| अनंत लिमये हे पेशाने सिव्हिल इंजिनियर होते. त्यांनी ६० च्या दशकापासून पुढे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठी कंत्राटी पद्धतीने बरीच कामे केली.पंढरपूरचा नवीन पूल त्यांच्याच कारकिर्दीत झाला.कामानिमित्त ते रत्नागिरीत असताना लेखक श्याम जोगळेकर यांचे कुटुंब त्यांच्या शेजारी राहायचे. पुढे अनंतराव व श्याम जोगळेकर या दोघांनीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम केले. त्यामुळे पुन्हा एकदा ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. लेखाच्या निमित्ताने या स्नेहाला उजाळा देत अनंतरावांच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू श्याम जोगळेकर लेखाद्वारे मांडत आहेत. |
स्वातंत्र्यपूर्व काळात – विशेषतः एकोणिसाव्या शतकात – महाराष्ट्रामध्ये विविध शिक्षित राष्ट्रभक्तांनी देश स्वतंत्र होण्यासाठी विचारविनिमय सुरू केला होता. त्यामध्ये आधी राजकीय स्वातंत्र्य, की प्रथम सामाजिक सुधारणा हा वादाचा मुद्दा, लोकमान्य टिळक आणि सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्यात त्या काळात निर्माण झाला होता. देशाला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले, की नंतर सामाजिक सुधारणा करता येतील अशी बहुसंख्य लोकांची धारणा असल्यामुळे, इंग्रजांचे राज्य जाऊन, भारतीयांचे स्वराज्य स्थापन व्हावे, यासाठी हळूहळू संपूर्ण देशभर वातावरण निर्माण झाले. नंतरच्या काळात राजकीय स्वातंत्र्य हे सर्व समाजाचे एकमेव ध्येय निर्माण झाले. सर्व देशात या दृष्टीने समाजातील सर्व गटांनी प्रयत्न केले. परिणामी १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. गेल्या ७८ वर्षांत आपल्या भारत देशात विविध आर्थिक सुधारणा झाल्या. भारतीय घटनेच्या निर्मितीनंतर आपला देश प्रजासत्ताक झाला. भारतीय संविधानातील तरतुदींनुसार, संमत कायद्यांद्वारे काही सामाजिक सुधारणा झाल्या. परंतु या सामाजिक सुधारणांचा विविध क्षेत्रांतील वेग खूपच मंद असल्याने, विविध समाजसुधारक विचारवंतांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत या सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रयत्न सुरू केले. आपल्या समाजातील काही सामाजिक समस्यांची चिकित्सा करण्याच्या हेतूने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी, ९ ऑगस्ट,१९८९ रोजी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ची स्थापना केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंनिसची स्थापना केल्यानंतर अल्पावधीतच अलिबागमध्येही प्रा.पुरुषोत्तम गोखले यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनानुसार अंनिसची शाखा सुरू करण्यात आली. त्यासाठी डॉ.दाभोलकरांचे अलिबागला व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याला लोकांचा प्रतिसादही उत्तम मिळाला. त्या वेळी प्रा.विलास घळसासी, प्रा.शाम जोगळेकर, डॉ.अनिल पाटील, मुश्ताक घट्टे,भारती किल्लेकर, प्रा.अविनाश ओक, डॉ.शरद फुलारी, डॉ.के.एम.पाटील, शुभांगी जोगळेकर, नितीन राऊत, सतीश लोंढे, निलेश घरत इ. शिक्षक, विद्यार्थी आणि अन्य नागरिक सहभागी झाले होते. यापैकी काही आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.आपली दैनंदिन कामे सांभाळून अंनिसचे कार्यकर्ते कार्य करीत होते. अंनिसच्या कोकणासाठी सुरू झालेल्या दोन मोहिमा, सुरुवातीच्या काळात डॉ. दाभोलकर आणि पनवेलमधील मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर यांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या.
