भूगोलाचे बंदी 

भारतीय माणूस व नकाशा यांची गाठ शालेय शिक्षणानंतर क्वचितच पडते. शालेय जीवनातसुद्धा भूगोलाचे शिक्षक भिंतीवरती मोठा नकाशा लावून जेव्हा काही शिकवतात तेव्हासुद्धा विद्यार्थी लांबूनच नकाशा बघतात. आपली नकाशाशी क्वचितच दोस्ती होते त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतेकांच्या दृष्टीने भूगोल हा काही महत्त्वाचा विषय नसतो. त्याचा परिणाम असा होतो, की आपल्याला दिशांचे भान नसते. एखादे शहर आपल्या गावाच्या उत्तरेला आहे का दक्षिणेला आहे हे नक्की सांगता येत नाही. आपण प्रवासाला निघाल्यानंतर आपण कोणत्या दिशेला जात आहोत याचा आपण कधीच विचार करीत नाही. 

    परंतु माणसाच्या जीवनात भूगोलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाचे खाणे-पिणे, कपडे, वागणे, धार्मिक कर्मकांडे, रंगाचा चॉईस, घरे बांधण्याच्या पद्धती, युद्धे, स्थलांतर अशा अनेक गोष्टी भूगोलच ठरवत आला आहे हे आपल्या चट्कन लक्षात येत नाही. आता  तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व सुलभ कनेक्टिव्हिटीमुळे ( संपर्कसाधनांमुळे) आपल्यात समानता आली आहे, असे जरी वाटत असले; तरी ती समानता सुपरफिशियल (वरवरची )आहे; कारण गेली शेकडो वर्षे भूगोलाने मानव समूहावरती जे संस्कार केले आहेत ते सहजासहजी पुसले जात नाहीत. हे संस्कार आता त्या त्या मानव समूहांच्या ‘डी एन ए’मध्ये घुसले आहेत याची अनेक उदाहरणे देता येतील.

१) मारवाडी बायकांना भडक रंग का आवडतात? 

२) अरब राष्ट्र सतत आपापसांत का भांडत असतात? 

३) युरोपियन देशाने वसाहती का निर्माण केल्या?

४) भारताने कधीच कोणावरती आक्रमण का केले नाही? 

५) हिंदू धर्म सहिष्णु का आहे? 

६)आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे रशिया – युक्रेन युद्ध का चालू आहे?

 या सर्व प्रश्नांच्या मुळाशी भूगोलच आहे असे सांगितले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. आता आपण प्रत्येक प्रश्नाची छाननी करू या.

१) मारवाडी बायकांना भडक रंग का आवडतात? 

राजस्थानमधील मारवाड हा प्रदेश भारतातील थर वाळवंटाच्या जवळचा प्रदेश आहे; त्यामुळे या भागात निसर्गात रंगांचे जे वैविध्य असते ते दिसत नाही. निसर्ग हा एकसुरी वाटतो.  निसर्गातील हा एकसुरीपणा रंगीत कपडे घालून मोडता येतो. त्यामुळे मनावर अल्हाददायी  परिणाम होतो. मारवाडी पुरुषांचे फेटेसुद्धा भडक रंगाचे असतात त्यामागे हेच कारण आहे. माणसाला जी गोष्ट सुख देते ती आवडते. तेव्हा या प्रश्नाच्या मुळाशी ‘वाळवंट’ हे भौगोलिक कारण आहे.

२) अरब देश सतत आपापसांत का भांडत असतात?

येथेसुद्धा वाळवंट हेच भौगोलिक कारण आहे. अरबस्तानातील वाळवंट हे थरच्या वाळवंटापेक्षा जास्त मोठे व जास्त भीषण आहे. तेथे पाणी व अन्न यांचे दुर्भिक्ष असल्याने प्रत्येक गोष्टीकरता संघर्ष करावा लागतो.  यातूनच टोळी संस्कृती निर्माण झाली व टोळीयुद्ध हा जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला; हे संस्कार रक्तात भिनले. 

   जिथे शेती होत नाही त्या भागातील माणसे व्यापारी  होतात. अरब व मारवाडी व्यापारी का आहेत यामागेसुद्धा भूगोल आहे. अरबस्थान जवळ समुद्राच्या पूर्वेला थोड्याच अंतरावरती भारतासारखा समृद्ध देश असल्यामुळे मुस्लीम धर्म अरबस्थानात स्थापन होण्याच्या आधीपासून अरब व्यापारी म्हणून भारतात येत होते. रोमन साम्राज्य व भारत यांच्यातील व्यापारावर अरबांचे वर्चस्व होते. स्वतःच्या देशात शेतीयोग्य जमीन नसणे व समुद्राचे सान्निध्य  ही दोन भौगोलिक कारणे अरब व्यापारी  असण्यामागे आहेत.

