांडली आहेत. शेकडो केंद्रांवरून होणारा शेतीविषयक कार्यक्रम लक्षावधी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहे. दक्षिण भारतात तांदळाच्या एका जातीस ‘रेडिओ राईस’ म्हणून लोकप्रियता मिळाली हे कसे दुर्लक्षिता येईल? तमिळनाडूमध्ये मापिलई, साबा, पूनगार आणि कावूनी या तांदळाच्या चार पारंपरिक जाती समूहास ‘रेडिओ राईस’ संबोधलं गेलं. त्यामागे रेडिओवरचे कार्यक्रम ऐकून ऐकून प्रेरित झालेले शेतकरीच होते. आपली आवड, गीतगंगा, शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक प्रश्‍नोत्तरे, मान्यवर डॉक्टरांचा आरोग्यविषयक सल्ला अशा कार्यक्रमांना येणारी शेकडो पत्रे आणि आता ‘फोन इन’ कार्यक्रमांना मिळणारा थेट (डायरेक्ट) प्रतिसाद आजही रेडिओची गरज व लोकप्रियता दर्शवितात. उज्ज्वल परंपरा सांगणार्‍या लोककला : उदा. गवळण, भारूड, कीर्तन, भजन, वही गायन, कोळीगीतं, बंजारा गीते,जाकडीगीतं, नमन खेळे इ. सादर करणारे कलाकार यांना आकाशवाणीच उदार आश्रयदाते राहिली आहे, प्रोत्साहनाचा अखंड पाझर राहिली आहे.

आता प्रश्‍न एवढाच आहे, की या सर्व भूमिका पार पाडल्या असल्या तरी अजून पुढे लांबचा प्रवास करायचा आहे; मोठा पल्ला गाठायचा आहे. माध्यमांच्या भाऊगर्दीत आपले हक्काचे श्रोते टिकवायचे आहेत. हे करण्यासाठी आम्हांला आमची व्यावसायिक पात्रता उंच ठेवावी लागेल. अधिकाधिक प्रासंगिक राहावं लागेल. प्रसारण कर्मचार्‍यांमधील भ्रातृभाव वाढवावा लागेल. कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे शील राखण्यासाठी प्रसंगी कठोर व्हावे लागेल. केवळ अस्तित्वाची रक्षा हा फार खुजा लोकांपुढचा प्रश्‍न असतो. इथे प्रत्येक दिवसातला एकतरी कार्यक्रम अभिमान आणि आत्मगौरव द्विगुणित करणारा घडवायचा आहे.

* * * * *

Spool वर होणारे ध्वनिमुद्रण फार वेळ खाणारे. अगदी २००० पर्यंत ही पद्धत चालू होती.  तांत्रिक प्रगतीमुळे हे चित्र आता फार बदलले.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र सुधारणा झाली. आकाशवाणी मधल्या कामाचा आवाका तसेच गती दोन्ही वाढली.

लाडका अभिनेता राजकपूर ‘जयमाला ‘ सादर करायला विविध भारती स्टुडिओमध्ये आला तेव्हा बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवायची पाळी आली.

डिजिटल क्रांतीने कामात गती आणि सहजता आणली.  प्रसिद्ध लेखक आणि  विविध भारतीचे कार्यक्रम अधिकारी सुधीर ओखदे

Author

Leave a Reply