‘भूत शोध मोहीम’ आणि ‘चमत्कार दाखवा, अंनिसची या
त्रा आडवा’ या दोन मोहिमांची सुरुवात, कोकणातील विविध जिल्ह्यांसाठी पनवेलपासून सुरू झाली. अलिबागला जे.एस.एम.कॉलेजमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात या यात्रांना उत्तम प्रतिसाद मिळाला. त्या वेळी प्रात्यक्षिके, व्याख्याने असे कार्यक्रम झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि सोबतचे कार्यकर्ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत, नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सलग काही दिवस कार्यरत होते. या शोधमोहिमेत कोकणात एकही भूत सापडले नाही किंवा कोणताही दैवी चमत्कार सिद्ध झाला नाही. त्यामुळे दोन्ही यात्रांचा कार्यक्रम यथास्थित, यशस्वीपणे पार पडला.
अंनिसची माहिती देण्यासाठी सुरुवातीला ‘कवडसे’ नावाचे अनियतकालिक सुरू झाले. विविध अंकांत अंनिसच्या विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांची माहिती, वैचारिक लेख इ. प्रकाशित होत असत. अंनिसला वीस वर्षे पूर्ण झाल्यावर मुख्य कार्यक्रम ऑगस्ट, २००९ मध्ये झाला. त्यानंतर स्थापन झालेल्या अंनिस,अलिबागतर्फे एका स्मरणिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पेण येथील सहकार भवनमध्ये आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी डॉ.दाभोलकर आले होते. सुप्रसिद्ध पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते या स्मरणिकेचे एका दिमाखदार कार्यक्रमात प्रकाशन झाले होते. शारदा साठे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आम्ही काही कार्यकर्ते दाभोलकर यांच्यासह गप्पागोष्टी करीत होतो. ‘कवडसे’ हे मराठी अनियतकालिक सुरू होते, तसेच दाभोलकर यांनी एक इंग्रजी नियतकालिक सुरू केले होते. त्याचे संपादक पुण्याचे अनंत लिमये होते. त्याची आठवण झाल्याने मी दाभोलकर यांच्याकडे त्यांचा संपर्क क्रमांक मागितला. ‘माझा त्यांचा परिचय कसा?’ असे त्यांनी कुतूहलाने विचारले.
“मी त्यांचा बालमित्र!” असे म्हटल्यावर ते म्हणाले, ते तर तुमच्यापेक्षा वयाने बरेच मोठे आहेत. तुम्ही बालमित्र कसे काय? मी म्हटले, “आमची रत्नागिरीला भेट झाली, तेव्हा मी शाळकरी मुलगा होतो. डॉ. दाभोलकरांना मोठी गंमत वाटली आणि हसू आले. त्यांच्याकडून संपर्क क्रमांक मिळाला. लिमये अंनिसच्या कार्यासाठी, अगदी मध्यरात्रीही पाच आकडी रकमेचीही मदत देण्यास तयार असतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. हे ऐकून अनंतराव लिमये यांचे महानपण जाणवले. त्यानंतरही डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा सहवास विविध कार्यक्रमांतून घडत होता. आमच्या ‘लोकप्रबोधन’ या रायगडमधील सेवाभावी संस्थेने, रायगड जिल्हा परिषदेच्या आर्थिक सहकार्याने, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील, निवडक शिक्षकांसाठी, पाच वर्षांच्या काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत, तीन दिवसांची विज्ञान संस्कार शिबिरे आयोजित केली होती. खोपोलीला झालेल्या एका शिबिरात डॉ.दाभोलकर ‘वैज्ञानिक दृष्टिकोण’ या विषयावर शिक्षकांशी दीड-दोन तास मनसोक्त बोलले होते. अन्य शिबिरांत आमच्या विविध कार्यकर्त्यांनी, शिक्षकांशी विविध विषयांवर संवाद साधला होता. शिबिरांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण, मनोविज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन, सर्पविज्ञान, स्त्री आणि पुरुष समानता, संत, समाज सुधारक यांचे प्रबोधनाचे कार्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि संधारण, मानवी उत्क्रांती, ग्राहक-शिक्षण असे विविध विषय घेतले जात होते. नंतर प्रशिक्षित शिक्षकांसाठी अंनिसचा ‘सत्यशोध प्रज्ञा परीक्षा’ हा उपक्रम ठेवला गेला. त्याला काही काळ उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