याच संदर्भात एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण देतो. पोर्तुगीज इंग्रजांच्या जवळजवळ शंभर वर्षे आधी भारतात आले; परंतु गोवा, मुंबई, वसई, दमण व दीव एवढ्या छोट्या प्रदेशावर त्यांची सत्ता मर्यादित राहिली. यामागे एक कारण असे आहे, की पोर्तुगाॅल येथून पाहिजे तेवढे तरुण भारतात येत नव्हते. राज्य जर वाढवायचे असेल तर आपली विश्वासातील माणसे लागतात; परंतु ती स्वदेशातून येत नव्हती. यामागे माझ्या मते शेती हे एक कारण होते. पोर्तुगाॅलमध्ये सोळाव्या शतकात चांगली शेती होत होती. मक्यासारखे नवीन पीक त्यांच्या हातात आले होते. ब्राझीलमधून आलेल्या एक्झॉटिक फळांची लागवड होत होती. त्यामुळे शेती किफायतशीर होती. त्यामुळे पोर्तुगीज तरुण जमीनजुमला सोडून भारतात येत नव्हता. याच्या अगदी विरुद्ध स्थिती इंग्लंडमध्ये होती. इंग्लंडमध्ये शेतीला महत्त्व नसल्याने ब्रिटिश तरुण नशीब काढण्यासाठी भारतात यायला तयार होता. त्यामुळे भारतात इंग्रजांची सत्ता वाढली व पोर्तुगीजांची सत्ता मर्यादित राहिली. तेव्हा भूगोल इतिहाससुद्धा घडवत असतो हे लक्षात येते. पोर्तुगीजांची सत्ता न वाढण्यामागे एक गैरभौगोलिक कारण आहे; ते म्हणजे धर्मप्रसार करणे व त्यासाठी अनन्वित छळ करणे यावर त्यांचा खूप भर होता. त्यामुळे ते अत्यंत अप्रिय झाले. असो! 

आता तिसरा प्रश्न तपासून पाहू. युरोपियन देशांनी वसाहती का निर्माण केल्या? आपण जर युरोपचा नकाशा नीट बघितला तर असे लक्षात येईल, की ज्या देशांना अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे त्याच देशांनी मोठ्या वसाहती निर्माण केल्या. असे देश म्हणजे  स्पेन, पोर्तुगाल, फ्रांस व इंग्लंड. इटली व जर्मनी या देशांनासुद्धा समुद्रकिनारा आहे; परंतु ते थेट अटलांटिक महासागरात प्रवेश करू शकत नाहीत; त्यामुळे त्यांच्या  नौदलाला मर्यादा येतात. त्यामुळे या देशांच्या वसाहती मर्यादित स्वरूपाच्या आहेत. वसाहती टिकवण्यासाठी बलाढ्य नौदलाची गरज असते. वसाहती निर्माण करण्याची प्रवृत्ती तयार होण्यामागे अनेक कारणे जरी असली तरी जमिनीची भूक हे महत्त्वाचे कारण आहे. युरोपियन देश खूप छोटे असल्याने त्यांना मोठ्या भूभागाचे आकर्षण होते.  त्यातूनच ही प्रवृत्ती निर्माण झाली; शिवाय वसाहतीतून लूटमार करून संपन्नता येते ही गोष्टही युरोपियन देशांच्या लक्षात आली.

   भारतीयांनी कोणावरही आक्रमण न करण्यामागे प्रचंड  भूभाग असणे हेच भौगोलिक कारण आहे. सुपीक जमीन, हवामानाचे वैविध्य व प्रचंड भूभाग यामुळे भारत हा त्या काळातील एक संपन्न देश होता व आजही आहे. संपन्नता सहिष्णुता निर्माण करते. भारतात निसर्गाची अनेक रूपे दिसतात. निसर्गातील साहचर्य व त्यातून निर्माण होणारे सहजीवन भारतीय अनुभवत होते म्हणूनच, ‘एकं  सत् विप्राः बहुधा वदन्ति’ अशी वाक्ये सांगितली गेली. सर्वसमावेशक भारतीय संस्कृती निर्माण होण्यामागे निसर्गरम्य भूगोलच कारणीभूत आहे. भारतीयांनी राजकीय वर्चस्व न गाजवता हजार वर्षांपूर्वीच्या ज्ञात जगावर सांस्कृतिक वर्चस्व मात्र गाजवले. त्याच्या पाऊलखुणा  आजसुद्धा दिसतात. असो! 

