तवाडा योको, जपानी – जर्मन लेखिका

  योको तवाडा (जन्म १९६०) या जपानी लेखिका सध्या बर्लिनमध्ये राहतात. यांचे हायस्कूलपर्यंत शिक्षण जपानमध्ये झाले. वयाच्या विसाव्या वर्षी त्या जर्मनीत स्थायिक झाल्या. उच्चशिक्षण जर्मनीत. ही माहिती नेटवरही मिळेल. मुख्य म्हणजे त्या जपानी आणि जर्मन दोन्ही भाषांत ललित तसेच वैचारिक लेखन करतात. मायबोलीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत लिहिणारे लेखक-लेखिका पूर्वी होऊन गेले आहेत; पण योको तवाडा जपानी तसेच जर्मन भाषेत लेखन करतात आणि दोन्ही भाषांतील लेखनाकरिता त्यांना दोन्ही देशांत पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची दोन पुस्तके इंग्लिशमध्ये अनुवादित झाली आहेत.  ‘The naked eye’ या पुस्तकात पाच वाक्ये जर्मनमध्ये, त्यांचा अनुवाद जपानी भाषेत, पुढची पाच वाक्ये जपानीत आणि त्यांचा अनुवाद जर्मनमध्ये असे हे पुस्तक आहे! त्यांना नोबेल मिळेल अशी पाश्चात्त्य साहित्य वर्तुळात चर्चा आहे. ‘द न्यूयॉर्कर,’ ‘वर्ड्स विदाउट ऑर्डर्स,’ ‘दि इकॉनॉमिस्ट’(लंडन) वगैरे मासिकांत त्यांच्यावरील लेख, मुलाखती वाचल्या. त्यांचे बहुभाषकत्वाबाबतचे विचार बोधक वाटले, ते वाचकांशी शेअर करत आहे.           

काव्यात्मक घळ                                                             

मायबोली ही खरी भाषा, नंतर शिकलेली दुसरी भाषा, ही उपरी भाषा असाही एक समज असतो पण त्याला योको तवाडा यांचा विरोध आहे. “मी जपानी भाषेची लेखिका किंवाजर्मन भाषेची लेखिका, असे काही मला व्हायचे आहे, असे मुळीच  नाही, या दोन भाषांमध्ये ‘पोएटिक रव्हीन’ ‘काव्यात्मक घळ’ आहे; तेथे विहार करायला मला आवडते,” असे योको तवाडा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. माझ्यापुढे प्रश्न होता तवाडा योको यांनी ‘काव्यात्मक घळ’ असे का म्हटले आहे?  या कल्पनेचा सहजासहजी अर्थ लागत नव्हता. त्याकरिता भाषा, बहुभाषिकता, अनुवाद यांवरील माझ्याजवळ असलेल्या बऱ्याच नोंदींचा धांडोळा घेतला. हळूहळू  अर्थ उकलू लागला, तो असा –भाषा हे संस्कृतीचे ठळक अंग. साहित्यसंस्कृतीचा आरंभ पद्याने झाला. मग गद्य आले. पौर्वात्य संस्कृतींमध्ये भाषेवर पद्याचा जास्त प्रभाव होता तितका प्रभाव पाश्चात्त्य संस्कृतींमध्ये नव्हता. जपानी भाषेवर तर काव्याचा गाढा प्रभाव आहे. १८६८ पर्यंत जपानमध्ये ‘सरकारी कागदपत्रे’ – डॉक्युमेंट्स’ पद्यात लिहिली जात असत. जपानी हायकू प्रसिद्ध आहेत.योको तवाडा जपानी असल्यामुळे त्यांनी काव्यात्मक शब्द वापरून दोन भाषांतील अरुंद दरीला काव्यात्मक म्हणणे साहजिक आहे. परकीय भाषेचे मातृभाषेत भाषांतर करताना त्या भाषेतील शब्दांचा अर्थ नुसता कोशात पाहून भाषांतर होत नाही. अनुवाद हा परकाया प्रवेश असतो. अनुवादक दुसऱ्या भाषिक संस्कृतीत कल्पनेने शिरतो. ही काव्यात्मक प्रक्रिया असते. कल्पनाक्षमता ही काव्याशी निगडित  आहे. अनुवादक अलगदपणे शब्द उचलतो आणि त्याच्या अनुवादात वापरतो, तेव्हा ‘कोशातील’ शब्दातून अर्थाची फुलपाखरे उडू लागतात. याकरिता शब्दांशी दोस्ती लागते. गणिती रामानुजनची आकड्यांशी दोस्ती होती. तो आकड्यांशी लीलया खेळत असे. अनुवादाचे असेच काहीसे असते.                                                  