कालांतराने अंनिसचे कार्यक्षेत्र आणि व्याप्ती वाढत गेली. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे दोन दिवसांचे राज्य अधिवेशन फेब्रुवारी,२०१३ मध्ये झाले होते. तेव्हा डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची भेट झाली होती. येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि अनेक हितचिंतकांनी विविध प्रकारे मदत केली होती. डॉ.दाभोलकरांच्या बहुतेक सर्व पुस्तकांची परीक्षणे करण्याची संधी मला वेळोवेळी प्राप्त झाली. त्यांचे नवीन पुस्तक प्रकाशित होताच, ते मला परीक्षणासाठी पाठवत असत. त्यांना कोणत्याही कारणासाठी पत्र लिहिले, की त्यांचे त्वरित उत्तर येत असे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास विभागातर्फे, गटविकास अधिकारी, ‘नागरी हक्क संरक्षण’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी मार्चमध्ये करीत असत. वाघ नावाचे तत्कालीन अधिकारी, माझे विद्यार्थी असल्याने, ते मला अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यान देण्यासाठी विविध ग्रामपंचायतीतून होणाऱ्या कार्यक्रमांना आवर्जून बोलवत असत. नेण्या-आणण्याची व्यवस्था त्यांच्या खात्यामार्फत होत असे आणि मानधनही दिले जात असे. मार्च,२००५पासून, सलग तीन वर्षे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर बोलण्याची मला संधी मिळाली होती. त्या वेळी विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडीतील शिक्षिका आणि मदतनीस, पोलीस इ. उपस्थित असत. अशा कार्यक्रमांतून नेमके काय बोलावे हे विचारण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मी पत्र पाठवले होते. त्याचे त्वरित उत्तरही आले होते. त्यामध्ये त्यांनी, तुम्हांला शासनातर्फे निमंत्रण येते, या विषयी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले होते. या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर तुम्हांला मार्गदर्शनाची गरज नाही, हेही त्यांनी नमूद केले होते. साप्ताहिक साधनाचे संपादक झाल्यावरही त्यांचे विविधांगी कार्य आणि त्यासाठी सर्वत्र बसने प्रवास हे सारे सातत्याने सुरू होते. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी, पुण्याला त्यांचा निर्घृण खून केला गेला आणि सारेच दुःखी झाले, बेचैन झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर गेले; पण त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य संपले नाही. उलट विविध अंगांनी ते विस्तारले गेले हे विशेष!
डॉ. दाभोलकरांकडून, त्या वेळी मला पुण्याला राहणाऱ्या अनंतराव लिमये यांचा दूरध्वनी संपर्क क्रमांक प्राप्त झाला आणि माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. अनंतराव साठच्या दशकात सुमारे पाच/सहा वर्षे रत्नागिरीला, टिळक आळीतील दीक्षित वाड्यात राहावयास आले होते. त्या वेळी त्यांचे रत्नागिरी तालुक्यात रस्ते बांधणीचे काम सुरू होते. आमच्या कुटुंबाशी परिचित आणि मोठ्या भावाचे मित्र बाळ जोगळेकर यांच्या आईने, अनंतरावांच्या पत्नीला, म्हणजे त्यांच्या भाचीला, सर्व प्रकारची मदत करावी, असा निरोप माझ्या आईला पाठवला होता. रत्नागिरीतील