आता आपण रशियन-युक्रेन  युद्धाच्या भौगोलिक कारणाकडे वळू या. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावरती युक्रेन स्वतंत्र झाला व क्रिमिया हा युक्रेनचा भाग झाला. त्यामुळे ‘ब्लॅक सी’वरती असलेले सेव्हास्टोपोल  हे बंदर युक्रेनच्या ताब्यात गेले. हे बंदर बारमाही वापरण्यायोग्य आहे. रशियाची इतर बंदरे नॉर्थ सीवर असल्याने हिवाळ्यात ही बंदरे वापरता येत नाहीत. सेव्हास्टोपोलवरील ताबा गेल्यामुळे रशियाची कोंडी झाली. त्यामुळे २०१४ साली रशियाने आक्रमण करून क्रिमियावर ताबा मिळवला. आज क्रिमिया हा रशियन ऑक्युपाईड पार्ट ऑफ युक्रेन समजला जातो – पिओके सारखा. इंग्लंड, फ्रांस या १९ व्या शतकातील सुपर पॉवर्सनी नेहमीच झारच्या आधिपत्याखालील रशियाला ब्लॅक सीमध्ये प्रवेश मिळू नये म्हणून राजकारण केले आहे. त्यातूनच ऑक्टोबर १८५३ ते मार्च १८५६ या काळात रशियाविरुद्ध इंग्लंड, फ्रांस व ऑटोमन सुलतान ‘अब्दुल माजेद’ यांनी एकत्र येऊन रशियाला क्रिमियाचा ताबा मिळू दिला नाही. या युद्धात रशियाचा पराभव झाला. इतिहासात हे युद्ध क्रिमियन वॉर म्हणून प्रसिद्ध आहे. आज रशियन  नौदलाला भूमध्य समुद्रात यावयाचे असेल तर इस्तंबूल येथील बोस्फोरच्या चिंचोळ्या खाडीतून एजिअन (Aegean sea)या समुद्रामार्गे भूमध्य समुद्रात प्रवेश करावा लागतो. (नकाशा पाहावा.) याचा परिणाम असा झाला, की रशियाला नेहमीच तुर्कस्तानला पाठिंबा द्यावा लागतो. पण हे तुर्कस्तान (तुर्किया)वरचे परावलंबित्व कमी व्हावे म्हणून रशियाने सिरियाच्या भूमध्य समुद्रावरील टारटस् (Tartus )   हे बंदर नौदलाच्या तळासाठी भाड्याने घेतले होते; पण आता  सिरीयाच्या नवीन राजवटीने हा भाडेकरार रद्द केला आहे. या करारामुळे सिरियाचा माजी प्रमुख बशर अल असाद याचे रशियाबरोबर चांगले संबंध होते. सिरियात राज्यक्रांती झाल्यावर असाद रशियाला का पळून गेला हे कोडे उलगडते.

चांगला समुद्रकिनारा नसल्याने रशियन नौदल कधीच प्रबळ नव्हते. त्यामुळे रशियाच्या झारने आपले साम्राज्य पूर्वेकडे मध्य आशियाकडे वाढवले. रशियातील प्रचंड थंडीमुळेच नेपोलियन व हिटलरचा पराभव झाला. त्यामुळे असे म्हणतात, की ‘जनरल विंटर’ नेहमीच रशियाला मदत करतो. रशियाच्या प्रचंड आकाराची व लष्करी सामर्थ्याची पश्चिम युरोपला नेहमीच भीती वाटते म्हणून गेली  दोनशे वर्षे पश्चिम युरोप व आता अमेरिका रशियाची कोंडी कशी होईल या खटाटोपात असतात. यातूनच युक्रेन रशिया युद्ध चालू आहे.

    अमेरिकेच्या (USA) एका बाजूला अटलांटिक महासागर व दुसऱ्या बाजूला पॅसिफिक महासागर असल्याने अमेरिकेवर ‘पर्ल हार्बर’चा अपवाद वगळता कधीच आक्रमण झाले नाही. भूगोलाने अमेरिकेला संरक्षण दिले आहे व रशियाची कोंडी केली आहे.

   भूगोलामुळेच सिंधु- सरस्वती संकृती बहरली आणि भूगोलामुळेच ती नष्टही झाली.

     वरील विवेचनावरून हेच स्पष्ट होते, की भूगोलच इतिहास घडवत असतो. यावरून एक सुंदर वाक्य तयार झाले आहे. ‘History without geography is like a picture without canvas.’ तेव्हा भूगोलाचे सामर्थ्य आपण ओळखले पाहिजे.

               

Author

One thought on “भूगोलाचे बंदी 

Leave a Reply