कल्पनावाद                                                  

अनुवादात Imagism = कल्पनावाद ही चळवळ Ezra Pound (१८८५-१९७२) या  अमेरिकी कवीने आणली. त्याने Ernest Fenollosa (१८५३-१९०८) या  अमेरिकेतील  जपानी चित्रकलेच्या  इतिहासकाराने  चिनी भाषेतील कवितांच्या काही नोंदी केल्या होत्या. या नोंदी वापरून पौंडने Cathey ही कविता लिहिली. दोघांनाही चिनी भाषा येत नव्हती – किंवा जुजबी येत होती. अनुवाद कल्पनेने करायचे असतात अशी पौंडची थिअरी होती. त्याच्यावर बरेच वादही झाले; पण कल्पनावाद ही संकल्पना मात्र भाषांतरात रुजली.                                                    

संवाद-अनुवाद                                                                   

‘मातृभाषा हासुद्धा एक अनुवाद असतो,’ असे एका भाषाचिंतकाने म्हटले आहे ते काही अंशी खरे आहे. दोघेजण खास एकमेकांचे दोस्त आहेत. दोघांचा मायबोलीत संवाद चालू आहे तरी एकजण म्हणतो, “अरे तू काय म्हणतोस हे मला काही समजत नाही.” दोघेजण एकाच भाषेत बोलणारे मग हे कसे काय असा प्रश्न पडतो. त्याचे थोडे विश्लेषण केले पाहिजे.मिडीयम म्हणजे माध्यम. मराठी माध्यमाची शाळा – म्हणजे येथे शिक्षण मराठी भाषेतून दिले जाते. मिडीयममधील ‘इडियम’ हा शब्द ग्रीकमधून आला आहे. त्याचा अर्थ ‘खासगी’ ‘युनिक’ ‘विशिष्ट’ असा आहे.                    फ्रॉइडचा ‘id’ ‘इड’ म्हणजे माणसाच्या नेणिवेतील भाग. इथे निर्माण होते ती ‘इडियम’ म्हणजे प्रत्येकाची खासगी बोली. म्हणजे प्रत्येक माणूस त्याच्या खासगी बोलीत दुसऱ्याशी बोलतो, दुसरा त्याच्या बोलीत त्याच्या म्हणण्याचा अर्थ लावतो. म्हणून प्रत्येक संवाद हा एक प्रकारचा अनुवाद असतो. अनुवादात काहीतरी राहून जाण्याची शक्यता असते. म्हणून तर एकाच भाषेत बोलणारे कधीकधी एकमेकांना समजू शकत नाहीत.                                                   

भाषा आणि विचार                                                    

भाषा एकमेकांशी संपर्क, संवाद साधण्याकरता असते हे ठीक आहे; पण भाषा  मुळात विचार करण्यासाठी असते. विचार अमूर्त असले तरी आपण ‘भाषेत’ विचार करतो. विचार अमूर्त असतात म्हणजे काय? ‘विचार’ म्हणजे विचार करताना मेंदूपेशीत चाललेल्या प्रक्रिया. या प्रक्रियांचे ‘इलेक्ट्रो-केमिकल’ ‘विद्युत-रासायनिक’ संदेशवहन होऊन भाषाकेंद्रात जाऊन त्याचे आपण ज्या भाषेत विचार करत असतो त्या भाषेच्या शब्दांत रूपांतर होते. ‘ब्रेन-कंप्युटर-इंटरफेस’ या तंत्रज्ञानाने म्हणजे – मेंदू संगणकाला जोडून तयार केलेल्या तंत्रज्ञानाने ज्या व्यक्तीची वाचा स्ट्रोकमुळे गेली आहे ती व्यक्ती आपले विचार लिहू वा बोलू शकते. म्हणजे स्ट्रोकमुळे किंवा इतर कारणांमुळे भाषाकेंद्राला इजा झाल्याने  मेंदू ‘विचारांचे’ रूपांतर भाषेत करू शकत नाही म्हणून मेंदू संगणकाला जोडून ते काम संगणकाला करायला लावून अमूर्त विचारांचे रूपांतर शब्दांत केले जाते.       आज प्रायोगिक स्तरावर हे शक्य झाले आहे. उद्या ते व्यवहारात येईल. 