टिळक आळीतील दीक्षित वाड्यात, त्या वेळी नाना दीक्षित यांच्या शेजारी आमचे तीन मोठ्या खोल्यांच्या जागेत बिऱ्हाड होते. आमच्या घरावरील, पहिल्या मजल्यावर नुकतेच लग्न झालेले तरुण लिमये दाम्पत्य राहावयास आले होते. मी त्या वेळी शाळेत शिकत होतो. अनंतराव दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचे. लीलाताईंना नवीन घरात, नव्याने संसार मांडण्यास माझी आई मदत करीत होती. त्यांना काही हवे असेल तर मी आणि माझी धाकटी बहीण वासंती तत्परतेने मदत करीत होतो. त्यांच्याशी झालेल्या परिचयातून आमच्या दोघांच्या हळूहळू गप्पा सुरू झाल्या. वेळ असेल तेव्हा दिवसभरात त्यांच्याकडे जाणे आवडू लागले. रविवारी सुटीच्या दिवशी अनंतराव जीपने लीलाताईंना घेऊन दुपारनंतर फिरायला जात. मलाही बरोबर घेऊन जात. त्यांच्याबरोबर तेव्हा, खऱ्या अर्थाने, दूरवर पसरलेल्या रत्नागिरी शहराचे दर्शन घडले होते. अनंतराव रत्नागिरीतील गल्लीबोळांतून सफाईने आणि वेगाने जीप फिरवत असत. खूप मजा येई. गप्पागोष्टीही सुरू असत. अनंतराव आणि लीलाताई हे तरुण आणि परस्परांना अनुरूप असे सुंदर जोडपे होते. ‘साप्ताहिक सत्यशोधक’च्या लिमये परिवाराशी त्यांचा नातेसंबंध होता. विशेष म्हणजे आमच्या घराशिवाय त्यांचा दीक्षित वाड्यातील अन्य कोणाशी काही संबंध नव्हता. मात्र सर्वांना त्यांच्याविषयी कुतूहल वाटे. दोघांचे वागणे, बोलणे सौजन्याचे असे. अधूनमधून दोघेही, तर कधी लीलाताई एकट्याच पुण्याला जात असत. त्यांच्या मुलाच्या, विजयच्या जन्मानंतर (२०.३.१९६२) लीलाताई, छोट्या विजयला घेऊन रत्नागिरीला आल्या. विजयला खेळवायला मी, वासंतीसह त्यांच्या घरी वारंवार जात होतो. त्याच्या पालनपोषणासाठी माझ्या आईची त्यांना वारंवार मदत होत असे. सुरुवातीला विजय पुण्याहून रत्नागिरीला आल्यावर आजारी पडत असे. मात्र नंतर हळूहळू त्याच्या बाललीला वाढू लागल्या. एकदा त्याला खेळवताना, त्याच्याकडे असलेला रंगीबेरंगी, फुगवलेला मोठा फुगा त्याच्याकडे टाकल्याने, टेबलावरील त्याची दुधाची रिकामी, काचेची बाटली खाली पडून फुटली होती. आता लीलाताई ओरडतील अशी भीतीही वाटली; पण त्या म्हणाल्या, तेव्हापासून त्याची दुधाच्या बाटलीची सवय सुटली. नंतर त्याच्यासह लीलाताई पुण्याला अधूनमधून जाऊन, दीर्घकाळ राहू लागल्या. अनंतराव घरी असले की स्वच्छ लेंगाझब्बा या वेशात, मधल्या खोलीत छोट्या बॅगेतील टाइपराइटरवर पत्रे टाईप करीत. मला ते पाहावयास खूप आवडत असे. कामात गढून गेलेले ते छान दिसत – अगदी फोटो काढावेत असे! एकदा ते त्यांच्या शेजारच्या, छोट्या डबीतील काही खाताना दिसले. ते म्हणाले, ही थ्रीप्टीन बिस्किटे आहेत. दोन खाल्ली की भूक भागते. सुमारे साठ वर्षांपूर्वीचे हे दृश्य डोळ्यासमोर येते. आपणही मोठे झाल्यावर, असे छोट्या टाइपराइटरवर पत्रे टाइप करण्याचे माझे स्वप्न होते. नंतर त्यासाठी टाइपिंगही शिकलो. तसा टाइपराइटरही मिळवला; पण आता इंग्रजी पत्रे कोणाला लिहिणार, असा निरुत्तर करणारा प्रश्नही होताच! एकदा मे महिन्यात आमच्या गावाकडील घराजवळील हापूस आणि पायरीचे आंबे पेट्यांतून पुण्याला त्यांच्याकडे पाठवले होते. हे आंबे त्यांच्या घरातील सर्वांनाच खूप आवडले होते. कितीही पेट्या पाठविल्या तरी चालतील असे अनंतराव मग सांगत होते. डिसेंबर, १९६७ मध्ये पहाटे, झालेल्या प्रचंड भूकंपानंतर आणि नंतरच्या त्याच्या वारंवारतेमुळे, भीतीने वाड्यातील सर्व बिऱ्हाडकरू बिऱ्हाडांसमोरील लांबलचक पसरलेल्या अंगणात, रात्रीची अंथरुणे घालून झोपत असत.
