संपादकीय : डिसेंबर  २०२५

 टेल्को परिवाराचे मैत्र 

पूर्वी टेल्को या नावाने प्रसिद्ध असलेली टाटा समूहातील एक अग्रगण्य कंपनी आता टाटा मोटर्स नावाने ओळखली जाते. टेल्को हे नाव घेतले की आपल्याला अपरिहार्यपणे सुमंत मुळगावकर यांची आठवण होते. सुमंत मुळगावकर (जन्म : ५ मार्च १९०६, मृत्यू : १ जुलै १९८९) हे  दूरदृष्टीचे आणि देशाला स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न पाहणारे उद्योजक होते. त्यांना विशेषतः ‘टाटा मोटर्सचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते. जवळपास चार दशके त्यांनी टेल्कोचे नेतृत्व केले आणि या कंपनीला जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या एका विशाल अभियांत्रिकी कंपनीत रूपांतरित केले. त्यांच्या संकल्पनेतून टेल्को परिवारात अनेक नवनवीन प्रयोग झाले. गुणवत्तापूर्ण उत्पादन करणे हे त्या कंपनीचे एक वैशिष्ट्य होते. कंपनीसाठी सुप्रशिक्षित कामगार वर्ग असणे अत्यंत गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले होते. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत  मुळगावकर  यांचे एक स्वतंत्र धोरण होते. त्यांनी तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या विकासावर जोर दिला. जमशेदपूर आणि पुणे येथे तांत्रिक प्रशिक्षण विभाग सुरू केले, ज्यामुळे देशात कुशल तंत्रज्ञ तयार झाले. वाहन निर्मितीसाठी लागणारे गुंतागुंतीचे सुटे भाग (असेंब्लीज) देशातच बनवण्याचा त्यांनी आग्रह धरला. यामुळेच भारताचा वाहन उत्पादन क्षेत्रात आजचा उच्च क्रमांक आहे. ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेचा पाया त्यांनी ६०-७० च्या दशकातच घातला. टाटा मोटर्सने त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांच्या नावावरून ‘टाटा सुमो (SUMO)’ या प्रसिद्ध वाहनाला (Su-Moolgaokar) नाव दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९९० मध्ये मरणोत्तर ‘पद्मभूषण’ हा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. ते एक निसर्गप्रेमीही होते. पुण्यात टेल्कोचा कारखाना उभारताना त्यांनी ओसाड जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आणि पाण्याचे स्रोत निर्माण केले. भारतीय वाहन उद्योगाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणले आणि देशाला तांत्रिक व औद्योगिक आत्मनिर्भरतेकडे नेले.

    या विचारानेच  १९६६ साली टेल्को अप्रेंटिस स्कूलची स्थापना झाली. १९६१ सालच्या अप्रेंटिसशिप कायद्यानुसार यांचे कामकाज चालते. युवकांमध्ये व्यावसायिक कौशल्ये आणि उत्पादन उद्योगासाठी आवश्यक असलेली पायाभूत तांत्रिक कौशल्ये  विकसित करणे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगारासाठी तयार करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

त्यानंतर आजपर्यंत या संस्थेतून ५९ तुकड्या प्रशिक्षित होऊन बाहेर  पडल्या  आहेत. त्यांपैकी पहिल्या वीस बॅचेसच्या आठशेंहून अधिक मित्रांनी एकत्र येऊन नुकतेच पुण्यातील वानवडी येथे एक स्नेहसंमेलन साजरे केले. या कार्यक्रमाला टेल्को  प्रशिक्षण विभागाचे माजी व्यवस्थापक मोहन मते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.  टेल्को परिवारात या शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला फुल टाइम अप्रेंटिस अर्थातच एफटीए  म्हणून ओळखले जाते  व बॅच क्रमांकानुसार एफटीए १,२,१७ अशी ओळख सांगितली जाते. टेल्को कंपनीत काम करताना आवश्यक सर्व गोष्टी या प्रशिक्षणार्थींना शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेल्या अभ्यासक्रमाद्वारे शिकवल्या जातात. पहिली सुमारे सतरा वर्षे या प्रशिक्षण संस्थेतून बाहेर पडलेल्या प्रशिक्षणार्थींना टाटा मोटर्स त्यांच्या कंपनीत कायमस्वरूपी सामावून घेत असे.  त्यानंतर बदललेल्या औद्योगिक परिस्थितीमुळे आता सरसकट प्रत्येकाला कंपनीत थेट  भरती  करणे थांबले आहे; परंतु अत्यंत चांगले प्रशिक्षण देण्याची परंपरा मात्र अखंडित चालू आहे. याचा लाभ शेकडो युवकांना आजही मिळतो आहे. टाटा गुणवत्तेची मोहर घेऊन बाहेर पडलेल्या या युवकांना नोकरी मिळणे खूप सोपे जात असणार याची खातरी वाटते. 

      हल्ली कौशल्याधारित शिक्षण हे चलनी नाणे बनले आहे. नवीन शैक्षणिक विचाराचा तो आत्मा आहे. ‘शिक्षण कशासाठी’ याची शेकडे उत्तरे देता येतील.  सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोणातून हा प्रश्न विचारला गेला तर ‘शिक्षण रोजगारासाठी’ हेच सर्वात संयुक्तिक उत्तर आहे. १९६० च्या  दशकात  अशा प्रकारचा संपूर्णपणे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करणे, त्यासाठी आवश्यक  त्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि जवळपास ५९ वर्षे सातत्याने तो चालू ठेवणे हे कौतुकास्पद आहे. 

      या प्रशिक्षण कार्यक्रमातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे  स्वतःचे मोठमोठे व यशस्वी उद्योग उभे केले आहेत हे आणखी एक वैशिष्ट्य.  यामध्ये झेरेक्सस राव, अशोक भोसले, हनुमंत तरटे, मोहन भोसले, उमेश तायडे, मिलिंद आठवले  या काही ठळक नावांचा समावेश होतो. प्रशिक्षण काळात जे काही पाहिले व शिकले त्यातून या प्रेरणा निर्माण झाल्या असणार त्यात काही शंका नाही. यांतील काही प्रशिक्षणार्थींनी शासन सेवेत प्रवेश करून तेथेही चांगले काम केले आहे.  काही जणांनी वकिली व्यवसायात व कलाक्षेत्रात  स्पृहणीय यश मिळवले आहे. सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक हरी नरके आणि एव्हरेस्ट वीर सुरेंद्र चव्हाण हे देखील टेल्को परिवारातील होते . 

       देशापुढे सध्या असलेल्या अनेक प्रश्नांपैकी बेरोजगारी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या  दर्जेदार प्रशिक्षण संस्था  हे त्याला एक उत्तर असू शकते. 

Author

One thought on “संपादकीय : डिसेंबर  २०२५

  1. I have seen the growth of Telco trainees.Aprentice is given free hand in learning technical subjects and personal development fairly.,so as to become a ‘pukka ‘ expert not only in technical subjects,but also a good responsible citizen.
    Such training centres are no smaller than IITs/Management schools.

Leave a Reply