 शब्दांच्या पलीकडले                                                            

‘मला याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही,’ असे आपण काही वेळेला म्हणतो. काही कार्यक्रमांचे नाव ‘शब्दांच्या पलीकडले’ असे असते. शब्दांची अर्थ पोचवण्याची ताकद कमी पडते. मग माणूस भाषेला देहबोलीची, उच्चारातील चढ-उतारांची, चेहऱ्यावरील हावभावांची जोड देतो. शब्दांची शक्ती वाढवण्याकरता आणखी काय करता येईल याबाबत संशोधन चालू आहे. दोन भिन्न भाषांचा संकर झाला म्हणजे दोन्ही भाषांची ताकद वाढते. इंग्लीशच्या संपर्कामुळे मराठीत विराम चिन्हे आली, अ‍ॅ, ऑ, आले, मराठी भाषेची अर्थवाही होण्याची खुबी वाढली. लिखित भाषेला इमोजीची जोड म्हणजे जणू देहबोलीची जोड आहे. तेव्हा दोन भाषा शिकणे फायद्याचे ठरते.                       

बाह्यआवाज                                                       

 योको तवाडा यांनी ‘Exophony’ हे निबंध लिहिले आहेत. Exophony म्हणजे ‘बाह्यआवाज!’ याचा अर्थ मातृभाषा सोडून परभाषेत निर्मितिक्षम लेखन करणे. ग्रीक Exo = outside of आणि phony = sound. हा शब्द २००७ साली Susan Arndt आणि Robert Stockhammer या दोन जर्मन लेखकांनी गुंफला. योको तवाडा यांचे याच मथळ्याचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात बाह्यआवाजाचे विश्लेषण केले आहे. त्याचा थोडक्यात आशय पाहू.                           

प्रत्येक भाषेला संस्कृतीचे कुंपण असते. या कुंपणापलीकडचा शोध घ्यावा लागतो. याकरिता मायबोलीच्या कोशेट्यातून बाहेर पडावे लागते. या कोशातून बाहेर पडून दुसरी भाषा शिकल्यानंतर अभिव्यक्तीच्या शक्यता वाढतात. परभाषा शिकल्यामुळे माणूस त्याच्या गतकालापासून थोडा दूर जातो. सांस्कृतिक भिन्नता, फरक समजतात. दुसऱ्या भाषेत निर्मितिक्षम लेखन केल्याने त्या लेखकाचा वाचक वर्ग विस्तारतो.                                              ‘Archipelago of the Sun’ या कादंबरीत बहुभाषकत्वाचे फायदेच जणू सांगितले आहेत. पर्यावरणातील बदलामुळे हिरुको या मुलीची मातृभूमी गायब झाली आहे./तिचे बहुभाषक मित्र एका नावेत बसून हिरुकोच्या मायभूमीचा शोध घ्यावयास निघाले आहेत. त्यात सुसानू हा एक गूढ जपानी माणूस, ग्रीनलंडमधील तरुण नानुक,  नुट – एक डॅनिश भाषातज्ज्ञ – जो हिरुकोच्या प्रेमात आहे, नोरा ही जर्मन ग्रंथपाल आहे  जी नानुकवर मोहित आहे आणि आकाश हा भारतीय विद्यार्थी जो पुरुष असून स्त्री होऊ-इच्छित (पारलिंगी) आहे. हे सगळे बहुभाषक एकत्र प्रवास करत आहेत. ही ढोबळ कथावस्तू झाली. त्याचा गर असा आहे.  परदेशीपणा हा मानसिक आरोग्यासाठी चांगला असतो. हल्ली पराकोटीचा राष्ट्रीयवाद जगातील बहुतेक देशांत बोकाळला आहे. आमचा देश, आमची  संस्कृती,  ‘बेस्टायटीस’ ‘our-country-is-best-itis’  हा रोग बऱ्याच देशांतील लोकांना जडला आहे. बहुभाषकत्व हा त्यावर चांगला उतारा आहे. याचा राजकारणाशी काही संबंध नाही. भाषा ही सागरासारखी वाहत असते. बहुभाषक एकमेकांवर आपटतात आणि सगळ्यांचाच आकार थोडा थोडा बदलतो. हा मगज काव्यात्मक वाटला तरी बहुभाषा शिकण्याचे फायदे मेंदूविज्ञानानेसुद्धा सांगितले आहेत.  दुसरी भाषा शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. 

 

                                                                                                                                                                                                                                                           

Author

Leave a Reply