अधूनमधून अनंतराव रात्री बाहेर पार्टीला किंवा जेवायला जाण्यापूर्वी आमच्या अंथरुणावर येऊन बसून गप्पा मारत असत, त्याची आठवण येते. नंतर त्यांचे येथील काम संपले. ते पुन्हा पुण्याला परत गेले. ‘१९२७, सदाशिव पेठ, पुणे- ३०’ हा त्यांनी दिलेला, पुण्याचा त्यांच्या घराचा पत्ता फक्त आमच्याकडे राहिला! माझ्या कॉलेजच्या शिक्षणाच्या काळात, दोन वर्षांनी आम्ही सड्यावरील, पहिल्या ‘रत्नागिरी हाऊसिंग सोसायटीत’ बांधलेल्या आमच्या नवीन घरात, १९६८मध्ये राहावयास गेलो. बालपणापासूनचा रत्नागिरी येथील टिळक आळीतील आणि सुमारे दहा वर्षांचा दीक्षित वाड्यातील आमचा अधिवास कायमचा संपला. तेथील मित्र, बालपणीचे सवंगडी दुरावले!
१९७० मध्ये माझी बी.ए.ची, अंतिम वर्षाची परीक्षा झाली. त्यानंतर ‘इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर’ पदासाठीची जाहिरात वृत्तपत्रांत आली होती. पदवीधारक आणि पदवी परीक्षेला बसलेले अर्ज करण्यास पात्र होते. जवळचे परीक्षा केंद्र पुणे होते. त्यासाठी मला प्रथमच पुण्याला जायचे होते. अनंतरावांकडे मी पोस्टकार्ड पाठवले. त्याच प्रमाणे माझ्या वडिलांनी त्यांना, “शाम परीक्षेसाठी तुमच्याकडे येऊ दे का?” अशी विचारणा करणारे पत्रही पाठवले. दिवसभर एस.टी. बसचा प्रवास करून, संध्याकाळी पुणे येथे पोहोचलो. बसस्टँडवर अनंतराव गाडी घेऊन आले होते. माझी बॅग त्यांनी घेतली आणि मी पुणे शहर पाहत त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांचा तीन मजली बंगला पाहून थक्क झालो. छोटी शारदा, विजय यांच्याशिवाय, अनंतरावांच्या दोन-तीन बहिणी आणि त्यांची मुलेमुली – माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली – शाळांना सुट्टी असल्याने मामाच्या घरी आली होती. रत्नागिरीकरांचा आंबे खाण्याचा हंगाम उशिरा सुरू होतो. पण पुण्याला त्यांच्याकडे मी प्रथमच त्या हंगामातील भरपूर आंबे खाऊन घेतले; शिवाय अनंतराव, पूर्वी आम्ही पाठवलेल्या आंब्यांचीही तारीफ करीत होते. या पाहुण्यांच्या गर्दीत लीलाताई फारशा भेटतच नव्हत्या. रविवारी सकाळी स्थानिक बसने पुणे रेल्वे स्टेशनजवळचे वाडिया कॉलेजमधील परीक्षा केंद्र पाहून लवकरच परतलो कारण बसला गर्दी नव्हती. पुणे शहराचे दर्शनही झाले. सोमवारी परीक्षेसाठी बसने जाण्यासाठी निघालो तर बसला प्रचंड गर्दी होती. पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशीही तसेच घडले. अखिल भारतीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेचा आणि पुण्यातील स्थानिक
बसमधील प्रचंड गर्दीचा माझा तो पहिलाच अनुभव होता. तेथील पुणेरी वातावरण अनुभवले. नंतर माझ्या या स्पर्धा परीक्षेविषयी, रत्नागिरीतील सुप्रसिद्ध प्राप्तिकर सल्लागार आणि आमचे स्नेही, वैद्यकाका म्हणाले होते, “अरे तुला हे पद झेपले असते का? बरे झाले, तुझी निवड झाली नाही.” ते असे का म्हणाले असावेत, ते मला तेव्हा फारसे कळले नाही. मात्र आता कालांतराने चांगलेच जाणवते आहे!
