- बेंगरुळु, उगवणे ते मावळणे
‘अंतर्नाद’ मधील(नोव्हेंबर २०२५) बेंगळुरू विषयीचा लेख आवडला. २० नोव्हेंबर १९९४ ते २१ फेब्रुवारी १९९५ असे तीन महिने अध्ययनासाठी मला या शहरातील एका नामांकित संशोधन संस्थेत काढावे लागले. तेव्हा हे शहर आजच्याइतके घाईगर्दीचे धावपळीचे नव्हते; तरीही त्याच्या उगवणे ते मावळणेचा एक दमदार फ्लेवर, दरवळ मनीमानसी दाटून राहिला. ‘अस्तिसूत्र’ या माझ्या दीर्घकथेत ते तपशिलात आले आहे. व्हाईटफिल्ड, केंपगौडाचे नंदीमंदिर, इंदिरानगर उडुपी कॅफे ही सार्वकालिक दृष्टिरसनासुखाची आनंदनिधाने.
–प्रा. सुरेंद्र दरेकर पाटील
- ग. दि. माडगुळकरांनी लिहिलेली शेवटची कविता
नोव्हेंबर २०२५ च्या ‘अंतर्नाद’ मध्ये ‘बिनकाट्याचा गुलाब’ हा माझा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात ग. दि. माडगुळकरांनी आनंदवनातील मुक्तांगण मंचाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं लिहिलेल्या ‘आनंदसाधकांनो, या रे मिळून सारे.. मुक्तांगणात या रे, मुक्तांगणात या रे’ या गीताचा संदर्भ होता. त्याला जोडून ‘हे ग. दि. माडगुळकरांनी लिहिलेलं बहुधा शेवटचंच गीत’ असाही उल्लेख होता. त्यानंतरही एकदा गदिमांनी आनंदवनासाठी एक कविता लिहिली होती आणि तीच त्यांची शेवटची कविता ठरली. आनंदवनात वृक्षारोपणासाठी बालतरूच्या पालखीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या उपक्रमासाठी एक कविता लिहून देण्याची विनंती बाबा आमटे यांनी गदिमांना केली होती. ८ डिसेंबर १९७७ रोजी पु.लं. नी या विनंतीच्या आठवणीसाठी गदिमांना फोन केला. वास्तविक गदिमा तेव्हा खूप आजारी होते. तरीही त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ डिसेंबर १९७७ रोजी कविता लिहून तयार झाल्याचे पु.लं.ना कळवले. त्या कवितेच्या पहिल्या काही ओळी अशा होत्या:
‘कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा,
भूषवी अंगणा, येऊनिया |
माणसाचा स्नेह, स्वीकारी संगती
मानाचा अतिथी आमुचा तू |’
आनंदवनातील बालतरूच्या पालखीसाठी गदिमांनी लिहिलेली ‘कोवळ्या रोपट्या’ ही कविता ही त्यांची बहुधा शेवटची कविता ठरली. त्यानंतर पाचच दिवसांनी म्हणजे १४ डिसेंबर १९७७ रोजी गदिमांचे दु:खद निधन झाले.
डॉ. मंदार परांजपे, पुणे.भ्रमणध्वनी : ९८२२३ २५९३६