पुण्यातील स्पर्धा परीक्षा झाल्यावर मी काही दिवस अनंतरावांकडे राहिलो होतो. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्या मुला-मुलींबरोबर एकदा सकाळी पर्वतीला गेलो होतो. मी वयाने मोठा म्हणून लीलाताईंनी मुलांची आणि छोट्या विजयची जबाबदारी घेण्यासाठी सांगितले होते. पर्वतीच्या पायऱ्या चढून सर्वजण गेलो. माझी पर्वतीला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. येताना सर्व बालसेना, मुक्त वानरसेनेप्रमाणे दौडत निघाली. उतरताना मी पुरेशी काळजी घेत होतो. हळूहळू चालण्याचे रूपांतर जणू धावण्यात झाले. वेग वाढत गेला आणि छोटा विजय शेवटी, शेवटच्या पायरी जवळच्या भिंतीवर आपटला. त्याच्या कपाळाला इजा झाली, मोठे टेंगूळ आले. सारी मुले घाबरली. आम्ही घरी पोहोचलो. माझ्यावरील जबाबदारीमुळे माझी चिंता वाढली होती. नंतर डॉक्टरचे उपचार झाले. ही घटना, मी कधीही विसरलो नाही. नेहमी उतारावर जपून चालू लागलो. कालांतराने अलिबागला कनकेश्वरला हाच अनुभव वेळोवेळी घेता आला. जीवनात उतारावर जपून चालायचं असतं, हे वाढत्या वयात नंतर हळूहळू कळले! नंतर पुन्हा एकदा अनंतरावांच्या दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या बहिणींबरोबर पर्वतीवर गेलो होतो. पर्वतीवरील सर्व मंदिरे, स्मारके सावकाश पाहता आली. कार्तिकेयाचे मंदिर मी प्रथमच पाहिले. स्त्रियांना मंदिरात प्रवेश बंदी होती, तो फलक पाहून अनंतरावांच्या बहिणींपैकी एकीने मला इंग्रजीत त्याचे कारण विचारले. ‘कार्तिकेयाचे दर्शन स्त्रियांनी घेतले असता, पुढील सात जन्म वैधव्य प्राप्त होते,’ ही कथा मला माहीत होती; पण हे सर्व इंग्रजीत स्पष्ट करणे, माझ्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा मी काय उत्तर दिले होते, ते आता आठवत नाही. कालांतराने दक्षिण भारतातील कार्तिकस्वामी मंदिरात स्त्रियांना प्रवेश बंदी नसल्याचे पाहून मला अतीव आश्चर्य वाटले होते. हिंदू धर्मातील श्रद्धांमधील ही एवढी तफावत आणि विविधता मला थक्क करणारी वाटते आणि धक्कादायकही! पर्वतीहून येताना वाटेत एक ‘दौलत’ नावाचा बंगला दिसला. तो प्रसिद्ध लेखक प्रा.ना.सी. फडके यांचा होता. त्यांची मी ‘खेळणी’ ही कादंबरी वाचली होती; पण त्यानंतर मी पुन्हा प्रा. फडके यांच्या कादंबऱ्या अजिबात वाचल्या नाहीत – कारण वाचलेली कादंबरी पूर्णपणे फसलेली होती आणि ते आमच्या पिढीचे लेखक राहिले नव्हते. शारदा त्या वेळी खूपच लहान होती (जन्म : १७.९.१९६६) लीलाताई सर्वांचे उत्तम आदरातिथ्य करीत होत्या. कधी मी त्यांच्याबरोबर जाऊन भाजी आणि अन्य सामान आणण्यासाठी सोबत करीत होतो. येताना श्रमपरिहार म्हणून उसाचा रसही त्या प्रेमाने रसवंतीगृही जाऊन देत होत्या. एके दिवशी ‘पुणे शहर दर्शन बस’ने दिवसभर पुणे फिरलो. शिंदे छत्री, आगाखान पॅलेस, शनिवारवाडा ही ऐतिहासिक, प्रसिद्ध स्थळे प्रथमच पाहिली. त्या वेळी पुणे शहर दर्शन लक्झरी बसचे तिकीट फक्त सहा रुपये होते. आता हे आश्चर्यकारक वाटू शकते. पंचावन्न वर्षांपूर्वीची ही एक आठवण! अनंतरावांच्या घरामागेच जादूगार रघुवीर यांचा बंगला होता. त्या बंगल्याचे दर्शन त्या बसमधून उतरताना घडले होते. रत्नागिरीला जाण्याचे बसचे तिकीट निश्चित झाल्यावर, मी पुण्याला दोन दिवसांत तीन चित्रपट पाहिले. रत्नागिरीला त्या वेळी नवे चित्रपट खूप उशिरा, म्हणजे काही महिन्यांनी प्रदर्शित होत असत. ‘द ट्रेन,’ ‘कटी पतंग’ हे राजेश खन्नाचे दोन नवीन चित्रपट आणि ‘अपराध’ हा मराठी चित्रपट पाहिला. त्यामुळे लीलाताई म्हणाल्या, “अरे शाम ! घरी कळवू का?” मी निरुत्तर झालो! कारण तोपर्यंत महिन्यातून एखादा चित्रपट पाहण्याची परवानगी मला मिळत असे.
पुण्याला त्यांच्याकडे रात्री, तिसऱ्या मजल्यावरील मोठ्या हॉलमध्ये मी एकटाच झोपत असे. मला काहीशी भीतीही वाटे. परंतु सकाळी लवकर उठून, माझे सर्व आटपून, मी खाली जात असे. गप्पागोष्टींत छान वेळ जात असे. पुणेरी मुले कधीतरी माझ्या छानपैकी फिरक्याही घेत होती. तेथील आधुनिक संडासामध्ये प्रथमच मी मागील बाजूस खिडकीत, रीडर्स डायजेस्टच्या अंकांची चळत पाहिली होती. संडासामध्ये उत्तम वाचन होते आणि त्याच वेळी…! याची प्रथमच जाणीव झाली. कारण त्याआधी, रत्नागिरीतील, टिळक आळीतील, दूरवर असणारे संडास काळोखे, टोपलीचे होते आणि भयावहही!
एकदा अंघोळ करून बाहेर येताना, तेथील रॅकमधील बाटलीतील द्रव, खोबरेल समजून डोक्याला लावला. डोके चोळताच प्रचंड फेस आला. शांपूची जीवनातील ती पहिलीच ओळख होती! पुन्हा अंघोळ करावी लागली.
त्यानंतर दोन वर्षांनी, मी रत्नागिरीत एम.ए.(संपूर्ण अर्थशास्त्र) पूर्ण केले. लवकरच मी अलिबागला जे.एस.एम.कॉलेजमध्ये व्याख्यातापदी रुजू झालो. आता पुणे, मुंबई ही महानगरे तुलनेने जवळ आली होती. केव्हातरी पुण्याला जाणे होई. अलिबागला एकटा राहत असताना, शासकीय विश्रामगृहात भोजनासाठी जात असे. तेव्हा एकदा दुपारी अनंतराव लिमये अचानक भेटल्याचे आठवते. त्या वेळी आम्हां दोघांना अनपेक्षित भेटीने खूप आनंद झाला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भेटीनंतर, काही वर्षांनी आम्ही ठरवून लिमये यांचेकडे, दुपारी ९.२.२०११ रोजी जेवायला गेलो होतो. ते घरी एकटेच राहत होते. लीलाताईंच्या दीर्घ आजाराचे आणि त्यांच्या अकाली मृत्यूचे समजले होते. या विषयी गप्पा झाल्या. त्यांनी, त्यांच्या शारदा या मुलीविषयी अतिशय कौतुकाने सांगितले. शारदा बापटकडे तुला मी घेऊन जाईन, असेही ते म्हणाले. शारदा लहान असताना त्यांच्या घरी गेलो असता भेटली होती. पण त्यानंतर दीर्घकाळ आमच्या भेटी झाल्या नव्हत्या. शारदा बापटने तिच्या आईच्या आजारपणाचा आणि नंतर झालेल्या तिच्या अकाली मृत्यूचा धसका घेतला होता. शारदाला संसारात आणि आपल्या व्यवसायात रमल्यानंतरही, दीर्घ काळानंतर आईच्या आजाराचे सुयोग्य निदान होऊन तिच्यावर सुयोग्य उपचार व्हावेत, यासाठी डॉक्टर व्हावे असे वाटू लागले. डॉ.आनंद नाडकर्णी यांनी घेतलेल्या यू ट्यूबवरच्या सविस्तर मुलाखतीतून ती जिद्दीने डॉक्टर झाल्याचे उत्तम प्रकारे स्पष्ट होते. अनेक विषयांत, वाटणाऱ्या कुतूहलातून आणि त्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून शारदाचे व्यक्तिमत्त्व कसे संपन्न होत गेले, याची सविस्तर माहिती या मुलाखतीतून समजते. अनंतराव यांच्या निधनानंतर आम्ही दोघे पुण्याला गेलो असता, शारदा बापटच्या घरी, दुपारी, १५ जानेवारी, २०२१ रोजी जेवायला गेलो होतो. तिच्याशी भरपूर गप्पा झाल्या. यापूर्वी गेलो असतो तर अनंतरावही या गप्पांत सामील झाले असते, याची सखेद जाणीव झाली. अनंतरावांना माझ्या वृत्तपत्रांतील लेखनाचे, ग्राहक चळवळीतील कार्याचे आणि अंनिसमधील सक्रिय सहभागाचे खूप कौतुक वाटे. साप्ताहिक साधनामध्ये माझे लेखन प्रसिद्ध व्हावे, असेही त्यांना वाटे. कालांतराने माझे एका पुस्तकाचे परीक्षण साधनामध्ये प्रकाशित झाले; पण त्या वेळी अनंतराव हयात नव्हते. त्यांना माझ्यातील झालेल्या वैचारिक बदलांचे मोठे कौतुक वाटत असे. ते त्यांच्या प्रत्यक्ष किंवा फोनवरून होणाऱ्या संभाषणातून जाणवे. ‘शाळा भेट’ हे नामदेव माळी लिखित पुस्तक, अनंतरावांनी मला, त्यांच्या सहलीसाठी अलिबागजवळच्या नागावला आलेल्या एका मित्रांबरोबर ‘भेट’ म्हणून पाठवले होते. कालांतराने त्या पुस्तकावर माझे परीक्षण प्रकाशित झाले होते.
अनंतराव यांना ८६ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले होते (१३.१.१९३४ – ८.२.२०२०). परंतु लीलाताईंना जेमतेम साठ वर्षांचे आयुष्य लाभले होते (७.४.१९४३ – २.२.२००३). वयाची चाळिशी गाठण्यापूर्वीच त्या आजारी पडू लागल्या. नंतर त्यांच्या तब्येतीच्या तक्रारीही वाढत गेल्या. आजाराचे गांभीर्यही वाढले. आईच्या आजारपणाचे गांभीर्य आणि वाटणाऱ्या चिंतेमुळे शारदाने संसारात रमल्यानंतरही, उशिरा पण जिद्दीने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु तोपर्यंत तिची आई निवर्तली होती!
शारदाने अनंतरावांच्या आठवणी शब्दबद्ध कराव्यात असे मी तिला एकदा सुचविले. त्या वेळी ती म्हणाली की, ‘माझे आणि बाबांचे विचार अगदी एकसारखेच होते. तेव्हा काका तुम्हीच त्यांच्या आठवणी लिहून काढा.’ माझ्या स्मृतीतील, प्रामुख्याने माझ्या बालपणातील त्यांच्याशी निगडित आठवणी मी शब्दबद्ध केल्या आहेत. परंतु पिता आणि मुलीचे नाते, त्यांच्यातील भावबंध काही वेगळेच असतात. त्याचे दर्शन तिच्या लेखनातून व्यक्त व्हावे, यासाठी माझ्या तिला खूप सदिच्छा!
माणसाची जडणघडण विविध व्यक्तींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभावातून, त्यांनी मांडलेल्या विचारांतून होत असते. माझ्या जीवनामध्ये समकालीन परिचित व्यक्तींच्या लाभलेल्या सहवासाच्या प्रभावाचा समावेश आहे. तसेच पूर्वी होऊन गेलेल्या आणि त्यांपैकी काही काळाच्या पडद्याआड गेलेल्या, महान व्यक्तींच्या उपलब्ध लेखनामधून लाभलेल्या विचारांचा ठसाही कळत-नकळतपणे पडला आहे. व्यक्तीची जडणघडण कशा प्रकारे होते, हे प्रत्येकाला
कळत-नकळतपणे जीवनाच्या संध्याकाळी जाणवणे महत्त्वाचे आहे.
जीवनाच्या संध्याकाळी हे सिंहावलोकन आपणा सर्वांना सुखाचे आणि आनंदाचे ठरावे, असे मनापासून वाटते.
# # # #
लेखक प्रा. शाम जोगळेकर


तरुणपणीचे अनंतराव आणि लीलाताई

लिमये, बापट परिवाराचा एकत्रित फोटो, अनंतरावांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या भोजनाच्या वेळचा आहे.

बापट लिमये परिवार
